ऑक्टोबर
गुरुवार, १ ऑक्टोबर
मी तर यहोवाकडे डोळे लावीन.—मीखा ७:७.
यहोवाची सेवा करत राहायला आपल्याला मदत व्हावी म्हणून सहसा आपल्याला वडिलांकडून, विभागीय पर्यवेक्षकांकडून, शाखा कार्यालयाकडून आणि नियमन मंडळाकडून मार्गदर्शन मिळतं. पण अमुक एक मार्गदर्शन का देण्यात आलंय हे आपल्याला कळत नाही तेव्हा काय? अशा वेळी ते मार्गदर्शन योग्य असेल का, याबद्दल आपल्या मनात कदाचित शंका येईल. इतकंच काय, तर कदाचित मार्गदर्शन देणाऱ्या भावांची अपरिपूर्णता, त्यांच्या चुका आपल्याला दिसू लागतील. आपण जेव्हा विश्वासाने चालतो तेव्हा आपल्याला हा भरवसा असतो की सगळ्या गोष्टी यहोवाच्या नियंत्रणात आहेत आणि त्याला आपल्या परिस्थितीची जाणीव आहे. यामुळे आपण आज्ञा पाळायच्या म्हणून पाळत नाही, तर त्या लगेच पाळायला तयार असतो. (इब्री १३:१७) आपल्याला माहीत आहे की आपण आज्ञा पाळतो तेव्हा मंडळीची एकता वाढते. (इफिस. ४:२, ३) तसंच, आपल्याला हासुद्धा भरवसा असतो की पुढाकार घेणारे भाऊ जरी अपरिपूर्ण असले, तरी आज्ञा पाळल्यामुळे यहोवा आपल्याला आशीर्वाद देईल. (१ शमु. १५:२२) आणि पुढे जर या मार्गदर्शनात खरंच काही बदल करायची गरज असली, तर यहोवा ते योग्य वेळी नक्की बदलेल. टेहळणी बुरूज२५.०३ २३-२४ ¶१३-१४
शुक्रवार, २ ऑक्टोबर
देव रहस्यांचा उलगडा करू शकतो.—दानी. २:२८.
आज आपण एका रोमांचक काळात जगत आहोत! दररोज बायबलच्या भविष्यवाण्या पूर्ण होताना आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत. उदाहरणार्थ, जगावर वर्चस्व मिळवण्यासाठी “उत्तरेच्या राजाची” आणि “दक्षिणेच्या राजाची” चढाओढ आपण पाहू शकतो. (दानी. ११:४०, तळटीप.) तसंच संपूर्ण जगभरात कल्पनाही करता येणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात आनंदाचा संदेश घोषित केला जात असल्याचं आपण पाहतोय. आणि लाखो लोक त्याला चांगला प्रतिसाद देत असल्याचंही आपण पाहू शकतोय. (यश. ६०:२२; मत्त. २४:१४) शिवाय, “योग्य वेळी” भरपूर प्रमाणात आपल्याला आध्यात्मिक अन्नसुद्धा मिळत आहे. (मत्त. २४:४५-४७) लवकरच होणाऱ्या काही महत्त्वाच्या घटनांबद्दल आपल्याला स्पष्टपणे समजावं, म्हणून यहोवा आपल्याला आजही मदत करत आहे. (नीति. ४:१८) आपण खातरी बाळगू शकतो की मोठं संकट सुरू झाल्यानंतर, विश्वासू राहता यावं आणि आध्यात्मिक रितीने प्रगती करता यावी म्हणून ज्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, त्या गोष्टी आपल्याला नक्की कळतील. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे, भविष्यात अशाही काही गोष्टी घडणार आहेत ज्यांबद्दल आपल्याला माहीत नाही. टेहळणी बुरूज२४.०५ ८-९ ¶१-२
शनिवार, ३ ऑक्टोबर
तो आपल्या जिभेने बदनामी करत नाही.—स्तो. १५:३.
स्तोत्रकर्त्याने स्तोत्र १५:३ मध्ये खासकरून बदनामी करण्याविषयी म्हटलंय. पण बदनामी म्हणजे काय? अगदी साध्या शब्दात सांगायचं, तर बदनामी म्हणजे अशी एखादी खोटी गोष्ट सांगणं ज्यामुळे एखाद्याचं नाव खराब होऊ शकतं. स्तोत्र १५:३ मध्ये आपल्याला याची आठवण करून दिली आहे, की यहोवाचे पाहुणे त्यांच्या शेजाऱ्यांचं काहीही वाईट करत नाहीत. आणि ते आपल्या मित्रांची निंदा करत नाहीत. (स्तो. १५:१) मग निंदा करण्यात कोणकोणत्या गोष्टी येतात? एखाद्याबद्दल वाईट गोष्ट पसरवून आपण नकळत एखाद्याची निंदा करू शकतो. उदाहरणार्थ, या परिस्थितींचा विचार करा: (१) एक बहीण पायनियर सेवा करायचं थांबवते, (२) एक विवाहित जोडपं आता बेथेलमध्ये सेवा करत नाही, (३) एक भाऊ आता वडील किंवा सहायक सेवक म्हणून सेवा करत नाही. हे नेमकं कोणत्या कारणांमुळे घडलं असेल याबद्दल काहीतरी अंदाज बांधून, तो इतरांना सांगणं योग्य ठरेल का? त्यांनी असं का केलं असेल याची बरीच कारणं असतील जी आपल्याला माहीत नाहीत. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की यहोवाच्या तंबूतला पाहुणा “आपल्या शेजाऱ्याचं वाईट करत नाही, आणि आपल्या मित्रांची निंदा करत नाही.” टेहळणी बुरूज२४.०६ ११-१२ ¶११-१३
रविवार, ४ ऑक्टोबर
मी सतत यहोवाला माझ्यापुढे ठेवतो. तो माझ्या उजव्या हाताला असल्यामुळे, माझी पावलं कधीही डळमळणार नाहीत.—स्तो. १६:८.
यहोवाबद्दल आपल्या मनात असलेली योग्य भीती वाढवण्यासाठी आपण प्रत्येक निर्णय घेताना यहोवाचं मन आनंदित करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बायबलचा एखादा अहवाल वाचताना स्वतःला विचारा: ‘मी जर या परिस्थितीत असतो तर मी काय केलं असतं?’ उदाहरणार्थ, दहा हेरांनी वचन दिलेल्या देशाची पाहणी करून आल्यावर त्यांचं मत सांगितलं, तेव्हा तुम्ही तिथे आहात अशी कल्पना करा. त्यांनी दिलेल्या बातमीवर विश्वास ठेवून तुम्हीसुद्धा माणसाच्या भीतीला बळी पडला असता का, की यहोवावरच्या तुमच्या प्रेमाला आणि त्याचं मन आनंदित करायच्या इच्छेला तुम्ही जास्त महत्त्व दिलं असतं? यहोशवा आणि कालेब यांनी जे सत्य ओळखलं होतं, ते इस्राएलच्या त्या अख्ख्या पिढीला ओळखता आलं नाही. त्यामुळे वचन दिलेला देशात जायची संधी त्यांनी गमावली.—गण. १४:१०, २२, २३. टेहळणी बुरूज२४.०७ १० ¶७
सोमवार, ५ ऑक्टोबर
हृदयांचं परीक्षण करणारा यहोवा आहे.—नीति. १७:३.
गोमरने इतर पुरुषांसाठी होशेयला सोडून दिलं. मग ती मदत करण्याच्या पलीकडे होती का? यहोवा मनं ओळखणारा देव आहे. त्याने होशेयला सांगितलं: “इस्राएलचे लोक दुसऱ्या देवांच्या मागे जातात . . . तरीसुद्धा मी त्यांच्यावर प्रेम करतो; तसाच आता तूही, जिच्यावर दुसरा माणूस प्रेम करतो आणि जी व्यभिचार करत आहे, अशा स्त्रीवर पुन्हा प्रेम कर.” (होशे. ३:१; नीति. १६:२) लक्ष द्या, होशेयची बायको अजूनही गंभीर पाप करत होती. तरीसुद्धा, यहोवाने होशेयला तिच्याकडे पाठवलं, तिला क्षमा करायला सांगितलं आणि तिला पुन्हा आपली बायको म्हणून स्वीकारायला सांगितलं. त्याच प्रकारे यहोवाने आपल्या हट्टी लोकांबद्दल आशा सोडली नव्हती. ते अजूनही गंभीर पापं करत होते तरीसुद्धा त्याचं त्यांच्यावर प्रेम होतं. त्यांना आपले मार्ग बदलायला आणि पश्चात्ताप करायला मदत करण्यासाठी, त्याने स्वतःहून संदेष्ट्यांना त्यांच्याकडे पाठवलं. या उदाहरणातून आपल्याला शिकायला मिळतं, की एका व्यक्तीच्या मनात जे काही चाललंय ते यहोवाला कळतं. तसंच, ती व्यक्ती अजूनही गंभीर पाप करत असेल, तरी यहोवा तिला पश्चात्ताप करायला मदत करतो. टेहळणी बुरूज२४.०८ १० ¶७
मंगळवार, ६ ऑक्टोबर
नियमशास्त्र हे पुढे येणाऱ्या चांगल्या गोष्टींची छाया आहे.—इब्री १०:१.
सुरुवातीच्या यहुदी ख्रिश्चनांना बरेच मोठमोठे बदल करावे लागणार होते आणि हे त्यांच्यासाठी काही सोपं नव्हतं. एके काळी यहुदी लोक यहोवाचे निवडलेले लोक होते. यरुशलेममधून राज्य करणारे राजे यहोवाचं प्रतिनिधित्व करायचे. शिवाय, यरुशलेममधलं मंदिर शुद्ध उपासनेचं केंद्रसुद्धा होतं. तसंच, सगळे विश्वासू यहुदी त्यांच्या धार्मिक पुढाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे मोशेचं नियमशास्त्र पाळत होते. त्यामध्ये खाण्यापिण्याबद्दल, सुंतेबद्दल आणि यहुदी नसलेल्या लोकांशी कसं वागायचं याबद्दल नियम होते. पण येशूच्या मृत्यूनंतर यहोवाने यहुदी लोकांची बलिदानं स्वीकारायचं बंद केलं होतं. यामुळे जे यहुदी ख्रिश्चन वर्षानुवर्षं सवयीप्रमाणे नियमशास्त्र पाळत होते, त्यांना बदल करणं खूप कठीण गेलं. (इब्री १०:१, ४, १०) इतकंच काय तर प्रेषित पेत्रसारख्या प्रौढ ख्रिश्चनांनासुद्धा यांसारख्या काही बदलांशी जुळवून घ्यायला कठीण गेलं. (प्रे. कार्यं १०:९-१४; गलती. २:११-१४) शिवाय या नवीन विश्वासांमुळे यहुदी धर्मगुरूसुद्धा त्यांचा छळ करू लागले. टेहळणी बुरूज२४.०९ ९ ¶४
बुधवार, ७ ऑक्टोबर
जे तुमचं नेतृत्व करत आहेत आणि ज्यांनी तुम्हाला देवाचं वचन सांगितलं आहे, त्यांची आठवण ठेवा.—इब्री १३:७.
यहोवा जेव्हा त्याच्या लोकांना एखादी गोष्ट करायला सांगतो, तेव्हा त्यांनी ती व्यवस्थित पद्धतीने करावी अशी त्याची इच्छा असते. (१ करिंथ. १४:३३) उदाहरणार्थ, संपूर्ण जगात आनंदाचा संदेश सांगितला जावा अशी देवाची इच्छा आहे. (मत्त. २४:१४) आणि या कामाची जबाबदारी यहोवाने येशूवर सोपवली आहे. हे काम व्यवस्थित पद्धतीने व्हावं याची येशूने काळजी घेतली आहे. पहिल्या शतकात, यरुशलेममध्ये प्रेषितांचा आणि वडिलांचा एक गट होता. हा गट मंडळ्यांसाठी निर्णय घ्यायचा. (प्रे. कार्यं १५:२; १६:४) पुढे वेगवेगळ्या ठिकाणी मंडळ्या बनू लागल्या. मग मंडळीतले वडील यरुशलेममधल्या भावांकडून मिळालेल्या सूचना मंडळीतल्या भाऊबहिणींना कळवायचे. (प्रे. कार्यं १४:२३) जेव्हा भाऊबहिणींनी या सूचनांचं पालन केलं, तेव्हा “मंडळ्या विश्वासात मजबूत होत गेल्या आणि शिष्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली.”—प्रे. कार्यं १६:५. टेहळणी बुरूज२४.०४ ८ ¶१
गुरुवार, ८ ऑक्टोबर
मग्दालीया मरीयाने शिष्यांना येऊन ही बातमी सांगितली: “मी प्रभूला पाहिलंय!”—योहा. २०:१८.
निसान महिन्याच्या १६ व्या दिवशी भल्या पहाटे काही स्त्रिया येशूच्या कबरेजवळ आल्या. (लूक २४:१, १०) आता त्यांच्यापैकी मग्दालीया मरीयाच्या बाबतीत काय झालं याकडे लक्ष देऊ या. जेव्हा मरीया कबरेजवळ आली तेव्हा तिला ती रिकामी दिसली. हे पाहून ती धावत पेत्र आणि योहानला त्याबद्दल सांगायला गेली. आणि ते जेव्हा काय झालंय ते बघायला कबरेजवळ येत होते, तेव्हा तीसुद्धा त्यांच्या मागे गेली. कबर रिकामी असल्याची खातरी झाल्यावर ते घरी परतले. पण मरीया तिथेच थांबली आणि रडू लागली. पण येशू आपल्याला पाहतोय हे तिला माहीतच नव्हतं. या विश्वासू स्त्रीला रडताना पाहून येशूला खूप वाईट वाटलं आणि त्याला तिचं सांत्वन करावंसं वाटलं. म्हणून तो तिच्यासमोर प्रकट झाला. आणि त्याने एक साधीशी गोष्ट करून तिला प्रोत्साहन दिलं. तो तिच्याशी बोलला आणि त्याने तिला एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली. त्याने तिला त्याच्या शिष्यांना पुनरुत्थानाची बातमी कळवायला सांगितली.—योहा. २०:१७, १८. टेहळणी बुरूज२४.१० १३-१४ ¶७
शुक्रवार, ९ ऑक्टोबर
मी इजिप्त देशात बरीच चिन्हं आणि चमत्कार करीन.—निर्ग. ७:३.
मोशेने एक संदेष्टा, न्याय करणारा, सेनापती आणि इतिहासकार म्हणून काम केलं. त्याने इस्राएल राष्ट्राला इजिप्तमधल्या गुलामगिरीतून बाहेर काढलं. आणि यहोवाच्या अनेक चमत्कारांचा तो प्रत्यक्ष साक्षीदार होता. बायबलची पहिली पाच पुस्तकं, स्तोत्र ९० आणि कदाचित स्तोत्र ९१ लिहिण्यासाठी यहोवाने त्याचा उपयोग केला. त्याने ईयोबचं पुस्तकही लिहिलं असावं. आपल्या मृत्यूच्या काही काळाआधी, म्हणजे वयाच्या १२० व्या वर्षी, मोशेने सगळ्या इस्राएली लोकांना एकत्र बोलवलं. त्यांनी पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या गोष्टींची त्याने त्यांना आठवण करून दिली. त्यांनी यहोवाने केलेली अनेक चिन्हं आणि चमत्कार, तसंच इजिप्तविरुद्ध देवाने बजावलेला न्यायदंड स्वतः पाहिला होता. (निर्ग. ७:४) देवाने तांबड्या समुद्राचे दोन भाग केले तेव्हा त्यांनी ते पाहिलं होतं, आणि त्यातून ते चालत गेले होते. आणि त्यांनी फारोच्या सैन्याचा नाश होतानाही पाहिला होता. (निर्ग. १४:२९-३१) ओसाड रानात त्यांनी यहोवाचं संरक्षण आणि काळजी अनुभवली होती. (अनु. ८:३, ४) आणि आता ते वचन दिलेल्या देशात प्रवेश करण्याच्या तयारीत होते. म्हणून मोशेने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या शेवटच्या संधीचा फायदा घेतला. टेहळणी बुरूज२४.११ ९ ¶३-४
शनिवार, १० ऑक्टोबर
ही भाकर खाणारा प्रत्येक जण सर्वकाळ जगेल. मी देत असलेली भाकर म्हणजे माझं शरीर आहे. जगाला जीवन मिळावं म्हणून मी ते देईन.—योहा. ६:५१.
येशू गालीलमध्ये लोकांशी जे बोलला आणि प्रभूच्या सांजभोजनाच्या वेळी त्याच्या प्रेषितांशी जे बोलला, त्यात एक फरक होता. गालीलमध्ये तो जे बोलला ते असंख्य लोकांना लागू होतं आणि ते खासकरून यहुद्यांना उद्देशून होतं. त्यांना त्याच्याकडून फक्त अन्न हवं होतं. पण त्याने त्यांचं लक्ष खरोखरच्या अन्नापेक्षा आणखी जास्त महत्त्वाच्या एका गोष्टीकडे वळवलं. एक अशी गोष्ट जिच्यामुळे त्यांना सर्वकाळाचं जीवन मिळणार होतं. येशूने त्यांना सांगितलं की शेवटच्या दिवशी मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत केलं जाईल आणि ते सर्वकाळ जगतील. लक्ष द्या, तो एका लहान गटाबद्दल बोलत नव्हता. लहान गटाबद्दल त्याने नंतर प्रभूच्या सांजभोजनाच्या वेळी सांगितलं. याउलट, गालीलमध्ये लोकांशी बोलताना त्याने अशा एका आशीर्वादाबद्दल सांगितलं जो सगळ्यांना मिळणार होता. टेहळणी बुरूज२४.१२ ११ ¶१०-११
रविवार, ११ ऑक्टोबर
पतींनो, आपल्या पत्नीवर प्रेम करा.—कलस्सै. ३:१९.
यहोवा हिंसक लोकांचा द्वेष करतो. (स्तो. ११:५) आणि जे पती आपल्या पत्नीला मारहाण करतात ते तर यहोवाला मुळीच आवडत नाहीत. (मला. २:१६) जर एक पती आपल्या पत्नीशी नीट वागत नसेल, तर याचा परिणाम यहोवासोबतच्या त्याच्या नात्यावरही होईल. इतकंच काय, तर यहोवा त्याच्या प्रार्थनासुद्धा ऐकणार नाही. (१ पेत्र ३:७) काही पती आपल्या पत्नीशी रागाने बोलतात किंवा अशा प्रकारे बोलतात ज्यामुळे तिला वाईट वाटू शकतं. पण यहोवाला “राग, क्रोध, आरडाओरडा, शिवीगाळ” अजिबात आवडत नाही. (इफिस. ४:३१, ३२) जो पती आपल्या पत्नीशी कठोरपणे बोलतो त्याचा परिणाम त्याच्या विवाहावर तर होतोच, पण यहोवासोबतच्या त्याच्या नात्यावरही होतो. (याको. १:२६) जो पती पोर्नोग्राफी पाहतो, त्याच्याबद्दलही हेच म्हणता येईल. अशा पतीचंही यहोवासोबतचं नातं खराब होतं. शिवाय, तो त्याच्या पत्नीचाही अनादर करतो. यहोवाची इच्छा आहे की पतीने आपल्या पत्नीला फक्त वागण्यातूनच नाही तर विचारांनीही एकनिष्ठ असावं. येशूने म्हटलं होतं की जेव्हा एक माणूस एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहतो, तेव्हाच तो “आपल्या मनात” तिच्याशी व्यभिचार करतो.—मत्त. ५:२८, २९. टेहळणी बुरूज२५.०१ ९ ¶६-८
सोमवार, १२ ऑक्टोबर
माणूस फक्त येशू ख्रिस्तावर असलेल्या विश्वासाद्वारे नीतिमान ठरवला जातो.—गलती. २:१६.
बायबल म्हणतं की यहोवाच्या सेवकांना नीतिमान ठरवण्यात आलंय. याचा अर्थ आपल्या पापांची आपण त्याला भरपाई द्यावी अशी तो आपल्याकडून अपेक्षा करत नाही. पण, असं करून तो न्यायासाठी असलेले त्याचे स्तर मोडत नाही. तसंच, आपण काहीतरी केलंय म्हणून तो आपल्याला नीतिमान ठरवत नाही आणि तो आपलं पापही खपवून घेत नाही. उलट प्रायश्चित्ताच्या व्यवस्थेवर आणि खंडणी बलिदानावर आपला विश्वास असल्यामुळे त्याला आपली कर्जं माफ करायचा आधार मिळतो. अशा प्रकारे तो आपल्याला नीतिमान ठरवतो. (रोम. ३:२४) आपल्या सगळ्यांसाठी याचा काय अर्थ होतो? स्वर्गात येशूसोबत राज्य करायला ज्यांची निवड करण्यात आली आहे त्यांना देवाची मुलं म्हणून आधीच नीतिमान ठरवण्यात आलंय. (तीत ३:७; १ योहा. ३:१) त्यांच्या पापांची क्षमा करण्यात आली आहे; जणू काय ती त्यांनी कधी केलीच नव्हती. आणि त्यामुळे ते देवाच्या राज्यात जायला पात्र ठरलेत. (रोम. ८:१, २, ३०) ज्यांना पृथ्वीवरच्या जीवनाची आशा आहे त्यांना देवाचे मित्र म्हणून नीतिमान ठरवण्यात आलंय आणि त्यांच्या पापांचीसुद्धा क्षमा करण्यात आली आहे.—याको. २:२१-२३. टेहळणी बुरूज२५.०२ ५ ¶१७-१८
मंगळवार, १३ ऑक्टोबर
तुझे विचार देवाचे नाहीत तर माणसांचे आहेत.—मत्त. १६:२३.
एकदा प्रेषित पेत्र यहोवासारखा विचार करायला चुकला. येशूने त्याच्या प्रेषितांना सांगितलं होतं की त्याला यरुशलेमला जावं लागेल, तिथे त्याला धार्मिक पुढाऱ्यांच्या हाती दिलं जाईल, त्याला छळ सोसावा लागेल आणि त्याला ठार मारलं जाईल. (मत्त. १६:२१) पेत्रला माहीत होतं की येशू देवाच्या लोकांना वाचवणार होता, कारण येशू वचन दिलेला मसीहा होता. असं असूनही यहोवा येशूला अशा प्रकारे मरू देईल, ही गोष्ट पेत्रला मान्य करायलाच खूप कठीण जात होती. (मत्त. १६:१६) त्यामुळे पेत्र येशूला बाजूला घेऊन गेला आणि म्हणाला: “हे काय बोलतोस प्रभू? तुला नक्कीच असं काही होणार नाही.” (मत्त. १६:२२) येशू आणि पेत्र एकसारखा विचार करत नव्हते. कारण पेत्र यहोवासारखा विचार करत नव्हता. पेत्रचे हेतू जरी चांगले असले तरी येशूने त्याचा सल्ला नाकारला. कारण येशूने स्वतःवर दया करावी अशी यहोवाची मुळीच इच्छा नव्हती. त्या वेळी पेत्र एक महत्त्वाचा धडा शिकला. तो म्हणजे, आपण देवासारखा विचार केला पाहिजे. आपणही हाच धडा शिकू शकतो. टेहळणी बुरूज२५.०३ ९ ¶५-६
बुधवार, १४ ऑक्टोबर
यहोवा दुःखी लोकांच्या जवळ असतो; मनाने खचलेल्यांना तो वाचवतो.—स्तो. ३४:१८.
तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुमचं मन दुखावल्यामुळे किंवा तुमचा विश्वासघात केल्यामुळे तुम्ही खचून गेला आहात का? समोरच्या व्यक्तीने तुम्हाला कसंही वागवलं असलं, तरी तुमच्या स्वर्गातल्या पित्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. विश्वासघातामुळे होणाऱ्या दुःखाचा सामना करत असताना आजच्या वचनातल्या दावीदच्या शब्दांमुळे आपल्याला सांत्वन मिळू शकतं. याबद्दल एका पुस्तकात असं म्हटलंय, की ‘मनाने खचलेले,’ असे लोक असू शकतात, “ज्यांना काहीच आशा नाही.” मग अशा लोकांबद्दल यहोवाला कसं वाटतं? यहोवा त्यांच्या जवळ असतो. तो अशा पालकासारखा आहे जो आपल्या रडणाऱ्या मुलाला कुशीत घेतो आणि त्याला सांत्वन देतो. एखाद्याने आपला विश्वासघात केल्यामुळे आपण दुःखी होतो, तेव्हा यहोवाला आपलं दुःख जाणवतं आणि तो आपल्याला मदत करायला आतुर असतो. तो आपल्या मनावर झालेल्या जखमांवर फुंकर घालायला तयार असतो. तसंच, त्याने आपल्याला खूप सुंदर आशासुद्धा दिली आहे. त्यामुळे आपल्याला समस्यांचा सामना करायला मदत होते.—यश. ६५:१७. टेहळणी बुरूज२४.१२ २३-२४ ¶१३-१४
गुरुवार, १५ ऑक्टोबर
यहोवाकडूनच तुम्हाला बक्षिसाच्या रूपात वारसा मिळेल.—कलस्सै. ३:२४.
आज मंडळीतले वडील याची खातरी ठेवू शकतात, की यहोवा त्यांची चांगली कामं पाहतो आणि त्याची कदर करतो. वडील मंडळीत मेंढपाळ म्हणून काम करतात, मंडळीला शिकवतात आणि प्रचारकार्य करतात. पण ही सगळी कामं करण्यासोबतच बरेच वडील बांधकाम विभागात आणि नैसर्गिक विपत्ती मदतकार्यातसुद्धा काम करतात. इतर काही वडील पेशन्टला भेट देणाऱ्या गटांमध्ये किंवा हॉस्पिटल संपर्क समित्यांमध्ये सेवा करतात. अशा कामांत भाग घेणारे वडील, मंडळीकडे यहोवाने घालून दिलेली व्यवस्था म्हणून पाहतात. त्यांची नेमणूक ते पूर्ण मनाने पार पाडतात आणि असा भरवसा ठेवतात, की ते जे काही करत आहेत त्याचं प्रतिफळ यहोवा त्यांना नक्की देईल. (कलस्सै. ३:२३, २४) आपण सगळेच वडील म्हणून सेवा करू शकत नाही. पण आपल्या प्रत्येकाकडे यहोवाला देण्यासाठी काही ना काही आहे. जेव्हा आपण त्याची सेवा करण्यासाठी आपल्या परीने सगळ्यात चांगलं ते करायचा प्रयत्न करतो, तेव्हा तो त्याची कदर करतो. जगभरातल्या कामासाठी आपण देत असलेलं दान कितीही कमी असलं, तरी यहोवासाठी ते महत्त्वाचं आहे. तसंच, आपल्या भाऊबहिणींच्या चुकांकडे दुर्लक्ष करून आपण जेव्हा त्यांना क्षमा करतो, तेव्हा तो खूप खूश होतो. हे लक्षात ठेवा की तुम्ही जे काही करताय ते यहोवासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तो तुमच्यावर प्रेम करतो. तो नक्कीच तुम्हाला त्याचं प्रतिफळ देईल.—लूक २१:१-४. टेहळणी बुरूज२४.०६ २३-२४ ¶१२-१३
शुक्रवार, १६ ऑक्टोबर
आपलं मन तिच्या मार्गांकडे वळू देऊ नकोस. आणि तिच्या वाटांकडे वाहवत जाऊ नकोस.—नीति. ७:२५.
यहोवाच्या कुठल्याही उपासकाच्या हातून काय घडू शकतं, हे शलमोनने लिहिलेल्या या अहवालातून आपल्याला कळतं. तो कदाचित एखाद्या गंभीर पापात पडू शकतो. आणि त्याला वाटेल, की हे सगळं त्याच्याकडून अचानक झालं. किंवा तो म्हणेल की हे माझ्याकडून “नकळत घडलं.” पण तरी प्रत्यक्षात काय घडलं याचा जर त्याने विचार केला तर त्याला कदाचित कळेल, की त्याने काही चुकीची पावलं उचलल्यामुळे त्याच्या हातून असं घडलं. यात वाईट संगत, चुकीचं मनोरंजन किंवा ख्रिस्ती व्यक्तीसाठी अयोग्य असलेल्या ठिकाणांना प्रत्यक्ष किंवा इंटरनेटवरून पुन्हा-पुन्हा भेट देणं यांसारख्या गोष्टी असतील. यासोबतच त्याने प्रार्थना करणं, बायबल वाचणं, सभांना जाणं, प्रचार करणं हेसुद्धा कदाचित थांबवलं असेल. नीतिवचनांत सांगितलेल्या त्या तरुणाप्रमाणे हे पाप त्याच्या हातून नक्कीच अचानक घडलं नसेल. यातून आपण काय शिकतो? आपण पाप आणि पापाला प्रवृत्त करणाऱ्या गोष्टीसुद्धा टाळल्या पाहिजेत. या अहवालातून शलमोन हाच मुद्दा मांडतो.—मत्त. ५:२९, ३०. टेहळणी बुरूज२४.०७ १६ ¶१०-११
शनिवार, १७ ऑक्टोबर
आमची ही संपत्ती मातीच्या भांड्यांत आहे.—२ करिंथ. ४:७.
ही संपत्ती काय आहे? ही संपत्ती म्हणजे प्रचाराचं काम आहे. यामुळे लोकांचा जीव वाचतो. (२ करिंथ. ४:१) आणि मातीची भांडी काय आहेत? ती इतरांना आनंदाचा संदेश सांगणाऱ्या देवाच्या सेवकांना सूचित करतात. पौलच्या दिवसांत व्यापारी अन्नसामग्री, द्राक्षारस आणि पैसे यांसारख्या मौल्यवान गोष्टी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी, मातीच्या भांड्यांचा वापर करायचे. त्याच प्रकारे यहोवाने आपल्याला आनंदाचा मौल्यवान संदेश सांगायची जबाबदारी सोपवली आहे. आणि यहोवाच्या मदतीने, आपल्याला हा संदेश विश्वासाने सांगत राहायचं बळ मिळतं. कधीकधी आपल्याला माणसांची भीती वाटू शकते. किंवा लोक आपला संदेश ऐकणार नाहीत याचीसुद्धा भीती वाटू शकते. मग आपण यावर कशी मात करू शकतो? प्रेषितांना जेव्हा प्रचार न करण्याचा हुकूम देण्यात आला होता, तेव्हा त्यांनी काय प्रार्थना केली याचा विचार करा. भीतीला बळी पडण्याऐवजी त्यांनी यहोवाला अशी प्रार्थना केली: ‘धैर्याने बोलत राहायला आम्हाला बळ दे.’ यहोवाने लगेचच त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. (प्रे. कार्यं ४:१८, २९, ३१) जर तुम्हालाही कधी माणसांची भीती वाटली तर लोकांवरचं प्रेम वाढवण्यासाठी तुम्ही यहोवाला मदत मागू शकता. त्यामुळे लोकांना आनंदाचा संदेश सांगायला तुम्हाला भीती वाटणार नाही. टेहळणी बुरूज२४.०४ १६-१७ ¶८-९
रविवार, १८ ऑक्टोबर
हे आमच्या स्वर्गातल्या पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो.—मत्त. ६:९.
यहोवावर प्रेम असल्यामुळे आपण त्याचं नाव पवित्र करायला प्रवृत्त होतो. सैतानाने यहोवाबद्दल खोट्या गोष्टी पसरवून त्याच्या नावावर जो कलंक लावलाय तो पुसून टाकायच्या कामात भाग घ्यायची आपली इच्छा आहे. (उत्प. ३:१-५; ईयो. २:४; योहा. ८:४४) आपल्या सेवाकार्यात यहोवाची बाजू घ्यायला आणि जे ऐकतील त्यांना त्याच्याबद्दल सत्य सांगायला आपण उत्सुक आहोत. त्याचा सगळ्यात मोठा गुण प्रेम आहे. तो नीतीने आणि न्यायाने राज्य करतो. आणि त्याचं राज्य सगळी दुःखं काढून टाकेल, तसंच मानवी कुटुंबात शांती आणि आनंद आणेल या सगळ्या गोष्टी लोकांना कळाव्यात अशी आपली इच्छा आहे. (स्तो. ३७:१०, ११, २९; १ योहा. ४:८) जेव्हा आपण लोकांना या सगळ्या गोष्टी सांगतो, तेव्हा आपण त्याचं नाव पवित्र करतो. तसंच आपण आपल्या नावाला जागतोय याचं समाधानसुद्धा आपल्याला असतं. टेहळणी बुरूज२४.०५ १८ ¶१२
सोमवार, १९ ऑक्टोबर
तू मेजवानी देशील तेव्हा जे गरीब, लंगडेलुळे आणि आंधळे आहेत त्यांना आमंत्रण दे. म्हणजे तू आनंदी होशील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याजवळ काहीही नाही. जेव्हा नीतिमान लोकांना मेलेल्यांतून पुन्हा जिवंत केलं जाईल तेव्हा तुला याचं प्रतिफळ मिळेल.—लूक १४:१३, १४.
भावांनो, तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांसोबतच इतरांसाठीसुद्धा चांगल्या गोष्टी करता, तेव्हा तुम्ही ‘पाहुणचाराची आवड असलेली’ व्यक्ती आहात हे दाखवत असता. (१ पेत्र ४:९) पाहुणचार करणारी व्यक्ती कशी असते याबद्दल एका पुस्तकात असं वर्णन केलंय: “त्याच्या घराचं आणि त्याच्या हृदयाचं दार इतरांसाठी नेहमी उघडं असतं.” म्हणून स्वतःला विचारा: ‘पाहुणचार दाखवण्याच्या बाबतीत माझं नाव कसं आहे?’ (इब्री १३:२, १६) पाहुणचार करणारी व्यक्ती इतरांसाठी जे काही करता येईल ते करायला तयार असते. मग तिचे पाहुणे यहोवाच्या सेवेत मेहनत घेणारे विभागीय पर्यवेक्षक असो किंवा पाहुणा वक्ता असो.—उत्प. १८:२-८; नीति. ३:२७; प्रे. कार्यं १६:१५; रोम. १२:१३. टेहळणी बुरूज२४.११ २१ ¶६
मंगळवार, २० ऑक्टोबर
ज्या कुमारी तयार होत्या त्या त्याच्यासोबत लग्नाच्या मेजवानीला आत गेल्या.—मत्त. २५:१०.
कुमारींच्या दाखल्यात येशूने अशा दहा कुमारींबद्दल सांगितलं, ज्या नवऱ्या मुलाला भेटायला निघाल्या होत्या. नवरा मुलगा लग्नाच्या मेजवानीत आपल्याला घेऊन जाईल अशी त्या सगळ्यांना आशा होती. (मत्त. २५:१-४) येशूने पाच जणींना “समजदार” म्हटलं आणि इतर पाच जणींना “मूर्ख” म्हटलं. समजदार कुमारी नवरा मुलगा रात्री कितीही उशीरा आला तरी वाट पाहायला तयार होत्या. त्यामुळे त्यांनी अंधारात प्रकाश देण्यासाठी दिवे आणले होते. इतकंच काय तर नवऱ्या मुलाला यायला उशीर झाला तर त्यासाठी त्यांनी जास्त तेलसुद्धा आणलं होतं. यावरून कळतं, की त्या आपले दिवे पेटते ठेवण्यासाठी तयार होत्या. (मत्त. २५:६-१०) जेव्हा नवरा मुलगा आला तेव्हा समजदार कुमारी लग्नाच्या मेजवानीला त्याच्यासोबत गेल्या. त्याच प्रकारे जे अभिषिक्त ख्रिस्ती येशू येईपर्यंत सतर्क आणि विश्वासू राहून तयार असल्याचं दाखवतील त्यांना बक्षीस मिळेल. ते बक्षीस म्हणजे हे अभिषिक्त ख्रिस्ती नवऱ्या मुलासोबत, म्हणजे येशूसोबत त्याच्या स्वर्गातल्या राज्यात सामील होतील.—प्रकटी. ७:१-३. टेहळणी बुरूज२४.०९ २१ ¶६
बुधवार, २१ ऑक्टोबर
सर्व राष्ट्रांतून आलेला एक मोठा लोकसमुदाय मला दिसला.—प्रकटी. ७:९.
जेव्हा आपण हे पाहतो की आपल्या प्रचारामुळे जगभरातल्या लोकांना कशी मदत होते तेव्हा आपल्याला प्रचार करत राहण्याचं प्रोत्साहन मिळतं. दरवर्षी, आवड दाखवणारे लाखो लोक स्मारकविधीला हजर होतात आणि आपल्यासोबत बायबल अभ्यास करतात. इतकंच नाही तर, लाखो लोक बाप्तिस्मा घेऊन आपल्यासोबत प्रचाराच्या कामात सामील होतात. आपल्याला हे माहीत नाही की अजून किती लोक आपला संदेश स्वीकारतील. पण आपल्याला हे नक्की माहीत आहे की यहोवा एका मोठ्या लोकसमुदायाला एकत्र करतोय. आणि हा समुदाय मोठं संकट पार करेल. (प्रकटी. ७:९, १४) यहोवा देव पिकाचा मालक आहे, आणि त्याला अशी खातरी आहे की आणखी बरेच लोक आनंदाचा संदेश स्वीकारतील. म्हणून आपण प्रचार करत राहिलं पाहिजे. (लूक १०:२) येशूच्या खऱ्या शिष्यांनी नेहमीच आवेशाने आनंदाच्या संदेशाचा प्रचार केलाय. जेव्हा लोकांनी प्रेषितांना धाडसाने बोलताना पाहिलं, तेव्हा त्यांना जाणवलं की ही “माणसं येशूसोबत असायची.” (प्रे. कार्यं ४:१३) तर आपणसुद्धा धाडसाने आणि आवेशाने आनंदाचा संदेश सांगत राहू या. त्यामुळे लोकांना कळेल की आपणही येशूसारखं वागतोय. टेहळणी बुरूज२५.०३ १८ ¶१५; १९ ¶१७-१८
गुरुवार, २२ ऑक्टोबर
हे यहोवा, शेवटी माणूस काय आहे, की तू त्याच्याकडे पाहावं?—स्तो. १४४:३.
ज्यांच्याकडे इतरांचं लक्षसुद्धा जात नाही अशा लोकांकडे यहोवा लक्ष देतो, हे आपल्याला बायबलमधून शिकायला मिळतं. उदाहरणार्थ, इस्राएलचा भावी राजा म्हणून इशायच्या एका मुलाचा अभिषेक करण्यासाठी यहोवा शमुवेल संदेष्ट्याला त्याच्याकडे पाठवतो, तेव्हा काय झालं याचा विचार करा. इशायला आठ मुलं होती. पण त्याने फक्त आपल्या सात मुलांनाच शमुवेलकडे आणलं. त्याने सर्वात लहान असणाऱ्या दावीदला बोलवलं नाही. पण यहोवाने मात्र दावीदला निवडलं होतं. (१ शमु. १६:६, ७, १०-१२) कारण यहोवाने दावीदचं मन पाहिलं होतं आणि त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हे त्याला माहीत होतं. यहोवाचं तुमच्याकडे लक्ष आहे, हे त्याने आत्तापर्यंत तुम्हाला कसं दाखवून दिलंय यावर विचार करा. तो तुमची गरज ओळखून तुम्हाला सल्ला देतो. (स्तो. ३२:८) विचार करा, जर तो तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखत नसता, तर त्याला हे करता आलं असतं का? (स्तो. १३९:१) जर तुम्ही यहोवाचा सल्ला लागू केला आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होतोय हे पाहिलं, तर तुम्हाला याची खातरी पटेल, की यहोवाला तुमची काळजी आहे. (१ इति. २८:९; प्रे. कार्यं १७:२६, २७) तुम्ही करत असलेले प्रयत्न आणि तुमच्यातले चांगले गुण तो पाहतो, आणि त्यामुळे तो तुमच्याशी मैत्री करायला पुढे येतो.—यिर्म. १७:१०. टेहळणी बुरूज२४.१० २५-२६ ¶७-९
शुक्रवार, २३ ऑक्टोबर
येशूला त्यांचा कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते.—मार्क ६:३४.
हे खरंय की यहोवावर तुमचं प्रेम आहे आणि इतरांची सेवा करायची तुमची मनापासून इच्छा आहे. मग ही इच्छा तुम्ही कशी वाढवू शकता? आपल्या भाऊबहिणींची सेवा केल्यामुळे किती आनंद मिळतो, याचा तुम्ही विचार करू शकता. येशूने म्हटलं: “घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.” (प्रे. कार्यं २०:३५) स्वतः येशू या तत्त्वानुसार जगला. इतरांची सेवा केल्यामुळे त्याला खरा आनंद मिळाला. एक उदाहरण लक्षात घ्या जे मार्क ६:३१-३४ मध्ये दिलंय. या प्रसंगी येशू आणि त्याचे शिष्य खूप थकले होते. विश्रांती घेण्यासाठी ते एका एकांत ठिकाणी जायला निघाले. पण येशूकडून काहीतरी शिकायला मिळेल या आशेने लोकांचा एक मोठा जमाव त्यांच्या आधी तिथे जाऊन पोचला. येशू त्यांना नाही म्हणू शकला असता, कारण त्याला आणि त्याच्या शिष्यांना “जेवायलासुद्धा वेळ मिळाला नव्हता.” किंवा मग येशू फक्त एक-दोन गोष्टी शिकवून त्यांना पाठवून देऊ शकला असता. पण लोकांवर त्याचं प्रेम असल्यामुळे तो त्यांना ‘दिवस मावळेपर्यंत’ शिकवत राहिला.—मार्क ६:३५. टेहळणी बुरूज२४.११ १६ ¶९-१०
शनिवार, २४ ऑक्टोबर
तुम्हाला तुमच्या कामाचं प्रतिफळ मिळेल.—२ इति. १५:७.
आईवडिलांनो, इतरांना बायबलमधली सत्यं सांगायच्या संधी शोधायला आपल्या मुलांना प्रोत्साहन द्या. (रोम. १०:१०) इतरांना आपल्या विश्वासाबद्दल सांगायला आपण खरंतर खूप मेहनत घेत असतो. त्याची तुलना आपण एखादं संगीत वाद्य वाजवायला शिकताना जी मेहनत घेतो त्याच्याशी करू शकतो. शिकणारा सुरुवातीला सोपीसोपी गाणी वाद्यावर वाजवतो आणि मग हळूहळू त्यात तरबेज होतो. तसंच, मुलं सुरुवातीला बायबलची सत्यं सांगताना सोप्या पद्धतीचा वापर करू शकतात. उदाहरणार्थ, तुमची मुलं एखाद्या वर्गसोबत्याला म्हणू शकतात: “तुला माहीत आहे का, वैज्ञानिकांनी निसर्गातल्या गोष्टींची नक्कल करून बऱ्याच गोष्टी बनवल्यात? याबद्दल माझ्याकडे एक व्हिडिओ आहे. मी शाळेनंतर तुला दाखवला तर चालेल का?” मग उत्क्रांती की निर्मिती या व्हिडिओ मालिकेतला एखादा व्हिडिओ दाखवल्यानंतर ते असं म्हणू शकतात: “निसर्गातल्या गोष्टींची नक्कल करून माणसं वेगवेगळ्या गोष्टी बनवतात तेव्हा त्यांची स्तुती केली जाते. मग ज्या गोष्टींची ते नक्कल करतात त्यासाठी कोणाची स्तुती झाली पाहिजे?” अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तर्क केल्यामुळे तो वर्गसोबती यहोवाबद्दल आणखी जाणून घ्यायला कदाचित तयार होईल. टेहळणी बुरूज२४.१२ १९ ¶१७-१८
रविवार, २५ ऑक्टोबर
एका माणसाद्वारे पाप जगात आलं आणि पापाद्वारे मरण आलं.—रोम. ५:१२.
आपल्याला पाप आणि मृत्यूपासून सोडवण्यासाठी यहोवाने येशूच्या खंडणी बलिदानाची व्यवस्था केली. पण एका परिपूर्ण माणसाने बलिदान दिल्यामुळे लाखो लोकांची पाप आणि मृत्यूपासून सुटका कशी होणार होती? प्रेषित पौलने याबद्दल म्हटलं: “जसं एका माणसाने [आदामने] आज्ञा मोडल्यामुळे पुष्कळ जण पापी ठरले, तसंच, एकाच माणसाने [येशूने] आज्ञापालन केल्यामुळे पुष्कळांना नीतिमान ठरवलं जाईल.” (रोम. ५:१९; १ तीम. २:६) दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, एका परिपूर्ण माणसाने आज्ञा मोडल्यामुळे आपण सगळे पापाचे आणि मृत्यूचे गुलाम बनलो. पण दुसऱ्या एका परिपूर्ण माणसाने आज्ञा पाळल्यामुळे आपल्याला पापापासून आणि मृत्यूपासून सुटका मिळू शकते. यहोवा आज्ञाधारक असलेल्या आदामच्या मुलांना असंच कायमचं जगू देऊ शकला नसता का? आपल्याला कदाचित वाटेल की, यहोवाने असं केलं असतं तर समस्या लगेच सुटली असती. पण खरंतर यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तसं करणं योग्य ठरलं नसतं. का? कारण जर त्याने खंडणीची व्यवस्था केली नसती तर असं वाटलं असतं, की आदामने कधीच गंभीर पाप केलं नाही आणि त्याची मुलंसुद्धा पापी नाहीत. पण ही गोष्ट खरी नव्हती. टेहळणी बुरूज२५.०१ २०-२१ ¶३-४
सोमवार, २६ ऑक्टोबर
आपण दिसणाऱ्या गोष्टींप्रमाणे नाही, तर विश्वासाने चालत आहोत.—२ करिंथ. ५:७.
पौलने त्याच्या आयुष्यात यहोवाची बरीच सेवा केली होती. पण आता त्याला समजलं होतं की लवकरच त्याला मारून टाकण्यात येईल. तरीही ज्या प्रकारे तो जीवन जगला त्याबद्दल विचार करून तो खूश होता. कारण त्याने यहोवाच्या सेवेत बरेच चांगले निर्णय घेतले होते आणि त्याला याची खातरी होती, की यहोवा त्याच्यावर खूश आहे. म्हणूनच तो म्हणू शकला: “मी धाव पूर्ण केली आहे आणि विश्वास टिकवून ठेवला आहे.” (२ तीम. ४:६-८) आपल्यालासुद्धा पौलसारखे चांगले निर्णय घ्यायची इच्छा आहे आणि यहोवाला खूश करायचं आहे. मग आपण हे कसं करू शकतो? पौलने स्वतःबद्दल आणि इतर विश्वासू ख्रिश्चनांबद्दल असं म्हटलं: “आपण दिसणाऱ्या गोष्टींप्रमाणे नाही, तर विश्वासाने चालत आहोत.” बायबलमध्ये “चालणं” हा शब्द काही वेळा, एखादी व्यक्ती ज्या प्रकारे जीवन जगते याला सूचित करतो. जी व्यक्ती विश्वासाने चालते, ती निर्णय घेताना यहोवा त्याबद्दल काय विचार करतो ते बघते. तिच्या कामांवरून हे दिसून येतं की यहोवा तिला आशीर्वाद देईल याची तिला खातरी आहे. तसंच, देवाच्या वचनात दिलेला सल्ला पाळल्यामुळे तिला आता चांगलं जीवन जगता येईल आणि भविष्यात सर्वकाळाचं जीवन मिळेल याचीही तिला खातरी असते.—स्तो. ११९:६६; इब्री ११:६. टेहळणी बुरूज२५.०३ २० ¶१-२
मंगळवार, २७ ऑक्टोबर
आपली विचारसरणी बदलून स्वतःचं रूपांतर होऊ द्या.—रोम. १२:२.
जे भाऊबहीण आधी क्रूर आणि हिंसक स्वभावाचे होते, त्यांनी आपल्या जीवनात पवित्र शक्तीच्या मदतीने खूप मोठमोठे बदल केलेत. (यश. ६५:२५) त्यांनी त्यांच्या वाईट गुणांवर मात करण्यासाठी खूप मेहनत घेतली. (इफिस. ४:२२-२४) हे खरंय, की देवाचे लोक अजूनही अपरिपूर्ण असल्यामुळे चुका करत राहतील, पण यहोवाने “सर्व प्रकारच्या” लोकांना प्रेम आणि शांतीच्या अतूट बंधनात बांधलंय. (तीत २:११) आणि हा चमत्कार सर्वशक्तिमान देवच करू शकतो! यहोवा जे काही म्हणतो ते नेहमीच पूर्ण होतं. (यश. ५५:१०, ११) आध्यात्मिक नंदनवन आज खरंच एक वास्तविकता आहे. यहोवाने भाऊबहिणींचं जे कुटुंब बनवलंय तसं आपल्याला कुठेच पाहायला मिळत नाही. या हिंसक जगात त्याच्या लोकांमध्ये राहिल्यामुळे आपल्याला शक्य तितक्या प्रमाणात शांतीचा आणि सुरक्षिततेचा अनुभव घेता येतो. (स्तो. ७२:७) या कारणांसाठी भाऊबहिणींच्या मोठ्या कुटुंबात जास्तीत जास्त लोकांना आणायला मदत करायची आपली इच्छा आहे. आणि आपण हे शिष्य बनवण्याच्या कामावर लक्ष लावून करू शकतो.—मत्त. २८:१९, २०. टेहळणी बुरूज२४.०४ २३ ¶१३, १५
बुधवार, २८ ऑक्टोबर
आपल्याला ख्रिस्ताचं मन समजलं आहे.—१ करिंथ. २:१६.
येशूने पूर्ण बुद्धीने यहोवावर प्रेम केलं. देवाची त्याच्यासाठी काय इच्छा आहे हे त्याला माहीत होतं. त्याप्रमाणे वागायचा त्याने निश्चय केला होता. योग्य ते करण्यासाठी त्याला दुःख सोसावं लागलं तरी तो तसं करायला तयार होता. आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा त्याचा निर्धार होता. त्यामुळे त्याने कुठल्याच गोष्टीला त्याच्या या ध्येयाच्या आड येऊ दिलं नाही. पेत्र आणि इतर प्रेषितांकडे येशूसोबत वेळ घालवण्याची एक चांगली संधी होती. त्यामुळे येशू नेमका कसा विचार करतो हे त्यांना शिकायला मिळालं. पेत्रने देवाच्या प्रेरणेने जेव्हा त्याचं पहिलं पत्र लिहिलं, तेव्हा त्याने ख्रिश्चनांना ख्रिस्तासारखी मनोवृत्ती ठेवायचं प्रोत्साहन दिलं. (१ पेत्र ४:१) मूळ भाषेत पेत्रने “तयार असा” हे जे शब्द वापरलेत ते अशा सैनिकांना लागू होतात, जे युद्धाच्या तयारीसाठी शस्त्रं धारण करतात. त्यामुळे जेव्हा एक ख्रिस्ती येशूसारखी मनोवृत्ती ठेवतो किंवा त्याच्यासारखा विचार करतो, तेव्हा तो पापी प्रवृत्तींविरुद्ध आणि सैतानाच्या या दुष्ट जगाविरुद्ध लढायला जणू एक शक्तिशाली शस्त्र धारण करत असतो.—२ करिंथ. १०:३-५; इफिस. ६:१२. टेहळणी बुरूज२५.०३ ८-९ ¶१-३
गुरुवार, २९ ऑक्टोबर
माणसाच्या मनातले विचार खोल पाण्यासारखे असतात, पण समंजस माणूस ते बाहेर काढतो.—नीति. २०:५.
डेटींग करताना समोरच्या व्यक्तीमधल्या कोणत्या गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या पाहिजेत? त्या व्यक्तीमध्ये भावनिकरीत्या गुंतून जाण्याआधी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींवर त्या व्यक्तीसोबत चर्चा करावीशी वाटेल. जसं की, त्या व्यक्तीच्या ध्येयांबद्दल. एखादी व्यक्ती आतून कशी आहे हे तुम्ही कसं समजून घेऊ शकता? यासाठी चांगला मार्ग म्हणजे त्या व्यक्तीसोबत मन मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे बोलणं. त्यासाठी तुम्ही समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारू शकता आणि जेव्हा ती बोलते तेव्हा तिचं लक्ष देऊन ऐकू शकता. (याको. १:१९) हे करण्यासाठी तुम्ही अशा काही गोष्टी सोबत मिळून करू शकता, ज्यामुळे तुम्हाला एकमेकांसोबत बोलता येईल. जसं की, एकत्र जेवणं, सार्वजनिक ठिकाणी फिरायला जाणं किंवा प्रचार करणं. तसंच तुम्ही मित्रांसोबत आणि घरच्यांसोबत वेळ घालवतानाही एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकता. त्यासोबतच अशा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे ती व्यक्ती वेगवेगळ्या लोकांसोबत आणि परिस्थितींमध्ये कशी वागते हे तुम्हाला समजेल. टेहळणी बुरूज२४.०५ २८ ¶६-७
शुक्रवार, ३० ऑक्टोबर
देवाची प्रिय मुलं या नात्याने त्याचं अनुकरण करा.—इफिस. ५:१.
येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्यावर अशा परीक्षा येतील ज्यांमुळे आपल्याला कधी नव्हे इतकं यहोवावर विसंबून राहावं लागेल. बायबल काळातल्या देवाच्या विश्वासू सेवकांच्या आणि अलिकडच्या काळातल्या भाऊबहिणींच्या अनुभवांमधून देवाने त्याच्या सेवकांना कसा आधार दिला ते आपण पाहू शकतो. तसंच या अहवालांवर आपण खोलवर विचार करू शकतो. असं करून आपण यहोवाला आपला खडक बनवत असतो. तसंच यामुळे मंडळीला आणखी भक्कम करण्यासाठी तुम्ही तयार असाल. उदाहरणार्थ, येशूने शिमोनला केफा (ग्रीकमध्ये “पेत्र”) नाव दिलं. याचा अर्थ “खडकाचा तुकडा” असा होतो. (योहा. १:४२) यावरून हे सूचित होतं, की तो पुढे मंडळीतल्या भाऊबहिणींना सांत्वन देऊन त्यांचा विश्वास भक्कम करणार होता. मंडळीतल्या वडिलांचं वर्णनसुद्धा “मोठ्या खडकाची सावली” असं करण्यात आलंय. यावरून ते भाऊबहिणींना कसं संरक्षण देतात हे स्पष्ट होतं. (यश. ३२:२) साहजिकच जेव्हा भाऊबहीण यहोवाच्या गुणांचं अनुकरण करतात, तेव्हा मंडळीला नक्कीच फायदा होतो. टेहळणी बुरूज२४.०६ २८-२९ ¶१०-११
शनिवार, ३१ ऑक्टोबर
फक्त [यहोवाचीच] उपासना केली जावी, अशी अपेक्षा करणारा तो देव आहे.—अनु. ४:२४.
यहोवाने इस्राएलच्या ज्या राजांना विश्वासू समजलं ते खऱ्या उपासनेला जडून राहिले होते. बरेच राजे यहोवाचे नियम तोडून खोट्या उपासनेकडे वळल्यामुळे, यहोवाच्या नजरेत अविश्वासू ठरले. (१ राजे २१:२५, २६; २ इति. १२:१) उपासनेचा हा मुद्दा यहोवासाठी इतका महत्त्वाचा का आहे? याचं एक कारण म्हणजे खऱ्या उपासनेत देवाच्या लोकांचं मार्गदर्शन करण्याची जबाबदारी राजांची होती. तसंच, खोट्या उपासनेमुळे त्यांच्या हातून गंभीर पाप आणि अन्याय होणार हे ठरलेलंच होतं. (होशे. ४:१, २) यासोबतच, राजे आणि त्यांची प्रजा यहोवाला समर्पित होती. म्हणून बायबलमध्ये खोट्या उपासनेत सहभागी होण्याची तुलना व्यभिचाराशी केली आहे. (यिर्म. ३:८, ९) व्यभिचार करणारी एक व्यक्ती तिच्या जोडीदाराविरुद्ध पाप करते आणि खूप वाईट रितीने तिचं मन दुखावते. त्या व्यक्तीच्या वेदना शब्दांत सांगण्यासारख्या नसतात. त्याच प्रकारे, यहोवाचा एखादा समर्पित सेवक जेव्हा खोट्या उपासनेत भाग घेतो, तेव्हा तो त्याच्या विरुद्ध पाप करतो आणि यामुळे यहोवाच्या मनाला खूप वेदना होतात.—अनु. ४:२३. टेहळणी बुरूज२४.०७ २२-२३ ¶१२-१५