येशूचे जीवन व उपाध्यपण
ख्रिस्ताच्या राज्यवैभवाचा पूर्व देखावा
येशू फिलिप्पैमधील कैसरियाच्या वाटेवर थांबून आपल्या प्रेषितांच्या समवेत लोकसमुदायास शिकवू लागतो. तो त्यांच्यापुढे एक थरारक घोषणा करतोः “मी तुम्हास खचित सांगतो की, येथे उभे राहणाऱ्यांत कोणी असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांस मरणाचा अनुभव येणारच नाही.”
‘येशूच्या या म्हणण्याचा अर्थ काय?’ असा अचंबा शिष्यांना नक्कीच वाटतो. सुमारे आठवडाभरानंतर येशू पेत्र, याकोब व योहान यांना आपणाबरोबर घेऊन एका उंच डोंगरावर जातो. शिष्यांना झोप लागलेली आहे कारण ही रात्र आहे. येशू प्रार्थना करीत असता त्यांच्यादेखत त्याचे रुप पालटते. त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी होते व त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र होतात.
तेव्हा, “मोशे व एलिया” वाटणारे दोघेजण दिसतात व ते येशूसोबत ‘त्याच्या यरुशलेमात पूर्ण होणाऱ्या निर्याणा’बद्दल बोलू लागतात. हे निर्याण अर्थातच, येशूचा मृत्यु व नंतर होणारे पुनरुत्थान याच्या अनुषंगाने आहे. यावरुन हे स्पष्ट दिसते की, पेत्राला वाटत होते त्याप्रमाणे येशूचे मानहानीकारक मरण टळू शकणार नव्हते, ते अटळ होते.
आता पूर्ण जागे होऊन शिष्य मोठ्या आश्चर्याने ते सर्व पाहू व ऐकू लागतात. हा जरी दृष्टांत असला तरी तो इतका खरा वाटतो की, पेत्र लगेच त्या दृश्यात सहभागी होऊन बोलू लागतो. तो म्हणतोः “प्रभुजी, आपणासोबत येथे असावे हे आम्हाकरता बरे आहे. आपली इच्छा असली तर मी येथे तीन मंडप करतो. आपल्यासाठी एक, मोशासाठी एक व एलियासाठी एक.”
पेत्र बोलत आहे तोच एक तेजस्वी मेघ त्यांच्यावर छाया करतो. मेघातून एक वाणी ऐकू येतेः “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, याजवर मी संतुष्ट आहे. याचे तुम्ही ऐका.” ती वाणी ऐकून शिष्य पालथे पडतात. पण येशू त्यांना म्हणतोः “उठा, भिऊ नका.” ते उठतात तेव्हा येशूशिवाय कोणीही त्यांच्या दृष्टीस पडत नाही.
दुसऱ्या दिवशी ते डोंगरावरून खाली उतरत असता, येशू त्यांना निक्षून सांगतोः “तुम्ही जो साक्षात्कार पाहिला तो मनुष्याचा पुत्र मेलेल्यातून पुनः उठेपर्यंत कोणाला सांगू नका.” दृष्टांतात एलिया दिसल्यामुळे शिष्यांच्या मनात प्रश्न उद्भवलेला असतो. ते विचारतातः “एलिया प्रथम आला पाहिजे असे शास्त्री का म्हणतात?”
“एलिया आलाच आहे,” असे येशू सांगतो, “पण त्यांनी त्याला ओळखले नाही.” हे सांगताना येशू बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी सांगत होता, योहानाने एलियाची भूमिका पार पाडली होती. एलियाने अलिशासाठी मार्ग सिद्ध केला तसे योहानाने येणाऱ्या ख्रिस्तासाठी मार्ग तयार केला होता.
तो साक्षात्कार येशू व त्याच्या शिष्यांसाठीही केवढा बलवर्धक ठरतो. हा दृष्टांत प्रत्यक्षात, ख्रिस्ताच्या राज्यवैभवाचा पूर्व देखावा आहे. येशूने एका आठवड्याआधी सांगितले होते त्याप्रमाणे शिष्यांनी “मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहिले.” येशूच्या मरणानंतर, पेत्राने आपल्या लिखाणात “आम्ही पवित्र डोंगरावर त्याजबरोबर असताना ख्रिस्ताच्या ऐश्वर्यशाली गौरवास प्रत्यक्ष पाहिले,” असा उल्लेख केला.
येशू हा शास्त्रवचनात उल्लेखिलेला व देवाने निवडलेला राजा असल्याचे सिद्ध करून दाखविण्याविषयीचे चिन्ह परूश्यांनी येशूकडे विचारले होते. पण त्यांना कोणतेही चिन्ह दिले गेले नाही. याउलट, येशूच्या जिवलग शिष्यांना राज्याबद्दलच्या भविष्यवादांची प्रचिती व्हावी म्हणून येशूला रुपांतरीत दृष्टांतात पाहण्याची मुभा मिळाली. यामुळेच पेत्र पुढे लिहितोः “यास्तव, अधिक निश्चित असे संदेष्ट्यांचे वचन आम्हाजवळ आहे.” मत्तय १६:२८–१७:१३; मार्क ९:१-१३; लूक ९:२७-३७; २ पेत्र १:१६-१९.
◆ काहींनी मरण येण्याआधी ख्रिस्ताला त्याच्या राज्य गौरवात आलेले कसे पाहिले?
◆ दृष्टांतामध्ये मोशे व एलिया हे येशूसोबत कशाविषयी बोलत होते?
◆ हा दृष्टांत शिष्यांना एवढा बळ पुरविणारा कसा होता?