वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ३/१ पृ. २२-२६
  • देवाच्या लोकांमधील मुलांची निपज

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाच्या लोकांमधील मुलांची निपज
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • इस्त्राएलातील मुलांची निपज
  • इस्त्राएलातील मुलांसाठी कठीण काळ
  • आरंभीच्या ख्रिश्‍चनांमधील मुलांची निपज
  • “संसारात हालअपेष्टा”
  • “काळाचा संक्षेप करण्यात आला आहे”
  • आजच्या काळातील मुलांची निपज
  • प्राचीन उदाहरण
  • “कठीण दिवस”
  • या अंतसमयातील मुलांची जबाबदारीची वाढ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • विश्‍वास व चांगला विवेकभाव राखून ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • जागृत राहण्याची निकड अधिकच वाढली आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • तुम्ही आपल्या विश्‍वासाच्या द्वारे जगाचा धिक्कार करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ३/१ पृ. २२-२६

देवाच्या लोकांमधील मुलांची निपज

“यहोवा . . . तुम्हाला सहस्त्रपट वाढवो.”—अनुवाद १:११.

१. पवित्र शास्त्र मुलांचा निपज याविषयी काय म्हणते?

“पाहा, संतति ही यहोवाने दिलेले धन आहे. पोटचे फळ त्याची देणगी आहे. तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत. ज्या पुरुषाचा भाता अशांनी भरला आहे तो धन्य!” असे आम्ही स्तोत्रसंहिता १२७:३-५ मध्ये वाचतो. होय, मुलांना जन्मास आणणे हा विलोभनीय हक्क निर्मात्या यहोवा देवाने पहिले मानवी जोडपे व त्याच्या वंशंजांना बहाल केला.—उत्पत्ती १:२८.

इस्त्राएलातील मुलांची निपज

२. अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्या वंशंजामध्ये मोठी कुटुंबे ही इष्ट बाब का समजण्यात येई?

२ अब्राहामाचे वंशज इसहाक व याकोब यांच्यामध्ये मोठी कुटुंबे ही अत्यंत इष्ट बाब समजली जाई. उपपत्न्या व दासी यांना झालेली मुलेही औरस समजली जात, जे याकोबाच्या मुलांच्या प्रकरणात दिसते. ती मुले इस्त्राएलांच्या बारा वंशांचा पाया घालणारे कुलपिता बनले. (उत्पत्ती ३०:३-१२; ४९:१६-२१; पडताळा २ इतिहास ११:२१.) देवाने विवाहाच्या अनुषंगाने एकपत्नीत्व अशी मूलतः व्यवस्था योजिली होती तरी अब्राहामाच्या वंशजांच्या बाबतीत त्याने बहुपत्नीत्व आणि उपपत्न्या यांना मुभा दिली, ज्यामुळे लोकसंख्या अधिकपणे वाढण्यास हातभार मिळाला. या इस्त्राएलांना ‘मातीच्या रजःकणाप्रमाणे संख्येने विपुल अशी प्रजा’ व्हावयाचे होते. (२ इतिहास १:९; उत्पत्ती १३:१४-१६) याच राष्ट्रात वचनयुक्‍त “संतान” येणार होते व त्याच्या द्वारे “पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे” आशीर्वादित होणार होती.—उत्पत्ती २२:१७, १८; २८:१४; अनुवाद १:१०, ११.

३. शलमोनाच्या कारकीर्दीत इस्त्राएलांची कशी स्थिती होती?

३ अशाप्रकारे, मुलांना जन्मास आणणे हे इस्त्राएलामध्ये यहोवाकडील आशीर्वादाचे चिन्ह समजले जात होते हे स्पष्ट आहे. (स्तोत्रसंहिता १२८:३, ४) तथापि, आम्हाला हे लक्षात घेतले पाहिजे की, वर प्रास्ताविकतेत १२७ व्या स्तोत्रातील शब्दांचे जे वाचन आपण केले होते ते राजा शलमोनाने इस्त्राएलांच्या इतिहासाच्या कृपामय काळात लिहिले होते. त्या काळाबद्दल पवित्र शास्त्र म्हणतेः “यहुदा व इस्त्राएल हे समुद्र किनाऱ्‍याच्या वाळूप्रमाणे संख्येने बहुत असत. ते खाऊन पिऊन चैनीत असत. [उत्तरेकडील] दानापासून ते [दक्षिणेकडील] बैर-शेब्यापर्यंत सारे यहुदी व इस्त्राएल आपापली द्राक्षलता व अंजीर वृक्ष ह्‍यांच्याखाली शलमोनाच्या सर्व कारकीर्दीत निर्भय राहात होते.”—१ राजे ४:२०, २५.

इस्त्राएलातील मुलांसाठी कठीण काळ

४, ५. (अ) मुलांची निपज हा इस्त्राएलांसाठी नेहमी आनंदाचा प्रसंग का ठरला नाही? (ब) निदान दोन प्रसंगी तरी यरुशलेमात कोणते हृदयद्रावक प्रसंग घडले?

४ परंतु इस्त्राएलांच्या इतिहासात असाही काळ आला की जेथे मुलांचा जन्म शोकांतिका ठरला. यरुशलेमाचा पहिल्यांदा नाश झाला त्यावेळी यिर्मया संदेष्ट्याने विलाप करून असे लिहिलेः “माझे डोळे अश्रूंनी जर्जर होत आहेत . . . कारण बालके व तान्ही नगराच्या आळ्यात मूर्च्छिंत होऊन पडली आहेत. . . . स्त्रियांनी आपल्या पोटचे फळ, हातावर खेळविलेली आपली बालके खावी काय?” “कोमल हृदय स्त्रियांच्या हातांनी आपली अर्भके शिजविली.”—विलापगीत २:११, २०; ४:१०.

५ अशाचप्रकारे हृदयाला पिळवटून टाकणारे दृश्‍य जवळजवळ सात शतकानंतर परत दिसले. यहुदी इतिहासकार योसेफस सांगतो की इ. स. ७० ला यरुशलेमाभोवती पडलेल्या वेढ्यात मुलांनी आपल्या बापाच्या तोंडातून अन्‍न काढून खाल्ले, तर आयांनी आपल्या बालकाच्या तोंडातील चतकोर तुकडा उपसून खाल्ला. तो आठवून सांगतो की, कसे एका यहुदी स्त्रीने दूध पिणाऱ्‍या आपल्या बालकास ठार मारले, त्याचे शरीर विस्तवावर भाजले व ते खाल्ले. या प्रकारे, इ. स. पूर्वी ६०७ व इ. स. ७० मध्ये यहुदा व यरुशलेम यांना यहोवाकडील दंडाज्ञा प्राप्त होण्याच्या वर्षांपर्यंत ज्या लेकरांचा जन्म घडला तो जबाबदारीचा होता असे क्वचितच किंबहूना म्हटलेच जाऊ शकत नाही.

आरंभीच्या ख्रिश्‍चनांमधील मुलांची निपज

६, ७. (अ) येशूने ख्रिश्‍चनांसाठी कोणती प्रथा काढून टाकली? (ब) आध्यात्मिक इस्त्राएलांची वाढ कोणत्या माध्यमाने होणार होती आणि हे कशाद्वारे सिद्ध होते?

६ पण मग, आरंभीच्या ख्रिश्‍चनांत मुलांच्या जन्माविषयी कोणता दृष्टीकोण होता? प्रथमतः आम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की येशूने आपल्या शिष्यांत बहुपत्नीकत्व तसेच रखेली हा प्रकार रुजू होऊ दिला नाही. त्याने यहोवाच्या मूळच्या दर्जास म्हणजेच एका स्त्रीचा एकाच पुरुषासोबत विवाह यालाच प्रस्थापित केले. (मत्तय १९:४-९) दैहिक इस्त्राएल मुलांचा जन्म घडवून आणून बहुसम्पन्‍न झाले पण तेच आध्यात्मिक इस्त्राएलांना प्रामुख्यत्वे शिष्य बनविण्याच्या कार्याद्वारे बहुसम्पन्‍न व्हावयाचे होते.—मत्तय २८:१९, २०; प्रे. कृत्ये १:८.

७ ख्रिस्ती धर्माची वाढ मुख्यतः मुलांचा जन्म घडवून व्हावयाची असती तर येशूने आपल्या शिष्यांना “स्वर्गाच्या राज्यासाठी” सडे राहण्याचे ‘दान स्विकारण्याचे’ प्रोत्साहन दिलेच नसते. (मत्तय १९:१०-१२) प्रेषित पौलाने देखील हे लिहिले नसतेः “जो आपले कौमार्य विवाहासाठी देतो तो बरे करतो पण जो ते लग्नासाठी देत नाही तो अधिक बरे करितो.”—१ करिंथकर ७:३८.

८. आरंभीच्या ख्रिश्‍चनांपैकी बहुतेकांनी लग्न केले होते आणि त्यांना मुले होती हे कशावरुन दिसते?

८ राज्याची आस्था जोपासण्यासाठी एकाकी राहण्याचे प्रोत्साहन दिले तरी येशूने वा पौलाने ते कोणावर लादले नाही. दोघांनीही दूरदृष्टीने हे पाहिले होते की काही ख्रिस्ती विवाहबद्ध होतील. यामुळे त्यांना मुले होतील हे स्वाभाविक होते. या कारणास्तव ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने आपणात मुलांची वाढ करण्याविषयीचा थेट सल्ला पुरविणारे अनेक उतारे सामावून आहेत. (इफिसकर ६:१-४; कलस्सैकर ३:२०, २१) वडील वा उपाध्य सेवकांनी लग्न केलेच तर त्यांना अनुकरणीय पालक व्हावयाचे होते.—१ तीमथ्य ३:४, १२.

९. प्रेषित पौलाच्या मते काही ख्रिस्ती स्त्रियांचे मुले प्रसवण्यामुळे कसे संरक्षण होणार होते, पण त्यांना यासोबत कशाची गरज होती?

९ प्रेषित पौलाने असेही म्हटले की, मुले असणे ही गोष्ट काही स्त्रियांसाठी संरक्षणदायक असेल. गरजवंत विधवांना मदत देण्याच्या अनुषंगाने बोलताना त्याने लिहिलेः “तरुण विधवांस नोंदू नये . . . त्या आळशी होतात, घरोघर फिरतात; आणि आळशी होतात इतकेच नव्हे तर वटवट्या व लुडबुड्या होतात; आणि बोलू नये ते बोलतात. म्हणून माझी इच्छा आहे की तरुण विधवांनी लग्न करावे, मुल प्रसवावी, घर चालवावे आणि विरोधकाला निंदा करण्यास निमित्त सापडू देऊ नये, कारण कित्येक बहकून सैतानामागे जाऊन चुकल्या आहेत.” तथापि, अशा स्त्रिया “मर्यादेने विश्‍वास, प्रीती व पवित्रता ह्‍यात राहिल्यास बालकाला जन्म देण्याच्या योगे त्यांचे संरक्षण” होणार होते.—१ तीमथ्य ५:११-१५; २:१५.

“संसारात हालअपेष्टा”

१०. करिंथकरांच्या पहिल्या पत्रात पौलाने विधवांसाठी कोणती वेगळीच सूचना प्रस्तुत केली?

१० तथापि, ही आणखी लक्षवेधक गोष्ट आहे की, याच प्रेषित पौलाने काही विधवांसाठी वेगळाच उपाय करिंथकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्रात सुचविला. विवाहाविषयीचा सल्ला वदविताना तो ‘सवलत म्हणून सांगितला’ अशी पुष्टी त्याने त्याला दिली. त्याने लिहिलेः “जे अविवाहीत व ज्या विधवा आहेत त्यांना मी म्हणतो की तुम्ही माझ्यासारखे राहिला तर तुमच्यासाठी बरे. तथापि जर त्यांस संयम धरता येत नसेल तर त्यांनी लग्न करावे, कारण वासनेने जळण्यापेक्षा लग्न करणे बरे. पण जर ती [विधवा] तशीच राहिली तर माझ्या समजुतीप्रमाणे ती अधिक सुखी होईल. मलाही देवाचा आत्मा आहे असे मला वाटते.”—१ करिंथकर ७:६, ८, ९, ४०.

११. (अ) जे लग्न करतात अशांना कोणता अनुभव येणार, आणि १ करिंथकर ७:२८ च्या समासाचा संदर्भ यावर कसा प्रकाश पाडतो? (ब) ‘हालअपेष्टा भोगाव्या लागू नयेत अशी माझी इच्छा आहे’ या पौलाच्या म्हणण्याचा काय अर्थ होता?

११ पौलाने आणखी स्पष्ट केलेः “कोणा कुमार व कुमारिकेने लग्न केले तर ते पाप करतात असे नाही. तरीपण अशांना संसारात हालअपेष्टा भोगाव्या लागतील. त्या भोगाव्या लागू नयेत अशी माझी इच्छा आहे.” (१ करिंथकर ७:२८) “संसारात हालअपेष्टा” यांच्या बाबतीत न्यू वर्ल्ड ट्रान्स्लेशन मधील समासाचा संदर्भ उत्पत्ती ३:१६ हे वचन दाखवितो, जेथे असे लिखित आहेः “तो [यहोवा] स्त्रीला म्हणालाः ‘मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन. तू क्लेशाने लेकरे प्रसवशील; तरी तुझा ओढा नवऱ्‍याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व करील.’” जे लग्न करतात अशांना वैवाहिक समस्यांसोबत मुलांचा जन्म घडवून आणण्याशी संबंधित असणाऱ्‍या समस्या “संसारात हालअपेष्टा” या अर्थी येणार होत्या. पौलाने लग्न करणे व मुले प्रसविणे या गोष्टीला मनाई घातली नव्हती, तरी आपल्या सह ख्रिश्‍चनांना, यामुळे त्यांच्यावर यहोवाची सेवा करण्याला बांध घालणाऱ्‍या समस्या व अडथळे येणार होते याचा इशारा देण्याचे आपले कर्तव्य आहे असे त्याने मानले होते.

“काळाचा संक्षेप करण्यात आला आहे”

१२. विवाहीत ख्रिश्‍चनांना प्रेषित पौलाने कोणती सूचना दिली आणि कोणत्या कारणास्तव?

१२ पहिल्या शतकात ख्रिश्‍चनांना जगातल्या लोकांप्रमाणे जीवन व्यतित करायचे नव्हते. त्यांची परिस्थिती त्यांच्या वैवाहिक जीवनावर सुद्धा परिणामित होणार होती. पौलाने लिहिलेः “बंधुजनहो, मी हेच म्हणतो की, काळाचा संक्षेप करण्यात आला आहे, ह्‍यासाठी की, ज्याला पत्नी आहे त्याने, ह्‍यापुढे ती नसल्यासारखे असावे. . . . जे ह्‍या जगाचा उपयोग करतात त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करीत नसल्यासारखे असावे. कारण ह्‍या जगाचे बाह्‍य स्वरुप लयास जात आहे. तुम्ही निश्‍चिंत असावे अशी माझी खरीच इच्छा आहे. . . . हे मी तुमच्याच हितासाठी सांगतो. तुम्हास फासात गुंतवावे म्हणून नव्हे, तर तुमच्या हातून उत्तम आचरण व प्रभूची सेवा एकाग्रतेने व्हावी म्हणून सांगतो.”—१ करिंथकर ७:२९-३५.

