आमच्या या भीतीग्रस्त काळात तुम्ही कोणावर खरोखरी भाव ठेवू शकाल?
“अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.”—स्तोत्रसंहिता १४६:३.
१. आमच्या काळाची कोणती गुणलक्षणे आहेत, व ती कसली गरज दाखवितात?
आम्ही बालक होतो त्यावेळी घाबरलेल्या स्थितीत असता आमच्या काळजी वाहणाऱ्या पालकांकडे आम्ही सांत्वन व संरक्षणासाठी धावत होतो. आमचा त्यांच्यावर भाव होता. आता प्रौढ झाल्यावर सुध्दा आम्हाला ज्यावर आपला भाव ठेवता येईल अशा कोणाची गरज सातत्याने लागते. खरे पाहता आजच्या काळात इतक्या भयग्रस्त गोष्टी होत आहेत म्हणून हे खासपणे जरुरीचे आहे. आपल्या काळाविषयीचे भाष्य करताना एका जर्मन वर्तमानपत्राने विवेचीत केलेः “जग पूर्वी कधीही नव्हते इतके भयाने ग्रस्त झाले आहे.” सध्या मानवजातीला ज्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्याविषयी मुत्सद्दी, पत्रकार आणि इतर लोकांनी आपली भीती वेळोवेळी व्यक्त केली आहे.
२. या पिढीत दिसून येणारे भय आणि भरवशाची उणीव याविषयी कसले भाकित करण्यात आले होते?
२ अशी ही विवेचने, येशू ख्रिस्ताने आमच्या काळाविषयीचे जे भाकित केले होते ते प्रवर्तित करते. तो म्हणाला होताः “रा घाबरी होऊन पेचात पडतील. भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील.” (लूक २१:२५, २६) पवित्र शास्त्राने आणखी असे भाकित केलेः “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील” आणि लोक ‘स्वतःवर प्रीती करणारे, बेईमानी, निंदक, आणि विश्वासघातकी होतील.’ हे उद्गार आमच्या काळाचे प्रमुख लक्षण, भरवशाची उणीव हे असेल असे दाखवितात.—२ तीमथ्यी ३:१-४.
कमी होत चाललेला भाव
३. आमच्या युगात भाव दुर्मिळ बनला आहे याचा कोणता पुरावा आहे?
३ आजच्या या भीतीग्रस्त काळात आम्हाला कोणीतरी भरवशाचे असावे हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. ते इमानी असावेत व आमच्या गरजेच्या वेळी त्यांनी सहाय्य द्यावे अशी अपेक्षा असते. तरीपण बहुतेकांना, त्यांनी ज्यांना भरवशाचे मानले होते त्यांच्याकडूनच निराशा मिळाली. एका देशातील वर्तमानपत्राने असे जाहीर केलेः “लोकांना बहुतेक सामाजिक संघटनांवर विश्वास वाटत नाही.” राजकीय मुत्सद्दी व व्यापारी नेते यांच्यावर कमी भाव व्यक्त होत आहे. विश्वस्तपणाचा अभाव कौटुंबिक वर्तुळातसुध्दा शिरला आहे हे घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणाद्वारे दिसून येते. काही देशात तीन विवाहामागे एक तर दोनास एक असेही घटस्फोटाचे प्रमाण दिसते. एका देशात सम्पन्न झालेल्या विवाहात ७० टक्के विवाह दहा वर्षातच घटस्फोटात संपले! अशाप्रकारे भाव हा दुर्मिळ होत चालला आहे. पूर्वी कोणी असे म्हटले की, “माझा कोणावरही विश्वास राहिला नाही” तर ते असाधारण वाटायचे पण आता ते तसे वाटत नाही.
४. भीतीचा परिणाम कित्येक तरुणांवर कसा होत आहे?
४ सबंध मानवी इतिहासातील हा अत्यंत भीतीग्रस्त काळ असल्यामुळे सर्वत्र इतका बेभरवसा दिसत आहे. या शतकाने दोन महायुध्दे व इतर कित्येक युध्दे पाहिली आहेत ज्यामध्ये लाखोंचे बळी घेतले गेले. आता अण्वस्त्रे ही पृथ्वीवरील जीवन समूळ उद्ध्वस्त करण्याची दहशत उभी करुन आहेत. यामुळे तर लहानांचाही भरवसा डगमगू लागला अहे. एका वैद्यकीय मासिकाने कळवलेः “अण्वस्त्राच्या भडक्याच्या दहशतीने अधिकाधिक मुले व बालकेसुध्दा घाबरु लागली आहेत.” कॅनडाच्या एका वृत्तपत्राने म्हटले की, आता कित्येक युवकात “द्वेषदर्शिता, निराशा आणि असहाय्यतेची भावना खेळू लागली आहे.” एका युवकाने म्हटलेः “प्रौढ जनांकरवी आम्हाला सुरक्षित असल्याचे वाटत नाही. पूर्वी कधी निपजली नाही अशी द्वेषदर्शिता बाळगणारी पीढी अशी आमची ख्याति होण्याची शक्यता वाटते.”
५. तान्ह्यांच्या अजाण व असहाय्य गटाला वाचा असती तर त्यांनी काय बोलून दाखविले असते?
५ प्रौढजनांकरवी सुरक्षित असल्याचे वाटत नाही अशाप्रकारचे भाष्य आणखी एका गटाला करता आले असते तर काय? हा गट म्हणजे तान्ही बाळके होय, ज्यांचा वध त्यांचा जन्म होण्याआधीच गर्भपाताकरवी होत असतो. दर वर्षी जगभरात साधारण ५ कोटी ५० लाख गर्भपात घडतात असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. मानवजातीच्या अशा या अजाण व असहाय गटाचा केवढा हा विश्वासघात!
६. आमच्या काळातील गुन्हेगारीमुळे विश्वास कसा उडत चालला आहे?
६ आमच्या काळी आणखी एका भीतीची वाढ होत असल्यामुळे बेभरवसा वाढता दिसत आहेः ते भय आहे हिंसाचारात बळी पडण्याचे. आता कित्येक जण त्या एका स्त्रीचे अनुकरण करीत आहेत जी म्हणते की, ती रोज रात्री आपल्या उशीखाली पिस्तुल घेऊन झोपते. आणखी एका भीतीग्रस्त स्त्रीने म्हटलेः “मला तर भारी उद्वीग्नता वाटते. . . . माझी आजी तर आपल्या काळी दरवाजाला कुलुप घालतच नव्हती.” तद्वत, प्युर्टो रिको येथील एका वृत्तपत्राच्या संपादकीय लेखात म्हणण्यात आलेः “आम्ही आता जणू कैदत आहोत.” होय, आम्ही स्वतःच्याच घरात गजाआड किंवा कुलुपे घालून बंदिस्त आहोत. ही भीती साधार आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेत तीन स्त्रियांपैकी एकीवर तिच्या आयुष्यमानात कधी ना कधी हल्ला होतोच. तेथील शस्त्रक्रिया करणाऱ्या एका तज्ञांनी म्हटलेः “खून, बलात्कार, बायकोस केली जाणारी मारहाण, मुलांना गैरपणे वागविणे आणि पाठीत वार करणे अशा या गंभीर हिंसाचारात दरवर्षी साधारणतः चाळीस लाख अमेरिकन लोक बळी पडतात.” ही गुन्हेगारी इतर देशातहि साधारण आहे आणि अशामुळेच लोकांचा विश्वास उडत राहतो.
७. वाईट आर्थिक स्थिती बेभरवसा अधिक का वाढविते?
७ अविकसित देशात बहुतेक गरीबीत राहतात. आपल्याला यातून कोणी बाहेर काढील याचा फारच थोड्यांना भरवसा वाटतो. अशा एका देशातील अध्यक्षांनी म्हटले की एका राज्यात जन्मलेल्या दर हजार बालकात २७० बालके एका वर्षाची होण्याआधीच मरतात. दर १०० घरात केवळ एकाकडेच पाणी असते. दुसऱ्या एका देशातील सरकार म्हणते की, त्यांच्या बालकांमध्ये ६० टक्के गरजवंत आहेत आणि अशीच अनाथ असणारी ७० लाख मुले “अशिक्षित, दुरावलेली स्थिती व काम करण्यास अपात्र असणाऱ्या स्थितीत भटकत आहेत.” अमेरिकेत घर नसलेल्या युवकांची संख्या ५ लाख असल्याचा अंदाज काढण्यात आला पण काही म्हणतात की ती यापेक्षा अधिक आहे. अशा मुलांठायी आपल्या पालकांबद्दल, समाजात, कायदा व सुव्यवस्था आणि पुढाऱ्यांची अभिवचने यावर केवढा भरवसा राहणार?
८. (अ) धनाढ्य राष्ट्रांची स्थैर्यता व गोलार्धव्याप्त अर्थव्यवस्था कशी दहशत उभी करुन आहे? (ब) आर्थिक व्यवस्था सोडविण्याच्या बाबतीत तज्ज्ञांवर केवढ्या प्रमाणात भाव ठेवता येण्याजोगा आहे?
८ आर्थिक समस्या धनाढ्य राष्ट्रांनाही भेडसावते. १९३०च्या काळातील मंदीनंतर आता अलिकडेच अमेरिकेत कित्येक मोठ्या बँका अपयशी ठरल्या. एका अर्थतज्ञाने लिहिलेः “१९२०शी मध्ये जशी मंदी होती त्याप्रमाणे बँकांच्या सर्वसाधारण व्यवस्था नाजूक होत आहेत.” एका निरिक्षकाने म्हटले की, आर्थिक जगतात “एक हानिकारी वादळ उद्भवण्याचा धोका संभवत असल्याचे दिसतो.” आणखी एकाने म्हटलेः “आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारा तणाव आता कुठे खोळंबून नाही, तो आलाच आहे त्यामुळे मोठी निकडीची परिस्थिती जाणवते.” अशा या त्रासातून बाहेर पडण्याच्या बाबतीत कोणा अर्थतज्ज्ञावर भाव ठेवता येईल का? यांच्यापैकी एकाने म्हटले की, त्यांनी भाकित केलेले अनुमान “इतके पाचावर धारण बसवते की त्यामुळे सर्वत्र गोंधळ पसरलेला दिसतो.”
अनाठायी आशावाद
९. (अ) या शतकाच्या आरंभाला जो आशावादी दृष्टीकोण राखण्यात आला होता त्याचे काय झाले? (ब) १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या दस्तऐवजावर यहोवाच्या साक्षीदारांनी आपली स्वाक्षरी करण्याचे का पत्करले नव्हते?
९ हे सारे काही, जग २०व्या शतकात शिरले तेव्हा बाळगलेल्या आशेपेक्षा किती वेगळे दिसते बरे! त्या आधी कित्येक दशकात शांती नांदत होती आणि आता शांतीचा एक नवा उच्चांक गाठला जाईल अशी आशा धरण्यात आली होती. पण १९१४ च्या युध्दाने त्या आशेचा पार चुराडा केला. १९४५ च्या दुसऱ्या भयंकर महायुध्दानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेवर स्वाक्षऱ्या झाल्या. यावेळी राष्ट्रांनी युध्दानंतरची जागतिक शांती, समृध्दता, आणि न्याय याविषयी राखलेला दृष्टांत लिखाणबध्द केला. अलिकडचाच एक वृत्तांत कळवतोः “अंतिम कागदपत्रावर, सर्व खंड, वंश व धर्म यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ५१ देशाच्या स्वाक्षऱ्या झाल्या.” तथापि, एक असा धर्म होता ज्याचे प्रतिनिधित्व करण्यात आले नाही, किंवा ज्याची तशी इच्छा नव्हती व ते आहेतः यहोवाचे साक्षीदार. शांती, समृध्दता व न्याय याविषयीची ती अभिवचने या जगाच्या कोणत्याही राष्ट्राला वा त्याच्याशी संलग्न असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघासारख्या कोणाही संस्थेला पूर्ण करता येणार नाहीत हे त्यांना ठाऊक आहे.
१०. संयुक्त राष्ट्रसंघाने मागे १९४५ मध्ये जे स्वप्न पाहिले होते त्याच्या तुलनेत आजची खरी वास्तवता कशी दिसते?
१० तोच अहवाल पुढे म्हणतोः ‘चाळीस वर्षांनी त्या तत्वप्रणालीची पुन्हा उजळणी करणे योग्य वाटले. पण पुरावा मोठा गंभीर दिसला. निःपक्षपातीपणाची उणीव, कमी स्वरुपाचा सुरक्षितपणा आणि वाढता हिंसाचार ही वस्तुस्थिती दिसते आहे. अन्न, पाणी, निवारा, आरोग्य चिकित्सा आणि शिक्षण यांची गरज असलेली लोकसंख्या मात्र वाढत आहे. हे १९४५ मध्ये पाहिलेले ते स्वप्न नव्हते.’ पुढे म्हटले आहेः ‘राष्ट्रांनी एकत्र येऊन भय व गरज यापासून मुक्त असणारे जग लोकांना देऊ असे ठरविल्यानंतर आता चाळीस वर्षानंतर असे दिसते आहे की मानवजातीचा एक चतुर्थांश भाग हा दारिद्र्याखाली भरडला जात आहे. भूकबळीने होणारे दरदिवशीचे मृत्यु साधारणपणे ५०,००० असल्याचे सांगितले जाते.’ असे आहे तरी रा युध्दासाठी एका तासाला एक कोटीपेक्षा अधिक डॉलर्स खर्च करीत आहेत!
