देवाच्या प्रीतीपासून तुम्हाला काहीही विभक्त करू शकेल का?
“माझी खातरी आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपति, वर्तमान काळच्या गोष्टी, बले, उंची खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तु, ख्रिस्त येशू आपला प्रभु ह्याच्या मध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्या पासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ होणार नाही.”—रोमकरांस पत्र ८:३८, ३९.
१. देवाची प्रीती ही दर दिवशी कोणकोणत्या मार्गाने प्रदर्शित होते?
देव प्रीती आहे. या गोष्टीची प्रचिती आम्हाला दर दिवशी आमचे जीवन टिकवून ठेवणाऱ्या विविध मार्गाकरवी मिळते. आम्ही श्वासोच्छ्वास करीत असलेली हवा, पिण्यास मिळणारे पाणी, खाण्याजोगा आहार या सर्व गोष्टी देवाच्या प्रीतीचा प्रत्यय देणाऱ्या रूपात आम्हास मिळतात. या गोष्टी चांगल्या–वाईटांना, त्याविषयीचे मूल्य जाणले जावो वा न जावो तरीही दिल्या जातात. येशूने आपल्या स्वर्गिय पित्याविषयी भाष्य करताना याची साक्ष देऊन म्हटले: “तो वाईटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो.” (मत्तय ५:४५) आपल्या जीवनाच्या पोषणासाठी पृथ्वीवरील प्रत्येक जीवंत व्यक्तिने देवाचे आभार मानले पाहिजेत.—स्तोत्रसंहिता १४५:१५, १६.
२. यहोवाने मानवजातीविषयी आपले थोर प्रेम कसे व्यक्त केले आणि यहोवाला जे हवे होते त्याविषयी येशूने कशी रसिकता दाखवली?
२ मानवी निर्मितीच्या बाबतीत देवाची प्रीती, फुलाप्रमाणे कोमेजणाऱ्या व गवताप्रमाणे सुकून जाणाऱ्या सद्य जीवनाचे पोषण करण्याच्याही पलीकडे गेली आहे. (१ पेत्र १:२४) त्याने मानवजातीला सदासर्वकाळ जिवंत राहण्याची तरतूद करून ठेवली आहे: “देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. यासाठी की जो कोणी त्याजवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) या तरतुदीची व्यवस्था करण्यामध्ये देवाला व त्याच्या पुत्राला खूप मोठी किंमत द्यावी लागली. गेथशेमाने बागेत आपल्या मृत्यु पुर्वीच्या रात्री येशूने जमिनीवर पडून इतक्या कष्टाने प्रार्थना केली की, “रक्ताचे मोठमोठे थेंब पडावे असा त्याचा घाम पडत होता.” या त्रस्त स्थितीतही येशूला आपल्या पित्याच्या नामावर जी निंदा लादण्यात आली ती चांगली आठवणीत होती व शिवाय त्याने तो प्याला आपणापासून दूर करण्याचेही म्हटले. तरी तो म्हणाला: “माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (लूक २२:४४; मार्क १४:३६) येशू अत्यंत त्रस्त स्थितीत होता तरी यहोवा जे अपेक्षित होता तेच सर्वप्रथम आले. छळ आणि वधस्तंभावर खिळले जाऊन त्यापासून सावकाशरित्या त्याला आलेले मरण त्याला देवाच्या प्रीतीपासून विभक्त करू शकले नाही.
३. प्रेषित पौलाचे कोणते शब्द यहोवाचे साक्षीदार स्वतःच्या बाबतीत असल्याचे समजतात व त्यामुळे त्यांच्यावर कोणता परिणाम ओढावला गेला?
३ आज येशूच्या पावलास अनुसरणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांच्या बाबतीत यहोवाची जी इच्छा आहे तीच सर्वप्रथम येते. “देव आपल्याला अनुकूल असल्यास” असे ते प्रेषित पौलाच्या सुरात म्हणतात, “आपल्याला प्रतिकूल कोण? ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला विभक्त करील? क्लेश, आपत्ति, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही विभक्त करतील काय? उलटपक्षी, ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो.” (रोमकर ८:३१, ३५, ३७) या शतकात यहोवाच्या साक्षीदारांना लुटणे, मारहाण, अंगाची कातडी सोलली जाणे, शारीरिक इजा, बलात्कार, उपासमार, गोळ्या घालून ठार करणे आणि नाझी छावण्यात शिरच्छेद होणे या सर्व गोष्टी अनुभवाव्या लागल्या. या सर्व गोष्टी, त्यांनी देवाच्या प्रीतीपासून स्वतःला विभक्त होऊ देण्याचे नाकारले या कारणामुळे त्यांच्यावर आल्या.
४. देवाच्या प्रीतीपासून स्वतःला विभक्त करण्यापासून नकार देणाऱ्या तरूण मुलाच्या सचोटीबद्दल तुम्हाला कसे वाटते?
४ चव्वेचाळीस वर्षे आधी यहोवाच्या साक्षीदारांपैकी एका तरूण मुलाने आपल्या पालकांना नाझींच्या राजकीय बंद्यांच्या छावणीतून एक पत्र पाठवले. त्यातील काही भाग असा आहे:
४“आता दिवसाचे नऊ वाजत आहे व माझ्या चौकशीला आरंभ होत आहे. पण मला ११:३० पर्यंत थांबले पाहिजे. मी हे लिखाण राज्याच्या लष्करी न्यायालयाच्या एकाकी कोठडीतून करीत आहे. मला अशी शांती आहे जी खरोखरीच अविश्वसनीय वाटते. पण मी सर्व काही प्रभुवर सोपवून दिले आहे. त्यामुळेच मी या घटकेसाठी व नित्याच्या बंदिवासातील बेड्यात शांतपणे आहे. तुम्हाला यांनी म्हटले होते की मला बेड्या घालणार नाहीत. पण हे सारं खोटं आहे! मी रात्रंदिवस बेड्यातच आहे. केवळ कपडे घालणे, काढणे आणि कोठडी स्वच्छ करण्यापुरत्या बेड्या काढल्या जातात. . . .
“१२:३५. आता सर्व पूर्ण झाले आहे. मी माझा आक्षेप [त्यांनी, मी यहोवा देवाची भक्ती करण्याचे सोडून द्यावे या केलेल्या मागणीस घेतलेला आक्षेप] राखला म्हणून मजवर मृत्युदंडाची शिक्षा घोषित करण्यात आली आहे. मी ते ऐकले, आणि मी ‘तू आपल्या मरणापावेतो विश्वासू रहा’ हे आणि आणखी इतर प्रभूचे शब्द उच्चारले व सारे काही संपले. पण त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. मला आता अशी शांती, ती स्थैर्यता आहे ज्याची कदाचित तुम्हाला कल्पना येणार नाही. . . . ही शांती, हा माझा आनंद मला न्यायालयाच्या दालनातच लाभला; तो जगाला केव्हाही कळू शकणार नाही आणि मी आता परत माझ्या कोठडीत जात आहे तरी तो त्यांना मजमधून काढून घेता येणार नाही. . . . रडू नका. . . . हेच अति उत्तम मी आज तुम्हाला व आमच्या सर्व प्रिय बांधवांना देऊ शकतो. ज्या दिवशी माझी हत्या (शिरच्छेद) होणार आहे त्याच्या आदल्या दिवशीचा हा रविवार आहे.”a
“तो . . . स्वतः तुम्हास पूर्ण, दृढ व सबळ करील”
५, ६. देवाच्या प्रीतीस निष्ठावंतपणे धरून राहिल्यामुळे ज्यांना अत्यंत कटु परिक्षाप्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे अशांना पौल व पेत्राचे कोणते हमीकारक शब्द सांत्वनदायक वाटतात?
५ त्या तरूण मुलाला जीवनापासून वेगळे करण्यात आले, पण देवाच्या प्रीतीपासून नव्हे. अशाच प्रकारच्या निर्दयी वृत्तीचे प्रदर्शन या शतकात यहोवाच्या साक्षीदारांवर घडले गेले. अशा स्वरूपाचा छळ सहन करणे व मृत्युला सुद्धा सामोरे जाणे हे देवाच्या सेवकांना स्वतःच्या बळावर जमले नाही तर देवाच्या शक्ती करवी करता आले. “देव विश्वसनीय आहे” अशी प्रेषित पौल हमी पुरवितो, “तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायहि करील, ह्यासाठी की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.” (१ करिंथकर १०:१३) परिक्षेत असताना यहोवाचे विश्वासू साक्षीदार, तुरूंगवास घडला तेव्हा पौलाने जसे म्हटले त्या प्रमाणेच म्हणू शकले की, “प्रभु माझ्याजवळ उभा राहिला. . . . त्याने मला शक्ती दिली.”—२ तिमथ्यी ४:१७.
६ गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे ते शोधीत राहणाऱ्या सैतानाबद्दल सावधान राहण्याचा इशारा दिल्यावर प्रेषित पेत्र ही हमी देतो: “आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले तो सर्व कृपेचा देव, तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर, स्वतः तुम्हास पूर्ण दृढ व सबळ करील.” (१ पेत्र ५:८–१०) या सर्व इश्वरी पाठबळाचा विचार केल्यावर एक गोष्ट अगदी उघडपणे दिसते: देवाची प्रीती अपयशी ठरू शकत नाही; तिच्यापासून दूर होण्याचे काही कारण घडलेच तर ते आमच्या चुकीमुळे असेल, त्याच्या नाही.
७. सैतानाने येशूच्याबाबतीत कोणती युक्ती वापरली, पण येशूने त्याला कसे पराजित केले?
७ सैतान नेहमीच गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे हल्ला करीत नाही. कित्येकदा तो ‘चतुर सापा’ प्रमाणे तर कधी तर “तेजस्वी देवदूता” प्रमाणे सामोरा येतो. तो आमच्या बाबतीत दुष्ट कल्पना योजून असतो त्यामुळे त्याची आमच्यावर पकड बसू नये याकरता आम्ही नेहमी दक्ष असले पाहिजे. “दियाबलाच्या कुयुक्त्यांचा सामना करण्यास उभे राहता यावे” म्हणून आपण संपूर्ण शस्त्रसामग्री धारण केली पाहिजे. (उत्पत्ती ३:१; द जेरूसलेम बायबल; २ करिंथकर २:११; ११:१३–१५; इफिसकर ६:११, रेफरन्स बायबल, तळटीप) येशूच्या उपाध्यपणाच्या वेळी सैतान शास्त्रवचने अवतरीत आला, येशूला चुकीचे कृत्य आचरण्यास मोहित करावे म्हणून त्याने त्या शास्त्रवचनांचा चुकीच्या अर्थाने वापर केला. तीनदा त्याने येशूला मोहीत करण्याचा प्रयत्न केला पण त्यात तो अपयशी झाला. सैतानाने शास्त्रवचनाच्या केलेल्या चुकीच्या अवलंबनास येशूने त्याच्या योग्य अवलंबनाने उलथवून लावले. त्यानंतर येशूने सैतानाला निघून जाण्यास सांगितले. पण सैतान “दुसऱ्या योग्य वेळी कधी संधी मिळेल ते पाहण्यासाठी त्याला सोडून निघून गेला.”—लूक ४:१३; मत्तय ४:३–११.
८, ९. कोणत्या फसव्या मार्गाद्वारे येशूवर हल्ला करण्यासाठी सैतान परतला आणि पौलाने आमच्या रक्षणार्थ आम्ही काय करावे म्हणून मार्गदर्शन दिले?
८ सैतान चिकाटीचा प्रयत्न करतो. तो वेगवेगळ्या वेषात परततो. तो त्या काळी धर्मपुढाऱ्यांच्या माध्यमाने येशूकडे परतला. येशूने ते लागलेच ओळखले त्यामुळे तो त्यांना उघडपणे बोलला: “तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहे.” काही लोक अजाणपणे सैतानाचा उद्देश साध्य करवितात. प्रेषित पेत्राने, तो योग्य मनोदयाने निषेधाद्वारे येशूला बोलला की, “प्रभुजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही” तेव्हा त्याने हेच केले. यावेळी येशूने पेत्राला अगदी जोरदारपणे “अरे सैताना, मजपुढून निघून जा, तू मला अडखळण आहे” अशी दटावणी दिली. (योहान ८:४४; मत्तय १६:२२, २३) याचप्रमाणे सैतानाचा उद्देश एखादा मालक, कर्मचारी, शाळकरी विद्यार्थी, मित्र, नातेवाईक, पालक किंवा वैवाहिक सोबती याकरवी देखील सहजगत्या राबविला जाऊ शकतो. यास्तव आम्ही सतत दक्ष राहिले पाहिजे आणि यहोवाबरोबरील नातेसंबंधात कशालाही विघ्न आणू देता कामा नये.
९ याकारणास्तव, “सैतानाच्या डावपेचापुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण कर”ण्याची गरज आहे. “कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे तर . . . आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.”—इफिसकर ६:११, १२.
पतित देहावरील पापाची पकड
१०. “पाप” या शब्दाचा काय अर्थ होतो आणि कोणते आचार आपल्याला देवाच्या प्रेमापासून विभक्त करतात?
१० आम्ही जेथे अशक्त आहोत तेथेच सैतान मारा करतो. तो आमच्या शारीरिक भावनांना पाप करण्यास उद्युक्त करतो. हे त्याचे आवडते निशाण आहे. (स्तोत्रसंहिता ५१:५) ज्याचे पाप असे भाषांतर करण्यात आले आहे तो ग्रीक शब्द हा.मा.र्टि’आ असा आहे. हा.मार.टा’नो या क्रियापदाचा मुलभूत अर्थ होतो, “लक्ष्य चुकणे.” (रोमकर ३:९, रेफरन्स बायबल तळटीप) जितके अधिक आम्ही लक्ष्य चुकवितो आणि देवाच्या आज्ञा पाळण्यात अपयश दाखवितो तितक्या अधिकपणे आम्ही देवाच्या प्रीतीपासून दूर जात असतो, कारण “देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय.” (१ योहान ५:३) जारकर्म, व्यभिचार, कामातुरपणा, रंगेलपणा, मस्तीच्या मेजवान्या, शारीरिक वासनांची मुक्त लयलूट, हेवा, मत्सर, जडवादी गोष्टींचा लोभ—या सर्व गोष्टी आपणाला देवाच्या प्रेमापासून विभक्त करतात, आणि “अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.”—गलतीकर ५:१९–२१.
११. पाप हळुवारपणे आमचा ताबा कसा घेते व त्यामुळे कोणता परिणाम उद्भवतो?
११ जडवादी, मी–पणा, लैंगिक वृत्ती यांनी भारावलेले चित्रपट, पुस्तके, नाटके आणि दुरदर्शन कार्यक्रम अनियंत्रित व निषिद्ध सुखविलासास वाढीस लावतात. पहिले पाप दुसऱ्या पापास सोपे करते, मग त्याच्या मागोमाग तिसरे, चवथे येते आणि मग लवकरच जगाच्या गोष्टींचे वेडेपणाचे मार्गाक्रमण मोठ्या वेगाने सुरु होते. त्यामुळे “देवावर प्रीती न करता सुखविलासाची आवड धरणारे” “देहवासना तृप्त करण्यासाठी योजना आखण्यात” निमग्न होतात. (२ तिमथ्यी ३:४; रोमकर १३:१४) याप्रकारे तरूण व वृद्ध, दोघेहि पापाच्या जबड्यात शिरतात आणि त्यांचा विवेक संवेदनाहीन बनतो. “ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणास वाहून घेतले.”—इफिसकर ४:१९; १ तिमथ्यी ४:२.
१२. पापाचे आम्हावर वर्चस्व आहे हे कोणकोणती शास्त्रवचने दाखवितात आणि याबद्दल पौलाने कसा शोक व्यक्त केला?
१२ देवाच्या प्रेमापासून विभक्त न होण्याचा ज्यांचा ठाम निश्चय आहे अशांनी पतित देहावरील पापाच्या पकडीविरूद्ध स्वतःला सिद्ध केले पाहिजे. पवित्र शास्त्र वारंवार सांगते त्याप्रमाणे पाप आमचा भयानक शत्रू आहे. ते म्हणते: “जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे,” “सर्व पापवश आहेत,” “सर्वांनी पाप केले आहे,” “पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये,” “ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहा,” “पापाचे वेतन मरण आहे,” आणि “सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले आहे.” (योहान ८:३४; रोमकर ३:९, २३; ६:१२, १६, २३; गलतीकर ३:२२) पौल “पापाला विकलेला” “पापाच्या नियमांच्या स्वाधीन” होता, त्यामुळे त्याने विलाप केला: “जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो.” (रोमकर ७:१४, १९, २३) याकारणास्तव त्याने आक्रोश केला: “किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील?” यानंतर तो आनंदाने उत्तर देतो: “आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे मी देवाचे आभार मानतो.”—रोमकर ७:२४, २५.
१३, १४. (अ) कशाद्वारे आपल्याला पापापासून मुक्ति मिळते? (ब) आम्हाला ख्रिस्ताच्या प्रेमात कसे टिकून राहता येईल?
१३ ख्रिस्त येशू येईपर्यंत “पापाने मरणाच्या योगे राज्य केले.” (रोमकर ५:१४, १७, २१) पण येशूच्या मृत्यु व पुनरूत्थानानंतर, जे देवाने आपल्या पुत्राकरवी देऊ केलेल्या प्रेमळ देणगीस रसिकता दाखवितात त्यांच्या बाबतीत पाप हे पदच्युत झाले. त्याने आमच्या पापापासून आमचे रक्षण केले, ती धुऊन टाकली, त्यापासून आम्हास शुद्ध केले, त्यापासून आम्हास सोडविले व ती पूर्णपणे नाहीशी केली. (मत्तय १:२१; प्रे. कृत्ये ३:१९; २२:१६; २ पेत्र १:९; १ योहान १:७; प्रकटीकरण १:५) अशाप्रकारे केवळ प्रेषित पौलच नव्हे तर ख्रिस्त येशूने सांडलेल्या रक्तावर जे विश्वास ठेवतात त्या सर्वांनी, पाप व मृत्यु याच्या शोचनीय दैहिक बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग उघडा करून दिला म्हणून येशू ख्रिस्त आमचा प्रभु याच्या द्वारे देवाचे उपकार मानण्यास हवे.
१४ तद्वत आम्ही आपणाला देवाच्या प्रीतीपासून विभक्त होऊ देता कामा नये इतकेच नसून स्वतःला ख्रिस्ताच्या प्रीतीतही राखण्याची तिकीच आवश्यकता आहे. देवासमीप राहण्यात ज्या गोष्टी समाविष्ट आहेत त्याच येशूसमीप राहण्यातही आहेत. येशूने ही गोष्ट असे म्हणण्याद्वारे स्पष्ट केली: “जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे; तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.”—योहान १५:९, १०.
वाहवत जाण्याचा धोका
१५. आम्ही कशास भेदनीय आहोत आणि हा धोका टाळण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?
१५ पाप व मरणाच्या बंधनापासून मिळालेली मुक्तता मागे पडण्याद्वारे किंवा वाहवत जाण्याद्वारे गमावू नका. हे एवढ्या सावकाशरित्या घडते की ते आमच्या लक्षात सुद्धा येत नाही. गलतीकर ६:१ म्हणते तसे: ‘बंधुजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात नकळत सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहा ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. तूही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष ठेव.” एखाद्याने दुसऱ्याला सूचना केली तरी प्रत्यक्षात सूचनाकर्त्यानेही “स्वतःकडे लक्ष ठेव”ले पाहिजे. आम्ही स्वतःच सर्व भेदनीय आहोत! “ह्या कारणास्तव, ऐकलेल्या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाऊ.”—इब्रीयांस २:१.
१६, १७. आध्यात्मिक दृष्टया वाहवत जाण्याचा धोका आहे हे कसे चित्रित होते व तो टाळण्याकरता आम्ही काय करावे?
१६ वाहवत जाण्यास कसलेही कष्ट लागत नाहीत. त्यामुळे ते खूपच सोपे—पण आध्यात्मिक दृष्ट्या मोठे घातक आहे. तुम्हाला जाणीव होण्याआधीच तुम्ही देवाच्या प्रीतीपासून विभक्त झालेले असल्याचे दिसून येईल. हे चुकलेल्या मेंढरासमान आहे. ते कसे चुकते बरे? एक मेंढपाळ याची स्पष्टता देतो: ‘त्याचे कुरतडणेच हरवते. ते एका बाजूला काही अंतरावर गवताची थोडी हिरवळ बघते व तेथे जाऊन कुरतडणे सुरु करते. पुनः त्याला दहा फूट अंतरावर आणखी थोडीशी हिरवळ दिसते, मग ते तेथे जाऊन कुरतडण्यास आरंभ करते, पुनः काही अंतरावरील हिरवळ लोभिष्ट वाटू लागते व मग मेंढरू तेथे जाऊन चरू लागते; लवकरच ते कळपापासून खूप दूर जाते. त्याचे चरणे प्रत्यक्षात हरपते.’
१७ हीच गोष्ट आध्यात्मिकरित्या वाहवत जाणाऱ्यांच्या बाबतीत घडते. थोड्या फार भौतिक गोष्टी, जागतिक सहवास याची कुतुहलता वा काही विशिष्ट शास्त्रवचनाविषयी स्वतःच काढलेला निष्कर्ष याद्वारे याची साळसुद सुरुवात घडते. पण थोडे थोडे करीत ती व्यक्ती देवाच्या कळपापासून अधिकाधिक दुरावत जाते व मग ती देवाची मंडळी व त्याची प्रीती यांना पारखी होते. अशा या व्यर्क्तिनी पौलाच्या या आग्रहाकडे लक्ष दिलेले नसते की, “तुम्ही विश्वासात आहा किंवा नाही ह्या विषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीती पहा.”—२ करिंथकर १३:५.
१८, १९. आम्हाला दियाबलास कसे पळवून लावता येईल आणि देवाच्या समीप कसे येता येईल?
१८ “सैतानाला अडवा,” असे आम्हाला म्हटले आहे, “म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल.” “देवाचेवचन, आत्म्याची तरवार” याचा कुशलतापूर्वक वापर करून सैतानाच्या सर्व युक्तिबाज हल्ल्यांना आपण परतवू शकतो. याच प्रकारे येशूने अरण्यवासात सैतानाला दूर हाकून लावले. आम्हाला आणखी सांगितले आहे की, “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.” (याकोब ४:७, ८; इफिसकर ६:१७) स्तोत्राच्या लेखकांप्रमाणे देवाच्या वचनास जडून राहून आपण स्वतःला देवाच्या समीप ठेवण्यास हवे. “यहोवाचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळयांस समंजस करतो.” “मी तुझे निर्बंध ध्यानात धरीन. तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश आहे. . . . मी तुझ्या निर्बंधापासून ढळलो नाही.”—स्तोत्रसंहिता १९:७; ११९:९५, १०५, १५७.
१९ प्रार्थना करणे, देवाच्या वचनाचा अभ्यास करणे, आमच्या बंधुजनांवर प्रीती व्यक्त करणे, त्यांच्या बरोबर सभांमध्ये नियमितरित्या सहवास राखणे आणि इतरांना देवाच्या राज्याविषयी सांगणे—या सर्व मार्गाकरवी आम्हाला देवाच्या समीप राहता येईल आणि त्याची जी प्रीती ख्रिस्त येशू आमचा प्रभु याच्या द्वारे व्यक्त करण्यात आली तिच्या मध्ये स्वतःला टिकविता येईल.—१ थेस्सलनीकाकर ५:१७; रोमकर १२:२; इब्रीयांस १०:२४, २५; लूक ९:२.
२०. पौलाने असा कोणता निर्धार घोषित केला जो आज यहोवाचे साक्षीदार स्वतःचा बनवीत आहेत?
२० पौलाने अत्यंत आवेशपूर्ण रितीने आणि उच्च स्वरात, पृथ्वीवरील आजच्या सर्व यहोवाच्या साक्षीदारांचा निर्धार व्यक्त केला: “माझी खातरी आहे की, मरण जीवन, देवदूत, अधिपति, वर्तमानकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तु, ख्रिस्त येशू आपला प्रभु ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती (व्यक्त झाली, जेबी) आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ होणार नाही.”—रोमकर ८:३८, ३९.
[तळटीपा]
a दी वॉचटावर, ऑगस्ट १, १९४५, पृष्ठ २३७, २३८.
तुम्हाला आठवते का?
◻ यहोवाची प्रीती, त्याने जीवनाकरता ज्या तरतुदी केल्या आहेत त्यात कशी दिसून येते?
◻ यहोवाच्या साक्षीदारांना देवाच्या प्रीतीपासून विभक्त करण्यासाठीं सैतानाने कोणत्या पद्धती आजमावून पहिल्या?
◻ पापाची आम्हावर पकड आहे हे कोणकोणती शास्त्रवचने दाखवून देतात आणि ही पकड कशी सोडविता येते?
◻ वाहवत जाणे हे घातक का आहे आणि त्याच्या सोबत कसा सामना देता येईल?
[२५ पानांवरील चित्रं]
मेंढरू सावकाशपणे दूर होत जाते व शेवटी ते आपला मार्ग हरवून बसते