१३. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांसाठी ‘काळाचा संक्षेप’ कोणत्या अर्थी करण्यात आला होता?

१३ पवित्र शास्त्र प्रामाण्य फ्रेडरीक गॉडेट यांनी लिहिलेः “विदेशी लोकांना हे जग कायमचे टिकून राहील असे वाटत होते पण ख्रिश्‍चनाला त्याच्या डोळ्यापुढे परोसिया [ख्रिस्ताचे पुनरागमन] दिसत होती, ज्याची तो मोठ्या उत्कंठतेने वाट पाही.” ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना पुनरागमनाचे वा “उपस्थितीचे” चिन्ह दिले होते व हा इशाराही दिला की, “जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येईल हे तुम्हास ठाऊक नाही.” (मत्तय २४:३, ४२) काळाचा “संक्षेप” होत आला होता ते याअर्थी की, पहिल्या शतकात जगणाऱ्‍या ख्रिश्‍चनांनी ख्रिस्ताच्या परतण्याच्या अपेक्षेने आपले जीवन व्यतित करायचे होते. याशिवाय, “अकाली व अनपेक्षित” अशा घटना घडून आपले आयुष्य संपेल व त्याकरवी ‘त्यांना झालेल्या पाचारणाची खात्री’ अपूर्ण राहील, याच्या किती काळापर्यंत व्यक्‍तीशः जगायला मिळेल याची त्यांना माहिती नव्हती.—उपदेशक ९:११; २ पेत्र १:१०.

१४. (अ) मत्तय २४:१९ ची समज कशी होण्यास हवी? (ब) इ. स. ६६ हे वर्ष आले तेव्हा येशूने दिलेल्या इशाऱ्‍याने कशी अधिक निकड धरली असावी?

१४ तरीपण यहुदीया व यरुशलेमातील ख्रिश्‍चनांनी “जागृत राह”ण्याची खास गरज होती. येशूने यरुशलेमाच्या दुसऱ्‍या नाशासंबंधाने इशारा दिला तेव्हा त्याने म्हटलेः “त्या दिवसात ज्या गरोदर व ज्या अंगावर पाजणाऱ्‍या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार!” (मत्तय २४:१९) हे खरे की येथे येशू पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना, त्यांनी स्वतःला मुले होण्यापासून परावृत्त ठेवावे असे सांगत नव्हता. तर तो या गोष्टीची भविष्यवादित सत्यता भाकित करीत होता की यरुशलेमाच्या नाशाचे चिन्ह दिसू लागेल त्यावेळी गरोदर व मुले असणाऱ्‍या स्त्रियांना पलायन अधिक अडचणीचे होणार. (लूक १९:४१-४४; २१:२०-२३) तरीपण इ. स. ६६ नंतरच्या काळात यहुदीयातील यहुद्यांमध्ये खळबळ होऊ लागली त्यावेळी आरंभीच्या ख्रिश्‍चनांच्या लक्षात येशूचा इशारा नक्की आला असावा व त्या इशाऱ्‍यानेच त्या त्रासाच्या जगात मुलांना जन्मास आणण्याच्या त्यांच्या मनोदयावर प्रभुत्व गाजविले असावे.

आजच्या काळातील मुलांची निपज

१५, १६. (अ) आजच्या काळी जिवंत असणाऱ्‍या ख्रिश्‍चनांसाठी “काळाचा संक्षेप” कसा करण्यात आलेला आहे? (ब) ख्रिश्‍चनांनी कोणते प्रश्‍न स्वतःला विचारावेत?

१५ ख्रिश्‍चनांनी या ‘अंतसमया’त विवाह आणि मुलांचा जन्म घडवून आणणे याविषयी कसा दृष्टीकोण धरावा? (दानीएल १२:४) पूर्वी नव्हते तितक्या अधिक खरेपणाने आज “ह्‍या जगाचे बाह्‍यस्वरुप लयास जात आहे” किंवा आणखी एक भाषांतर म्हणते त्याप्रमाणे “सध्याच्या व्यवस्थीकरणाची योजना ही अगदी त्वरेने लयास जात आहे.”—१ करिंथकर ७:३१, फिलिप्स.

१६ आता, पूर्वी नव्हता इतक्या अधिकपणे “काळाचा संक्षेप करण्यात आला आहे.” होय, “सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल” हे यहोवा देवाने त्याच्या लोकांना नेमून दिलेले कार्य संपण्यास आता खूपच मर्यादित काळ उरला आहे व “तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) ते काम शेवट होण्याआधी झालेच पाहिजे. या कारणामुळे ख्रिश्‍चनांनी स्वतःला हे विचारुन पाहणे अगदीच सयुक्‍त ठरेल की, विवाहबद्ध होणे किंवा लग्न झालेले असल्यास मुले होणे याचा, त्यांनी त्या महत्वपूर्ण कार्यात सहभाग घेण्यावर कसा परिणाम करील?

प्राचीन उदाहरण

१७. (अ) जलप्रलयाआधी नोहा व त्याच्या तीन मुलांना कोणते काम पूर्ण करायचे होते व ते साधारण किती काळ चालले असावे? (ब) नोहाचे पुत्र व त्यांच्या बायकांनी जलप्रलयापूर्वीच्या काळात मुले जन्माला आणण्यापासून स्वतःला कोणत्या संभाव्य कारणांमुळे वंचित ठेवले असावे?

१७ येशूने “मनुष्याच्या पुत्राची उपस्थिती” “नोहाच्या काळा”सारखी असेल असे म्हटले. (मत्तय २४:३७) नोहा व त्याच्या तीन मुलांना जलप्रलयाआधी एक विशिष्ट काम पूर्ण करायचे होते. त्यात प्रचार करण्याचे व प्रचंड तारु बांधण्याचे समाविष्ट होते. (उत्पत्ती ६:१३-१६; २ पेत्र २:५) यहोवाने तारु बांधण्याची आज्ञा केली त्या वेळेपावेतो नोहाचे तीन पुत्र विवाहबद्ध झाले होते असे स्पष्ट दिसते. (उत्पत्ती ६:१८) तारु उभारण्यात नेमका किती काळ लागला ते आम्हाला ज्ञात नाही, पण त्याला बहुधा काही दशके लागली असावीत असे दिसते. तर मग ही लक्षवेधक गोष्ट आहे की, त्या जलप्रलयापूर्वीच्या काळात नोहाचे पुत्र व त्यांच्या बायका यांना मुले नव्हती. प्रेषित पेत्र तर अगदी स्पष्ट सांगतो की,‘ त्या तारवात केवळ आठ जण [म्हणजेच चार विवाहीत जोडपे, ज्यांच्यासोबत मुले नव्हती] पाण्यातून वाचविण्यात आले.’ (१ पेत्र ३:२०) नोहाची मुले बहुधा दोन कारणामुळे अपत्यविना राहिली असावीत. पहिले, पाण्याच्या महाप्रलयाकरवी संभाव्य नाश सामोरा येत असल्यामुळे त्यांना इश्‍वरीय दृष्ट्या अशा कामाची नियुक्‍ती लाभलेली होती ज्यात त्यांनी एकाग्रतेने लक्ष देणे जरुरीचे होते. आणि दुसरे म्हणजे, जेथे “मानवांची दुष्टाई फार आहे व त्यांच्या अंतःकरणात येणाऱ्‍या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट” आहेत त्या ‘जाचजुलमांनी’ भरलेल्या जगात मुलांना जन्मास आणावे हा विचारच त्यांना नकोसा वाटला असावा.—उत्पत्ती ६:५, १३.

१८. नोहाचे पुत्र व त्यांच्या बायकांनी जो मार्ग चोखाळला तो नियम जरी नसला तरी त्यामुळे विचाराला कोणते खाद्य मिळते?

१८ याचा अर्थ, नोहाचे पुत्र व त्याच्या बायका यांनी जलप्रलयाआधी जे मार्गाक्रमण चोखाळले तेच आजच्या विवाहीत दांपत्यासाठी नियम आहे असे नाही. तरीपण, सध्या आम्ही ज्या काळात हयात आहोत त्याची तुलना येशूने नोहाच्या काळासोबत केली असल्यामुळे त्यांच्या उदाहरणामुळे आमच्या विचाराला खाद्य मिळते.

“कठीण दिवस”

१९. (अ) आमचा काळ नोहाच्या काळाशी कसा तुल्य ठरतो? (ब) पौलाने “शेवटल्या काळा”विषयीचे कोणते भाकित केले आणि या भविष्यवादाचा मुलांच्या निपजासोबत कसा संबंध आहे?

१९ नोहा व त्याच्या कुटुंबाप्रमाणे आपणही “अभक्‍तांच्या जगात” राहात आहोत. (२ पेत्र २:५) त्यांच्याप्रमाणेच, आम्ही, ज्याचा लवकरच नाश होणार आहे त्या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या “शेवटल्या काळा”त आहोत. सैतानी व्यवस्थीकरणाच्या “शेवटल्या काळा”विषयी भाकित करताना प्रेषित पौलाने म्हटले की, ते “कठीण दिवस” असतील. या कठीण दिवसात मुलांची वाढ करणे किती त्रासदायक गोष्ट असेल ते दाखविताना तो म्हणाला की, मुले “आईबापास न मानणारी” होतील. त्याने जेव्हा म्हटले की, लोक “कृतघ्न, बेईमान, ममताहीन” असतील त्यावेळी त्याच्या विचारात मुलेही समाविष्ट असावीत. (२ तीमथ्य ३:१-३) पौल “शेवटल्या काळी” जगातील लोकांमध्ये दिसून येणाऱ्‍या परिस्थितीविषयी भाकित करीत होता तरी त्या कठोर वृत्तीमुळेच मुलांची वाढ करणे ख्रिस्ती पालकांना किती जड जाणार होते ते स्पष्टरित्या दिसते आणि याच गोष्टीचा अनुभव कित्येकांना आला.

२०. आता पुढील अंकी प्रसिद्ध होणाऱ्‍या लेखात कोणत्या गोष्टी चर्चिल्या जातील?

२० वरील सर्व गोष्टींचा अनुरोध दाखवितो की, मुलांना जन्मास आणण्याविषयी समतोल दृष्टीकोण बाळगणे किती जरुरीचे आहे. त्यामुळे खूप आनंद मिळत असला तरी कित्येक हृदयव्यथाही अनुभवाव्या लागतात. त्याचे फायदे व तोटेही आहेत. यापैकीच्या काहींचे परिक्षण आपल्याला पुढील अंकी प्रसिद्ध होणाऱ्‍या लेखात आढळेल.

उजळणीसाठी मुद्दे

◻ मोठी कुटुंबे असणे ही इस्त्राएलांमध्ये इष्ट गोष्ट का होती?

◻ मुलांच्या जन्मामुळे यहुद्यांना काही वेळा हृदयव्यथा अनुभवण्यास मिळाल्या याकरवी काय सूचित होते?

◻ आध्यात्मिक इस्त्राएलांची संख्यावाढ कोणत्या पद्धतीने होणार होती?

◻ आरंभीच्या ख्रिश्‍चनांसाठी “काळाचा संक्षेप” कसा करण्यात आला होता?

◻ कोणत्या कारणांस्तव नोहाचे पुत्र व त्यांच्या बायकांनी स्वतःला जलप्रलयाआधी अपत्यविना ठेवले असावे, आणि आजची स्थिती काय आहे?

[२५ पानांवरील चित्रं]

यरुशलेमातून त्वरेने पळ काढणे, लहान मुले असणाऱ्‍यांना खूपच कठीण जाणार होते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा