वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ५/१ पृ. २१-२६
  • इयोबाची सचोटी—एवढी अप्रतिम का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • इयोबाची सचोटी—एवढी अप्रतिम का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • इयोबाचे मर्यादित ज्ञान
  • इयोबाच्या सचोटीविषयीचा वाद
  • हल्ल्याचा आणखी एक प्रकार
  • इयोबाचे समर्थन व सुधारणूक
  • ईयोबाने सहन केले—आपणही करू शकतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • ईयोबाने यहोवाच्या नावाचे गौरव केले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • ईयोब पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • इयोबाची सचोटी—ती कोणास अनुसरता येईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ५/१ पृ. २१-२६

इयोबाची सचोटी—एवढी अप्रतिम का?

“माझा प्राण जाईतोवर मी आपली सचोटी सोडणार नाही.”—इयोब २७:५.

१. इयोब कोण होता व तो खरी व्यक्‍ती होता हे आपल्याला कसे कळते?

इयोब इतिहासातील उल्लेखनीय माणूस होता. त्याच्यापाशी मोठी धनसंपति होती इतकेच नसून दयाळू शास्ता व नेता या अर्थीही त्याचा मोठा मान मरातब होता. पवित्र शास्त्र म्हणते की, “पूर्व देशातल्या सर्व लोकात तो थोर होता.” (इयोब १:३; २९:१२–१५) धार्मिक मनुष्य या अर्थी त्याला नोहा व दानिएल यांच्या मालिकेत ठेवले गेले. (यहेज्केल १४:१४, २०) ख्रिश्‍चनांकरता अनुकरणासाठी एक उदाहरण या नात्याने पवित्र शास्त्र इयोबाला सादर करते. त्यामुळे तो इतिहासातील खरी व्यक्‍ति होता हे स्पष्ट दिसते.—याकोब ५:११.

२. सैतानाकडून इयोबाची जी परिक्षा झाली त्याचा काळ कसा निश्‍चित ठरविता येतो?

२ इयोब ऊस देशात राहात होता जेथे सध्याचा अरेबिया देश आहे. तो इस्राएली नव्हता तरीही यहोवाचा उपासक होता आणि हीच गोष्ट यहोवाने सैतानाच्या लक्षात आणून दिली. देवाने जे म्हटले की, “भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा . . . असा दुसरा कोणी नाही” ते हे प्रकटविते की, त्या काळी उल्लेखनीय असा दुसरा कोणीही देवाचा सेवक हयात नव्हता. (इयोब १:८) याकारणास्तव, सैतानाकरवी इयोबाची घडलेली परीक्षा, त्याचे दूरचे नातेवाईक इस्राएल लोक यांना इ.स.पू. १६५७ मध्ये अप्रतिम असा सचोटी रक्षक योसेफ याच्या मृत्यूनंतर जी दास्यता मिसरात मिळाली त्यावेळेला तसेच मोशाने सचोटीच्या मार्गाक्रमणाचा मागोवा घेण्याआधी घडली असावी.

३. इयोबाचे पुस्तक कोणी लिहिले व त्याला ती माहिती का मिळू शकली?

३ मोशानेच इयोबाचे पुस्तक लिहिले हे उघड आहे. पण त्याला इयोबाच्या परिक्षेबद्दल कसे कळले असावे बरे? इ.स.पू. १५५३ मध्ये मोशाला मिसर सोडून देणे भाग पडल्यावर तो मिद्यान येथे राहावयाला लागला. हे ठिकाण ऊस देशापासून दूर नव्हते. (निर्गम २:१५–२५; प्रे.कृत्ये ७:२३–३०) त्यावेळी इयोब, यहोवाने त्याला आशीर्वादित केलेल्या शेवटच्या १४० वर्षांच्या काळात जगत होता. (इयोब ४२:१६) नंतर इस्राएल लोक अरण्यवासाच्या प्रवासात शेवटी ऊस देशानजीक होते तेव्हा मोशाला इयोबाच्या जीवनाच्या समाप्तीवर्षाबद्दल व त्याच्या मृत्यूबद्दल कळले असावे.

इयोबाचे मर्यादित ज्ञान

४. (अ) यहोवा देवासंबंधीच्या इयोबाच्या ज्ञानाचा उगम बहुधा कोणता असावा, व त्याने अब्राहाम आणि इसहाक यांच्या संतानासोबत दळणवळण राखले असावे हे निश्‍चितपणे का म्हणता येईल? (ब) इयोब सचोटी राखणारा अप्रतिम माणूस कसा बनला?

४ इयोबाची परिक्षा झाली त्यावेळी पवित्र शास्त्राच्या कोणत्याही भागाचे लिखाण झाले नसल्यामुळे त्याचे देव व त्याच्या उद्देशाविषयीचे ज्ञान मर्यादित होते. तरीपण इयोबाला, यहोवाने अब्राहाम, इसहाक, याकोब व योसेफ यांच्या बरोबरच्या दळणवळणाची माहिती असावी, याचे कारण असे की इयोब हा अब्राहामाचा भाऊ नाहोर व त्याचा ज्येष्ठपुत्र ऊस याचा वंशन होता. आणखी एक गोष्ट अशी की, ऊसचा भाऊ बथुवेल होता, जो इसहाकाची बायको रिबका हिचा बाप व योसेफ या पणजोबा होता. (उत्पत्ती २२:२०–२३) यहोवाने अब्राहाम व त्याच्या संतानासोबत जे दळणवळण राखले त्याविषयीची जेवढी माहिती त्याला मिळाली ती इयोबाने जतन करून ठेवली व त्यालाही यहोवास संतुष्ट करण्याची इच्छा वाटत होती. या प्रकारामुळे इयोब सचोटी राखणारा, सात्विक आणि यहोवावर पुर्णपणे निष्ठा ठेवणारा अप्रतिम माणूस बनला.

५. इयोबाची सचोटी खासपणे कशामुळे अप्रतिम बनते?

५ योसेफाचा मिसरात मृत्यू घडल्यानंतर जादा काळ गुदरला नसेल तेव्हा इयोबाची सचोटी हा अदृश्‍य स्वर्गात यहोवा देव व सैतानामधील वादाचा विषय बनला. तरीपण या सचोटीभोवती गुंफलेल्या या वादाविषयी इयोबाला काहीही माहिती नव्हती. तरीपण, खासपणे, आपल्याला का छळ होत आहे त्याविषयीच्या अजाणतेमुळेच त्याची अतूट अशी सचोटी मोठी लक्षणीय बनते. देवाच्या सर्व सेवकांच्या फायद्यासाठीच यहोवाने नंतर मोशाला इयोबाच्या सचोटी विषयाबद्दल जो वाद निर्माण झाला होता त्याविषयी लिखाण करण्यास प्रवृत्त केले.

इयोबाच्या सचोटीविषयीचा वाद

६. (अ) स्वर्गात भरलेल्या सभेमुळे देव व सैतानामधील वादाविषयीचे प्रकटन कसे होऊ शकले? (ब) या वादाचा मुळांरभ कोठे होता व त्यात कशाचा समावेश होता?

६ इयोबाचे पुस्तक अदृश्‍य घटनांचा पडदा सरकवते आणि आम्हापुढे स्वर्गामध्ये यहोवा देवापुढे दिव्यदूतांच्या भरलेल्या सभेचा प्रसंग सादर करते. तेथेच उपस्थित असलेल्या सैतानाला यहोवा स्मरण देतो की, “भूतलावर [इयोबाच्या] तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही.” (इयोब १:८) अशाप्रकारे इयोबाची सचोटी समाविष्ट असणाऱ्‍या वादविषयाची येथे सुरूवात दिसते. पण हा काही नवा वादविषय नाही. सैतानाने आदाम व हव्वेला देवापासून दूर नेले व त्याच्या परिणामात जेव्हा जणू हे म्हटले की, ‘मला जरा संधि तर दे व मग पहा, मी सर्वांना तुझी सेवा करण्यापासून परावृत्त करतो की नाही,’ तेव्हाच या वादग्रस्त प्रश्‍नाला हात घातला गेला.—उत्पत्ती ३:१–६.

७. इयोबाच्या सचोटीविषयी सैतानाने कोणते मत प्रकट केले आणि दियाबलाने देवापुढे कोणते आव्हान प्रस्तुत केले?

७ स्वर्गातील या शासकीय सभेमध्ये सैतानाला इयोबाच्या सचोटीच्या आधाराविषयी आपले मत प्रकटविण्याचा वाव दिला जातो. “इयोब देवाचे भय काय फुकट बाळगतो?” असे तो विचारतो. “तो, त्याचे घर व त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातले आहे ना? . . . [तर आता] तू आपला हात पुढे करून,” सैतान आव्हान देतो, “त्याच्या सर्वस्वास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.”—इयोब १:९–११.

८. (अ) सैतानाच्या आव्हानाला यहोवाने कोणते उत्तर दिले? (ब) इयोबावर सैतानाने कोणते भयंकर हल्ले चढविले?

८ यहोवा सैतानाचे आव्हान पत्करतो. त्याचा इयोबाच्या सचोटीवर पूर्ण विश्‍वास आहे. याकरताच तो सैतानाला उत्तर देतो: “पाहा, त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो; त्याला मात्र हात लावू नको.” (इयोब १:१२) सैतान लगेच इयोबावर घाला घालतो. शबाई लोक इयोबाचे १००० बैल व ५०० गाढवी घेऊन जातात व त्यावर देखरेख ठेवणाऱ्‍या सर्व चाकरांना एकाशिवाय ठार करतात. पुढे सैतान स्वर्गातून अग्नि पाठवून इयोबाची ७००० मेंढरे व त्यावरील चाकर यांना भस्म करतो. त्यातून एकजण निभावतो. यानंतर सैतान खास्द्यांच्या तीन तुकड्यांना पाठवून इयोबाचे ३,००० उंट चोरून नेतो आणि एकाशिवाय सर्व चाकरांना मारतो. शेवटी सैतान जेथे इयोबाची १० मुले मेजवानी करत असतात त्या घरावर मोठे वादळ आणून घराचा चुराडा करतो व मुलांना ठार मारतो. मग उरलेले चाकर एकामागून येऊन इयोबाला घडलेल्या भयंकर घटनेची माहिती देतात.—इयोब १:१३–१९.

९. इयोबावर आलेल्या विपत्ती कशामुळे सहनतेकरता खूपच जड वाटल्या, तरीदेखील त्याबद्दल इयोबाची कशी प्रतिक्रिया होती?

९ केवढ्या ह्‍या विपत्ति! त्या कोणाकडून आल्या हे इयोबाला समजले असते तरी त्यांचा भार सोसण्यास खूपच जड होता. पण त्याला ते समजले नाही. स्वर्गातील वादविषयाचे केंद्रस्थान तो होता व यहोवा देव त्याचा, सैतानाने केवढाहि निर्दयी त्रास आणला तरी आपली सचोटी टिकवून ठेवणारे लोक आहेत हे प्रदर्शित करण्यासाठी वापर करीत होता हे त्याला ठाऊक नव्हते. त्यामुळेच दुःखाने त्रस्त होऊन व आपल्या नुकसानीस देव काहीसा जबाबदार आहे असे वाटून इयोबाने म्हटले: “यहोवाने दिले आणि यहोवानेच नेले; धन्य यहोवाचे नाम!” होय, “ह्‍या सर्व प्रसंगात इयोबाच्या हातून पाप झाले नाही व अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही.”—इयोब १:२०–२२.

१०. (अ) इयोबाविषयीची कोणती पुढची अनुमति सैतान विचारतो, आणि यहोवा ती देण्याची का तयारी दाखवितो? (ब) इयोबाला जी शोचनीय स्थिति प्राप्त होते त्याचे कोणते परिणाम दिसतात?

१० पुनः देवदूतांच्या दुसऱ्‍या सभेमध्ये सैतानाला केवढे लाजल्यासारखे वाटले असावे जेव्हा यहोवाने इयोबाबद्दल त्याला स्मरण दिले की, “तो आपली सचोटी अद्याप दृढ धरून राहिला आहे”! पण सैतान हार मानत नाही. आता तो आव्हान करतो की त्याला इयोबाच्या शरीरावर प्रहार करण्याची अनुमति मिळाली तर मग इयोब नक्कीच देवाला तोंडावर शाप देईल. आता येथेही इयोबाच्या सचोटीवर भरवसा ठेवून यहोवा सैतानाला अनुमति देतो व बजावतो की त्याचा जीव त्याने घेऊ नये. तद्वत, सैतान ‘इयोबास मोठमोठ्या गळवांनी नखाशिखात अतिशय पीडितो.” (इयोब २:१–८) इयोबाची अशी शोचनीय स्थिति बनते की त्याचा मित्रपरिवारही त्याच्या पुढून लाजेने मान खाली घालून जातो आणि पूर्वीचे त्याचे परिचित त्याची थट्टा उडवितात.—इयोब १२:४; १७:६; १९:१३–१९; ३०:१, १०–१२.

११. आणखी कोणता तडाखा इयोबाला सहन करावा लागला आणि या सर्व त्रासात इयोबाची सचोटी राखणे कशामुळे अप्रतिम बनवते?

११ आता आणखी एक तडाखा! इयोबाच्या बायकोचा विश्‍वास डळमळतो. ती त्याला म्हणते: “तुम्ही अजुनही सचोटी धरून राहिला आहात का? देवाला शाप द्या व मरून जा!” पण तो तिला म्हणतो: “तू धर्महीन स्त्रियांप्रमाणे बोलतेस, देवापासून सुखच घ्यावे, आणि दुःख घेऊ नये का?” अहवाल म्हणतो त्याप्रमाणे, “ह्‍या सर्व प्रसंगी इयोबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही.” (इयोब २:९, १०) इयोबाकडून त्याच्या त्रासाचे कारण लपविण्यात आले होते हे तुम्ही लक्षात घेता तेव्हा त्याची सचोटी केवढी अप्रतिम ठरते!

हल्ल्याचा आणखी एक प्रकार

१२. (अ) इयोबाचे सांत्वन करण्यासाठी कोणती माणसे आली? (ब) इयोबाची आणखी परीक्षा पाहण्याकरिता सैतानाने या मनुष्यांचा कसा वापर केला?

१२ तथापि, सैतान एवढ्यातच लढत संपवीत नाही. तो अशा तिघा तथाकथित सूज्ञ जणांना सामोरे आणतो ज्यांना इयोबाचा व्यक्‍तिशः परिचय असावा वा त्यांनी त्याच्या विषयी, तो “पूर्व देशात सर्व लोकात . . . थोर होता” ही ख्याति ऐकली असावी. ते इयोबापेक्षा वयाने मोठे आहेत हे स्पष्ट दिसते. (इयोब १:३; १५:१०; ३२:६) त्यांच्यापैकी दोघे दूरचे नातेवाईक आहेत. अलीफज तेमानी हा एसावाचा नातू तेमान याकरवी अब्राहामाचा वंशज आहे आणि बिल्दद शूही हा अब्राहामाचा मुलगा शुह याचे संतान आहे. (इयोब २:११; उत्पत्ती ३६:१५; २५:२) सोफरची वंशावळी अनिश्‍चित आहे. वरपांगी रितीने ही तिघे इयोबाचे सांत्वन करावयाला येतात पण वस्तुतः इयोबाची सचोटी भंगवावी या करता सैतान त्यांचा वापर करतो. जसे विचारपूस करणारे राजकीय अधिकारी स्वतःला मित्र असल्याचे भासवतात पण कैद्यांची निष्ठा भंगवावी व त्यांना आपल्या स्वतःच्या सरकाराविरूद्ध उभे करावे हा त्यांचा हेतू असतो. त्याप्रमाणेच हे तिघे “सांत्वनकर्त्ते” इयोबाला देवाविरूद्ध प्रवृत्त करतील ही आशा सैतान धरतो.—इयोब १६:२, ३.

१३. (अ) इयोबाचे पाहुणे आल्यावर त्यांनी काय केले? (ब) बोलायला सुरूवात झाल्यावर त्यानी कोणता मार्ग धरला?

१३ इयोबाकडे आल्यानंतर त्या तीन पाहुण्यांनी सात दिवस व सात रात्री इयोबाला होणाऱ्‍या यातना व त्याची दैन्यावस्था शांतपणे पाहिली. (इयोब २:१२, १३) सरतेशेवटी त्यांच्यामध्ये मोठा असणारा अलीफज बोलण्यास आरंभ करतो व तो असा सर्वसाधारण विषय मांडतो ज्या करवी त्रिपक्षीय व तीन फेऱ्‍यांचा परिसंवाद निर्माण होतो. अलीफजचे भाषण व त्यावर त्याच्या मित्रांची भाषणे बहुधा आरोपयुक्‍त गोष्टींचा सूर व्यक्‍त करतात. प्रत्येकाने आपले आरोपाचे भाषण केल्यावर इयोब त्याला प्रत्युत्तर देऊन त्यांच्या वादाचे खंडण करतो. सोफर वादाच्या तिसऱ्‍या फेरीत काही बोलत नाही. बहुधा आपल्याला अधिक काही सांगावयाचे नाही असे त्याला वाटले असावे. अशाप्रकारे सोफर परिसंवादाच्या दोन फेरी तर अलीफज व बिल्दद हे प्रत्येकी तीन फेरी घेतात.

१४. इयोबाविरुद्ध कोणत्या प्रकारचा विवाद त्या तिघांनी मांडला आणि अशाच प्रकारची धूर्त युक्‍ति सैतानाने येशूविरूद्ध कशी वापरली?

१४ अलीफजची भाषणे मोठमोठी आहेत पण त्याची भाषा काहीशी मृदु आहे. बिल्ददची भाषा पीडादायक आहे तर सोफरची त्याहून अधिक आहे. त्यांचा वाद अत्यंत धूर्तपणे, इयोबाची सचोटी भंगवावी या सैतानाच्या उद्देशाची परिपूर्ति व्हावी म्हणून मांडला जातो. ते खरी वस्तुस्थिति सांगतात पण त्यामागील पार्श्‍वभूमि व त्याचा अवलंब चुकीने करतात. अगदी हीच पद्धत सैतानाने येशूविरूद्ध वापरली. देवाचे दूत त्याच्या लोकांना इजा होण्यापासून बचावतील या शास्त्रवचनाचा संदर्भ घेऊन सैतान येशूला, तो देवाचा पुत्र आहे हे सिद्ध करून दाखविण्यासाठी मंदिरावरून खाली उडी मारण्यास सांगतो. (मत्तय ४:५–७; स्तोत्रसंहिता ९१:११, १२) सैतानाच्या या विचारपद्धतीशी इयोबाला बराच काळ सामना करावा लागला.

१५. इयोबाच्या त्रासाचा उगम कोठून आहे असा वाद अलीफजने केला?

१५ आपल्या प्रास्ताविक भाषणात अलीफज म्हणतो की इयोबावर आलेली विपत्ति ही त्याच्या पापास्तव देवाने दिलेला दंड आहे. “कोणी निरपराध असून कधी नाश पावला आहे काय?” असे तो विचारतो. “माझ्या पाहण्यात तर असे आहे की जे अधर्माची नांगरणी करतात व दुःखाची पेरणी करतात ते तशीच कापणी करतात.” (इयोब ४:७, ८) पुढे अलीफज दाव्याने म्हणतो की देव आपल्या सेवकांविषयी भरवसा बाळगीत नाही. “पाहा, तो तर आपल्या सेवकांचाही भरवसा धरीत नाही,” अलीफज म्हणतो, “तो आपल्या दिव्यदूतांस प्रमाद केल्याचा दोष लावतो. तर मृत्तिका गृहात जे राहतात . . . त्यांचा त्याच्यापुढे काय पाड!”—इयोब ४:१८, १९.

१६. अलीफजच्या हल्ल्याचा मागोवा बिल्दद कसा अनुसरतो; व कोणत्या अयोग्य उदाहरणाचा तो वापर करतो?

१६ बिल्दद शाब्दिक हल्ला करतो. “तू शुद्ध व सरळ असलास तर,” तो म्हणतो, “खात्रीने [देव] तुझ्या हितास जागेल, तुझा निर्दोष निवास यथापूर्वक करील.” बिल्दद म्हणतो की लव्हाळा व बोरू पाण्यावाचून सुकतात व मरतात. या मुळेच, तो यथार्थ निर्वाळा देतो की, “देवास विसरून जाणाऱ्‍यांची गति अशीच आहे.” पण हे उदाहरण इयोबाला लागू करणे व पुढे, “भक्‍तिहीनांची आशा मावळते” असे हे त्याचे म्हणणे केवढे चुकीचे वाटते!—इयोब ८:६, ११–१३.

१७. सोफर कोणते भारी उद्‌गार काढतो?

१७ सोफरचे उद्‌गार तर अधिक भारी आहेत. ‘देव जर बोलला व त्याला काय वाटते ते त्याने सांगितले तर!’ असे तो एकंदरीत म्हणतो. ‘तू काय केले हे देवाला ठाऊक आहे. तुला झाली पाहिजे त्यापेक्षा कितीतरी तो कमी शिक्षा करीत आहे. तू आपला सर्व अधर्म दूर करून पापापासून दूर हो; तर निश्‍चये तू निर्भय होशील आणि तुला पुष्कळ मित्र मिळतील.’—इयोब ११:४–६, १४–२०.

१८. वादाच्या दुसऱ्‍या फेरीत ते तिघे इयोबावरील हल्ला कसा पुढे नेतात?

१८ विवादाच्या दुसऱ्‍या फेरीत अलीफज परत इयोबाच्या सचोटीवर हल्ला करतो. ‘देव आपल्या दूतांचाही विश्‍वास धरीत नाही तर तुझ्यासारख्या क्षुद्राची काय कथा? दुर्जन नेहमीच संकटात पडतो.’ (इयोब १५:१४–१६, २०) वादाविषयी इयोबाने व्यक्‍त केलेला प्रतिकार पाहून बिल्दद क्रोधाविष्ट होतो व जणू असे म्हणतो: ‘तुझा दिवा मालवेल, तुझ्या अस्तित्वाचे सर्व स्मरण नाहीसे होईल. देवास विसरणाऱ्‍यांचे असेच होत असते.’ (इयोब १८:५, १२, १३, १७–२१) इयोबाच्या पूर्वीच्या ऐश्‍वर्याचा उल्लेख करून सोफर विचारतो: ‘दुर्जनांचा जयजयकार अल्प असतो व भक्‍तिहीनांचा आनंद क्षणिक असतो हे तुला ठाऊक नाही का? आकाश दुष्टांचा अधर्म प्रकट करीत असतो.’—इयोब २०:४, ५, २६–२९.

१९. (अ) अलीफजच्या मते देव मानवाच्या सचोटीचे केवढे मोल राखतो? (ब) बिल्दद इयोबावरील शाब्दिक हल्ला कसा संपवितो?

१९ वादाच्या तिसऱ्‍या फेरीची सुरूवात करताना अलीफज विचारतो: ‘माणसाकडून देवाला काही लाभ आहे का? तू सात्विक असलास तर त्यामुळे देवाचा काही फायदा होईल का? देवाकडे परत वळ,’ तो म्हणतो, ‘आणि त्याच्याशी सरख्य कर. अशाने तुझे कल्याण होईल.’ (इयोब २२:२, ३, २१–२३) बिल्दद आपला शाब्दिक हल्ला या प्रकार संपवितो: ‘मी शुद्ध आहे असा दावा पृथ्वीवरील कोणास करता येईल?’ तो विचारतो. ‘देव इतका वैभवी आहे की त्याच्यापुढे चंद्र व तारेही जणू काहीच नाहीत. तर मग त्याच्या दृष्टीने कृमि ठरलेला मुनष्य केवढा क्षुद्र असणार!’—इयोब २५:२–६.

इयोबाचे समर्थन व सुधारणूक

२०. (अ) देव पापासाठी शिक्षा म्हणून त्रास देतो या वादाला इयोब कसे उत्तर देतो? (ब) इयोबचा निश्‍चय काय आहे आणि त्याची सचोटी देवाला खरीच मोलवान वाटत होती हे आम्हाला कसे समजू शकते?

२० भयंकर त्रास असला तरी इयोब क्षणार्धासाठी सुद्धा आपल्या जाचकांच्या फसव्या विवादाला बळी पडत नाही. शारीरिक पीडा ही देवाकडून पापासाठी लाभलेली शिक्षा आहे तर, तो विचारतो: “दुष्ट जिवंत का राहतात? ते वयोवृद्ध का होतात? ते समृद्ध का होतात?” (इयोब २१:७–१३) इयोबाच्या निंदकांच्या मताविरूद्ध देव खरेपणाने आपल्या सचोटी रक्षणकर्त्यांचे मोल जाणत असतो कारण याकरवीच, ‘देवाच्या सेवेपासून मला कोणालाही परावृत्त करता येईल’ या सैतानाच्या टोमण्यास तो पुरेपूर उत्तर देऊ शकतो. (नीतीसूत्रे २७:११; स्तोत्रसंहिता ४१:१२) इयोबाला आपल्या सचोटीविषयी आत्मविश्‍वास वाटत असतो आणि म्हणूनच तो जाहीर करतो: “माझा प्राण जाईतोवर मी आपली सचोटी सोडणार नाही!” (इयोब २७:५) त्याच्यावर जे काही गुदरले होत त्याला पात्र ठरण्याजोगे असे काहीही त्याने केले नव्हते.

२१. इयोबाच्या भिकार सांत्वनकर्त्यांना अलीहूने काय म्हटले आणि त्याने इयोबाला कोणती आवश्‍यक सुधारणूक देऊ केली?

२१ इतक्या वेळेपर्यंत अलीहू हा तरूण मुलगा चाललेल्या वादा–प्रतिवादातील शब्द लक्ष देऊन ऐकत होता. तो आता बोलायला उठतो व म्हणतो की इयोबाच्या भिकार सांत्वनकर्फ़ांना इयोब पापी आहे हे सिद्ध करून दाखविता आले नाही. (इयोब ३२:११, १२) मग इयोबाकडे वळून अलीहू म्हणतो: “तुमचे बोलणे माझ्या कानी पडले: ‘मी शुद्ध आहे, निरपराध आहे, मी निष्कलंक आहे, मी निर्दोष आहे. पाहा, देव कसा मजविरूद्ध निमित्त शोधतो, तो मला शत्रू गणितो.’ . . . हे तुमचे बोलणे यथार्थ नाही.” (इयोब ३३:८–१३; ६:२९; १३:२४, २७; १९:६–८) होय, इयोबाने स्वतःचे समर्थन करण्याची फारच चिंता केली. पण याच वेळी त्याने देवाला कधीहि धिक्कारले नव्हते वा देव सर्व काही यथास्थित करील याबद्दलचा आपला आत्मविश्‍वास गमाविला नव्हता.

२२. (अ) यहोवाचे ऐकल्यावर इयोब कसा प्रतिसाद व्यक्‍त करतो? (ब) इयोबाच्या भिकार सांत्वनकर्त्याबाबतीत देव काय अपेक्षितो आणि इयोबास प्राप्त झालेली शेवटची परिणिती कोणती?

२२ अलीहू आपले संभाषण संपवितो त्यावेळी वादळ सुरू होते आणि यहोवा स्वतः वावटळीतून भाष्य करतो: “अज्ञानाचे शब्द बोलून दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा हा कोण? आता . . . आपली कमर बांध. मी तुला हे विचारतो; मला सांगा.” यहोवाचे ऐकल्यावर इयोब कबूल करतो की तो पूर्ण ज्ञान नसल्यामुळे उतावळेपणाने बोलून गेला त्यामुळेच तो “धूळराखेत बसून पश्‍चाताप करीत आहे.” यानंतर यहोवा अलीफज व त्याच्या दोन मित्रांचा धिक्कार करतो व इयोबाला त्यांच्याखातर प्रार्थना करायला सांगतो. यानंतर इयोबाला पूर्वस्थिति प्राप्त होते. त्याला सात मुले व तीन सुंदर मुली होतात. त्याच्यापाशी पूर्वी होते त्याच्या दुपटीने त्याला पशुधन मिळते. आणखी १४० वर्षे जगल्यानंतर इयोब “वृद्ध व पुऱ्‍या वयाचा होऊन मरण” पावतो.—इयोब ३८:१–४; ४२:१–१७.

२३. इयोबाच्या सचोटीने आम्हावर कसा परिणाम करावा?

२३ खरेच, इयोब हा सचोटी राखणारा अप्रतिम गृहस्थ होता! सैतानाच्या दुष्ट आव्हानाचे आपण निशान बनलो आहोत हे त्याला कळण्याचा मार्ग नव्हता. यामुळेच त्याची सचोटी अधिक महत्वाची ठरते कारण आपणावर ओढावलेला त्रास देवाकडून आहे असे त्याला वाटत होते तरी त्याने देवाचा धिक्कार केला नाही व त्याला शाप दिला नाही. यात आम्हाला केवढा मोठा धडा आहे, कारण आमच्या सचोटीच्या परीक्षांचा उगम आम्ही जाणून आहोत! तद्वत, इयोबाच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याची प्रेरणा आम्हाला झाली पाहिजे आणि देवाच्या शत्रूने आम्हावर काही जरी आणले तरी यहोवा देवाच्या कार्यात सतत प्रगमन करीत राहण्याचा आमचा विचार असण्यास हवा.

तुम्हाला उत्तर देता येईल का?

◻ कोणत्या गोष्टींमुळे इयोबाची सचोटी अप्रतिम ठरते?

◻ इयोबाची भेट कोणी घेतली व ते काय करू शकतील आशी सैतानाने अशा धरली?

◻ त्या तिघांनी इयोबाविरूद्ध कोणता विवाद मांडला?

◻ इयोबाने कोणते समर्थन केले पण त्याची कशी सुधारणा करण्यात आली?

◻ कोणता परिणाम निष्पण्ण झाला व याचा आम्हावर कसा प्रभाव होण्यास हवा?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा