तुम्ही “आतिथ्य करण्यात तत्पर” आहात का?
तो उन्हाळ्यातील दिवस होता. यहोवाच्या साक्षीदारांचा एक गट, लहान मोठे असे सर्व राज्य सभागृहाची डागडुजी, सफाई व रंगरंगोटी करण्याच्या कामात परिश्रमाचे काम उरकत होते. दुपार झाली तेव्हा बहुतेक थकलेले दिसू लागले व काहींनी सावलीत विश्रांति घेतली.
अगदी त्याच वेळी साक्षीदार भगिनीपैंकी तिघी आपल्या हातात अल्पोपहाराची तबके व सोबत चहा, कॉफी, थंड पेये घेऊन तेथे आल्या. त्या थकलेल्या जिवांकरता ते केवढे सुखद आश्चर्य होते! त्या तिघ्या बहिणींच्या स्वयंप्रेरित आदरातिथ्याने व प्रेमाने सर्व कामगारांना शारीरिक दृष्ट्या उत्साहवर्धक तर केलेच पण त्यांनी त्या दुपारी बंधू भगिनींच्या सबंध सहवासास अधिक उबदार व प्रेमपूर्ण करण्यात मोठा हातभार दिला.
खऱ्या ख्रिश्चनत्वाचे ओळखचिन्ह
आदरातिथ्य व प्रेम हे अर्थातच या खास प्रसंगापुरते मर्यादित नसते. ख्रिस्ती धर्माचा संस्थापक, येशू ख्रिस्त याने आपल्या खऱ्या अनुयायांबाबत हे दर्शविले: “तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहा.” याचप्रमाणे प्रेषित पौलाने आपल्या सह ख्रिश्चनांना सूचना केली: “आतिथ्य करण्यात तत्पर असा.” (योहान १३:३५; रोमकर १२:१३) दुसऱ्या शब्दात म्हणावयाचे झाल्यास इतरांकरता निस्वार्थ प्रेमाने दाखविलेले आदरातिथ्य खऱ्या ख्रिश्चनांचा जीवनमार्ग आहे.
तथापि, एखादा ख्रिस्ती बनल्यावर त्याला हे गुण आपोआप येतात असे नाही. उलटपक्षी त्याला याकरता खूप परिश्रम घ्यावे लागतात. हे आजच्या जगतात खासपणे खरे आहे कारण पवित्र शास्त्राने भाकित केल्याप्रमाणे बहुतकांचे प्रेम थंड झाले आहे. (मत्तय २४:१२) पण जेथे हे गुण दिसतात तेथे केवढा फरक दिसतो! एकमेकांसोबत घनिष्ठ संबंध राखणारे कौटुंबिक सदस्य एकमेकांच्या संगतीचा आनंद घेतात व त्यांना आपसात वेळ घालविण्यात आनंद वाटतो. याप्रमाणे ख्रिस्ती मंडळीचे सदस्य नियमितपणे सभा, क्षेत्रकार्य व इतर प्रसंगाना हजर राहतात तेव्हा त्यांना एकमेकांचा परिचय घडतो. ते खरे मित्र बनतात व कौटुंबिक सदस्यांपेक्षाहि जवळचा संबंध त्यांना वाटतो. (नीतीसूत्रे १८:२४) यहोवाच्या साक्षीदारांमधील आपसातील मित्रत्वाचे बंध जगाच्या अहितकारी प्रभावापासून कुंपण असे ठरते.
ख्रिस्ती स्त्रियांची भूमिका
“आतिथ्य करण्यात तत्पर” असा हा बोध सर्व ख्रिश्चनांना अनुलक्षून असला तरी तो ख्रिस्ती स्त्रियांसाठी अभूतपूर्व भूमिकेकरता लागू होतो. तसे पाहिले तर स्त्रियाच व खासपणे गृहिणी आतिथ्य दाखविण्याच्या अनुषंगाने असणारी सर्व कामे करीत नसतात का? पती मंडळीतील काही विशिष्ठांना घरी येऊन ख्रिस्ती सहवासाचा आनंद घेण्याचे आमंत्रण देतो त्यावेळी त्याची बायकोच घर स्वच्छ करणे, जेवण बनविणे व कार्यक्रमानंतर भांडी विसळणे व इतर स्वच्छता करणे ह्या गोष्टी करीत नाही का? या सर्व प्रकारात पती व मुलांनी मदतीचा हात द्यायचा असतो व दिलाच पाहिजे तरी सर्व गोष्टी यथास्थित होत आहेत हे पाहण्याची अटळ जबाबदारी पत्नीचीच असते.
आपल्या आध्यात्मिक भावा–बहिणींना खऱ्या आतिथ्याचा लाभ घेऊ देण्यात कित्येक ख्रिस्ती स्त्रियांनी स्वेच्छेने बहुत परिश्रम दाखविले हे मोठे प्रशंसनीय आहे. उदाहरणार्थ, हाँगकाँग मधील पूर्ण वेळेची पायनियर उपाध्या दीप या हिचे उदाहरण लक्षात घ्या. तिचे पती स्थानिक मंडळीत वडील आहेत. हे दोघे कधी बंधू भगिनींना तर कधी सबंध पुस्तक अभ्यास गटाला आपल्या घरी येण्याचे निमंत्रण देतात त्यावेळी करावयाची पुष्कळ कामे असतात तरीही ती आनंदाने त्या सर्वांचा पाहुणचार करते. “आम्ही जेवण साधेच ठेवतो,” असे ती म्हणते. “बंधूजणांना सहवासाचा आनंद प्राप्त होत आहे व त्याकरवी त्यांची उभारणी होत आहे हे पाहणे चांगले वाटते.” होय, आतिथ्य दाखविण्याद्वारे ख्रिस्ती स्त्रिया मंडळीत उबदार आत्मा उभारण्यामध्ये मोठी भूमिका पार पाडीत असतात.
आतिथ्य दाखविण्यात जे समाविष्ठ आहे ते पाहता ख्रिस्ती स्त्रीने आपल्याकडील उद्योगीपणा व स्वार्थत्याग दाखविण्याची मोठी हाक आहे. तथापि त्यांच्या या प्रेमाच्या परिश्रमाची जाण त्यांचे पती व इतर कृतज्ञ पाहुणे याजकरवी राखली जाते याची त्यांनी खात्री बाळगावी. अर्थातच काही प्रसंगी केलेल्या गोष्टींबद्दल योग्य ती रसिकता व्यक्त होत नाही, पण त्यामुळे निराश वा उद्विग्न होण्याचे आणि पाहुणचार दाखविण्याचे थांबविणे जरूरीचे नाही. इतरांपासून आभारीपणा व्यक्त होणे आणि आमच्या परिश्रमाबद्दल रसिकता वदविली जात आहे हे पाहणे जरी तृप्तीदायक असले तरी हे लक्षात ठेवणे चांगले की आम्ही आतिथ्य हे ती गोष्ट योग्यतेची व प्रेमळ आहे म्हणून दाखविण्याची इच्छा धरावयास हवी. शिवाय असे आम्ही करीत राहावे ही यहोवा देवाची इच्छा असते व हे त्याला संतोषविणारे आहे.
समतोल दृष्टीकोण राखणे
सध्याच्या महागाईच्या काहात काहींना आतिथ्य करण्याची टाळाटाळ वाटते. त्यांना वाटते की आपल्याला हे जमणार नाही. येथेच आम्हाला समतोल दृष्टीकोण राखण्याची गरज आहे. खाण्यापिण्यात काही खास असले तर त्यामुळे प्रसंगाचे आगळेपण वाढत असले तरी या गोष्टी सर्व महत्वपूर्ण अशा नाहीत. देवाचे वचन अगदी सूज्ञपणे हे सांगते: “पोसलेल्या बैलाची मेजवानी देऊन मनात द्वेष वागविणे यापेक्षा प्रेमाची भाजीभाकरी बरी.” (नीतीसूत्रे १५:१७) आम्हापाशी काय आहे वाआपण काय वाढतो हे महत्वाचे नाही. तर संगनमताचा उभारणीकारक सहवास व आम्ही प्रदर्शित केलेला प्रेमाचा आत्मा या महत्वाच्या व रसिकपूर्ण गोष्टी आहेत.
विरोध करणारा पती असणाऱ्या ४० वर्षें वयाच्या फंग हिंग या बहिणीचे प्रकरण लक्षात घ्या. हाँगकाँग येथे अजस्त्र इमारतींच्या वसाहतीत ती एका छोट्या खोलीत आपला संसार थाटून आहे. तिची आर्थिक परिस्थितीही तसे पाहता चांगली नाही. खरे पाहता कौटुंबिक मिळकतीत थोडा फार हातभार मिळावा याकरता तिला अर्धवेळ नोकरी करावी लागते. तरी तिच्यापाशी जे आहे त्याबाबतीत ती औदार्यशील आहे. मंडळीतील साक्षीदार बांधव तिच्या वसाहतीत प्रचारकार्यासाठी येतात त्यावेळी ती त्यांना तिच्या घरी अल्पोपहारासाठी येण्याचे आमंत्रण देते. असा हा प्रेमळ स्वभाव तिच्या सह ख्रिश्चनांच्या रसिकतेला पात्र ठरतो एवढेच नाही तर तो हेही दाखवितो की खरे आतिथ्य दाखविण्याकरता एखाद्याने सर्व वस्तु संपन्न असले पाहिजे असे काही नाही.
पाहुणचार व्यक्त करण्यामध्ये मितव्ययी बनण्याचा प्रयत्न राखला तरी आतिथ्याच्या बाबतीत आणखी काही गोष्टींविषयींचा स्वार्थत्याग पत्करणे जरूरीचे आढळते. तर मग तसे करणे योग्य ठरेल का? आम्ही खऱ्या ख्रिस्ती प्रेमाने भारावलेलो आहोत तर ते निश्चये व्हावयास हवे. खरे म्हणजे स्वार्थत्यागाविना प्रेम कसे दिसणार? यहोवा देव व येशू खिस्त या दोघांनीही मानवजातीखातर आपल्या प्रेमास्तव मोठा स्वार्थत्याग पत्करला—यहोवाने आपला पुत्र देऊ केला तर येशूने स्वतःचे परिपूर्ण मानवी जीवन.—योहान ३:१६; १५:१३.
आरंभीच्या ख्रिश्चनांनीही हाच प्रेमळ मार्ग अनुसरला. मासेदोनियाच्या बांधवांबाबत प्रेषित पौलाने लिहिले: “संकटाच्या बिकट परिक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य, ह्यामध्ये त्यांची औदार्यसंपदा विपुल झाली. कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्तीपलीकडेही आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो. त्यांनी आम्हाजवळ आग्रहपूर्वक मागितले की, पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हाला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी.” (२ करिंथकर ८:२–४) त्यांचे “कमालीचे दारिद्र्य” व त्यांनी “शक्तीपलीकडेही आपण होऊन दान दिले” या गोष्टींमुळे त्यांचे औदार्य अधिक अस्सल व अंतःकरण हेलावणारे आहे असे व्यक्त झाले.
एखादा गरीब असो की श्रीमंत, तसेच आधुनिक सुविधा उपलब्ध असल्या तरी आतिथ्य दाखविण्याकरता वेळ, श्रम व अर्थसंकल्प या गोष्टी लागतात. तर मग, मुलभूत प्रश्न हा आहे की: ख्रिस्ती सहवासाचा आशीर्वाद इतरांना प्राप्त व्हावा म्हणून परिश्रम घेण्याची आमची तयारी आहे का? लक्षात ठेवा की, “उदार मनाचा समृद्ध होतो” असे पवित्र शास्त्रातील नीतीसूत्र म्हणते, “जो मुक्तपणे इतरांना पाणी देतो त्यालाही ते मुक्तपणे मिळेल.” आम्ही यहोवाने वदविलेल्या अनुसार आतिथ्य दाखवितो व त्यात त्याचे उदात्त उदाहरण अनुसरतो त्यावेळी परिणामतः आम्ही “यहोवाला उसने देतो” या विचाराने सांत्वन पावू शकतो.—नीतीसूत्रे ११:२५; १९:१७.
कोणास निमंत्रण द्यावे?
“जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल,” असे येशू एकदा म्हणाला, “तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी ह्यांना बोलावू नका.” पण का? “कारण तेही कदाचित तुम्हास उलट आमंत्रण करतील व तुमची फेड होईल.” (लूक १४:१२) येशूने येथे जे काही म्हटले त्यात आम्ही आमच्या मित्रांना वा नातेवाईकांना जेवणासाठी बोलावूच नये असा मुद्दा नव्हता. कारण प्रत्यक्षात पाहता येशूनेही मार्था व मरीया या परिचितांच्या घरी जेवणाचा आनंद लुटला. त्यामुळे त्याच्या वरील उद्गारात हा मतितार्थ होता की आम्ही आपले आतिथ्य प्रदर्शन आम्हालाही माघारे परत काही मिळू शकेल या आशेअपेक्षेने करू नये.
यानंतर येशूने दाखवून दिले त्याप्रमाणे ज्यांना आम्ही पाहुणचाराचे निमंत्रण देतो ते असे असावेत ज्यांना सहवासापासून पूर्णांशाने लाभ मिळू शकेल. (लूक १४:१३) त्यामध्ये प्रोत्साहनाची गरज असणारे, सत्यात नवीन असणारे, बुजरे, वेगळे राहणारे आणि वयस्कर यांचा समावेश असावा. अशा या सहवासाचा केवढा उभारणीकारक परिणाम होऊ शकतो हे ओय युक या आवेशी पण ढासळते आरोग्य असणाऱ्या वयस्कर भगिनीच्या उद्गारावरून समजते. ती म्हणते: “बांधव त्यांच्या एकत्रीकरणाच्या मेळाव्यात मला नेहमी बोलावतात व पुष्कळ मार्गाद्वारे मला दयाळूपणा व्यक्त करतात. एका मोठ्या कुटुंबाचे आपण भाग आहोत या भावनेने मला खूप आनंद होतो.”
अशा या मेळाव्याचे उद्दिष्ट हे अर्थातच सामाजिक स्वरूपाच्या पुढे जाते. एकमेकांची उभारणी व्हावी आणि यहोवाच्या सह उपासकांतील प्रेमाचे कटिवेष्टण अधिक दृढ व्हावेत अशी त्यामागील अपेक्षा असते. या कारणास्तव खाद्यपेयाच्या समृद्धतेपेक्षा उभारणीकारक व प्रोत्साहनपर वातावरण राखण्यावर जोर असावा. त्याचप्रमाणे अशा प्रसंगी जे संभाषण व ज्या हालचाली होतील त्याबद्दल देखील विचार राखावयास हवा. सर्वच हालचाली पवित्र शास्त्रावर केंद्रित असाव्यात किंवा सर्व संभाषण शास्त्रवचनीय विषयांबद्दलच असले पाहिजे असा दंडक नाही तरी जे काही चर्चिले वा केले जाईल ते सर्व उभारणीकारक व उत्तेजनपर असेल हे पाहणे सुज्ञपणाचे व प्रेमळ ठरेल. स्पर्धावृत्तीचे खेळ, रटाळ चहाड्या किंवा मानहानीकारक शेरे या गोष्टी अर्थातच टाळल्या पाहिजेत.—इफिसकर ४:२९, ३१.
आतिथ्य करणाऱ्यांसाठी समृद्ध प्रतिफळ वाट पाहून आहे
परतप्राप्ती होण्याच्या विचाराने कोणीही आतिथ्य दाखवावयाचे नसले तरी अतिथीप्रेम व्यक्त करणाऱ्याला काहीच प्रतिफळ नाही असे नाही. खरे म्हणजे खऱ्या प्रकारचे आतिथ्य दाखविणाऱ्याला प्रयत्नाविना पुष्कळ बहुमान मिळतात. याकरवी नवे मित्र मिळतात, जुने लागेबांधे अधिक दृढ़ होतात. त्याकरवी इतरांमध्येही औदार्य व अतिथ्याचा आत्मा जोपासण्याची प्रेरणा निर्माण होते. (लूक ६:३८; नीतीसूत्रे ११:२५) यापेक्षा अधिक म्हणजे, सबंध विश्वातील थोर आतिथ्यकार म्हणजे आमचा प्रेमळ निर्माणकर्ता यहोवा देव याचे याकडे लक्ष राहते की जो खरेपणाने आतिथ्य करतो त्याला कसलीही वाण पडत नाही, कारण त्याच्या सारखेच “आतिथ्य करण्यात तत्पर” असणाऱ्यांची तो जाण ठेवतो.