देवाच्या निर्मितीपासून आम्ही काय शिकू शकतो?
कबुतर आपले डोके आणि चोच यातील चुंबकीय स्फटिकांच्या पुंजकाचा वापर करुन दिशा साधते. विशिष्ट मासे विद्युत शक्ती निर्माण करतात. विविध प्रकारचे पक्षी समुद्रातील पाण्याच्या प्राशनाने समुद्रात जादा झालेले क्षार कमी करतात. काही कवच असणाऱ्या माशांना छिद्र असते ज्यात पाणी भरुन ते पोहू शकतात आणि त्यात वायु भरुन ते पुन्हा वर येऊ शकतात.
होय, आज मानव होकायंत्राचा वापर करतो, विद्युतशक्ती निर्मितो, पाणबुड्या बनवतो किंवा समुद्राच्या पाण्याचे उर्ध्वपतन करतो तेव्हा तो देवाच्या निर्मिती कार्याचे वस्तुतः अनुकरण करीत असतो हे त्याला कळत नसते.
खरेच, देवाच्या निर्मिती कार्यात मानवासाठी शिकण्यास पुष्कळशा गोष्टी आहेत आणि या कारणास्तव काही वेळा त्यास “निसर्गाचे पुस्तक” असे म्हटले आहे. उदाहरणार्थ, बायोनिक ही विज्ञानशास्त्राची अशी शाखा आहे जी निर्मितीत सापडणाऱ्या निरनिराळ्या व्यवस्थांचा व्यावहारिक अभ्यास करण्यासाठी समर्पित आहे. यात पक्ष्याप्रमाणे विमानाचे पंख, डॉल्फीनच्या आकाराच्या पाणबुड्या आणि मानवी हाडाप्रमाणे मजबूत असणारा सांगाडा समाविष्ठ आहे. पण मग, या “निसर्गाचे पुस्तका” याला इतकेच तंत्रशिक्षण सादर करायचे आहे का?
नाही. ते काही वेळेस नैतिक शिक्षणाचे सुद्धा व्यवहारी धडे पुरविते. उदाहरणार्थ, मुंगीठायी उपजत असणाऱ्या उद्योगीपणाच्या संदर्भात पवित्र शास्त्रातील नीतीसूत्रे पुस्तक बोध करतेः “अरे आळशा, मुंगीकडे जा; तिचे वर्तन पाहून शहाणा हो; तिला कोणी धनी, देखरेख करणारा किंवा अधिपति नसता ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळविते आणि कापणीच्या दिवसात आपले भक्ष्य जमा करुन ठेविते.”—नीतीसूत्रे ६:६-८.
परंतु, प्राणीमात्रांच्या वर्तणुकीपासून धडा मिळविण्यास इथॉलॉजी या विज्ञानशास्त्र विभागाच्या काही मर्यादा आहेत. मानवी वर्तणुकीला प्राणीवर्गाच्या वर्गवारीत तंतोतंत ठेवता येत नाही. मानवाची भाषा व विचार करण्याची गुंतागुंतीची पद्धत अशा लक्षनीय गोष्टी फरक दाखवितात. एका शास्त्रज्ञाने म्हटले की, “आम्ही शेपूट नसलेल्या तल्लख माकडाप्रमाणे नाहीत.” आमची बुद्धी ही “आम्हाला गुणवैधर्म्यात इतर सर्व जीवधाऱ्यांपासून अगदीच वेगळी ठेवते.”
तसेच, आणखी काही असे प्रश्न आहेत जे निर्मिती कार्याचा कसून केलेला अभ्यास सोडवू शकत नाहीत. ते म्हणजेः जीवनाला काही उद्देश आहे का? देव अस्तित्वात आहे का आणि आहे तर तो आम्हाविषयी काळजी करतो का? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतात का ते पाहू या.
[७, ८ पानावरील चौकट/चित्र]
निर्मितीत ते प्रथम होतेः प्रतिध्वनि-ग्रहण व्यवस्था
वटवाघूळाची रचना प्रतिध्वनि ग्रहण करणाऱ्या व्यवस्थेसारखी आहे. आपला आवाज सोडून व त्याच्या प्रतिध्वनीचे पृथ्थकरण करुन भक्ष्याची जागा निश्चित करुन त्याचा पाठलाग करण्यास ही गोष्ट त्याला सहाय्यक ठरते. तरीपण विशिष्ठ पतंगाकडे (डॉगबेन टायगर) देखील संकेतांना खुंटविण्याची शक्ती आहे व हेही आपल्या प्रतिस्पर्ध्याप्रमाणेच ध्वनिलहरी पाठवितात. हा संकेत मिळाल्यावर ते अडखळण आहे किंवा नाही याचा छडा लावण्यात वटवाघूळ वेळ घालवीत नाही; ते पतंगास टाळते.
कॅनडातील विश्वविद्यालयाचे प्राध्यापक जेम्स फुलार्ड यांनी आश्चर्य व्यक्त करुन असे म्हटलेः “वटवाघूळ व पतंग हे अगदी थोडक्या पेशींचा वापर करते; यात पूर्ण माहिती खंडाची कार्यपद्धत व गहनता हाताळणारे तंतु असतात ही आश्चर्यावह गोष्ट आहे. त्यात इतकी काटकसर व लपंडाव असतो की, याचा मानवाच्या बिनतारी दळणवळण व्यवस्थेलाही हेवा वाटू लागेल.
निर्मितीत ते प्रथम होतेः पाण्याखालील डुबकी घेणारी घंटा
१६व्या शतकाच्या सुरवातीला लिओनार्डो डा व्हिन्सी यांनी पाण्यात खाली डुबकी घेण्याची उपकरणे शोधून काढलीत असे म्हटले जाते. तरीपण, अरगायरोनेटा जलचर या कोळ्याने पाण्याखाली श्वसन करण्याची पद्धत आधीच तयार करुन ठेवली होती. ॲन्ड्री टेट्री यांनी आपल्या लेस आऊटलीस चेसलेस इट्रस व्हिवान्ट (जीवधाऱ्यांकरवी वापरण्यात येणारी उपकरणे) या पुस्तकात हे विवेचीत केले की हा कोळी “संथ वाहणाऱ्या पाण्याच्या ओघातील जलचर वनस्पतींवर स्थिरावतो व त्यामध्ये समांतरीत जाळे विणतो; ते काही ठिकाणी थोडेसे ढिले, पण अनेक धाग्यांनी विणलेले असते. पृष्ठभागावर येऊन . . . हा कोळी झटकन हिसका देऊन त्याच्या सहाय्याने हवेचा बुडबुडा पोटाखालील जलप्रतिबंधक केसात पकडतो. . . . कोळी खाली येऊन हा हवेचा बुडबुडा त्या जाळीच्या धाग्याखाली सोडतो. बुडबुडा आल्यावर जाळीचा आकार वाढतो.” अशा अनेक खेपा करुन हा कोळी या जाळीत पुरेशी हवा भरतो व तिला घंटेचा आकार देतो व अशाप्रकारे या घंटेखाली तो दिवसभर राहून श्वसन करतो आणि येथेच रात्री धरलेल्या भक्ष्याचे सेवन करतो. याविषयी टेट्री पुढे म्हणतातः “मानवाने पाण्याखाली डुबकी घेण्याची तयार केलेली उपकरणे ही निसर्गात दिसून येणाऱ्या खास प्रकारांवर जुळवून घेण्यात आली आहेत.”