कापणीच्या कामासाठी तातडीने कामकरी हवेत!
“पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा.”—लूक १०:२
१. लूक १०:२ मधील येशूचे शब्द वाचून तुम्ही कोणती प्रतिक्रिया व्यक्त कराल, पण तुम्हाला काय करण्याची सूचना आहे?
येशूचे हे शब्द वाचल्यावर, आपलाहि यात समावेश आहे असे तुम्हाला वाटते का? ते साधारण १९ शतके आधी उच्चारण्यात आल्यामुळे आता ते अर्थसूचक नाहीत असे कदाचित तुम्हाला वाटेल. पण असा हा घाईने घेतलेला निर्णय खराच चुकीचा ठरेल. येशूच्या शब्दांचे पूर्ण आकलन होण्यासाठी ते शब्द प्रथमतः जेव्हा उच्चारले गेले तेव्हा काय घडले गेले ते आपण पहिल्यांदा पाहू व नंतर आमच्या आजच्या परिस्थितीचे परीक्षण करू.—पडताळा १ करिंथकर १०:११.
२. इ.स. ३२ मधील कोणत्या परिस्थितीने येशूला तातडीच्या हालचालीची हाक दिली व त्याने ती कशी हाताळली?
२ इ.स. ३२ मध्ये मंडपाचा सण होऊन गेला होता व आता येशूच्या वधस्तंभावरील मृत्यू घडण्यास केवळ सहा महिन्यांचा अवधि होता. प्रचाराचे कार्य जलदगतिने व्हावे याकरता येशूने ७० जणांस “ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्याने आपणापुढे पाठविले.” ते निघाले तेव्हा येशूचे हे शब्द त्यांच्या कानी निनादत होते: “पीक फार आहे, परंतु कामकरी थोडे आहेत. म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा.”—लूक १०:१, २.
मोठी कापणी परिणामित होते
३. येशूच्या उपाध्यपणातील शेवटच्या महिन्यातील वाढीव प्रचारामुळे निष्पण्ण झालेले काही परिणाम सांगा.
३ या वाढीव प्रचाराच्या श्रमाचा कोणता परिणाम घडला? आम्ही वाचतो: “नंतर ते सत्तर जन आनंदाने परत येऊन म्हणाले: ‘प्रभूजी, आपल्या नावाने भुते देखील आम्हाला वश होतात.’” दुरात्म्यांवरील देवाच्या शक्तिचे हे केवढे सामर्थ्यशाली प्रदर्शन होते! कार्याच्या या सुंदर अहवालाने येशू नक्कीच भारावला असावा कारण त्याने म्हटले: “सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले आहे.” (लूक १०:१७, १८) येशूला ठाऊक होते की स्वर्गात मशीही राज्याचा जन्म घडल्यावर सैतान व त्याच्या दुरात्म्यांना तेथून सरतेशेवटी हाकलून दिले जाणार. तरीपण येशू अद्याप पृथ्वीवर असताना मानव अदृश्य दुरात्म्यांना बाहेर घालवू शकतो या गोष्टीमुळे त्याला त्या भावी आनंदमय प्रसंगाकरता अधिक खात्री मिळाली. या कारणास्तव, येशू सैतानाच्या स्वर्गातून होणाऱ्या भावी पतनासंबंधाने खात्रीशीर बोलला.—प्रकटीकरण १२:५, ७–१०.
४. निसान १४, ३३ इ.स.च्या आधी येशू व त्याच्या शिष्यांनी जे कापणीचे काम उरकले त्याचा काय उद्देश होता?
४ ज्या कापणी संबंधाने येशूने बोलणी केली तो कोणा धान्याचा वा फळांचा हंगाम नव्हता पण लोकांचा, राज्य संदेशास उत्स्फुर्ततेने प्रतिसाद देणाऱ्या मेंढरासमान लोकांना एकत्रित करण्याचा होता अशा या कापणीची फळे दृष्टोपत्तीस येऊ लागली होती. तरीपण, निसान १४, ३३ इ.स. च्या काही महिन्यांआधी येशू व त्याच्या शिष्यांनी जे हंगामाचे कार्य केले ते येशूच्या मृत्यु व पुनरूत्थानानंतर उरकल्या जाणाऱ्या भव्य कापणी कामाचा पाया होता.—पडताळा स्तोत्रसंहिता १२६:१, २, ५, ६.
५. इ.स. ३३ मधील पेंटेकॉस्टच्या वेळी कोणती उत्साहवर्धक घटना घडली व याचा त्यानंतरच्या कापणी कामावर कसा परिणाम घडला गेला?
५ आता इ.स. ३३ चा पेंटेकॉस्टचा दिवस उजाडला. यरूशलेमात येशूचे सुमारे १२० शिष्य जमले होते. “अकस्मात मोठया वाऱ्याच्या सुसाटयासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले . . . ते सर्वजण पवित्र आत्म्याने पूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.” ही प्रचंड कापणीची सुरूवात होती! “त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली.” (प्रे.कृत्ये १:१५; २:१–४, ४१) “ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत . . . देवाची स्तुति करीत हर्षाने व सालस मनाने जेवीत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि यहोवा तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे.” (प्रे.कृत्ये २:४६, ४७) नंतर आम्हाला आढळते: “विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरूष व स्त्रिया ह्यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले.” आणखी नंतर “देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरूशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली; याजकवर्गातीलही पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली.”—प्रे.कृत्ये ५:१४; ६:७.
६. प्रचारकार्यास झालेल्या विरोधामुळे राज्य फलप्राप्तीवर काय परिणाम दिसला?
६ आता राज्य संदेशाला विरोध वाढू लागला. त्यामुळे कापणीचे काम थंडावले का? नाही, कारण “ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले.” फिलिप्प शोमरोन शहरात गेला, लोकांनी त्याचे उत्सुकतेने ऐकले. दुरात्मिक बाधा असलेले, पक्षघाती व लूळे हे सर्व बरे झाले. त्यामुळेच “त्या नगरात आनंदीआनंद झाला” हे नवलाईचे नव्हते.—प्रे.कृत्ये ८:१–८.
७. येशूने आपल्या शिष्यांना प्रे.कृत्ये १:८ मध्ये दिलेल्या आज्ञेची पूर्णता केवढ्या प्रमाणात झाली?
७ पुनरूत्थित येशूने आपल्या शिष्यांना म्हटले होते: “यरूशलेमेत, सर्व यहुदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” (प्रे.कृत्ये १:८) कार्य करावयाच्या क्षेत्राचा विस्तार बघता अधिक कामकऱ्यांची—तातडीची—गरज भासली. शिष्यांचा केवढा मोठा हंगाम अपेक्षित होता! तो मिळत होता—देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने. घातकी वृत्तीच्या शौलाचे परिवर्तन घडल्यावर आम्हाला कळविले आहे: “सर्व यहुदीया, गालील व शोमरोन ह्या प्रदेशातील मंडळीस स्वस्थता मिळाली; आणि तिची उन्नति होऊन ती यहोवाच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली.” (प्रे.कृत्ये ९:३१) मेंढरासमान वृत्तीच्या लोकांना एकत्रित करण्याच्या कामास गति मिळाली तसे आरंभीच्या शिष्यांना येशूचे हे शब्द सारखे आठवत राहिले: “पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा.” तर मग, ‘पिकाचा धनी’ यहोवाने या प्रार्थनेला उत्तर दिले का? होय निश्चितपणे. तसे नसते तर हे कसे लिखित झाले असते की, “सुवार्ता . . . आकाशाखालच्या सर्व सृष्टीत घोषणा” होऊ शकली?—कलस्सैकर १:२३.
आजची अधिक निकड
८. राज्य कामकऱ्यांची निकड ही १९८०शीच्या काळात पूर्वीपेक्षा अधिक का वाटत आहे?
८ आज १९८०शीच्या काळात कापणीच्या कामकऱ्यांची गरज ही पूर्वी पेक्षा अधिक आहे. ते का बरे? कारण या जगाच्या क्षेत्राचा विस्तार आता वाढलेला आहे. त्यामुळेच कापणी करावे लागणारे पीक आता बहुपट बनले आहे. हे येशूने भाकित केलेल्या गोष्टीशी सहमत आहे. त्याने म्हटले होते की त्याचे अनुयायी सुवार्तेच्या बाबतीत त्याने पृथ्वीवर जितके कार्य केले होते त्याच्या परिमाणात मोठी कृत्ये करतील.—योहान १४:१२.
९. (अ) योहानाला प्रकटीकरण ७:१–३ मध्ये दिसलेल्या दृष्टांतात प्रचाराची आजची निकड कशी जोरदारपणे सांगितली आहे? (ब) प्रकटीकरण १४:४ मध्ये “देवासाठी व कोकऱ्यासाठी प्रथमफळ” या संज्ञेवरून कोणता अभूतपूर्व संकेत मिळतो?
९ आजच्या प्रचाराच्या कामामागे असणाऱ्या निकडीची संवेदना प्रकटीकरण ७:१–३ मध्ये योहानाला जो दृष्टांत दिसला त्याच्या नाट्यमय रचनेत दिसते. तेथे, “चार देवदूत पृथ्वीच्या चार कोनांवर उभे राहिलेले” व “पृथ्वीचे चार वारे अडवून धरीत” आहेत हे दाखविले गेले. ते त्या ‘चार वाऱ्यांवरील’ आपली पकड किती काळ घट्ट धरून ठेवणार? “आमच्या देवाचे जे दास आहेत त्याच्या कपाळावर . . . शिक्का मारीपर्यंत.’ पण हे किती काळ चालणार? याविषयीची सूचना एप्रिल ४, १९८५ रोजी झालेल्या प्रभूच्या सांजभोजन प्रसंगी केवळ ९,०५१ जणांनीच आपण १,४४,००० सदस्यांपैकींचे आहोत ही जी मान्यता कळविली त्यात मिळते. ज्याचे वर्णन प्रकटीकरण १४:४ मध्ये “देवासाठी व कोकऱ्यासाठी प्रथमफळ असे माणसातून विकत घेतलेले” असे केले आहे त्यांच्यातील हे शवटले सदस्य आहेत. यामुळेच असे दिसते की बहुतेक सर्व ‘प्रथमफळे’ गोळा झालेली आहेत. तथापि, “प्रथमफळ” या संज्ञेमुळे आणखी काही फळे आहेत असा अर्थ निघतो का? होय, अर्थातच हीच गोष्ट यहुद्यांच्या शेतकी वर्षाच्या समाप्तीला, मंडपाच्या सणाच्या वेळी इतर फळांचे जे महामूर उत्पन्न गोळा होत होते त्यामध्ये स्पष्ट दिसून येते.—अनुवाद १६:१३–१५.
१०. आधुनिक काळात कोणत्या दोन गोष्टींचा संग्रह केला जात आहे, आणि ही वस्तुस्थिति अधिक कापणीच्या कामकऱ्यांची किती नितांत गरज आहे याला कसे अधोरखित करते?
१० अशाप्रकारे हे स्पष्ट होते की अभिषिक्त जणांच्या शेषांचा कापणीसंग्रह समाप्तीला येत असता आणखी एका कापणी संग्राहाची सुरूवात होते. नेमके हेच, त्याच दृष्टांतात योहानाने जे पाहिले त्यात परावर्तित होत नाही का? “ह्यानंतर मी पाहिले तो पाहा, सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा . . . मोठा लोकसमुदाय . . . माझ्या दृष्टीस पडला.” योहानाला कळविले गेले: “मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत.” (प्रकटीकरण ७:९, १४) “मोठा लोकसमुदाय” याचे एकत्रीकरण पूर्ण करण्याचा फक्त थोडा काळ उरला आहे. एकदा का “पृथ्वीचे चार वारे” मोकळे सोडले व “मोठे संकट” सुरू झाल्याचा इशारा होईल तेव्हा फारच उशीर झालेला असेल! तर मग, जे आढळतील अशा बहुसंख्य लोकांना आणण्याकरता कापणीच्या कामकऱ्यांची केवढी नितांत गरज आहे ते तुम्हास दिसत नाही का?
हजारो प्रतिसाद देत आहेत
११. (अ) येशूची “दुसरी मेंढरे” कापणीत कितपर्यंत सहभागी होत आहेत? (ब) १९८५ च्या स्मृतिदिनाच्या उपस्थितिवरून काय सूचित होते?
११ मेंढरासमान असणाऱ्या लोकांचा संग्रह करण्याच्या कामाचे स्वरूप कसे विस्तारित राहील त्याविषयीचे भाकित करताना येशूने म्हटले: “ह्या मेंढवाडयातील नव्हत, अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पहिजेत. ती माझी वाणी ऐकतील; मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल.” (योहान १०:१४, १६) त्या ‘एक कळपा’शी अनुबंधित आहोत असे ३० लाखापेक्षा अधिक जणांनी आधीच प्रदर्शित केले आहे. यापैकीच्या १,८९,८००चा १९८५च्या कार्यवर्षात बाप्तिस्मा झाला. तरीपण स्मृतिदिनाच्या समारंभाची उपस्थिति ७७,९२,१०९ इतकी होती. हे आम्हास काय सांगते? हेच की आणखी खूप जणांनी मेंढपाळाची वाणी ऐकली आहे पण या वा त्या कारणामुळे त्यांनी येशूच्या “माझ्यामागे या” या उबदार आमंत्रणाला अद्याप प्रतिसाद दर्शविला नाही.—लूक ५:२७.
१२. कोणता महत्वाचा प्रश्न आम्ही स्वत:ला विचारण्यास हवा?
१२ ‘सद्य व्यवस्थीकरणाच्या समाप्ती’ काळात होत असलेल्या कापणीच्या कामाच्या बाबतीत तुम्ही कोठे उभे आहात? (मत्तय १३:३९) कापणीच्या आनंदात सहभागी होणाऱ्या प्रसन्न जमावापैकी तुम्ही एक आहात का? किंवा तुम्ही नुसते निरिक्षक आहात आणि “माझ्यामागे या” ह्या उत्तम मेंढपाळाच्या निमंत्रणास जाहीर प्रतिसाद देण्यापासून मागे हटता? आमच्या मागील लेखात लूकाच्या ९व्या अध्यायातील ज्या तीन माणसांची चर्चा करण्यात आली त्याच्यासारखी सबब सांगण्याची आम्ही कोणीही इच्छा करू नये. त्या तिघांना कशास मुकावे लागले त्याचा विचार करा—राज्य सेवेचा आनंद, ज्यात बहुधा भुतग्रस्त माणसांची सुटका करण्याचा अनुभवही समाविष्ट होता!—लूक ९:५७–६२; १०:१७.
१३. स्वेच्छापूर्ण कापणीचा कामकरी असण्यामध्ये विश्वास कशी महत्वपूर्ण भूमिका पार पाडतो?
१३ प्रेषित पौलाने म्हटले: “विश्वासावाचून [देवाला] संतोषविणे अशक्य आहे.” (इब्रीयांस ११:६) होय, स्वतःच्या आस्था बाजूला सारून आपले जीवन देवाला स्वेच्छेने समर्पित करून कापणीचा कामकरी बनण्यासाठी विश्वास लागतो. तुम्हाला कदाचित गंभीर आरोग्य समस्या असेल; कदाचित तुमच्या कौटुंबिक सदस्यांपैकी काहीजण यहोवाच्या साक्षीदारंचा कटु विरोध करीत असतील; कदाचित तुम्हाला वाटेल की आता काही बदल करण्यास आपण वृद्धापकाळामुळे असमर्थ आहोत; तसेच शाळेतील खडतर दबावास तोंड देण्यास आपणात ताकद नाही असेही वाटेल. तुमची परिस्थिति काहीही असो, तुमच्या समस्या इतरांपेक्षा यहोवा अधिक चांगल्या पद्धतीने जाणून आहे हे लक्षात असू द्या. तुम्ही आवश्यक असणारी पावले स्वतः उचलली तर तो तुमच्या समीप येऊन तुम्हाला त्याची सेवा करण्याच्या तुमच्या निर्धाराला बळकटी देत राहील याची खात्री असू द्या.—स्तोत्रसंहिता १०३:१३, १४; याकोब ४:८.
विश्वास ‘डोंगर’ हलवू शकतो
१४. मत्तय १७:२० मध्ये लिखित असणाऱ्या येशूच्या म्हणण्याचा काय अर्थ आहे ते सांगा.
१४ येशूने म्हटले: “तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला ‘इकडून तिकडे सरक’ असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल; तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही.” असा हा अनुभव १९८० शीच्या अधिक कामकऱ्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देणाऱ्या शेकडो, हजारो जणांना व्यक्तिगतरित्या आला आहे. एकेकाळी त्यांना ज्या समस्या व अडचणी डोंगरासमान वाटत होत्या त्या यहोवाच्या मदतीकरवी सहज जिंकता आल्या. (मत्तय १७:२०; १९:२६) पुढील अनुभवांचा विचार करा:
१५, १६. अमेरिकेतील एका तरूण माणसाला आणि ब्राझिलमधील एका कॅथोलिक पतीला बाप्तिस्म्यामधील मोठ्या अडखळणांवर कशी मात करता आली ते सांगा.
१५ अमेरिकेत कॅलिफोर्निया येथे एक पोलिओचा रोगग्रस्त होता. तो भयंकर अडचणीत होता. त्याला त्याचे कौटुंबिक सदस्यही लक्ष देत नव्हते. एके दिवशी यहोवाच्या साक्षीदाराला तो घरोघरच्या उपाध्यपणात आढळला। त्याच्याबरोबर पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरू झाला. पण तो इतका लाजाळू होता की जेव्हा साक्षीदार अभ्यासासाठी येत तेव्हा तो आपली खुर्ची फिरवून तोंड भिंती कडे करून बसे. या व इतर समस्येवर मात करण्यासाठी कित्येक महिने लागले. तथापि त्याने ती केली त्यामुळे आज तो आनंदी व बाप्तिस्मा झालेला साक्षीदार आहे.
१६ ब्राझिलमधील एक कॅथोलिक जोडपे आपल्या धर्माला कंटाळले व त्यांनी ओघाओघाने यहोवाच्या साक्षीदारांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास आरंभिला. आता त्यांना आपल्या आध्यात्मिक गरजा तृप्त झाल्याचे वाटू लागले पण एक डोंगरासमान अडखळण त्यांच्यापुढे उभे होते. अँटोनियो हा पति धुम्रपान करण्यात मोठा बहाद्दर होता. सात वर्षाचा असताना त्याने या धुम्रपानाला सुरूवात केली होती व आता तो सतत ४८ वर्षे धुम्रपान करीत आला होता! काही वर्षांमध्ये त्याने ही सवय मोडण्याचा प्रयत्न केला पण सर्व काही व्यर्थ ठरले. या वेळेला मात्र काही वेगळेच होते कारण अँटोनियो म्हणतो: “आता मला समजले की मला देवास संतुष्ट करायचे आहे व त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मला समर्पित करण्यासाठी मला समर्पित करायचे आहे तर मला हे धुम्रपान सोडलेच पाहिजे. खूप प्रार्थना करून शेवटी मला ते सोडून देण्यात यश लाभले.” यहोवा देवास केलेले समर्पण पाण्याच्या बाप्तिस्म्याद्वारे चिन्हांकित करता आले म्हणून त्याला केवढा आनंद वाटला!—स्तोत्रसंहिता ६६:१९; मार्क ११:२४.
१७. (अ) येशू व त्याच्या शिष्यांना अशा कोणत्या दुरात्मिक प्रभावाचा सामना करावा लागला जो आज प्रबल आहे? (ब) पहिल्या शतकात दुरात्मिक प्रभावाला येशू व त्याच्या शिष्यांनी कसे हाताळले, तेच आज कसे हाताळले जात आहे?
१७ भूतबाधा झालेल्या यहुद्यांच्या समस्येचा सामना येशू व त्याच्या शिष्यांना नित्याने करावा लागला. तोच दुरात्मिक प्रभाव आज कार्यरत आहे, कारण सैतान व त्याच्या दुरात्म्यासमूहाला स्वर्गातून हाकलून देऊन आता पृथ्वीच्या परिसरात टाकलेले आहे. (प्रकटीकरण १२:७–९, १२, १७) ख्रिस्ती धर्माच्या बाल्यावस्थेत यहोवाने केले तसे आज तो आपल्या लोकांना दुरात्म्यांना हाकलून देण्याचे सामर्थ्य देत नाही. तरीपण त्याने ख्रिश्चनांसाठी दिलेली आध्यात्मिक शास्त्रसामग्री या दुरात्मिक प्रभावाविरूद्ध संरक्षण ठरते व त्याकरवीच इतरांची दुरात्म्यांच्या पकडीतून सुटका करता येऊ शकते. (इफिसकर ६:१०–१८) घानाकडून असा अहवाल आला आहे: “बांधवांच्या निश्चयी प्रयत्नांनी दुरात्म्यांच्या पकडीतून पुष्कळांची सुटका होत आहे.” घरोघरच्या कार्यात एका साक्षीदाराला एक स्त्री भेटली व जेव्हा पवित्र शास्त्रीय चर्चा सुरू झाली त्यावेळी “ती स्त्री एकएकी रडायला लागली.” तिची काय समस्या होती? साक्षीदाराने सांगितले: ‘एका दुरात्म्याने तिला पछाडले होते. ज्यावेळी तो तिला पछाडे तेव्हा तिला रडायला लावी; आणि तिच्यापाशी असणारे सर्व पैसे गायब होत.” नियमित पवित्र शास्त्र अभ्यासाने तिला या दुरात्म्याच्या त्रासापासून सुटका मिळवून दिली त्यामुळे ती यहोवाला आपले समर्पण करू शकली.—योहान ८:३२.
१८. प्रचारकार्याचे मागदर्शन करण्यात दिव्यदूत क्रियाशील आहेत हे कोणता अनुभव विदित करतो?
१८ वर नमूद केलेल्या समस्या कोणा व्यक्तिच्या मनात इतक्या मोठ्या असतील ज्या कदाचित त्याला आत्महफ़ेचा प्रयत्न करायला लावतील. न्यूझीलंडच्या त्या तरूण स्त्रीचे प्रकरण विचारात घ्या. ज्या साक्षीदाराने तिला पहिली भेट दिली तिला ती स्त्री “भावनाविवश असल्याचे व काही तरी निश्चय करून बसलेली आहे” असे दिसले. नंतर या स्त्रीने कबूल केले की तिचा “आत्महफ़ा करण्याचा विचार होता पण प्रथम देवास प्रार्थना करून त्याच्या मदतीची विचारणा करण्याचे तिने ठरवले होते.” नेमक्या याच वेळी साक्षीदाराने तिचा दरवाजा ठोठावला त्यामुळे तिने “प्रार्थनेचे उत्तर दिले म्हणून देवाचे आभार मानले.” हा योगायोग होता का? तर मग अशा गोष्टी वारंवार का घडतात? येशूने काय म्हटले होते? “जेव्हा मुनष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवादूतासह येईल तेव्हा . . . जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो [लोकांस] एकमेकांपासून वेगळे करील.” (मत्तय २५:३१, ३२; तसेच प्रकटीकरण १४:६ पहा.) दिव्यदूत येशूला मेंढपाळकत्वाच्या कामात मदत देत आहेत आणि जे धन्याला मदतीसाठी आक्रोश करीत आहेत त्यांच्याकडे त्याचे “सहकारी” पाठविण्यात मार्गदर्शन देत आहेत.—१ करिंथकर ३:६, ९; पहा प्रे. कृत्ये ८:२६–३९; १६:९, १०.
१९. आज कोणती जागतिक परिस्थिति अस्तित्वात आहे व ती आम्हाकडून कोणत्या हालचालीची अपेक्षा करते?
१९ आम्ही आज कोठेही राहात असलो तरी हजारो लोक अशा समस्यांनी भारावलेले आहेत ज्यावर यहोवाच्या कित्येक लोकांनी आधीच मात केली आहे. असे समस्याग्रस्त लोक तुमच्या शेजारीच राहात असतील! त्यांना मदतीची नितांत गरज आहे. येशूने म्हटले त्याप्रमाणे खरोखरी “पीक फार आहे.” आम्ही पिकाच्या धन्यास १९८६च्या वर्षभरातील कापणीसाठी अधिक कामकरी पाठवावेत अशी प्रार्थना करीत आहोत. तुमचे अंतःकरण या निमंत्रणास प्रतिसाद देवो: कापणीच्या कामासाठी तातडीने कामकरी हवेत!
उजळणीकरता प्रश्न
◻ पिकाचा धनी कोण आहे?
◻ कोणत्या दोन प्रकारातील कापणी आता सुरू आहे?
◻ येशूने, आपले शिष्य कोणती महत्कृत्ये करतील असे म्हटले होते?
◻ कापणीच्या कामकऱ्यांठायी विश्वास असणे का जरूरीचे आहे?