घातक चहाडी कशी चिरडता येईल?
“हे यहोवा, माझ्या मुखावर पहारा ठेव; माझ्या वाणीचे द्वार संभाळ.” —स्तोत्रसंहिता १४१:३.
१. देवाने दिलेला मेंदू केवढी कार्यक्षमता राखून आहे?
यहोवाने आपल्याला मेंदू दिला आहे. तो केवढा आश्चर्यजनक आहे! द इनक्रेडीबल मशीन हे पुस्तक सांगतेः “आम्हाला कितीही गुंतागुंतीचा संगणक निर्माण करता आला तरी तो मानवी मेंदूच्या गुंतागुंतीपुढे व लवचिकपणापुढे फिकाच पडेल . . . तुमच्या मेंदूत हरक्षणाला जाणाऱ्या लाखो संवेदनात्मक लहरींच्या माध्यमाने माहितीचा अपूर्व साठा नेला जातो. त्या तुमच्या शरीराच्या आत तसेच बाहेरील वातावरणात काय चालले आहे ते सांगत असतात . . . इतर काही लहरी, माहितीचे पृथ्थकरण व परिक्षण करून त्यामधून भावना, आठवणी, विचार व योजना निर्माण करतात की ज्यामुळे एखाद्या निर्णयाला येता येते. मेंदूतून निघणाऱ्या संवेदना तुमच्या शरीराला काय करायचे हे लगेच सांगतात . . . याच दरम्यान तुमचा मेंदू तुमची श्वसनक्रिया, रक्ताची रासायनिक क्रिया, तपमान व इतर अशा कित्येक गोष्टी की, ज्यांची तुम्हाला जाणीव देखील होत नाही अशांवर आपले नियंत्रण ठेवतो.”—पृष्ठ ३२६.
२. आता कोणता प्रश्न विचारासाठी सामोरा येतो?
२ खरेच, देवाकडून लाभलेल्या या देणगीचा एखाद्या टाकाऊ खोक्याप्रमाणे किंवा कचरापेटीसारखा कधीच उपयोग करता कामा नये. पण जेव्हा आपण घातक चहाड्यांना ऐकतो व त्या पसरवितो तेव्हा या मेंदूचा दुरुपयोगच करीत असतो. तेव्हा, अशा भाषणाला आपल्याला कसे टाळता येईल आणि इतरांनाही त्यापासून कसे परावृत करण्यात मदत देता येईल?
देवाने दिलेल्या मनाची कदर राखा
३. कोणी खरा ख्रिश्चन घातक भाषण का करणार नाही?
३ देवाने दिलेल्या मनाची कदर बाळगल्यास ती आपल्याला घातक चहाड्या ऐकणे व त्या पसरविणे यापासून दूर ठेवील. अशा कल्पनांना आत्मसात करण्यास तसेच आपली जिव्हा दुसऱ्यांना इजा देण्यासाठी वापरण्याकरता यहोवाचा आत्मा नक्कीच कोणाला चालना देणार नाही. उलटपक्षी, देवाचे वचन म्हणते की, “दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो.” (यशया ५५:७) दुष्ट व्यक्तीचे मन दुष्ट विचारांनी भरलेले असते व तो लगेच सज्जनांची निंदा करतो. पण देवाने दिलेल्या मनाची कदर करणाऱ्या व्यक्तींकडून आपण अशी कधीच अपेक्षा करणार नाही.
४. आमचा मेंदू व आमची बोलण्याची क्षमता याची आम्हास कदर असली तर आम्ही आमचे मन व जीभ यांचा कसा वापर करू?
४ आपले मन व आपली जीभ यांना आमच्या पापीष्ट शरीराच्या वासना व्यक्त करण्यापासून केवळ खरी कदरच आवर घालू शकते. आमचे विचार व बोलणे हे उच्च पातळीवर आम्ही राखू. आमच्या विचारांपेक्षा ज्याचे विचार उच्च आहेत त्या देवावर आम्ही प्रार्थनापूर्वकतेने विसंबून राहिल्यास घातक चहाड्या करण्यापासून दूर राहता येईल. प्रेषित पौलाने ही सूचना केलीः “जे काही सत्य [खोटे किंवा निंद्य नव्हे], जे काही गंभीर विचाराचे [क्षुद्रतेचे नव्हे], जे काही न्याय्य [दुष्ट किंवा घातक नव्हे], जे काही शुद्ध [घाणेरडी निंदा किंवा दुष्ट शंका नव्हे], जे काही प्रशंसनीय [द्वेष्य किंवा अपमानकारक नव्हे], जे काही श्रवणीय [नीचपणाचे नव्हे], जो काही सद्गुण [वाईटपणा नव्हे], जी काही स्तुति [धिक्कार करणे नव्हे] त्यांचे मनन करा.”—फिलिप्पैकर ४:८.
५. समविश्वासू बांधवांनी पौलाच्या बाबतीत काय ऐकले व पाहिले होते?
५ पौलाने पुढे म्हटलेः “माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले, व माझे जे ऐकले, पाहिले ते आचरीत राहा; म्हणजे शांतीदाता देव तुमच्या बरोबर राहील.” (फिलिप्पैकर ४:९) पौलाविषयी इतरांनी काय पाहिले व ऐकले होते? शुद्ध तसेच आध्यात्मिकरित्या उभारणीकारक असणाऱ्या गोष्टी. त्याने लुदिया किंवा तीमथ्य याविषयी चहाड्या सांगून त्यांचे कान भरविले नाही. याचप्रमाणे पौलाने देखील स्वतः यरूशलेम येथील वडील जनांविषयी कोठल्याही अफवा ऐकल्या नाही व त्या पसरविल्याही नाहीत.a देवाने दिलेल्या मनाविषयी पौलाने आदर बाळगला होता म्हणूनच त्याने स्वतःला घातक चहाड्यांमध्ये पडू देण्यापासून आवरले. आम्ही देखील, यहोवाने आम्हास दिलले मन व जीभ याविषयी खरी कदर बाळगल्यास पौलाप्रमाणे त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकू.
देव व त्याच्या वचनाविषयी आदर राखा
६, ७. (अ) अनियंत्रित जीभेचे कोणते परिणाम होतात हे याकोब कसे दाखवितो? (ब) आपण देव व त्याचे वचन याचा आदर केल्यास काय घडणार नाही?
६ देव तसेच त्याचे पवित्र वचन याबद्दलचा अंतःकरणपूर्वक आदर आपल्याला घातक चहाड्यांना चिरडून टाकण्यास मदत करील. खरे पाहता, हा आदर तर, शिष्य याकोबाने जीभ योग्य कामासाठी वापरण्याची जी सूचना मांडली ती ग्रहण करण्यासाठी चालना देईल. (याकोब ३:२-१२) जसा एक छोटासा लगाम जनावराला सरळ मार्गाने नेतो त्याचप्रमाणे ज्या माणसाला आपली जीभ ताब्यात ठेवता येते तो आपल्या सबंध शरीराला काबूत ठेऊ शकतो. लहानशी ठिणगी सबंध वनाला आग लावू शकते तसेच लहानशी जीभ सर्वत्र आगीचे चक्र सुरु करू शकते. मानसाला जनावरे, पक्षी, सरपटणारे जीव तसेच समुद्रप्राणी माणसाळविता येतात, पण “मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही,” असे याकोब म्हणतो. पण ही काही, घातक चहाड्या चिरडून टाकता येत नाही यासाठी सबब होत नाही.
७ एकाच मुखातून आशीर्वाद व शाप येतात असे याकोबाने म्हटले आहे. हे बरोबर नाही, कारण झऱ्यातून एकाच वेळी गोड व कडू पाणी येत नाही. अंजिराच्या झाडावर जैतुनाची फळे येत नाही; तसेच खाऱ्या पाण्यातून गोड पाणी निघत नाही. हे खरे की, ख्रिश्चन अपूर्णावस्थेत असेपर्यंत जिभेला पूर्णपणे वश करता येणार नाही. यामुळे, पश्चाताप दाखविणाऱ्या गुन्हेगाराच्या बाबतीत आपण दयाळू असले पाहिजे, पण त्यामुळे घातक चहाड्यांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये. आपण देव व त्याचे वचन याविषयीचा खरा आदर प्रदर्शित करीत राहिल्यास आम्हाकडून जीभेचा विषारी पद्धतीचा दुरुपयोग होत राहणार नाही.
प्रार्थना कशी मदत देऊ शकते
८. घातक चहाड्यांना चिरडून टाकण्यास प्रार्थना आमची कशी मदत करू शकते?
८ घातक चहाड्यांना ऐकण्याचा व त्या पसरविण्याचा मोह प्रबळ असतो. तुम्ही गतकाळात अशा मोहात पडला असाल तर मग देवाकडे क्षमा मागून त्याच्या मदतीची याचना करणार नाही का? येशूने आम्हाला अशी प्रार्थना शिकविलीः “आम्हास परिक्षेत आणू नकोस तर आम्हास वाइटापासून सोडीव.” (मत्तय ६:१३) जे ख्रिश्चन अशा परिक्षेतच नव्हे पण वाईट बोलण्यास देवाने आपल्याला सोडू नये अशी कळकळीची प्रार्थना करतात ते सैतानाच्या या साधनाला बळी पडणार नाहीत; त्यांची या घातक निंदेखोरापासून सुटका केली जाईल.
९. कोणाची निंदा करण्याचा मोह झाल्यास आम्ही कशी प्रार्थना करावी?
९ कोणाची निंदा करण्याचा आम्हाला मोह झाल्यास आम्ही अशी प्रार्थना करू शकतोः “हे यहोवा, माझ्या मुखावर पहारा ठेव; माझ्या वाणीचे द्वार संभाळ.” (स्तोत्रसंहिता १४१:३) द्वेषी, लबाड, व घातकी निंदा करणारा सैतान याचे अनुकरण करून या मोहाला वश होऊ दिल्यास आमची चिरकालिक जीवनप्राप्तीची संधी आमच्या हातून जाईल. (योहान ८:४४) प्रेषित योहानाने लिहिलेः “जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे; आणि कोणाही नरहिंसकाच्या ठायी सार्वकालिक जीवन राहात नाही.”—१ योहान ३:१५.
प्रीती चहाडीस दूर घालवून देते
१०. दुसऱ्यांविषयी चहाड्या करीत फिरण्यापेक्षा आम्ही त्यांचे कशाविषयी ऋणी असावे?
१० आम्ही सर्वजण एकमेकांचे ऋणी आहोत, पण ज्यामुळे घातक चहाडी उद्भवते तो द्वेष मात्र आम्ही आपणापाशी राखू नये. “एकमेकांवर प्रीती करणे याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका,” असे पौलाने लिहिले. (रोमकर १३:८) एकमेकांविरुद्ध दुर्भाषण करून त्यांची ख्याति डागाळण्याऐवजी दरदिवशी प्रेमाचे ऋण फेडण्याचे आचरण ठेवावे. यहोवावर प्रीती करीत आहोत असा जर आपला दावा आहे तर आम्हाला आपल्या सहउपासकांची निंदा करून चालणार नाही, “कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही.”—१ योहान ४:२०.
११. घातक चहाड्यासंबंधाने येशूने शेरडे व मेंढरे याविषयी दिलेला दाखला आमच्या विचाराला खाद्य कसे देतो?
११ येशूने शेरडे व मेंढरे यांचा दिलेला दाखला लक्षात आणा. शेरडांसारख्या लोकांना असे सांगण्यात आले की, त्यांनी येशूच्या बांधवांना जी वागणूक दिली ती त्यालाच दिली. तुम्ही कधी ख्रिस्ताविषयी चहाडी करणार का? तुम्हाला तुमचा प्रभु व धनी याविषयी असे काही बोलता येणार नाही तर मग त्याच्या अभिषिक्त बांधवांना तसे वागवू नका. शेरडांनी केलेली चूक करू नका, कारण ते “सार्वकालिक शिक्षा भोगावयास जातील.” तुमची येशूच्या बांधवांवर प्रीती आहे तर ती, तुम्ही त्यांच्याविषयी जे बोलता त्याद्वारे दाखवून द्या.—मत्तय २५:३१-४६.
१२. नीतीसूत्रे १६:२ चा गोषवारा काय आहे, आणि त्याने आमचे विचार, कृती व भाष्य यावर काय परिणाम करावा?
१२ आम्ही सर्वच पापी व येशूच्या खंडणी यज्ञाची गरज असणारे आहोत, त्यामुळे कोणाला आमच्याविषयी अवकृपेचे भाष्य करावेसे वाटल्यास तो आमच्याबद्दल बरेच काही सांगून जाईल. (१ योहान २:१, २) अर्थातच, आम्हाला स्वतःला वाटत असेल की, आम्ही बऱ्याने वागणारे आहोत. पवित्र शास्त्रही म्हणते की, “मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण यहोवा आत्मे तोलून पाहतो.” देवाची तागडी वशिला किंवा पक्षपातीपणाने झुकवता येत नाही. (नीतीसूत्रे १६:२; प्रे. कृत्ये १०:३४, ३५) तो आमचा आत्मा तोलून बघतो आणि ज्याद्वारे आम्ही विचार करतो, कृती करतो व बोलतो ती अंतस्थ प्रवृत्ती तो लक्षात आणतो. त्यामुळे आपण स्वच्छ, शुद्ध आहोत आणि बाकीचे सर्व मात्र कलंकित व घातकी शेरा मिळण्याच्या पात्रतेचे आहेत असे देवाने आमच्या बाबतीत बघावे हे आम्ही निश्चितच इच्छिणार नाही. आम्हाला यहोवाप्रमाणेच निःपक्षपाती, दयाळू व प्रेमळ असले पाहिजे.
१३. (अ) “प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे,” ही गोष्ट घातक चहाड्यांना कशी चिरडू शकते? (ब) आम्हाला नाहीत असे सेवेचे हक्क दुसऱ्या कोणाला मिळाल्यास त्याविरुद्ध निंदात्मक भाषण करण्यास काय आम्हाला आवर घालू शकेल?
१३ पौलाने १ करिंथकर १३:४-८ मध्ये जे म्हटले त्याचा अवलंब केल्यामुळे घातक चहाड्यांना चिरडून टाकण्यास मदत मिळेल. त्याने लिहिलेः “प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे.” विभाजित घरात राहणारी व छळाचा अनुभव घेणारी एक भगिनी कदाचित आम्हाला उत्स्फुर्ततेने अभिवादन करणार नाही. किंवा कदाचित कोणाची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते शारीरिकदृष्ट्या मंद असतील. तर मग, अशा लोकांना टीकात्मक चहाड्यांचे सावज बनविण्याऐवजी प्रीतीने आम्हाला अशांसोबत सहनशील व दयाळू राहण्यास चालना देऊ नये का? ‘प्रीती हेवा करीत नाही, बढाई मारीत नाही व फुगत नाही.’ यास्तव, आम्हाला नाहीत असे सेवेच्या कार्याचे हक्क दुसऱ्या ख्रिश्चनाला मिळतात तेव्हा, त्याच्याविरुद्ध बोलणी करण्यास व तो त्या कामासाठी लायक नाही असे शेरे देत राहण्यापासून केवळ प्रीतीच आम्हाला बांध घालू शकेल. याचप्रमाणे प्रीती असली तर आम्ही जे साध्य करू त्याविषयी बढाई करणार नाही; कारण अशा गोष्टीमुळे ज्यांना ते हक्क नाही अशांमध्ये खिन्नता निर्माण केली जाऊ शकते.
१४. आम्ही इतरांविषयी जे बोलतो त्यावर परिणाम करू शकेल असे आणखी काय प्रीतीसंबंधाने आहे?
१४ पौल असेही म्हणाला की, ‘प्रीती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहात नाही, चिडत नाही, व अपकार स्मरत नाही.’ ख्रिस्ती आचाराला न शोभणाऱ्या गोष्टी बोलण्यापेक्षा प्रीतीने आम्हाला इतरांविषयी चांगले बोलण्यास व त्यांच्या आस्थेचा विचार करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. ती आम्हाला चिडण्यापासून तसेच लोकांना खऱ्या किंवा काल्पनिक इजात्मक गोष्टी बोलण्यापासून आवर घालते. वस्तुतः ‘प्रीती अनीतीत आनंद मानीत नाही, तर सत्यासंबंधी आनंद करीत’ असल्यामुळे ती आम्हाला घातक चहाड्यांपासून व शिवाय विरोधकांना अन्याय सहन करावा लागला तेव्हाही या चहाड्या पसरविण्यापासून आवर घालते.
१५. (अ) ‘प्रीती सर्वांसंबंधाने धीर धरते व खरे मानते’ याचा आम्हावर कसा परिणाम होण्यास हवा? (ब) जरी कोणी यहोवाच्या संस्थेविरुद्ध बोलणी केली तरी प्रीतीचा कोणता पैलू आम्हाला तिच्याशी जडून राहण्यात मदत देईल?
१५ प्रीती, देवाच्या वचनात आढळणारे “सर्वकाही खरे मानण्यास सिद्ध असते [व] सर्वांची आशा धरते.” तसेच ती लबाड धर्मत्याग्यांच्या निंद्य प्रचारास श्रवण करण्यास लावण्यापेक्षा ‘विश्वासू दास’वर्गाद्वारे जे आध्यात्मिक अन्न पुरविण्यात येते त्याची कदर करण्यास प्रभावीत करते. (मत्तय २४:४५-४७; १ योहान २:१८-२१) खरे म्हणजे, प्रीती ‘सर्वांसंबंधाने धीर धरते व ती कधी अंतर देत नाही,” त्यामुळे, जरी कोणी “खोटे बंधू” व इतरांनी देवाच्या संस्थेविरुद्ध वा तिच्यामधील सदस्यांविषयी काही विरोधाची बोलणी केली तरी ती आम्हास संस्थेशी निष्ठावंत राहण्यास मदत करते.—गलतीकर २:४.
आदर चहाडीस उपटून काढतो
१६. करिंथमधील खोट्या बांधवांनी पौलाला कशी वागणूक दिली?
१६ समविश्वासू बांधवांसाठी असणारा आदर घातक चहाड्यांना चिरडून टाकण्यासाठी मदत करतो. आमच्या बांधवांचा देव स्वीकार करीत असल्यामुळे आम्ही त्यांची निंदा करता कामा नये. पौलाला ज्यांचा सपंर्क आला त्या “खोट्या बांधवां”सारखे आम्ही कधीही असू नये. त्यांनी निश्चये त्याच्याविषयी निंद्य बोलणी केली असावीत. (२ करिंथकर ११:२६) याशिवाय धर्मत्याग्यांनी देखील त्याची निंदा केली असावी. (पडताळा यहुदा ३, ४.) करिंथमध्ये काही विशिष्ठ लोकांनी पौलाविषयी असे म्हटलेः “त्याची पत्रे वजनदार व जोरदार आहेत, परंतु त्याची शरीरयष्टी दुर्बळ व त्याचे भाषण टाकाऊ आहे.” (२ करिंथकर १०:१०) लोकांना ज्यांच्याविषयी प्रेम वाटत असते त्याविषयी ते असे शेरे कधीही देत नाहीत.
१७. दियत्रफेस प्रेषित योहानाविरूद्ध कोणत्या प्रकारचे संभाषण करीत होता?
१७ याचप्रमाणे दियत्रफेस हा आणखी एक मनुष्य होता, ज्याने प्रेषित योहानाविरूद्ध बोलणी केली होती. “मी मंडळीला थोडेसे लिहिले,” असे योहान म्हणाला, “परंतु, तिच्यामध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रफेस हा आमचा स्वीकार करीत नाही; ह्यामुळे मी आलो तर तो जी कृत्ये करतो त्याची आठवण देईन. तो आम्हाविरुद्ध द्वेषबुद्धीने बाष्कळ बडबड करतो.” (३ योहान ९, १०) अशी ही बडबड करणे खूपच गंभीर गोष्ट होती, त्यामुळे आज आम्ही जर अशा गोष्टी ऐकल्या वा त्या पसरविल्या जात आहे हे पाहिले तर ते ताबडतोब थांबवण्यास हवे.
१८. देमेत्रिय हा दियत्रफेसपेक्षा कसा वेगळा होता, आणि यांच्यामधील भिन्नता आमच्या वागणूकीवर कसा परिणाम करू शकते?
१८ नीतीमानांचा आदर राखला जाण्यास हवा यासाठी योहानाने गायसला म्हटलेः “प्रिय बंधो, वाईटाचे अनुकरण करू नको, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेले नाही. देमेत्रियाविषयी सर्वांनी व स्वतः सत्यानेही चांगली साक्ष दिली आहे; आम्हीही साक्ष देतो; आणि आमची साक्ष खरी आहे हे तुला ठाऊक आहे.” (३ योहान १, ११, १२) आपण प्रत्येकाने स्वतःला विचारून पाहण्यास हवेः “मी कोणासारखा आहे, बडबडणाऱ्या दियत्रफेसासारखा की, विश्वासू देमेत्रियसारखा?” आम्ही आमच्या बांधवांचा आदर केल्यास आम्ही त्यांच्याविषयी कधीही नकारात्मक बोलणी करणार नाही व त्याकरवी आम्ही बडबडे आहोत या अर्थी इतरांना बघण्याचे कारण पुरविणार नाही.
१९. खोट्या बांधवांनी सी. टी. रसेल यांची मानहानी करण्याचा कसा प्रयत्न केला?
१९ खोट्या बंधूंचे अस्तित्व केवळ पहिल्याच शतकात नव्हते. १८९०च्या काळात देवाच्या संस्थेसोबत संबंध ठेवणाऱ्या काही उलट्या काळजाच्या लोकांनी वॉचटावर संस्थेचा ताबा आपणापाशी घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चार्ल्स टेझ रसेल यांच्याविरुद्ध फितुरी केली व त्यांना संस्थेचे पहिले अध्यक्ष राहण्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. ही फितुरी साधारणतः दोन वर्षे आतल्या आत शिजत होती व शेवटी ती १८९४ मध्ये उघड झाली. ठेवण्यात आलेले सर्व खोटे दोषारोप हे रसेल यांनी कारभारात अप्रामाणिकपणा केला या दाव्यावर आधारलेले होते. काही क्षुल्लक दोषारोपांनी आरोप करणाऱ्यांचा हेतू साध्य करण्याचा यत्न साधला व तो हेतू म्हणजे सी. टी. रसेल यांची मानहानी. तरीपण, निपक्षपाती ख्रिश्चनांनी एकंदर प्रकरणाचा शोध केला व रसेल हे निर्दोष असल्याचे स्पष्ट केले. अशाप्रकारे, “रसेल व त्यांच्या कामाला उडवून देण्याचा” बेत पूर्णपणे फसला गेला. प्रेषित पौलाप्रमाणेच बंधू रसेल यांचीही खोट्या बंधूंकडून निंदा झाली, पण ही योजना सैतानाची होती हे स्पष्ट झाले. यानंतर, फितुरी करणारे लोक ख्रिस्ती सहवासाचा अनुभव घेण्यास अपात्र असल्याचे ठरवण्यात आले.
चांगली कामे घातक चहाडीला उडवून देतात
२०. काही तरुण विधवांच्या बाबतीत पौलाला कोणता दोष आढळला?
२० घातक चहाड्या या, कामात मग्न राहिल्यामुळे नव्हे तर आळशी वा रिकामटेकडे बसून राहिल्यामुळे उद्भवत असतात हे पौलाला माहीत होते. काही तरुण विधवा “घरोघर फिरुन आळशी होतात; आणि आळशी होतात इतकेच नव्हे तर वटवट्या व लुडबुड्या होतात आणि बोलू नये ते बोलत राहतात” हे पौलाला आवडले नाही. मग, याला उपाय कोणता होता? हितकारक कामे. यामुळेच पौलाने लिहिलेः “तरुण विधवांनी लग्न करावे, मुले प्रसवावी, घर चालवावे आणि विरोधकाला निंदा करण्यास निमित्त सापडू देऊ नये.”—१ तीमथ्य ५:११-१४.
२१. घातक चहाडीचा पाश दूर सारण्यात १ करिंथकर १५:५८ कसा प्रभाव पाडते?
