वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 १२/१ पृ. १०-१५
  • वयस्करांच्या हिताकडे दृष्टी ठेवणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वयस्करांच्या हिताकडे दृष्टी ठेवणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विधवांचा सन्मान करणे
  • वडील या नात्याने त्यांचे हित पहावे
  • व्यक्‍तिगतरित्या त्यांच्या हिताकडे लक्ष द्या
  • ख्रिस्ती कुटुंब वयस्करांना मदत देते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • वयोवृद्धांची काळजी वाहणे —ख्रिस्ती जबाबदारी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • मंडळीतील वृद्ध बांधवांचा आदर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • वेगळे राहात असले तरी त्यांना विसरलो नाही
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 १२/१ पृ. १०-१५

वयस्करांच्या हिताकडे दृष्टी ठेवणे

“तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्‍यांचेहि पहा.”—फिलिप्पैकर २:४.

१, २. (अ) वयस्करांच्या गरजेविषयी पहिल्या शतकातील नियमन मंडळाने कशी आस्था दाखवली? (ब) त्यामुळे प्रचार कार्य दुर्लक्षिले गेले नव्हते याचा कोणता पुरावा आहे?

इ.स. ३३चा पेन्टेकॉस्ट झाल्यावर लगेचच ख्रिस्ती मंडळीत “हेल्लेणी यहुद्यांची इब्री लोकांविरूद्ध कुरकुर सुरु झाली. कारण [गरजवंतांच्या अन्‍नाच्या] रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे.” यातील बहुतेक विधवा वयस्कर होत्या व त्यांना स्वतःच स्वतःची तरतूद करता येत नव्हती हे उघड आहे. त्या कुरकुरीच्या प्रकरणात प्रेषितांनी स्वतःच हस्तक्षेप केला व म्हटले: “तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्‍या जरूरीच्या कामावर नेमू.”—प्रे. कृत्ये ६:१–३.

२ अशाप्रकारे आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी गरजवंतांची काळजी करणे हे “जरूरीचे काम” आहे असा दृष्टीकोण धरला होता. काही वर्षानंतर शिष्य याकोबाने लिहिले: “देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे . . . हे आहे.” (याकोब १:२७) याचा हा अर्थ होता का की सर्वात महत्वाच्या प्रचाराच्या कामाकडे दुर्लक्ष झाले? नाही. कारण विधवांची काळजी घेण्याविषयीच्या कार्याची उत्तम व्यवस्था लावून झाल्यावर “देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. यरूशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली.”—प्रे. कृत्ये ६:७.

३. फिलिप्पैकरांस पत्र २:४ मध्ये कोणते उत्तेजन देण्यात आले आहे व ते आज खासपणे का योग्य आहे?

३ आज आम्ही “कठीण दिवसात” रहात आहोत. (२ तिमथ्यी ३:१) कौटुंबिक जीवनाचा ताण व प्रापंचिक काम यामुळे वयस्करांच्या गरजेसबंधांची काळजी करण्याची शक्‍ती व इच्छा हवी तितकी राहत नाही. या कारणास्तव फिलिप्पैकरांस पत्र २:४ आम्हाला यथायोग्यपणे आर्जविते: “तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका. तर दुसऱ्‍यांचेही पहा.” हे समतोलरित्या व व्यवहारिकपणे कसे साध्य करता येईल?

विधवांचा सन्मान करणे

४. (अ) पहिल्या शतकातील मंडळीने विधवांचा “सन्मान” का व कसा केला? (ब) अशा या तरतुदीची नेहमीच गरज भासे का?

४ तिमथ्याला लिहिलेल्या पहिल्या पत्रातील ५व्या अध्यायात पौल दाखवितो की आरंभीचे ख्रिश्‍चन मंडळीत विधवांची कशी काळजी घेत. त्याने तिमथ्याला आर्जविले: “ज्या विधवा खरोखरीच्या विधवा आहेत त्यांचा सन्मान कर.” (वचन ३) वयस्कर विधवांना निवडण्यात येऊन त्यांना नियमितरित्या आर्थिक साह्‍य देऊन त्यांचा सन्मान केला जाई. अशा या विधवांना इतर कोणत्याही उगमाकडून मदत मिळत नसे असे दिसते त्यामुळेच त्या ‘देवावर आपली आशा ठेवून रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना करण्यात’ मग्न असे. (वचन ५) त्यांच्या या उदरनिर्वाहाविषयीच्या प्रार्थनांचे कसे उत्तर मिळे? मंडळीद्वारे. संघटीत कार्यक्रमानुसार लायक विधवांना विनम्र असा चरितार्थ पुरवला जाई. अर्थातच, कोणा विधवेला आर्थिक साहाय्याचा उगम होता किंवा तिची देखभाल तिचे नातेवाईक करू शकत होते तर अशा या तरतुदीची तिला जरूरी नसे.—वचने ४, १६.

५. (अ) काही विधवा कशा “विलासी” बनत होत्या? (ब) अशांना मदत देण्याचे बंधन मंडळीवर हाते का?

५ “परंतु जी [विधवा] विलासी आहे ती जिवंत असून [आध्यात्मिक दृष्टया] मेलेली आहे.” (वचन ६) या विधवा “विलासी” वा किंगडम इन्टरलिनियर शब्दशः म्हणते त्याप्रमाणे “विषयासक्‍तीने वागणारी” कशी होत असे त्याविषयीचे स्पष्टीकरण पौल देत नाही. (वचन ११) तथापि, लिडेल ॲण्ड स्कॉट्‌स्‌ ग्रीक–इंग्लीश लेक्सिन या ग्रंथाच्या मते “विषयासक्‍तीने वागणे” यात “वेडगळपणा किंवा विलासाचा अतिरेकपणा किंवा यथेष्ट भोग” याचाहि समावेश होता. कदाचित काहींना त्यावेळी वाटत असावे की, मंडळीने त्यांना श्रीमंत करावे, असंयमी जीवनाच्या यथेष्ट भोग व उधळपट्टीसाठी आर्थिक साह्‍य करावे. परिस्थिति कोणतीही असली तरी अशा प्रवृत्तिच्या व्यक्‍ति मंडळीकडील मदत प्राप्त करण्यास अपात्र आहेत असे पौल दर्शवीत होता.

६, ७, आणि तळटीप. (अ) ही “यादी” काय होती? (ब) ६० वर्षांच्या आत असलेल्यांना आर्थिक साह्‍य का नाकारले जाई? (क) प्रतिकूल “शासन” मिळू नये यासाठी पौलाने तरूण विधवांना काय मदत दिली?

६ त्यामुळेच पौलाने म्हटले: “साठ वर्षाच्या आत [नाही अशी] . . . विधवा [अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्‍यांच्या] यादीत नोंदण्यात यावी.” पौलाच्या काळात ६० वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्‍या विधवेला स्वतःचा चरितार्थ स्वतःच करण्याची क्षमता नसलेली व विवाह होऊ न शकणारी असे समजले जाई.a “परंतु,” पौल म्हणाला, “तरूण विधवांस [यादीत] नोंदू नये. कारण जेव्हा त्या कामुक होऊन ख्रिस्ताला सोडतात, तेव्हा त्या लग्न करावयास पाहतात. अशाने त्यांना शासन होईल, कारण त्यांनी आपल्या विश्‍वासाच्या पहिल्या प्रतिज्ञेचा भंग केला.”—वचने ९, ११, १२.

७ ही “यादी” तरूण विधवांसाठी खुली राखली असती तर काहींनी उतावळीने सड्या राहण्याची प्रतिज्ञा जाहीर केली असती. पण वेळ गेला तसतसे आपल्या ‘कामुकते’ वर नियंत्रण राखण्यास त्यांना जड गेले असते आणि मग लग्न करण्याची इच्छा प्रदीप्त झाली असती; व या कारणामुळे की, त्यांनी सडे राहण्याविषयीच्या ‘आपल्या विश्‍वासाच्या प्रतिज्ञेचा भंग केला म्हणून त्यांना शासन मिळणार हाते.’ (उपदेशक ५:२–६ पडताळा.) अशी ही संभाव्य समस्या पौलाने खोडून लावली आणि म्हणून त्याने म्हटले: “माझी इच्छा अशी आहे की तरूण विधवांनी लग्न करावे, मुले प्रसवावी.”—वचन १४.

८. (अ) पौलाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वामुळे मंडळीचे कसे रक्षण झाले? (ब) तर मग गरजवंत तरूण विधवा आणि वृद्ध पुरुष यांची काळजी घेतली जात होती का?

८ याशिवाय, ज्यांनी ख्रिस्ती सत्कार्याचा चांगला अहवाल राखला आहे अशांपुरतीच प्रेषिताने ती यादी मर्यादित ठेवली. (वचन १०) याप्रकारे कोणा आळशी वा लोभिष्ठांसाठी मंडळी हे “कल्याणकारी केन्द्र” नव्हते. (२ थेस्सलनीकाकर ३:१०, ११) पण तेच वृद्ध पुरुष व तरूण विधवा यांच्या बाबतीत काय? अशांपुढे काही गरज उभी राहिलीच तर मंडळी वैयक्‍तिक आधाराने यांना मदत करू शकत होती.—पडताळा १ योहान ३:१७, १८.

९. (अ) वयस्करांविषयी काळजी घेण्याची व्यवस्था पहिल्या शतकापेक्षा आज का भिन्‍न ठरते? (ब) पहिले तिमथ्यी याच्या ५व्या अध्यायात पौलाने केलेली चर्चा आज आम्हामध्ये कशा विषयीची रसिकता उभारते?

९ अशा प्रकारची व्यवस्था पहिल्या शतकातील मंडळ्‌यांची गरज भागविण्यास पुरेशी होती. तथापि, द एक्स्पोझिटर्स बायबल कॉमेन्ट्री ने परिक्षण केले त्याप्रमाणे: “आज, विम्याद्वारेची अर्थप्राप्ति, सामाजिक सुरक्षा व नोकरीच्या संध्या यामुळे परिस्थिती खूपच वेगळी झाली आहे.” सामाजिक व आर्थिक स्वरूपात बदल झाल्यामुळे आज मंडळयांनी वृद्धांना अर्थसाह्‍य करणारी यादी बाळगण्याची तितकी जरूरी नाही. तरीपण पौलाने तिमथ्याला लिहिलेल्या गोष्टी आम्हामध्ये याची रसिकता उभारतात: (१) वयस्करांच्या समस्या या सबंध मंडळीच्या—खासपणे वडिलांच्या—काळजीचा भाग आहेत. (२) वयस्करांची काळजी घेण्याबद्दल योग्य ती व्यवस्था करण्यास हवी. (३) जे खरेच गरजवंत आहेत अशांपुरती ही काळजी मर्यादित आहे.

वडील या नात्याने त्यांचे हित पहावे

१०. वयस्करांच्या बाबतीत आस्था प्रदर्शित करण्यात आज वडील कसा पुढाकार घेऊ शकतात?

१० वयस्करांच्या बाबतीत आस्था प्रदर्शित करण्यात देखरेखे कसा पुढाकार घेतात? ते वयस्करांच्या गरजेचा मसुदा आपल्या वेळोवेळी होणाऱ्‍या वडीलवर्गाच्या सभेत नमूद करू शकतात. एखादी विशिष्ठ मदत देण्याची गरज आहे तेव्हा ती देण्याची ते व्यवस्था करू शकतात. कदाचित ही मदत त्यांना व्यक्‍तिगतरित्या देता येणार नाही परंतु त्यांना हे दिसेल की ती मदत देण्यात मंडळीत पुष्कळजण, युवकसुद्धा इच्छुक असतात. तरीपण, ज्याला ही मदत पुरविली जाते त्यावर संयोजन ठेवण्यास ते एका बांधवाची नेमणूक करू शकतील व त्याद्वारे त्याकडे लक्ष देत राहतील.

११. वयस्करांच्या गरजेसंबंधी वडील कसे परिचित होऊ शकतात?

११ शलमोनाने सल्ला दिला: “तू . . . आपल्या कळपावर चांगली नजर ठेव.” (नीतीसूत्रे २७:२३) याकरता देखरेख्यांनी वयस्करांना व्यक्‍तिगत भेटी द्याव्या म्हणजे त्यांच्या कोणत्या ‘गरजा भागवा’यच्या आहेत ते त्यांना चांगले कळेल. (रोमकर १२:१३) एका फिरत्या देखरेख्याने ही गोष्ट अशी मांडली: “काही वयस्कर अगदीच अपराधीन असतात त्यामुळे तुम्हाला कशाची गरज आहे हे विचारणे सुयुक्‍त ठरणार नाही. उलटपक्षी त्यांची गरज न्याहाळून ती पूरी करण्याच्या कामाला लागणे हे फारच बरे!” जपानमध्ये ८० वर्षे वयाच्या भगिनीला लक्ष देण्याची गरज तेथील देखरेख्यांना आढळली. ते कळवतात: “आम्ही, तिची कोणीतरी दिवसातून दोनदा, सकाळ, संध्याकाळ प्रत्यक्ष वा फोनद्वारे भेट घेत आहे याची व्यवस्था लावून दिली.”—पडताळा मत्तय २५:३६.

१२. (अ) वयस्करांना मंडळीच्या सभांचा लाभ मिळत आहे याकडे वडील कसे लक्ष देऊ शकतात? (ब) संस्थेकरवी निर्मिण्यात आलेल्या ध्वनिफितींचा कसा चांगला उपयोग केला जाऊ शकतो?

१२ वयस्करांना मंडळीच्या सभांचा लाभ मिळत आहे याचीही देखरेखे काळजी बाळगून असतात. (इब्रीयांस १०:२४, २५) काहींना वाहनांची गरज आहे का? काहींना कमी ऐकू येत असल्यामुळे त्यांना सभेचा कार्यक्रम ‘ऐकण्यास व समजून घेण्यास’ जड जातो का? (मत्तय १५:१०) अशांसाठी हेडफोन्स बसविणे उपयुक्‍त होईल. याचप्रमाणे आज कित्येक मंडळ्या आपल्या सभेतील कार्यक्रम टेलिफोन तारांच्या माध्यमाने नेतात, याचा उपयोग अपंगांना घर बसल्या सभेचा कार्यक्रम ऐकता येतो. ज्यांना आजारपणामुळे सभांना येता येत नाही अशांसाठी सभांचा कार्यक्रम ध्वनिमुद्रित केला जातो—काही प्रकरणात त्यांच्यासाठी टेपरेकॉर्डर विकत घेतला जातो. ध्वनिफिती बद्दल बोलताना जर्मनीतील एक वडील म्हणाले: “मी कित्येक वयस्करांना भेटी दिल्या व पाहिले की ते दुरदर्शनपुढे नुसते बसून कार्यक्रम बघत होते, असे कार्यक्रम की जे आध्यात्मिक दृष्ट्या उभारणीकारक नव्हते.” तर मग अशांना संस्थेकरवी निर्मिण्यात आलेल्या ध्वनिफिती जसे की किंग्डम मेलडीज्‌ आणि पवित्रशास्त्र वाचन ऐकण्याचे का प्रोत्साहन देऊ नये?

१३. वयस्करांना राज्य–घोषक या अर्थी क्रियाशील राहण्यास कशी मदत दिली जाऊ शकते?

१३ मंडळीचे काही ज्येष्ठ सदस्य प्रचाराच्या बाबतीत अनियमित वा अक्रियाक बनले. वयोमान हे अर्थातच कोणालाही “राज्याची ही सुवार्ता” घोषित करण्याला बांध घालू शकत नाही. (मत्तय २४:१४) काही तुम्हासोबत प्रचार कार्याला येण्याच्या साध्या निमंत्रणाला प्रतिसाद देतील. तुम्ही कदाचित क्षेत्रकार्यातील अनुभव त्यांना सांगून त्यांची प्रचाराविषयीची प्रीती पुनः जागृत करू शकाल. त्यांना जिना चढण्याचा त्रास वाटत आहे तर जेथे लिफ्टची सोय आहे तेथे किंवा बैठ्या घरात कार्य करण्याची योजना करा. काही प्रचारक वयस्करांना आपणासोबत पवित्रशास्त्र अभ्यासाला घेऊन जाऊ शकतील—किंवा या वयस्करांच्या घरी तो शास्त्राभ्यास घेतील.

१४ व रकाना. (अ) कोणी बंधु वा भगिनी अत्यंत बिकट आर्थिक निकडीत पडला तर वडील काय करू शकतात? (ब) वयस्कर प्रचारकांच्या गरजा काही मंडळींनी कशी पुऱ्‍या केल्या?

१४ ‘पैसा आश्रय देणारा आहे.’ (उपदेशक ७:१२) तरीपण पुष्कळसे वृद्ध बंधु–भगिनी भीषण आर्थिक निकडीत आहेत व त्यांना त्यांचे नातेवाईक मदत देत नाहीत. तरीपण या गरजेची कल्पना दिली जाते तेव्हा मंडळीतील काही विशिष्ट मदतीसाठी सहसा पुढे येतात. (याकोब २:१५–१७) वडील कोणती शासकीय वा सामाजिक सेवा, विम्याचे प्रकार, निवृत्तिवेतन इ. गोष्टी उपलब्ध आहे त्याचा शोध घेऊ शकतात. तथापि, काही देशात अशा सेवा उपलब्ध नसतील त्यामुळे सबंध मंडळीने १ तिमथ्यी ५ अध्यायात दाखविलेला नमुना अनुसरून साह्‍य देणे याशिवाय पर्याय नसतो. (पहा ऑर्गनाइज्ड टू अकम्प्लीश आवर मिनिस्ट्री पृष्ठ १२२–३.)

नायजेरियातील प्रचारकांनी त्यांच्यातील ८२ वर्षे वयाच्या नियमित पायनियर व त्यांच्या पत्नीला नियमितपणे भौतिक चीजवस्तु दिल्या. ते राहात होते ते घर मोडून तेथे इमारत उभारण्याचा सरकारचा प्रकल्प आला तेव्हा राहण्याची इतरत्र व्यवस्था होईपर्यंत मंडळीने त्यांना राज्य सभागृहालगत जोडून असलेल्या खोलीत राहण्याचे निमंत्रण दिले.

ब्राझिलमध्ये एका मंडळीने एका वृद्ध जोडप्याची काळजी घेण्यासाठी दाई ठेवली. त्याच वेळी एका भगिनीला त्यांचे घर स्वच्छ करणे, जेवण बनविणे व इतर कामे करणे यासाठी नियुक्‍त करण्यात आले. दर महिन्याला ही मंडळी त्यांना लागणाऱ्‍या खर्चासाठी निधि बाजूला काढीत असे.

१५. (अ) मंडळी जी मदत देते तिला काही मर्यादा आहे का? (ब) अवास्तवपणे मागणी करणाऱ्‍यांना लूक ११:३४ मधील सल्ला कसा योग्यपणे लागू आहे?

१५ पहिल्या शतकाप्रमाणेच या तरतुदी जे खरेच गरजवंत आहेत अशांसाठी आहेत. अर्थात, वडील खर्चिक मागण्या किंवा अवास्तव गोष्टींची पूर्ति करण्यासाठी बांधील नाहीत. वयस्करांनी सुद्धा ‘साधी दृष्टी’ ठेवण्यास हवी.—लूक ११:३४.

व्यक्‍तिगतरित्या त्यांच्या हिताकडे लक्ष द्या

१६, १७. (अ) वडीलांशिवाय इतरांनीही वयस्करांच्याबाबतीत आस्था दाखविणे का महत्वाचे आहे? (ब) फार कामात असणारे प्रचारक सुद्धा वयस्करांसाठी कशी ‘संधि साधू शकतात’?

१६ काही काळाआधी एका वयस्कर भगिनीला इस्पितळात दाखल करण्यात आले. अयोग्य व अपुरा आहार हे रोगाचे निदान काढण्यात आले. “मंडळीतील अधिक लोकांनी तिच्याविषयी आस्था राखली असती” असे एका वडीलाने लिहिले, “तर हे कधीही घडले नसते.” होय, वयस्करांविषयी केवळ वडीलांनीच आस्था बाळगायची नसते. पौलाने म्हटले: “आपण एकमेकांचे अवयव आहो.”—इफिसकर ४:२५.

१७ तुम्हापैकी काहींना व्यक्‍तिगत जबाबदाऱ्‍यांचा निःसंशये भार आहे. तरीपण, ‘केवळ आपलेच हित पाहू नका.’ (फिलिप्पैकर २:४) व्यक्‍तिगत संयोजनाद्वारे तुम्हाला ‘संधि साधून घेता’ येईल. (इफिसकर ५:१६) उदाहरणार्थ, तुम्हाला कोणा वयस्कराला क्षेत्र कार्य झाल्यावर भेट देता येईल का? आठवड्यातील दिवस काही जणांसाठी एकाकीपणाचा काळ असतो. वयस्करांना भेट देण्यात व त्यांची कामे करण्यात युवक सुद्धा उपयोगी पडू शकतात. एका भगिनीने, तिला ज्या युवकाने मदत केली त्याविषयी अशी प्रार्थना केली: “हे यहोवा, बंधु जॉनसाठी मी तुझे आभार मानते. तो केवढा चांगला मुलगा आहे.”

१८. (अ) वयस्करांसोबतचे संभाषण कधी कधी अवघड का बनते? (ब) कोणा वयस्कर व्यक्‍तिसोबत एखादा, परस्परांस प्रोत्साहनदायक ठरणारे संभाषण कसे करू शकतो वा कशी भेट देऊ शकतो?

१८ सभांमध्ये वयस्करांना तुम्ही नुसते वरवरचे बोलणे करता का? ऐकायला कमी येणाऱ्‍या व जलदपणे वक्‍तव्य करू न शकणाऱ्‍या कोणा वयस्कराशी संभाषण करणे कठीण वाटत असेल. शिवाय आरोग्य ढासळत असते म्हणून सर्वच वृद्धांठायी उत्साह दिसून येईलच असे नाही. तरीसुद्धा “सहनशील मनाचा इसम बरा.” (उपदेशक ७:८) थोडासा प्रयत्न केला तर खरी “उत्तेजनाची देवाणघेवाण” साध्य करता येते. (रोमकर १:१२) क्षेत्र कार्यातील अनुभव सांगण्याचा प्रयत्न करून बघा. टेहळणी बुरुज किंवा अवेक! मसिकात तुम्ही वाचलेल्या एका मुद्याची आपणात सहभागिता करा. किंवा नुसते ऐकत राहा. (पडताळा इयोब ३२:७.) तुम्ही वाव दिला तर वयस्करांना बरेच काही बोलून दाखविण्याची इच्छा असते. एका वडिलाने कबूल केले: “त्या वयस्कर बंधूला भेट दिल्यामुळे मला खरेच चांगले वाटायला लागले.”

१९. (अ) वयस्करांबद्दल वाटणारी आमची काळजी आणखी कोठपर्यंत जाते? (ब) वयस्कर पालकांची काळजी घेणाऱ्‍या कुटुंबास आपण साहाय्यक ठरू शकू असे कोणते मार्ग आहेत?

१९ जी कुटुंबे वयस्करांची काळजी घेत आहेत त्यांच्याविषयी सुद्धा तुम्ही दखल घ्यायला नको का? आपल्या वृद्ध पालकांची काळजी वाहणाऱ्‍या एका जोडप्याने कळवले: “आम्हाला प्रोत्साहन देण्याऐवजी मंडळीतील काहींनी आमच्यावर टीकाच झोडली. एक भगिनी तर अशीही म्हणाली: ‘तुम्ही सभा चुकवत राहिलात तर आध्यात्मिक दृष्ट्या आजारी व्हाल.’ तथापि, आम्ही सभांना अधिकपणे उपस्थित राहावे यासाठी ती आम्हाला कसलीही मदत करण्यास इच्छुक नव्हती.” याचप्रमाणे पोकळ अभिवचनेही निराशदायक वाटतात जसे की, तुम्हाला मदतीची आवश्‍यकता वाटलीच तर मला सांगा. हे म्हणणे बहुतांशी “उब घ्या व तृप्त व्हा” या सारखेच ठरते. (याकोब २:१६) तुम्हाला वाटणारी काळजी कृतीत रूपांतरित व्हावी हे केवढे बरे! एक जोडपे कळवते: “बांधव आम्हाला खरोखरी चांगले व सहकारी होते. काहीजण आईची एक दोन दिवसाकरता काळजी घेत त्यामुळे आम्हास विरंगुळा मिळे. काही तिला आपल्या शास्त्राभ्यासास नेत. शिवाय बाकीचे तिच्या खुशालीबद्दल तिला विचारीत तेव्हा आम्हाला खरेच समाधान वाटे.”

२०, २१. काळजी घेणाऱ्‍यांच्या बाबतीत वयस्कर आपला कोणता सहकार देऊ शकतात?

२० सर्वसाधारणपणे आम्हातील वयस्करांची चांगली काळजी वाहिली जात आहे. तरी पण हे काळजी करण्याचे काम कण्हत नव्हे तर आनंदाने होण्यासाठी वयस्कर साक्षीदार स्वतः काय करू शकतात? (पडताळा इब्रीयांस १३:१७) तुमची काळजी घेण्यासाठी वडिलांनी जी व्यवस्था लावून दिली आहे तिच्याशी सहकार्य द्या. जो दयाळूपणा तुम्हासंबंधाने व्यक्‍त करण्यात येतो त्याविषयी आभारी असा व कृतज्ञता दाखवा. अवास्तव मागणी करीत राहण्याचे किंवा टिकेखोर बनण्याचे टाळा. वृद्धापकाळात दुखणी–खुपणी अधुनमधून वर येत राहिली तरी सदा आनंदी व सरळ मनोवृत्ति प्रदर्शित करण्याचा प्रयत्न ठेवा.—नीतीसूत्रे १५:१३.

२१ ‘बांधव खरेच चांगले आहे, त्यांच्यावाचून माझे काय होईल, कोण जाणे’ असे कित्येक वयस्करांनी बोलून दाखविल्याचे ऐकिवात आहे. असे असले तरी वयस्करांची काळजी घेण्याची प्रमुख जबाबदारी त्यांच्या मुलांची आहे. यात कशाचा समावेश आहे व हे आव्हान चांगल्या रितीने कसे पेलता येईल?

[तळटीपा]

a  लेवीय २७:१–७ मंदिरात कामगार या अर्थी राहण्याचा “नवस” (कराराद्वारे) केलेल्या व त्यातून मुक्‍त होऊ पाहणाऱ्‍या विषयीची माहिती देते. ही मुक्‍त होण्याची किंमत वयोमानाप्रमाणे भिन्‍न हाती. ६०व्या वर्षी ही किंमत बरीच कमी होई कारण असे मानले जाई की इतक्या वयाच्या माणसाला तरूणाप्रमाणे कष्टाचे काम करणे जमत नाही. दी एन्सायक्लोपिडीआ जुडाईका पुढे म्हणते: “तालमुदच्या मते वार्धक्य . . . ६०व्या वर्षी सुरु होई.”

तुम्हाला आठवते का?

◻ वयस्कर विधवांसाठी पहिल्या शतकात कोणत्या तरतुदी करण्यात आल्या होत्या?

◻ मंडळीतील वयस्करांची काळजी वाहण्यासंबंधाने वडील कसे संयोजन करू शकतात?

◻ वयस्कर बंधु–भगिनींसाठी मंडळीतील प्रत्येक जण वैयक्‍तिकपणे कशी आस्था दाखवू शकतो?

◻ काळजी घेणाऱ्‍यांच्या बाबतीत वयस्कर जन कसे सहकार्य देऊ शकतील?

[१३ पानावरील चौकट]

वयस्करांना मदत देणे —काहीजण काय करीत आहेत

ब्राझिल मधील एका मंडळीला त्यांच्या सभागृहानजीक राहणाऱ्‍या एका बांधवाच्या भैतिक गरजांविषयीची काळजी घेण्याचा सोयीचा मार्ग आढळला: सभागृहाची स्वच्छता करणारा पुस्तक अभ्यासाचा गट त्याचेहि घर स्वच्छ करतो.

तेथील आणखी एका मंडळीला त्यांच्यातील अपंग बांधवाला इश्‍वरशासित उपाध्यपणाच्या शाळेत क्रियाशील ठेवण्याचा साधा व सोपा मार्ग आढळला. त्याची भाषण देण्याची तारीख येई त्या दिवशी एका बांधवाला सोबत आणखी दोघा–तिघा प्रचारकांना घेऊन त्याच्या घरी भेट देण्याची नियुक्‍ति मिळते. ती छोटीशी सभा प्रार्थनेद्वारे सुरु केली जाते. मग तो बंधू आपले भाषण सादर करतो. भाषण झाल्यावर त्याला आवश्‍यक सल्ला दिला जातो. या भेटीमुळे केवढे प्रोत्साहन त्या बंधूला लाभते!

प्रवासी देखरेख्यांनी पुढाकार घेण्यात उत्तम उदाहरण राखले आहे. एका मंडळीत एक वयस्कर बंधू खुर्चीच्या गाडीस खिळला आहे. त्याची भेट घेण्याचे लांबणीवर पडू लागले म्हणून तो मध्यंतरी बराच उद्विग्न बनला. तथापि, प्रवासी देखरेख्यांनी या बंधूला खाजगीरित्या स्लाईड व त्यावरील भाषण ऐकविले. त्या वयस्कर बंधूने जे न्याहाळले ते पाहून त्याच्या डोळयातून अश्रुधारा वाहू लागल्या. देखरेखे म्हणतात: “थोडेसे लक्ष व प्रीती ही इतका मोठा परिणाम घडवून आणते ते बघून मला अत्यंत समाधान वाटले.”

नायजेरियामध्ये वडीलांनी एका वयस्कर बंधूला मेंढपाळकत्वाची भेट दिली तेव्हा त्यांना आढळले की हा बंधू खूपच आजारी आहे. त्याला लगेच इस्पितळात दाखल केले गेले. या बांधवाला अधिक काळजीयुक्‍त वैद्यकीय उपचाराची गरज उभी राहिली पण या इलाजाचा खर्च त्याला देता येऊ शकत नव्हता. मंडळीला याविषयीची माहिती दिली गेली तेव्हा प्रचारकांनी त्या खर्चास पुरेसे होतील इतके पैसे देऊ केले. दोघा वडिलांनी आपल्या कामातून रजा काढून आळीपाळीने त्याला दवाखान्यात नेण्याचे व परत घरी आणण्याचे काम केले. हा बंधू आपल्या आजारातून बरा झाल्याचे व त्यानंतर आपल्या मरणापर्यंत तो चारवर्षे साहाय्यक पायनियरींग करीत आहे हे पाहण्याचा त्यांना आनंद वाटला.

फिलिपाईन्स मध्ये एका वयस्कर भगिनीला स्वतःचे कुटुंब नव्हते. तिच्या तीन वर्षांच्या आजारपणात मंडळीने तिची काळजी घेण्याची व्यवस्था केली. त्यांनी तिला राहायला छोटीशी जागा दिली, दर दिवशी जेवण आणले व तिच्या स्वास्थ्याची काळजी घेतली

[१२ पानांवरील चित्रं]

मंडळीतील आमच्या वयस्करांच्या बाबतीत सन्मान दाखविण्यात सर्वजण सहभागी होऊ शकतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा