उपाध्य सेवकहो आपणासाठी चांगली योग्यता राखा!
“ज्यांनी सेवकपण चांगले चालविले ते आपणासाठी चांगली योग्यता आणि ख्रिस्त येशूवरील विश्वासात बोलण्याचे फार धैर्य मिळवितात.”—१ तिमथ्यी ३:१३.
१. उपाध्य सेवक अशी नियुक्ति लाभल्यावर त्या पुरुषाचे ध्येय कोणते असावे, आणि मंडळीतील इतरांनी काय करण्याची इच्छाधरली पाहिजे?
सध्या उपाध्य सेवकपदावर असणाऱ्या पुरुषांची त्याकरता “अगोदर पारख” झालेली असते. (१ तिमथ्यी ३:१०) पण त्यांची नियुक्ति हा त्याचा शेवट ठरत नाही. वास्तविकपणे त्यांना नेमून दिलेली कर्तव्ये ‘चांगल्या प्रकारे’ पार पाडून “आपणासाठी चांगली योग्यता” मिळवीत राहणे हे त्यांचे ध्येय बनते. (१ तिमथ्यी ३:१३) त्यांना ही ध्येयप्राप्ती लाभावी याकरता ऐक्यवान अशा ख्रिस्ती मंडळीतील प्रत्येक सभासदाने आपला पाठिंबा दाखवत राहण्याची इच्छा धरली पाहिजे.
२. उपाध्य सेवकांकरवी जे काही केले जाते त्याचा मंडळीच्या सदस्यावर कसा परिणाम होत असतो?
२ प्रेषित पौलाने असे सूचित केले की ख्रिस्ताच्या आध्यात्मिक शरीराच्या सर्व सदस्यांना एकत्रितपणे काम करीत राहिल्यामुळे व एकमेकांची काळजी वाहिल्यामुळे लाभ घडत असतो. (१ करिंथ १२:१२–३१) याचप्रमाणे उपाध्य सेवक सुद्धा त्यांना देवाकडून लाभलेले काम ‘चांगल्या प्रकारे’ पार पाडतात तेव्हा सध्याच्या ख्रिस्ती मंडळीतील प्रत्येक सदस्यास फायदा घडतो. पण तेच उपाध्य सेवकांपुढे काही समस्या उभ्या राहिल्या व त्यामुळे त्यांना आपली कर्तव्ये योग्यपणे पार पाडण्यात अडथळा झाला तर त्याद्वारे मंडळीच्या सर्व सदस्यांवर मोठा त्रास उद्भवेल.
३. (अ) यहोवाच्या सर्व लोकांना कोणत्या समस्या सर्वसाधारण आहेत? (ब) एक अलिकडील चाचणी काय प्रकटविते?
३ यहोवाच्या सर्व लोकांना एकाच प्रकारचे “झगडणे, रक्तमांसाबरोबर नव्हे, तर . . . आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे.” (इफिस. ६:१२) यासोबत यहोवाच्या सर्व सेवकांना स्वतःची अपूर्णता व पापीष्ठ वासना याबरोबर लढत द्यावी लागते. तरीपण एक गट या नात्याने उपाध्य सेवकांना यहोवाच्या साक्षीदारांतील इतर गटापेक्षा काही विशिष्ट समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवतात. ही गोष्ट एका पश्चिमी युरोपीय देशात ३२० पेक्षा अधिक मंडळयात १,३६० उपाध्य सेवकांची जी चाचणी घेण्यात आली त्याकरवी सूचित झाली.
सडेपण व विवाह
४. आपल्या सडेपणाचा अविवाहीत उपाध्य सेवकांनी कसा दृष्टिकोण धरावा आणि इतरांनी त्यांना कोणते प्रात्साहन द्यावे?
४ उपाध्य सेवकांच्या चाचणीत हे दिसले की यापैकीचे १० टक्कयापेक्षा अधिक जण अद्याप सडे आहेत. असे लाके ९० टक्के विवाहीत जणांवर ज्या सर्वसाधारण जबाबदाऱ्या पडतात त्यापासून मुक्त आहेत. पण सड्या बांधवांनी आपल्याला मोकळीक आहे म्हणून करमणूक व सामाजिक गोष्टी या सारख्या व्यक्तिगत गोष्टींचा अतिरेक होऊ देऊ नये याबद्दल काळजी घेण्यास हवी. शिवाय विवाहबद्ध व्हावे या स्वाभाविक इच्छेलाही जीवनात इतर सर्व गोष्टींपेक्षा वरचढ होऊ देऊ नये. (मत्तय ६:३३) तसेच आपल्या विवाहीत मित्रांच्या दबावाला बळी पडण्याचे व घाई गडबडीचा आणि अविचारी विवाह संपादण्याचे त्यांनी टाळावे. एकमेकांबद्दलचा विचार राखणारा ख्रिश्चन अर्थातच आपल्या समविश्वासू बांधवाच्या सडेपणाच्या स्थितीचा आदर राखील व त्यांना, शक्य असल्यास पूर्ण वेळेच्या उपाध्यपणाचा पत्कर करून, उपलब्ध असणारी मोकळीक इश्वरशासित ध्येयांच्या कामी लावण्याचे प्रोत्साहन देईल.
५. सडे आहेत त्यापेक्षा विवाहीत उपाध्य सेवकांपुढे कोणता मोठा धोका उभा असतो?
५ वर उल्लेखिलेल्या चाचणीत आढळले की ६२ टक्के उपाध्य सेवक पालक आहेत. अशांना सड्या बांधवापेक्षा आपली अंतःकरणे “संसाराच्या चिंता” यांनी अधिकपणे “भारावली जाण्याचा” धोका असतो. (लूक २१:३४–३६) याकरताच सडेपणाविषयीची शिफारस करताना पौल म्हणाला: “तुम्ही निश्चिंत असावे अशी माझी इच्छा आहे. अविवाहीत पुरुष प्रभूला कसे संतोषवावे अशी प्रभूच्या गोष्टींविषयी चिंता करतो. परंतु विवाहीत पुरुष आपल्या पत्नीला कसे संतोषवावे, अशी जगाच्या गोष्टीं विषयीची चिंता करतो. येणेकडून त्याचे मन द्विधा झालेले असते . . . जो लग्न करतो तो बरे करतो, पण जो लग्न करीत नाही तो अधिक बरे करील.”—१ करिंथकर ७:३२–३८.
६. विवाहीत उपाध्य सेवकांनी काय करण्याची गरज आहे व याबाबतीत कोण सहाय्यक प्रस्ताव सुचवू शकतील?
६ “लग्नसंबंध स्वर्गात जुळवले जातात” असे यहोवाचे लोग मानीत नसले तरी वैवाहिक समस्या सोडविण्यासाठी स्वर्गीय सूज्ञानाची गरज आहे हे त्यांना माहीत आहे. (स्तोत्रसंहिता १९:७; नीतीसूत्रे ३:५, ६) यास्तव विवाहीत उपाध्य सेवकांनी देवाच्या वचनातील सल्ला शक्य आहे तितक्या जवळून अनुसरण्यास हवा. त्यांनी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य तारतम्यतेने पाळल्या तर पाहिजे, पण ही सबब मंडळीतील त्यांच्या इश्वरशासित जबाबदाऱ्यात हेळसांड करण्यामध्ये कारण बनता कामा नये. याकरता एक विचारपूर्वक आराखडा तयार करण्याची गरज आहे. या बाबतीत गरज उद्भवेल त्यावेळी प्रौढ व अनुभवी विवाहीत दांपत्यांनी नव्यानेच विवाहबद्ध झालेल्यांना साहाय्यक असे प्रस्ताव सुचवावेत.
७. (अ) विवाहीत उपाध्य सेवकाचे कुटुंब त्याचे प्रयत्न व आध्यात्मिक वाढीच्या बाबतीत कसा परिणाम करु शकतात? (ब) विवाहबद्ध होण्याची इच्छा करणाऱ्या उपाध्य सेवकांनी काय लक्षात ठेवणे बरे ठरेल?
७ कुटुंबाचे साहाय्य मिळत राहणे हे विवाहीत उपाध्य सेवकाला मोठे मदतकारक ठरते. जी कुटुंब सदस्ये उपाध्य सेवक असणाऱ्या आपल्या कुटुंब प्रमुखाच्या बाबतीत, त्यांनी आम्हास अधिक वेळ द्यावा व अधिक लक्ष पुरवावे किंवा त्यांनी जडवादीय गोष्टी अधिकांशानेच पुरवाव्या ही अवास्तव मागणी राखली तर त्याची आध्यात्मिक प्रगती खुंटणार हे नक्की. पण तेच, सर्व कौटुंबिक सदस्य “सेवकपण चांगले चालविण्या”च्या त्यांच्या प्रयत्नाला हातभार देतात तेव्हा तो एक आशीर्वाद ठरतो. (१ तिमथ्यी ३:१३) तद्वत, कोणा अविवाहीत उपाध्य सेवकांची विवाहबद्ध होण्याची इच्छा झाली तर आपला संभाव्य विवाह सोबती आपली आध्यात्मिक प्रगती वाढीस लावणार की ती खुंटविण्यास कारणीभूत ठरेल याचा आधीच विचारविनिमय होणे अत्यंत जरूरीचे आहे.
