वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es26 पृ. ११०-१२२
  • सप्टेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सप्टेंबर
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२६
  • उपशिर्षक
  • मंगळवार, १ सप्टेंबर
  • बुधवार, २ सप्टेंबर
  • गुरुवार, ३ सप्टेंबर
  • शुक्रवार, ४ सप्टेंबर
  • शनिवार, ५ सप्टेंबर
  • रविवार, ६ सप्टेंबर
  • सोमवार, ७ सप्टेंबर
  • मंगळवार, ८ सप्टेंबर
  • बुधवार, ९ सप्टेंबर
  • गुरुवार, १० सप्टेंबर
  • शुक्रवार, ११ सप्टेंबर
  • शनिवार, १२ सप्टेंबर
  • रविवार, १३ सप्टेंबर
  • सोमवार, १४ सप्टेंबर
  • मंगळवार, १५ सप्टेंबर
  • बुधवार, १६ सप्टेंबर
  • गुरुवार, १७ सप्टेंबर
  • शुक्रवार, १८ सप्टेंबर
  • शनिवार, १९ सप्टेंबर
  • रविवार, २० सप्टेंबर
  • सोमवार, २१ सप्टेंबर
  • मंगळवार, २२ सप्टेंबर
  • बुधवार, २३ सप्टेंबर
  • गुरुवार, २४ सप्टेंबर
  • शुक्रवार, २५ सप्टेंबर
  • शनिवार, २६ सप्टेंबर
  • रविवार, २७ सप्टेंबर
  • सोमवार, २८ सप्टेंबर
  • मंगळवार, २९ सप्टेंबर
  • बुधवार, ३० सप्टेंबर
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२६
es26 पृ. ११०-१२२

सप्टेंबर

मंगळवार, १ सप्टेंबर

तुम्ही विश्‍वासात आहात की नाही याची पारख करत राहा.—२ करिंथ. १३:५.

आपण आध्यात्मिक रितीने प्रौढ होण्यासाठीच नाही, तर आपली प्रौढता टिकवून ठेवण्यासाठीसुद्धा मेहनत घेतली पाहिजे. आणि त्यामुळे आपण असा विचार नाही केला पाहिजे, की आपल्याला आणखी प्रगती करायची गरज नाही. (१ करिंथ. १०:१२) उलट आपण आध्यात्मिक रितीने प्रगती करत आहोत की नाही हे आपण “सतत तपासून” पाहिलं पाहिजे. प्रेषित पौलने कलस्सैकरांना पत्र लिहिलं तेव्हा त्याने पुन्हा एकदा ख्रिस्ती प्रौढता टिकवून ठेवणं किती गरजेचं आहे यावर जोर दिला. तिथल्या भाऊबहिणींची आध्यात्मिक रितीने वाढ झाली असली, तरी पौलने त्यांना जगाच्या विचारसरणीचा स्वतःवर प्रभाव न होऊ देण्याचा इशारा दिला. (कलस्सै. २:६-१०) तसंच, तिथल्या मंडळीतल्या भाऊबहिणींना चांगल्या प्रकारे ओळखत असलेला एपफ्राससुद्धा त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. त्यांनी “स्थिर उभं राहावं” म्हणजेच त्यांनी आध्यात्मिक रितीने प्रौढ व्हावं अशी तो प्रार्थना करत होता. (कलस्सै. ४:१२) यातून आपल्याला काय समजतं? पौल आणि एपफ्रास या दोघांनाही हे माहीत होतं, की आपल्याला जर आपली ख्रिस्ती प्रौढता टिकवून ठेवायची असेल, तर आपल्याला स्वतः मेहनत घ्यावी लागेल आणि त्यासोबतच यहोवाच्या मदतीचीसुद्धा गरज पडेल. पौल आणि एपफ्रास यांची अशी इच्छा होती की, कलस्सैमधल्या भावांना समस्यांचा सामना करावा लागत असला तरी त्यांनी आध्यात्मिक रितीने प्रौढ असावं. टेहळणी बुरूज२४.०४ ६-७ ¶१६-१७

बुधवार, २ सप्टेंबर

आपल्यासोबत यहोवा आहे! म्हणून त्यांना मुळीच घाबरू नका.—गण. १४:९.

यहोवाबद्दल योग्य भीती बाळगणं म्हणजे त्याच्यावर प्रेम करणं. इतकं की त्याचं मन दुखावेल अशी कोणतीच गोष्ट न करणं. म्हणूनच आपण त्याची मर्जी मिळवायला योग्य आणि अयोग्यमधला, सत्य आणि असत्यामधला फरक ओळखायला आतुर असतो. (नीति. २:३-६; इब्री ५:१४) आपण देवाची भीती बाळगण्यापेक्षा जर माणसांना घाबरलो तर आपण सत्यापासून भरकटून जाऊ. यहोवाने इस्राएली लोकांना कनान देश द्यायचं वचन दिलं होतं. या देशाची पाहणी करायला ज्या १२ हेरांना पाठवलं होतं त्यांचा विचार करा. त्यांच्यापैकी दहा हेरांच्या मनात यहोवावरच्या प्रेमापेक्षा कनानी लोकांची भीती जास्त होती. त्यांनी इतर इस्राएली लोकांना सांगितलं, की “आपण त्या लोकांशी लढू शकत नाही. कारण ते आपल्यापेक्षा ताकदवान आहेत.” (गण. १३:२७-३१) मानवी दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर कनानी लोक खरोखरच ताकदवान होते. पण इस्राएली लोक त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवू शकणार नाहीत, असं जे त्यांनी म्हटलं त्यावरून कळतं, की ते यहोवाबद्दल विचार करत नव्हते. टेहळणी बुरूज२४.०७ ९-१० ¶५-६

गुरुवार, ३ सप्टेंबर

सगळ्या पृथ्वीचा न्यायाधीश योग्य ते करणार नाही का?—उत्प. १८:२५.

आपण असं खातरीने म्हणू शकतो का, की लोकांचा न्याय करताना यहोवा नेहमी योग्य तेच करेल? हो! आधी सांगितल्याप्रमाणे अब्राहामला हे चांगल्या प्रकारे कळलं होतं, की यहोवा परिपूर्ण, सर्वात बुद्धिमान, दयाळू असा “सगळ्या पृथ्वीचा न्यायाधीश” आहे. त्याने त्याच्या मुलाला प्रशिक्षण दिलंय आणि त्याच्यावर न्याय करायची जबाबदारी सोपवली आहे. (योहा. ५:२२) यहोवा आणि येशूला माणसाच्या मनात काय आहे हे ओळखता येतं. (मत्त. ९:४) त्यामुळे काहीही झालं तरी ते ‘योग्य तेच’ करतील! तर मग, योग्य काय आहे हे यहोवाला माहीत आहे या गोष्टीवरचा आपला भरवसा आणखी मजबूत करू या! न्याय करायला लागणारी पात्रता आपल्याकडे नाही, पण यहोवाकडे आहे! (यश. ५५:८, ९) म्हणून आपण असा पूर्ण भरवसा ठेवू या की यहोवा आणि त्याचा मुलगा न्याय करायचं सगळं काम योग्यपणेच करतील. कारण त्याचा मुलगा, आपल्या पित्याच्या न्यायाचं आणि दयेचं हुबेहूब अनुकरण करणारा योग्य असा राजा आहे!—यश. ११:३, ४. टेहळणी बुरूज२४.०५ ७ ¶१८-१९

शुक्रवार, ४ सप्टेंबर

यहोवाला कपटी माणसाची घृणा वाटते, पण सरळ माणसाशी त्याची जवळची मैत्री असते.—नीति. ३:३२.

येशू जेव्हा नथनेलला पहिल्यांदा भेटला, तेव्हा जे घडलं त्यावरून प्रामाणिक असणं का महत्त्वाचं आहे, हे आपल्याला कळतं. फिलिप्प आपला मित्र नथनेल याला येशूची भेट घालून देण्यासाठी त्याच्याजवळ आणतो, तेव्हा एक विशेष गोष्ट घडते. येशू पूर्वी कधीच नथनेलला भेटला नव्हता. पण तरीसुद्धा येशू त्याला म्हणतो: “पाहा, हा एक खरा इस्राएली आहे. याच्यात जराही कपट नाही.” (योहा. १:४७) नथनेलचा प्रामाणिकपणा येशूला खूप विशेष वाटला. आपल्याप्रमाणेच नथनेलसुद्धा अपरिपूर्ण होता. पण त्याच्यामध्ये कुठलाही खोटेपणा किंवा दिखाऊपणा नव्हता. हीच गोष्ट येशूला आवडली आणि म्हणून त्याने त्याची प्रशंसा केली. देवाला आनंदी करण्यासाठी त्याच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत याबद्दल १५ व्या स्तोत्रात बरंच काही सांगितलंय. आणि यांपैकी बऱ्‍याच गोष्टी आपण इतरांशी कसं वागतो याच्याशी संबंधित आहेत. स्तोत्र १५:३ मध्ये म्हटलंय, की यहोवाच्या तंबूमध्ये असलेला पाहुणा “आपल्या जिभेने बदनामी करत नाही, आपल्या शेजाऱ्‍याचं वाईट करत नाही, आणि आपल्या मित्रांची निंदा करत नाही.” आपण जर आपल्या बोलण्याच्या क्षमतेचा गैरवापर केला, तर इतरांचं खूप नुकसान होऊ शकतं.—याको. १:२६. टेहळणी बुरूज२४.०६ १० ¶७; १०-११ ¶९-१०

शनिवार, ५ सप्टेंबर

प्रभू, तुझ्या नावाने दुष्ट स्वर्गदूतसुद्धा आमच्या अधीन होतात.—लूक १०:१७.

तुम्ही जर प्रचाराची चांगली तयारी केली तर इतरांशी बोलताना तुम्हाला जास्त भीती वाटणार नाही. सेवाकार्यात जाण्याआधी येशूने त्याच्या शिष्यांना तयारी करण्यासाठी मदत केली. (लूक १०:१-११) येशूने शिकवलेल्या गोष्टी लागू केल्यामुळे शिष्यांना बऱ्‍याच चांगल्या गोष्टी करता आल्या आणि त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. आपण प्रचाराची चांगली तयारी कशी करू शकतो? आपण काय बोलणार आहोत याचा आपण विचार करू शकतो आणि मग ते आपल्या शब्दात बोलायचा प्रयत्न करू शकतो. त्यासोबतच घरमालक कशी प्रतिक्रिया देईल आणि आपण कसं उत्तर देऊ शकतो याचा आधीच विचार केल्यामुळेसुद्धा आपल्याला मदत होईल. मग नंतर लोकांशी बोलताना आपण शांतपणे आणि आनंदी चेहऱ्‍याने त्यांच्याशी बोलू शकतो. टेहळणी बुरूज२४.०४ १६ ¶६-७

रविवार, ६ सप्टेंबर

यहोवा आमच्या देवा, गौरव, सन्मान आणि सामर्थ्य मिळण्यासाठी तूच योग्य आहेस. कारण तू सर्व गोष्टी निर्माण केल्या.—प्रकटी. ४:११.

आनंदाच्या संदेशाचा प्रचार करण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या मनात यहोवाबद्दल आणि त्याच्या पवित्र नावाबद्दल असलेलं प्रेम. आपण ज्या देवावर प्रेम करतो त्याची स्तुती करण्याचा एक मार्ग म्हणून आपण प्रचारकार्याकडे बघतो. आपण या गोष्टीशी पूर्णपणे सहमत आहोत, की यहोवा त्याच्या उपासकांकडून गौरव, सन्मान आणि सामर्थ्य मिळवण्यासाठी अगदी योग्य असा देव आहे. यहोवाने “सर्व गोष्टी निर्माण” केल्या आणि आपण त्याच्यामुळेच अस्तित्वात आहोत. या गोष्टींचे खातरीलायक पुरावे जेव्हा आपण दुसऱ्‍यांना सांगतो, तेव्हा आपण देवाला गौरव आणि सन्मान देत असतो. तसंच आपण आपल्या परिस्थितीप्रमाणे आपल्या वेळेचा, शक्‍तीचा आणि साधनांचा प्रचारकार्यात पुरेपूर उपयोग करतो, तेव्हा आपण त्याला आपली ताकद देतो म्हणजेच आपलं सामर्थ्य देत असतो. (मत्त. ६:३३; लूक १३:२४; कलस्सै. ३:२३) सोप्या शब्दांत सांगायचं झालं, तर आपण ज्या देवावर प्रेम करतो त्याच्याबद्दल इतरांना सांगायला आपल्याला आवडतं. तसंच त्याच्या नावाबद्दल आणि त्याचा काय अर्थ होतो हे इतरांना सांगायलाही प्रवृत्त होतो. टेहळणी बुरूज२४.०५ १७-१८ ¶११

सोमवार, ७ सप्टेंबर

त्याचा मनापासून शोध घेणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देतो.—इब्री ११:६.

यहोवा सध्या आपल्याला शांतीने आणि समाधानाने जीवन जगायला मदत करतोय. पण त्यासोबतच तो भविष्यात आपल्याला सर्वकाळाचं जीवनही देईल. आपण त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवू शकतो, की आपल्याला प्रतिफळ द्यायची त्याची इच्छा आहे आणि तशी ताकदही त्याच्याकडे आहे. याच खातरीमुळे आपल्याला प्राचीन काळातल्या त्याच्या विश्‍वासू सेवकांप्रमाणेच त्याच्या सेवेत व्यस्त राहायची प्रेरणा मिळते. या बाबतीत पहिल्या शतकातल्या तीमथ्यचं उदाहरण घेता येईल. (इब्री ६:१०-१२) तीमथ्यला जिवंत देवावर पूर्ण भरवसा होता. (१ तीम. ४:१०) म्हणूनच इतरांसाठी आणि यहोवासाठी मेहनत करायला तो तयार होता. हे त्याने कसं केलं? प्रेषित पौलने त्याला प्रचारात आणि मंडळीत एक चांगला शिक्षक बनण्याचं प्रोत्साहन दिलं. त्यासोबतच त्याला तरुण आणि वृद्ध अशा सगळ्या भाऊबहिणींसमोर एक चांगलं उदाहरण मांडायचं होतं. शिवाय त्याला काही कठीण नेमणुकाही देण्यात आल्या होत्या. यामध्ये गरज असलेल्यांना अगदी स्पष्ट, पण प्रेमळ शब्दांत सल्ला देणंही सामील होतं. (१ तीम. ४:११-१६; २ तीम. ४:१-५) तीमथ्यला याची खातरी होती, की यहोवा आपल्याला नक्कीच प्रतिफळ देईल.—रोम. २:६, ७. टेहळणी बुरूज२४.०६ २२-२३ ¶१०-११

मंगळवार, ८ सप्टेंबर

आपल्या सर्व संदेष्ट्यांद्वारे यहोवा [इस्राएल आणि यहूदा यांना] इशारा देत राहिला.—२ राजे १७:१३.

आपल्या लोकांना इशारा देण्यासाठी आणि त्यांना सुधारण्यासाठी यहोवाने बऱ्‍याच वेळा आपल्या संदेष्ट्यांचा वापर केला. उदाहरणार्थ, त्याने यिर्मया संदेष्ट्याकडून त्यांना असा संदेश दिला: “हे बंडखोर इस्राएल, माझ्याकडे परत ये. मी तुझ्याकडे रागाने बघणार नाही. कारण मी एकनिष्ठ देव आहे. . . . मी तुझ्याबद्दल कायम मनात राग धरणार नाही. तू फक्‍त आपले अपराध कबूल कर. कारण तू तुझ्या देवाविरुद्ध, यहोवाविरुद्ध बंड केलंय.” (यिर्म. ३:१२, १३) तसंच, यहोवाने योएल संदेष्ट्याद्वारे त्यांना असं सांगितलं: “पूर्ण मनाने माझ्याकडे परत या.” (योए. २:१२, १३) शिवाय, यशया संदेष्ट्याद्वारे त्याने असं घोषित केलं: “स्वतःला धुऊन शुद्ध करा, तुमची दुष्ट कामं माझ्या नजरेपुढून दूर करा; वाईट कामं करायचं सोडून द्या.” (यश. १:१६-१९) तसंच, यहोवाने यहेज्केलद्वारे त्यांना असं विचारलं: “एखादा दुष्ट माणूस मरतो, तेव्हा मला आनंद होतो का? त्याने आपला दुष्टपणा सोडून द्यावा आणि जिवंत राहावं, असंच मला वाटत नाही का? कोणाच्याही मृत्यूने मला आनंद होत नाही. . . . म्हणून मागे वळा आणि जिवंत राहा.” (यहे. १८:२३, ३२) पापी लोक पश्‍चात्ताप करतात तेव्हा यहोवाला आनंद होतो. कारण त्याची अशी इच्छा आहे की त्यांनी सर्वकाळ जगावं. टेहळणी बुरूज२४.०८ ९-१० ¶५-६

बुधवार, ९ सप्टेंबर

संपूर्ण शास्त्र देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं असून ते उपयोगी आहे.—२ तीम. ३:१६.

यहोवा त्याच्या सगळ्याच सेवकांना आध्यात्मिक भरणपोषण, मार्गदर्शन आणि हवं असलेलं संरक्षण पुरवतो. यहोवा भेदभाव करत नाही, याचं एक उदाहरण म्हणजे त्याने आज जगभरातल्या सगळ्या लोकांसाठी बायबल उपलब्ध करून दिलंय. पवित्र शास्त्र मुळात तीन भाषांमध्ये लिहिण्यात आलं होतं: हिब्रू, ॲरामेईक आणि ग्रीक. मग इतर लोकांच्या तुलनेत बायबलच्या या तीन भाषा ज्यांना वाचता येत होत्या त्यांचं यहोवासोबत जास्त जवळचं नातं होतं का? नाही, तसं नव्हतं. (मत्त. ११:२५) आपल्याला बायबलच्या मूळ भाषा येतात की नाही किंवा आपलं शिक्षण किती झालंय या गोष्टींच्या आधारावर यहोवा आपल्याला त्याच्या तंबूत पाहुणे म्हणून बोलवत नाही. तसंच, तो फक्‍त जास्त शिक्षण झालेल्या लोकांना त्याच्या वचनात असलेला सल्ला आणि मार्गदर्शन देत नाही. उलट तो जगभरातल्या सगळ्या लोकांना त्याची बुद्धी देतो. मग त्यांचं जास्त शिक्षण झालेलं असो किंवा नसो. त्याच्या प्रेरित वचनाचं, बायबलचं आज हजारो भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलंय. त्यामुळे जगभरातल्या सगळ्या लोकांना त्याच्या शिकवणींचा फायदा घेता येतो आणि त्याच्यासोबत मैत्री कशी करता येईल, हे शिकून घेता येतं.—२ तीम. ३:१६, १७. टेहळणी बुरूज२४.०६ ६-७ ¶१३-१५

गुरुवार, १० सप्टेंबर

[यरुशलेम] ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे.—लूक २१:२०.

येशूने आधीच सांगितल्याप्रमाणे यहुदी व्यवस्थेचा विनाश लवकरच होणार होता. त्या काळच्या ख्रिस्ती लोकांना, विश्‍वास आणि धीर यांसारखे गुण वाढवून स्वतःची तयारी करण्यासाठी उरलेल्या वेळेचा चांगला उपयोग करणं गरजेचं होतं. (इब्री १०:२५; १२:१, २) इब्री ख्रिश्‍चनांना जे संकट सोसावं लागलं त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठ्या संकटाचा आपल्याला सामना करावा लागणार आहे. (मत्त. २४:२१; प्रकटी. १६:१४, १६) म्हणून यहोवाने त्या काळातल्या ख्रिश्‍चनांना जे व्यावहारिक सल्ले दिले होते, त्यांपैकी काहींवर विचार करा. यामुळे आपल्यालाही फायदा होईल. इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रात प्रेषित पौलने भाऊबहिणींना देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास करायचं प्रोत्साहन दिलं. (इब्री ५:१४–६:१) हिब्रू शास्त्रवचनांचा वापर करून, पौलने त्यांच्याशी तर्क केला आणि त्यांना पटवून दिलं की यहुदी धर्मापेक्षा ख्रिस्ती उपासनेची पद्धत श्रेष्ठ आहे. पौलला माहीत होतं की सत्याचं ज्ञान वाढवल्यामुळे आणि सखोल समज मिळवल्यामुळे ख्रिश्‍चनांना चुकीचे विचार ओळखून त्यांपासून दूर राहता येईल आणि त्यामुळे ते सत्यापासून भरकटणार नव्हते. टेहळणी बुरूज२४.०९ ८-९ ¶२-३; १० ¶६

शुक्रवार, ११ सप्टेंबर

प्रभू खरोखरच उठलाय.—लूक २४:३४.

येशूच्या शिष्यांना प्रोत्साहनाची गरज होती. का बरं? कारण काहींनी येशूसोबत पूर्णवेळ राहण्यासाठी आपली घरंदारं, कुटुंबं आणि आपला व्यवसाय सोडून दिला होता. (मत्त. १९:२७) काही जणांना तर येशूचे शिष्य बनल्यामुळे वाळीत टाकल्यासारखी वागणूक दिली जात होती. (योहा. ९:२२) त्यांनी हे सगळे त्याग यासाठी केले होते, कारण त्यांचा विश्‍वास होता की येशूच वचन दिलेला मसीहा आहे. (मत्त. १६:१६) पण जेव्हा येशूला मृत्यूदंड देण्यात आला तेव्हा त्यांच्या सगळ्या आशा धुळीला मिळाल्या आणि ते खूप निराश झाले. येशूला आपल्या शिष्यांचं दुःख कळत होतं. त्याला माहीत होतं की त्यांचं हे दुःख विश्‍वासाच्या कमतरतेमुळे नाही, तर त्याला गमावल्यामुळे आहे. म्हणून त्याच्या पुनरुत्थानाच्या दिवशीच त्याने शिष्यांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. उदाहरणार्थ, त्याच्या कबरेपुढे रडणाऱ्‍या मग्दालीया मरीयाला तो भेटला. (योहा. २०:११, १६) तसंच तो अम्माऊसला जाणाऱ्‍या त्या दोन शिष्यांनाही भेटला. शिवाय तो प्रेषित पेत्रलाही भेटला. टेहळणी बुरूज२४.१० १३ ¶५-६

शनिवार, १२ सप्टेंबर

तुम्ही बाळगत असलेल्या आशेबद्दल जो कोणी प्रश्‍न विचारतो, त्याला उत्तर देण्यासाठी नेहमी तयार राहा.—१ पेत्र ३:१५.

आईवडिलांनो, आपण निर्माणकर्त्यावर का विश्‍वास ठेवतो याबद्दल इतरांना सांगायला आपल्या मुलांना तयार करा. jw.org या आपल्या वेबसाईटवर उत्क्रांती आणि निर्मिती या विषयावर बरेच लेख आहेत. तुम्ही तुमच्या मुलांसोबत यावर चर्चा करू शकता. आणि मग त्यांना विचारू शकता, की यातल्या कोणत्या तर्काचा वापर करून ते इतरांना निर्माणकर्त्याबद्दल चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतात. आणि मग, तुम्ही त्यांच्याकडून चांगला सराव करून घेऊ शकता. जर कोणी ऐकून घ्यायला तयार असेल, तर ते त्याच्यासोबत अगदी साध्या-सोप्या पद्धतीने कसा तर्क करू शकतात हे त्यांना शिकवा. उदाहरणार्थ, वर्गातला एखादा मुलगा म्हणेल: “मला ज्या गोष्टी दिसतात त्यावरच मी भरवसा ठेवतो आणि देवाला मी कधीच पाहिलं नाही.” अशा वेळी तर्क करायला तुमची मुलं कदाचित असं म्हणू शकतात: “कल्पना कर की तू एका जंगलातून चालला आहेस आणि तुला आजूबाजूला एकही माणूस दिसत नाही. पण त्या जंगलात तुला एक लहानसं घर दिसतं. मग कोणी माणूस दिसत नाही म्हणून तू असा विचार करशील का, की ते घर तिथे आपोआपच आलं? नक्कीच नाही. कारण तुला माहीत आहे की नक्कीच कोणीतरी ते घर बांधलंय. मग विचार कर निर्माणकर्ता दिसत नाही, म्हणून तू असा विचार केला पाहिजे का, की हे विश्‍व आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी आपोआपच आल्यात?” टेहळणी बुरूज२४.१२ १८ ¶१६

रविवार, १३ सप्टेंबर

म्हाताऱ्‍या माणसांजवळ बुद्धी नसते का? आणि बरंच आयुष्य जगल्यावर समजशक्‍ती येत नाही का?—ईयो. १२:१२.

जीवनातले महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच मार्गदर्शनाची गरज असते. बऱ्‍याचदा हे मार्गदर्शन आपल्याला मंडळीतल्या वडिलांकडून आणि प्रौढ भाऊबहिणींकडून मिळू शकतं. ते आपल्यापेक्षा खूप मोठे आहेत, म्हणून त्यांच्या काळातला सल्ला आपल्या काहीच उपयोगाचा नाही असं आपण म्हणून नये. आपण मोठ्यांकडून शिकावं अशी यहोवाची इच्छा आहे. कारण त्यांनी आपल्यापेक्षा जास्त पावसाळे बघितले आहेत. आणि त्यामुळे त्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त अनुभव, समजशक्‍ती आणि बुद्धी आहे. बायबल काळात, यहोवाने आपल्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी विश्‍वासू असलेल्या आपल्या वृद्ध सेवकांचा उपयोग केला. उदाहरणार्थ मोशे, दावीद आणि प्रेषित योहान यांचा त्याने वापर केला. ते वेगवेगळ्या काळात जगले आणि त्यांची परिस्थिती एकमेकांपेक्षा खूप वेगळी होती. त्यांच्या जीवनाचा शेवट जवळ असताना त्यांनी तरुणांना खूप मोलाचा सल्ला दिला. देवाचं ऐकणं किती महत्त्वाचं आहे या गोष्टीवर त्या विश्‍वासू सेवकांनी जोर दिला. आपण तरुण असलो किंवा वृद्ध असलो, तरी त्यांनी दिलेल्या सल्ल्यावर विचार करू शकतो. त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होईल.—रोम. १५:४; २ तीम. ३:१६. टेहळणी बुरूज२४.११ ८ ¶१-२

सोमवार, १४ सप्टेंबर

जोपर्यंत तुम्ही मनुष्याच्या मुलाचं मांस खात नाही आणि त्याचं रक्‍त पीत नाही तोपर्यंत तुम्हाला जीवन मिळणार नाही.—योहा. ६:५३.

नोहाच्या काळात, देवाने मानवांना अशी आज्ञा दिली होती की त्यांनी रक्‍त खाऊ नये. (उत्प. ९:३, ४) इस्राएली लोकांना जेव्हा त्याने नियमशास्त्र दिलं तेव्हा त्याने हीच आज्ञा त्यांना परत सांगितली. नियमशास्त्रात सांगण्यात आलं होतं की जो कोणी रक्‍त खाईल त्याला “ठार मारलं जावं.” (लेवी. ७:२७) नियमशास्त्रात सांगितलेल्या सगळ्या आज्ञा यहुद्यांनी पाळल्या पाहिजेत असं येशूने शिकवलं. (मत्त. ५:१७-१९) त्यामुळे येशू लोकांना त्याचं खरोखरचं मांस खायला आणि रक्‍त प्यायला सांगेल ही गोष्ट तर्काला पटत नाही. येशू इथे लाक्षणिक अर्थाने बोलत होता. तो याआधी त्याला विहिरीजवळ भेटलेल्या शोमरोनी स्त्रीसोबत याच प्रकारे बोलला होता. त्याने म्हटलं: “मी दिलेलं पाणी . . . सर्वकाळाचं जीवन देणाऱ्‍या एखाद्या खळखळत्या झऱ्‍यासारखं होईल.” (योहा. ४:७, १४) येशू त्या शोमरोनी स्त्रीला असं सांगत नव्हता की एखाद्या विहिरीचं पाणी प्यायल्यामुळे तिला सर्वकाळाचं जीवन मिळेल. त्याच प्रकारे, कफर्णहूम इथे जमलेल्या लोकांनासुद्धा तो सर्वकाळाचं जीवन मिळण्यासाठी त्याचं खरोखरचं मांस खायला आणि रक्‍त प्यायला सांगत नव्हता. टेहळणी बुरूज२४.१२ ९-१० ¶४-६

मंगळवार, १५ सप्टेंबर

तुम्ही आपली शरीरं जिवंत, पवित्र आणि देवाला स्वीकारयोग्य बलिदान म्हणून अर्पण करावीत. असं केल्यामुळे, तुम्हाला आपल्या विचारशक्‍तीने पवित्र सेवा करता येईल.—रोम. १२:१.

आज स्त्रियांबद्दल जगाचा खूप चुकीचा दृष्टिकोन आहे. याचा आपल्यावर प्रभाव होऊ नये म्हणून ख्रिस्ती पतींनी सावध असलं पाहिजे. का? कारण आपल्या विचारांचा आपल्या कामांवर प्रभाव होऊ शकतो. प्रेषित पौलने रोममधल्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना असा इशारा दिला, की त्यांनी “या जगाच्या व्यवस्थेचं अनुकरण करू” नये. (रोम. १२:१, २) पौलने जेव्हा रोममधल्या ख्रिश्‍चनांना हे पत्र लिहिलं, तेव्हा तिथली मंडळी सुरू होऊन काही काळ झाला होता. तरी पौलच्या शब्दांवरून हे दिसून येतं, की मंडळीतल्या काहींवर अजूनही जगातल्या विचारांचा आणि रितीरिवाजांचा प्रभाव होता. म्हणूनच पौलने त्यांना आपले विचार आणि वागणं बदलायचा सल्ला दिला. तोच सल्ला आज ख्रिस्ती पतींनासुद्धा लागू होतो. दुःखाची गोष्ट म्हणजे, काही पतींवर जगाचा प्रभाव पडलाय आणि त्यांनी आपल्या पत्नीचा छळ केलाय. टेहळणी बुरूज२५.०१ ९ ¶४

बुधवार, १६ सप्टेंबर

तुमच्या हाती सोपवलेल्या देवाच्या कळपाचा देखरेख करणारे या नात्याने मेंढपाळांप्रमाणे सांभाळ करा.—१ पेत्र ५:२.

मंडळीतले वडील बरीच कामं करतात. ते आवेशी प्रचारक म्हणून काम करतात. (२ तीम. ४:५) ते प्रचाराच्या कामात आवेशाने पुढे असतात. तसंच ते मंडळीच्या क्षेत्रात प्रचारकार्याची योजना करतात. शिवाय ते प्रभावीपणे प्रचार करण्यासाठी आणि शिकवण्यासाठी आपल्याला प्रशिक्षण देतात. ते दयाळूपणे आणि कोणताही भेदभाव न करता निर्णय घेतात. एखादा भाऊ किंवा बहीण गंभीर पाप करते तेव्हा वडील त्यांना यहोवासोबतची मैत्री पुन्हा पहिल्यासारखी करण्यासाठी मदत करायचा प्रयत्न करतात. त्याच वेळी मंडळी शुद्ध राहील याचीही ते काळजी घेतात. (१ करिंथ. ५:१२, १३; गलती. ६:१) वडील खासकरून मेंढपाळ म्हणूनसुद्धा ओळखले जातात. (१ पेत्र ५:१-३) ते चांगल्या प्रकारे तयार केलेली आणि शास्त्रवचनांवर आधारित असलेली भाषणं देतात, मंडळीतल्या प्रत्येकाशी चांगली ओळख करून घ्यायचा प्रयत्न करतात आणि मेंढपाळ भेटी देतात. काही वडील आपल्या इतर जबाबदाऱ्‍यांसोबतच राज्य सभागृह बांधकाम प्रकल्पात तसंच सभागृहांची देखभाल करायच्या कामात, अधिवेशनाचं आयोजन करण्याच्या कामात आणि हॉस्पिटल संपर्क समितीत तसंच पेशन्टला भेट देणाऱ्‍या गटाच्या कामातही मदत करतात. थोडक्यात, वडील आपल्यासाठी खरंच खूप मेहनत घेतात! टेहळणी बुरूज२४.१० २० ¶९

गुरुवार, १७ सप्टेंबर

ज्याप्रमाणे आदाममुळे सगळे मरत आहेत, त्याचप्रमाणे ख्रिस्तामुळे सगळे जिवंत केले जातील.—१ करिंथ. १५:२२.

बायबलमध्ये म्हटलंय, की येशूने दिलेल्या खंडणीमुळे आपल्याला सुटका मिळाली आहे किंवा आपण मुक्‍त झालो आहोत. प्रेषित पेत्रने ही गोष्ट अशा प्रकारे स्पष्ट केली: “तुम्हाला हे माहीत आहे, की तुमच्या वाडवडिलांपासून चालत आलेल्या तुमच्या व्यर्थ जीवनशैलीतून, सोनं किंवा चांदी यांसारख्या नाशवंत गोष्टींनी तुमची सुटका करण्यात आलेली नाही [शब्दशः “तुम्हाला खंडणी देऊन सोडवण्यात आलेलं नाही”]. तर, एका निष्कलंक आणि निर्दोष कोकऱ्‍याच्या, म्हणजेच ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्‍ताने तुमची सुटका करण्यात आली आहे.” (१ पेत्र १:१८, १९; तळटीप) खंडणी बलिदानामुळे आपण पाप आणि मृत्यूच्या गुलामीतून मुक्‍त होऊ शकतो. (रोम. ५:२१) खरंच, येशूच्या मौल्यवान रक्‍ताद्वारे किंवा त्याच्या जीवनामुळे आपल्याला सुटका मिळाली आहे. म्हणूनच आपण यहोवा आणि येशूचे मनापासून आभार मानले पाहिजेत. टेहळणी बुरूज२५.०२ ५ ¶१५-१६

शुक्रवार, १८ सप्टेंबर

नेहमी सावध राहणारा माणूस सुखी असतो.—नीति. २८:१४.

आपण सावध राहून स्वतःचं संरक्षण कसं करू शकतो? याबद्दल नीतिवचनांतल्या ७ व्या अध्यायात सांगितलेल्या तरुणाकडून आपण काय शिकू शकतो याकडे लक्ष देऊ या. त्याने एका वाईट चालीच्या स्त्रीसोबत अनैतिक लैंगिक काम केलं. २२ व्या वचनात म्हटलंय, तो “अचानक” त्या स्त्रीच्या मागे जाऊ लागला. पण आधीच्या वचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याने आधी अशी काही पावलं उचलली होती, ज्यांमुळे खरंतर तो हळूहळू पाप करायला प्रवृत्त झाला होता. मग तो पाप करायला कशामुळे प्रवृत्त झाला होता? सगळ्यात आधी तो संध्याकाळच्या वेळी “[अनैतिक स्त्रीच्या] घराजवळच्या रस्त्यावरून गेला.” मग तो सरळ तिच्या घराच्या दिशेने चालू लागला. (नीति. ७:८, ९) त्यानंतर, त्याने त्या स्त्रीला पाहिलं, पण तरी तो मागे वळला नाही. उलट त्याने तिला त्याचं चुंबन घेऊ दिलं आणि आपण वाईट व्यक्‍ती नाही असं भासवण्यासाठी ती त्याला शांती-अर्पणं दिल्याबद्दल जे काही सांगत होती ते तो ऐकत राहिला. (नीति. ७:१३, १४, २१) जर त्या तरुणाने पाप करायला प्रवृत्त करणारे सगळे धोके टाळले असते, तर तो स्वतःचं मोहांपासून आणि पापापासून संरक्षण करू शकला असता. टेहळणी बुरूज२४.०७ १६ ¶८-९; १८ ¶१९

शनिवार, १९ सप्टेंबर

त्याला प्रेमळपणे क्षमा करून सांत्वन द्या.—२ करिंथ. २:७.

यहोवा आपल्या लोकांमध्ये गंभीर पाप खपवून घेत नाही. काहींना वाटतं, की यहोवा दयाळू देव असल्यामुळे तो पश्‍चात्ताप न करणाऱ्‍यांनाही मंडळीत राहू देईल. पण यहोवा तसं करत नाही. तो दयाळू असला, तरी तो वाईट गोष्टी अजिबात खपवून घेत नाही. आणि तो त्याच्या नीतिमान स्तरांशी तडजोडही करत नाही. (यहू. ४) यहोवाने जर असं केलं तर ते दया दाखवणं नसेल. कारण त्यामुळे मंडळीतल्या इतर जणांचंही नुकसान होईल. (नीति. १३:२०; १ करिंथ. १५:३३) आपल्याला माहीत आहे, की कोणाचाही नाश होऊ नये असं यहोवाला वाटतं. आणि तो लोकांना वाचवायचा प्रयत्न करतो. जे पापी लोक आपलं मन बदलतात आणि त्याच्यासोबत पुन्हा नातं जोडायचा प्रयत्न करतात त्यांना तो दया दाखवतो. (यहे. ३३:११; २ पेत्र ३:९) करिंथमधल्या माणसाने पश्‍चात्ताप करून आपला पापी मार्ग सोडला होता. म्हणूनच, यहोवाने प्रेषित पौलचा वापर करून मंडळीला समजावलं, की त्या माणसाला त्यांनी माफ करावं आणि मंडळीत त्याचं पुन्हा स्वागत करावं. टेहळणी बुरूज२४.०८ १७ ¶७; १८-१९ ¶१४-१५

रविवार, २० सप्टेंबर

या माझ्या भावांपैकी सगळ्यात लहानासाठी तुम्ही जे काही केलं ते माझ्यासाठीच केलं.—मत्त. २५:४०.

मेंढरं आणि बकऱ्‍यांच्या दाखल्यातून येशूने अशा लोकांच्या न्यायाबद्दल सांगितलं ज्यांना अभिषिक्‍त बांधवांना पाठिंबा द्यायची संधी आहे. (मत्त. २५:३१-४६) तो हा न्याय ‘मोठ्या संकटाच्या’ दरम्यान आणि हर्मगिदोनच्या आधी करेल. (मत्त. २४:२१) जसं मेंढपाळ मेंढरांना बकऱ्‍यांपासून वेगळं करतो, तसं येशू अभिषिक्‍त भावांना एकनिष्ठपणे पाठिंबा देणाऱ्‍यांना आणि न देणाऱ्‍यांना एकमेकांपासून वेगळं करेल. यहोवाचा नियुक्‍त न्यायाधीश या नात्याने येशू लोकांचा नीतीने न्याय करेल असं बायबल सांगतं. (यश. ११:३, ४) तो लोकांच्या वागण्या-बोलण्याचं आणि स्वभावाचं, तसंच ते अभिषिक्‍त भावांशी कसं वागतात यांचं परीक्षण करेल. (मत्त. १२:३६, ३७) त्यामुळे येशूला त्याच्या अभिषिक्‍त भावांना आणि त्यांच्या कामाला कोण पाठिंबा देत आहे हे माहीत होईल. त्यांना पाठिंबा देण्याचा एक मार्ग म्हणजे प्रचारकार्यात त्यांना मदत करणं. टेहळणी बुरूज२४.०९ २१ ¶३-४

सोमवार, २१ सप्टेंबर

सगळ्या गोष्टींची खातरी करा.—१ थेस्सलनी. ५:२१.

आपण जे मानतो त्याची तुलना बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टींशी करून ते खरंय का, याची आपण खातरी करू शकतो. उदाहरणार्थ, ‘देवाच्या नजरेत माझी खरंच काही किंमत आहे का?’ अशी शंका असणाऱ्‍या एका तरुणाचा विचार करा. त्याने हा प्रश्‍न तसाच सोडून द्यावा का? नाही. उलट याबद्दल यहोवाचे विचार काय आहेत हे जाणून घेऊन त्याने “सगळ्या गोष्टींची खातरी” केली पाहिजे. जेव्हा आपण देवाचं वचन वाचतो तेव्हा आपण यहोवाचं “ऐकत” असतो. पण अमुक एका गोष्टीच्या बाबतीत त्याचं मत जाणून घेण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. आपल्याला ज्या गोष्टीची शंका आहे ते लक्षात ठेवून आपण बायबल वाचलं पाहिजे. त्यासाठी आपण यहोवाच्या संघटनेने पुरवलेल्या संशोधनाच्या साधनांचा वापर करून संशोधन करू शकतो. (नीति. २:३-६) आपण संशोधन करत असताना यहोवाने आपलं मार्गदर्शन करावं आणि आपल्या मनात असलेल्या शंकांबद्दल त्याला काय वाटतं, हे आपल्याला समजावं म्हणून आपण त्याला प्रार्थना करू शकतो. मग आपण आपल्या परिस्थितीला लागू होतील अशी बायबल तत्त्वं आणि व्यावहारिक माहिती शोधू शकतो. टेहळणी बुरूज२४.१० २५ ¶४-५

मंगळवार, २२ सप्टेंबर

[प्रेम] स्वार्थ पाहत नाही.—१ करिंथ. १३:५.

एक व्यक्‍ती गर्विष्ठ असेल किंवा स्वतःला इतरांपेक्षा खूप मोठं समजत असेल, तर यहोवा तिच्या प्रयत्नांवर कधीच आशीर्वाद देणार नाही. (१ करिंथ. १०:२४, ३३; १३:४) येशूच्या काही जवळच्या शिष्यांनीसुद्धा काही वेळा चुकीच्या हेतूने खास जबाबदाऱ्‍या मिळवायचा प्रयत्न केला. याकोब आणि योहान या दोन प्रेषितांसोबत घडलेल्या घटनेचाच विचार करा. त्यांनी येशूला म्हटलं, की त्याने त्याच्या राज्यामध्ये त्यांना एक खास पद द्यावं. पण याबद्दल येशूने त्यांची प्रशंसा केली नाही. उलट त्याने सगळ्या १२ प्रेषितांना म्हटलं: “ज्याला तुमच्यामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल त्याने तुमचा सेवक झालं पाहिजे, आणि ज्याला तुमच्यामध्ये प्रमुख व्हायचं असेल त्याने सर्वांचा दास झालं पाहिजे.” (मार्क १०:३५-३७, ४३, ४४) जे भाऊ योग्य हेतूने, म्हणजे इतरांची सेवा करायच्या हेतूने पुढे यायचा प्रयत्न करतात ते मंडळीसाठी एक आशीर्वादच असतात.—१ थेस्सलनी. २:८. टेहळणी बुरूज२४.११ १६ ¶७-८

बुधवार, २३ सप्टेंबर

पुष्कळ जणांच्या सल्ल्यामुळे कामात यश मिळतं.—नीति. १५:२२.

एखादा निर्णय घेताना, प्रेमामुळे आपण ‘दुसऱ्‍यांच्या फायद्याचा’ विचार करू आणि मर्यादा ओळखून वागू. (१ करिंथ. १०:२३, २४, ३२; १ तीम. २:९, १०) या सगळ्या गोष्टींमुळे, इतरांबद्दलचं आपलं प्रेम आणि आदर दिसून येईल असे निर्णय आपल्याला घेता येतील. जर तुम्हाला एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तो अमलात आणण्यासाठी काय करावं लागेल याचा विचार करा. येशूने शिकवलं होतं, की ‘खर्चाचा हिशोब लावा.’ (लूक १४:२८) त्यामुळे तो निर्णय यशस्वी होण्यासाठी तुम्हाला किती वेळ, मेहनत आणि साधनं लागतील याचा विचार करा. काही बाबतीत तुमच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी कुटुंबातल्या सदस्यांना काय करता येईल, हे तुम्ही त्यांना विचारू शकता. असं करणं फायद्याचं का आहे? कारण त्यामुळे तुम्हाला कळेल की तुम्हाला कदाचित तुमच्या निर्णयामध्ये बदल करायची गरज आहे, किंवा दुसरा एखादा पर्याय जास्त व्यावहारिक आहे. तसंच, जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांना यात सामील कराल आणि त्यांचं ऐकून घ्याल, तेव्हा तुमच्या निर्णयाला साथ द्यायला ते मनापासून तयार होतील. टेहळणी बुरूज२५.०१ १८-१९ ¶१४-१५

गुरुवार, २४ सप्टेंबर

जल्लोष करा आणि आनंदी राहा.—यश. ६५:१८.

आपण आध्यात्मिक नंदनवनात “जल्लोष” का केला पाहिजे आणि “आनंदी” का राहिलं पाहिजे याबद्दल यशया सांगतो. हे लाक्षणिक नंदनवन यहोवाने बनवलंय. (यश. ६५:१८, १९) त्यामुळे यात आश्‍चर्य करण्यासारखं काहीच नाही की तो लोकांना आध्यात्मिक रितीने ओसाड पडलेल्या जगातल्या संघटनांमधून बाहेर काढायला आणि सुंदर लाक्षणिक नंदनवनात आणायला आपला वापर करतोय. सत्यात असल्यामुळे आपण ज्या आशीर्वादांचा आनंद घेतोय त्याबद्दल आपण उत्सुक आहोत. आणि त्यामुळेच इतरांना त्याबद्दल सांगायला आपण प्रवृत्त होतो. (यिर्म. ३१:१२) आध्यात्मिक नंदनवनाचे रहिवासी म्हणून आपल्याला मिळालेल्या आशेबद्दलसुद्धा आपण आभारी आणि उत्सुक आहोत. बायबल असं अभिवचन देतं की, आपण ‘घरं बांधू आणि त्यांत राहू, आपण द्राक्षांचे मळे लावू आणि त्यांचं फळ खाऊ.’ आपली “मेहनत वाया जाणार नाही.” कारण आपण “यहोवाने आशीर्वादित” केलेली मुलं असू. यहोवा आपल्याला सुरक्षित, समाधानी आणि अर्थपूर्ण जीवन देण्याचं वचन देतो. त्याला प्रत्येकाच्या गरजा माहीत आहेत आणि तो “प्रत्येक जिवाची इच्छा पूर्ण” करेल.—यश. ६५:२०-२४; स्तो. १४५:१६. टेहळणी बुरूज२४.०४ २२-२३ ¶११-१२

शुक्रवार, २५ सप्टेंबर

[देव] माझा मजबूत खडक, माझा आश्रय आहे.—स्तो. ६२:७.

जेव्हा आपण यहोवावर पूर्ण भरवसा ठेवतो, तेव्हा आपण त्याला आपला खडक म्हणून पाहत असतो. आपल्याला या गोष्टीचा भरवसा आहे, की कठीण काळात आपण त्याच्या आज्ञांचं पालन करतो तेव्हा आपल्याला नेहमी फायदाच होईल. (यश. ४८:१७, १८) जसजसं आपण त्याची मदत अनुभवतो तसतसं आपला त्याच्यावरचा भरवसा आणखी वाढत जाईल. त्यामुळे आपण अशा परीक्षांना तोंड द्यायला आणखी चांगल्या प्रकारे तयार असू. कारण आपल्याला माहीत असेल की फक्‍त यहोवाच आपल्याला यांतून सोडवू शकतो. एका मोठ्या खडकाप्रमाणेच यहोवा खंबीर आणि स्थिर आहे. त्याचं व्यक्‍तिमत्त्व आणि त्याचा उद्देश कधीच बदलत नाही. (मला. ३:६) एदेन बागेत बंडाळी झाली तेव्हासुद्धा तो डगमगला नाही. प्रेषित पौलने लिहिल्याप्रमाणे यहोवाला ‘त्याच्या स्वभावाच्या विरोधात वागणं शक्य नाही.’ (२ तीम. २:१३) याचा अर्थ, काहीही झालं आणि इतरांनी काहीही केलं तरी यहोवा कधीही त्याचे गुण, त्याचा उद्देश किंवा त्याचे स्तर बदलत नाही. कधीही न बदलणाऱ्‍या आपल्या देवावर भरवसा ठेवून, आपण तारणासाठी आणि कठीण काळात मदतीसाठी त्याच्याकडे पाहू शकतो.—स्तो. ६२:६, ७. टेहळणी बुरूज२४.०६ २७-२८ ¶७-८

शनिवार, २६ सप्टेंबर

मनातली गुप्त व्यक्‍ती फार मौल्यवान आहे.—१ पेत्र ३:४.

तुम्ही जर डेटींग करत आहात तर, लग्न करायचं की नाही हा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला कोणती गोष्ट मदत करू शकते? त्यासाठी तुम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकता. डेटींग सुरू करण्याआधी तुम्ही त्या व्यक्‍तीबद्दल काही गोष्टी नक्कीच माहीत करून घेतल्या असतील. पण आता त्या भावाच्या किंवा बहिणीच्या “मनातल्या गुप्त व्यक्‍तीला” समजून घेण्यासाठी तुमच्याकडे संधी आहे. यामध्ये त्या व्यक्‍तीची आध्यात्मिकता, तिचं व्यक्‍तिमत्त्व आणि ती कसा विचार करते या गोष्टी समजून घेणंसुद्धा येतं. डेटींग करत असताना तुम्हाला हळूहळू काही प्रश्‍नांची उत्तरं समजली पाहिजेत. जसं की ‘ती व्यक्‍ती माझा चांगला विवाह जोडीदार होऊ शकते का?’ (नीति. ३१:२६, २७, ३०; इफिस. ५:३३; १ तीम. ५:८) ‘आम्ही एकमेकांच्या भावनिक गरजा पूर्ण करू शकतो का? एकमेकांमध्ये ज्या कमतरता आहेत त्या स्वीकारून आम्ही आयुष्य जगू शकतो का?’ (रोम. ३:२३) एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून घेत असताना लक्षात ठेवा की तुमच्या आवडीनिवडी किती सारख्या आहेत, यापेक्षा तुम्ही एकमेकांच्या वेगळेपणाशी किती जुळवून घेता हे जास्त महत्त्वाचं आहे. टेहळणी बुरूज२४.०५ २७ ¶५

रविवार, २७ सप्टेंबर

मी यहोवाविरुद्ध पाप केलंय.—२ शमु. १२:१३.

दावीद राजाने एक गंभीर चूक केली होती. पण जेव्हा नाथान संदेष्ट्याने त्याचं हे पाप त्याला दाखवून दिलं तेव्हा त्याने नम्रपणे पश्‍चात्ताप केला. (स्तो. ५१:३, ४, १७, उपरीलेखन) हिज्कीया राजानेसुद्धा यहोवाविरुद्ध पाप केलं. (२ इति. ३२:२५) पण दावीद राजाप्रमाणेच हिज्कीया राजानेसुद्धा नम्रपणे पश्‍चात्ताप केला. (२ इति. ३२:२६) शेवटी यहोवाने त्याला “योग्य ते करत” राहणारा विश्‍वासू राजा म्हणून पाहिलं. (२ राजे १८:३) यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? आपण आपल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप केला पाहिजे आणि तीच चूक पुन्हा होऊ नये म्हणून जमेल ते केलं पाहिजे. पण जर आपल्याला मंडळीतल्या वडिलांकडून अगदी छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल सल्ला मिळाला तर काय? यहोवाने किंवा वडिलांनी आपल्याकडे पाठ फिरवली आहे असा आपण कधीच विचार करू नये. इस्राएलमधल्या चांगल्या राजांनासुद्धा सल्ल्याची आणि सुधारण्याची गरज पडली होती. (इब्री १२:६) त्यामुळे जेव्हा आपल्याला सुधारण्यात येतं तेव्हा आपण ते (१) नम्रपणे कबूल केलं पाहिजे, (२) गरज असलेले बदल केले पाहिजेत आणि (३) पूर्ण मनाने यहोवाची सेवा करत राहिली पाहिजे. आपण जेव्हा आपल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप दाखवतो तेव्हा यहोवा आपल्याला क्षमा करेल.—२ करिंथ. ७:९, ११. टेहळणी बुरूज२४.०७ २१ ¶८; २२ ¶९, ११

सोमवार, २८ सप्टेंबर

त्या दुष्टाला आपल्यामधून काढून टाका.—१ करिंथ. ५:१३.

जेव्हा पाप करणारा पश्‍चात्ताप करत नाही, तेव्हा त्याला मंडळीतून काढून टाकलं जातं. कारण पश्‍चात्ताप करण्यासाठी वडिलांनी वारंवार प्रयत्न करूनसुद्धा त्याने ती मदत नाकारलेली असते. (२ राजे १७:१२-१५) आणि त्याच्या कामांवरून दिसून येतं, की त्याने यहोवाच्या आज्ञा मोडायचं निवडलंय. (अनु. ३०:१९, २०) तो आता यहोवाचा साक्षीदार नाही हे मंडळीला कळावं म्हणून सभेमध्ये एक छोटीशी घोषणा केली जाते. पाप करणाऱ्‍याचा सर्वांसमोर अपमान करायला ही घोषणा केली जात नाही. याउलट, या घोषणेमुळे मंडळीला शास्त्रवचनांत दिलेला सल्ला पाळायला मदत होते. कारण बायबल म्हणतं, अशा व्यक्‍तीची “संगत सोडून द्या” आणि “त्याच्यासोबत जेवायलाही बसू नका.” (१ करिंथ. ५:९-११) यहोवाने हे मार्गदर्शन आपल्याच फायद्यासाठी दिलंय. प्रेषित पौलनेही म्हटलं: “थोडंसं खमीरसुद्धा पिठाच्या संपूर्ण गोळ्याला फुगवतं.” (१ करिंथ. ५:६) जे यहोवाच्या नीतिमान स्तरांनुसार चालायचा प्रयत्न करतात त्यांचा निर्धार अशा लोकांमुळे कमजोर होऊ शकतो.—नीति. १३:२०; १ करिंथ. १५:३३. टेहळणी बुरूज२४.०८ २७ ¶३-४

मंगळवार, २९ सप्टेंबर

जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सगळ्या गोष्टी करण्याची मला शक्‍ती मिळते.—फिलिप्पै. ४:१३.

आपण खरोखर दुसऱ्‍यांना आपली शक्‍ती किंवा ताकद देऊ शकत नाही, पण आपण त्यांच्यासाठी आपल्या ताकदीचा वापर करू शकतो. जसं की आपण वयस्कर किंवा आजारी भाऊबहिणींच्या घरची कामं करू शकतो किंवा त्यांना लागणारं सामान आणून देऊ शकतो. तसंच आपण राज्य सभागृहाच्या साफसफाईसाठी किंवा देखरेखीसाठी स्वतःहून पुढे येऊ शकतो. शब्दांत ताकद असते हेसुद्धा विसरू नका. तुम्हाला असं कोणी माहीत आहे का, ज्याला प्रोत्साहनाची गरज आहे? किंवा असं कोणी माहीत आहे का, ज्याला सांत्वनाची गरज आहे? असं असलं तर त्याच्याशी बोलण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्या. तुम्ही त्याला प्रत्यक्ष भेटू शकता किंवा त्याच्याशी फोनवर बोलू शकता. किंवा एखादं कार्ड, इमेल किंवा मेसेज पाठवू शकता. त्यात तुम्ही जे काही म्हणाल ते खूप भारी असण्याची गरज नाही. मनापासून आलेल्या प्रेमळ आणि साध्या शब्दांनीसुद्धा त्या व्यक्‍तीला खूप बरं वाटू शकतं. यामुळे त्याला पुढेही विश्‍वासू राहायला किंवा आहे त्या परिस्थितीत सकारात्मक राहायला मदत होईल.—नीति. १२:२५; इफिस. ४:२९. टेहळणी बुरूज२४.०९ २८ ¶८-१०

बुधवार, ३० सप्टेंबर

जर एखादा माणूस मंडळीत देखरेख करायला पात्र ठरण्यासाठी प्रयत्न करत असेल, तर तो चांगल्या कामाची इच्छा बाळगतो.—१ तीम. ३:१.

तुम्ही काही काळापासून मंडळीत सहायक सेवक म्हणून सेवा करत असाल, तर वडील म्हणून सेवा करण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी स्वतःमध्ये वाढवण्यासाठी तुम्ही नक्कीच मेहनत घेत असाल. मग या ‘चांगल्या कामाचं’ ध्येय ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? मंडळीतले वडील कोणकोणत्या जबाबदाऱ्‍या पार पाडत असतात याचा विचार करा. ते प्रचारात पुढाकार घेतात, मेंढपाळ भेटी घेतात आणि आपल्या वागण्या-बोलण्यातून मंडळीतल्या भाऊबहिणींचा विश्‍वासही मजबूत करतात. म्हणूनच बायबलमध्ये या मेहनती वडिलांना, “माणसांच्या रूपात भेटी” असं म्हटलं आहे. (इफिस. ४:८) मंडळीत वडील म्हणून सेवा करायला तुम्ही पात्र कसं ठरू शकता? वडिलांसाठी असलेल्या पात्रता आणि नोकरीसाठी असलेल्या पात्रता यात खूप फरक आहे. बाहेरच्या जगात बऱ्‍याचदा कामावरच्या ठिकाणी लागणारी मूलभूत कौशल्यं तुमच्याकडे असतील तर तुम्हाला अगदी सहज नोकरी मिळू शकते. पण तुम्हाला जर मंडळीत वडील म्हणून सेवा करायची असेल, तर तुमच्याकडे फक्‍त प्रचाराची आणि शिकवण्याची कौशल्यं असणं पुरेसं नाही. तर तुमच्यामध्ये १ तीमथ्य ३:१-७ आणि तीत १:५-९ मध्ये सांगितलेल्या पात्रता असणंही आवश्‍यक आहे. टेहळणी बुरूज२४.११ २० ¶१-३

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा