प्राणघातक मिलाफ
अमेरिकेतल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी, १९५९ साली असे भाकीत केले होते की क्षयरोग (टीबी) लवकरच कायमचा नाहीसा होईल. आणि खरोखरच, काही वर्षांपर्यंत या रोगाचे प्रमाण अगदीच कमी झाले; इतके, की हा रोग आता पूर्णपणे आटोक्यात आला आहे असे कित्येकांना वाटू लागले. पण आता टीबी पुन्हा परतला आहे, आणि यावेळेस एका प्राणघातक जिवाणूच्या, अर्थात एचआयव्हीच्या सोबतीने. या एचआयव्ही जिवाणूची लागण झालेल्या रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती हळूहळू कमजोर होते आणि बहुतेक केसेसमध्ये रुग्णाला एड्स होतो.
असे तर जगातल्या एकंदर लोकसंख्येपैकी जवळजवळ एक तृतियांश म्हणजे कमीतकमी दोनशे कोटी लोकांच्या शरीरात टीबीचे जिवाणू आहेत. पण हे जिवाणू शरीराच्या संपर्कात आल्यावर या लोकांना प्रत्यक्ष टीबी होण्याची शक्यता सबंध आयुष्यात फक्त १०% असते. याउलट, एचआयव्हीचा संसर्ग झालेल्यांना एका वर्षातच संसर्गजन्य टीबी होण्याची ८% शक्यता असते. त्यामुळे, एचआयव्हीची लागण झालेल्यांची संख्या जसजशी वाढते तसतसा टीबी हा रोग अत्यंत मोठ्या प्रमाणावर फैलावण्याचा धोका आहे.
डब्ल्यूएचओचे (जागतिक आरोग्य संघटना) डॉ. रिचर्ड जे. ओब्रायन यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेत टीबीच्या केसेसमध्ये अलीकडे सुमारे १५ टक्के वाढ झाली आहे. आणि त्यांच्या मते, ‘ही वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे एचआयव्ही आणि टीबी यांचा मिलाफ.’ पण, सर्वाधिक धोका आहे तो विकसनशील देशांना. दर वर्षीच्या ऐंशी लाख नव्या टीबी रुग्णांपैकी तब्बल ९० टक्के रुग्ण गरीब देशांतले असतात आणि यांपैकी जवळजवळ तीस लाख रुग्ण दगावतात.
जगभरात, या दोन्ही प्राणघातक जिवाणूंचा संसर्ग झालेले जवळजवळ चाळीस लाख चाळीस हजार लोक आहेत. पण डब्ल्यूएचओच्या अंदाजानुसार काही वर्षांतच, एचआयव्हीची लागण झालेल्यांपैकी जवळजवळ दहा लाख लोक दर वर्षी टीबीमुळे आपला जीव गमावतील. एचआयव्ही/एड्स यांना लढा देण्याकरता राबवलेल्या जॉईंट युनायटेड नेशन्स प्रोग्रामचे वरिष्ठ अधिकारी पीटर पीजॉ यांच्या शब्दांत, “जोडीने आलेली ही साथ चालू दशकातली सर्वात भयंकर आरोग्य समस्या ठरली आहे.”
[२५ पानांवरील चित्राचे श्रेय]
New Jersey Medical School —National Tuberculosis Center