इयोबाची सचोटी—ती कोणास अनुसरता येईल?
“तो मला न्यायाच्या ताजव्यात तोलील; देवाला माझी सचोटी कळून येईल.—इयोब ३१:६, न्यू.व.
१. इयोबाच्या उदाहरणाचा विचार करणे का चांगले आहे, आणि कोणते प्रश्न उद्भवतात?
इयोबाला आपल्या सचोटीचा भरवसा होता, याकरताच त्याने देवाकरवीच्या परीक्षणाचे स्वागत केले. आज दियाबल सैतान देवाची सेवा करणाऱ्या सर्वांची सचोटी भंगविण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न करीत असल्यामुळे इयोबाचे उदाहरण आम्हा सर्वांना प्रोत्साहनदायक ठरू शकते. (१ पेत्र ५:८) या गोष्टीची जाण असल्यामुळे शिष्य याकोबाने म्हटले की, संदेष्टयांचा व खासपणे इयोबाचे “दुःख सहन व . . . धीर ह्याविषयीचा कित्ता घ्या”वा. (याकोब ५:१०, ११) पण इयोबाच्या सचोटीचे कोणास अनुकरण करता येईल? आम्हाला करता येईल? इयोबाने कोणकोणत्या मार्गी सचोटीच्या बाबतीत आम्हापुढे उदाहरण मांडले?
२. (अ) इयोब या नावाचा काय अर्थ आहे? (ब) इयोबाच्या सचोटी–रक्षण मार्गाक्रमणाद्वारे काय साध्य केले गेले?
२ इयोब या नावाचा अर्थ “वैरत्वाचे लक्ष्य” असा होतो, जो स्वतः तसा बनला होता. पण जेव्हा यहोवाने सैतानाला त्याच्या विनंतीची अनुमति दिली आणि इयोबा भोवतालचे संरक्षणाचे कुंपण काढले तेव्हा सैतानाने, करता आले तेवढे सर्व केले तरी त्यामुळे इयोबाची देवास असलेली सचोटी भंगली गेली नाही. (इयोब १:१—२:१०) याकरवी इयोबाने सैतानाच्या त्या दाव्याला की त्याला देवाची सेवा करण्यापासून कोणालाहि परावृत्त करता येईल या टोमण्याला सडेतोड उतर दिले. (नीतीसूत्रे २७:११) आपल्या सचोटी रक्षणाच्या मार्गाक्रमणाद्वारे इयोब जणू सबंध विश्वाला घोषित करीत होता, ‘सैताना, तू तर अगदीच लबाड आहे. यहोवा हा माझा देव आहे आणि काहीही झाले तरी मी त्याला आपली सचोटी दाखविणार.’—इयोब २७:५.
इयोबाप्रमाणे असणारे
३. स्वर्गात कोणाला संरक्षण मिळत होते व त्याच्याबद्दल कोणते प्रश्न विचारले आहेत?
३ यहोवा व सैतान याजमधील वादविषय हा लक्षणीयपणे सार्वत्रिक होता, ज्यात आत्मिक क्षेत्राचा समावेश होता. तेथे स्वर्गात यहोवाच्या संरक्षणयुक्त दक्षतेच्या पंखाखाली त्याचे वचनयुक्त “संतान” होते व याच्या करवीच देव आपला भव्य उद्देश पूर्ण करण्याची इच्छा बाळगून होता. (उत्पत्ती ३:१५) पण तेच, ‘संरक्षणाच्या पंखाखालून’ बाहेर काढल्यास हा देखील इयोबाप्रमाणेच सचोटी राखणार का? आदाम होता तसा एखादा परिपूर्ण मानव देवाला पूर्ण स्वरूपाची सचोटी दाखवू शकतो का? (१ करिंथकर १५:४५) हे “संतान” पृथ्वीवर प्रगट होईल तेव्हा त्यावर अत्यंत कठिण अशी परिक्षा आणण्याची सैतानाने तयारी केली.
४. (अ) सैतानाच्या वैरभावाचे मुख्य लक्ष्य कोण बनला आणि देवाने त्याजवरील आपले संरक्षणछत्र काढले होते हे आपल्याला कसे समजते? (ब) येशूने यहोवास काय देऊ केले?
४ स्वर्गातून पाठविलेले ते “संतान” येशू ख्रिस्त असल्याचे सिद्ध झाले. यामुळेच तो दियाबलाचे मुख्य लक्ष्य, सैतानाच्या पीडेचे मुख्य केंद्र बनला. यहोवाने आपल्या संरक्षणाचा कवच त्याच्यावरून काढून घेतला होता हे येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर असताना “माझ्या देवा, माझ्या देवा तू माझा त्याग का केला?” या आरोळीकरवी स्पष्ट झाले. (मत्तय २७:४६; स्तोत्रसंहिता २२:१) देवाने आपणावरील संरक्षण काढून घेतले हे येशूला सातत्याने जाणवत होते तरी त्याने इयोबाप्रमाणेच “अनुचित कृत्य केल्याचा आरोप . . . देवावर केला नाही” वा पाप केले नाही. (इयोब १:२२) त्याने इयोबासारखेच अनुकरण केले, देवास पूर्ण स्वरूपाची सचोटी राखली व त्याकरवी “भूतलावर त्याच्या तोडीचा . . . दुसरा कोणी नाही” हे सिद्ध केले. (इयोब १:८) याकारणामुळेच यहोवा देवाला, सैतानाच्या या खोट्या दोषारोपासंबंधी की, खडतर परिक्षा प्रसंगात विश्वासू राहू शकेल असा कोणताहि माणूस देव पृथ्वीवर राखू शकत नाही याला सार्वकालिक उत्तर मिळाले.
५. (अ) सैतान काय करीत आहे? (ब) स्वर्गातून हाकलून लावल्यावर सैतानाने काय केले?
५ तरीसुद्धा आणखी उत्तर मिळविण्याच्या इच्छेस्तव सैतान, जे येशूसोबत मिळून देवाच्या स्त्री संघटनेचे “संतान” बनतात त्या येशूच्या आध्यात्मिक बंधूंची निंदा करीत राहतो. देवराज्याची स्थापना स्वर्गात झाली त्याविषयीचे वर्णन पुरविताना पवित्र शास्त्र सैतानाबद्दल म्हणते: “आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांजवर दोषारोप करणारा . . . खाली टाकण्यात आला आहे!” तरीपण सैतान नुसती निंदा करण्यापेक्षा अधिक काही करतो, तो वैरभावाचा हल्ला चढवितो! पवित्र शास्त्र स्पष्ट करते की त्याला स्वर्गातून खाली टाकल्यावर “अजगर [सैतान] स्त्रीवर रागावला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयीची साक्ष पटविणारे असे तिच्या संतानपैकी बाकीचे लोक यांजबरोबर लढाई करावयास तो निघून गेला.”—प्रकटीकरण १२:७–१२, १७.
६. (अ) आज प्रचार कार्यात कोण पुढाकार घेत आहे व त्यांना कोण येऊन मिळाले आहेत? (ब) या सर्वांच्या बाबतीत सैतान काय करण्याचा प्रयत्न राखून आहे?
६ “[स्त्रीच्या] संतानापैकी बाकीचे लोक” आज पृथ्वीवर असणारे यहोवाचे अभिषिक्त साक्षीदार आहेत. ते “येशूविषयीची साक्ष देण्याचे” काम नेटाने करतात ते या अर्थी की तो आता राजा म्हणून सिंहानाधिष्ठ झाला असून लवकरच हे अधार्मिक व्यवस्थीकरण लयास आणणार अशी ते जगभरात जाहीरपणे घोषणा करतात. (मत्तय २४:१४; दानीएल २:४४) पण ते एकटेच नाहीत! आता त्यांना तीस लक्षापेक्षा अधिक लोकांचा प्रचंड समुदाय येऊन मिळाल्यामुळे त्यांचे एकतेचे जागतिक सचोटी रक्षणकर्त्यांचे संघटन तयार झाले आहे. या सर्व सचोटी राखणाऱ्यांना सुद्धा सैतानाच्या अविरत छळाचा अनुभव येत आहे. त्यांचा स्वर्गीय पिता यहोवा याला त्यांच्या सचोटीत आनंद वाटतो.—२ तिमथ्यी ३:१२; नीतीसूत्रे २७:११.
७. सैतानाचा हल्ला होत असला तरी आम्हाला का आत्मविश्वास बाळगता येईल?
७ सैतानाने आपले कुयुक्तीपूर्ण लक्ष इयोबावर केंद्रित केले त्याचेप्रमाणे देवास सचोटी राखणाऱ्या आम्हावरसुद्धा तो लक्ष राखून आहे हा विचार गंभीर वाटतो. तरीपण, आम्ही भांबावून जाण्याची गरज नाही. का बरे? कारण “यहोवा फार कनवाळू व दयाळू आहे” आणि तो तुला दगा देणार नाही, सोडून जाणार नाही.” (याकोब ५:११; अनुवाद ३१:६) होय, यहोवा आम्हास उंचावून धरील. पवित्र शास्त्र म्हणते की, “सचोटीनुरुप चालणाऱ्यांस तो ढाल आहे.” (नीतीसूत्रे २:७) पण याचा अर्थ, यहोवा आमची परिक्षा होऊ देणार नाही असा नाही. इयोबाची होऊ दिली त्याप्रमाणे तो आमचीही परीक्षा होऊ देईल. तथापि, “देव विश्वासपात्र आहे.” प्रेषित पौलाने म्हटले, “तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलिकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय करील, असे की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.”—१ करिंथकर १०:१३.
परीक्षेत असताना
८. इयोबाचे उदाहरण आज आम्हाला कसे लाभदायक ठरू शकते?
८ आम्हाला खडतर परीक्षचा सामना करावा लागतो तेव्हा सचोटीविषयक इयोबाचे उदाहरण खासपणे लाभदायक ठरू शकते. इयोबाला इतका त्रास झाला की त्याने मरण्याची आणि शिओलात, मानवजातीच्या सर्वसाधारण कबरेत जाण्याची इच्छा धरली. (इयोब १४:१३) आजही काहींना असेच वाटते, त्यामुळे त्यांच्यावर ओढावलेल्या त्रासामुळे ते इयोबाचे नाव काढतात. तुम्हालाही असेच वाटले असावे. खरेच, इयोबावर बेतलेल्या त्रासाविषयीचे वाचन केयामुळे जणू, ज्याने आम्हापेक्षाही खडतर त्रासाला तोंड दिले त्या मित्राकडून प्रोत्साहन मिळण्याजोगे ते ठरते. कोणीतरी सहन केले आहे व त्याला आपली जाणीव आहे ही गोष्ट निश्चितपणे आपल्याला सहन करण्यात मदत देते.
९. इतरांच्या सचोटी राखण्यामुळे आम्हाला कसा लाभ होतो?
९ यहोवाने आमच्या गरजा ओळखून इयोबाच्या पुस्तकाचे लिखाण, आम्ही, इयोबाने राखली तशी सचोटी राखावी म्हणून केले आहे. (रोमकर १५:४; याकोब ५:१०, ११) शरीराचा एक भाग जसा दुसऱ्या अंगावर विसंबून असतो त्याप्रमाणेच विश्वासू सेवकांना एकमेकांची गरज असते हे देवाला ठाऊक आहे. (१ करिंथकर १२:२०, २६) अलिकडेच झालेल्या “सचोटी राखणारे” अधिवेशनास या मासिकाचे लाखो वाचक उपस्थित राहिले होते ते आठवा. तेथे हजर राहिलेल्यांना, ज्यांचे मुख्य ध्येय देवास सचोटी राखण्याचे आहे त्यांच्या सहवासात राहण्याचे किती आवडले होते ते नक्कीच आठवेल. उपस्थित राहिलेल्यांना संमेलनात आपणासोबत असणारे हजारो, आपापल्या वसाहतीतील नोकरीवर व शाळेत खडतर परीक्षेत सचोटी राखून आहेत हे जाणून त्यांना प्रत्यक्षात सचोटी राखण्याचे केवढे प्रोत्साहन लाभले असावे बरे!—१ पेत्र ५:९.
१०. (अ) कोणी योग्य मनोदय राखण्यात कसा मागे पडू शकतो? (ब) इयोबाने काय विचारण्चाची सुरुवात केली?
१० तरीपण नेहमीच योग्य मनोदय आमच्या ठायी राहीलच असे नाही. इयोबसुद्धा या बाबतीत मागे पडला. मोठा त्रास सहन करणारा व मनाची त्रस्त स्थिती झालेला कदाचित म्हणू शकेल, ‘देव हे मजवर का आणतो? हे सर्व घडण्यास तो का अनुमति देतो?’ ‘देवाची सेवा करण्यात अर्थ तरी काय?’ अशीही मजल तो मारू शकतो. आपल्या त्रासाच्या उगमाची जाणीव नसयामुळे इयोबाने धार्मिक असण्याच्या लाभाविषयी प्रश्न केला कारण चांगया माणसांना वाईट माणसांपेक्षा अधिक त्रास होत असयाचे दिसत होते. (इयोब ९:२२) अलीहूच्या मते इयोबाने म्हटले होते: “मला यात काय लाभ? मी पाप केले तरी यापेक्षा मला कमी काय मिळणार?” (इयोब ३५:३, ॲन अमेरीकन ट्रान्स्लेशन) तरीपण आपणाला इतके स्वतःच्या त्रासामध्ये गुरफटून जाऊन योग्य मनोदय सोडून देणे व देवाची सेवा करण्याच्या मोलाविषयीची प्रश्नार्थकता उभी करणे साजेसे नाही.
११. अलीहूने इयोबास कोणती चांगली सुधारणा देऊ केली?
११ अलीहूने इयोबास आवश्यक ती सुधारणा देऊ केली आणि यहोवा इयोबापेक्षा श्रेष्ठ आहे हे दर्शवून त्याने सर्व गोष्टी यथास्थित केल्या. (इयोब ३५:४, ५) अलीहूने दाखविले की काहीही झाले तरी देव हा निष्काळजी आहे व तो अन्यायीपणा दाखवतो असे वाटून आम्हाला त्याचा धिक्कार करता येईल असे आम्ही कधीही वाटू देऊ नये. “तू पाप केले तर,” अलीहूने इयोबाला विचारले, “देवाचे काय जाते? तुझे अपराध बहुत असले तर त्याचे काय बिघडणार?” (इयोब ३५:६) देवाचे मार्ग सोडून देऊन आणि त्याची सेवा करण्याचे बंद करून देवाचा धिक्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे देवाला नव्हे तर तुम्ही स्वतःलाच इजा करीत असता.
१२. आमची सचोटी राखणे देवावर कसा परिणाम करते?
१२ दुसऱ्या बाजूने अलीहूने स्पष्ट केले की आम्ही योग्य तेच केले तरी यहोवाला व्यक्तिशः लाभ मिळत नाही. अर्थात, आमच्या सचोटीचा देवाला आनंद हा होतोच पण त्याच वेळी तो आमच्या उपासनेवर अवलंबून राहतो असे काही नाही. हेच अलीहूने इयोबास प्रश्न केला तेव्हा सूचित केले होते: “तू धार्मिक असलास तर तू त्याला काय देणार? तुजपासून त्याला काय मिळणार?” (इयोब ३५:७) देवाने आम्हाला जीवन दिले आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही श्वास घेतो, हालचाल करतो व जिवंत आहोत. सर्व काही त्याचेच आहे! (प्रे.कृत्ये १७:२५; १ इतिहास २९:१४) त्यामुळेच आमच्या दुष्टाईचा वा धार्मिकतेचा देवावर व्यक्तिगत परिणाम घडत नाही.—इयोब ३५:८.
सुधारणुकीनंतर
१३. (अ) दिलेल्या सुधारणुकीबद्दल इयोबाने कशी प्रतिक्रिया व्यक्त केली? (ब) आम्हा सर्वांची कोणती समस्या असते?
१३ प्रथम अलीहू व नंतर स्वतः यहोवाने सुधारणूक केयावर इयोबाने कशी प्रतिक्रिया व्यक्त केली? त्याने ती स्विकारली आणि “धूळराखेत” बसून पश्वाताप व्यक्त केला. (इयोब ४२:६) होय, इयोब लीन झाला व त्याने आपया चुकीची कबुली दिली. त्याच्या या लीनतेचे आम्हाला कुतूहल वाटत नाही का? पण आम्हाबद्दल काय? आम्ही इयोबाप्रमाणेच निश्चयाने सचोटी राखणारे असलो तरी आमच्या सर्वांचा चुका करण्याकडे आणि या किंवा त्या मार्गी असमतोल होण्याचा कल असतोच. (याकोब ३:२; गलतीकर २:११–१४) आमच्या चूका किंवा आमची अपूर्णता अलीहूसारख्या कोणा युवकाने सुद्धा आमच्या निदर्शनास आणून दिली तर आम्ही काय करावे?—इयोब ३२:४.
१४. (अ) कोणा व्यक्तिची सुधारणूक केली जाते त्यावेळी सर्वसाधारण कल कोणता असतो? (ब) चुका किंवा अयोग्य न्याय कशामुळे घडू शकतो आणि वाग्दंड मिळाला तेव्हा इयोबाने कोणते उदाहरण मांडले?
१४ सुधारणूक स्विकारणे सहसा सोपे वाटत नाही. (इब्री १२:११; नीतीसूत्रे ३:११, १२) आमचेच समर्थन मांडण्याचा नेहमी कल असतो. कदाचित इयोबाप्रमाणे आम्ही हेतुपुरस्सर बोललो नसेल वा काही चुकीचे केले नसेल. आमचा त्यामागील हेतू चांगला राहिला असावा. तरी पण पूर्ण ज्ञानाअभावी समजणूकीची वा संवेदनाची उणीव यामुळे आम्ही काही बोलून गेलो असू. आमच्या विवेचनाने वंशीय वा राष्ट्रीय उच्चतेचा भाव किंवा एखाद्या गोष्टीविषयी अशास्त्रीय हट्ट व्यक्त केला असेल. आता हीच गोष्ट आमच्या निदर्शनास आणली जाऊन त्याकरवी आमचा व्यक्तिगत दृष्टिकोण कसा दिसून आला आणि याकरवी दुसऱ्यांना इजा होऊन त्यांची आध्यात्मिकता कशी बाधली ते सांगितले गेले. तर मग आम्हास वाग्दंड दिला जातो तेव्हा आम्ही इयोबाप्रमाणे ‘न समजलेले ते बोललो’ असे कबूल करून ‘पश्चाताप करतो’ का?—इयोब ४२:३, ६.
धनावर नव्हे, देवावर भरवसा ठेवणे
१५. इयोबाची भिस्त धनसंपत्तीवर नव्हती हे आम्ही कसे जाणतो?
१५ बिल्ददने, इयोब देवाला विसरला होता व त्याचे चित्त दुसरीकडे कोठे होते असे सांगून इयोबाच्या विश्वस्तपणाविषयी संशय व्यक्त केला. (इयोब ८:१३, १४) इयोबाला भौतिक संपत्तीचा आशीर्वाद मिळाला होता तरी त्याचा भरवसा त्या गोष्टीत नव्हता. त्याने आपली संपदा गमाविली तरी तो आपल्या सचोटीपासून तिळमात्र ढळला नाही. (इयोब १:२१) आपल्या समारोपाच्या समर्थनात इयोबाने म्हटले: “जर मी सुवर्णावर भरवसा ठेवला असता, ‘तुजवर माझी भिस्त आहे’ असे सुवर्णास म्हटले असते; जर माझे धन बहुत आहे, माझ्या हातांनी फार कमाई केली आहे याचा मी आनंद केला असता . . . तर हाही न्यायाधीशांपुढे नेण्याजोगा गुन्हा झाला असता; अशाने मी उर्ध्वलोकीच्या देवाशी दगा केला असे झाले असते.”—इयोब ३१:२४–२८.
१६. (अ) आम्ही स्वतःचे कोणते परीक्षण करावे? (ब) जे देवावर भरवसा ठेवतात अशांना तो कोणते अभिवचन देतो?
१६ आम्हाबद्दल काय? आम्ही आपली भिस्त कोठे ठेवून आहोत—यहोवावर की भौतिक धनावर? इयोबाने इच्छिले त्याप्रमाणे आम्हालाही तराजूत तोलून पाहिले तर याबाबतीत आमची सचोटी ती काय, हे देवास समजू शकेल काय? आमच्या सचोटीच्या मार्गाक्रमणाद्वारे यहोवा देवाला सैतानाच्या टोमण्याला योग्य ते उत्तर देता यावे हीच आमच्या जीवनातील सर्वप्रथम काळजी आहे का? किंवा आमची प्रमुख कळकळ सुखविलास व मालकी हक्काच्या वस्तु याविषयीची आमची इच्छा तृप्त करीत राहणे ही आहे? आमच्या स्वतःवर आणि आम्हापाशी उपलब्ध असणाऱ्या भौतिक गोष्टी याला अवास्तव महत्व न देता आम्ही इयोबाप्रमाणे राहणे आणि यहोवावर भिस्त ठेवून त्याचे हृदय आनंदीत करणे हे केवढे चांगले आहे बरे! आम्ही यहोवावर भरवसा ठेवला, त्याच्या आस्थांना प्रधान स्थानी ठेवले तर तो आम्हाला कधीही न सोडण्याचे वा टाकून न देण्याचे अभिवचन देतो.—मत्तय ६:३१–३३; इब्रीयांस १३:५, ६.
लैंगिक नैतिकता
१७. इयोबाच्या “सांत्वन कर्त्यां”नी कोणता आळ घेतला, पण इयोबाने आपल्या नैतिक वागणुकीविषयी काय म्हटले?
१७ इयोबाच्या भिकार सांत्वनकर्त्यांनी इयोबावर लैंगिक गैरवर्तणुकीचा थेट आरोप केला नव्हता तरी त्यांनी, त्याने काहीतरी गुप्त चुक केली होती म्हणूनच देवाकडून त्याला ही शिक्षा मिळाली असे वारंवार प्रतिपादित केले. सधन मनुष्य व खरे पाहता, “पूर्व देशातल्या सर्व लोकात थोर” असल्यामुळे इयोबाला वैवहिक बंधनाबाहेर लिंगाचार साधण्याच्या अनेक संधि प्रस्तुत होत्या. (इयोब १:३; २४:१५) इयोबाच्या आधीचे व नंतरचे काही देवाचे सेवक लैंगिक मोहपाशास बळी पडले. (उत्पत्ती ३८:१५–२३; २ शमुवेल ११:१–५) तरीपण, इयोबाने अशा स्वरूपाच्या चुकीच्या मार्गाक्रमणाला जवळ येऊ दिले नाही. त्याने म्हटले: “मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ? . . . माझे मन कोणा स्त्रीला पाहू लंपट झाले, मी आपल्या शेजाऱ्याच्या दाराशी टपून बसलो . . . [तर] हे दुष्कर्म आहे, हा न्यायाधिशांनी शिक्षा करण्याजोगा गुन्हा आहे.”—इयोब ३१:१, ९–११.
१८. लैंगिक नैतिकतेचे जतन करणे एवढे कठीण का आहे, तरीपण आम्ही ती राखली तर आम्ही धन्य का ठरू शकू?
१८ व्यभिचाराच्या नादी लावून देवाच्या सेवकांची सचोटी भंगविण्यात सैतानाला दुसऱ्या कोणाही मार्गाने एवढे यश प्राप्त झाले नसेल. (गणना अध्याय २५) लैंगिक गैरवर्तनास उद्युक्त करणाऱ्या सर्व मोहपाशांना धुडकावून लावण्यात तुम्ही इयोबाच्या सचोटीचे अनुकरण कराल का? लैंगिक विषयाने वेडापिसा झालेल्या व अनैतिकता बोकाळलेल्या सध्याच्या जगात हे खरे आव्हान आहे. पण जेव्हा समाचाराचा दिवस येईल तेव्हा इयोबाप्रमाणेच मोठ्या आत्मविश्वासाने हे म्हणणे केवढे सांत्वनदायक ठरेल की, ‘देवाला माझी सात्विकता माहीत आहे’!—इयोब ३१:६.
काय आम्हाला मदतगार ठरू शकेल
१९. सचोटी राखण्यात काय महत्वपूर्ण गोष्टी आम्हास मदतगार ठरतील?
१९ इयोबाच्या सचोटीचे अनुकरण करणे तितके सोपे नाही कारण सैतान आजही इयोबाप्रमाणेच आमची सचोटी मोडण्याचा फारच पराकाष्ठेचा प्रयत्न करीत आहे. याकारणास्तव, देवाकडिल संपूर्ण शस्त्रसामग्री आम्ही धारण केली पाहिजे. (इफिसकर ६:१०–१८) यामध्ये देवाशी इयोबासारखे संधान राखणे आणि आम्ही वा आमचे कुटुंब जे काही करू त्यामध्ये त्याला संतुष्ट करण्याची जाणीव राखणे या गोष्टी समाविष्ट आहेत. (इयोब १:५) यामुळेच, पवित्र शास्त्र अभ्यास, समविश्वासूबरोबरचा नियमित सहवास आणि आमच्या विश्वासाची जाहीर घोषणा महत्वपूर्ण आहे.—२ तिमथ्यी २:१५; इब्रीयांस १०:२५; रोमकर १०:१०.
२०. (अ) परिक्षाप्रसंगात कोणती आशा आम्हास जतन करून ठेवू शकते? (ब) सचोटी राखणाऱ्यांविषयीचे स्तोत्रकर्त्याने उल्लेखिलेले कोणते प्रतिफळ आम्हाला मिळू शकेल?
२० तथापि, परीक्षाप्रसंगात जे आम्हाला टिकवून ठेवू शकते ते तेच आहे ज्याने इयोबाला टिकविले—सद्य जीवन एवढेच सर्वकाही नाही हा त्याचा आत्मविश्वास. “मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय?” इयोबाने विचारले. याच्या उत्तरात तो म्हणाला: “तू मला हाक मारशील व मी तुला उत्तर देईन.” (इयोब १४:१३–१५) अगदी असाच आत्मविश्वास की, यहोवा त्याच्या विश्वासू सेवकांना पुनरूत्थित करील, आम्हाला सैतानाच्या कोणत्याहि परीक्षेचा सामना देण्यासाठी धैर्यवान बनवील. (इब्रीयांस ६:१०) बऱ्याच काळाआधी पवित्र शास्त्र स्तोत्रकर्त्याने लिहिले: “मला तर तू माझ्या सचोटीमुळे स्थिर राखतोस. मला तू आपल्या सम्मुख सर्वकाळ ठेवतोस.” (स्तोत्रसंहिता ४१:१२) यहोवा आम्हास स्थिर करो आणि त्याचे सचोटी रक्षणकर्ते सेवक ठरल्यामुळे सदासर्वकाळासाठी बचावून ठेवो—हेच आम्हा प्रत्येकाचे आनंदी भवितव्य ठरो!
तुम्ही उत्तर द्याल का?
◻ इयोबासारखे असल्याचे कोणी सिद्ध केले, आणि त्यांच्यामध्ये कोणती समांतरता सांगता येते?
◻ इयोबाने परीक्षांबद्दल जी प्रतिक्रिया दर्शविली त्याकडून आम्ही काय शिकू शकतो?
◻ इयोबाने सुधारणूकीविषयी कसला प्रतिसाद दर्शविला आणि आम्ही याकडून काय शिकतो?
◻ इयोबाने भौतिक गोष्टी व लैंगिक नैतिकता याबद्दल कोणते सुंदर उदाहरण मांडले?
◻ इयोबाने राखली तशी सचोटी राखण्यात आम्हाला काय मदतगार ठरू शकते?
[२८ पानांवरील चित्र]
इयोबाप्रमाणे तुम्हीही, ‘सचोटी राखण्याकरवी सध्या फायदा काय,’ असा प्रश्न कधी केला होता का?