वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es26 पृ. १३५-१४७
  • नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नोव्हेंबर
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२६
  • उपशिर्षक
  • रविवार, १ नोव्हेंबर
  • सोमवार, २ नोव्हेंबर
  • मंगळवार, ३ नोव्हेंबर
  • बुधवार, ४ नोव्हेंबर
  • गुरुवार, ५ नोव्हेंबर
  • शुक्रवार, ६ नोव्हेंबर
  • शनिवार, ७ नोव्हेंबर
  • रविवार, ८ नोव्हेंबर
  • सोमवार, ९ नोव्हेंबर
  • मंगळवार, १० नोव्हेंबर
  • बुधवार, ११ नोव्हेंबर
  • गुरुवार, १२ नोव्हेंबर
  • शुक्रवार, १३ नोव्हेंबर
  • शनिवार, १४ नोव्हेंबर
  • रविवार, १५ नोव्हेंबर
  • सोमवार, १६ नोव्हेंबर
  • मंगळवार, १७ नोव्हेंबर
  • बुधवार, १८ नोव्हेंबर
  • गुरुवार, १९ नोव्हेंबर
  • शुक्रवार, २० नोव्हेंबर
  • शनिवार, २१ नोव्हेंबर
  • रविवार, २२ नोव्हेंबर
  • सोमवार, २३ नोव्हेंबर
  • मंगळवार, २४ नोव्हेंबर
  • बुधवार, २५ नोव्हेंबर
  • गुरुवार, २६ नोव्हेंबर
  • शुक्रवार, २७ नोव्हेंबर
  • शनिवार, २८ नोव्हेंबर
  • रविवार, २९ नोव्हेंबर
  • सोमवार, ३० नोव्हेंबर
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२६
es26 पृ. १३५-१४७

नोव्हेंबर

रविवार, १ नोव्हेंबर

मी तुझ्याबद्दल कायम मनात राग धरणार नाही.—यिर्म. ३:१२.

मंडळीतून ज्यांना काढून टाकण्यात आलंय त्यांच्या बाबतीत वडील यहोवासारखी दया दाखवण्याचा प्रयत्न करतात. हे समजण्यासाठी काही उदाहरणांकडे लक्ष द्या. इस्राएली लोकांना मदत करण्याआधी, त्यांनी पश्‍चात्ताप करावा याची यहोवा वाट पाहत बसला नाही. याउलट, त्यांनी पश्‍चात्ताप करण्याआधीच यहोवाने संदेष्ट्यांना त्यांच्याकडे पाठवून पुढाकार घेतला. होशेय संदेष्ट्याची बायको अजूनही पाप करत होती. तरी, यहोवाने त्याला तिच्यासोबत समेट करायला सांगितलं. यातून यहोवाने त्याच्या लोकांना शिकवलं की तो किती दयाळू आहे. (होशे. ३:१; मला. ३:७) आज मंडळीतले वडील यहोवाच्या या गुणाचं अनुकरण करतात. आणि त्यांनाही मनापासून वाटतं की पाप करणाऱ्‍याने यहोवाकडे परत यावं. म्हणून त्या व्यक्‍तीला यहोवाकडे परत यायला कठीण जाईल अशी कोणतीही गोष्ट ते करत नाहीत. येशूने हरवलेल्या मुलाचं जे उदाहरणं दिलं त्याचाही विचार करा. वडिलांनी “धावत जाऊन [त्याच्या मुलाला] मिठी मारली आणि प्रेमाने त्याचे मुके घेतले.” (लूक १५:२०) इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? मुलाने क्षमेची भीक मागावी याची वडील वाट पाहत बसले नाहीत. याउलट, कुठल्याही प्रेमळ पित्याप्रमाणे त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला. टेहळणी बुरूज२४.०८ २८ ¶७-८

सोमवार, २ नोव्हेंबर

तुमच्यापैकी कोणाला बुद्धीची गरज असली, तर त्याने ती देवाजवळ मागत राहावी म्हणजे त्याला ती दिली जाईल. कारण देव कोणालाही दोष न लावता सगळ्यांना उदारपणे बुद्धी देतो.—याको. १:५; तळटीप.

आजच्या वचनातल्या शब्दांवरून कळतं की यहोवा त्याची बुद्धी फक्‍त स्वतःपुरती राखून ठेवत नाही, तर ती इतरांना उदारपणे देतो. हेही लक्षात घ्या, की यहोवा जेव्हा बुद्धी देतो तेव्हा तो “कोणालाही कमी न लेखता” किंवा “दोष न लावता” देतो. आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे हे मान्य केल्यामुळे वाटणारा कमीपणा तो आपल्याला कधीच भासू देत नाही. उलट आपण ती बुद्धी त्याच्याकडे मागावी अशी त्याची इच्छा आहे. (नीति. २:१-६) मग आपण आपल्याजवळ असलेलं ज्ञान इतरांना देऊन यहोवाचं अनुकरण करू शकतो का? (स्तो. ३२:८) नक्कीच! यासाठी यहोवाच्या लोकांकडे बऱ्‍याच संधी आहेत. उदाहरणार्थ, आपण सेवाकार्यात नवीन प्रचारकांना प्रशिक्षण देतो. मंडळीतले वडीलसुद्धा सहायक सेवकांना आणि बाप्तिस्मा घेतलेल्या भावांना मंडळीत त्यांच्या नेमणुका हाताळण्यासाठी धीराने मदत करतात. तसंच संघटनेत ज्यांना बांधकाम आणि दुरुस्तीच्या कामाचा अनुभव आहे ते कमी अनुभव असलेल्या भाऊबहिणींना बांधकाम प्रकल्पामध्ये काम करायला प्रशिक्षण देण्यासाठी मदत करतात. टेहळणी बुरूज२४.०९ २८-२९ ¶११-१२

मंगळवार, ३ नोव्हेंबर

तुम्ही आमच्यासाठी खूप प्रिय बनला होता.—१ थेस्सलनी. २:८.

भावांनो, वडील म्हणून पात्र ठरण्यासाठी ‘ज्याच्याकडे बोट दाखवता येणार नाही’ अशी व्यक्‍ती तुम्ही असलं पाहिजे. म्हणजे मंडळीत तुमचं चांगलं नाव असलं पाहिजे आणि तुमच्यावर कोणताही आरोप लावायचं कारण नसलं पाहिजे. (१ तीम. ३:२) तसंच, बाहेरच्या लोकांमध्येही तुमचं चांगलं नाव असलं पाहिजे. विश्‍वासात नसलेले लोक तुमच्या ख्रिस्ती विश्‍वासावर कदाचित टीका करतील, पण तुमच्या प्रामाणिकपणावर आणि वागण्या-बोलण्यावर कोणताही आरोप लावण्याचं कारण त्यांच्याकडे नसलं पाहिजे. (दानी. ६:४, ५) म्हणून स्वतःला विचारा: ‘मंडळीत आणि बाहेर माझं चांगलं नाव आहे का?’ तुम्हाला जर ‘चांगुलपणाची आवड असेल’ तर इतरांमधले चांगले गुण तुम्हाला दिसतील आणि त्यासाठी तुम्ही त्यांची प्रशंसा कराल. (तीत १:८) तसंच, तुम्ही एक पाऊल पुढे जाऊन, इतरांसाठी चांगलं करायलाही तयार असाल. वडिलांमध्ये हा गुण असणं इतकं महत्त्वाचं का आहे? कारण मंडळीची देखभाल करण्यासाठी आणि आपल्या इतर जबाबदाऱ्‍या पार पाडण्यासाठी ते आपला मौल्यवान वेळ खर्च करत असतात. (१ पेत्र ५:१-३) त्यांना एवढी मेहनत घ्यावी लागत असली तरी इतरांची सेवा केल्यामुळे मिळणारा आनंद त्यांनी केलेल्या कोणत्याही त्यागापेक्षा जास्त असतो.—प्रे. कार्यं २०:३५. टेहळणी बुरूज२४.११ २०-२१ ¶३-५

बुधवार, ४ नोव्हेंबर

घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.—प्रे. कार्यं २०:३५.

मंडळीत सहायक सेवक खूप महत्त्वाचं काम करतात. प्रेषित पौलने या विश्‍वासू भावांची मनापासून कदर केली. उदाहरणार्थ, फिलिप्पैमधल्या ख्रिश्‍चनांना पत्र लिहिताना त्याने वडिलांसोबतच सहायक सेवकांचा विशेष उल्लेख केला. (फिलिप्पै. १:१) तरुण असो किंवा वृद्ध, बाप्तिस्मा घेतलेल्या बऱ्‍याच भावांना मंडळीत सहायक सेवक म्हणून काम करण्यात खूप आनंद मिळतो. उदाहरणार्थ, डेवेनला सहायक सेवक म्हणून नेमण्यात आलं तेव्हा तो फक्‍त १८ वर्षांचा होता. दुसरीकडे पाहता, लुईस नावाच्या भावाला, वयाची पन्‍नाशी गाठल्यावर सहायक सेवक म्हणून नेमण्यात आलं. याबद्दल त्यांना कसं वाटतं? लुईस म्हणतात: “मंडळीत सहायक सेवक म्हणून काम करणं खरंच खूप मोठा बहुमान आहे. भाऊबहीण माझ्यावर खूप प्रेम करतात आणि मला असं वाटतं, की सहायक सेवक म्हणून सेवा करणं हा त्यांना प्रेम दाखवायचा खरंच खूप चांगला मार्ग आहे.” बऱ्‍याच सहायक सेवकांना या भावासारखंच वाटतं. जर तुमचा बाप्तिस्मा झाला असेल, पण तुम्ही अजून सहायक सेवक नसाल तर तुम्ही हे ध्येय ठेवू शकता का? टेहळणी बुरूज२४.११ १४ ¶१-३

गुरुवार, ५ नोव्हेंबर

हे यहोवा, मी तुझ्याकडे भीक मागतो! मी तुझ्या नजरेत योग्य तेच करत आलो. या सगळ्याची आठवण कर.—२ राजे २०:३.

यहूदाचा राजा हिज्कीया ३९ वर्षांचा होता, तेव्हा त्याला कळलं की त्याला एक गंभीर आजार आहे. यशया संदेष्ट्याने त्याला यहोवाचा संदेश दिला. त्याने त्याला म्हटलं की त्याच्या आजारपणामुळे त्याचा मृत्यू होईल. (२ राजे २०:१) यामुळे हिज्कीयाला कोणतीच आशा दिसत नव्हती. तो इतका दुःखी झाला की ढसाढसा रडू लागला. आणि त्याने यहोवाला कळकळून प्रार्थना केली. हिज्कीयाने रडून यहोवाला जी प्रार्थना केली, ती ऐकून यहोवाला त्याची दया आली. त्याने त्याला म्हटलं: “मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि तुझे अश्रू पाहिले आहेत. मी तुला बरं करीन.” यशया संदेष्ट्याद्वारे यहोवाने त्याचं आयुष्य आणखी वाढवायचं आणि यरुशलेमला अश्‍शूरच्या राजाच्या हातून वाचवायचं वचन दिलं. (२ राजे २०:४-६) तुम्हाला असा एखादा आजार झालाय का, ज्यावर काहीच इलाज नाही? तर मग यहोवाला प्रार्थना करा. अगदी कळकळून, रडून प्रार्थना करा. बायबल आपल्याला अशी खातरी देतं, की “जो खूप करुणामय असा पिता आहे, आणि सगळ्या प्रकारच्या सांत्वनाचा देव आहे” तो सर्व परीक्षांमध्ये आपलं सांत्वन करेल.—२ करिंथ. १:३, ४. टेहळणी बुरूज२४.१२ २४ ¶१५-१७

शुक्रवार, ६ नोव्हेंबर

नीतिमान आणि अनीतिमान अशा सगळ्या लोकांना मेलेल्यांतून उठवलं जाणार आहे, अशी या लोकांप्रमाणेच मीसुद्धा देवाकडून आशा बाळगतो.—प्रे. कार्यं २४:१५.

नवीन जगात पुनरुत्थान झालेल्या आपल्या प्रिय जनांचं स्वागत करताना आपल्याला खरंच खूप आनंद होईल! सृष्टीतल्या अद्‌भुत गोष्टींचं निरीक्षण करून आपल्याला यहोवाबद्दल आणखी शिकून घेताना किती आनंद होईल याचीसुद्धा कल्पना करा. (स्तो. १०४:२४; यश. ११:९) आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे, मनात कोणतीही दोषीपणाची भावना न ठेवता आपल्याला यहोवाची सेवा करता येईल. आज ‘पापाच्या क्षणिक सुखासाठी’ आपण हे सगळे आशीर्वाद गमावण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही! (इब्री ११:२५) आपल्याला कराव्या लागणाऱ्‍या कोणत्याही त्यागाच्या तुलनेत हे आशीर्वाद खूप मोठे आहेत. लक्षात असू द्या, एक असा दिवस येईल जेव्हा पृथ्वीवरचं नंदनवन फक्‍त भविष्यातली आशा नसेल, तर आपण तिथे प्रत्यक्ष असू. यहोवाने आपल्यावरच्या प्रेमापोटी खंडणी बलिदानाची भेट दिली नसती, तर यांपैकी कोणतीच गोष्ट शक्य झाली नसती. टेहळणी बुरूज२५.०१ २९ ¶१२

शनिवार, ७ नोव्हेंबर

यहोवाचा हात इतका तोकडा आहे का?—गण. ११:२३.

इब्री लोकांना या पुस्तकात अशा बऱ्‍याच लोकांबद्दल सांगितलंय, ज्यांचा यहोवावर विश्‍वास होता. त्यांच्यापैकी एक म्हणजे मोशे. त्याचा यहोवावर जबरदस्त विश्‍वास होता. (इब्री ३:२-५; ११:२३-२५) यहोवानेही ओसाड रानात इस्राएली लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली आणि त्यांना सांभाळलं. आणि यामुळे मोशेचा यहोवावरचा विश्‍वास डळमळला नाही. (निर्ग. १५:२२-२५; स्तो. ७८:२३-२५) असं असलं तरी इस्राएली लोकांच्या सुटकेच्या जवळपास एका वर्षानंतर त्याच्या मनात एक प्रश्‍न निर्माण झाला. तो म्हणजे, यहोवा इस्राएली लोकांना खरंच मांस देऊ शकेल का? कारण इस्राएली लोकांची संख्या लाखोंच्या घरात होती आणि ओसाड रानात पुरेसं अन्‍न नव्हतं. मग अशा परिस्थितीत यहोवा त्या सगळ्यांना पुरेसं मांस कसं पुरवेल, असं मोशेच्या मनात आलं. त्यावर मोशेला उत्तर देत यहोवाने म्हटलं: “यहोवाचा हात इतका तोकडा आहे का?” (गण. ११:२१-२३) दुसऱ्‍या शब्दांत, यहोवा मोशेला म्हणत होता की ‘तुला खरंच असं वाटतं का, की मी जे म्हटलंय ते पूर्ण करू शकणार नाही?’ टेहळणी बुरूज२५.०३ २६ ¶१-२

रविवार, ८ नोव्हेंबर

प्राचीन काळातल्या जगाचीही [देवाने] गय केली नाही.—२ पेत्र २:५.

जलप्रलयाचा अहवाल भविष्यात होणाऱ्‍या घटनांना सूचित करतो असं आपण समजावं का? नाही. का बरं? कारण बायबलमध्ये यासाठी आपल्याला कोणताही आधार मिळत नाही. हे खरं आहे, की येशूने नोहाच्या दिवसांची तुलना त्याच्या उपस्थितीच्या काळाशी केली. पण त्याने असं कुठेही सुचवलं नाही, की या जलप्रलयादरम्यान घडलेल्या प्रत्येक घटनेचा आणि प्रत्येक व्यक्‍तीचा संबंध भविष्यातल्या गोष्टींशी आहे. शिवाय त्याने असंही म्हटलं नाही, की जेव्हा यहोवाने जहाजाचं दार बंद केलं तेव्हा त्याचा संबंध भविष्यातल्या घटनांशी आहे. (मत्त. २४:३७-३९) नोहाला यहोवाकडून सूचना मिळाली, तेव्हा त्याने कशी प्रतिक्रिया दाखवली? त्याने जहाज बांधलं आणि असं करून दाखवून दिलं की तो यहोवाला विश्‍वासू आहे. (इब्री ११:७; १ पेत्र ३:२०) त्याचप्रमाणे, लोक जेव्हा देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश ऐकतात तेव्हा त्यांनी त्याप्रमाणे कार्यही केलं पाहिजे. (प्रे. कार्यं ३:१७-२०) पेत्रने नोहाला “नीतिमत्त्वाचा प्रचारक” म्हटलं. आज आपण जगभरात प्रचाराचं काम करत आहोत आणि आवेशाने या कामात सहभाग घ्यायचा प्रयत्न करत आहोत. पण आपण कितीही मेहनत घेतली तरीही अंत येण्याआधी पृथ्वीवरच्या प्रत्येकच व्यक्‍तीपर्यंत आपण आनंदाचा संदेश पोचवू शकत नाही. टेहळणी बुरूज२४.०५ ९-१० ¶३-५

सोमवार, ९ नोव्हेंबर

[तो] यहोवाचं भय मानणाऱ्‍यांचा आदर करतो.—स्तो. १५:४.

आपण यहोवाच्या मित्रांना दया आणि आदर दाखवण्याचे मार्ग शोधले पाहिजे. (रोम. १२:१०) आपण ते कसं करू शकतो? एक मार्ग स्तोत्र १५:४ मध्ये सांगितलाय. तो म्हणजे यहोवाच्या तंबूतला पाहुणा ‘नुकसान सहन करावं लागलं, तरी दिलेला शब्द मोडत नाही.’ पण आपण जेव्हा दिलेला शब्द मोडतो तेव्हा इतरांना वाईट वाटू शकतं. (मत्त. ५:३७) उदाहरणार्थ, यहोवाची अशी इच्छा आहे की पती-पत्नीने त्यांचं लग्नाचं वचन पाळावं. त्यासोबतच आईवडील जेव्हा मुलांना दिलेलं वचन पाळतात तेव्हा त्याला आनंद होतो. दुसऱ्‍या शब्दांत, देवावर आणि शेजाऱ्‍यांवर असलेल्या प्रेमामुळे आपण दिलेला शब्द पाळायला जमेल ते करू. यहोवाच्या मित्रांना आदर दाखवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे त्यांचा पाहुणचार करणं आणि त्यांना उदारता दाखवणं. (रोम. १२:१३) जेव्हा आपण भाऊबहिणींसोबत वेळ घालवतो तेव्हा त्यांच्यासोबत आणि यहोवासोबतची आपली मैत्री आणखी मजबूत करता येते. त्यासोबतच जेव्हा आपण पाहुणचार दाखवतो तेव्हा आपण यहोवाचं अनुकरण करत असतो. टेहळणी बुरूज२४.०६ १२ ¶१५-१६

मंगळवार, १० नोव्हेंबर

नाशवंत माणूस काय आहे, की तू त्याला आठवणीत ठेवावं?—स्तो. ८:४.

यहोवा नम्र लोकांना सत्य प्रकट करतो. (मत्त. ११:२५) आपणसुद्धा सत्य शिकून घेण्यासाठी नम्रपणे मदत स्वीकारली. (प्रे. कार्यं ८:३०, ३१) तरीसुद्धा गर्विष्ठपणा आपल्यात येऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. नाहीतर गर्विष्ठपणामुळे बायबलची तत्त्वं आणि संघटनेकडून येणारं मार्गदर्शन जितकं योग्य आहे तितकंच आपलंही मत योग्य आहे, असं आपल्याला वाटू लागेल. आपली नम्रता टिकवून ठेवण्यासाठी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की यहोवाच्या महानतेपुढे आपण क्षुल्लक आहोत. (स्तो. ८:३, ४) आपण नम्र असावं आणि शिकवण्याच्या लायक असावं म्हणून आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो. यहोवा त्याच्या वचनाद्वारे आणि त्याच्या संघटनेद्वारे आपल्याला त्याचे विचार कळवतो आणि या विचारांना आपल्या विचारांपेक्षा जास्त महत्त्व देण्यासाठी तो आपल्याला मदत करेल. यहोवाला नम्र लोक आवडतात आणि घमेंडी, गर्विष्ठ, उद्धट लोकांची त्याला घृणा वाटते. ही गोष्ट तुमच्या बायबल वाचनातून कशी सिद्ध होते हे पाहायचा प्रयत्न करा. तसंच एखाद्या नेमणुकीमुळे तुम्हाला थोड्या प्रमाणात अधिकार मिळतो आणि तुम्ही लोकांच्या नजरेत येता, तेव्हा खासकरून नम्रता दाखवायची जास्त गरज आहे. टेहळणी बुरूज२४.०७ १० ¶८-९

बुधवार, ११ नोव्हेंबर

जो सगळ्यात लहान, तो हजार होईल, आणि जो सगळ्यात छोटा, तो शक्‍तिशाली राष्ट्र बनेल. मी यहोवा, योग्य वेळी हे लगेच घडवून आणीन.—यश. ६०:२२.

१९१९ पासून, येशू अभिषिक्‍तांच्या एका छोट्याशा गटाचा वापर करून प्रचाराचं आणि त्याच्या शिष्यांना आध्यात्मिक अन्‍न पुरवायचं काम व्यवस्थित पद्धतीने पार पाडत आहे. (लूक १२:४२) साहजिकच, यहोवा या गटाच्या कामावर आशीर्वाद देतोय. (यश. ६५:१३, १४) आपण जर व्यवस्थित पद्धतीने काम करत नसतो, तर येशूने सोपवलेलं काम आपल्याला पूर्ण करता आलं नसतं. (मत्त. २८:१९, २०) उदाहरणार्थ, आपण कुठे प्रचार केला पाहिजे हे जर भावांनी आपल्याला सांगितलंच नसतं, तर कोणीही कुठेही प्रचार केला असता. यामुळे काही क्षेत्रांमध्ये सारखा-सारखा प्रचार झाला असता, तर काही क्षेत्रं तशीच राहिली असती. व्यवस्थित पद्धतीने काम केल्यामुळे आपल्याला आणखी कोणते फायदे होत आहेत, याचा विचार करा. पृथ्वीवर असताना येशूने त्याच्या शिष्यांना व्यवस्थित पद्धतीने काम करण्यासाठी जसं संघटित केलं होतं, तसंच तो आजही देवाच्या लोकांच्या बाबतीत करत आहे. टेहळणी बुरूज२४.०४ ८-९ ¶२-४

गुरुवार, १२ नोव्हेंबर

जर तू आपला मार्ग बदलून चांगली कामं करू लागलास, तर मी तुझा स्वीकार करणार नाही का? पण जर तू आपला मार्ग बदलून चांगली कामं केली नाहीस, तर तुझ्यावर ताबा मिळवण्यासाठी पाप दाराजवळ टपून बसलं आहे.—उत्प. ४:७.

काइन हा आदाम आणि हव्वाचा मोठा मुलगा होता. त्याच्या आईवडिलांकडून त्याला पापी वृत्ती वारशाने मिळाली. इतकंच नाही, तर बायबल त्याच्याबद्दल म्हणतं: “त्याची स्वतःची कार्यं दुष्ट होती.” (१ योहा. ३:१२) कदाचित यामुळेच, जेव्हा काइनने बलिदान अर्पण केलं तेव्हा यहोवाने “काइनचा आणि त्याच्या अर्पणाचा स्वीकार केला नाही.” पण आपलं वागणं बदलण्याऐवजी “काइनला खूप राग आला आणि तो नाराज झाला.” मग यहोवाने काय केलं? तो काइनशी बोलला. (उत्प. ४:३-७, तळटीप) लक्ष द्या, की यहोवाने प्रेमळपणे काइनशी तर्क केला. यहोवाने त्याला सांगितलं, की त्याने जर आपलं चुकीचं वागणं सोडून दिलं तर तो त्याला आशीर्वाद देईल. त्यासोबतच, यहोवाने त्याला सांगितलं, की रागामुळे त्याच्या हातून मोठी चूक होऊ शकते. पण, दुःखाची गोष्टी म्हणजे काइनने त्याचं ऐकलं नाही. यहोवा त्याला पश्‍चात्ताप करायला मदत करत होता, पण त्याने ती मदत स्वीकारली नाही. काइनने यहोवाचं ऐकलं नाही, म्हणून आता कोणत्याच पापी व्यक्‍तीला पश्‍चात्ताप करायला मदत करायची नाही असं यहोवाने ठरवलं का? मुळीच नाही! टेहळणी बुरूज२४.०८ १० ¶८

शुक्रवार, १३ नोव्हेंबर

तुम्ही जीवन निवडावं, म्हणजे तुम्ही जगाल.—अनु. ३०:१९.

इस्राएल राष्ट्राला एका सुंदर भविष्याची आशा होती. यहोवाच्या आशीर्वादाने इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात खूप मोठं आयुष्य जगू शकणार होते. तो देश अतिशय सुंदर होता आणि तिथली जमीन सुपीक होती. मोशेने तिथे काय-काय असेल याबद्दल सांगताना म्हटलं: “तिथली मोठी आणि सुंदर शहरं जी तुम्ही बांधली नाहीत, सर्व प्रकारच्या चांगल्या वस्तूंनी भरलेली घरं ज्यांच्यासाठी तुम्ही मेहनत केली नाही, पाण्याचे हौद जे तुम्ही खोदले नाहीत आणि द्राक्षमळे व जैतुनाची झाडं जी तुम्ही लावली नाहीत.” (अनु. ६:१०, ११) मोशेने इस्राएली लोकांना एक इशाराही दिला. त्याने त्यांना सांगितलं, की त्यांना जर त्या सुंदर देशात राहायचं असेल, तर त्यांना यहोवाच्या आज्ञांचं पालन करावं लागेल. मोशेने त्यांना म्हटलं, की त्यांना जर ‘जीवन निवडायचं’ असेल, तर त्यांनी यहोवाचं ऐकून ‘त्याला धरून राहावं.’ (अनु. ३०:२०) पण इस्राएली लोकांनी यहोवाला नाकारलं. त्यामुळे काही काळानंतर यहोवाने अश्‍शूरी आणि नंतर बॅबिलोनी लोकांना त्यांच्यावर विजय मिळवून त्यांना बंदिवासात नेऊ दिलं.—२ राजे १७:६-८, १३, १४; २ इति. ३६:१५-१७, २०. टेहळणी बुरूज२४.११ ९ ¶५-६

शनिवार, १४ नोव्हेंबर

ज्याने मला पाठवलं त्या पित्याने आणल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही.—योहा. ६:४४.

आज जगात स्वतःला ख्रिस्ती म्हणवणाऱ्‍या बऱ्‍याच जणांना असं वाटतं की त्यांनी जर फक्‍त ‘येशूवर विश्‍वास ठेवला’ आणि त्याला आपला तारणारा मानलं तर त्यांचं तारण होईल. (योहा. ६:२९) गालीलमध्येसुद्धा बऱ्‍याच जणांनी सुरुवातीला येशूवर विश्‍वास ठेवला. पण नंतर ते त्याला सोडून निघून गेले. त्यांनी असं का केलं? गालीलमध्ये बहुतेक लोक येशूच्या मागे यासाठी आले होते, कारण तो त्यांना हव्या असलेल्या गोष्टी देत होता. त्यांना फक्‍त चमत्काराने बरं व्हायचं होतं, मोफतचं अन्‍न खायचं होतं आणि त्यांना हव्या असलेल्या गोष्टी ऐकायच्या होत्या. पण येशूने हे दाखवून दिलं की त्याच्या खऱ्‍या शिष्यांनी यापेक्षा जास्त करायची गरज आहे. तो या पृथ्वीवर फक्‍त लोकांच्या शारीरिक गरजा पूर्ण करायला आला नव्हता. येशूच्या खऱ्‍या शिष्यांना तुम्ही ‘माझ्याकडे या’ हे त्याचं आमंत्रण स्वीकारायची गरज होती. म्हणजे, त्याने शिकवलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना स्वीकारायच्या होत्या आणि त्या पाळायच्या होत्या.—योहा. ५:४०. टेहळणी बुरूज२४.१२ ११-१२ ¶१२-१३

रविवार, १५ नोव्हेंबर

पतींनो, ख्रिस्ताने ज्याप्रमाणे मंडळीवर प्रेम केलं त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा आपल्या पत्नीवर प्रेम करा.—इफिस. ५:२५.

आपल्या पत्नीशी वाईट वागणं थांबवायला एका पतीला कशामुळे मदत होऊ शकते? तो येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करायचा प्रयत्न करू शकतो. त्याने पतींसाठी एक चांगलं उदाहरण मांडलंय. येशू आपल्या शिष्यांशी ज्या प्रकारे वागला-बोलला त्यातून पती काय शिकू शकतात ते आता पाहू या. तो त्याच्या शिष्यांशी दयेने आणि आदराने वागला. त्याने कधीच त्यांच्यावर अधिकार गाजवला नाही किंवा तो त्यांच्याशी कठोरपणे वागला नाही. त्याने आपल्या ताकदीचा वापर करून त्याचा अधिकार सिद्ध केला नाही. उलट त्याने नम्रपणे त्यांची सेवा केली. (योहा. १३:१२-१७) त्याने त्याच्या शिष्यांना म्हटलं: “माझ्याकडून शिका, म्हणजे तुमच्या जिवाला विश्रांती मिळेल. कारण मी प्रेमळ आणि नम्र आहे.” (मत्त. ११:२८-३०) येशू प्रेमळ होता. पण प्रेमळ असण्याचा अर्थ एक व्यक्‍ती कमजोर आहे असा नाही. उलट त्याच्यात आत्मसंयम असतो. त्यामुळे जेव्हा त्याला भडकवलं जातं तेव्हा तो शांत राहतो आणि स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवतो. टेहळणी बुरूज२५.०१ १० ¶१०-११

सोमवार, १६ नोव्हेंबर

आपली सगळी कामं यहोवावर सोपव.—नीति. १६:३.

आपल्याला माहीत आहे की जसजसा या जगाचा अंत जवळ येतोय तसतसं आपल्याला आणखी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. सरकारं बदलतील, युद्धं होतील, नैसर्गिक विपत्ती आणि नवनवीन महामाऱ्‍या येतील. त्यामुळे कदाचित आपल्याला आपली नोकरी, आपल्याकडे असलेल्या गोष्टी गमवाव्या लागतील. अशा वेळी, आपल्या निर्णयांवरून यहोवावरचा आपला भरवसा कसा दिसून येईल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चिंतांबद्दल यहोवाशी बोला. त्यामुळे तुम्हाला खूप मदत होईल. चांगले निर्णय घेता यावे म्हणून त्याच्याकडे बुद्धी मागा. तसंच, तुमच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला खूप जास्त चिंता वाटू नये, म्हणून त्याच्याकडे शांत मन मागा. (लूक १२:२९-३१) जे आहे त्यात समाधानी राहता यावं म्हणून त्याला सतत विनंती करा. (१ तीम. ६:७, ८) पैशांची चणचण भासते तेव्हा त्याचा सामना कसा करता येऊ शकतो याबद्दल आपल्या साहित्यामध्ये संशोधन करा. jw.org वरच्या साहित्यामुळे बऱ्‍याच जणांना अशा समस्यांचा सामना करण्यासाठी मदत मिळाली आहे. टेहळणी बुरूज२५.०३ २९ ¶१०-११

मंगळवार, १७ नोव्हेंबर

मी कोणत्याही माणसाला दूषित किंवा अशुद्ध म्हणू नये, असं देवाने मला दाखवलंय.—प्रे. कार्यं १०:२८.

सुंता न झालेल्या विदेशी लोकांना देवाच्या लोकांचा भाग बनायची वेळ आली होती. यासाठी, प्रेषित पेत्रला विदेशी असलेल्या कर्नेल्यला प्रचार करण्यासाठी नेमण्यात आलं. विदेशी लोकांपैकी जे ख्रिस्ती बनले त्यांच्यात कर्नेल्य पहिला होता. यहुदी लोक सहसा विदेशी लोकांसोबत जास्त संबंध ठेवत नव्हते. त्यामुळे विदेशी लोकांना प्रचार करण्यासाठी पेत्रला त्याचा दृष्टिकोन बदलायची गरज होती. या बाबतीत यहोवाची काय इच्छा आहे हे जेव्हा पेत्रला कळलं, तेव्हा त्याने स्वतःचा दृष्टिकोन बदलला. यामुळे जेव्हा त्याला विदेश्‍यांकडे पाठवण्यात आलं तेव्हा तो “कोणतीच हरकत न घेता” त्यांच्याकडे गेला. (प्रे. कार्यं १०:२८, २९) त्याने कर्नेल्यला आणि त्याच्या घराण्याला प्रचार केला. मग त्यांनी बाप्तिस्मा घेतला. (प्रे. कार्यं १०:२१-२३, ३४, ३५, ४४-४८) याच्या बऱ्‍याच वर्षांनंतर, पेत्रने ख्रिश्‍चनांना त्यांच्या “विचारांत एकता असावी” असं प्रोत्साहन दिलं. (१ पेत्र ३:८) आपण जर यहोवासारखा विचार केला तर आपल्यात आणि आपल्या भाऊबहिणींच्या विचारांमध्ये एकता असेल. टेहळणी बुरूज२५.०३ ९-१० ¶७-८

बुधवार, १८ नोव्हेंबर

वेगवेगळ्या आणि विचित्र शिकवणींच्या मागे लागून भरकटू नका.—इब्री १३:९.

या जगाची वृत्ती आणि विचार देवाच्या परिपूर्ण दृष्टिकोनापासून खूप दूर गेलेले आहेत. (नीति. १७:१५) त्यामुळे आपण निराश करणारे किंवा आपली दिशाभूल करणारे विचार ओळखून त्यांपासून दूर राहण्याची आपली क्षमता वाढवली पाहिजे. प्रेषित पौलने इब्री ख्रिश्‍चनांना प्रौढतेपर्यंत पोहोचण्यासाठी खटपट करत राहण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला आपणही पाळला पाहिजे. म्हणजेच आपण सत्याचं सखोल ज्ञान घेत राहिलं पाहिजे आणि यहोवा जसा विचार करतो, तसा विचार करायला शिकलं पाहिजे. शिवाय हे आपण समर्पण आणि बाप्तिस्मा झाल्यानंतरही करत राहिलं पाहिजे. सत्यात आपल्याला कितीही वर्षं झालेली असली, तरी आपण सगळ्यांनीच देवाच्या वचनाचं नियमित वाचन आणि अभ्यास केला पाहिजे. (स्तो. १:२) नियमितपणे वैयक्‍तिक अभ्यास केल्यामुळे पौलने इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रात ज्या गुणावर भर दिला, तो गुण आपल्याला वाढवता येईल. आणि तो गुण म्हणजे, विश्‍वास.—इब्री ११:१, ६. टेहळणी बुरूज२४.०९ १० ¶७-८

गुरुवार, १९ नोव्हेंबर

देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.—याको. ४:८.

जर यहोवा आपल्यासाठी खरा असेल, तर त्याला विश्‍वासू राहायला आपल्याला सोपं जाईल. योसेफच्या बाबतीत ही गोष्ट खरी ठरली. त्याने अनैतिक काम करायला ठामपणे नकार दिला. देव त्याच्यासाठी खरा होता आणि तो नाराज होईल अशी कोणतीच गोष्ट त्याला करायची नव्हती. (उत्प. ३९:९) यहोवा आपल्यासाठीही एक खरीखुरी व्यक्‍ती असावी म्हणून आपण त्याला प्रार्थना करण्यासाठी आणि बायबलचा अभ्यास करण्यासाठी वेळ काढला पाहिजे. असं केल्यामुळे त्याच्यासोबतची आपली मैत्री वाढत जाईल. योसेफप्रमाणे जर आपलंही यहोवासोबत एक जवळचं नातं असेल, तर तो नाराज होईल अशी कोणतीच गोष्ट आपल्याला करावीशी वाटणार नाही. यहोवा एक जिवंत देव आहे, ही गोष्ट जे लोक विसरतात ते त्याच्यापासून सहज दूर जातात. ओसाड रानात असताना इस्राएली लोक कसं वागले त्याचा विचार करा. यहोवा खरंच आहे, हे त्यांना माहीत होतं. पण त्यांना अशी शंका वाटू लागली, की यहोवा खरंच आपल्या गरजा पुरवेल का? (निर्ग. १७:२, ७) नंतर त्यांनी बंड केलं. नक्कीच आज्ञा न मानणारी त्यांची मनोवृत्ती आपल्यासाठी एक इशारा आहे. आणि त्यांच्या अशा उदाहरणाचं आपल्याला नक्कीच अनुकरण करायचं नाही.—इब्री ३:१२. टेहळणी बुरूज२४.०६ २४ ¶१४-१५

शुक्रवार, २० नोव्हेंबर

यहोवाची नजर नीतिमानांवर असते, तो त्यांची मदतीची याचना ऐकतो.—स्तो. ३४:१५.

आपण या व्यवस्थेच्या शेवटच्या दिवसांमध्ये जगतोय. म्हणून ज्या समस्यांमुळे आपल्या डोळ्यांत अश्रू येतात, त्या समस्या वाढतच जाणार आहेत. यहोवा आपल्या डोळ्यांतून येणारे अश्रू पाहतो आणि ते पाहून त्याला खूप दुःख होतं. आपले अश्रू यहोवासाठी खूप अनमोल आहेत. म्हणून ज्या वेळी आपल्यावर कठीण समस्या येतात, तेव्हा आपण यहोवासमोर प्रार्थनेत आपलं मन मोकळं करत राहू या. तसंच, एकटं न राहता आपण मंडळीतल्या आपल्या प्रेमळ भाऊबहिणींसोबत राहू या. आणि बायबलमधल्या यहोवाच्या दिलासादायक शब्दांमधून सांत्वन मिळवत राहू या. आपण याची खातरी ठेवू शकतो, की जर आपण विश्‍वासू राहून धीर धरला, तर यहोवा आपल्याला नक्कीच आशीर्वाद देईल. तसंच, दुःख झाल्यामुळे, निराशेमुळे आणि विश्‍वासघातामुळे आपल्या डोळ्यांत जे अश्रू येतात ते भविष्यात तो पुसून टाकणार आहे. (प्रकटी. २१:४) मग त्या वेळी आपल्या डोळ्यांतून फक्‍त आनंदाचेच अश्रू वाहतील. टेहळणी बुरूज२४.१२ २१ ¶३; २५ ¶१९

शनिवार, २१ नोव्हेंबर

यहोवा म्हणतो, “तुम्ही माझे साक्षीदार आहात.”—यश. ४३:१२.

यहोवाने आपल्याला त्याचे साक्षीदार होण्यासाठी निवडलंय आणि धैर्य दाखवायला मदत करायचं वचनसुद्धा त्याने दिलंय. (यश. ४३:१०, ११) ही मदत तो कोणत्या चार मार्गांनी करतो ते आपण पाहू या. पहिला, आपण जेव्हा-जेव्हा प्रचार करतो तेव्हा-तेव्हा येशू आपल्यासोबत असतो. (मत्त. २८:१८-२०) दुसरा, यहोवाने आपल्याला मदत करण्यासाठी स्वर्गदूतांना नेमलंय. (प्रकटी. १४:६) तिसरा, शिकलेल्या गोष्टी आठवायला यहोवा आपल्याला त्याची पवित्र शक्‍ती देतो. (योहा. १४:२५, २६) आणि चौथा, यहोवाने आपल्याला मदत करायला भाऊबहीण दिलेत. यहोवाच्या मदतीने आणि आपल्या भाऊबहिणींच्या साथीने आपण धैर्याने प्रचार करत राहू शकतो. पण जेव्हा घरोघरच्या प्रचारात खूप कमी लोक भेटतात तेव्हा निराश झाल्यासारखं वाटू शकतं. अशा वेळेस तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘या वेळी माझ्या क्षेत्रातले लोक कुठे असतील?’ (प्रे. कार्यं १६:१३) ‘ते कामावर असतील की बाजारात गेले असतील?’ जर असं असेल तर तुम्ही रस्त्यावरचं साक्षकार्य करून जास्त लोकांना भेटू शकता. टेहळणी बुरूज२४.०४ १७ ¶१०-११

रविवार, २२ नोव्हेंबर

जर एखाद्याला स्वतःच्या कुटुंबाचं नेतृत्व करता येत नसेल, तर तो देवाच्या मंडळीची काळजी कशी घेईल?—१ तीम. ३:५.

जर तुम्ही पती असाल आणि तुम्हाला मंडळीत वडील म्हणून सेवा करायची इच्छा असेल तर तुमच्या कुटुंबाचंसुद्धा इतरांसमोर एक चांगलं उदाहरण असलं पाहिजे. ‘तुम्ही तुमच्या कुटुंबाचं चांगल्या प्रकारे नेतृत्व करणारे’ असलं पाहिजे. एक प्रेमळ आणि जबाबदार कुटुंबप्रमुख म्हणून तुमचं इतरांसमोर एक चांगलं उदाहरण असलं पाहिजे. यामध्ये उपासनेशी संबंधित सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेणं सामील आहे. तुम्हाला जर मुलं असतील तर तुम्ही “आपल्या मुलांना पूर्ण गांभीर्याने अधीनतेत ठेवणारे” असलं पाहिजे. (१ तीम. ३:४) तुम्ही त्यांना प्रेमाने शिकवलं पाहिजे आणि प्रशिक्षण दिलं पाहिजे. हे खरंय की सर्वच मुलांना खेळायला, बागडायला आवडतं. पण तुमच्या चांगल्या प्रशिक्षणामुळे ते आज्ञा पाळायला, इतरांना आदर द्यायला आणि चांगलं वागायला शिकतील. तुमच्या मुलांना यहोवासोबत चांगलं नातं जोडण्यासाठी, बायबलच्या तत्त्वांनुसार जगण्यासाठी आणि बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करण्यासाठी तुम्ही होता होईल तितकी मदत केली पाहिजे. टेहळणी बुरूज२४.११ २२ ¶१०-११

सोमवार, २३ नोव्हेंबर

कोणी आपल्या मित्रांसाठी आपला प्राण द्यावा यापेक्षा मोठं प्रेम कोणतंच असू शकत नाही.—योहा. १५:१३.

आपण यहोवाच्या सेवेत जितकं जास्त व्यस्त राहू, तितकं तो आपल्याला कशा प्रकारे मदत करतो हे आपल्याला जाणवेल. यामुळे त्याच्यावरचा आपला भरवसासुद्धा आणखी वाढेल. (१ करिंथ. ३:९) पण लक्षात असू द्या की यहोवा कधीच आपली तुलना इतरांशी करत नाही. त्याच्यावर प्रेम असल्यामुळे आपण त्याच्यासाठी जे करतो त्याची त्याला कदर आहे. त्याने खंडणीची तरतूद करून आपल्याला एक अनमोल भेट दिली आहे. त्यासाठी आपल्याला किती कदर आहे हे पाहून त्याला खूप आनंद होतो! (१ शमु. १६:७; मार्क १२:४१-४४) खंडणी बलिदानामुळेच आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळते, यहोवासोबत मैत्री करता येते आणि सर्वकाळाच्या जीवनाची आशा मिळते. यहोवाचं आपल्यावर प्रेम असल्यामुळे त्याने आपल्याला हे सगळे आशीर्वाद दिलेत, म्हणून आपण नेहमी त्याबद्दल कदर व्यक्‍त करत राहू या. (१ योहा. ४:१९) येशूनेसुद्धा आपल्यावर प्रेम असल्यामुळे पृथ्वीवर येऊन त्याच्या जीवनाचं बलिदान दिलं. म्हणून त्याने जे केलं, त्याबद्दलसुद्धा आपण नेहमी कदर व्यक्‍त करत राहू या. टेहळणी बुरूज२५.०१ ३१ ¶१६-१८

मंगळवार, २४ नोव्हेंबर

मी दिवसभर चिंतेत असायचो.—स्तो. ७३:१४.

स्तोत्र ७३ लिहिणाऱ्‍या स्तोत्रकर्त्याला कसं वाटलं असेल याचा विचार करा. त्याने अशा लोकांना पाहिलं जे निरोगी, समृद्ध आणि तणावापासून मुक्‍त असल्याचे वाटत होते. (स्तो. ७३:३-५, १२) जेव्हा त्याने त्यांचं आणि त्यांच्या वरवर दिसणाऱ्‍या यशाचं परीक्षण केलं तेव्हा त्याला वाटलं की यहोवाच्या सेवेतले त्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत. निराश करणाऱ्‍या या विचाराने तो “दिवसभर चिंतेत” असायचा. (स्तो. ७३:१३, १४) मग त्याने अशा निराश करणाऱ्‍या भावनांना कसं तोंड दिलं? निराश असलेला हा स्तोत्रकर्ता यहोवाच्या उपासना मंडपाच्या शांत वातावरणात गेला. (स्तो. ७३:१६-१८) तिथे तो स्पष्टपणे विचार करू शकत होता. त्याला हे कळलं, की काही लोकांचं जीवन जरी सोपं वाटत असलं तरी त्यांना भविष्याची काहीच आशा नाही. यामुळे त्याला मनाची शांती मिळाली आणि यहोवाची सेवा करायचा आपण घेतलेला निर्णयच सगळ्यात चांगला आहे हे त्याला समजलं. याचा परिणाम म्हणजे यहोवाची सेवा करत राहायचा त्याचा निश्‍चय आणखी पक्का झाला.—स्तो. ७३:२३-२८. टेहळणी बुरूज२४.१० २७ ¶११-१२

बुधवार, २५ नोव्हेंबर

लोकांना कळू दे, की तुझं नाव यहोवा आहे आणि या संपूर्ण पृथ्वीवर फक्‍त तूच सर्वोच्च देव आहेस.—स्तो. ८३:१८.

यहोवाने आपल्याला त्याचे “साक्षीदार” म्हणून निवडलंय. (यश. ४३:१०-१२) काही वर्षांआधी नियमन मंडळाच्या एका पत्रात असं म्हटलं होतं: “आपल्यासाठी असलेला सगळ्यात मोठा बहुमान म्हणजे यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखलं जाणं.” असं का म्हणता येईल? या उदाहरणाचा विचार करा. समजा तुमच्यावर एक कोर्ट केस चालू आहे. आणि तुमच्यावर लावलेल्या आरोपामुळे तुमचं नाव बदनाम झालंय. पण आरोप खोटे आहेत, हे सांगण्यासाठी तुम्हाला एका साक्षीदाराची गरज आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच अशा एका व्यक्‍तीला निवडाल ज्याला तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखता आणि ज्याच्यावर तुमचा भरवसा आहे. तसंच कोर्टाने त्याच्यावर भरवसा ठेवावा म्हणून समाजात त्याचं चांगलं नावसुद्धा आहे. त्याचप्रमाणे, यहोवाने आपल्याला त्याचे साक्षीदार म्हणून निवडलंय आणि दाखवून दिलंय की तो आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखतो. तसंच, त्याला आपल्याबद्दल भरवसा आहे की तोच खरा देव आहे अशी साक्ष आपण देऊ. यहोवाचे साक्षीदार असण्याचा आपल्याला अभिमान आहे. म्हणूनच लोकांना त्याच्या नावाबद्दल सांगण्यासाठी आणि त्याच्यावर लावलेले आरोप चुकीचे आहेत, हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक संधीचा आपण फायदा करून घेतो. असं करून आपण आपल्या नावाला जागत असतो.— रोम. १०:१३-१५. टेहळणी बुरूज२४.०५ १८-१९ ¶१३

गुरुवार, २६ नोव्हेंबर

त्याने आजारी असलेल्या सर्वांना बरं केलं.—मत्त. ८:१६.

इतरांची सेवा केल्यामुळे येशूला खरा आनंद मिळाला. एका प्रसंगी येशूने लोकांना फक्‍त शिकवलंच नाही, तर इतर मार्गांनीही त्याने त्यांना मदत केली. त्याने चमत्काराने लोकांना अन्‍न पुरवलं आणि आपल्या शिष्यांना ते वाटायला सांगितलं. (मार्क ६:४१) अशा प्रकारे इतरांची सेवा करणं किती महत्त्वाचं आहे हे त्याने त्यांना दाखवून दिलं. येशूने चमत्कार करून जे अन्‍न पुरवलं होतं ते शिष्यांनी लोकांना वाटलं. आणि ‘सगळे लोक पोटभर जेवले.’ येशूसोबत मिळून लोकांना मदत केल्यामुळे शिष्यांना खरंच किती आनंद झाला असेल! (मार्क ६:४२) येशूने स्वतःपेक्षा इतरांच्या गरजांचा विचार केला आणि असं करायची ही त्याची पहिलीच वेळ नव्हती. त्याने आपलं संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेसाठी दिलं. (मत्त. ४:२३) इतरांना शिकवल्यामुळे आणि त्यांच्या गरजा पूर्ण केल्यामुळे येशूला खरंच खूप आनंद मिळायचा. टेहळणी बुरूज२४.११ १६-१७ ¶१०-११

शुक्रवार, २७ नोव्हेंबर

शेवटच्या दिवसांत खूप कठीण काळ येईल हे लक्षात ठेव.—२ तीम. ३:१.

“शेवटच्या दिवसांत” परिस्थिती आणखीनच कठीण होत जाईल. आणि अशा वेळी एकमेकांना मदत करायच्या अनेक संधी आपल्याजवळ असतील यात शंका नाही. अशा परिस्थितीत आपण आपल्या भाऊबहिणींसाठी भावनिक आणि आध्यात्मिक रितीनेसुद्धा आश्रयस्थान होऊ शकतो. असं करण्याचा एक मार्ग म्हणजे, राज्य सभागृहात जेव्हा आपले भाऊबहीण येतात तेव्हा आपण त्यांचं स्वागत करू शकतो. तसंच त्यांना प्रेम दाखवण्यासाठी किंवा त्यांना ताजंतवानं आणि सुरक्षित वाटावं म्हणून आपण होता होईल तितकं करायचा प्रयत्न करतो. खरोखरचं वादळ असो किंवा वादळासारखी परिस्थिती, मंडळीतले वडील भाऊबहिणींसाठी आश्रय बनू शकतात. जेव्हा नैसर्गिक विपत्ती येते किंवा तातडीची वैद्यकीय परिस्थिती निर्माण होते, तेव्हा वडील व्यावहारिक मदत पुरवण्यासाठी पुढाकार घेतात. यासोबतच ते त्यांना आध्यात्मिक रितीनेसुद्धा मदत देतात. एखादा वडील सौम्यतेने वागणारा, सहानुभूती दाखवणारा आणि ऐकायला नेहमी तयार असणारा आहे, हे जेव्हा भाऊबहीण ओळखतात तेव्हा ते संकोच न बाळगता त्याच्याकडे मदत मागायला येतात. वडील असे गुण दाखवतात तेव्हा कोणालातरी आपली काळजी आहे, याची भाऊबहिणींना जाणीव होते. आणि त्यामुळे वडील त्यांना जे बायबल आधारित मार्गदर्शन देत आहेत, त्याचं पालन करायला सोपं जातं.—१ थेस्सलनी. २:७, ८, ११. टेहळणी बुरूज२४.०६ २९-३० ¶१२-१३

शनिवार, २८ नोव्हेंबर

त्याने स्वतःच्या मुलालाही राखून ठेवलं नाही.—रोम. ८:३२.

यहोवा देव सर्वशक्‍तिमान आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की त्याला भावना नाहीत. आपल्याला त्याच्या प्रतिरूपात बनवण्यात आलंय. म्हणजे जर आपल्यात भावना आहेत तर यहोवा देवालासुद्धा नक्कीच भावना आहेत. बायबलमध्ये असं म्हणण्यात आलंय, की “त्याचं मन दुखावलं” आणि त्याला “दुःख” देण्यात आलं. (स्तो. ७८:४०, ४१) यहोवाने दुष्ट लोकांना आपल्या प्रिय मुलाला यातना देऊन ठार मारताना पाहिलं होतं तेव्हा त्याला किती दुःख झालं असेल! खंडणी बलिदानामुळे आपल्याला शिकायला मिळतं की यहोवा आपल्यावर जितकं प्रेम करतो, त्यापेक्षा जास्त प्रेम आपल्यावर कोणीच करू शकत नाही; आपले सर्वात जवळचे नातेवाईक किंवा आपले सर्वात चांगले मित्रही नाही. (रोम. ८:३२, ३८, ३९) आपण स्वतःवर जितकं प्रेम करतो, त्यापेक्षा जास्त प्रेम यहोवा आपल्यावर करतो यातही काही शंका नाही. तुम्हाला सर्वकाळ जगायची इच्छा आहे का? खरंतर, आपल्याला सर्वकाळाचं जीवन द्यायची यहोवाला आपल्यापेक्षा जास्त इच्छा आहे. तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा हवी आहे का? खरंतर, आपल्याला क्षमा करायची यहोवाला आपल्यापेक्षा जास्त इच्छा आहे. त्याची फक्‍त हीच अपेक्षा आहे की आपण त्याच्यावर विश्‍वास ठेवून आणि त्याच्या आज्ञा पाळून खंडणीची सुंदर भेट स्वीकारावी. खरंच, खंडणी बलिदान हा देवाच्या प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा आहे.—उप. ३:११. टेहळणी बुरूज२५.०१ २२ ¶८-९

रविवार, २९ नोव्हेंबर

प्रभूच्या दृष्टीत कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत याची खातरी करत जा.—इफिस. ५:१०.

आपल्या सगळ्यांनाच कधीकधी आपण जे पाहतो, ऐकतो आणि आपल्याला जे वाटतं त्या आधारावर निर्णय घ्यावे लागतात. पण आपण जे पाहतो आणि ऐकतो ते नेहमी बरोबर असेलच असं नाही. आणि जर आपण अशा प्रकारे निर्णय घेतले तर आपण कदाचित यहोवाला आवडणार नाही असं काहीतरी करून बसू. (उप. ११:९; मत्त. २४:३७-३९) पण याउलट, जर आपण विश्‍वासाने चाललो तर आपण असे निर्णय घेऊ जे ‘प्रभूच्या दृष्टीत चांगले असतील.’ देवाचा सल्ला पाळल्यामुळे आपल्याला मनाची शांती आणि खरा आनंद मिळेल. (स्तो. १६:८, ९; यश. ४८:१७, १८) आणि जर आपण असंच विश्‍वासाने चालत राहिलो, तर आपल्याला भविष्यात सर्वकाळाचं जीवन मिळेल. (२ करिंथ. ४:१८) आपण विश्‍वासाने चालतोय, की दिसणाऱ्‍या गोष्टींप्रमाणे चालतोय हे आपल्याला कसं कळेल? यासाठी आपण स्वतःला काही प्रश्‍न विचारू शकतो. जसं की, ‘मी कोणत्या आधारावर निर्णय घेतो? मी फक्‍त दिसणाऱ्‍या गोष्टींप्रमाणे निर्णय घेतो, की यहोवाचा सल्ला लक्षात ठेवून निर्णय घेतो?’ टेहळणी बुरूज२५.०३ २१ ¶३-४

सोमवार, ३० नोव्हेंबर

एकमेकांबरोबर शांतीने राहा.—१ थेस्सलनी. ५:१३.

आपलं हे आध्यात्मिक नंदनवन इतरांना आकर्षित वाटेल असं बनवण्याची महत्त्वाची जबाबदारी आज आपल्या प्रत्येकावर आहे. आपण जर यहोवाचं अनुकरण केलं तर आपल्याला ही जबाबदारी नक्की पूर्ण करता येईल. यहोवा लोकांना कधीच त्यांच्या इच्छेविरुद्ध त्याच्या संघटनेकडे ओढून आणत नाही, उलट तो अगदी प्रेमाने लोकांना त्याच्याजवळ ‘आणतो.’ (योहा. ६:४४; यिर्म. ३१:३) चांगल्या मनाचे लोक जेव्हा यहोवाच्या प्रेमळ गुणांबद्दल आणि त्याच्या सुंदर व्यक्‍तीमत्त्वाबद्दल शिकून घेतात, तेव्हा ते आपोआपच त्याच्याकडे आकर्षित होतात. मग आपल्या चांगल्या गुणांनी आणि चांगल्या वागण्याने आपण इतरांना आध्यात्मिक नंदनवनाकडे कसं आकर्षित करू शकतो? एक मार्ग म्हणजे भाऊबहिणींसोबत प्रेमाने आणि दयेने वागणं. जेव्हा बायबलमधल्या करिंथ मंडळीत नवीन लोक सभेला उपस्थित राहिले असतील, तेव्हा त्यांना जे अनुभवायला मिळालं तेच आज ख्रिस्ती सभेला आलेल्या नवीन लोकांना अनुभवायला मिळावं अशी आपली इच्छा आहे. त्यांनी म्हटलं होतं: “देव खरंच तुमच्यामध्ये आहे.” (१ करिंथ. १४:२४, २५; जख. ८:२३) म्हणून आजच्या दैनिक वचनातल्या सल्ल्याचं आपण पालन केलं पाहिजे. टेहळणी बुरूज२४.०४ २३-२४ ¶१६-१७

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा