‘सढळ हाताने पेरा, सढळ हाताने कापणी करा’
“जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील.”—२ करिंथकर ९:६.
१. यहोवा देव सबंध विश्वामध्ये आनंदी का आहे?
आमचा देव यहोवा हा “आनंदी देव” आहे. तो उदार दाता असल्यामुळेच आनंदी आहे, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याने विवेचीत केले: “घेण्यापेक्षा देणे यात अधिक आनंद आहे.” (१ तिमथ्यी १:११; प्रे.कृत्ये २०:३५) यहोवा देवाने जे काही देऊ केले त्यापेक्षा अधिक कोणीही देऊ शकले नाही. त्याने आपला एकुलता एक पुत्र, शब्द याच्या निर्मितीपासून ते आजतागायत देऊ केले आहे. याकरताच आम्ही म्हणू शकतो की तोच सबंध विश्वामध्ये सर्वात अधिक आनंदी आहे.
२, ३. (अ) देवाने कोणत्या मार्गी सढळ हाताने पेरणी केली आहे? (ब) यहोवा देवाने सढळ हाताने कापणी केली आहे व तो आणखी करील असे का म्हणता येते?
२ याच प्रकारचे तत्व २ करिंथकर ९:६ संग्रहीत करण्यात आले आहे: “जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील.” यहोवा देवाने आपल्या निर्मितीच्या बाबतीत केवढ्या सढळ हाताने पेरणी केली आहे! त्याचे वचन लाखो आत्मिक प्राण्यांविषयीची माहिती देते. (प्रकटीकरण ५:११) शिवाय आकाशात असणाऱ्या अगणित आकाशगंगा, ज्यात प्रत्येकात लाखो तारे आहेत त्यांचाही विचार करा. आम्ही खाली या पृथ्वीवर येतो तेव्हा यहोवा देवाने निर्माण केलेल्या सचेतन व अचेतन गोष्टींची केवढी विविधता आम्हास पहावयास मिळते! खरेच, “त्याच्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे.” (स्तोत्रसंहिता १०४:२४) या बरोबरच आम्हाला देवाने आमचे मन, आमची ज्ञानेंद्रिये आणि आमची शरीरे याबाबतीत केवढे समृद्ध केले आहे बरे! आमची घडण ही “भयप्रद व अद्र्भित रीतीने” खरीच झाली आहे.—स्तोत्रसंहिता १३९:१४.
३ यहोवा देवाने सढळ हाताने पेरणी केली आहे यात कोणताही संशय नाही. हे केवळ त्याने आपल्या निर्मिती कार्याच्या बाबतीतच केले असे नाही तर त्याने पृथ्वीवरील प्राणीमात्राशी जो संबंध राखला त्याच्या बाबतीतही केले. पण मग, त्याला सढळ हाताने कापणी करता आली का? होय, निश्चितपणे! पण कोणत्या मार्गी? त्याला गतकाळी जे बुद्धीमान प्राणीमात्र त्याची सेवा करण्यासाठी बहुसंख्येने गोळा करता आले व सध्याही प्राप्त होत आहेत व आणखीनही प्राप्त होतील त्या अर्थाने, या प्राणीमात्रांची कृति देवाचे अंतःकरण आनंदविते ते या खास अर्थाने की त्याद्वारे टोमणा देणाऱ्या दियाबलाला लबाड सिद्ध केले जाते.—नीतीसूत्रे २७:११.
४. २ करिंथकर ९:६चे तत्व सर्वदा, आमच्या काळातही कसे लागू होत आहे?
४ शब्द यापासून सुरुवात करून यहोवा देवाच्या कितीतरी विश्वासू सेवकांनी त्याच्यासारखीच सढळ हाताने पेरणी व सढळ हाताने कापणी केल्याची मुबलक साक्ष पवित्र शास्त्र आपणामध्ये सामावून आहे. हे असेच असावयास हवे कारण यहोवा देवाची तत्वे सर्वकाळाकरता व सर्व लोकांसाठी एकाच प्रकाराने कार्यान्वित होत असतात. त्यामुळेच पेरणी व कापणीविषयक तत्व तुमच्याही जीवनात सत्य असल्याचे आढळून येईल.
५, ६. (अ) सढळ हाताने पेरणी करण्यामध्ये कोणते शत्रू आम्हास अडथळा निर्माण करीत आहेत? (ब) आम्ही काय करण्याची इच्छा धरली पाहिजे आणि आमच्या पवित्र सेवेच्या कोणत्या प्रकाराच्या बाबतीत?
५ आम्ही सढळ हाताने पेरणी करण्याजोगी उदाहरणे व कारणे मुबलकरित्या पवित्र शास्त्रात असली तरी तसे करणे हे सोपेपणाचे कृत्ये नाही. ते का बरे? कारण तीन असे शत्रू आहेत जे आम्हाला यात अडथळा निर्माण करतात. पहिला शत्रू म्हणजे, स्वार्थी प्रवृत्तीकडे झुकणारी आमची अनुवंशिक वृत्ती. आम्ही उत्पत्ती ८:२१ मध्ये असे वाचतो: “मानवाच्या अंतःकरणातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात.” शिवाय मानवी हृदय हे धोकेबाज व फसवे आहे असेही देवाचे वचन आम्हास सांगते. (यिर्मया १७:९) दुसरा शत्रू म्हणजे आम्हाला दुष्टाच्या अधीन असणाऱ्या दुष्ट जगापासून प्रखर दबावाचा सामना करावा लागत आहे. (१ योहान ५:१९) तिसरा शत्रू म्हणजे प्रत्यक्ष दियाबल सैतान जो आम्ही बेसावध असता आम्हास गिळंकृत करण्यास तयार असतो.—१ पेत्र ५:८.
६ या तीन शत्रूंबद्दल तुम्ही सतत दक्ष राहता का? हे शत्रू असल्यामुळेच आम्ही “सुबोध ऐक[ण्यात] व शिक्षण स्वीकार[ण्यात]” तत्पर असले पाहिजे, “म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यात [आपण] सूज्ञपणे” वागू. (नीतीसूत्रे १९:२०) खरे म्हणजे पौलाने केले त्याप्रमाणेच आपणही “आपल्या शरीराला बुकलून दास करून ठेवले पाहिजे” नाहीतर शेवटाला आपल्याला हार खावी लागेल. (१ करिंथकर ९:२७) सढळ हाताने पेरणी करणे व सढळ हाताने कापणी करणे हे तत्व यहोवाच्या ख्रिस्ती साक्षीदारांच्या पवित्र सेवेच्या हर प्रकाराला लागू होणारे आहे. होय, प्रत्येक प्रकार पडताळून पहा आणि बघा की हे तत्व त्याला कसे लागू होते: आमचा व्यक्तिगत अभ्यास, आमची सभांची उपस्थिती, आमची प्रार्थना, औपचारिक अनौपचारिकपणे आम्ही देत असलेली साक्ष आणि आमचे कौटुंबिक नातेसंबंध.
पवित्र शास्त्र अभ्यासाच्या बाबतीत सढळ हाताने पेरणी करणे
७, ८. (अ) आम्हाला आमच्या व्यक्तिगत पवित्र शास्त्र अभ्यासाच्या बाबतीत सढळ हाताने पेरायचे आहे तर आम्हापाशी काय असले पाहिजे? (ब) आम्ही कोणती ध्येये ठेवावी व ती कशी प्राप्त करू शकतो?
७ आम्हाला यहोवा देवाचा फलदायी उपाध्याय व्हावयाचे आहे तर प्रथमतः आमच्या वैयक्तिक पवित्र शास्त्र अभ्यासाच्या बाबतीत आम्ही सढळ हाताने पेरणी करायला हवी. आम्हाला सूक्ष्म अशी आध्यात्मिक भूक असली पाहिजे. आमचे जीवन केवळ भौतिक गोष्टींवर आधारलेले नाही याचीही रसिकता आम्हाठायी असण्यास हवी. दैनंदिन जीवनाच्या काळज्या व भार आम्हावर नित्याने असता आमच्या आध्यात्मिक गरजेसंबंधाने जागृत रहाण्यासाठी आम्हाला परिश्रमपूर्वक जाणीव ठेवण्याची गरज आहे. (मत्तय १३:१९) स्तोत्रकर्त्याने देवाच्या वचनासंबंधाने जी रसिकता बाळगली होती तीच आम्हाठायी व्यक्तिगतरित्या असणे खरेच चांगले असेल की, ‘मोठी लूट सापडलेल्या मनुष्याला जसा आनंद होतो तसा तुझ्या वचनाविषयी मला आनंद होतो.”—स्तोत्रसंहिता ११९:१६२.
