तुम्ही असंतुष्ट स्वभावाचा प्रतिकार करता का?
तक्रारीच्या सुरात कुरकुर करीत राहणे हा अनुभव पवित्र शास्त्रात आम्हाला अगदी सुरुवातीला आढळतो. (निर्गम १५:२४) आज अशा प्रकारातील कुरकुर आम्हासभोवताली नित्याने ऐकू येते व तिचा सूर वाढता आहे. ही कुरकुर आता प्रत्येकाला गिळंकृत करण्याच्या मागे लागली आहे इतका तिचा प्रभाव आता जोरदार बनला आहे. या आत्म्याचे प्रदर्शन खालच्या आवाजात बडबडत राहणे, तक्रार मांडणे, असंतुष्टपणाने वा असमाधानकारकरित्या वटवट करणे यात दिसते. अशा या वटवटीचा किंवा कुरकुरीचा खऱ्या ख्रिश्चनांनी प्रतिकार करायला हवा. पण या असंतुष्ट स्वभावाला आम्हाला कसा प्रतिकार करणे जमेल?
त्याची सुरूवात कशी झाली
काही परिस्थितींबद्दल समाधान न वाटण्याजोगी साहजिक कारणे आहेत. रहिवाश्यांच्या दुष्टतेमुळे “सदोम व गमोरा यांचा बोभाटा फार झाला आहे” हे समजणे काही कठीण नाही. (उत्पत्ती १८: २०, २१) तरीपण नको त्या वटवटी वा कुरकुरीचे मुळ असंतुष्टपणात असते. या असंतुष्ट स्वभावाचा जनक स्वतः दियाबल सैतान आहे जो “सर्व जगाला ठकविणारा” आहे. (प्रकटीकरण १२:९) एदेन बागेत त्याने अशी परिस्थिती सामोरी आणली की त्यामुळे प्रथमतः हव्वेत व नंतर आदामात असंतुष्टपणा उभारला गेला. (उत्पत्ती ३:१–७) त्या वेळेपासून सैतान अशा विविध परिस्थितींना सामोरे आणत आहे ज्याद्वारा लोकात असंतुष्टपणा उभारला जातो.
एदेन मधील बंडानंतरच्या कैक शतकानंतर यहोवाने इस्राएलांना मिसरातून सोडविले आणि त्यांचे राष्ट्र या नात्याचे संघटन तयार करून आपले स्वतःचे नाव केले. (निर्गम ९:१६) आपल्या मुक्तिदात्यास हे लोक कृतज्ञ राहिले का? आपल्या ४० वर्षाच्या अरण्यप्रवासात त्यांनी यहोवाविरूद्ध एकतर थेटपणे वा मोशे व अहरोनाच्या चुका दाखवीत राहून कुरकुर केली! एका प्रकरणात यहोवाने विचारले: “ही जी दुष्ट मंडळी मजविरूद्ध कुरकुरत आहे तिचे मी कोठवर सोसू?” (गणना १४: २६, २७; निर्गम १६:२, ७) असंतुष्टपणाचा हा स्वभाव प्राचीन इस्राएलाच्या सबंध ऐतिहासिक काळात दिसून आला.—यहेज्केल १८:२५.
जीवनात प्राप्त झालेल्या स्थितीबद्दल कुरकुरत राहणे
अपूर्ण असल्यामुळे एखादा मनुष्य अयोग्यपणे आपल्या परिस्थितीचे कारण बनवून कुरकुरत राहणे साहजिक आहे. नीतीमान मनुष्य इयोब त्याच्यावर बेतलेल्या भयंकर परिस्थितीमुळे इतका दुःखी झाला की त्याने आपल्या जन्मदिवसाला शाप दिला. (इयोब ३:१–३) तर मग, ख्रिस्ती म्हणणारे जन जीवनातील आपल्या परिस्थितीबद्दल असंतुष्ट होऊ शकतात का? होय, काही, तसे झाले आहेत.
पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीत जी “अभक्त माणसे” शिरली होती त्यांच्या विषयी शिष्य यहुदाने असे लिहिले: ‘ते लोक कुरकुर करणारे, जीवनातील आपल्या परिस्थिती विषयी असंतुष्ट व [अनैतिक चालीचे] वासनासक्त आहेत. त्यांचे तोंड फुशारकीच्या गोष्टी बोलते; व लाभासाठी ते मुखस्तुति करणारे आहेत.” (यहुदा ३, ४, १६) विश्वासू ख्रिती राहण्यासाठी अशा तक्रारी लोकांपासून आम्ही दूर राहिले पाहिजे. त्यामुळेच यहोवाचे सेवक असण्यामुळे जे आशीर्वाद आम्ही उपभोगीत आहोत त्यांचे मनन करीत राहून इश्वरी पसंतीचा स्वभाव व्यक्त करीत राहणे किती बरे आहे!—गलतीकर ६:१८.
