देवाकडील शांती केव्हा?
“शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवील.”—रोमकरांस पत्र १६:२०.
१, २. (अ) एका हिंदू महात्म्यांनी युध्द व शांतीविषयी काय म्हटले? (ब) जे देवाकडील शांतीचा अनुभव घेतील असे धन्य लोक कोण आहेत?
“शस्त्रास्त्रांची वेडी स्पर्धा चालूच राहिली तर इतिहासात कधीही घडली नाही इतकी मोठी हत्त्या त्यापासून परिणामित होईल. आणि कोणी विजेता मागे राहिलाच तर त्याने आपल्या राष्ट्राकरता मिळविलेला विजय हा जणू जिवंतावस्थेतील मृत्यूच असेल.” असे हे भविष्योद्गार मागे १९३८ मध्ये मोहनदास गांधी यांनी आपल्या काळाच्या पुढे दृष्टीक्षेप टाकून उद्गारले होते.
२ याच्या आधी १९३१ मध्ये गांधींनी ब्रिटीश व्हाइसराय यांना म्हटले होते: “जेव्हा तुमचे राष्ट्र व माझे राष्ट्र ख्रिस्ताने जी शिकवण डोंगरावरील प्रवचनात दिली त्यावर एकत्र होतील तेव्हा आम्ही आमच्या समस्या सोडविलेल्या असणार, केवळ आमच्या राष्ट्रांच्याच नव्हे तर सबंध जगाच्या.” या हिंदू महात्माजींनी सुचविले त्याप्रमाणे येशूचे डोंगरावरील प्रवचन दीर्घकालीन शांतीच्या मार्गाकडे निर्देश करते. आपल्या प्रवचनात ख्रिस्ताने म्हटले: “शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना ‘देवाची मुले’ म्हणतील.” (मत्तय ५:९) अशी पुष्कळ “मुले” आज देवाकडील शांतीचा आनंद उपभोगीत आहेत. काही काळातच, पृथ्वीवरील सर्व लीन जन “उदंड शांतीसुखाचा उपभोग घेतील.” (स्तोत्रसंहिता ३७:११) पण, आम्ही, असा हा परिणाम प्राप्त होऊ शकेल याबद्दल आत्मविश्वास बाळगू शकतो का?
३. आज पृथ्वीवर खरी शांती का नाही?
३ मानवजातीवर आज जागतिक विनाशाची छाया पसरुन आहे. अलिकडचाच अभ्यास हे कळवितो: “दुसऱ्या जागतिक महायुध्दानंतर अण्वस्त्रांच्या शस्त्रागारांच्या निर्मितीसाठी ३–४०,००,००,००,००,००० (३–४ दशलक्ष–दशलक्ष) इतका असमंजस असा परम खर्च करण्यात आला आहे. . . . जगातील अण्वस्त्रांचा साठा इतका मेगाटन झाला आहे की त्याकरवी ५८ महापद्म लोक ठार होऊ शकतील, किंवा सध्या जिवंत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला बारा वेळा ठार करता येईल इतक्या क्षमतेचा आहे.”a तरीसुध्दा ही वेडी स्पर्धा अद्याप आपला वेग वाढवीत आहे. याला वेडी किंवा MAD असे उचितपणे म्हणता येते कारण या आद्याक्षरांचा अर्थ मिच्युअली ॲश्युअर्ड डिस्ट्रक्शन असा आहे. ही अशी डळमळती विचारधारा आहे ज्यावर बलिष्ठ सत्ता आपली तथाकथित शांती आधारुन आहेत. ही खचितच देवाकडील शांती नव्हे.
४. (अ) आज जग कोणते चित्र सादर करते? (ब) तरीपण यहोवाच्या उपासकांना कोणत्या दृढ आशेची हमी आहे?
४ अशाप्रकारे हे जग प्रत्येक बाबतीत फारच निराशाजनक चित्र सादर करते. सध्याच्या युगात दिसून येणारा राजकारणी भ्रष्टाचार, हिंसात्मक गुन्हेगारी, आर्थिक डोकेदुखी, अभक्तपणा आणि धार्मिक गोंधळ या गोष्टी पूर्वी नव्हत्या इतक्या अधिकपणे आज मानवी समाजाला सहन कराव्या लागत आहेत. “सबंध सृष्टि . . . कण्हत आहे व वेदना भोगीत आहे” हे मानवजातीच्या बाबतीत पूर्वी नव्हते इतके आज खरे आहे. तरीपण आपली मानवी सृष्टि “नश्वरतेच्या दास्यत्वातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता” मिळेल असे देवाकडील अभिवचन आहे. (रोमकर ८:२१, २२) पवित्र शास्त्राचा देव, सार्वभौम प्रभु यहोवा याची उपासना करणाऱ्या शांतीप्रिय जनांना त्या मुक्ततेत शिरकाव करण्याची हमी आहे. ही अशी मुक्तता असेल जी खऱ्या शांतीमध्ये, चिरकालिक शांतीमध्ये पुर्णपणे मुळाविलेली असेल. (यहेज्केल ३७:२६–२८) पण ही शांती केव्हा व कशी येईल?
“काळ व समय” याविषयीचा देवाचा दृष्टीकोण
५. १ थेस्सलनीकाकर ५:१ च्या अनुषंगाने कोणता प्रश्न येतो?
५ प्रेषित पौलाने थेस्सलनीका येथील ख्रिश्चनांना पुनरुत्थान हे ‘प्रभु (येशू) च्या येण्या’ सोबत कसे संबंधित आहे याचे विवेचन देऊन त्यांना सांत्वन दिले होते. यानंतर तो म्हणतो: “बंधूनो, काळ व समय ह्याविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही.”—१ थेस्सलनीकाकर ४:१५; ५:१.
६. “काळ व समय” यहोवाला महत्वपूर्ण आहेत हे आम्हाला कसे समजते?
६ प्रेषिताचे ते शब्द सुचवितात का की देवाला “काळ व समय” महत्वाचे वाटत नाहीत? तसे नाही! (उपदेशक ३:१) ६९ सप्तकीय वर्षांच्या शेवटी जेव्हा “काळाची पूर्णता झाली” तेव्हा “देवाने आपल्या पुत्राला पाठविले.” शिवाय येशूने इ. स. २९ ते इ. स. ३३ पर्यंत केलेल्या साडेतीन वर्षांच्या उपाध्यपणाचा काळही आधीच भाकित करण्यात आला होता. (गलतीकर ४:४; दानीएल ९:२४–२७) “परराष्ट्रीयांची सद्दी” संपली तेव्हाच म्हणजे १९१४ मध्ये येशूला “स्वर्गीय यरुशलेम” येथे राजा याअर्थी अधिष्ठित करण्यात आले. (लूक २१:२४; इब्रीयांस १२:२२; यहेज्केल २१:२७; दानीएल ४:३१, ३२) “मोठे संकट” हे देखील यहोवाने नियुक्त केलेल्या ‘दिवस व घटकेला’च येणार. “त्याला विलंब लागावयाचा नाही.”—मत्तय २४:२१, ३६; हबक्कुक २:३.
७. पौलाने थेस्सलनीकाकरांना “काळ व समय” याविषयी लिहिण्याची का गरज नव्हती?
७ तथापि, आपल्या लिखाणात त्यावेळी पौलाला “काळ व समय” याविषयी लिहिण्याची गरज वा निकड नव्हती. त्या थेस्सलनीकाकर ख्रिश्चनांना हे आधीच पटले होते की यहुदी व्यवस्थीकरणाचा शेवट होण्याचा “समय” चालू होता जो, २० वर्षांनी म्हणजे इ. स. ७० मध्ये संपणार होता. त्यांचा आवेश व ‘पवित्र आत्म्याचा आनंद’ उदाहरणीय होता. (१ थेस्सलनीकाकर १:४–७) याचप्रमाणे आज यहोवाच्या साक्षीदारांना याची पूर्ण जाणीव आहे की १९१४ पासून दिसलेली जागतिक युध्दे व इतर दुःखदायक घटना या येशूची राज्य सत्ता व वैभव यातील अदृश्य उपस्थिती यांचे “चिन्ह” आहे.—मत्तय २४:३—८; २५:३१.
८. आम्ही का जागृत व क्रियाशील राहिले पाहिजे?
८ यानंतर प्रेषित आपल्या सह ख्रिश्चनांना असे म्हणण्याद्वारे बळकटी देतो: “कारण तुम्हाला स्वतःला पक्के माहीत आहे की, जसा रात्री चोर येतो, तसाच यहोवाचा दिवस येतो.” (१ थेस्सलनीकाकर ५:२) आम्हाला त्याची निश्चित वेळ माहीत नसली तरी तो न्यायदंड बजावण्याचा दिवस अधिकाधिक जवळ येत आहे. देवाने नियुक्त केलेल्या घटकेला तो एकाएकी, एकदम येऊन धडकेल. याकारणास्तव आम्ही जागृत राहून क्रियाशील असले पाहिजे.—लूक २१:३४–३६.
शांतीची आणीबाणीची घोषणा
९. (अ) कोणती ओरड उद्भवते व त्यात खरे ख्रिस्ती का सहभागी नाहीत? (ब) हा पुकारा कोण निनादवील आणि यांची यिर्मयाच्या काळातील अधिपतींसोबत कशी तुलना होते?
९ “शांती आहे, निर्भय आहे!” अशा पध्दतीने पौल, ख्रिस्ताच्या “आगमनसमया”चा कळस गाठला जाईल तेव्हा ऐकायला मिळणाऱ्या घोषणेसंबंधाने आम्हाला जागृत करतो. (१ थेस्सलनीकाकर ५:३) ही ओरड आम्हाला लवकरच ऐकायला मिळेल का? जागतिक शांती व निर्भयतेबद्दलचा हा पुकारा कोणत्या उगमाकडून येईल? अर्थातच ख्रिस्ताच्या अनुयायांमधून नाही कारण येशूने म्हटलेच होते की ते स्वत: व त्याचे राज्य “या जगाचे नाही.” (योहान १५:१९; १७:१४, १६; १८:३६) या कारणास्तव ज्यांच्याकडून ही घोषणा निनादणार ते देवाच्या येत असलेल्या राज्याचा विरोध करणारे जगातील लोक असणार. तेच स्वतः, दियाबल सैतान या “दुष्टाच्या अधीन” असलेल्या या जगाचे भाग आहेत. (१ योहान ५:१९) यिर्मयाच्या काळातील राजकीय व धार्मिक नेत्यांप्रमाणेच हेही ‘आपल्याच मनाप्रमाणे भाष्य करुन’ म्हणतीलः “तुम्हास शांती प्राप्त होईल.” असे बोलताना ही शांती देवाकडूनच येत आहे असे सुध्दा चुकीने भासवितील. पण त्यांचा हा दावा केवढा खोटा व निरर्थक ठरणार बरे!—यिर्मया २३:१६, १७, १९, २०.
१०. सध्याच्या जागतिक परिस्थितीकडे येईपर्यंत कोणत्या घटनांची शृंखला पार झाली?
१० “शांती आहे, निर्भय आहे!” अशी ओरड होईपर्यंत घटनांची शृंखला पार होते. ते १९२० वे वर्ष होते जेव्हा, ज्याला आज पहिले जागतिक युध्द म्हणतात त्या मोठ्या युध्दाच्या जागेपणात लीग ऑफ नेशन्स सामोरी आली. या लीगचा उद्देश या पृथ्वीतलावरुन युध्दाचे समूळ उच्चाटन करणे हा होता. पण दुसरे जागतिक महायुध्द सामोरे आले व त्यानेच लीगला असा टोला लगावला की ती अगाधकूपात जाऊन पडली. मग परत ऑक्टोबर २४, १९४५ रोजी या संघटनेचे राखेतून उत्थान झाले पण संयुक्त राष्ट्रसंघ या नव्या नावाने. (पडताळा प्रकटीकरण १७:८.) या संघटनेचे मुलभूत ध्येय “जागतिक शांती व निर्भयता टिकवून ठेवणे ” हे आहे. त्याच्या संस्थापकांनी “भावी पिढीला युध्दाच्या ज्वालेतील होरपळण्यापासून राखून ठेवण्याचा” निर्धार व्यक्त केला. अशी ही शांती व निर्भयतेविषयीची हमी देण्यात संयुक्त राष्ट्रसंघ यशस्वी ठरला का?
११. जगापुढे उभी ठाकलेली आणीबाणी किती गंभीर आहे?
११ संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थापकांपैकी काही कितीही प्रांजळ राहिले असले तरी हा संघ त्याच्या लीग या माजी संघाप्रमाणेच आपला सनदीने हक्क असणारा उद्देश सफळ करण्यात अपयशी ठरला आहे. जग सध्या अण्वस्त्रांच्या, फटाकेयुक्त पिपावर बसले आहे. एप्रिल १९८६ मध्ये चेर्नोबिल, यु. एस. एस. आर मध्ये आकस्मिक घटना घडून सर्व युरोपभर जे किरणविसर्जक परिणाम पसरले त्याने हे दाखविले की अणुचे बळ शांतीमय उद्देशास्तव जरी वापरण्यात आले तरी त्यात केवढी संभाव्य भयंकरता आहे. दक्षिण पॅसिफिक दिशेला असणारी काही राष्ट्रे आपले क्षेत्र अणु–मुक्त ठेवण्याचा प्रयत्न राखून आहेत. पण पूर्ण स्वरुपाचे अणु युध्द भडकलेच तर त्यामधून कोणी बचावलेले आहे असे कोठेही दिसणार नाही.
“शांती व निर्भयता” शक्य आहे का?
१२. राष्ट्रसंघाने १९८६ साठी कोणती घोषणा वदविली आणि याला राष्ट्रांमधून कोणता प्रतिसाद मिळाला?
१२ आणीबाणीची स्थिती केवढी खोल जात आहे याची जाणीव राखूनच संयुक्त राष्ट्रसंघाने १९८६ हे आंतरराष्ट्रीय शांतीचे वर्ष असेल असे घोषित केले. याला राष्ट्रांमधून मिश्र स्वरुपाचा प्रतिसाद मिळाला. बहुतेक सर्वांनीच या वा त्या मार्गी राष्ट्रसंघाच्या शांतीच्या वर्षास पाठबळ दिले पण त्यांनी हे दर्शविले की अण्वस्त्र युध्द शांतीला भीतीग्रस्त बनवीत आहे. मध्यंतराच्या काळात सबंध पृथ्वीवर, दुसरे जागतिक महायुध्द संपल्यावर, छोटी छोटी अशी सुमारे १५० युध्दे चालूच राहिली व त्यांनी एकंदरीत ३,००,००,००० पेक्षाही अधिकांचा बळी घेतला. तर मग राष्ट्रसंघाच्या इमारतीवरील कोरलेल्या यशया २:४ मधील प्रसिध्द शब्दांनुरुप हालचाल करण्यामध्ये कोणाही राष्ट्राने खराच पुढाकार घेतला आहे असे म्हणता येऊ शकते का?
१३. धार्मिक पुढाऱ्यांनी कसा पाठिंबा दिला?
१३ राष्ट्रसंघाच्या शांतीवर्षास पाठबळ देण्याच्या बाबतीत जगातील धर्म मागे नव्हते. पोप जॉन पॉल दुसरे यांनी जानेवारी १ ही तारीख जागतिक शांती दिवस असे संबोधून त्यांनी जागतिक मुत्सद्यांना विश्वव्याप्त शांती प्रस्थापित करण्यास आवश्यक असणारा आधार व नेतृत्व द्यावे असे आवाहन केले. या आंतरराष्ट्रीय शांती वर्षात असीसी, इटली येथे जगातील सर्व विश्वासीयांनी प्रार्थनेकरता जमावे असेही निमंत्रण त्यांनी दिले. या आमंत्रणाला कॅन्टरबरीचे आर्चबिशप, चर्च ऑफ इंग्लंडचे श्रेष्ठी आणि बौध्द गटाकडून उबदार प्रतिसाद मिळाला. वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चेस या संघटनेने आंतरराष्ट्रीय शांती वर्षाच्या बाबतीत एक परिपत्रक काढून सर्वांनी तातडीने निशस्त्रीकरण करण्यास आरंभ करावा असे आवाहन केले.
१४. शांतीसाठी आखलेली योजना केवळ कशी यशस्वी होऊ शकते?
१४ परंतु, “शांती व निर्भयता” प्रस्थापित करण्याच्या प्रकरणाबाबत “शांतीचा देव” याची काय इच्छा आहे? अपूर्ण मानव या जगाला शांती व निर्भयता देऊ शकतील असे देवाचे भविष्यवादित वचन दाखविते का? तसे नाही! यहोवा देवाने आपली धार्मिकता वा कीर्ति याच्या सहमतात आचरलेल्या कृतीवरच “निश्चित यश” अवलंबून असेल.—यशया ५५:११; ६१:११.
कोसळणारा “आकस्मित नाश”
१५. पौल या पुढील कोणती आश्चर्यकारक घोषणा करतो?
१५ प्रेषित पौल आम्हाला यानंतर काय घडणार ते सांगतो. तो म्हणतोः “ ‘शांती आहे, निर्भय आहे!’ असे ते म्हणतात तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा आकस्मित नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.”—१ थेस्सलनीकाकर ५:३.
१६. राष्ट्रांचे मार्ग देवाचे मार्ग का नाहीत?
१६ ते शब्द प्रथमतःच वाचताना फार मोठा धक्का बसतो. पण पवित्र शास्त्र त्याबद्दलचे स्पष्टीकरण देते. राष्ट्रे आज आचरीत असलेले मार्ग देवाचे मार्ग नाहीत. (यशया ५५:८, ९) त्याने आज विविध मानवी राजवटीला चालू राहण्याची मुभा देण्यामागील कारण कावेबाज सर्प, दियाबल सैतान याने साधारणपणे ६,००० वर्षांआधी जो वादविषय निर्मिला होता त्याला उत्तर देता यावे हे आहे. या सैतानाने आमच्या प्रथम पालकांना देवापासून स्वतंत्र मार्गाक्रमण करण्यासाठी चिथाविले तेव्हा मानवजातीला देव–प्रणीत शासनाची खरीच गरज आहे का हा विवाद त्याने प्रस्तुत केला.—उत्पत्ती ३:४, ५.
१७. मानवी राजवटीने आपला कोणता अहवाल नोंदविला व त्याद्वारे काय सिध्द होते?
१७ यानंतर जी हजार वर्षे गुदरली त्यामध्ये देवाने मानवाला, त्याला वाटणाऱ्या सर्व तऱ्हेच्या मानवी सरकाराद्वारे संशोधन करु दिले. एखाद्या प्रकारातील सरकार थोड्या वर्षांसाठी राहिले वा शेकडो वर्षांकरता राहिले तरी या प्रकारच्या प्रत्येक मानवी राजवटीने खरी शांती व सुरक्षितता आणण्यात अगदीच अपयश दाखविले. हरतऱ्हेच्या मानवी सरकारात युध्द, गुन्हेगारी, आणि मृत्यु या गोष्टी नित्याने मानवजातीस पछाडत राहिल्या. इतिहासभर “एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करतो” हा अनुभव मिळत राहिला. (उपदेशक ८:९) आणि आजची वस्तुस्थिती काही वेगळी नाही. ज्या कोणाला त्या वादविषयाची माहिती आहे तो, देवाचा संदेष्टा बोलला, अगदी त्याप्रमाणेच बोलू शकतो: “हे यहोवा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.”—यिर्मया १०:२३.
१८. “शांती आहे, निर्भय आहे!” ही राष्ट्रांनी केलेली ओरड का व्यर्थ जाणार?
१८ आता मात्र तो वादविषय एकदाचा व कायमचा मिटविण्याची वेळ झाली आहे. देव–प्रणीत राजवटच मानवजातीला खरी शांती व निर्भयता देऊ शकते. तथापि, जेव्हा राष्ट्रे “शांती आहे, निर्भय आहे” अशी ओरड करतात तेव्हा ते देव–प्रणीत राजवटीस पसंती दाखवितात असे नाही. वस्तुतः आपल्या स्वतःच्या घमेंडी कल्पनातरंगाप्रमाणे त्यांना आपले स्वामित्व पुढे चालविण्याची इच्छा आहे. पण आता वेळ संपत आली आहे! राष्ट्रांना आता ही जाणीव झाली आहे की काहीतरी जबर हालचाल तातडीने केलीच पाहिजे नाहीतर सारे काही अणुच्या भडक्यात फस्त होईल. याकरताच ते यिर्मयाने भाकित केलेली गोष्ट करतील: “शांतीचे नाव नसता, ‘शांती! शांती!’ असे म्हणून माझ्या लोकांचा घाय ते वरवर बरा करण्याचा प्रयत्न करतात.” पण हे सारे वायफळ जाणार!—यिर्मया ६:१४; ८:११, १५.
भविष्यवादित अंत
१९. “यहोवाचा दिवस” कसा येऊन धडकेल?
१९ “आकस्मित नाश” असे प्रेषित पौल म्हणतो. देवाचा संदेष्टा यशया याला ही पुष्टी देतो: “पाहा, त्यांचे वीर बाहेर रडत आहेत. शांतीचा संदेश आणणारे स्फुंदून स्फुंदून रडतील.” (यशया ३३:७) कित्येक ठिकाणी पवित्र शास्त्र हे दाखवून देते की दुष्ट राष्ट्रे व लोक यांजवर येणारा यहोवाचा न्यायदंड त्वरेने, अनपेक्षितपणे—होय, “जसा रात्री चोर येतो” त्याप्रमाणे येईल. (१ थेस्सलनीकाकर ५:२, ३; यिर्मया २५:३२, ३३; सफन्या १:१४–१८; २ पेत्र ३:१०) आपण शांती व निर्भयतेचे मैदान गाठले आहे असे जग जेव्हा मोठ्याने पुकारा करीत असेल नेमक्या त्याच वेळी “यहोवाचा दिवस” आकस्मितरित्या घाबरवून सोडणाऱ्या दराऱ्याने येऊन धडकेल. “शांती आहे, निर्भय आहे!” ही ओरड कशाकरता झाली आहे हे देवाच्या लोकांनी आधीच ओळखले असेल व ते यहोवाने पुरविलेल्या आश्रयात सुरक्षित असतील.—स्तोत्रसंहिता ३७:३९, ४०; ४६:१, २; योएल ३:१६.
२०. (अ) राष्ट्रसंघ हा कोणत्या प्रकारातील “श्वापद” आहे? (ब) यहोवा खोट्या धर्माकडे कशा पध्दतीने बघतो, व का?
२० देववचनात लीग ऑफ नेशन्स व तिचा वारस संयुक्त राष्ट्रसंघ यांचे मार्गाक्रमण, ज्याला सात डोकी (श्वापदापासून उद्भवलेल्या सात जागतिक सत्तांचे प्रतिनिधित्व करणारी) व दहा शिंगे (श्वापदाला सध्या पाठबळ देणाऱ्या सरकारी सत्ता) आहेत, त्या“किरमिजी रंगाचे श्वापद” याच्या प्रतिमेत रेखाटले आहे. पवित्र शास्त्र दाखविते की ब्रिटीश “सिंह” व रशियाचे “अस्वल” याप्रमाणे हे राजकारणी “श्वापद” आहे. या श्वापदावर एक स्त्री, “मोठी बाबेल, कळवंतीणीची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई” बसली होती. (प्रकटीकरण १७:३–८) हे, जो धर्म यहोवा व त्याचे नीतीमान राज्य यांचे प्रतिनिधित्व करीत नाही त्या खोट्या धर्माबद्दल यहोवास वाटणाऱ्या दृष्टीकोणाबद्दलचे चांगले वक्तव्य करते. राजकारणात समाविष्ठ होण्याद्वारे ती त्याच्याशी आध्यात्मिक व्यभिचार करते. याबद्दलचे एक उदाहरण, जगाने शांती व निर्भयता याविषयी काढलेल्या मोहीमेत धर्म संयुक्त राष्ट्रसंघाला जी साथ देऊन आहे ते आहे. यहोवाच्या साक्षीदारांमार्फत घोषित केल्या जाणाऱ्या देवाच्या न्यायदंडापासून शांती व निर्भयता मिळावी अशीही तिची मनोमन इच्छा आहे. याच्या पूर्तीस्तव तिने साक्षीदारांच्या ख्रिस्ती कार्यहालचालीवर बंदी घालावी याकरता काही सरकारांवर आपला जम बसविला आहे.—स्तोत्रसंहिता २:१–३.
२१. (अ) कोणती कृति “यहोवाच्या दिवसा”ची सुरुवात दर्शविते? (ब) हा “दिवस” कसा संपुष्टात येईल?
२१ “यहोवाचा दिवस” कसा येऊन धडकेल? मानवी इतिहासाच्या या अंधःकारमय रात्री तो खरोखरी “चोर येतो त्याप्रमाणे” येईल! हे, देव राष्ट्रसंघीय श्वापदातील राष्ट्रांना खोट्या धर्मावर एकाएकी तुटून पडण्यास परावृत्त करील त्यावेळी होईल. मोठ्या बाबेलविषयी पेटत असलेला सुप्त क्रोध व्यक्त करण्यात ते ती कशी आहे हे प्रत्यक्षात उघड करुन दाखवतील व तिला पुरेपुर उद्ध्वस्त करतील. या दंडाची पूर्तता इतक्या त्वरेने होईल की तिचे पूर्वीचे राजकीय सहकारी अगदी आक्रोशाने म्हणतील: “अरेरे! बाबेल ही मोठी नगरी होती! बलाढ्य नगरी होती! एका घटकेत तुला न्यायदंड झाला आहे.” पण राष्ट्रे व त्यांची सैन्ये देवाच्या लोकांवरही हल्ला चढवितील. त्यावेळी, राजांचा राजा, ख्रिस्त येशू, या सर्व शत्रूंचा नाश करील आणि सर्वप्रमुख असा विरोधक दियाबल सैतान याला अगाधकूपात लोटील.—प्रकटीकरण १७:१६, १७; १८:१०; १९:११–२१; २०:१–३; पडताळा यहेज्केल ३८:११, १६, १८–२३.
२२. (अ) विश्वास धरणाऱ्या लोकांसाठी कोणते वैभवी भवितव्य आहे? (ब) तुम्हाला देवाकडील शांती अनुभवण्याचा आनंद कसा लाभू शकेल?
२२ त्यावेळी, सरतेशेवटी देवाच्या राज्य वर्चस्वाखाली खरी शांती व निर्भयता बहरु लागेल! (स्तोत्रसंहिता ७२:१, ७; यशया ९:६, ७) आज जे “जागे व सावध राह”तात असे पुष्कळ जण ही गोष्ट घडत असलेली पाहण्यासाठी जिवंत राहतील. (१ थेस्सलनीकाकर ५:४–६) ख्रिस्ताकरवी पुरविण्यात आलेल्या यहोवाच्या खंडणी व्यवस्थेवर विश्वास राखणाऱ्या “सर्व राष्ट्रे . . . ह्यांच्यापैकी[चा] . . . मोठा लोकसमुदाय” “मोठे संकट” यातून बचावला जाऊन देवाकडील चिरकालिक शांतीचा अनुभव घेत राहील. (प्रकटीकरण ७:९–१७; २१:३, ४) तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल अशी आम्ही आशा करतो!
[तळटीपा]
a वर्ल्ड मिलटरी ॲण्ड सोशल एक्स्पेंडीचर १९८५ हे प्रकाशन.
तुम्ही कशी उत्तरे द्याल?
◻ “काळ व समय” देवाला व आम्हाला का महत्वाचे आहेत?
◻ समीप येत असलेला “यहोवाचा दिवस” याबद्दल आम्हाला कसे वाटले पाहिजे?
◻ १ थेस्सलनीकाकर ५:३ मधील ओरड करण्यात कोणाचा सहभाग असेल आणि केव्हा?
◻ त्या ओरडीमुळे कोणत्या महत्वपूर्ण घटनांविषयीची कळ ओढली जाईल?