८ याबाबतीतली निश्चित मदत म्हणजे, “अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे जपून वागण्याविषयी काळजी घ्या, संधि साधून घ्या” या सूचनेकडे लक्ष देणे ही आहे. (इफिसकर ५:१५, १६) तुम्हाला स्वतःच्या बाबतीत हे परिक्षण करावेस वाटेल. त्यासाठी विचारा: वॉचटावर व अवेक! ही मासिके येतात तेव्हा ती वाचण्यासाठी मी वेळ काढतो का? वार्षिक अहवाल पुस्तक तसेच आम्हाला अधिवेशनात जी पुस्तके व इतर प्रकाशने मिळतात त्याबद्दल काय? यांच्या वाचनासाठी आम्हाला नियमाने एक वा दोन तास कदाचित मिळणार नाही पण तेच दक्ष राहिलो तर इथून तिथून थोडा वेळ काढून याचे थोडेसे वाचन किंवा पवित्र शास्त्राचा एखादा अध्याय वा मासिकातील एखादा लेख वाचून काढता येईल. पुष्कळ ख्रिश्चनांचा असा सराव आहे की ते दर दिवशी सकाळी १० ते १५ मिनिटे आधी उठतात आणि त्यांचे ध्यान जेव्हा एकाग्र आहे त्या याच वेळी ते वाचन करतात. काहींना प्रवासात असताना आपले बहुतेक वाचन उरकता येते असे दिसते. तुम्हाबद्दल काय?
९. आमच्या व्यक्तिगत अभ्यासाच्या बाबतीत आम्ही सढळ हाताने कशी कापणी करू शकतो?
९ यापद्धतीने आम्ही सढळ हाताने पेरणी केली तर सढळ हाताने कापणी करण्याची आशाही आम्हाला धरता येईल. ते कसे? याकरवी आमचा विश्वास बळकट होईल, आमची आशा तेजोमय होईल व आमची मनोवृत्ती आनंदी व सरळ असेल. यापेक्षा अधिक म्हणजे, आम्ही इतरांना उत्तम साक्ष देण्यात स्वतःला तयार करू. आमचे संभाषण उभारणीकारक ठेवण्यात आणि संधि मिळेल त्याप्रमाणे आमच्या बांधवांची मदत देण्यात आम्हाला आनंद वाटेल. असा हा परिणाम कसा निष्पण्ण होतो ते १ तिमथ्यी ४:१५, १६ वरून पडताळून पहा.
सभेच्या उपस्थिती संबंधाने सढळ हाताने पेरणी करणे
१०. सभांच्या बाबतीत आमचा मनोदय कसा असण्यास हवा?
१० तुम्ही कदाचित विचाराल: सढळ हाताने पेरा व सढळ हाताने कापणी करा हे तत्व मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्याच्या बाबतीत सुद्धा लागू होते का? होय, निश्चितपणे. आम्हाला स्तोत्रकर्त्या दावीदाप्रमाणे वाटायला हवे, ज्याने असे म्हटले होते: “‘आपण यहोवाच्या घराकडे जाऊ,’ असे ते मला म्हणाले तेव्हा मला आनंद झाला.” होय, आम्हाला आमच्या बंधूसोबत एकत्र भेटण्याची ओढ लागून राहण्यास हवी.—स्तोत्रसंहिता १२२:१.
११, १२. सभांना उपस्थित राहण्याच्या बाबतीत आम्ही सढळ हाताने कसे पेरू व कापू शकतो?
११ पण याच्याबद्दल आम्हाकडून कशाची अपेक्षा आहे? याचा अर्थ हा की आम्ही आमच्या पाच साप्ताहिक सभांना नियमितपणे व विश्वासूपणे उपस्थित राहिले पाहिजे. हवामान थोडेसे बदलले आहे किंवा थोडीशी डोकेदुखी आहे या सबबी घरी राहण्यासाठी कारण बनविता कामा नये. उन्हाळा किंवा थंडी, पावसाळा किंवा कोरडे हवामान हे आमच्या सभेला उपस्थित राहण्याच्या वाटेत किती वेळा अडखळण म्हणून सामोरे आले बरे? तरीपण उपस्थित राहण्यासाठी आम्ही जितक्या अधिकपणे अडखळणांवर मात करू तेवढ्या अधिकपणे यहोवाचा आशीर्वाद आम्हावर आलेला दिसेल. सभांच्या आधी येऊन उभारणीकारक बोलणी करण्याद्वारे तसेच सभा संपल्यावरही थोडा वेळ याच उद्देशाकरता थांबून राहून आम्हाला सढळ हाताने पेरणी करता येईल. तुम्ही व्यक्तिशः याबाबतीत कसे आहात? तुम्ही अधिक सढळ हाताने पेरणी करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे का? टेहळणी बुरुज अभ्यासक्रमाच्या सभेची तसेच इतर सभांची चांगली तयारी करणे हेही यात समाविष्ट आहे. याचे कारण असे की जेव्हा उत्तर देण्याची संधि आम्हाला मिळते तेव्हा चांगले विवेचन मांडण्याद्वारे आम्ही सढळ हाताने पेरणी करु शकतो.
१२ तर मग आम्हाला कशाप्रकाराने यात सढळ हाताने कापणी करता येईल? आम्ही जर उत्साही विवेचन सादर करीत आहोत तर याचा अर्थ आम्ही प्रत्यक्षात उत्साही असतो हे सुव्यक्त आहे आणि आमचे अंतःकरण आनंदी असल्यामुळेच आम्हाला निराश असलेल्यांना सांत्वन देता येत असते. होय, विवेचन मांडताना आम्ही ज्या सत्याविषयी बोलणी करीत असतो त्याकरवी प्रथम आमचा विश्वास दृढ झाल्याशिवाय राहात नाही व यामुळेच आम्ही सभेत उत्साहपूर्ण विवेचन सादर करू शकतो. हे इतके सोपे आहे: “उदार मनाचा समृद्ध होतो. जो उदारपणे पाणी पाजतो त्याला स्वतःला ते उदारपणे पाजण्यात येईल.”—नीतीसूत्रे ११:२५.
प्रार्थनेसंबंधाने सढळ हाताने पेरणी करणे
१३, १४. आम्ही आमच्या प्रार्थनासंबंधाने कसे (अ) सढळ हाताने पेरणी करू शकतो, (ब) सढळ हाताने कापणी करू शकतो?
१३ सढळ हाताने पेरणी करणे हे शास्त्रवचनीय तत्व आमच्या व्यक्तिगत प्रार्थनांबद्दल सुद्धा लागू होते. आमच्या प्रार्थना रटाळ, विचार न करता केलेल्या, सारख्या त्याच त्याच गोष्टींचे वक्तव्य करणाऱ्या अशा आहेत की त्या आमच्या उत्स्फुर्त अंतःकरणातून येतात? त्यात निव्वळ याचनाच नव्हे तर अंतःकरणपूर्वक स्तुति, आभारप्रदर्शन व वेळप्रसंगी नम्र प्रार्थनाही असतात का? प्रार्थनेच्या मोलवान हक्काविषयी आम्ही गंभीरता बाळगतो का? आम्ही आमच्या स्वर्गीय पित्यासमोर आपले अंतःकरण ओततो का? किंवा आमच्या प्रार्थनेत घाई दिसून येते किंवा कधी कधी तर प्रार्थना करण्यास सवड देखील नाही असे दिसते? प्रार्थना ही येशू ख्रिस्त व प्रेषित पौलाच्या जीवनात प्रमुख दर्जा राखून होती असे ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने स्पष्ट करतात.—लूक ६:१२, १३; योहान १७:१–२६; मत्तय २६:३६–४४; फिलिप्पैकर १:९–११; कलस्सैकर १:९–१२.
१४ प्रार्थनेसंबंधाने आम्ही जितक्या सढळ हस्ते पेरणी करतो तितक्याच प्रमाणात आम्ही त्याविषयी यहोवा देवाकडील उत्तर अपेक्षिण्याची आणि त्याच्यासोबत आपला नातेसंबंध सुधारला जाण्याचे अपेक्षू शकतो. कौटुंबिक प्रार्थनेद्वारे सर्व कौटुंबिक सदस्य प्रार्थना करणाऱ्या चालकासमीप येतात. मत्तय ७:७ मध्ये आढळणारे येशूचे शब्दही आपण लक्षात ठेवू या: “मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल.”
आमच्या उपाध्यपणासंबंधाने सढळ हाताने पेरणी करणे
१५. सढळ हस्ते पेरणी व कापणी कोठे अनुभवता येईल?
१५ आमच्या लेखाचे शिर्षक इतर गोष्टींपेक्षा आमच्या साक्षीकार्याच्या बाबतीत अधिक स्पष्टपणे लागू आहे. जितका अधिक वेळ आम्ही त्यामध्ये देऊ करतो तितक्या अधिकपणे आम्हाला मनोरंजक अनुभव, फलदायी पुनर्भेटी आणि उपयुक्त पवित्र शास्त्र अभ्यास ज्यामुळे जिवंत शिफारसपत्रे मिळतात त्याची सढळ अशी कापणी मिळू शकेल.—२ करिंथकर ३:२.
१६, १७. (अ) क्षेत्रकार्याच्या बाबतीत सढळ हस्ते पेरणी करण्यामध्ये आम्हाकडून कशाची अपेक्षा आहे? (ब) असे केल्यामुळे कोणत्या परिणामांची आशा करता येईल?
१६ तथापि, क्षेत्र उपाध्यपणाच्या अनुषंगाने सढळ अशी पेरणी करणे हे केवळ संख्येचे नव्हे तर गुणवत्तेचेही मोल राखून आहे. उपाध्यपणात सहभागी असताना आम्ही “आत्म्यात उत्सुक” असावयास हवे. (रोमकर १२:११) आम्ही उबदारपणे, स्मितवदनाने लोकांसोबत मोकळेपणाने बोलणे केले पाहिजे. हे आमच्या घरोघरच्या व रस्त्यावरील साक्षीकार्याच्या बाबतीतही लागू होते. रिझनिंग फ्रॉम द स्क्रिप्चर्स हे आमच्या भाषेत उपलब्ध असल्यास त्याकरवी आम्हास अधिक प्रभावी बनण्यास मदत मिळावी म्हणजे आम्ही फलदायी बनू आणि उपाध्यपणात जितका वेळ व श्रम खर्च करतो त्याची सढळ हस्ते कापणी मिळवता येईल.
१७ आमच्या क्षेत्र उपाध्यपणाच्या बाबतीत सढळ हाताने पेरणी करण्यात, आस्था आढळल्यावर त्याची नोंद घेण्याची दक्षता राखणे हे समाविष्ट नाही का? याजशी संलग्न असणारी गोष्ट म्हणजे त्याची परत भेट घेऊन त्या आस्थेची वाढ शक्य असल्यास पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्याद्वारे करणे ही आहे. यापेक्षा, अधिक म्हणजे आम्ही अग्नि–प्रतिबंधक साहित्याकरवी बांधणी करण्याची काळजी घेतली पाहिजे. याचा हा अर्थ होतो की आम्ही मोठ्या आत्मविश्वासपूर्वक, पण समभावनेने व चाणाक्षपणे शिकविले पाहिजे व शिकवताना विद्यार्थ्याला विविध पवित्र शास्त्रीय तत्वांबद्दल काय वाटते ते कुशलतापूर्वक काढून घेता आले पाहिजे. यामध्ये सढळ हस्ते पेरणी करण्याद्वारे आम्हाला ख्रिस्ती व्यक्तित्व उभारण्याची आशा करता येईल जे सैतान व त्याच्या व्यवस्थीकरणाद्वारे मिळणाऱ्या तडाख्याचा प्रतिकार करण्यास समर्थ ठरेल.—१ करिंथकर ३:१२–१५.
कौटुंबिक नातेसंबंधाच्या बाबतीत सढळ हाताने पेरणी करणे
१८. आमच्या कौटुंबिक नातेसंबंधाविषयी आम्ही कोणती सूचना लक्षात ठेवली पाहिजे?
१८ आम्ही ज्या परिमाणाने पेरतो त्याच मानाने कापणी मिळेल हे इश्वरशासित तत्व कौटुंबिक वर्तुळात देखील लागू होते. याबद्दल आम्ही लूक ६:३८ मधील येशूचे शब्द लक्षात ठेवण्यास हवेत: “द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल, चांगले माप दाबून, हलवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल.”
१९. पती व पत्नी कशाप्रकारे सढळ हस्ते पेरणी करून तशीच कापणी करू शकतात?
१९ विचारशील व निस्वार्थी स्वरूपाची दयाळू कृत्ये आचरण्याद्वारे पती व पत्नी यांना सढळ हस्ते पेरणी करण्याच्या अनेक सुसंध्या उपलब्ध आहेत. प्रेषित पौल इफिसकर ५:२२–३३ मध्ये उत्तम सल्ला देतो. कृपया ही वचने वाचून पहा व वाचताना तुम्हाला स्वतःला किती सढळ हस्ते पेरणी करता येईल त्याचा विचार करा. ख्रिस्ती पत्नी ही जितक्या अधिकपणे अधीन, सहकार्य देणारी व पाठबळ पुरविणारी आहे तितक्या अधिकपणे तिला कापणी करता येईल. ते कोणत्या प्रकाराने? तिच्या पतीची कळकळ व रसिक जिव्हाळयाद्वारे, ज्याचा प्रत्यय तो तिच्यावर आपल्या शरीरासारखीच प्रीती करण्यात दिसून येतो. याचप्रमाणे ख्रिस्ती पती १ पेत्र ३:७ मध्ये आर्जविलेला विचारशीलपणा राखण्यात जेवढी तत्परता दाखवितो आणि इफिसकर ५:२८, २९ मध्ये ठळकपणे दाखविण्यात आलेल्या निस्वार्थ प्रेमाचा प्रत्यय देतो त्याच प्रमाणात त्याला बायकोकडील अधीनता व तिचा निष्ठावंत पाठिंबा याची कापणी हाती मिळेल.
२०. मुलांच्या वाढीसंबंधाने सढळ हस्ते पेरणी करण्याचे तत्व कसे लागू करता येईल व कोणत्या परिणामासह?
२० याचप्रमाणे मुलांना यहोवाकडील शिस्त व मानसिक निर्बंध याकरवी संगोपन करण्याच्या आमच्या जबाबदारीकडे आमचे दुर्लक्ष होता कामा नये. (इफिसकर ६:४) खरे म्हणजे ही गोष्ट आमची इतर इश्वरशासित कर्तव्ये व हक्क यांच्या आधी येते. पण काही पालकांच्या बाबतीत हे तत्व दुर्लक्षिले जाते हे मोठ्या दुःखाचे आहे. एका दृष्टीने पालकांनी मुलांच्या भावनात्मक व आध्यात्मिक कल्याणासाठी आपली मौजमजा व सुखविलास यांचा त्याग करून त्यांच्यासोबत प्रमाणबद्ध वेळ देऊन त्यावर आपली प्रीती व्यक्त करण्यास हवी पण तेच दुसऱ्या दृष्टीने पालकांनी दृढ असलेच पाहिजे. त्यांना सूचना करण्यात आली आहे: “तू आपल्या मुलास शासन कर, म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल. तो तुझ्या जिवाला हर्ष देईल.” या पद्धतीने पेरणी करा आणि तुम्हाला आदर देणाऱ्या व तुम्हास प्रिय वाटणाऱ्या सचोटीकारक मुलांची वाढ करण्यात कापणी मिळवा.—नीतीसूत्रे २९:१७.
लाभांची कापणी करणारे व्हा
२१, २२. आमची पवित्र सेवा व कौटुंबिक नातेसंबंध यांच्याबाबतीत सढळ अशी पेरणी व कापणी कोण कोणत्या मार्गानी करता येईल?
२१ अशाप्रकारे आम्हाला हे स्पष्ट दिसले की ज्या प्रमाणात पेरणी करतो त्याच प्रमाणात कापणी मिळते हे तत्व ख्रिस्तीपणाच्या सर्व बाबींना लागू होणारे आहे. आम्ही आमच्या व्यक्तिगत पवित्र शास्त्र अभ्यासाच्या बाबतीत सढळ हस्ते पेरणी केल्यास त्याचा प्रत्यय बळकट विश्वास, तेजोमय आशा आणि आमच्या उपाध्यपणासाठी आवश्यक असणारी सिद्धता प्राप्त करण्यात होतो. सभांच्या बाबतीत आम्ही सढळ हस्ते पेरल्यास आमचा स्वतःचा विश्वास बळकट केला जाईल व आम्ही इतरांचाहि विश्वास बळकट बनवू शकू. प्रार्थनेच्या संबंधाने आम्ही सढळ हस्ते पेरल्यास आमचे आमच्या स्वर्गीय पित्यासोबत चांगले नातेसंबंध राहतील व तो आमच्या प्रार्थनांना उत्तर देईल. तसेच आम्ही आमच्या साक्षीकार्याच्या बाबतीत सढळ हस्ते पेरीत राहिलो तर आम्हाला व्यक्तिशः फायदा घडतो आणि आमच्या प्रयत्नांचे चीज झाले आहे हे दाखविणारी जिवंत शिफारस पत्रे आम्हाला मिळतील.
२२ याचप्रमाणे आम्ही हेही विसरता कामा नये की हे तत्व आमच्या कौटुंबिक नातेसंबंधाला सुद्धा लागू होणारे आहे. प्रेमळ विचारधारा राखून व निस्वार्थ स्वरूपाची कृत्ये करून आम्ही पती, पत्नी, पालक वा मुले या नात्याने अशा कौटुंबिक जीवनाची कापणी मिळवू जे समृद्ध असून ज्याचा सहवास व अनुभव साफल्याचा वाटेल. यामुळे बाहेरच्या लोकांनाही अप्रतिम अशी साक्ष होईल व त्यांनाही याच मार्गाचे अनुकरण करण्याचे पाचारण करता येईल.
२३. शेवटी आम्ही कोणत्या सूचनेकडे लक्ष देणे बरे ठरेल?
२३ तर यहोवाच्या प्रत्येक ख्रिस्ती साक्षीदार सेवकाने स्वतःच्या बाबतीत ही विचारणा करावी: मी अधिक सढळ हाताने पेरणी करू शकतो वा शकते का? १ थेस्सलनीकाकर ४:१ मध्ये पौलाने लिहिलेले शब्द अगदी सुयुक्त आहेत: “बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हास विनंति करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की तुम्ही कसे वागून देवाला संतोषवावे हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहा. त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धि व्हावी.” होय, आपण सर्वजण अधिक सढळ हस्ते पेरणी करू या म्हणजे आम्हाला सढळ हस्ते कापणी करता येईल, जी यहोवाच्या सन्मानास आणि आमच्या तसेच आमच्या बांधवांच्या आशीर्वादास कारणीभूत ठरेल. (w86 6/15)
उजळणीसाठी मुद्दे
◻ २ करिंथकर ९:६ मध्ये आढळणाऱ्या सत्याच्या बाबतीत यहोवा देवाने कसे उदाहरण राखले?
◻ पवित्र शास्त्र अभ्यास व ख्रिस्ती सभांच्या अनुषंगाने तुम्हाला अधिक कापणी करता येण्यासाठी काय करता येईल?
◻ क्षेत्र कार्याच्या बाबतीत तुम्हाला सढळ हाताने पेरणी करून तशीच कापणी कशी करता येईल?
◻ तुमच्या कुटुंबाला सढळपणे पेरणी व कापणी करण्यास सहाय्यक ठरू शकणारी व्यावहारिक पावले कोणती आहेत?