आम्ही यहोवाला कसे ‘सर्व प्रकारे संतोषवू’ शकतो?
आपले विचार, बोल व कृत्ये देवाला संतोषवितात का याबद्दल किती थोड्या लोकांना आज काळजी वाटते बरे! अशा स्वरुपाची काळजी आम्हाला आहे असा दावा करणाऱ्यांच्या बाबतीतही असे दिसते की ते देवाच्या बाबतीत केवळ तोंडपूजेपणा राखून आहेत. खरे पाहता बहुसंख्यांकाबद्दल असे म्हणता येऊ शकेल की: “ते दवाला संतुष्ट करीत नाहीत.”—१ थेस्सलनीकाकर २:१५, एन. डब्ल्यू.
ख्रिस्ती म्हणविणाऱ्या काहींना वाटते की, जोपर्यंत आपल्याकडून दहा आज्ञांचे उल्लंघन होत नाही तोपर्यंत आपण देवाला संतुष्ट करीत असतो. पण हे बरोबर नाही! आम्हास उदाहरण घालून देणाऱ्या येशू ख्रिस्ताने देवाबद्दल म्हटले: “जे त्याला आवडते ते मी सर्वदा करतो.” (योहान ८:२९) होय, त्याने विशिष्ट गोष्टी करण्याद्वारे त्याच्या पित्यास संतुष्ट केले. निश्चयी कृति ही जरुरीची असते हे प्रेषित पौलाने कलस्सै येथील आपल्या समविश्वासूंखातर जी प्रार्थना केली त्याकरवी दिसून येते. त्याने प्रार्थिले की, ते “प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ” देत असता त्यांनी “सर्व प्रकारे यहोवाला संतोषविण्याकरता” योग्यपणे वागावे.—कलस्सैकर १:९, १०.
तथापि, प्रश्न हा आहे की यहोवाला खरेच ‘सर्व प्रकारे संतुष्ट’ करता येते का? सध्या अपूर्ण असल्यामुळे ख्रिश्चनांना देवाला पूर्णपणे संतुष्ट करता येऊ शकणार नाही. तरीपण त्याला ‘सर्वप्रकारे संतुष्ट’ करण्याचा हेतु राखून त्या दिशेने कृति करण्याचा कसोशीचा प्रयत्न त्यांना करता येईल. “प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ” या पौलाच्या विधानाचा अर्थ सरळ स्वरूपाची कृत्ये असा होतो. अशा प्रकारातील सर्व कृत्यांची यादी अर्थातच आम्हाला पुरविता येणार नाही. पण त्याविषयीचा विचार करावयास लावणारे खाद्य मात्र आम्ही देऊ शकतो. या मुद्यांकरवी जर हे सूचित असेल की जीवनातील या विशिष्ट क्षेत्रात तुम्ही सुधारणा करणे अवश्य आहे तर मग यहोवाला संतुष्ट करण्यासाठी तुम्ही याच्या अनुषंगाने जे प्रयत्न कराल त्यावर तो निश्चित आशीर्वाद देईल याबाबत निश्चिंत असा. यहोवाला ‘सर्व प्रकारे संतुष्ट करणे’ याचा अर्थ हा होतो की आम्ही आमचे विचार, बोल व कृति नियंत्रित ठेवावी.
आमच्या विचारांबद्दल काय?
देवाचे वचन आम्हाला सांगते: “त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिति नाही, तर ज्याच्यापुढे आम्हाला जाब देणे आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट केलेले आहे.” (इब्रीयांस ४:१३) आमचे विचार मानवाला व दुरात्म्यांना वाचता येत नाही तर केवळ देवालाच समजू शकतात. असे असल्यामुळे आमचे विचारच मुळात त्याला संतुष्ट करणारे असले पाहिजेत. तद्वत, आम्ही स्वतःला हे विचारणे बरे की: माझ्या मनाच्या कंपासाची सुई कोणत्या आसाभोवती भिरभिरत राहते?
आम्ही आणखी असे विचारु शकतोः मी मनाचे मनोरे उभारुन पैसा, किर्ती व प्रतिष्ठा इत्यादि गोष्टींच्या अनुभवाची स्वप्ने पहात असतो का? विरुध्दपक्षी मी नेहमीच नकारार्थी विचारात, जसे की काल्पनिक तक्रारी यांचा विचार करण्यात गढलेलो असतो का? मी सतत लैंगिक विषयभोगाची स्वप्ने पाहण्यात विचारमग्न असतो का? किंवा माझे मन पैसा कसा मिळवीत राहावा याच्या योजना व प्रकल्प करण्यात गुंतलेले असते?
आता विचार करा: अशा प्रकारच्या विचारांनी आम्ही आमचे मन भारावून ठेवल्यास आम्ही यहोवाला ‘सर्व प्रकारे संतुष्ट’ करु शकतो का? अर्थातच नाही! तद्वत, कळकळीची प्रार्थना व देवाच्या मदतीने अशा विचारांना झाडून टाकून आपली मने उत्तम, सरळ, हितकारक, शुध्द आणि प्रिय गोष्टींनी भरावी. (फिलीपैकर ४:८) आमच्या मनाला शिस्त लावून यहोवास दिल्या जाणाऱ्या आमच्या उपासनेच्या अनुषंगाने त्याला विचार करावयाला लावणे हे किती बरे आहे! समीप येऊन ठेपलेल्या देवाच्या राज्याबद्दल विचार करा. देवाच्या वचनातून अलिकडेच शिकलेल्या मुद्यांचे स्मरण करा. पुढल्या मंडळीच्या सभेत ज्या विषयांचा विचार होणार आहे त्याची किंवा कार्यक्रमात तुम्हाला जो भाग नेमून दिला आहे त्या साहित्याचे वाचन करा. आपले क्षेत्र कार्य कसे वाढू शकेल याचा विचार करीत राहा. तुम्ही स्वतः प्रामुख्याने ख्रिस्ती उपाध्याय आहात याची जाणीव ठेवा.
स्वतःला ठाऊक असणाऱ्या शास्त्रवचनांची उजळणी करण्याद्वारे किंवा राज्य गाणी गुणगुणण्याद्वारे काहींना मदत मिळू शकली. स्वतःला स्मरण देत राहावे याकरता एका ख्रिस्ती उपाध्याने हे गीत रचले व ते तो गुणगुणत राहिला:
“हे देवा, तुझी इच्छा व प्रेम अनुज्ञा देते तसे राहण्याची कृपया मदत दे.
तू सर्व काही चांगले करीत असतो याकरता माझ्या हातून बंड कधीही न घडो.”
होय, प्राचीन काळच्या दावीद राजाने जशी प्रार्थना केली तशीच करा: “हे यहोवा, . . .माझ्या अंतःकरणाचे विचार तुला मान्य, [म्हणजेच, संतुष्ट करणारे] असोत.”—स्तोत्रसंहिता १९:१४.
आमच्या वक्तव्याबद्दल काय?
दावीदाने आणखी असे प्रार्थिले: “हे यहोवा . . . माझ्या तोंडचे विचार . . . तुला मान्य असोत.” (स्तोत्रसंहिता १९:१४) आम्हाला याकोबाचे पत्र ३:२–१२ पासून कळते की केवळ परिपूर्ण माणसाला त्याच्या जिभेला पूर्ण लगाम घालता येतो. पण जर आम्हाला यहोवाला “सर्व प्रकारे” संतुष्ट करायचे आहे तर आम्ही तिला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
दर दिवशी आम्ही कितीतरी शब्द बोलतो. आम्हाला अर्थातच आमची विधाने केवळ शास्त्रवचनीय विषयापुरतीच बध्द ठेवता येत नाहीत. तरीपण आम्ही जे बोलू त्यामध्ये यहोवास संतुष्ट करण्याचा विचार राखला पाहिजे. जसे की आपणाला माहीतच आहे की शिव्यागाळी, निंदा, किंवा असभ्य आणि घाणेरडी भाषा या गोष्टी आमच्या स्वर्गीय पित्याला संतुष्ट करु शकत नाहीत. या कारणास्तव आम्ही अशा प्रकारचे भाष्य टाळावे.—इफिसकर ५:३, ४.
आम्हाला आमच्या निर्मात्यास आमच्या बोलण्यासंबंधाने पूर्णप्रकारे संतुष्ट करावयाचे आहे तर आम्ही आमच्या मुखाद्वारे इतरा़बद्दल निंदक व मानहानीकारक गोष्टी न करण्याची दक्षता बाळगावी. आमच्या बाबतीत असे म्हटले गेले पाहिजे: “तो आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही. आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही.” आम्हाला अन्यायाचा त्रास होत असला तरी आम्ही “कोणाची निंदा करु नये.”—स्तोत्रसंहिता १५:३; तीतास ३:२.
भोजनप्रसंगी आपल्या शब्दांद्वारे यहोवास “सर्व प्रकारे” संतुष्ट करण्याची किती मोठी संधि असते बरे! अशी ही वेळ रागाचे वा उद्विग्न शब्द काढण्याची नसते. कितीतरी चांगल्या गोष्टी अशा प्रसंगी चर्चिल्या जाऊ शकतात. आम्ही कोणाकडे पाहुणे म्हणून असलो किंवा आमच्याकडे कोणी पाहुणे असले तर अशा प्रसंगाची सुसंधि हेरली पाहिजे. यात साधारणतः असे घडते की प्रौढ ख्रिश्चनांपेक्षा जो अधिक बडबड्या असतो तो या प्रसंगावर आपले प्रभुत्व ठेवीत असतो. तुमच्या घरी पूर्ण वेळेचे उपाध्यपण करणारा व यात अधिक वर्षांचा अनुभव असलेला कोणी भेट देणार आहे का? त्याला देवाच्या वचनाचे पुष्कळ ज्ञान आहे का? तर मग समंजसपणे त्याजपाशी असणाऱ्या ज्ञान भांडारातून अधिक ते प्राप्त करण्याची सुसंधि साधून घ्या. “मनुष्याच्या अंतःकरणातील मसलत खोल पाण्यासारखी असते, तरी समंजस ती बाहेर काढतो.”—नीतीसूत्रे २०:५.
आमच्या बोलण्याद्वारे यहोवास “सर्व प्रकारे” संतुष्ट करण्यासाठी आम्ही देवाचे नाम व त्याचे राज्य याविषयीची साक्ष इतरांना अनौपचारिकरित्या देण्याची सुसंधि हेरली पाहिजे. खरे म्हणजे असे हे अनौपचारिक साक्षीकार्य करण्याद्वारे ख्रिस्ती उपाध्याला बरेच काही साध्य करता येऊ शकते. तरीपण आमच्या वक्तव्याकरवी यहोवास संतुष्ट करण्याचा व दुसऱ्यांना आशीर्वाद ठरण्याचा प्राथमिक मार्ग म्हणजे घरोघरी राज्याचा संदेश नेणे हा होय.—प्रे. कृत्ये २०:२०.
ख्रिस्ती उपाध्यपणात सहभागी असताना राज्य संदेश प्रसारीत करण्यामध्ये सतत सुधारणा करीत राहण्याद्वारे आम्ही यहोवास “सर्व प्रकारे” संतुष्ट करु शकतो. आम्हाला “सुवार्ता” सोपविली गेली असल्यामुळे आम्ही प्रेषित पौलाप्रमाणे “माणसांना खूष करण्यासारखे न बोलता आमची अंतःकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खूष होईल” तसे बोलण्याची इच्छा धरावी. शिवाय आमच्या ओठांचा वापर ख्रिस्ती सभांमध्ये आमच्या विश्वासाविषयीचे जाहीर वक्तव्य करुन इतरांना प्रीती व सत्कर्मे करण्यासाठी प्रोत्साहन देता यावे म्हणून करावा या जबाबदारीकडे आम्ही कानाडोळा करू नये.—१ थेस्सलनी २:४; इब्रीयांस १०:२३–२५.
आमची वागणूक व कृत्ये याकरवी यहोवास “सर्व प्रकारे” संतुष्ट करणे
आम्हाला यहोवास “सर्व प्रकारे” संतुष्ट करावयाचे आहे तर आपल्या दैनंदिन वागणूकीबद्दल व मनोरंजनाबद्दल आम्ही दक्षता बाळगली पाहिजे. होय, आम्ही मनोरंजनप्राप्तीचा शोध घेतो तेव्हा आम्हाला देवाला नजरेआड करता येणार नाही. हा अतिरेक वाटतो का? नाही, कारण पौलाने म्हटले होते: “तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.” आम्ही हा इशारा लक्षात ठेवला पाहिजे की: “जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही.” तद्वत, इतर सर्व गोष्टीपेक्षा आमच्या मनोरंजनाचा प्रकार हितकारक असला पाहिजे.—१ करिंथकर १०:३१; रोमकर ८:८.
याशिवाय संयम व वेळ या बाबींकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही. यहोवास “सर्व प्रकारे” संतुष्ट करण्यासाठी आम्ही मनोरंजनाच्या प्रकाराला त्याच्या जागी प्रासंगिक असे ठेवण्यास हवे, अत्यंत महत्वपूर्ण असे नव्हे. आमचे मनोरंजन, मग ते दुरदर्शनवरील एखादा कार्यक्रम बघणे असो वा कोणता खेळ पाहण्यास जाणे असो, त्याने आमच्या ख्रिस्ती सभांना जाण्याच्या आणि क्षेत्रात नियमितपणे सहभाग घेण्याच्या वहिवाटीवर अतिक्रमण करता कामा नये.—मत्तय ६:३३.
यहोवास “सर्व प्रकारे” संतुष्ट करण्यामध्ये, आम्हाला संधि असेल व गरज उद्भवलेली दिसेल त्याप्रमाणे आमच्या ख्रिस्ती बांधवांचे चांगले करीत राहण्याचेही समाविष्ठ आहे. याबाबतीत आम्ही वाचतो: “चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका. कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.” फिलिप्पैकर ख्रिश्चनांनी पौलाच्या बाबतीत जो कनवाळूपणा व्यक्त केला त्याबद्दल तो म्हणाला की, तो “जणू काय सुगंध, देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ” असा होता.—इब्रीयांस १३:१६; फिलिप्पैकर ४:१८.
मुलांना आपल्या वागणुकीद्वारे यहोवाला “सर्व प्रकारे” कसे संतुष्ट करता येईल? पौलाने म्हटले की याचा अभूतपूर्व मार्ग असा की त्यांनी आपल्या पालकांची “प्रभुमध्ये” आज्ञा मानावी. तो असेही म्हणतो: “मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापाच्या आज्ञा पाळा; हे प्रभुला संतोषकारक आहे.”—इफिसकर ६:१–३; कलस्सैकर ३:२०.
यहोवा देव व त्याचे पृथ्वीवरील माध्यम याजद्वारे देवाच्या सर्व समर्पित सेवकांनी दयाळूपणाचा नित्याने लाभ प्राप्त केला असल्यामुळे आपण प्रेम व कृतज्ञतेने त्याला “सर्व प्रकारे” संतुष्ट करण्याची नेहमी इच्छा धरावी. प्रेममय कृतज्ञता आम्हास सांगते की, “देवाच्या कृपेचा स्विकार व्यर्थ होऊ देऊ नये.” (२ करिंथकर ६:१) यहोवास पूर्ण प्रकारे संतुष्ट करण्याचा मनोदय राखणे हे न्याय व बरोबर आहे कारण तो प्रत्यक्षात विश्वाचा सार्वभौम प्रभु आहे. खरे म्हणजे, यहोवास “सर्व प्रकारे” संतुष्ट करण्याचा यज्ञ करणे हा सर्वोत्तम सुज्ञतेचा मार्ग आहे, कारण असे केल्यामुळेच सध्या लाभ मिळतो आणि भावी जीवनप्राप्तीचे अभिवचनही मिळते.—१ तिमथ्यी ४:८.
होय, आम्ही आमचे विचार, बोल, आमची वागणूक व कृति यांच्याबाबतीत दक्षता राखली पाहिजे. यहोवाच्या मदतीनेच आम्हाला हे साध्य करता येऊन त्याला पूर्ण प्रकारचा संतोष देता येईल. असे करण्यात आम्ही मंद बनू नये. उलटपक्षी, प्रेषित पौलाने थेस्सलनीका येथील ख्रिश्चनांना दिलेल्या सूचनेचे नेहमी स्मरण ठेवावे, ते असे की: “बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हास विनंति करतो व प्रभु येशूमध्ये बोध करतो की तुम्ही कसे वागून देवाला संतोषवावे हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहा. त्यात तुमची उत्तरोत्तर वृध्दी व्हावी.”—१ थेस्सलनीकाकर ४:१.
[३१ पानांवरील चित्र]
मनोरंजनास ख्रिस्ती कार्यावर अतिक्रमण करू देऊ नका