बंधू वा सहकाऱ्यांविरुद्ध
यहोवाच्या सेवकांनी आपसात प्रेमळ व एकमेकांबद्दल सहकार्याची वृत्ती राखली पाहिजे. पण तेच, कुरकुरणे इतरांसोबतच्या चांगल्या नातेसंबंधाला घातक ठरू शकते. कोराह या लेव्याने व त्याच्या साथीदारांनी मोशे व अहरोनाविरुद्ध कुरकुर केली व त्यांच्याविषयीचा द्वेषभावही व्यक्त केला. याविषयी यहोवाने तीव्र नापसंती व्यक्त केल्यामुळे तक्रार मांडणाऱ्या लोकांना मृत्यू प्राप्त झाला.—गणना १६वा अध्याय.
शतकानंतर प्रेषित योहानाने, अग्रगण्य होण्याची आवड धरणाऱ्या दियत्रफेस विषयी म्हटले की तो “अपशब्द बोलून बडबड करतो.” योहानाचे त्या मंडळीत येणे झाले तर तो त्या तक्रारखोराकडे उचित लक्ष देणार होता.—३ योहान ९, १०.
या कारणास्तव, मंडळीत आमची जी स्थिति आहे तिच्याबद्दल असंतुष्ट वृत्ती दाखविणे, कुरकुर करीत राहणे याविषयी आम्ही दक्षता बाळगलेली बरी. उदाहरणार्थ, मंडळीत एका विशिष्ठ जबाबदारीसाठी कोणाची नेमणूक करण्यात आली पण आम्हाला वाटते की आम्ही त्या पदासाठी अधिक लायक आहोत. अशावेळी ज्याला तेथे नेमले गेले त्याविरूद्ध मनात असंतोष वाढविण्याच्या प्रवृत्तीला आळा घालणे बरे. तसे करण्यात आमची चूकच घडेल. त्यामुळे कोराह किंवा दियत्रफेस प्रमाणेचा स्वभाव स्वतःमध्ये जडवू नये हे आम्ही ठरवून टाकावे.
पवित्र शास्त्र उपाय अंमलात आणा
आपण सर्वजण अपूर्णत्वामुळे आणि त्रासदायक काळात जगत असल्यामुळे असंतुष्ट भावना व्यक्त करतो हे साहजिक आहे. तरीपण आम्हापाशी आवश्यक ती मदत उपलब्ध आहे कारण या असंतुष्ट स्वभावावर आणि तक्रारीच्या प्रवृत्तीवर कशी मात करावी हे शास्त्रवचने आम्हाला दाखवितात.
कुरकुर ही यहोवाला मान्यतादर्शक वाटत नाही या मुलभूत मुद्याची जाण करून घेणे महत्वाचे आहे कारण त्यामध्ये देवावरील प्रीती व विश्वासाचा अभाव दिसतो. यासाठीच प्रेषित पौलाने इशारा दिला: “त्यांच्यापैकी [अरण्यातील इस्राएल लोक] कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले. तेव्हा तुम्ही करकुर करू नका.” (१ करिंथकर १०:१०; गणना १४:३५–३८) पौलाने आणखी लिहिले: “जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा.” (फिलिप्पैकर २:१४) सतत कुरकुरत राहून “आनंदी देवा”ची सेवा पूर्ण जिवानिशी करणे एखाद्यास कसे जमेल बरे? (१ तिमथ्यी १:११) याकरताच, एकंदरीत प्रकरणाविषयी आम्ही यहोवाचा दृष्टिकोण उचलून धरावा आणि आम्हास समाधानी व आनंदी बनविण्याचे सामर्थ्य त्याजठायी आहे असा संपूर्ण आत्मविश्वास बाळगावा. त्याच्या आत्म्याच्या फलप्राप्तीत आनंद या गुणाचाही समावेश आहे हे आठवणीत असू द्या.—गलतीकर ५:२२, २३.
असंतुष्ट स्वभावाचा प्रतिकार करण्यामध्ये, या जीवनात नित्याने बदल होत असतो. हे जाणून घेणे साहाय्यक ठरते. त्यामुळे तक्रारविषयक कोणतेही कारण तात्पुरतेच राहणार. (पडताळा २ करिंथकर ४:१७.) याची जाणीव राखल्यामुळे आम्हाला यहोवाची सेवा करण्यामध्ये सर्वदा आनंद वाटला पाहिजे. चिंताक्रांत वा असमाधानी होऊ देण्यापेक्षा “आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढयात तृप्त असावे.” (१ तिमथ्यी ६:८) यहोवाचे हे आश्वासन आम्हाला खरेच अंतःकरण उबविणारे आहे की, “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.” तद्वत, आमच्या स्वर्गीय पित्याच्या काळजीत निश्चिंत व सुरक्षित राहून आपल्या जीवनातील स्थितीविषयी कुरकुरत न बसता “जवळ आहे तेवढयात . . . तृप्त असावे.”—इब्रीयांस १३:५.
आमचा आशिर्वादीत दर्जा लक्षात ठेवणे
आपल्या जीवनात आपण काय साध्य करू शकलो याबद्दल कधी तुम्हास असंतुष्ट झाल्याचे वाटले का? तर मग, तुमची पूर्वीची स्थिति व सध्या खऱ्या ख्रिश्चनांसोबत आध्यात्मिक नंदनवनात तुम्हाला जो दर्जा प्राप्त झाला आहे त्याविषयी विचार करा. (पडताळा २ करिंथकर १२:१–४.) ख्रिस्ताच्या अभिषिक्त अनुयायांना ‘अंधःकारातून देवाच्या अद्र्भित प्रकाशात पाचारण करण्यात आले आहे.’ त्यांचे सहकारी, “मोठा लोकसमुदाय” यालाही सत्याच्या अद्र्भित प्रकाशाचा आनंद मिळत आहे व त्यांच्या पुढे भव्य स्वरूपाचे भवितव्य आहे. (१ पेत्र २:९; प्रकटीकरण ७:९–१४) तर मग, आम्ही आध्यात्मिक प्रकाशाचा अनुभव घेत आहोत तसेच यहोवा देव व येशू ख्रिस्त या आमच्या राजाला जाणण्यात व त्यांची सेवा करण्याचा आम्हाला अप्रतिम हक्क आहे यामुळे आम्ही संतुष्ट इतकेच नव्हे तर अत्यधिक आनंदी व्हावयास नको का?
आम्ही बंधूभगिनींच्या एका आंतरराष्ट्रीय संघटनेचे भाग आहोत व या भव्य जाहीर संघटनेचे मार्गदर्शन येशू ख्रिस्त आपल्या “विश्वासू व बुद्धमान दासा” करवी करीत आहे. राज्याची सुवार्ता प्रसारीत करण्यात आणि शिष्य बनविण्याच्या कामी हे जागतिक बंधुत्व यहोवाची इच्छा पूर्ण करीत आहे. (मत्तय २४:१४, ४५–४७; २८:१९, २०; १ पेत्र २:१७) ही, संतुष्ट राहण्यासाठी किती भव्य कारणे आहेत!
तथापि, मंडळीच्या काही हालचालीविषयी आम्हाला व्यक्तिगत रित्या असंतोषितपणा वाटत आहे तर कदाचित काही विशिष्ट प्रकाराबाबतीत आम्ही गैरसमज धरला असावा किंवा कदाचित आमच्या दृष्टिकोनात आम्ही चुकलोही असू शकतो. ही वस्तुस्थिति अपूर्ण मानवात एवढेच नव्हे तर समर्पित ख्रिश्चनांतही अशक्यप्राय अशी नाही. (पडताळा नीतीसूत्रे १६:२, गलतीकर २:११–१४; फिलिप्पैकर ४:२.) पण तेच आम्ही बरोबर आहोत तर मग यहोवा आवश्यक असणारा कोणताही बदल आपला पुत्र व मंडळीचा मस्तक याकरवी घडवून आणील याविषयी आत्मविश्वास राखायला नको का? (इफिसकर ५:२२, २३) असंतुष्ट होण्यापेक्षा सहनशील राहणे किती बरे!
यहोवाने संघटनात्मक असणाऱ्या आपल्या लोकांसोबत राखलेल्या दळणवळणावर आपण मनन केल्यास संतुष्ट असण्याची बरीच कारणे सापडतील. उदाहरणार्थ, पवित्र शास्त्रीय तत्वांची अत्यंत स्पष्ट समजावणूक देण्यात आली आहे. यामुळे यहोवाच्या लोकांना आध्यात्मिक दृष्टया उभारले गेले आहे. शुद्ध वागणुकीविषयीचे देवाचे दृष्टीकोनसुद्धा स्पष्ट करण्यात आल्यामुळे यहोवाचे साक्षीदार, पूर्ण नसले तरी, नैतिकतेमध्ये उल्लेखनीय ठरले आहेत. खरे ख्रिस्ती संघटन कसे कार्यवाहित व्हावयास हवे याविषयीची आमची समज आता इतक्या पातळीपर्यंत सुधारली आहे की त्यामुळे आम्ही यहोवाची सेवा त्याने मंडळीच्या संघटनेकरता ठरवून दिलेल्या शास्त्रवचनीय मार्गदर्शनाआधारे करीत आहोत. (फिलिप्पैकर १:१) या सर्व गोष्टी समर्पित ख्रिस्ती या नात्याने आमच्या संतुष्ट वृत्तीत भर टाकणाऱ्या नसाव्या का?
विश्वासू ख्रिश्चनांना भवितव्याविषयीची वैभवी आशा आहे. तिने आम्हास अतृप्त वाटणाऱ्या कोणाही तात्कालिक भावनेस डालवून द्यायला समर्थ ठरले पाहिजे. आता, जेथे प्रत्येक जीव यहोवाचे स्तवन करील तो काळ अत्यंत समीप आलेला आहे. (स्तोत्र संहिता १५०) तेव्हा या दरम्यानच्या काळात आपण कुरकुरीला वाव देऊ नये. उलटपक्षी, आपण आमच्या प्रेमळ स्वर्गीय पित्याची सेवा इश्वरी संतुष्टपणाने करीत राहू.