२१ स्त्रियांनी आपले घर चालवले, मुलांना देवाच्या दर्जानुरुप प्रशिक्षण दिले, आणि इतर योग्य हालचालीत सहभाग घेतला तर घातक चहाडीप्रत नेणाऱ्या वटवटीसाठी त्यांना वेळच देता येणार नाही. तसेच पुरुष मंडळी देखील चांगल्या कामात गुंतून राहिली तर त्यांना अशा बडबडीसाठी वेळ राहणार नाही. “प्रभुच्या कामामध्ये करण्याजोगे पुष्कळ” असल्यामुळे आम्हाला घातक चहाड्या करण्याचे टाळण्यामध्ये खूप मदत मिळू शकेल. (१ करिंथकर १५:५८) ख्रिस्ती सेवकपण, मंडळीच्या सभा तसेच इतर ईश्वरी कामे यात अंतःकरणपूर्वक घेतलेला सहभाग आमची मने आध्यात्मिक गोष्टीत लावून ठेवील, जे आम्हास रिकामटेकडे, चहाडी करणारे व इतरांच्या कामात लुडबुड करणारे बनण्यापासून दूर ठेवील.
२२. निंदकांविषयी देवाचा दृष्टीकोण काय असल्याचे नीतीसूत्रे ६:१६-१९ सांगते?
२२ आम्ही ईश्वरी कामात मग्न राहिलो व इतरांना आध्यात्मिक आशीर्वाद मिळवून देण्यात मदत केली तर बेईमानी व चहाड्या लावणारे असे न होता, खरे मित्र बनू शकू. (नीतीसूत्रे १७:१७) त्याचप्रमाणे, आम्ही घातक चहाड्या टाळत राहिलो तर आमचा एक सर्वोत्तम मित्र असेल व तो म्हणजे स्वतः यहोवा देव. आपण हे लक्षात ठेवू या की अशा सात गोष्टींचा त्याला वीट आहे व त्या आहेतः “उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतःकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी व भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य.” (नीतीसूत्रे ६:१६-१९) चहाडखोर लोक राईचा पर्वत करतात आणि विपरीत गोष्टी सांगतात; आणि निंदकाठायी खोटी जिव्हा असते. त्यांचे शब्द, ज्यांचे पाय कहाण्या पसरवण्यात उत्सुक असतात अशांना गति देतात. आणि सरतेशेवटी या सर्वांचा परिणाम म्हणजे वैमनस्य होय. पण, आपण जर देव ज्यांचा द्वेष करतो अशा गोष्टींचा द्वेष केला तर आम्ही घातक चहाड्यांना दूर झुगारून देऊ शकू; कारण या चहाड्या सरळांची बदनामी करतात व प्रमुख निंदक दियाबल सैतान याला आनंद देत असतात.
२३. आमच्या संभाषणाकरवी आम्हाला यहोवाचे अंतःकरण कसे आनंदी करता येईल?
२३ या कारणास्तव, आपण यहोवाचे अंतःकरण आनंदी करू या. (नीतीसूत्रे २७:११) ज्या संभाषणाविषयी त्याला घृणा वाटते ती आपण टाळू या; निंदा ऐकण्याचे टाळू या आणि घातक चहाड्यांना चिरडण्यासाठी होता येईल तितके करू या. या गोष्टी अर्थात, यहोवा आमचा पवित्र देव याच्या साहाय्याने निश्चितपणे करता येतील.
[तळटीपा]
a आज, नियमन मंडळाचे सदस्य किंवा त्याचे प्रतिनिधी यांनी अमूक असे म्हटले वा केले याविषयीचे सनसनाटी वृत्त ऐकणे व ते पसरविणे हे योग्य नाही.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ दुसऱ्यांची निंदा करू नये यासाठी प्रार्थना आम्हाला कशी मदत करू शकते?
◻ १ करिंथकर १३:४-८चा अवलंब आम्हाला घातक चहाड्या चिरडून टाकण्यात कशी मदत देतो?
◻ इतरांना आदर दाखविणे ही गोष्ट आमच्या समविश्वासूंविषयी चहाड्या पसरविण्याच्या मोहाला कसा प्रतिबंध घालते?
◻ घातक चहाड्यांचा पाश टाळण्यामध्ये १ करिंथकर १५:५८ कोणता प्रभाव राखून आहे?