११. मानवाने चांगल्या जगाविषयीची दिलेली अभिवचने केवढी विश्वासपात्र वाटतात?
११ एक शतकभर मिळालेल्या संधीमध्ये हा जो उदास अहवाल गाठला गेला त्याच्या दृष्टीकोनातून पाहता या सर्व समस्यांचे उच्चाटन करण्याविषयी मानवाने दिलेल्या अभिवचनांवर भाव ठेवता येईल का? अशी ही अभिवचने समुद्रावरील मोठ्या जहाजाच्या कप्तानाने जे उद्गार काढले होते तेवढ्याच विश्वासपात्रतेची वाटतात. त्याने म्हटले होतेः “हे [मोठे] जहाज पाण्याखाली जाईल अशी कोणतीहि संभाव्य परिस्थिती मला दिसत नाही. . . . जहाजाच्या आधुनिक तंत्रज्ञानाने खूप मोठी मजल मारली आहे.” त्या जहाजाच्या कर्मचाऱ्यांपैकी एकाने प्रवाश्यासोबत बोलताना म्हटले होतेः “देवालाही हे जहाज पाण्याखाली बुडवता येणार नाही.” तरीपण तेच टिटॅनिक जहाज १९१२ मध्ये बुडाले व त्याने १,५०० लोकांना जलसमाधी दिली. १९३१ मध्ये अमेरिकेतील नॅशनल एज्युकेशन या संस्थेने म्हटले की शिक्षणाच्या जोरावर “१९५०च्या आधीच गुन्हेगारी ही बहुतेक नष्ट झालेली दिसेल.” १९३६ मध्ये एका ब्रिटीश पत्रकाराने असे लिहिले की, १९६० पर्यंत “अन्न, वस्त्र व निवारा या गोष्टी हवेची जशी काहीच किंमत नाही तितक्या स्वस्त असतील.” पण आजची वस्तुस्थिती पाहिल्यावर ती अभिवचने किती खोटी होती याजशी तुम्ही सहमत होणार नाही का?
ज्याच्यावर पूर्ण भाव ठेवता येईल असा तो
१२. आम्ही कोणावर पूर्णपणे आपला भाव ठेवू शकतो व त्याने आम्हासाठी कोणता मार्गदर्शक दिला आहे?
१२ तर मग या भयग्रस्त काळात आमची मदत होईल याकरता भाव ठेवण्यासाठी कोणीतरी असावा याची आम्हाला अत्यंत गरज आहे. हा कोणीतरी मानव असून चालणार नाही. मानवजातीने स्वतःला समस्यांच्या खाईत इतके खोल नेले आहे की तिला स्वतःला बाहेर येणे मुष्कीलीचे झाले आहे. तद्वत, तो उगम मानवाचा निर्माता, यहोवा देव हा असणे अगदी उचित वाटते. त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहता येऊ शकते. हे जग या स्थितीला का आले आहे, ते कोठे जात आहे व शिवाय याच्यासाठी कोणता उपाय आहे हे त्याला माहीत आहे. या गोष्टीची माहिती त्याने आम्हाला मार्गदर्शनार्थ दिलेल्या पुस्तकात म्हणजे पवित्र शास्त्रात दिली आहे. या पुस्तकाविषयी २ रे तीमथ्यी ३:१६, १७ म्हणतेः “सर्व शास्त्रवचने देवाकडून प्रेरित झाली असून ती सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक व नीतीशिक्षण याकरता उपयोगी आहेत. याद्वारे देवभक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामास सिध्द होतो.”
१३. पवित्र शास्त्राविषयी यहोवाचे साक्षीदार काय मानतात?
१३ त्या प्रबळ विधानांकडे लक्ष द्या. देवाचे प्रेरित वचन सर्व गोष्टी सुधारते. ते योग्य काय ते आम्हास सांगते. ते आम्हाला पूर्णरुपाने सिध्द बनवते. योग्य गोष्टींकरता ते आमची पूर्ण तयारी करते. हे खरे की पुष्कळ लोक पवित्र शास्त्राचा देवाचे वचन या अर्थाने स्विकार करीत नाही. पण यहोवाचे साक्षीदार करतात. (१ थेस्सलनीकाकर २:१३) करोडो आकाशगंगा तसेच अब्जावधी तारे असणाऱ्या या अचंबित विश्वाच्या निर्मात्यास एका पुस्तकाची निर्मिती करणे शक्य आहे असे आम्ही मानतो. या पुस्तकातील अचूकता सत्य शोधकांच्या लाभास्तव सांभाळली जात आहे याकडे लक्ष देण्याची क्षमता त्याच्यापाशी आहे.—१ पेत्र १:२५.
१४. आजच्या काळाच्या वास्तवतेसोबत पवित्र शास्त्र कसे सुसंगत आहे?
१४ आमच्या या भीतीग्रस्त काळी देवाच्या वचनाला विश्वासपात्रतेविषयी काय म्हणायचे आहे? त्यात असलेली विवेचने आज अस्तित्वात असणाऱ्या परिस्थितीबरोबर तंतोतंत जुळतात. यिर्मया १०:२३ अगदी अचूकपणे म्हणते: “हे यहोवा, मला पूर्णपणे ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही. पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” तसेच स्तोत्रसंहिता १४६:३ अगदी उचितपणे आर्जवितेः “अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.”
१५. भाव ठेवण्याविषयी पवित्र शास्त्र आम्हाला कोणता सल्ला देते?
१५ देवाचे वचन आम्हाला, आम्ही मानव अपूर्ण असल्यामुळे स्वतःवर देखील भाव ठेऊ नये असा सावधानीचा इशारा देते. (रोमकर ५:१२) यिर्मया १७:९ असे निरिक्षण मांडतेः “हृदय सर्वात कपटी आहे.” यामुळेच नीतीसूत्रे २८:२६ सांगतेः “जो आपल्या हृदयावर भरवसा ठेवतो तो मूर्ख; पण जो सुज्ञतेने चालतो त्याचा बचाव होतो.” तर मग हा बचाव मिळण्यासारखे सुज्ञान आम्हाला कोठे मिळू शकेल? नीतीसूत्रे ९:१० म्हणतेः “यहोवाचे भय हा ज्ञानाचा आरंभ होय, आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय.” खरेच, निर्माणकर्त्याकडील सुज्ञानच आम्हाला या भीतीग्रस्त काळात योग्य ते मार्गदर्शन देऊ शकते. या कारणास्तव, नीतीसूत्रे ३:५, ६ आम्हाला सल्ला देतेः “तू आपल्या अगदी अंतःकरणापासून यहोवावर भाव ठेव. आपल्याच बुध्दीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”
जगातील धर्मांविषयीचा देवाचा दृष्टीकोण
१६. येशूच्या काळातील परुश्यांप्रमाणे या जगाचे धर्म आपणापाशी कोणती चुकीची धारणा धरुन आहेत?
१६ देवाकडील या सुज्ञानामुळे आम्हाला, जगाच्या धर्मांनी स्वतःला ज्या मरणप्राय खाईत अडकविले आहे त्यात पडण्यापासून आवरता येईल. त्यांना वाटते की आम्ही धार्मिक आहोत म्हणून नीतीमान आहोत. त्यांची ही प्रवृत्ती लूक १८:९ मध्ये चांगली वर्णिली आहेः “आपण धार्मिक आहोत असा जे कित्येक स्वतःविषयीचा भरवसा धरुन . . . होते, त्यांना त्याने [येशूने] दाखला सांगितला.” एका परुश्याने, तो पापी नाही यासाठी देवाचे आभार मानले, पण एक जकातदार ही काकळूत करीत राहिलाः “हे देवा, मज पाप्यावर दया कर.” तेव्हा येशूने म्हटलेः “त्या दुसऱ्यापेक्षा [परुशी] हा [पापी] नीतीमान ठरुन आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपणाला नमवितो तो उंच केला जाईल.”—लूक १८:१०-१४.
१७. परुश्यांसारखा जे धार्मिक प्रयत्न करतात त्यांच्याविषयी देव कोणता दृष्टीकोण धरुन आहे?
१७ परुश्याने स्वतःला देवापुढे नम्र केले नाही. उलटपक्षी, आपण, आपल्या दर्जांमुळे नीतीमान आहोत अशी त्याने स्वतःची धारणा करुन घेतली. पण देवाचा असा दृष्टीकोण नव्हता. (मत्तय २३:२५-२८) परंतु, त्या नम्र पाप्याने, देवाच्या वचनात यशया ६६:२ मध्ये जो दृष्टीकोण नमूद आहे तोच प्रवर्तित केलाः “जो दीन व भग्नहृदयी आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो, त्याजकडे मी पाहतो.” यहुदी धर्मपुढारी देवाच्या वचनाने कंपायमान झाले नाहीत. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आपल्याला जे बरे दिसते ते त्यांनी केले व स्वतःला असे वाटू दिले की देव याविषयीची पसंती राखतो. तरीपण येशू त्यांना म्हणालाः “मला ‘प्रभुजी, प्रभुजी’ असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असे नाही, तर जो माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी मला पुष्कळ जण म्हणतीलः ‘प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो, अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा.”—मत्तय ७:२१-२३.
१८. देवाची सेवा करीत आहोत असा दावा करणाऱ्या पण त्याच्या कायद्यांसोबत सुसंगत न राहणाऱ्या धर्मांचा देव कसा न्यायनिवाडा करणार?
१८ पहिल्या शतकातील त्या धर्मपुढाऱ्यांनी देवावर आपला भाव ठेवला नाही. उलट, देवाच्या नियमांचा भंग करणाऱ्या सांप्रदायांना त्यांनी आपल्या उराशी धरले. (मत्तय १५:३, ९) या कारणास्तव येशू त्यांना म्हणालाः “तुमचे घर तुम्हावर ओसाड सोडले आहे.” (मत्तय २३:३८) त्या यहुदी धर्माला देवाने खरेच सोडून टाकले आहे हे आमच्या समान शकाच्या ७०व्या वर्षी रोमी सैन्याने यहुद्यांची राष्ट्रीय राजधानी यरुशलेम आणि त्यातील मंदीर यांची जी धूळधाण केली त्याकरवी सुस्पष्ट झाले. आज यात काही बदल नाही. या जगाच्या धर्मांनी भक्तीविषयीचे स्वतःचे दर्जे स्थापित केले आहेत व हे दर्जे देवाच्या दर्जांशी सुसंगत नाहीत. त्यामुळे ते देवाची नव्हे तर स्वतःची इच्छा करु पाहात आहेत. याकारणास्तव ते देवाच्या नजरेत अनाचार करणारे असे दिसतात. (तीत १:१६) देवाने या धर्मांचा त्याग केला आहे हे राष्ट्रांकरवी लवकरच त्यांना उद्ध्वस्त केले जाणार त्याद्वारे प्रत्ययास येईल. पहिल्या शतकात यरुशलेम व त्यातील मंदीर हे रोमी सैन्याकरवी अशाच पध्दतीने उद्ध्वस्त करण्यात आले होते.—पहा प्रकटीकरण, अध्याय १७, १८.
१९. धर्माविषयी कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात?
१९ जागतिक धर्मांचा केलेला हा निवाडा फारच कटु वाटतो का? देवाचा हा निवाडा लवकरच संपन्न होणार याविषयीची आम्हाला कशी खात्री बाळगता येईल? देवाची मर्जी संपादित करावयाची आहे तर एखाद्या धर्माने काय केले पाहिजे? जे यहोवाकडे प्रांजळपणे वळतात व त्याच्या आज्ञांच्या अधीन राहतात अशा लोकांचे यहोवा संरक्षण करतो हे दाखविण्यासाठी काही ऐतिहासिक घटना उपलब्ध आहेत का? या प्रश्नांविषयी पुढील लेख आपले विवेचन सादर करील.
उजळणीसाठी प्रश्न
◻ आमच्या काळी कोणकोणत्या गोष्टीमुळे बेभरवसा वाढीस लागला आहे?
◻ या जगाचा आशावाद चुकीचा का ठरला?
◻ आम्ही कोणावर पूर्णपणे भाव ठेवू शकतो व त्याने आम्हासाठी कोणता मार्गदर्शक दिला आहे?
◻ आम्ही आपणा स्वतःवर किंवा इतर मानवावर का भाव ठेवू नये?
◻ देव या जगाच्या धर्मांकडे कोणत्या दृष्टीकोनातून बघतो?
[१३ पानांवरील चित्रं]
आपण धार्मिक आहोत असे परुश्याला वाटत होते, पण पाप्याने अगदी नम्रपणे देवाच्या दयेची याचना केली
[१५ पानांवरील चित्रं]
रोमी सैन्याने यरुशलेमाचा नाश पहिल्या शतकात केला तेव्हा देवाने यहुदी धर्मास जसे धिक्कारले तसेच जे धर्म त्याच्या इच्छेप्रमाणे वागत नाहीत अशांनाही तो धिक्कारतो