वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ३/१ पृ. २८-३२
  • प्राचीन मिसर प्रबळ जागतिक सत्तांमधील पहिली

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्राचीन मिसर प्रबळ जागतिक सत्तांमधील पहिली
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • भूप्रदेश व लोक
  • मिसरी धर्म
  • अमरत्वावरील विश्‍वास
  • कोण कधी हयात होता?
  • इतर जागतिक सत्ता उदयास येतात
  • यहोवा कोण आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ३/१ पृ. २८-३२

प्राचीन मिसर प्रबळ जागतिक सत्तांमधील पहिली

मिसर—फारोंचा व नाईल नदीचा प्राचीन प्रदेश. हा जगातील प्रमुख वसाहतीतील एक होता. त्याच्या कलेने संग्रहालये सुशोभित झाली. त्याचा इतिहास शाळेच्या क्रमिक पुस्तकात आढळतो. त्याची प्रचंड स्मारके प्रवाश्‍यांना अचंबीत करतात. याखेरीज पुष्कळ पवित्र शास्त्रीय घटना एकतर या प्रदेशात घडल्या किंवा त्यांजमध्ये याला समाविष्ट करुन घेण्यात आले. मिसर व त्याच्या लोकांना पवित्र शास्त्रात ७०० पेक्षा अधिक वेळा संदर्भित करण्यात आले आहे.

पण, प्राचीन मिसरच्या बाबतीत तुम्हाला खरेपणाने काय माहीत आहे? त्याच्याविषयी शिकून घेण्यामुळे पवित्र शास्त्रात उल्लेखिलेल्या अनेक गोष्टींचा अर्थ कळू लागेल.

मिसरात भूगर्भशास्त्रज्ञांना संशोधनात बरेच काही आढळले ज्यामुळे पवित्र शास्त्र अहवालास पुष्टी मिळते. उदाहरणार्थ, योसेफाविषयीचा अहवाल लक्षात घ्या. नावे, पदव्या, घरचा कारभारी या नात्याने योसेफास मिळालेला दर्जा, देशातील दुय्यम अधिकारी तसेच अन्‍नमंत्री हा त्याला मिळालेला दर्जा, मिसऱ्‍यांच्या दफनपद्धती, तसेच भाकरी थोपणाऱ्‍याने भाकरीची टोपली आपल्या डोक्यावर वाहून नेण्याची प्रथा—या सर्व गोष्टी संशोधनात मिळाल्या; त्या, त्या काळातील मिसऱ्‍यांच्या प्रथांना पुष्टी देतात.—उत्पत्ती, अध्याय ३९-४७; ५०:१-३.

भूप्रदेश व लोक

मिसरचे वास्तव्य नाईल नदीवर अवलंबून होते. अस्वान ते कैरोपर्यंतचे या नदीचे १२ मैल रुंदीचे पात्र तप्त आफ्रिकी वाळवंटाच्या पलिकडे उत्तरभागाला अरुंद हिरव्या फितीप्रमाणे वाहते. गतकाळात दरवर्षी येणाऱ्‍या पुरामुळे गाळ वाहून येत असे व यामुळेच मिसर धान्याची निर्यात करणारा व संकटकाळी आश्रय देणारा देश बनला. (उत्पत्ती १२:१०) नदीच्या किनाऱ्‍यावर वाढलेले लव्हाळी बोरु याकरवी आरंभीचा लिखाणाचा कागद मिळे.

नाईल नदीचे पाणी निळ्या भूमध्य समुद्रास जाऊन मिळते त्या आखातास ते पंख्यासारखे पसरते. या मोठ्या त्रिभुजप्रदेशाला खालचा मिसर म्हणतात. बहुधा येथेच “गोशेन प्रांत” होता व येथेच इस्राएली लोक मिसरातील आपल्या वास्तव्यात राहात होते.—उत्पत्ती ४७:२७.

मिसरी धर्म

प्राचीन मिसरी लोक फारोला आपला देव मानीत. यामुळेच फारोने मोशेला उपहासात्मकपणे जो प्रश्‍न विचारला होता त्याला अर्थ मिळतोः “हा कोण यहोवा की ज्याचे ऐकून मी इस्राएलांस जाऊ द्यावे?” (निर्गम ५:२) मिसऱ्‍यांना आणखी खूप दैवते होती. थुटमोश ३ याच्या कबरेवर खोदण्यात आलेल्या यादीत अशा ७४० दैवतांची नावे मिळाली. मिसरी त्र्येक देवांची भक्‍ती करीत, यामध्ये ओसीरीस, इशीश आणि होरस या तिघांचे त्र्येक खूपच मशहूर होते.

मिसऱ्‍यांच्या प्रसिद्ध दैवतांची चित्रे मानवी शरीरे आणि प्राण्यांची शीरे या स्वरुपात काढली जात. मिसरी होरस या दैवताला गरुडाचे डोके दाखवीत तर थोथ दैवताला करकोचा किंवा माकडाचे तोंड काढीत. मांजर, कोल्हा, मगर, वानर आणि विविध पक्षी यांना, त्यांचा विविध दैवतांसोबत संबंध दाखविला गेल्यामुळे पवित्र मानले जाई. अपीस या रेड्याला ओरसीस या दैवताचा अवतार समजण्यात येई व त्याला मेम्फीसच्या मंदिरात ठेवले जाई, आणि मरणानंतर त्याचा भव्य अंत्यसंस्कार करून कुजू नये म्हणून रसायने घालून दफन करीत. प्रसिद्ध मिसरी किड्याचे प्रतीक गळ्यात ताईत म्हणून घातले जाई; तो किडा शेणातील दिसत असे. याला निर्मात्या देवाचे प्रकटन मानीत.

इस्राएली लोकांचा मिसऱ्‍यांशी बराच काळ व जवळचा संबंध आला तरी यांना केवळ एकच देव यहोवा होता आणि याचीच ते भक्‍ती करीत. यांना देवाची किंवा कोणा पक्ष्याची, पशुची, माशाची किंवा इतर कशाचीही धार्मिक प्रतिमा करू नये असे सांगण्यात आले होते. त्यांनी मिसरातून बाहेर पडल्यावर काही काळातच सोन्याचे वासरु करून त्याची भक्‍ती केली हे मिसऱ्‍यांच्या दबावामुळे झाले.—निर्गम ३२:१-२८; अनुवाद ४:१५-२०.

अमरत्वावरील विश्‍वास

मिसऱ्‍यांचा अमरत्वावर ठाम विश्‍वास होता. यासाठीच मिसरी अधिपती आपल्या कबरा भव्य करीत, त्यात जीवनावश्‍यक गरजेच्या व चैनीच्या वस्तु भरीत. जीवनानंतर सार्वकालिक सुख मिळण्याची ते आशा धरुन होते. त्यांनी बांधलेले मनोरे हे या प्रथेची साक्ष देतात.

मिसरी कबरात सोन्याचे दागिने, कपडे, सामान, द्राक्षारस, अन्‍न, मातीची भांडी, हस्तिदंती पेट्या आणि डोळ्याचे काजळ रगडून तयार करण्यासाठी एक छोटी चीप देखील काळजीपूर्वक ठेवीत. कबरेच्या पलिकडील जीवनात या गोष्टींचा वापर होईल असा त्यांचा विश्‍वास होता. आधीच्या काळात कोणी धनी वारला तर त्याच्या दासांना ठार मारून त्याच्यासोबत पुरीत; हेतू हा की, मरणानंतर देखील ते त्याची सेवा करण्यासाठी तेथे असतील. हजारो मिसरी कबरात “मृतांचे पुस्तक” म्हणून ओळखण्यात येणारा मंत्रांचा संग्रह सापडला. मरणानंतर येणाऱ्‍या विविध संकटांचा सामना करण्यात हे मंत्र सहाय्य करतात अशी अपेक्षा धरली जाई.

पण इस्राएलांचा दृष्टीकोण यापेक्षा किती भिन्‍न होता! पवित्र शास्त्राने नंतर जे म्हटले ते यांना ठाऊक होते की, “मृतांस तर काहीच कळत नाही.” आणि जेव्हा माणूस मरतो तेव्हा “बुद्धी व ज्ञान यांचे नाव [रहात] नाही.”a भावी जीवनाकरता त्यांची आशा पुनरुत्थानावर विसंबून होती.—उपदेशक ९:५, १०; स्तोत्रसंहिता १४६:४; इयोब १४:१३-१५.

कोण कधी हयात होता?

मिसरी इतिहासकार मिसरी राजांचा ३१ “राजवंश” असल्याचा उल्लेख करतात आणि ते जुने राज्य (राजवंश ३-६), मध्य राज्य (राजवंश ११, १२) आणि नवे राज्य (राजवंश १८-२०) असे प्रकार सांगतात. पण अशा पद्धतीने त्या सर्वांची ओळख मिळणे फारच कठीण आहे. कारण त्यात प्रश्‍नार्थक आणि जीर्ण झालेली लिखाणे तसेच वेगवेगळ्या प्रदेशात एका मागोमाग नव्हे तर एकाच वेळी कित्येक राजांनी आपला अमल केल्याचाही समावेश येतो.b

मोशाने पवित्र शास्त्रातील पहिल्या पुस्तकांचे लिखाण आरंभिले तेव्हा त्याने मिसरी लोक राजांना नावांनी न संबोधता “फारो” असे जे संबोधित तीच प्रथा अनुसरली असावी. या कारणास्तव आपल्याला अब्राहाम व योसेफ यांच्या काळी कोणता फारो होता तसेच इस्राएल मिसरातून निघण्याच्या वेळी कोणता फारो राज्य करीत होता ते समजू शकत नाही. तथापि, नंतरच्या काळात “फारो” या पदव्यांसोबत त्या राज्यकर्त्यांची नावेही येऊ लागली व त्याकरवी पवित्र शास्त्रीय घटनांचा मिसरी राजाच्या यादीशी संबंध कळून आला. पवित्र शास्त्राच्या अभ्यासकांना खासपणे मनोरंजक वाटतील अशा काही फारोंची माहिती आम्ही येथे देत आहोतः

आखेनातन (मानला जाणारा १८ वा राजवंश) हा सूर्याची तबकडी आतन याचा कट्टर उपासक होता. १८८७ मध्ये कैरोपासून २०० मैल दक्षिणेकडे तेल-अल-आमरना येथे ३७७ मातीच्या पाट्या आढळल्या. या पाट्यात आखेनातन व त्याचा बाप आमेनहोटेप ३ यांना आलेला परराष्ट्रसंबंध विषयक पत्रव्यवहार होता. यात यरुशलेम, मगिद्दो, हाजोर, गज्जा आणि पॅलेस्टाइनमधील इतर प्रांत-शहराकडून आलेला पत्रव्यवहार होता. इस्राएलाने कनानात प्रवेश केल्यावर थोड्याच अवधीनंतर लिहिल्या गेलेल्या पत्रात लढाईतील तंटा व कारस्थाने यांचे वर्णन आढळते. त्याकरवी प्रत्येक गावात एक राजा होता असेही कळते. हेच यहोशवा या पवित्र शास्त्र पुस्तकात देखील आढळते.

तुतनखामेन हा आखेनातन याचा जावई होता. तो “राजा तुत” या नावान मशहुर झाला. याच्या सोन्याच्या कबरेचे सामान भूगर्भशास्त्रज्ञांना संशोधनात आढळले व ते कित्येक संग्रहालयात ठेवले आहे. हे सामान, फारोपाशी किती गडगंज संपत्ती होती त्याचा लक्षणीय पुरावा आहे. अशा या धनसंपत्तीचा मोशेने स्विकार केला नाही, तर त्याने “आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्‍वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने पसंत करून घेतले.”—इब्रीयांस ११:२४, २५.

मेर्नेप्ता हा “१९ व्या राजवंशा”चा होता. तेबेस येथील एका देवळात कोरलेल्या विजयाच्या लिखाणात या फारोने लिहिले की, “इस्राएल ओसाड झाला आहे, त्याचे संतान राहिले नाही.” हा प्राचीन मिसऱ्‍यांच्या अहवालात इस्राएलाचा राष्ट्र या अर्थी आढळणारा थेट असा एकमेव उल्लेख होय. या विजयाची घमेंड जरी खरी होती तरी तिने इस्राएलांनी कनानी प्रदेश आधीच काबीज केला होता याची साक्ष देते. तद्वत, तो विजय हा इ. स. पूर्व १४७३ मध्ये, आखेनातन याला तेल-अल-आमरनाची पत्रे आली आणि मर्नेप्ताहच्या काळी मिळाला हे दिसते.

शिशक (शेशांक १ला, “२२ वा राजवंश”) हा पहिला फारो आहे ज्याचा पवित्र शास्त्रात नावाने उल्लेख आला आहे. तो मोठे रथ आणि सैन्यदळ घेऊन यहुदावर स्वारी करून आला, यरुशलेमास धमकी दिली आणि “त्याने यहोवाच्या मंदिरातील व राजवाड्यातील सर्व भांडार लुटून नेले.” (२ इतिहास १२:९) ही घटना कर्नाक (प्राचीन तेबेस) येथील अमोनच्या देवळात दक्षिणेकडील भिंतीवर जे खोदीव काम करण्यात आले त्यात नमूद करण्यात आली आहे. त्यात १५६ हातबेड्या घातलेले बंदिवान आहेत व त्यातील प्रत्येकजण जिंकलेले शहर वा खेडे याचे प्रतिनिधित्व करीत होता व यात मगिद्दो, शुनेम आणि गिबोन यांचाही समावेश आहे. ज्या जागा शिशकने जिंकून घेतल्या त्यात तो “अब्रामाचे शेत” याचाही उल्लेख करतो; हा मिसरी लिखाणात अब्राहामाचा सुरुवातीचा संदर्भ आहे.

इतर जागतिक सत्ता उदयास येतात

ओघाओघाने मिसरवर अश्‍शुरने मात केली व ते प्रबळ जागतिक सत्ता झाले. तरीहि मिसर हे शक्‍तीमान राजकीय बळ याअर्थी राहिले. उत्तरेकडील इस्राएलाच्या दहा वंशीय राज्याचा शेवटला राजा होशे याने आपल्या कारकीर्दीत अश्‍शुरचे जोखड मोडण्यासाठी मिसरचा राजा सो याजशी संगनमत साधण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. (२ राजे १७:३, ४) काही वर्षांनी, यहुदाचा राजा हिज्कीया याच्या कारकीर्दीत कुशाचा राजा तिऱ्‍हाका (बहुधा मिसराचा कुशी अधिपती, राजा ताहारक) कनानमध्ये आला आणि त्याने अश्‍शुरचा राजा सन्हेरीब याचा हल्ला तात्पुरता परतवून लावला. (२ राजे १९:८-१०) अश्‍शुरात आढळलेली सन्हेरीबची बखर याच घटनेला अनुलक्षून म्हणतेः “मी कुशाचा राजा याचे रथ . . . जिवंतपणे हस्तगत केले.”—ओरिएन्टल इन्स्टिट्यूट प्रिझ्म ऑफ सेनाचेरीब, शिकागोचे महाविद्यालय.

यहोवाचा संदेष्टा यशया याने भाकित केले की, मिसरला “कठोर धन्याच्या” हाती दिले जाईल आणि एक “उग्र” राजा मिसऱ्‍यांवर आपली सत्ता गाजवू लागेल. (यशया १९:४) या भविष्यवादाची सत्यता एका अश्‍शुरी लिखाणात ध्वनित आहे जेथे सन्हेरीबचा मुलगा एसर-हद्दोन याने मिसरवर संपादित केलेल्या विजयाविषयी घमेंड मारून असे म्हटलेः “मी त्याचा राजा तिऱ्‍हाका याला पाचदा बाणांनी घायाळ केले आणि त्याच्या सबंध देशावर आपले साम्राज्य स्थापिले.”

फारो नखो याने इ. स. पू. ६२९ च्या सुमाराला उदयास येणारे तिसरे जागतिक साम्राज्य बाबेलोन याच्या सैन्याला मध्येच अडवून पकडण्याचा प्रयत्न केला. पवित्र शास्त्र म्हणते की, यरुशलेमाचा राजा योशीया याने मूर्खपणाने मगिद्दो येथे मिसरी सैन्याला अडवले व यात तो पराजित झाला व मारला गेला.c (२ इतिहास ३५:२०-२४) सुमारे चार वर्षांनी म्हणजे इ. स. पू. ६२५ मध्ये फारो नखो हा स्वतः कर्कमीश येथे बाबेलोनी सैन्यापुढे पराजित झाला. या घटनेला पवित्र शास्त्र आणि बाबेलोनी इतिहास, दोन्ही पुष्टी देतात. यामुळे बाबेलोनला पश्‍चिमी आशियावर आपले प्रभुत्व जमवता आले.

इ. स. पू. ५२५ मध्ये मिसर चवथे जागतिक साम्राज्य मेद-पारस याच्या ताब्यात आले. यानंतर दोन शतकांनी इ. स. पू. ३३२ मध्ये सिकंदर बादशहा दृश्‍यात आला आणि व त्याने मिसरला पाचवी जागतिक सत्ता ग्रीस याच्या अंकित केले. सिकंदरने नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात अलेक्झांड्रिया हे शहर वसविले आणि इ. स. पू. २८० मध्ये येथे पवित्र शास्त्राचे पहिले भाषांतर इब्री भाषेतून ग्रीक भाषेत झाले. या भाषांतराला सेप्ट्युजंट असे ओळखण्यात आले आणि हेच शास्त्र येशूच्या शिष्यांनी ग्रीक भाषेतील जगतात वापरले.

सहावी जागतिक सत्ता रोम याच्या काळी येशूला लहान बाळ असताना इर्ष्यावान हेरोदापासून वाचवावे म्हणून मिसरात आणण्यात आले. (मत्तय २:१३-१५) इ. स. ३३ च्या पेंटेकॉस्टच्या वेळी ख्रिस्ती सुवार्तेचा मनोरम प्रचार ऐकावा याकरता मिसरी लोक यरुशलेमात आले होते. शिवाय वक्‍तृत्वपूर्ण ख्रिस्ती अप्पुलोस याच भागातून आला होता.—प्रे. कृत्ये २:१०; १८:२४.

होय, मिसर आणि मिसरी लोक पवित्र शास्त्र इतिहासात ठळकपणे दिसून येतात आणि भूगर्भशास्त्रज्ञांचे संशोधन शास्त्रवचने या प्राचीन देशाविषयी जे काही सांगतात त्याला पुष्ठी देते. खरेच, मिसर इतक्या ठळकपणे दिसत होते की त्याचा भविष्यवादित संदेशात, सैतानाच्या वर्चस्वाखाली असणारे सबंध जग असा उल्लेख केला आहे. (यहेज्केल ३१:२; प्रकटीकरण ११:८) तरीपण प्राचीन मिसरला, ते प्रबळ जागतिक सत्ता म्हणून राहिले तरी त्याला यहोवाच्या उद्देशांची परिपूर्णता बदलता आली नाही. हेच पवित्र शास्त्र इतिहासाची दुसरी जागतिक सत्ता अश्‍शुर याच्याहि बाबतीत घडले, जे आम्ही टेहळणी बुरुजच्या ऑगस्ट अंकात पाहणार आहोत.

[तळटीपा]

a  द ज्युईश एन्सायक्लोपिडिआ म्हणतोः “शरीराचे विसर्जन झाल्यावर आत्मा जिवंत राहतो हा विश्‍वास . . . पवित्र शास्त्रवचनांत कोठेही शिकवण्यात आलेला नाही.”

b  या याद्यांशी संबंधित असणाऱ्‍या समस्यांच्या मनोरंजक चर्चेविषयी, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इन्कार्पोरेशन या संस्थेकरवी प्रकाशित करण्यात आलेले एड टू बायबल अंडरस्टँडिंग या पुस्तकातील ३२४-५ पृष्ठे पहा.

c  मगिद्दोत लढलेले हे एक निर्णायक युद्ध होते आणि यामुळेच याचा, हर्मगिद्दोन किंवा आर्मगिद्दोनमध्ये देव बंडखोर मानवी राष्ट्रांसोबत जे निर्णायक युद्ध लढणार त्याचे प्रतीक म्हणून वापर केला जातो.—प्रकटीकरण १६:१६.

[२८ पानांवरील नकाशा]

[For fully formatted text, see publication]

कर्कमीश

फरात

भूमध्य समुद्र

मगिद्दो

यरुशलेम

अलेक्झांड्रिया

गोशेन

मेम्फीस

खालचे मिसर

नाईल

तेबेस

[२९ पानांवरील चित्रं]

मानवी शरीर आणि गरुडाचे डोके या रुपात चितारण्यात आलेले मिसरी दैवत

[३० पानांवरील चित्रं]

मिसरी थडग्यात आढळलेल्या “मृतांचे पुस्तक” याचा काही भाग

[३० पानांवरील चित्रं]

मनोऱ्‍यात असणारे मिसरी थडगे व त्याचे झाकण

[३२ पानांवरील चित्रं]

बसलेल्या अमोन दैवताशेजारी राजा तुतनखामेन

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा