पवित्र शास्त्र इतिहासातील प्रबळ जागतिक सत्ता विनाशाकडे कूच करीत आहेत!
इतिहास अगाऊच लिहिल्याची तुम्हास कल्पना करता येईल का? ‘ते कधीच शक्य नाही,’ असेच तुम्ही म्हणाल, होय ना? तरीपण एक असे पुस्तक आहे ज्याने खरोखरी इतिहास अगाऊच कळवला आहे—त्या घटनांच्या शेकडो वा हजारो वर्षे आधी! ते पुस्तक पवित्र शास्त्र आहे.
पवित्र शास्त्राने प्राचीन घटना अचूकपणे कळवल्या इतकेच नव्हे तर देवाच्या लोकांवर परिणाम करणारा जागतिक इतिहासाचा प्रमुख आराखडा, २,५०० वर्षाआधीच्या प्राचीन बाबेलोनच्या काळापासून ते आजपर्यंत व आमच्या काळाच्या पलीकडेहि अगदी आश्चर्यकारकपणे भाकित केला आहे.
आमच्या समान शकाआधी सहाव्या शतकात हयात राहिलेल्या दानीएल संदेष्ट्याला जागतिक इतिहासाच्या भविष्यास अनुलक्षून असणारी चार वेगवेगळी प्रकटीकरणे पुरविण्यात आली. त्याला ही माहिती कोठून मिळाली? दानीएल स्वतः सांगतोः “रहस्ये प्रकट करणारा देव स्वर्गात आहे.” (दानीएल २:२८) प्राचीन जागतिक सत्तांच्या अवशेषांचे संशोधन करणाऱ्या भूगर्भसंशोधकांना इतिहास तसेच पवित्र शास्त्रात आढळणाऱ्या भविष्यवादाच्या सत्यतेचा आश्चर्यकारक पुरावा आढळला.
मिसर व अश्शुर या पवित्र शास्त्र इतिहासातील दोन प्रबळ जागतिक सत्ता दानीएलाच्या बऱ्याच काळाआधी अस्तित्वात होत्या. दानीएलाच्या काळात बाबेलोन सत्तेवर होते आणि यानंतर ज्या दोन जागतिक सत्ता येणार त्याचे भाकित या संदेष्ट्याला सांगण्यात आले. (दानीएल २:४७, ४८; ८:२०, २१) यानंतर आणखी दोन येणार होत्या ज्यामुळे आम्ही आपल्या काळात येतो.
एकंदर किती?
पवित्र शास्त्रानुसार अशा प्रकारच्या एकंदर किती जागतिक सत्ता असणार? याचे उत्तर प्रेषित योहानाला दिले गेले व यामुळे आपण काळाच्या प्रवाहात कोठे आहोत ते कळते. एका दिव्यदूताने योहानाला सांगितलेः “सात राजे आहेतः त्यापैकी पाच पडले आहेत, एक आहे आणि एक अद्याप आला नाही.”—प्रकटीकरण १७:१०.
योहानाच्या काळापर्यंत कोणत्या पाच जागतिक सत्ता येऊन गेल्या? मिसर, अश्शुर, बाबेलोन, मेद-पारस आणि ग्रीस या त्या होत. कोणती एक त्यावेळी होती? रोम. आणि कोणती ‘अद्याप आली नव्हती’? आमच्या काळातील अँग्लो-अमेरिकन जागतिक सत्ता. त्या या जागतिक सत्ता आहेत ज्याच्याशी देवाच्या प्राचीन व अर्वाचीन लोकांचा संबंध आला व येत आहे.
एक खास व महत्वपूर्ण गोष्ट ही की, एकामागोमाग केवळ सात जागतिक सत्ता येणार होत्या! सातवीच्या अवशेषांचा समावेश असणारी समकालीन अशी आठवी सत्ता, सातव्या सत्तेच्या काळात थोड्या काळ अस्तित्वात राहील असे सांगितले गेले. (प्रकटीकरण १७:१०, ११) याचा अर्थ हा की आपण आज मानवाकरवी चालविल्या जाणाऱ्या शेवटल्या प्रबळ सत्तेच्या काळात जगत आहोत. यानंतर आणखी जागतिक सत्ता नाही!
लवकरच जागतिक सत्तांचा काळ संपेल. या मानवी व्यवस्थांचा चुराडा होऊन त्या ‘वाऱ्याने उधळून नेल्या जातील’ असे दानीएलाने भाकित केले. (दानीएल २:३५) पण याऐवजी काय येणार? त्यापेक्षाहि श्रेष्ठ असे काहीतरी! दानीएल कळवितोः “त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही. . . . ते या सर्व राज्यांचे चूर्ण करुन त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” (दानीएल २:४४) तर या मानवी जागतिक सत्तांची जागा देवाच्या राज्याशिवाय इतर काहीही घेऊ शकणार नाही. जागतिक शासनात केवढा हा भव्य बदल!
तुम्हाला जागतिक सत्तांविषयी थोडीफार माहिती ही असेलच. तरीपण त्यातील प्रथा, त्यांचा धर्म आणि देवाच्या लोकांच्या तसेच पवित्र शास्त्रीय भविष्यवादाच्या अनुषंगाने असणारा त्यांचा संबंध याविषयीचे आणखी ज्ञान याकरवी शास्त्रवचनांच्या प्रकाशात मानवजातीच्या इतिहासाची अधिक ओळख करुन घेण्यास तुम्हाला आवडणार नाही का?
होय, निश्चितपणे. यासाठीच आम्ही या अंकापासून आठ लेख, जागतिक सत्तांच्या विषयासंबंधाने प्रसिद्ध करीत आहोत. या लेखांकरवी तुम्हाला पवित्र शास्त्रात कथित करण्यात आलेला इतिहास विश्वासार्ह व भरवशाचा आहे हे कळेल. यामुळे, पवित्र शास्त्रातील भविष्यवाद खरे व विश्वसनीय आहेत यावरील तुमचा विश्वास दृढ होईल. या मालिकेतील नंतरचे लेख ऑगस्ट १९८९ च्या अंकापासून पुढे दिले जातील.