शांतीच्या देवाकडील सांत्वन
“ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा.”—१ थेस्सलनीकाकर ४:१८.
१. पौलाने केलेली कोणती याचना त्याची शांतीविषयक असणारी आस्था दाखविते?
ख्रिस्ती मंडळीने शांतीचा अनुभव घ्यावा अशी पौल या प्रेषिताची मनोमन इच्छा होती. हे, प्रेरित शास्त्रवचनांमध्ये आमच्यासाठी त्याची जी १३ पत्रे संग्रहीत आहेत त्या पत्रांचा मायना या मसुद्याने सुरु होतो की ज्यांना त्याने ती पत्रे लिहिली त्यांनी देवाकडील शांतीचा अनुभव घ्यावा. उदाहरणार्थ, नुकत्याच बहरु लागलेल्या थेस्सलनीका येथील मंडळीला पौलाने लिहिले: “तुम्हास कृपा व शांती असो.” याच पत्राच्या समारोपाला त्याने पुन्हा ही याचना केली: “शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो, आणि आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत.”—१ थेस्सलनीकाकर १:१; ५:२३.
२. (अ) मंडळीविषयीची कोणती कळकळ पौलाने व्यक्त केली? (ब) आज ख्रिस्ती वडीलांना पौलाच्या उदाहरणाचे कसे अनुकरण करता येईल?
२ त्या विश्वास राखणाऱ्या नव्या लोकांमध्ये पौल व त्याच्या सहकाऱ्यांनी ‘श्रम व खटपट करण्यात’ कसलीही कसूर केली नव्हती. “आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्यवृत्तीचे होतो. आम्हास तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरिता आपला जीवही देण्यास राजी होतो,” असे पौल म्हणाला. हे शब्द वाचताना पौलाला त्या मंडळीविषयी केवढी जवळीक, खरी व गाढ प्रीती वाटत होती ते आम्हाला दिसून येत नाही का? होय, हा तोच प्रीतीचा नमुना आहे जो आज यहोवाच्या साक्षीदारांच्या जगभरात असणाऱ्या ५०,००० पेक्षा अधिक मंडळ्यातून ख्रिस्ती वडील व्यक्त करीत आहेत.—१ थेस्सलनीकाकर २:७–९; योहान १३:३४, ३५; १५:१२–१४.
३. (अ) थेस्सलनीका मंडळीला तिमथ्यी कसा लाभ पोहोचवू शकला? (ब) हे आज कशाबरोबर जुळते आहे?
३ सैतान या परिक्षकाने त्या थेस्सलनीका येथील ख्रिश्चनांवर संकट आणले होते. या कारणास्तव पौलाने तिमथ्याला त्यांच्याकडे ‘त्यांना स्थिर करावे व त्यांच्या विश्वासाच्या वृध्दीसाठी बोध करावा’ म्हणून पाठविले. तिमथ्यी पौलाकडे अथेन्स येथे आला तेव्हा त्याने या बांधवांच्या विश्वासूपणा व प्रीतीविषयी मोठा प्रफुल्लित अहवाल सादर केला. एकमेकांचा विश्वास व सचोटी याविषयी ऐकून सर्वांनाच मोठे सांत्वन प्राप्त झाले व ते देवास, आपणासंबंधीची काही उणीव अद्याप राहिली असल्यास त्याने ती दूर करावी याकरता याचना करीत राहिले. (१ थेस्सलनीकाकर ३:१, २, ५–७, १०) हे सुध्दा आजच्या इश्वरशासित व्यवस्थेवर प्रतिबिंब पाडते जेथे फिरते देखरेखे मंडळ्यांची उभारणी करतात व शिवाय यहोवाच्या साक्षीदारांना बंदीसत्रात वा कठोर छळात राहावे लागते तेथेही ते हेच कार्य करतात.—यशया ३२:१, २.
‘त्याच्या आगमनसमयी’
४, ५. (अ) येथे पौल कोणती याचना करतो व ती आज आम्हास मोठ्या आस्थेची का वाटावी? (ब) आमचे दिवस इतके अभुतपूर्व का आहेत?
४ आपल्या पत्राचा हा भाग प्रेषित पौल या याचनेने संपवितो: “जशी आमची प्रीती तुम्हावर आहे, तशी प्रभु तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो. ह्यासाठी की, आपला प्रभु येशू आपल्या आगमनसमयी सर्व पवित्र जनांसह येईल त्यावेळेस त्याने तुमची अंतःकरणे देव आपला पिता ह्याच्यासमोर पवित्रतेत निर्दोष राहण्यासाठी स्थिर करावी.”—१ थेस्सलनीकाकर ३:१२, १३.
५ हे लिहिताना पौल भविष्यकाळाकडे, जेव्हा “मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतासह येईल” ते येशूचे “आगमन व व्यवस्थीकरणाची समाप्ती” काळाकडे बघत होता. आमचा स्वर्गीय राजा १९१४ मध्ये आला. आपल्या अदृश्य अशा वैभवी सिंहासनावरुन येशू आता पृथ्वीवरील राष्ट्रे व लोकांचा न्याय करीत आहे व तो नम्र, मेंढरासमान लोकांना “मोठे संकट” यातून बचावण्याकरता आणि पृथ्वीवरील नंदनवनात सार्वकालिक जीवन देण्याकरता गोळा करीत आहे.—मत्तय २४:३–२१; २५:३१–३४, ४१, ४६.
आमचे भले होण्यासाठी आज्ञा
६. पौलाची कोणती सूचना आम्ही आता ऐकली पाहिजे?
६ सार्वकालिक जीवनाच्या ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी तुम्ही आहात का? तसे आहे तर पौलाने थेस्सलनीकाकरास जे लिहिले त्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे: “बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हास विनंती करतो की तुम्ही कसे वागून देवाला संतोषवावे हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले आहे व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहा, त्यात तुमची उत्तरोत्तर वृध्दि व्हावी. कारण प्रभु येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हास दिल्या त्या तुम्हास ठाऊक आहेत.” (१ थेस्सलनीकाकर ४:१, २) येथे पौल कोणत्या “आज्ञां”विषयी जोर देऊन बोलत होता?
७. (अ) कोणती ‘महत्वपूर्ण’ आज्ञा येथे दिलेली आहे? (ब) आम्हास देवाचा आत्मा मिळाला असल्यामुळे आम्ही कधीही बेसावध स्थितीत का राहू नये?
७ पहिली ‘आज्ञा’ सदाचारासोबत संबंधित आहे. पौल स्पष्टरित्या म्हणतो: “देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. देवाला न ओळखणाऱ्या परराष्ट्रीयांप्रमाणे कामवासनेने नव्हे, तर तुम्हातील प्रत्येकाने आपणासाठी पवित्रतेने व अब्रूने बायको करण्याचे समजून घ्यावे.” आम्ही देव व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांना ‘ओळखतो’ ही आनंदाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे आम्ही सार्वकालिक जीवनाच्या प्राप्तीसाठी धाव घेत आहोत. तर मग जगाच्या अनैतिकतेच्या घाणीत आम्ही परत ओढले जावे ही किती लाजेची गोष्ट आहे बरे! काहींनी राजकीय बंद्यांच्या छावण्यात व तुरुंगात कितीतरी वर्षे सहनतापूर्वक घालविली किंवा आपले सारे जीवनमान आवेशी मिशनरी कार्यात घालविले पण यांनीच परीक्षकाला नैतिकतेच्या बाबतीत बेसाबध स्थितीतील सावज स्वतःला बनू दिले हे किती दुःखद आहे. आम्हाला देवाचा आत्मा प्राप्त झाला आहे तर लैंगिक अशा गैरवर्तणूकीमुळे आम्ही त्याला कधीही ‘खिन्न’ करू नये!—१ थेस्सलनीकाकर ४:३–८; योहान १७:३; १ करिंथकर १०:१२, १३; इफिसकर ४:३०.
८, ९. (अ) “बंधुप्रेम” काय आहे? (ब) या प्रेमाची जोपासना आम्हाला कशी करता येईल व त्यामुळे कोणता लाभ मिळेल?
८ पौलाची दुसरी ‘आज्ञा’ फिल.आ.डेल.फि’आ, “बंधुप्रेमा”च्या अनुषंगाने आहे. (१ थेस्सलनीकाकर ४:९, १०) हे तात्विक प्रेम, अ.गा’पे, या प्रेमाचे खास वक्तव्य करते, ज्याविषयीची शिफारस पौलाने येथे ९ व्या वचनात तसेच अध्याय ३ रा व वचने ६ आणि १२ यात केली आहे. फिल.आ.डेल.फि’आ हा अत्यंत जिव्हाळ्याचा नातेसंबंध आहे व तो येशू व पेत्र तसेच दावीद व योनाथान यांच्यात दिसत होता. (योहान २१:१५–१७; १ शमुवेल २०:१७; २ शमुवेल १:२६) याला अ.गा’पेची जोड असली तर त्याकरवी निकटचे मित्रत्व उभारले जाते जे, यहोवाचे साक्षीदार पायनियर कार्यात तसेच इश्वरशासित हालचालीत जो आपसातला आनंदमय सहवास अनुभवतात त्यात प्रत्ययास येते.
९ पौल म्हणतो: “तुमची उत्तरोत्तर वृध्दी व्हावी.” आम्हाला आमच्या बंधुप्रेमाचा विस्तार नेहमीच करता येईल. जेव्हा वडील व उपाध्य सेवक आवेशी अशा राज्य सेवेत उत्साहपूर्ण नेतृत्व करतात तेव्हा हा सुंदर गुण ओतप्रोत भरुन वाहतो. मंडळीतील सर्वजण ‘प्रथम राज्य मिळविण्यात’ स्वत:ला निमग्न ठेवतात तेव्हा मानवी अपूर्णतेमुळे उद्भवणाऱ्या तफावती, व्यक्तिमत्वामुळे उडणारे खटके आणि यासारख्या इतर समस्या गौण बनतात. याकरताच आपण आपली दृष्टी आपल्या ध्येयावर ठेवू या.—मत्तय ६:२०, २१, ३३; २ करिंथकर ४:१८.
१०. ख्रिश्चन या नात्याने आम्हाला कसे ‘सभ्यतेने वागता’ येईल?
१० येथे पौल आणखी एका ‘आज्ञे’ला जोडतो—ती ही की आपण शांततापूर्ण जीवन जगण्याचे, आपल्या स्वतःच्या कामात मग्न असण्याचे व आपल्या हातांनी काम करीत राहण्याचे ध्येय ठेवावे. या पध्दतीने आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात ‘सभ्यतेने वागलो’ व तात्विक प्रेम आणि बंधुजनांविषयीचा कळवळा व्यक्त करीत राहिलो तर आमच्या सर्व गरजा पूर्ण होतील. —१ थेस्सलनीकाकर ४:११, १२; योहान १३:३५; रोमकर १२:१०–१२.
पुनरुत्थानाच्या आशेद्वारे मिळणारे सांत्वन
११. (अ) आता पौल पुनरुत्थानाच्या विषयाची का प्रस्तावना करतो? (ब) पौलाची ही सूचना आम्हावर कशी परिणामित होण्यास हवी?
११ यानंतर प्रेषित पुनरुत्थानाच्या भव्य आशेचा उल्लेख करतो. पण पौलाने या विषयाची प्रस्तावना का करावी? बांधवांना त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व छळात टिकून राहण्याकरता प्रोत्साहन द्यावे हा त्यामागील उद्देश होता. ते आपले जीवन गमावण्याच्या धोक्यात होते. त्याकाळापावेतो काही जण मृत्युमध्ये निद्रावश झाले होते असे दिसते. या कारणास्तव समविश्वासू जणांना सांत्वन देण्याची गरज होती. (१ थेस्सलनीकाकर २:१४–२०) ख्रिस्ताची “उपस्थिती” समीप आहे असा विचार राखून त्यांना याचे नवल वाटत होते की जे आधीच मृत झाले होते अशांचे काय होणार. अशांच्या बाबतीत पौलाने आता जे काही लिहीले ते आपला ख्रिस्ती प्रियजन गमावणाऱ्यांना सांत्वनदायक तर ठरलेच पण सोबत त्यांना यहोवाचा “दिवस” येऊन धडकेपर्यंत सहन करीत राहण्याचे प्रोत्साहनही मिळाले. पौलाच्या सूचनेने आम्हाला, आम्ही सुवार्तेची घोषणा करीत असता तसेच या व्यवस्थेचा सर्वनाश होण्याची अपेक्षा करीत असता आध्यात्मिक स्थैर्यता दाखविण्याचे सहाय्य दिले पाहिजे.—२ थेस्सलनीकाकर १:६–१०.
१२. आमचा कोणी प्रियजन वारतो तेव्हा आम्हाला कोणते खरे सांत्वन आहे व कोणत्या उगमाकडून?
१२ पौल म्हणतो: “बंधुजनहो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करु नये.” (१ थेस्सलनीकाकर ४:१३) पुनरुत्थानाच्या आशेत केवढे समाधान व मनाची शांती मिळते! पौलाने सुमारे पाच वर्षांनी करिंथ येथील ख्रिश्चनांना लिहिलेल्या दुसऱ्या पत्राची प्रस्तावना या पध्दतीने केली होती: “देव आपला पिता व प्रभु येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करावयास समर्थ व्हावे.”—२ करिंथकर १:२–४.
१३, १४. (अ) मृत्युच्या अर्थाविषयी ख्रिश्चनांनी माहीतगार असावे अशी पौलाची का इच्छा होती? (ब) मृतांची स्थिती कशी असते याबद्दल शास्त्रवचने काय सांगतात?
१३ मृतांच्या स्थितीविषयी आम्ही अजाण असावे अशी पौलाची इच्छा नव्हती. लवकरच नामधारी ख्रिश्चनात मोठा धर्मत्याग उद्भवणार होता व ते बाबेलोनी व ग्रीक शिक्षणाकडे परतणार होते. ते धर्मत्यागी, आत्म्याला अमरत्व आहे या प्लॅटोनिक सिध्दान्ताचा स्विकार करणार होते. आज हाच सिध्दान्त खोट्या धर्माच्या जगव्याप्त साम्राज्याचे मुलभूत शिक्षण बनला आहे. ‘नंतरचे जीवन’ मग ते स्वर्गातील असो, परगेटरीतले असो वा चिरकालिक यातना स्थळातील असो, याजशी संबंधित असणारा गुढवाद खरे सांत्वन देत नाही. तसेच अनुवंशिक अमरत्वपणा पुनरुत्थान तत्वाशी विसंगत ठरतो, कारण जीव जर मरतच नाही तर मग कोणाचे पुनरुत्थान होणे कसे शक्य दिसते बरे?
१४ पौल येथे “झोपी गेलेल्या लोकांविषयी” लिहित होता. होय, “झोपी गेलेल्या.” झोपलेल्या माणसाला कशाचीही जाणीव नसते व तो काही काम करु शकत नाही. (पडताळा उपदेशक ९:५, १०) येशूच्या उपाध्यपणात असा एक प्रसंग घडला जेव्हा येशूने लाजराच्या बाबतीत म्हटले की लाजर हा “झोपला आहे” व तो म्हणजे येशू त्याला “झोपेतून उठवावयास” जात होता. येशूच्या या शब्दांचा अर्थ त्याच्या शिष्यांना समजला नाही तेव्हा “येशूने त्यांना उघड सांगितले: ‘लाजर मेला आहे.’ ” लाजरच्या बहिणी मार्था व मरीया यांचे पुनरुत्थानाच्या आशेकरवी सांत्वन केले गेले. शिवाय येशूने त्यांना आणखी सांत्वन दिले. पण जेव्हा, चार दिवस मृत असलेला आपला मित्र लाजर याला येशूने मृत्युच्या निद्रेतून परत उठविले तेव्हा त्याच्या बहिणींचा व इतर सर्वांचा विश्वास केवढा दृढ झाला असावा बरे!—योहान ११:११—१४, २१–२५, ४३–४५.
१५. (अ) पुनरुत्थानासंबंधाने आमची आशा कशी बळकट केली जाते? (ब) कोणा प्रियजनाचा मृत्यु घडल्यावर स्वतःच्या बाबतीत योग्य तो बदल सांभाळण्यास आपल्याला कशी मदत मिळू शकते?
१५ हा चमत्कार व येशूने इतरांना मृतातून उठविण्याची केलेली इतर कृत्ये व शिवाय यहोवा देवाने येशूलाच पुनरुत्थित करण्याचे अग्रगण्य कृत्य—या सर्व लिखित घटना पुनरुत्थानाच्या अद्र्भित आशेवरील आमचा विश्वास दृढ करतात. (लूक ७:११–१७; ८:४९–५६; १ करिंथकर १५:३–८) हे खरे की मृत्यु दुःख व अश्रु देतो आणि प्रियजनांच्या अनुपस्थितीमुळे उद्भवणारी पोकळी भरुन काढणे मोठे कठीण वाटते. पण सेनाधीश प्रभु यहोवा याने, तो “मृत्यु कायमचा नाहीसा करील, . . . [आणि] सर्वांच्या मुखावरील अश्रु पुसील” या दिलेल्या हमीद्वारे केवढे सांत्वन व बळ मिळते बरे! (यशया २५:८; प्रकटीकरण २१:४) दुःखावरील सर्वोत्तम इलाज म्हणजे शांतीच्या देवाच्या सेवेत स्वतःला मग्न ठेवणे, आणि आम्हाला कृतज्ञतापूर्वक जी उबदार राज्य आशा लाभली आहे ती इतरांना देऊ करणे हा होय.—प्रे. कृत्ये २०:३५.
पुनरुत्थानाचा क्रम
१६, १७. (अ) “शेवटला शत्रू” कसा नाहीसा केला जाईल? (ब) आता पुनरुत्थानाचा कोणता क्रम पौल स्पष्ट करतो?
१६ ख्रिस्त हा पुनरुत्थानातील “प्रथमफळ” आहे व तो आता स्वर्गात देवाच्या उजव्या हातास सिंहासनाधिष्ठ आहे व लवकरच यहोवाचे वैभवी राज्य उद्देश पूर्ण करील असा आमचा बळकट विश्वास आहे. (इब्रीयांस ६:१७, १८; १०:१२, १३) पौलही हेच आणखी एका पत्रात लिहितो: “देवाने त्याच्या [येशू ख्रिस्त] पायाखाली सर्व शत्रु ठेवीपर्यंत त्याला [येशूला] राज्य केले पाहिजे. जो शेवटला शत्रु नाहीसा केला जाईल तो मृत्यु होय.” पण ते कसे शक्य आहे? थोडक्यात सांगायचे तर पुनरुत्थानाद्वारे व आदामाच्या पापाचे परिणाम काढून टाकण्याद्वारे. याचेच विवेचन पौलाने नुकतेच केले होते: “मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे, प्रथमफळ खिस्त; मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी.” (१ करिंथकर १५:२०–२६) पुनरुत्थानाच्या या क्रमाबद्दलच पौलाने थेस्सलनीकाकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्रात यानंतर कळविले होते:
१७ “येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्याद्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणील. यहोवाच्या वचनावरुन आम्ही हे तुम्हाला सांगतो की, प्रभुचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणारच नाही. कारण, आज्ञाध्वनि आद्यदिव्यदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभु स्वतः स्वर्गातून उतरेल; आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील.”—१ थेस्सलनीकाकर ४:१४–१६.
१८. “झोपी गेले”ल्या अभिषिक्तांचे पुनरुत्थान केव्हा झाले?
१८ १९१४ मध्ये येशूच्या राज्य सत्तेतील “आगमन” किंवा “उपस्थिती” समयी तो स्वतःच आद्य देवदूत या नात्याने जे “ख्रिस्तामध्ये” आहेत त्यांनी एकत्रित व्हावे अशी स्वर्गीय आज्ञा करतो. “जे झोपी गेलेले आहेत” अशा या अभिषिक्त जणांच्या बाबतीत हा तुतारीसारखा पुकारा त्यांचे स्वर्गात आध्यात्मिक पुनरुत्थान होण्यासाठी हाक देतो. अभिषिक्त लोकांचे मृतातून होणारे हे पुनरुत्थान १९१८ या वर्षापासून सुरु झाले हा दृष्टीकोण दी वॉचटावर ने आधीच सादर केला आहे.
१९. जे उरलेले आहेत ते केव्हा व कसे “मेघारुढ असे . . . घेतले” जातील व कोणत्या उद्देशास्तव?
१९ परंतु आता पृथ्वीवर १०,०००पेक्षाहि कमी असणाऱ्या व कमी कमी होत जाणाऱ्या उरलेल्या अभिषिक्तांबद्दल काय? यांनीही पृथ्वीवरील आपले जीवनाक्रमण विश्वासूपणे संपविण्यास हवे. पौल जणू यांच्याबरोबर ख्रिस्ताच्या आगमनसमयी होता या अर्थाने लिहित होता: “नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभुला सामोरे होण्यासाठी मेघारुढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभुजवळ राहू.” (१ थेस्सलनीकाकर ४:१७; पडताळा प्रकटीकरण १:१०.) अशा प्रकारे योग्य वेळी सर्व १,४४,००० चे पुनरुत्थान होईल व ते कोकरा येशू ख्रिस्त याजबरोबर स्वर्गीय सियोन डोंगरावर याजक व राजे याअर्थी सेवा करतील. (प्रकटीकरण १४:१, ४; २०:४, ५) पण जे कित्येक दशलक्ष आता कबरेत पडून आहेत त्यांच्याकरता काय वाट पाहून आहे?
२०, २१. (अ) कबरेत असलेल्या कित्येक दशलक्षांच्या बाबतीत पुढे काय होणार? (ब) कोणत्या गटाला पृथ्वीवर कधीच मरावे लागणार नाही व का? (क) या गटापैकीच्या काहींना मरण आलेच तर त्यांच्यासाठी कोणते आनंदी भवितव्य असणार?
२० या गोष्टीबद्दल पौल थेस्सलनीकाकरांच्या पहिल्या पत्रात कोणताही उल्लेख करीत नसला तरी प्रकटीकरण २०:१२ आम्हाला याची हमी देते की, “मृत झालेल्या लहानथोरांना” देवाच्या न्यायदानाच्या सिंहासनासमोर उभे राहण्याकरता उठविले जाईल. (योहान ५:२८, २९ सुध्दा पहा.) तथापि आज लाखोंचा असा “मोठा लोकसमुदाय” त्या राजासनापुढे एकत्रित केला जात आहे. अशांचा एक गट या नात्याने येणाऱ्या “मोठ्या संकटा”तून जिवंतपणे बचाव करण्यात येईल. त्यांचे कोकऱ्याकरवी राखण होत आहे व त्यांना “जीवनी पाण्याच्या झऱ्याकडे” निरविले जात आहे की ज्यामुळे त्यांना पृथ्वीवर कधीही मरावे लागणार नाही. तरीपण वयोमान व आकस्मिक घडणाऱ्या घटनांमुळे काही कदाचित प्रभुच्या “उपस्थिती” काळात मरतील. (प्रकटीकरण ७:९, १४, १७; उपदेशक ९:११) मग यांच्याबद्दल काय?
२१ अशा सर्व “दुसरी मेंढरे” याकरता अगोदर पुनरुत्थान होण्याची आनंदी आशा आहे. (योहान १०:१६) यांच्या विश्वास व कार्यामुळे यांना प्राचीन काळच्या अब्राहामाप्रमाणेच देवाबरोबरील मित्रत्वाच्या स्थितीत आणले गेले आहे. इब्रीयांस पत्राच्या ११ व्या अध्यायात वर्णिण्यात आलेल्या विश्वासू स्त्री–पुरुषांप्रमाणेच या आधुनिक काळच्या “दुसरी मेंढरे” यांनीही छळामध्ये आपली सहनशीलता दाखविली आहे. या कारणास्तव त्यांना “अधिक चांगले पुनरुत्थान” हर्मगिद्दोनानंतरच्या काळात आरंभाला प्राप्त होऊ शकेल. (इब्रीयांस ११:३५; याकोब २:२३) होय, ज्याने विश्वासपूर्वकतेने ‘येशूचे शरीर खाल्ले व त्याचे रक्त प्राशन केले’ त्याला या अभिवचनाच्या पूर्ततेत सहभागिता मिळेल: “त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे , आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन.”—योहान ६:५४; रोमकर ५:१८, २१; ६:२३.
२२. आम्हाला एकमेकांचे कसे सांत्वन करता येईल?
२२ पुनरुत्थानाच्या वैभवी आशेची चर्चा केल्यानंतर पौल सूचना करतो: “ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा.” (१ थेस्सलनीकाकर ४:१८) त्यानंतर तो “आपला प्रभु येशू . . . ह्याच्या आगमना”विषयी आणखी काही महत्वपूर्ण गोष्टींची चर्चा करतो. (१ थेस्सलनीकाकर ५:२३) त्या कोणत्या आहेत? याकरता “देवाकडील शांती—केव्हा?” हा लेख पहा.
सारांश
◻ ख्रिश्चनांच्या वतीने पौल कोणती विनंति करतो?
◻ आमच्या भल्यासाठी पौल कोणत्या “आज्ञा” देतो?
◻ मृतांच्या बाबतीत देवाचे वचन आमचे कसे सांत्वन करते?
◻ पुनरुत्थानाचा कोणता क्रम पौल वर्णितो?