येशूचे जीवन व उपाध्यपण
येशू आणि ज्योतिषी
पूर्वेकडून काही माणसे येत आहेत. ते ज्योतिषी म्हणजे ताऱ्यांच्या स्थितीचा अर्थ सांगणारे आहेत. पूर्वेकडिल त्यांच्या गावी असता त्यांनी एक नवीन तारा पाहिला, आणि यरूशलेमाकडे शेकडों मैल प्रवास करीत ते त्याच्या मागून आले.
ज्योतिषी यरूशलेमात आल्यावर विचारतात: ‘यहुद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे? आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयाला आलो आहोत’.
यरूशलेमातील हेरोद राजा हे ऐकतो तेव्हा तो खूप अस्वस्थ होतो. त्यामुळे लागलेच तो प्रमुख याजकांस बोलावतो व विचारतो: ‘ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावा?’ ते शास्त्रवचनाच्या आधारावर उत्तर देतात: ‘बेथलहेमात.’ तेव्हा हेरोद त्या ज्योतिषांना बोलावून सांगतो: ‘त्या बाळकाविषयी बारकाईने शोध करा व शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन.’ पण अंतःकरणी हेरोदाने त्या बाळकास ठार मारण्याची इच्छा धरलेली असते!
ते निघतात त्यावेळी एक आश्चर्यकारक गोष्ट घडते. जो तारा त्यांनी पूर्व दिशेला पाहिला होता तो त्यांच्यापुढे परत चालू लागतो! खरोखर, हा तारा काही सर्वसामान्य नव्हता पण त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खासरितीने दाखविला गेला. ते ज्योतिषी ताऱ्याचा मागोवा घेत मरीया व योसेफ ज्या घरात राहात होते तेथपर्यंत येऊन पोहोचतात. येथेच तो ताराही थांबतो.
ज्योतिषी घरात प्रवेश करतात तेव्हा मरीया व तिचे बाळक येशू त्यांना दिसते. ते पाया पड़ून त्याला वंदन करतात. आपल्या थैल्या सोडून ते सोने, ऊद व गंधरस ही दाने देतात. त्यानंतर जेव्हा ते, बाळक कोठे आहे हे हेरोदास सांगावयासाठी परतण्याच्या बेतात आहेत तेव्हाच स्वप्नाद्वारे देव त्यांना तसे न करण्याची आज्ञा करतो. त्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने स्वदेशी जातात.
ज्योतिषांना मार्गदर्शन द्यावयास, आकाशात हा तारा कोणी पाठविला असावा असे तुम्हाला वाटते बरे? या ताऱ्याने त्यांना थेट बेथलहेमात येशूकडे नेले नाही हे लक्षात घ्या. उलट, येशूला ठार मारण्याचा कट करू इच्छिणाऱ्या हेरोदाकडे यरूशलेमात त्यांना आणले गेले. देवाने हस्तक्षेप केला नसता व ज्योतिषांस न सांगण्याची आज्ञा दिली नसती तर हेरोदाने येशूला ठार केले असते. त्यामुळेच प्रत्यक्षात हे दिसते की देवाचा शत्रू, दियाबल सैतान याला, येशूला ठार मारण्याची ईच्छा होती व आपला हा उद्देश साध्य करण्यासाठीच त्याने त्या ताऱ्याचा वापर केला होता. मत्तय २:१–१२; मीखा ५:२.
◆ ज्योतिषांनी पाहिलेला तारा सर्वसामान्य नव्हता हे कसे दिसते?
◆ ज्योतिषांनी येशूला पाहिले तेव्हा तो कोठे होता?
◆ ज्योतिषांना मार्गदर्शन करावयास सैतानाने तो तारा दाखविला होता हे आम्ही का समजू शकतो?