वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ५/१ पृ. १०-१५
  • यहोवाचा आशीर्वाद समृद्धी देतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचा आशीर्वाद समृद्धी देतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • धनवान आणि उंट
  • धनवानांना एवढे कठीण का?
  • “द्रव्याचा मोह”
  • धनवान रहा—देवाच्या दृष्टीने
  • तुम्ही “देवविषयक बाबतीत धनवान” आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • देवाच्या नवीन जगात खरी संपन्‍नता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • देवाकडून मिळणारी श्रीमंती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • यहोवावर तुम्हाला कितपत भरवसा आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ५/१ पृ. १०-१५

यहोवाचा आशीर्वाद समृद्धी देतो

“स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे कठीण आहे.”—मत्तय १९:२३.

१, २. समृद्धिच्या दोन वेगळ्या प्रकाराबद्दल कोणता फरक स्पष्ट करता येतो?

“अहो, तुम्ही धनवान झाला आहात” असे कोणी तुम्हाला कळवले तर ते कसे वाटेल? आपण पैसा, जमीनजुमला किंवा चैनीच्या वस्तुंसंबंधाने श्रीमंत बनलो आहोत हे कोणी तुम्हास कळवल्यास पुष्कळ जण भारावून जातील. पण श्रीमंतीचा या दृष्टीकोणातून जरा विचार करा: “यहोवाचा आशीर्वाद समृद्धि देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.”—नीतीसूत्रे १०:२२.

२ देवाने प्राचीन काळातील कुलपिते तसेच इस्राएल राष्ट्रासोबत दळणवळण राखले तेव्हा त्याने त्यांच्या विश्‍वासूपणाबद्दल समृद्ध केले. (उत्पत्ती १३:२; अनुवाद २८:११, १२; इयोब ४२:१०–१२) शलमोन राजाला अशी समृद्धता मिळाली. तो अतिशय धनवान झाला. तरीपण तो आपल्या अनुभवाने हे शिकला की, जडवादी धनावर आपले जीवन केंद्रित करणे हे “सर्व काही व्यर्थ व वाऱ्‍यामागे धावणे होय.” (उपदेशक २:४–११; १ राजे ३:११–१३; ९:१४, २८; १०:१०) या कारणास्तव शलमोनाने, “यहोवाचा आशीर्वाद समृद्धि देतो, तिच्या बरोबर तो आणखी कष्ट देत नाही,” असे म्हटले तेव्हा तो हे जडवादी संपत्तीविषयी बोलत नव्हता. तो खरेपणाने ही सत्यता वदवीत होता की तुम्हाला देवाचा आशीर्वाद आहे तर तुमचे जीवन हे, जे लोक त्याची सेवा करीत नाहीत त्यांच्यापेक्षा खूपच समृद्ध असते. पण ते कसे काय?

३. देवाचे आशीर्वाद तुम्हास आहेत तर तुम्ही कशाच्या बाबतीत खरे धनवान आहात?

३ तुम्ही ख्रिस्ती आहात तर सध्या तुम्हाला यहोवाच्या कृपापसंतीचा अनुभव घेणे व इश्‍वरी सूज्ञानासारखा आशीर्वाद प्राप्त होऊ शकेल. तुम्हाला आनंदी, भरवसापात्र आणि तुमच्या विषयी आस्था राखणाऱ्‍या कुटुंबासमान मंडळीत स्विकारणीय स्थिती मिळू शकेल. देवाचे कायदे तुम्हाला पुष्कळ आजार व धोक्यापासून वाचवतात. याशिवाय या दुष्ट व्यवस्थीकरणासाठी समीप येत असलेल्या “मोठ्या संकटा”तून इश्‍वरी संरक्षण मिळण्याची व त्यानंतर पृथ्वीवरील नंदनवनात अनंतकालिक जीवन जगण्याची आशा बाळगण्याजोगे कारण आहे. असे हे आशीर्वाद व भवितव्य लक्षात घेता तुम्ही खरेपणाने म्हणू शकाल: “मी खरा धनवान आहे.”—मत्तय २४:२१, २२.

४. तुमची आध्यात्मिक समृद्धता कशी धोक्यात आणली जाऊ शकते?

