पवित्र शास्त्रीय ठळक मुद्दे एस्तेर १:१–१०:३
वंशनिःपात होण्यापासून लाभलेली ईश्वरी मुक्तता
ती प्रचंड हत्त्या मोठी भयानक असणार: तरुण आणि वृद्ध, लहान मुले आणि स्त्रिया, कोणासंबंधानेही दयामाया न दाखवता सर्वाचा निःपात केला जाईल. या योजनला विरोध करण्याचे कोणाचेहि धाडस होऊ शकणार नाही कारण हत्येच्या फर्मानावर राजाने स्वतः शिक्कामोर्तब केला आहे. होय, हतबल जनावरांप्रमाणे अत्यन्त निघृणपणे यहुद्यांची हत्या होणार!
अगदी असेच हामान या प्राचीन पर्शियाच्या पंतप्रधानाला वाटते. त्यानेच ही प्रचंड हत्या मर्दखय या यहुद्यावरील अत्यंत कटु द्वेषभावामुळे योजली होती. आता हामान स्वयंतुष्टतेने आपल्या विजयाची प्रतिक्षा करीत असता सबंध यहुदी राष्ट्र कळकळीने मुक्ततेकरता प्रार्थना करीत राहते. परिणाम? तो पवित्र शास्त्राचे नाट्यमय पुस्तक एस्तेर यात दाखविला आहे. स्वतः मर्दखयद्वारा लिखित असणाऱ्या या पुस्तकात, एका राष्ट्राचा कशाप्रकारे ईश्वरी सहाय्याने आणि एका तरुण स्त्रीच्या विश्वासाद्वारे बचाव झाला त्याचा विश्वास बळकट करणारा अहवाल सापडतो.
एस्तेर राणी बनते
कृपया एस्तेर १:१–२:२३ वाचा. इ.स.पूर्वी ४८४ मध्ये अहश्वेरोश (हशस्त १) हा पर्शियाचा राजा मोठी मेजवानी देतो. पण वश्ती राणी राजासमोर येण्याचे नाकारते. क्रोधाविष्ठ झालेला राजा तिला राणीपदावरुन काढून टाकतो व त्याऐवजी नव्या राणीचा शोध घेतो. आपल्या साम्राज्यातील अत्यंत सुंदर मुलींचे परिक्षण केल्यावर हदस्सा या सभ्य यहुदी मुलीची तो निवड करतो. या मुलीला या भूमिकेसाठी मर्दखय ह्या तिच्या चुलत्याने तयार केलेले असते. आपण यहुदी आहोत ही ओळख ती युवती लपविते आणि एस्तेर या पारशी नावाने ती वावरु लागते.
◆ १:३–५—या मेजवान्या का करीत?
हेरोडोटस या इतिहासकाराच्या मते हशस्त याने ग्रीसवर लष्करी मोहीम काढावी याकरता एकदा बैठक बोलावली. ही बहुतेक तीच मेजवानी असावी. त्यावेळी बहुधा या हशस्तने आपल्या राज्याचे सारे वैभव व श्रीमंती दाखवून उपस्थित सरदारांना याची खात्री पटवून दिली की आपल्याला ग्रीसवर मोहीम करण्याचे सामर्थ्य आहे.
◆ १:८—पिण्यासंबंधाने कोणता नियम होता?
अशा मेजवानीप्रसंगी अमुक प्रमाणापर्यंत पिण्याची गळ घालण्याची प्रथा पारशी लोकात होती असे दिसते. तरीपण येथे राजाने अपवाद काढून टाकला असावा. याचा परिणाम संयमाने पिण्यात झाला की असंयमाने पिण्यात झाला ते पवित्र शास्त्र सांगत नाही.
◆ २:१९, २०—मर्दखय ‘राजद्वारी’ का बसला होता?
मर्दखय अहश्वेरोश राजाच्या अधिकाऱ्यांपैकी एक होता. असे अधिकारी लोक राजद्वारी किंवा वेशीजवळ बसत आणि कोणता बादशाही हुकूम मिळतो त्याची वाट पाहत असत. मर्दखयाचा हुद्दा मोठ्या जबाबदारीचा असावा. तसे नसते तर हामानाला त्याला लगेच काढून टाकता आले असते. त्याच्या या हुद्दयामुळेच मर्दखयाला राजाचा खून करण्याचा कट कळू शकला व तो त्याला उधळून लावता आला.
आम्हासाठी धडा: राजासम्मुख जाण्याआधी एस्तेरने दागदागिने किंवा भरजरी वस्त्रप्रावरणांची मागणी केली नाही यात तिचा भिडस्तपणाच दिसतो. आपल्या अंतःकरणातील गुप्त मनुष्यपण आणि “सौम्य व शांत आत्मा” याकरवी ती राजाची मर्जी मिळवते. (१ पेत्र ३:१–५) याचप्रमाणे १९१९ पासून एकत्रित झालेल्या शेषांनी अभिषिक्त राजा येशू ख्रिस्ताची मर्जी संपादन केली आहे.
हामानाने रचलेला कट
वाचा ३:१–५:१४. अहश्वेरोश अमालेकी वंशातील हामान या गृहस्थाला पंतप्रधान करतो. पण मर्दखयला “अमालेकाशी पिढयानपिढया युद्ध होईल” या यहोवाच्या निर्णयाचे स्मरण असते त्यासाठी तो हामानाला मुजरा करण्याचे नाकारतो. (निर्गम १७:८–१६) याची प्रतिक्रिया म्हणून गर्विष्ठ हामान यहुद्यांचा निःपात करण्याची राजाला गळ घालतो!
मर्दखय एस्तेरला हस्तक्षेप करण्यास सांगतो, शिवाय तो याचेही तिला स्मरण देतो की ती गप्प राहिली तरी “दुसऱ्या कोठूनहि यहूद्यांची सुटका व उद्धार होईलच.” यहोवाच्या लोकांचे भवितव्य व शिवाय त्याने अमालेक्यांविरुद्ध वदविलेला न्यायदंड या गोष्टी पणाला लागलेल्या असल्यामुळे देव सुटका जरुर देईल हा आत्मविश्वास मर्दखयला वाटतो. (१ शमुवेल १२:२२) तद्वत, एस्तेर मागेपुढे न बघता राजासमोर जाते—या कृतीमुळे तिजवर मृत्युदंडसुद्धा ओढवला असता! तथापि अहश्वेरोश तिची कृति क्षम्य समजतो व तिने योजिलेल्या मेजवानीला जातो. मेजवानीचे जेवण संपवून बाहेर पडताना मर्दखयाने आपणाला मुजरा करण्याचे नाकारले हे पाहून हामान खूप संतापतो व तो मर्दखयला फाशी देण्याची योजना करतो.
◆ ३:७—“पूर” टाकण्यात काय समाविष्ट होते?
“पूर” हा बहुधा पारशी शब्द असावा ज्याचा अर्थ “चिठ्या” असा होतो. ज्योतिषी शकून पाहण्यासाठी चिठ्या टाकीत. हामानाने वंशनिःपात करण्याचा जो बेत आखला होता तो पार पाडण्याची सुयोग्य वेळ ठरविण्यासाठी या चिठ्या टाकल्या गेल्या असाव्यात.
◆ ४:३—मर्दखय व यहुद्यांनी उपोषण का केले?
राष्ट्रीय विनाश सामोरा असल्यामुळे ती वेळ गहन व गंभीर विचार करण्याची होती. (उपदेशक ३:४) त्यांना ईश्वरी मार्गदर्शनाची खूपच गरज होती. यामुळेच उपोषण हे आवश्यक बळ व सुज्ञानप्राप्तीकरता त्यांनी यहोवाकडे वळणे याची सूचकता दर्शविणारे होते. तुम्हापुढे परीक्षाप्रसंग आल्यास तुम्हीसुद्धा देवाकडे प्रार्थनापूर्वकतेने येता का?—इब्रीयांस ५:७.
◆ ५:६–८—एस्तेरने राजास कळविण्यास उशीर का लावला?
एस्तेरपाशी असणारे धैर्य निश्चितच खचले नव्हते कारण तिने आधी प्राण पणाला लावण्याचे धाडस केले होते. तथापि, तिला कदाचित राजाची सदिच्छा मिळविण्याची प्रथम इच्छा झाली असावी. त्यामुळेच तिने त्याला दुसऱ्यांदा मेजवानीला येण्याचे निमंत्रण दिले. यात ईश्वरी हस्तक्षेप समाविष्ठ असावा कारण त्या अवकाशाने काही घडामोडी घडू देण्यास वाव दिला.
आम्हासाठी धडा: मर्दखयच्या सूचनेचा अवलंब करण्यासाठी एस्तेरने विश्वास, धैर्य आणि स्वेच्छा दाखविली. याचप्रमाणे १९१९ पासून अभिषिक्त शेषांचा भाग बनलेल्यांनीही ख्रिस्ताच्या वधूच्या जुन्या सदस्यांबरोबर कार्य करण्यात अप्रतिम विश्वास, धैर्य आणि विश्वास दाखविला आहे. खरोखर, एक उत्तम उदाहरण!
कट हाणून पाडला गेला
वाचा ६:१–७:१०. रात्री अहश्वेरोश राजाची झोप उडते, यात निश्चये ईश्वरी कार्यभाग असावा. आपण काहीतरी करण्यात मागे पडलो आहोत असे वाटून तो अहवालाचे पुस्तक, बहुधा बादशाही रोजनिशी वाचावयाला लावतो. हत्येचा कट उघड केला याबद्दल मर्दखयला कसलाही बहुमान देण्यात आला नाही हे आढळल्यावर राजा हामानाला योग्य बहुमान सुचविण्यास सांगतो. ती बहुमानपात्र व्यक्ति आपणच असे समजून हामान फार भव्य समारंभ करण्याचा प्रस्ताव मांडतो. असा हा सन्मान मर्दखयाचा करायचा आहे व तो त्याने स्वतः करायचा असे त्याला म्हटले जाते तेव्हा हामानाला जणू अंधारीच येते. ही गोष्ट हामानाचे हितचिंतक त्याच्या पतनाचा अपशकून समजतात.
हा अपमानकारक अनुभव येऊन जातो न जातो तोच हामानाला एस्तेरच्या दुसऱ्या मेजवानीचे आमंत्रण येते. तेथे सम्राट एस्तेरला आपली विनंति कळवावयाला सांगतो. “आपल्या मर्जीस आल्यास मला व माझ्या लोकांस प्राणदान द्यावे हाच माझा अर्ज व विनंति आहे” असे राणी धडाडीने कळवते. आपण यहुदी आहोत हे प्रकटवून ती हामानाचा कट उघडा करते. भयाने गांगरुन जाऊन तो प्राणदानाची याचना करतो पण त्याला उलट फाशीच सुनावली जाते. मर्दखयाला फाशी दिली जावी याकरता जो खांब त्याने तयार केलेला असतो त्यावरच त्याला फाशी मिळते!
◆ ७:४—यहुद्यांचा निःपात राजाला का घातक ठरणार होता?
हामानाने यहुद्यांना गुलामगिरीत विकण्याची योजना केली असती तर त्यामुळे अहश्वेरोश राजाला मोठा फायदा झाला असता. पण सबंध लोकांचा निःपात हा खूपच आर्थिक तोटा देणारा, हामानाने जे १०,००० चांदीचे तलांत देऊ केले होते त्यापेक्षा अधिक नुकसानीचा ठरला असता. हा वंशनिःपात झालाच तर मग राजाला आपली स्वतःची राणीही गमवावी लागली असती आणि हे अत्यंत नुकसानीचे होणार होते.
◆ ७:८—हामानाचे तोंड का झाकण्यात आले?
हामानाने लज्जेमुळे वा दुःखामुळे स्वतःचे तोंड झाकले नाही, उलटपक्षी ते न्यायालयाच्या सेवकांनी, लज्जा वा विनाश दर्शवावा या अर्थी झाकिले. मृत्युदंडाची शिक्षा बजावताना हे पहिले पाऊल बहुधा उचलले जात असावे.
आम्हासाठी धडा: एस्तेरने आपले जीवन धोक्यात घालून आपण यहुदी आहोत हे धैर्याने विदित केले. याचप्रमाणे १९३१ पासून देवाच्या लोकांनी छळाची जोखीम पत्करून स्वतःला यहोवाचे साक्षीदार असल्याचे घोषित केले! (यशया ४३:१०–१२) तुम्हीही तेवढे धैर्यवान आहात का?
देवाच्या लोकांची मुक्तता घडते!
वाचा ८:१–१०:३. मर्दखय हामानाच्या जागी पंतप्रधान होतो. पुनः एकदा आमंत्रणाविना एस्तेर मोठ्या जोखीमेने राजदरबारात प्रवेश करते व हामानाने आखलेल्या योजनेला रद्द करण्याचे फर्मान काढण्याची याचना करते. सम्राट कबुल होतो व मर्दखयला अहश्वेरोशच्या नामाने एक प्रतिफर्मान जाहीर करायला सांगतो. पारसाच्या नियमाप्रमाणे पूर्वी काढण्यात आलेला हत्येचा आदेश रद्द होत नव्हता तरी आता या नव्या आदेशाने यहुद्यांना स्वतःचे संरक्षणार्थ लढण्याची मुभा दिली.
यहुद्यांमध्ये आनंदाचा मोठा जयघोष होतो! आता असाहाय्य बळी बनण्याऐवजी यहुद्यांना आपल्या स्वसंरक्षणार्थ मोर्चे तयार करण्याचा वाव मिळतो. शेवटी अदार (फेब्रुवारी–मार्च) महिन्याची १३ तारीख उजाडते. आपणास “उपद्रव करू पाहणाऱ्या” ७५,००० जणांचा यहुदी नाश करतात. हा विजय यहोवापासून प्राप्त झाला आहे याचा विसर पडू नये म्हणून मर्दखय अदार महिन्याच्या १४ व १५ तारखेस पुरीमचा वार्षिक उत्सव करावा असे फर्मान जाहीर करतो.
◆ ८:५—एस्तेरने समजबुद्धी कशी दाखविली?
एस्तेरने अगदी काळजीपूर्वकरित्या आपले शब्द राजासमोर वदविले. हामानाच्या दस्ताऐवजातील आदेशाचा जोर नाहीसा करावा हे राजाला अपील पूर्वक सांगताना तिने त्या आदेशाचा, हामान “याने जी पत्रे लिहून पाठविली” असा संदर्भ दाखविला. राजाचा या प्रकरणाशी असणाऱ्या जबाबदारीचा उल्लेख तिने मोठ्या चतुराईने टाळला. ख्रिश्चनांनीही सरकारी अधिकाऱ्यांपुढे साक्ष देताना याप्रमाणेच चतुर असावे.
◆ ८:१७—लोकांनी स्वतःला ‘यहुदी असे कसे घोषित केले’?
सेप्ट्युजंट म्हणते की, पारसाचे लोक “सुंता करुन यहुदी मतांचा स्वीकार करीत होते.” काढण्यात आलेले प्रतिफर्मान यहुद्यांसाठी इश्वरी पाठबळाचे चिन्ह समजून कित्येक पारशांनी स्वतःला यहुदी मतप्रवर्तक केले. याचप्रमाणे आजही “दुसरी मेंढरे” याच्या “मोठया लोकसमुदायाने” अभिषिक्त शेषांच्या बाजूने आपली भूमिका धारण केली आहे.—प्रकटीकरण ७:९; योहान १०:१६; जखर्या ८:२३.
◆ ९:१०, १५, १६—यहुद्यांनी लुटीस का हात लावला नाही?
खरे पाहता, राजाज्ञेने त्यांना लूट प्राप्त करुन घेण्याचा अधिकारही दिला होता. तथापि त्यांनी ती घेण्याचे नाकारले ही गोष्ट त्यांचा उद्देश स्वतःला समृद्ध करण्याचा नव्हे तर स्वसंरक्षणाचा होता हे स्पष्ट करते.
आम्हासाठी धडा: एस्तेरच्या काळातील यहुद्यांप्रमाणेच आज यहोवाचे साक्षीदार शत्रूपासून संरक्षण मिळावे याकरता सरकार व न्यायालये यांना अपील करतात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात धर्मपुढारी–प्रणीत असा जो हल्ला देवाच्या लोकांवर करण्यात आला त्याखातर हे करावे लागले. यहोवाच्या आशीर्वादानेच कित्येक प्रमुख न्यायालयीन लढे जिंकण्यात आले.
एस्तेरचे पुस्तक आज यहोवाच्या साक्षीदारांना आशा व उत्तेजनाचे उगम ठरते. त्यांच्यावर असणारा उत्कट रोष, त्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा शेवटचा व निकराचा प्रयत्न करून सैतान व्यक्त करील हे त्यांना ज्ञात आहे. यावेळी यहोवा त्यांचे कशा पद्धतीने संरक्षण करील ते अद्याप दिसून यावयाचे आहे. (यहेज्केल ३८:१६–२३) तरीपण त्यांचा आत्मविश्वास, यहोवा आपल्या लोकांचा कधी त्याग करणार नाही असा एस्तेरच्या काळाप्रमाणेच असेल. तो त्यांना अगदी योग्य समयी “सुटका व मुक्तता” प्रदान करील.