नोकरी आणि जडवाद
८. (अ) प्रापंचिक व्यवसायाच्या बाबतीत काही उपाध्य सेवकांना कोणता संभाव्य धोका भेडसावून आहे? (ब) कोणत्या शास्त्रवचनांवर मनन करणे एखाद्याला जडवादासोबत लढत देण्यास मदत करू शकते?
८ चाचणी झालेल्या उपाध्य सेवकात दहापैकी आठजण ६० वर्षे वयापेक्षा कमी होते. त्यामुळे बहुतेक स्वतःसाठी व आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी प्रापंचिक नोकरी करीत आहेत असे दिसले. यातील अर्धे तरी २० ते ४० वयाच्या दरम्यान आहे हे पाहण्यात आले. साधारणतः या वयात जगातील लोक एखादा व्यवसाय वा ध्येय यात कायम होणे आणि पुढे जाऊन आर्थिक सुरक्षितता प्राप्त करणे याकरता धडपडत असल्याचे दिसते. तुम्ही उपाध्य सेवक आहात व या वयाच्या दरम्यान आहात तर जगीक, जडवादीय प्रवृत्ती तुम्हामध्ये बळावली जाऊन तुमची आध्यात्मिकता कमकुवत केली जाईल हा धोका कमीपणाचा समजू नका. उलटपक्षी पौलाने जे म्हटले ते ध्यानात घ्या: “आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.” (१ तिमथ्यी ६:८) येशूनेही सुंदर असा सल्ला दिला जो आम्हा सर्वांना जडवादासोबत लढत देण्यास साहाय्यक ठरू शकतो. त्याचे वाचन स्वतःच मत्तय ६:१९–३४ मध्ये करून पाहा.
९. मत्तय १६:२६च्या अनुषंगाने खासपणे तरूण उपाध्य सेवकांच्या बाबतीत कोणता मार्ग सूज्ञतेचा आहे?
९ अहो तुम्ही तरूण उपाध्य सेवकहो, तुम्हाला हे दिसतच आहे की लोक जगात जागतिक ध्येये प्राप्त करून “यशस्वी” होत आहेत, अमाप संपत्ती मिळवित आहेत, पण यहोवाला मात्र त्यांच्या योजनात ते समाविष्ठ करून नाहीत. (पडताळा नीतीसूत्र १६:३; १९:२१.) अनध्यात्मिक आणि जडवादी असणाऱ्या पण ज्यांचे जीवन लवकरच “मोठ्या संकटात” उडून जाणार त्या कोणा माणसाप्रमाणे स्वतःच्या जीवनाला आकार द्यावा हे केवढ्या सुज्ञतेचे असेल बरे? (मत्तय २४:२१) कोणता यहोवाचा सेवक त्यांच्याबरोबर अदलाबदल करून घेण्याचे पसंत करील? “मनुष्याने सर्व जग मिळविले,” येशू म्हणाला, “आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ?” (मत्तय १६:२६) तर मग, सैतानाच्या ताब्यात असणाऱ्या या मृतप्राय जगाबरोबर असुरक्षित व अल्पकाळाचे संधान बांधून घेण्यापेक्षा यहोवाच्या संस्थेबरोबर एक सुरक्षित भवितव्य उभारणे हाच सूज्ञतेचा मार्ग आहे.—१ योहान ५:१९.
देवाच्या राज्याची निष्ठा
१०. राजकारणी घडामोडींच्या बाबतीत वाढता “तरूण” समूह व त्यातील उपाध्य सेवक यांनी कोणता पवित्रा घेतला आहे?
१० यहोवाच्या मशीही राजाबद्दल भविष्यवादितरित्या असे सांगण्यात आले: “तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक स्वसंतोषाने पुढे होतात. पावित्र्यानि मंडित झालेले तुझे तरूण तुला पहाटेच्या दहिवरासारखे आहेत.” (स्तोत्रसंहिता ११०:३) हा भविष्यवाद १९१४ पासून पूर्ण होत आहे आणि वाढता “तरूण” समूह याची जाणीव राखून आहे की त्यांची निष्ठा सर्वप्रथम वैभवी येशू ख्रिस्त हा ज्याचा राजा आहे त्या देवाच्या राज्यास असण्यास हवी. तर ही सर्व समर्पित माणसे व त्यामधील उपाध्य सेवकांचा वर्ग सरकारी “वरिष्ठ अधिकारी” याला सापेक्ष अधीनता दाखवून असला तरी कोणत्याही विवादीय प्रकरणात त्यांनी “देवास आपला शास्ता मानून त्याची आज्ञा मानली पाहिजे.” (रोमकर १३:१; प्रे. कृत्ये ५:२९) येशूने म्हटल्याप्रमाणे त्याचे अनुयायी या “जगाचे भाग” नाहीत. (योहान १५:१९; १८:३६) राष्ट्रातील राजकारणी घडामोडीत ते तटस्थ राहतात कारण ही भूमिका भंगविणे म्हणजे देवाच्या राज्याचा विश्वासघात करणारे बनणे हे त्यांना माहीत आहे.
११. ख्रिस्ती तटस्थतेमुळे ज्यांच्यावर त्रास ओढावला आहे त्यांना कशाची हमी आहे?
११ पण तेच ख्रिस्ती तटस्थता राखल्यामुळे कोणा उपाध्य सेवकाने वा इतराने आपली नोकरी एवढेच काय पण स्वातंत्र्य गमावले तर काय? (यशया २:२–४; योहान १७:१६) यावेळी त्यांना ठाऊक असते की त्यांचे आध्यात्मिक भाऊ आणि बहिणी त्यांना शक्य आहे तेवढे आध्यात्मिक आणि जरूर भासल्यास आर्थिक पाठबळही देतील. याचे कारण हे की यहोवाचे लोक एकमेकांची प्रेमळपणे काळजी वाहतात.—पडताळा योहान १३:३४, ३५; १ करिंथकर १२:२४, २५.
अधिक अनुभवाची गरज
१२. “चांगली योग्यता” मिळविणे यात कशाचा समावेश होऊ शकतो?
१२ चाचणी झालेल्यातील एक तृतीयांश उपाध्य सेवक दहापेक्षाही कमी वर्षे यहोवाचे साक्षीदार असे आहेत. हे उघड आहे की यांनी मंडळीच्या अधिक अनुभवी सदस्यांकडून मदत व मार्गदर्शन प्राप्त करून घेतले होते. पण “चांगली योग्यता” मिळविण्यात इतरांकडून शिकत राहण्याची व अनुभव गोळा करण्याची गरज आहे. याचा अर्थ हा होतो की नित्याने व्यक्तिगत ध्येये राखावी व ती मिळविण्याच्या प्राप्तीस्तव झटत राहावे. तद्वत, उपाध्य सेवक या अर्थी लाभदायक उद्देशासहित सेवा करण्याची तुमची प्रांजळ इच्छा आहे किंवा या पदाप्रत येऊ पहात आहा तर तुम्ही काही व्यक्तिगत ध्येये राखली आहेत का? उदाहरणार्थ, एका विशिष्ठ तारखेपर्यंत सबंध पवित्र शास्त्र वाचून काढण्याचे किंवा काही विशिष्ठ महिन्यात सहाय्यक पायनियरींग कार्य करण्याचे ध्येय का ठेवू नये?
१३. तिमथ्याला देण्यात आलेली कोणती सूचना उपाध्य सेवक बनू इच्छिणाऱ्या किंवा त्या पदावर सध्या असणाऱ्या बांधवास लाभदायक ठरू शकेल?
१३ तुम्ही वयाने व अनुभवाने अद्याप तरुण आहात तर तुम्हाला १ ले तिमथ्यी ४:१२–१५ मध्ये जे म्हणण्यात आले आहे त्यापासून लाभ घडू शकतो. ते शब्द तरूण देखरेखा तिमथ्यी याला अनुलक्षून असले तरी पौलाने भाषण व वर्तन याबाबत तेथे जे काही म्हटले आहे ते बहुतांशी जो बांधव उपाध्य सेवक बनू इच्छितो वा जो आधीच त्या पदावर आहे त्याला लाभदायक ठरू शकते. प्रेषिताने लिहिले: “कोणी तुझ्या तारूण्याला तुच्छ मानू नये. तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता ह्या विषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो. मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण ह्याकडे लक्ष ठेव. तुझ्यावर वडीलवर्ग हात ठेवण्याच्या वेळेस संदेशाच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे त्याकडे दुर्लक्ष करू नको. तुझी प्रगति सर्वांस दिसून यावी म्हणून तू या गोष्टींचा अभ्यास ठेव. ह्यात गढून जा.” ‘तुमची प्रगति सर्वांस दिसून येऊ शकेल’ अशा कशाबाबतीत तुम्ही काम करण्याची गरज आहे बरे? काय करण्याची जरूरी आहे त्याचा प्रार्थनापूर्वक विचार करा व यहोवाच्या मदतीने ते साध्य करा!
नैराश्यासोबत सामना करणे
१४, १५. (अ) वाढते वय व ढासळते आरोग्य यांच्याशी सामना कराव्या लागणाऱ्या उपाध्य सेवकांकरता कोणते शास्त्रवचनीय प्रोत्साहन आहे? (ब) हे लोक मंडळीतील इतरांना कसे प्रोत्साहन देऊ शकतात?
१४ उपाध्य सेवकांपैकी पुष्कळांना आता युवकावस्थेच्या समस्यांना तोंड देण्याची गरज राहिली नाही, कारण त्यांचे वय वाढलेले आहे व प्रकृतीही ढासळत आहे. यामुळे अर्थातच त्यांना नैराश्यासोबत लढत द्यावी लागते. तथापि, जे स्वतःला आध्यात्मिकदृष्ट्या सुदृढ ठेवतात अशांना पौलाने अभिषिक्त ख्रिश्चनांना लिहिलेल्या या उद्गारांद्वारे समाधान मिळते: “आम्ही हार मानीत नाही. परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. कारण आम्हावर येणारे संकट तत्कालिक व हलके असून ते आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. आम्ही दृश्य गोष्टीकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत.” (२ करिंथकर ४:१६–१८) पार्थिव आशा राखणाऱ्या यहोवाच्या सेवकांनासुद्धा अत्यंत प्रोत्साहनदायक असे भवितव्य आहे व ते म्हणजे पृथ्वीव्याप्त नंदनवनातील चिरकालिक जीवन.—लूक २३:४३; योहान १७:३.
१५ अशाप्रकारे ज्या उपाध्य सेवकांना वाढते वय व ढासळते आरोग्य यामुळे इतरांसारखे काम करू दाखविता येत नाही अशांना आनंदी व सरळ मनोवृत्ती राखण्याजोगे उत्तम कारण आहे. यामुळे सत्याबद्दलची रसिकता व चिरकालिक गोष्टीविषयी वाटणारा सखोल विश्वास प्रतिबिंबीत होतो. असा हा उत्तम आत्मा व सोबत केली जाणारी विनयशील सेवा मंडळीतील प्रत्येकास मोठी फायदेशीर व प्रोत्साहनदायक ठरते.
१६. वडील म्हणून नियुक्ति लाभली नाही तर उपाध्य सेवकांनी का निराश होऊ नये?
१६ तुम्ही उपाध्य सेवक आहात तर आपली शिकविण्याची हातोटी व आध्यात्मिक गुणवत्ता वाढविण्याद्वारे “देखरेख्याच्या पदाची प्राप्ती” करण्याचा प्रयत्न करावा. (१ तिमथ्यी ३:१) तुमची वडील म्हणून त्वरेने नियुक्ति होत नाही म्हणून निराश होऊ नका. वस्तुतः उपाध्य सेवक या नात्याने आपली कर्तव्ये “चांगल्या प्रकारे” पार पाडण्याकरवी तुम्ही लाभदायक उद्देश साध्य करीत असता व मंडळीला खरा ठेवा आहात हे ध्यानात असू द्या. यहोवाच्या संस्थेत कोणाही मार्गी सेवा करणे आणि आपल्या समविश्वासूंना राज्य प्रचाराच्या आज्ञेचे पालन करण्यात मदत देणे हा अप्रतिम हक्क आहे.—मत्तय २४:१४; २८:१९, २०.
इतर कशी मदत देऊ शकतात
१७. उपाध्य सेवकाला त्याची बायको व मुले याजकडून कसे साहाय्य मिळू शकेल?
१७ उपाध्य सेवक लाभदायक उद्देशासाठी आपली सेवा सादर करीत असतात ही जाण राखून यहोवाच्या सर्व लोकांनी त्यांच्या प्रयत्नांना आपले पाठबळ देण्याची इच्छा धरावी. उदाहरणार्थ, उपाध्य सेवकाच्या बायकोने व मुलांनी आहे त्या जीवनावश्यक गोष्टीत आपली तृप्तता दाखविली आणि चैनीच्या वस्तु मिळाव्यात याकरता कटकट धरली नाही तर त्याद्वारे त्याला ‘आपले सेवकपणे चांगले चालविण्यासाठी’ सोपे होईल नाही तर चैनीच्या वस्तुंच्या प्राप्तीस्तव त्याला नोकरीतच आपला सर्व वेळ घालवावा लागेल.—१ तिमथ्यी ६:६–८.
१८. (अ) वडील उपाध्य सेवकांची कशी मदत करू शकतात? (ब) वडील व उपाध्य सेवकात चांगले दळणवळण असणे का महत्वाचे आहे?
१८ उपाध्य सेवकांना आवश्यक असणारे मार्गदर्शन व सूचना पुरवून वडील त्यांची मदत करू शकतात. सुधारणा दाखवून दिल्यास त्याची प्रामाणिकपणे प्रशंसा होण्यास हवी. इतर गोष्टींसमवेत वडील उपाध्य सेवकांसोबत क्षेत्रात कार्य करू शकतात, भाषण तयार करण्यात त्यांना मदत देऊ शकतात व आपल्याठायी असणाऱ्या अनुभवाच्या साठ्याची सहभागिता करू शकतात. अशी ही आस्था व दळणवळण कधी कधी लोपाले जाते. उदाहरणार्थ, एका उपाध्य सेवकाकडे त्याच्या क्षेत्र कार्य अहवालाबद्दल विभागीय देखेरख्यांनी विचारणा केली तेव्हा त्याने म्हटले: “तुम्ही तरी ते का विचारता? ही सेवा तर कित्येक वर्षापासून कमीच आहे पण याबद्दल तुम्हीच पहिले असे आहात की ज्यांनी प्रथमतः ही विचारणा मजकडे केली.” जे वडील उपाध्य सेवकांना उभारणीकारक, प्रेमळ सूचना देतात आणि त्यांच्या समस्यामध्ये सहनशीलतेने मदत देतात त्यांना उल्लेखनीय परिणाम प्रत्ययास आल्याचा आनंद मिळतो.
१९. उपाध्य सेवकांनी चांगली योग्यता राखावी याकरता मंडळीचा प्रत्येक सदस्य कशी मदत करू शकतो?
१९ खरे पाहता मंडळीतील प्रत्येक सदस्य उपाध्य सेवकांना त्यांची योग्यता चांगली राखण्यासाठी मदत देऊ शकतो. ते कसे? त्यांना सहकार्य देऊन व ते जे काही करतात त्यांच्या कामाबद्दल अंतःकरणपूर्वक रसिकता व्यक्त करून. शरीर आरोग्यदायी राखण्यासाठी जसे शरीराचे सर्वच अवयव एकमेकांसोबत मिळून काम करतात त्याचप्रमाणे मंडळीची आध्यात्मिक सुदृढता राखण्यासाठी त्यामधील सर्व सदस्यांनी सहकार्य दिलेच पाहिजे. (पडताळा १ करिंथकर १२:२४, २५) याबाबतीत कष्टाळू उपाध्य सेवक पुष्कळ काही करून लाभदायक उद्दिष्ट साध्य करतात व चांगली योग्यता राखतात. त्यांनी व यहोवाच्या इतर सर्व निष्ठावान साक्षीदारांनी चिरकालिक सौख्यानंदाच्या भवितव्याकडे पाहात रहावे व “आनंदी देवा”चे अंतःकरण आनंदी करण्यासाठी एकजुटीने सहकार्य देत राहावे.—१ तिमथ्यी १:११; नीतीसूत्रे २७:११.
कृपया विवेचीत करा
◻ उपाध्य सेवकांना कोणकोणत्या समस्या असू शकतील?
◻ उपाध्य सेवकांची बायको व मुले त्यांना मदत देण्यासाठी काय करू शकतात?
◻ उपाध्य सेवकांना मदत देता येण्यासाठी वडीलांना काय करता येणे शक्य आहे?
◻ मंडळीतील प्रत्येक सदस्याला उपाध्य सेवकांना कशी मदत देता येईल?
[१३ पानांवरील चित्रं]
उपाध्य सेवकांनी शिष्य बनविण्यातील आणि मंडळीतील आपल्या जबाबदाऱ्या विश्वासूपणे पार पाडण्यास हव्या
[१६ पानांवरील चित्रं]
प्रौढ उपाध्य सेवक मंडळीस मदत व प्रोत्साहन देण्यात पुष्कळसे करू शकतात