४ तथापि, यहोवाच्या आशीर्वादाद्वारे तुम्हास लाभलेली “श्रीमंती” ही कदाचित आणखी एका प्रकारच्या श्रीमंतीकरवी—पैसे अथवा जडवादी मालमत्ता याकरवी धोक्यात येऊ शकते. आम्हापैकी थोडेजण (आर्थिक दृष्ट्या सुरक्षित असलो वा मर्यादित अर्थप्राप्ती असणारे असलो तरी) हे लगेच कबूल करू शकू की, “पैशाचा लोभ यामुळे बहकण्याचा खरा धोका मजपुढे उभा आहे.” तरीपण हा इशारा लक्षात आणा: “द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्‍वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस फार खेदांनी भोसकून घेतले आहे.” (१ तिमथ्यी ६:१०) या विधानाचे लिखाण अशाकाळी झाले होते जेव्हा सर्व संमतीप्राप्त ख्रिश्‍चनांचा देवाच्या पवित्र आत्म्याने अभिषेक होऊन त्यांना, ते ख्रिस्ताबरोबर स्वर्गीय शासनकर्ते होणार आहेत अशी खात्री लाभली होती. यांना, येशूबरोबर राहिलेल्या प्रेषितांचा कदाचित थेट संपर्क आला असावा. आता संपत्तीने यापैकीच्या कित्येकांना “बहकविले” तर हा धोका आज आमच्यासाठी किती मोठा आहे बरे.”—२ करिंथकर ५:५; रोमकर ८:१७, २३.

धनवान आणि उंट

५. येशूने धनाढ्यतेविषयी कोणता दृष्टीकोण राखला?

५ धनाढ्यता केवढी जोखीम आणते त्याविषयी येशूने वेळावेळी बोलणी केली, कारण याचा धोका प्रत्येकाला, मग तो श्रीमंत असो वा नसो त्याला असतो. (मत्तय ६:२४–३२; लूक ६:२४; १२:१५–२१) स्वपरिक्षणाचा आधार ठरावा याकरता येशूने एके प्रसंगी जे म्हटले व जे मत्तय १९:१६–२४, मार्क १०:१७–३० व लूक १८:१८–३० मध्ये लिखित आहे त्याचा विचार करा. खरे म्हणजे थोडा वेळ थांबून या अहवालाचे वाचन का करू नये?

६, ७. (अ) येशू व एक तरुण मनुष्य यात कोणते संभाषण झाले? (ब) त्यानंतर येशूने कोणती सूचना दिली?

६ एका तरूण अधिकाऱ्‍याने येशूकडे येऊन विचारले: “काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?” येशूने नियमशास्त्राकडे निर्देश करून हे स्पष्ट केले की जे काही जरूरीचे आहे ते सर्व काही यहोवाने सांगितलेच होते. तो तरूण उत्तरला की, “आपल्या तरूणपणापासून” तो ह्‍या गोष्टींचे पालने करीत आला होता. तो जणू जीवनप्राप्तीच्या दारापाशीच येऊन पोहचला होता, पण अद्याप आपणात कशाची तरी उणीव आहे हे त्याने हेरले असावे. त्याला वाटले असावे की आणखी एखादे सत्कृत्य वा कोणतीतरी महशूर कामगिरी ही त्याला सार्वकालिक जीवनाच्या दारातून प्रवेश मिळवून देईल. तथापि, येशूने दिलेल्या उत्तरात मोठा अर्थ ध्वनित होत होता. त्याने म्हटले: ‘तुझे असेलनसेल ते विकून गोरगरीबांना वाटून टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ति मिळेल. आणि चल, माझ्यामागे ये.” तेव्हा काय घडले? “हे ऐकून तो अतिशय खिन्‍न झाला, कारण तो फार श्रीमंत होता [वा त्याचापाशी खूप सांपत्तिक ठेवा होता.]” यामुळेच तो निघून गेला.—लूक १८:१८, २१–२३; मार्क १०:२२.

७ त्यानंतर येशूने म्हटले: “ज्यांच्याजवळ धन आहे त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती बरे कठीण आहे! श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे ह्‍यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” (लूक १८:२४, २५) ही सूचना फक्‍त त्या धनवानापुरतीच होती का? का तुम्ही, श्रीमंत वा गरीब असला तरी तुमचाही त्यात समावेश आहे? आपण पाहू या.

८. (अ) तो तरूण अधिकारी कोणासारखा होता? (ब) त्याच्यामध्ये कोणता दोष होता व त्याबद्दल आम्हास चिंता का वाटावी?

८ तुम्हाला त्या तरूण अधिकाऱ्‍याच्या परिस्थितीची कल्पना करता येईल. याकरता तुम्ही स्वतःपुढे एका तरूण ख्रिश्‍चनाचे चित्र उभे करा, ज्याला चांगले पवित्र शास्त्रीय ज्ञान आहे, चांगली नीतीमत्ता आहे व तो श्रीमंत घराण्याचा आहे. अशा या व्यक्‍तिचा तुम्हाला हेवा वाटू लागेल. पण येशूला त्या तरूण यहुदी मनुष्याबद्दल मोठी उणीव आढळली होती: त्याची संपत्ती वा मालमत्ता ही त्याच्या जीवनात फारच मोलाची होती. याकारणास्तव येशूने वर असणारी सूचना दिली. याद्वारे तुम्हाला हे दिसेल की आम्ही धनवान वा गरीब असलो तरी हा पवित्र शास्त्रीय अहवाल आम्हा सर्वानाच का महत्वपूर्ण आहे. आमच्यापाशी संपत्ती असली किंवा ती आम्हास हवीशी वाटली तरी ही संपत्ती वा मालमत्ता आमच्याही जीवनात अति महत्वाच्या जागी येऊ शकते.

९. येशू श्रीमंतीचा धिक्कार करीत नव्हता हे आम्हाला कसे कळू शकते?

९ भौतिक संपदा असणारा कोणी देवाची सेवा करू शकणार नाही असे येशू येथे म्हणत नव्हता. कारण पुष्कळ ती करू शकले. त्या तरूण यहुदी माणसाने काही प्रमाणात केली होती. जक्कय हा जकातदार सुद्धा “श्रीमंत” होता. (लूक १९:२–१०) पहिल्या शतकातील काही अभिषिक्‍त ख्रिश्‍चन धनाढ्य होते व त्यामुळे त्यांना “परोपकारी व दानशूर असावे” हे आव्हान होते. (१ तिमथ्यी ६:१७, १८; याकोब १:९, १०) शिवाय आजही काही धनवान ख्रिस्ती आहेत. राज्य कार्यास हातभार लावण्यासाठी त्यांनी औदार्याने देणग्या दिल्या, सभांसाठी आपली घरे दिली आणि आपणाजवळील वाहनांचा वापर उपाध्यपणासाठी केला. तर मग, येशूने श्रीमंत मुनष्य आणि उंट याजविषयीची का बोलणी केली? त्यापासून आम्हाला काय शिकता येईल?

१०. येशूने त्या प्रसंगी दिलेल्या सूचनेद्वारे आम्ही कोणता निर्णय घेऊ शकतो?

१० तुम्हाला या गोष्टीची जाण असेलच की, देवाची सेवा करण्याचा आरंभ करणे ही एक गोष्ट आहे तर ती संपेपर्यंत विश्‍वासू असल्याचे सिद्ध करून दाखविणे ही दुसरी गोष्ट आहे. (मत्तय २४:१३; फिलिप्पैकर ३:१२–१४) हाच विचार येशूच्या मनात असावा जेव्हा त्याने हे म्हटले की, “धनवानाला देवाच्या राज्यात जाणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” (मार्क १०:२५) कोणताही उंट हा प्रत्यक्षपणे छोट्या सुईच्या छिद्रातून कधीच जाऊ शकणार नाही, यास्तव येशू येथे अतिशयोक्‍तिचा अलंकार वापरीत होता; अशी गोष्ट की जी प्रत्यक्षात गृहीत धरताच येत नाही. तरीपण तिने हे प्रकटविले की धनवानाला काही गोष्ट करणे केवढ्या प्रयासाचे जाते. ती कोणती बरे? देवाची सेवा करण्याचा आरंभ करणे ही नव्हे तर, “देवाच्या राज्यात जाणे,” किंवा प्रत्यक्षात सार्वकालिक जीवन मिळविणे. तुमची आर्थिक स्थिती कशीही असली तरी येशूने दिलेली सूचना तुमचे विचार, तुमची आध्यात्मिक प्रगती यांना आणि तुम्हाला जीवनप्राप्ती देण्यात साहाय्यक ठरु शकते.

धनवानांना एवढे कठीण का?

११. येशूच्या प्रचारामुळे गरीब व श्रीमंतावर कसा परिणाम केला गेला?

११ येशू व त्याच्या प्रेषितांनी केलेल्या प्रचारामुळे “गरीबांना सुवार्ता सांगण्यात आली.” (मत्तय ११:५) पण यात धनवानाविषयी पक्षपात केला गेला नव्हता. तरीपण असे दिसते की गरीबांमध्ये अधिक जणांनी आपली आध्यात्मिक गरज ओळखली आणि आशेच्या संदेशाला प्रतिसाद दिला. (मत्तय ५:३, ६; ९:३५, ३६) धनवान यहुदी स्वतःच्याच परिस्थितीत संतुष्ट होते. (पडताळा लूक ६:२०, २४, २५) तरीपण त्या काळी काही जसे अपवाद ठरले, तसेच आजही काही अपवाद आहेत. काही धनवान लोक पवित्र शास्त्राचा संदेश स्विकारतात व देवाची सेवा करू लागतात. याचा परिणाम त्यांच्यासाठी मोठा होतो. असेच पौलाच्या बाबतीत घडले. त्याने जीवनातील स्वत:च्या स्थानाला अडखळण बनू दिले नाही. (फिलिप्पैकर ३:४–८) तथापि येशूने हे प्रतिपादित केले की धनवानांना ते अत्यंत कठीण जाणार.

“द्रव्याचा मोह”

१२, १३. (अ) एका दाखल्यात येशूने चिंतेविषयीचा कोणता मुद्दा सांगितला? (ब) धनवानांना अधिक अडखळणे का येतात?

१२ वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीवर पडलेल्या बीयांच्या दाखल्यात येशूने म्हटले की त्यापैकीचे काही “काटेरी झाडामध्ये पडले. मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटविली.” त्याने याबाबतीत स्पष्टता केली: “काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवितात व तो निष्फळ होतो.” (मत्तय १३:७, २२) बहुतेक सर्वांनाच “संसाराची चिंता” येते. जो गरीब, बेकार व अपंग आहे त्याला ती का वाटते ते आपल्याला समजू शकते. आर्थिक दृष्ट्या सुरक्षित असणाऱ्‍यांना अशी चिंता वाटत नाही तरीपण चलनवाढ, करात होणारा बदल आणि चोरीची भीती या गोष्टी त्याला वा तिला चिंतेत टाकू शकतात. अशा प्रकारे धनवान व गरीब हे दोघेही चिंतेच्या अधीन आहेत.—मत्तय ६:१९–२१.

१३ येशूने आणखी स्पष्ट केले की काहीजण “द्रव्याचा मोह” यामुळे मागे पडतील. आर्थिक दृष्ट्या यशप्राप्ती ही इर्ष्यायुक्‍त गोष्ट बनते. ॲरिस्टॉटल ओनासिस या लखोपतींनी एकदा म्हटले: “एखादी विशिष्ट पातळी गाठल्यावर पैसा तितका महत्वाचा राहात नाही. यशप्राप्ती ही तेव्हा मुख्य लक्ष्य होते. अशावेळी मजकरता सूज्ञ गोष्ट ही असेल की मी मला आवर घालावा. पण मी तो घालीत नाही. मला अधिकाधिक उंच भरारी घ्यावीशी वाटते, कारण त्यात खूप मजा वाटते.” याचप्रमाणे कोणा ख्रिश्‍चनाला प्रतिष्ठेची शिडी वर चढण्याची शिकस्त करण्यात मोठी मजा वाटेल. किंवा त्याला आपल्या जीवनात पूर्वार्धात ज्या गोष्टी “पुरेश्‍या” वाटत होत्या त्याची अधिक प्राप्तता व्हावी या हेतूने आपला व्यावसाय अधिक विस्तारीत करण्याचा मोह जडू शकतो. पूर्ण वेळेचे उपाध्याय या अर्थी सेवा करण्यासाठी आपले काम कमी करण्याऐवजी (वा निवृत्त होण्याऐवजी) तो “आपली गुदामे [वा घरे] मोडतो व ती मोठी बांधतो.” (पहा लूक १२:१५–२१) हे तुमच्या बाबतीत घडू शकते का? अशा स्थितीत असणारा कोणी देवाची सेवा पूर्ण जिवाने करीत आहे असा देव त्याच्याबद्दल दृष्टीकोण धरू शकेल असे तुम्हास वाटते का?

१४. ऐश्‍वर्य हे एखाद्यास कसे मागे टाकू शकते हे कसे दाखवता येते? (नीतीसूत्रे २८:२०)

१४ ऐश्‍वर्य (किंवा तिच्या प्राप्तीस्वत असणारी लालसा) ही आणखी काही प्रकाराद्वारे ख्रिश्‍चनांना “सार्वकालिक जीवन हे वतन मिळविण्यापासून” परावृत्त करते. धनाचा लोभ हा त्याला नफा कमीच दाखविणे ही जागतिक युक्‍ति किंवा या सारख्या इतर अप्रामाणिकपण साधारण युक्त्यांचा अवलंब करण्यास प्रवृत्त करील. तसेच त्याच्याकडे कष्टाळू व प्रामाणिक असे सह ख्रिश्‍चन कामाला असले तर त्यांच्या आध्यात्मिक आस्थेपेक्षा आपली स्वतःची कमाई ही वरच्या पातळीवर ठेवण्याची शक्यता आहे. तसेच त्यांना कामावर गुंतवून ठेवावे याकरता तो त्यांना अधिक खर्चिक जीवनपद्धती राखण्याचे (किंवा त्यासाठी कर्ज काढण्याचे) उत्तेजनही देईल. या शिवाय तो त्यांचा मालक म्हणून त्यांच्याशी करीत असलेली वागणूक मंडळीतील व्यवहारातही राबवण्याची शक्यता आहे.

१५. ऐश्‍वर्याचे घातक परिणाम आरंभीच्या ख्रिश्‍चनांपैकी काहींना कसे जाणवले असावेत? (स्तोत्रसंहिता ७३:३–८, १२, २७, २८)

१५ पहिल्या शतकातील धनवान ख्रिश्‍चनांपैकी काही “द्रव्याचा मोह” याला बळी पडले असे दिसते. याकोबाने, त्याविषयी लिहिले “अहो, धनवानांनो, जे क्लेश तुम्हाला होणार.” या लोकांपाशी मूल्यवान वस्त्रे होती, नोकरांना कमी पगार देऊन स्वतःपाशी सोने व चांदी गोळा केली होती, आणि चैनीचे जीवन जगून स्वतःला लठ्ठ बनविले होते. (याकोब ५:१–५) आजही हेच दिसते. संपत्ती ही ती असणाऱ्‍या माणसाला कदाचित त्याला नित्य लांबलांबचा प्रवास करण्यास उद्युक्‍त करील की स्थानिक मंडळीचा संपर्क राहू शकणार नाही. याचा अर्थ, चांगली वस्त्रप्रावरणे, दागिने, अन्‍न व प्रवास या गोष्टी घातक आहेत असे आम्हाला म्हणावयाचे असा नाही. तथापि, ज्या “धनवानां”विषयी याकोबाने लिहिले त्यांनी हितकारी दृष्टीकोण ग्रहण केला नाही, पण देवासमोर आपली भूमिका व आध्यात्मिकता अगदी खालच्या पातळीवर राखल्यामुळे त्यांना “रडून आकांत करण्याची” पाळी येणार होती.

१६. येशूने धनाविषयी एवढी स्पष्ट सूचना का दिली आणि तुम्ही स्वतःला काय विचारावे?

१६ धनवान आध्यात्मिकतेच्या बाबतीत ज्या यातना व अडखळणे अनुभवतात त्याबद्दल येशूला खात्रीने माहिती होती. शिवाय मोलवान गोष्टी गंजू शकतात वा कवडीमोल बनू शकतात हे सुद्धा त्याला माहीत होते. हे असे काही ख्रिस्ती ऐश्‍वर्यास कधीही घडत नाही. (नीतीसूत्रे ११:२८; मार्क १०:२९, ३०) याकरताच येशू हा इशारा देताना की, “ज्यांच्याजवळ धन आहे त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती बरे कठीण आहे,” आम्हाला खरी मदतगार सेवा देत होता. (लूक १८:२४) आम्हापाशी थोडी अर्थप्राप्ती असली तर त्याचा हा इशारा आम्हाला लाभदायक ठरू शकतो. तो कसा? आम्हीही धनवान का होऊ नये ही जागलेली इच्छा धुडकावून लावण्यात. येशूने सत्य सांगितले होते असा ख्रिश्‍चनांचा विश्‍वास आहे. येशूने आपल्या पित्याविषयी, या व्यवस्थीकरणाच्या समाप्तीविषयी आणि प्रीती जोपासण्याविषयी जे म्हटले त्यावर आमचा विश्‍वास आहे व त्याद्वारेच आम्ही आपले जीवन व्यतित करतो. या सत्य–प्रवक्त्याने असेही म्हटले: “देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे ह्‍यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” (मत्तय १९:२४) यावर तुमचा खराच विश्‍वास आहे का? तुमची कृति, जीवनमान आणि प्रवृत्ती याविषयीचा प्रत्यय देते का?

धनवान रहा—देवाच्या दृष्टीने

१७. यहोवाकडून समृद्ध होण्यासाठी कित्येक ख्रिस्ती काय करीत आहेत?

१७ आज जगभरात सर्वत्र देवाच्या सेवकांपैकी बहुतेक जण मत्तय १९:१६–२४ मध्ये आढळणाऱ्‍या सूचनेचा अवलंब करीत आहेत. पुष्कळ ख्रिस्ती तरूणांनी हा निर्धार राखला आहे की त्यांचे पुरेसे प्रापंचिक शिक्षण संपल्यावर ते पूर्ण वेळेच्या उपाध्यपणाचे ध्येय जोपासणार. आपल्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्‍न वाढविण्यासाठी प्रापंचिक व्यवसाय करू शकणाऱ्‍या गृहिणी आपला अधिक वेळ ख्रिस्ती कार्यासाठी देऊन स्वतःला व इतरांना आध्यात्मिकरित्या समृद्ध करीत आहेत. शिवाय आपल्या कुटुंबाची शारिरीक गरज पूर्ण करण्याची शास्त्रवचनीय जबाबदारी असणाऱ्‍या काही पुरुषांनी आपणाला उपाध्यपणात अधिक सहभाग कसा मिळू शकेल त्याचे मार्ग शोधून काढले आहेत.

१८, १९. यहोवाच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी झटणाऱ्‍यांनी कोणती पावले उचलली?

१८ तिशीच्या अर्ध्यात असणारे एक वडील कबूल करतात की, “पूर्ण वेळेचा उपाध्याय राहिल्यामुळे माझ्या तोंडातून शब्दप्रवाह सतत येत राही.” त्यांना वर्षाला २५,००० डॉलर्स इतकी अर्थप्राप्ती होती, शिवाय कंपनीमार्फत वेगळा खर्च मिळत असे आणि वापरावयाला कंपनीची कारसुद्धा होती. त्यांना १९८३च्या अधिवेशनात “योग्य ध्येये राखणे व मिळविणे” हे भाषण देण्याची नेमणूक मिळाली. ते म्हणतात: “मी मोठ्या उत्सुकतेने भाषणाची रूपरेषा वाचली. त्यामुळे मला फारच झोंबल्यासारखे व खजील झाल्यासारखे वाटले. मला माझा विवेक सतावू लागला.” अधिवेशन येण्याआधी त्यांनी आपल्या बायकोसोबत एकंदर परिस्थतीविषयी बोलणी केली. लवकरच त्यांनी अर्धवेळची नोकरी मिळविली व बायकोसोबत पायनियरींग सुरु केली. ते अद्याप पायनियर आहेत व पुष्कळ आध्यात्मिक आशीर्वादांचा आनंद घेत आहेत.

१९ आर्थिक सुरक्षितता आहे अशा ठिकाणाहून काहींनी स्वतःला अशा ठिकाणी स्थलांतरीत केले जेथे त्यांना आध्यात्मिक हालचाली वाढविता येतील. लॅटिन अमेरिकेतील स्वतःच्या पायनियरींग कार्याविषयी एका कॅनडीयन जोडप्याने लिहिले: “येथील बांधव गरीब असले तरी त्यांना सत्याविषयीचा खूपच आवेश आहे. ते ऐहिकरित्या गरीब वाटत असतील पण आध्यात्मिकरित्या करोडपती आहेत. आम्ही ३८ प्रचारक आहोत, त्यापैंकी १० नियमित पायनियर आहेत. आता दोन वेगवेगळया सभा चालवाव्या असे वाटते कारण सभेला खूप लोक येत आहेत—११० ते १४० इतकी सरासरी उपस्थिती असते. दोन वडील व तीन उपाध्य सेवकांना या सर्व सभांची काळजी घ्यावी लागते. यहोवा देवाला आपल्या जीवनात प्रधान स्थानी ठेवणे याचा काय अर्थ आहे ते आम्हाला आमच्या गरीब बांधवाकडून शिकायला मिळते. आपली परिस्थिती कशीही असली तरी यहोवाची सेवा आपण पूर्ण जिवाने करू शकतो हेच ते आम्हाला सांगतात.”

२०. जडवादी दृष्ट्या धनवान होण्याविषयी आम्हाला अंतःकरणात कसे वाटावे?

२० अशा ख्रिश्‍चनांना, मंडळीच्या आतील वा बाहेरील धनवान लोकांविषयीची इर्ष्या करण्याचे कोणतेही कारण नाही. तसेच जडवादी आशा आकांक्षांच्या विचारात गर्क होण्याचेही कारण नाही. सर्वसाधारण जीवन हालचालीकरता थोडासा पैसा हा लागतोच याची त्यांना जाणीव आहे. (उपदेशक ५:३; ७:१२) परंतु, धनवानांना आध्यात्मिक अडखळणे, आव्हाने व धोके आहेत हे जे सत्य येशूने वदविले त्याचीही त्यांच्यामध्ये जाण आहे. “प्रस्तुत युगातल्या धनवानांना” जे कठीण आव्हान आहे ते हे की त्यांनी “अभिमानी होऊ नये. चंचल धनावर आशा ठेवू नये तर . . . देवावर ठेवावी.”—१ तिमथ्यी ६:१७.

२१. जे आध्यात्मिक समृद्धिचा पाठलाग करतात अशांना काय मिळणार?

२१ या आव्हानाची पूर्तता करण्यामध्ये येशूसोबत बोलणारा तो तरूण अधिकारी मागे पडला. याच्या सारख्या काहींनी देवाची काही वेळ सेवा केली पण नंतर आपल्याकडील संपत्तीमुळे त्यांना वेदना मिळाल्या व ते आध्यात्मिक बाबतीत अपयशी ठरले. पण, उलटपक्षी आज लाखो निष्ठावंत ख्रिस्ती याची ग्वाही देतात की, “यहोवाचा आशीर्वाद समृद्धि देतो, तिच्यासोबत तो आणखी कष्ट देत नाही.” (नीतीसूत्रे १०:२२) त्यांचे जीवन अर्थभरीत आहे, त्यांना महत्वपूर्ण ध्येये आहेत आणि काहीतरी तडीस नेल्याचे समाधान मिळते. त्यांची सत्कर्मे सदासर्वदा राहतील व सोबत त्यांना सध्या व भवितव्यात अत्यंत आनंद देत राहतील. अशा पद्धतीने आपण धनवान होण्याचा प्रयत्न राखू या.—फिलिप्पैकर ४:१; १ थेस्सलनीकाकर २:१९, २०. (w86 6/15)

विचार करण्याजोगे मुद्दे

◻ नीतीसूत्रे १०:२२ मध्ये नमुदित असणारी समृद्धि वा श्रीमंती कोणत्या अर्थी आहे?

◻ धनवान व उंट याविषयी येशूने जे विवेचन मांडले त्यामागील मुद्दा कोणता होता?

◻ धनवानांसाठी जीवन इतके कठीण का असते?

◻ आम्ही देवाच्या मार्गाने समृद्ध राहण्याचा कसा प्रयत्न करू शकतो?

[१२ पानावरील चौकट]

संपत्ती आणि कुटुंब

संपत्तीच्या संभाव्य परिणामांचा विचार करताना, तुमच्या कुटुंबाचा विसर पडू देऊ नका. या घटनांचा विचार करा:

अति श्रीमंत माणसाच्या मुलांविषयक अभ्यास करणाऱ्‍या एका मनोविकारतज्ञांचा कॅनडामधील अहवाल म्हणतो: “त्यांना जीवन कंटाळवाणे वाटते. स्वतःला संतुष्ट करण्याशिवाय इतर कोणतीही ध्येये त्यांना नसतात आणि छोटीशी उद्विग्नताही त्यांना सहन होत नाही. त्यांना भावना अल्प स्वरूपात जाणवतात. जिनसा विकत घेणे प्रवास करणे व मौजमजेची काही नवी गोष्ट आढळते का ते पाहणे एवढेच त्यांचे प्रमुख ध्येय असते.”

न्यूयॉर्क टाइम्सने एका भूतपूर्व लक्षाधीशाच्या बाबतीत हे वृत्त कळविले: ‘आपल्या व्यवसायात ते यशस्वी झाले व अधिक संपत्ती मिळवू लागले तेव्हा त्यांना आपल्या कुटुंबात बदल झाल्याचा दिसला असे त्यांनी म्हटले. “माझी बायको व मुलगी लोकांना त्यांच्यापाशी असणाऱ्‍या संपत्तीच्या आधारे त्यांचे मोजमाप करू लागल्या. एका मुलीला मी ३,००,००० डॉलर्सचे घर दिले तर दुसरीला ३,००,००० डॉलर्स रोख द्यावे लागत.” हृदय विकाराचा झटका सहन केल्यावर आणि “संपत्तीने आपल्या बायको मुलींवर जो परिणाम केला तो पाहून” या गृहस्थांनी आपल्या जीवनाक्रमणाचा मार्ग बदलला.

मध्यपूर्वेतील एका तेल समृद्धिच्या देशाबाबत अर्नोल्ड हॉटींगर यांनी हे परिक्षिले: “संपत्ती हीच रोगाचे निदान आहे असे येथे मोठी अर्थप्राप्ती करण्याच्या उद्देशाने येणाऱ्‍या कित्येक विदेशी तज्ञांना परिचयाचे झाले आहे. येथे दिसणारी मन व शरीर यांची रोगविकृति इतरत्र दिसत नाही असे ते कळवतात. इथला रोग असा आहे की ज्यामुळे त्रास हा उद्‌भवतो पण तो कोणा शारीरिक अवयवाच्या दुखण्यामुळे आला आहे असे दिसत नाही. ते म्हणतात की या आजारामुळे तरूण लोक स्वतःला प्रौढ असल्यासारखे मिरवितात तर म्हातारे अगदीच बालिश वृत्ती प्रदर्शित करताना बघायला मिळते.”

[१५ पानावरील चौकट]

शुभवर्तमाने—सत्य की कल्पित कथा?

स्वतःला उच्च टिकाकार म्हणविणाऱ्‍या लोकांनी येशूचा जीवनी वृत्तांत असलेल्या शुभवर्तमान अहवालावर कित्येक काळाआधी विविध अंगाने टीका केली होती: त्यांचा असा दावा आहे की यातील अहवाल विरोधी मतांनी पुरेपूर भरला आहे. आणि योग्य इतिहास असा गणला जाण्याच्या बऱ्‍याच काळानंतर त्याचे लिखाण झाले आहे. यातील अद्‌र्भित घटना निव्वळ बनावट गोष्टी असल्याचे ते म्हणतात.

इतिहासकार वील डुरांट आपल्या सिझर ॲण्ड ख्राइस्ट या पुस्तकात शुभवर्तमानातील अहवालांचे परिक्षण एका वस्तुनिष्ठ ध्येयाने–ऐतिहासिक अहवाल या अर्थी करतात. शुभवर्तमानात वरवर दिसणाऱ्‍या तफावती व समस्या आहेत हे मान्य करीत असले तरी ते म्हणतात: ‘या तफावती अगदी गौण स्वरूपाच्या आहेत; वस्तुतः शुभवर्तमान अहवाल एकमेकांशी अप्रतिमरित्या जुळतात व ते ख्रिस्ताचे सुसंगत चित्र सादर करतात.”

पण त्या उच्च टिकाकारांचा जो आक्षेप आहे की शुभवर्तमान खऱ्‍या इतिहासाच्या कसोटीला उतरत नाही त्याविषयी काय? डुरांट म्हणतात: “आपल्या संशोधनाच्या अति उत्साहामुळे उच्च टिकाकारांनी नव्या कराराच्या खरेपणाबद्दल इतका कडक नियम लावून पहिला की त्याच्यामुळे इतर शेकडो प्राचीन गोष्टी, जसे की, हम्मुराबी, दावीद, सॉक्रेटीस इ.—दंतकथा यात विरजून जातील. शुभवर्तमानाविषयीची अहंमन्यता व वेदांतीय पूर्वकल्पना काही असली तरी त्यात अशा काही घटना आहेत ज्या संशोधकाला लपवता आल्या असत्या जसे की, देवाच्या राज्यात श्रेष्ठ स्थानप्राप्तीबाबत प्रेषितांमध्ये लागलेली स्पर्धा, येशूच्या अटकेनंतर त्यांचे पलायन, पेत्राचे नाकारणे. या अहवालाचे वाचन करणाऱ्‍या कोणालाही त्याच्या खरेपणाबद्दल संशय वाटणार नाही.”

इतिहासकार डुरांट समारोपाला लिहितात: ‘काही साध्या माणसांनी एकाच पिढीत एवढ्या प्रबळ, समर्थकारी व्यक्‍तिमत्वाचे तसेच, मानवी बंधुत्वाचे इतके भव्य व प्रेरित दर्शन घडवले हा चमत्कारच म्हणावा लागेल. उच्च टिकेच्या दोन दशकानंतर सुद्धा ख्रिस्ताचे जीवन, व्यक्‍तिमत्व आणि शिक्षण पूर्वी होते तसेच स्पष्ट दिसते. ते पाश्‍चिमात्य माणसाच्या इतिहासात एक भव्य छाप पाडते.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा