निसर्गाचे पुस्तक आणि पवित्र शास्त्र
“विश्व मला घोटाळ्यात टाकते! अशाप्रकारचे ‘घड्याळ’ कुठल्याही घड्याळ निर्मात्याशिवाय अस्तित्वात असू शकते अशी मी कल्पना करुच शकत नाही.”—व्होल्टायर, १८ व्या शतकातील फ्रेंच तत्ववेत्ता.
कोणतेही बिनचूक घड्याळ ते बनविणाऱ्याचे कौशल्य व कसब याची दाद घेण्याची प्रेरणा देते. परंतु, आम्हासभोवार पसरलेल्या विश्वाबद्दल काय? ते निदान काही प्रमाणात त्याच्या निर्मात्याच्या व्यक्तीत्वाचा आपणास परिचय करुन देऊ शकते का?
या प्रश्नाला, सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी हयात राहिलेल्या पवित्र शास्त्र लेखकांपैकी एक, प्रेषित पौलाने उत्तर दिले. तो म्हणालाः “सृष्टीच्या निर्मितीपासून त्याचे [देवाचे] अदृश्य गुण म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या गोष्टींवरुन ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत.” (रोमकर १:२०) तर मग, या निसर्गाच्या पुस्तकास न्याहाळण्यापासून आम्ही काय शिकू शकतो बरे?
हे घड्याळ त्याच्या निर्मात्याविषयी काय शिकविते
एखादा भव्य धबधबा, तुफानी समुद्र, हजारो ताऱ्यांनी भरलेले रात्रीचे निरभ्र आकाश—या अशा काही गोष्टी आहेत, ज्या आम्हास निर्मात्याबद्दल विचार करावयास लावतात. ग्रहांच्या भ्रमणतेतील अचूकतेने आम्हाला, व्होल्टायरप्रमाणेच, हा निर्माता भव्य संयोजक, आणि कुशल घड्याळनिर्माता आहे याचे स्मरण दिले पाहिजे.—स्तोत्रसंहिता १०४:१.
पृथ्वीवरील विविध निपज—मुबलक फळे आणि भाजीपाला—हा सुद्धा देवाच्या उदारतेची साक्ष देतो. प्रेषित पौलाने यालाही पुष्टी देऊन असे म्हटले की, देवाने “स्वतःस साक्षीविरहीत राहू दिले नाही, म्हणजे त्याने उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतु तुम्हास दिले, आणि अन्नाने व हर्षाने तुम्हास मन भरुन तृप्त केले.”—प्रे. कृत्ये १४:१७.
ते घड्याळ आम्हास काय सांगत नाही
निसर्गाच्या पुस्तकाचे आणखी परिक्षण आम्हाला देवाच्या आणखी गुणांविषयी माहिती देईल. पण आपण निर्मितीपासून जे शिकलो त्यावरच केवळ पूर्णपणे विसंबून राहिलो तर मग देवाविषयीचे आमचे ज्ञान नेहमीच मर्यादित राहील. फ्रेंच लेखक रॉबर्ट लेनोबल आपल्या इस्कूसे ड’उने हिजटोयर डे ला’यडी डे नेचर (निसर्गाच्या कल्पनेविषयी इतिहासाची रुपरेषा) या पुस्तकात विवेचीत करतातः “मनुष्य नेहमीच आपले लक्ष निसर्गाकडे, त्याचे रहस्य व गोपनीयता उमगून काढण्यासाठी लावत राहील, पण ते रहस्य प्रयोगशाळेतून केव्हाही बाहेर येऊ शकणार नाही.” ला क्रोइक्स या कॅथोलिक दैनिकाने, तुम्ही विश्वासणारे आहात की नास्तिक आहात ते पाहण्यासाठी एक चाचणी घेतली तेव्हा अर्ध्यापेक्षा अधिक फ्रेंच लोकांनी आपला कल या दिशेने दिला आणि कबूल केले की, “विज्ञानशास्त्र विश्वाचे पुरेसे स्पष्टीकरण कधीच देऊ शकणार नाही कारण पुष्कळ गोष्टी तत्वज्ञान किंवा धार्मिक गोष्टींवर अवलंबून आहेत.”
सुमारे ३,५०० वर्षांपूर्वी विश्वासू ईयोब देखील याच निष्कर्षास पोहंचला होता. त्याने प्रश्न केलाः “तरीपण ज्ञान कोठून मिळेल व आता बुद्धीचे स्थान ते कोणते?” हे ज्ञान निसर्गाच्या पुस्तकात मिळेल का? “अगाध जलाशय स्वतःच म्हणतो की, ‘ते माझ्याठायी नाही!’ समुद्रही म्हणतोः ‘ते माझ्याठायी नाही!’ ते सर्व जिवंतांच्या नेत्रांना अगोचर आहे, आकाशात भ्रमण करणाऱ्या पक्षांना ते गुप्त आहे.”—इयोब २८:१२, १४, २१.
मग हे ज्ञान धुंडाळण्यास आम्ही कोठे जावे? तेच पुस्तक उत्तर देतेः “देवच त्याचा मार्ग जाणतो; त्याचे स्थान त्यालाच ठाऊक आहे.” (इयोब २८:२३) देवाने या ज्ञानाची सहभागी त्याचा शब्द, पवित्र शास्त्र याच्या सहाय्याने मानवजातीसोबत अगदी विलोभनीयरित्या केली आहे.
पवित्र शास्त्रापासून मिळणारे अद्वितीय ज्ञान
पवित्र शास्त्र आम्हाला मानवाच्या आरंभाविषयी अप्रतिम अशी अंतर्दृष्टी देते. ते आम्हास देवाने पृथ्वी तयार करुन त्यानंतर तेथे पहिले मानवी दंपति ठेवल्याचे सांगते. आमचे पहिले पालक अव्यंग परिसरात चिरकालपणे जिवंत राहू शकले असते. परंतु त्यांनी बंडाळी केली व त्यांच्या पातकामुळे त्यांनी दुष्टतेचा मार्ग खुला केला—ज्यात पाप व मरण समाविष्ठ असून यानेच मानवजातीस ग्रासले आहे.—उत्पत्ती अध्याय १ ते ३; रोमकर ५:१२-२१.
या परिस्थितीवर उपाय म्हणून देवाने कोणते पाऊल उचलले याचीही सविस्तर माहिती पवित्र शास्त्र आम्हाला देते. आदाम व हव्वा यांच्या हजारो वर्षांनंतर, देवाचा स्वतःचा पुत्र येशू या पृथ्वीवर आला व त्याने मानवजातीला देवाबरोबर समेट करण्याची संधी प्रदान केली. याकरवी, जे त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि त्याच्या बलिदानाच्या मोलाची जाणीव राखतील अशांना, नंदनवनात परिवर्तित होणाऱ्या या पृथ्वीवर चिरकालिक जीवनाचे त्याने भवितव्य पुढे धरले.—लूक २३:४३; योहान ३:१६.
ही आशा आम्हातील प्रत्येकाला सादर होत आहे. ती प्राप्त करुन घेण्यासाठी आम्ही ‘एकच खरा देव त्याचे आणि त्याने पाठविलेल्या येशू ख्रिस्ताचे’ अचूक ज्ञान मिळविले पाहिजे. तसेच आम्ही या आशेनुरुप जीवन कंठले पाहिजे. हे अचूक ज्ञान पवित्र शास्त्रात सापडते.—योहान १७:३; याकोब २:२४-२६.
तुम्हाला या प्रश्नांची सविस्तर उत्तरे हवीत का की, मानव कोठून आला? मृत्युनंतर काय घडते? मानवजातीच्या समस्यांची कारणे कोणती आहेत? त्या एके दिवशी मिटविल्या जातील अशी आशा बाळगण्यास काही आधार आहे का? देव मानवजातीला केव्हा व कशी परिपूर्ण परिस्थिती प्रदान करील? याकरता आम्ही आपणाला पवित्र शास्त्रात शोध घेण्याचे उत्तेजन देत आहोत. हे असे एकमेव पुस्तक आहे जे तुम्हाला विश्वाच्या देवाकडून उत्तरे देईल. ते असे एकमात्र पुस्तक आहे जे “चिरकालिक जीवनासाठी आशेचा आधार” सामावून आहे. वॉचटावर संस्थेच्या विविध प्रकाशनांचा उद्देश, ही उत्तरे तुमच्या पवित्र शास्त्रातून काढून देण्यात मदत देणे असा आहे.—तीतास पत्र १:१, २.
[१० पानांवरील चित्रं]
देवाच्या व्यक्तीत्वाच्या स्वरुपास विश्व प्रकट करते
[११ पानांवरील चित्रं]
मानव व पृथ्वीबाबतचा देवाचा उद्देश काय ते केवळ पवित्र शास्त्रच आम्हास सांगू शकते