ऑगस्ट
शनिवार, १ ऑगस्ट
जगाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत आलं नाही असं मोठं संकट येईल.—मत्त. २४:२१.
आपली हीच प्रार्थना आहे, की जास्तीत जास्त लोकांनी आपला हा इशारा ऐकावा आणि आत्ताच शुद्ध उपासनेत आपल्यासोबत सामील व्हावं. पण सध्या जे लोक या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यांच्याबद्दल काय? जे लोक मोठ्या बाबेलचा नाश पाहिल्यानंतर यहोवावर विश्वास ठेवतील त्यांना वाचवण्याचा यहोवा कदाचित विचार करेल. जर असं असेल तर आपण हा इशारा त्यांना आत्ताच देणं खरंच किती महत्त्वाचं आहे. आपण आत्ता त्यांना काही सांगितलं तर त्या वेळी त्यांच्याकडे आठवण्यासाठी काहीतरी असेल. (यहेज्केल ३३:३३ सोबत तुलना करा.) कदाचित आपण त्यांना आत्ता जे काही सांगू त्या गोष्टी त्यांना आठवतील आणि खूप उशीर होण्याआधीच ते शुद्ध उपासना करण्यासाठी आपल्यात सामील होतील. बायबल काळात जेव्हा फिलिप्पैमध्ये “मोठा भूकंप झाला” तेव्हाच तुरुंगाच्या अधिकाऱ्याचं मन बदललं. कदाचित काही लोक आत्ता आपलं ऐकणार नाहीत. पण जगाला हादरून टाकणाऱ्या मोठ्या बाबेलच्या विनाशानंतर कदाचित त्यांचं मन बदलेल.—प्रे. कार्यं १६:२५-३४. टेहळणी बुरूज२४.०५ १७ ¶९-१०
रविवार, २ ऑगस्ट
ख्रिस्ताद्वारे नियमशास्त्र पूर्ण झालं.—रोम. १०:४.
प्रेषित पौलने इब्री ख्रिश्चनांना जे पत्र लिहिलं त्यातून आपण एक महत्त्वाचा धडा शिकू शकतो. त्या मंडळीतल्या काहींनी अजूनही आध्यात्मिक रितीने प्रगती केली नव्हती. ते “पुन्हा एकदा, जड [आध्यात्मिक] अन्नाची नाही, तर दुधाची गरज असलेल्यांसारखे” झाले होते. (इब्री ५:१२) मंडळीद्वारे यहोवा ज्या नवीन गोष्टी शिकवत होता त्या त्यांनी शिकून घेतल्या नव्हत्या आणि स्वीकारल्याही नव्हत्या. (नीति. ४:१८) उदाहरणार्थ, येशूच्या बलिदानामुळे ३० वर्षांआधीच मोशेचं नियमशास्त्र रद्द झालं होतं. तरीसुद्धा पूर्वी यहुदी असलेले काही ख्रिस्ती मोशेच्या नियमांवर अडून बसले होते. (तीत १:१०) त्यामुळे पौल त्यांना त्याने शिकवलेली गहन सत्यं समजून घ्यायला मदत करत होता. त्याच्या पत्रामुळे त्यांना यहोवाची उपासना करायची पद्धत समजून घ्यायला मदत झाली आणि त्यात येशूची काय भूमिका आहे हेसुद्धा चांगल्या प्रकारे समजलं. त्यामुळे त्यांना धैर्याने प्रचार करायला मदत झाली.—इब्री १०:१९-२३. टेहळणी बुरूज२४.०४ ६ ¶१५
सोमवार, ३ ऑगस्ट
नीतिमान आणि अनीतिमान अशा सगळ्या लोकांना मेलेल्यांतून उठवलं जाणार आहे.—प्रे. कार्यं २४:१५.
आदाम आणि हव्वाने सैतानासोबत मिळून यहोवाविरुद्ध बंड केलं, तेव्हापासून लाखो-करोडो लोकांचा मृत्यू झालाय. मग या लोकांना पुढे काही आशा आहे का? ख्रिस्ताच्या विश्वासू अनुयायांपैकी काही ठरावीक लोकांचं, म्हणजे १,४४,००० लोकांचं स्वर्गात अमर जीवनासाठी पुनरुत्थान केलं जाईल. (प्रकटी. १४:१) तसंच, यहोवावर प्रेम करणाऱ्या विश्वासू स्त्री-पुरुषांच्या मोठ्या लोकसमुदायाचा ‘नीतिमानांच्या पुनरुत्थानात’ समावेश असेल. आणि ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या काळात आणि शेवटच्या परीक्षेत जर ते नीतिमान राहिले, तर त्यांना या पृथ्वीवर कायम जगण्याची संधी मिळेल. (दानी. १२:१३; इब्री १२:१) पण जे “अनीतिमान” आहेत, अशांना हजार वर्षांच्या काळात त्यांचे मार्ग बदलण्याची आणि विश्वासूपणे यहोवाची सेवा करण्याची संधी दिली जाईल. या अनीतिमान लोकांमध्ये अशा लोकांचा समावेश होतो ज्यांनी यहोवाची सेवा कधीच केली नाही किंवा ज्यांनी ‘वाईट कामं केली’ होती. (योहा. ५:२९; लूक २३:४२, ४३) पण काही लोक इतके दुष्ट होते की यहोवाने त्यांचं पुनरुत्थान न करण्याचा निर्णय घेतलाय.—लूक १२:४, ५. टेहळणी बुरूज२४.०५ ३ ¶३; ५-६ ¶१५; ६-७ ¶१७
मंगळवार, ४ ऑगस्ट
हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, पण यांचं हृदय माझ्यापासून फार दूर आहे.—यश. २९:१३.
यहोवाने आपल्याला स्वीकारावं अशी जर आपली इच्छा असेल, तर आपण “मनातसुद्धा खरं” बोललं पाहिजे. (स्तो. १५:२) याचा अर्थ फक्त खोटं न बोलणं इतकाच नाही, तर आपण प्रत्येक बाबतीत प्रामाणिक राहावं असा होतो. आणि हीच यहोवाची इच्छा आहे. (इब्री १३:१८) हे महत्त्वाचंय, “कारण यहोवाला कपटी माणसाची घृणा वाटते, पण सरळ माणसाशी त्याची जवळची मैत्री असते.” (नीति. ३:३२) आपल्या ‘मनातसुद्धा खरं बोलणारी’ व्यक्ती फक्त लोकांसमोर देवाची आज्ञा पाळत नाही, तर एकटं असतानासुद्धा देवाची आज्ञा पाळते. ती कपटीपणे वागत नाही. याउलट, एक कपटी व्यक्ती यहोवाचे नियम आपल्या भल्याचे असतात यावर शंका घेऊ शकते. (याको. १:५-८) ती कदाचित स्वतःला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत नाहीत, त्याबाबतीत देवाच्या आज्ञा पाळणार नाही. आणि मग त्याचा काही वाईट परिणाम होत नाही, असं तिला दिसू लागतं तेव्हा ती आणखी गंभीर गोष्टींमध्ये देवाच्या आज्ञा मोडायचं धाडस करू लागते. मग तिची उपासना ही फक्त उपासना राहत नाही, तर ढोंगीपणा बनतो. (उप. ८:११) पण आपल्याला मात्र या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत प्रामाणिक राहायचं आहे. टेहळणी बुरूज२४.०६ १० ¶७-८
बुधवार, ५ ऑगस्ट
आपल्या कंबरेभोवती सत्याचा पट्टा बांधा आणि स्थिर उभे राहा.—इफिस. ६:१४.
आपलं देवाच्या वचनात असलेल्या सत्यावर प्रेम आहे आणि आपला विश्वास त्यावरच आधारलेला आहे. (रोम. १०:१७) “सत्याचा स्तंभ आणि आधार” म्हणून यहोवाने ख्रिस्ती मंडळीची स्थापना केली आहे, असं आपण मानतो. (१ तीम. ३:१५) जेव्हा बायबलवरचा किंवा देवाच्या संघटनेद्वारे मिळणाऱ्या मार्गदर्शनावरचा आपला भरवसा कमी होतो, तेव्हा सैतानाला खूप आनंद होतो. (इफिस. ४:१४) लवकरच सैतान, लोकांना सहज पटतील अशा खोट्या गोष्टी पसरवून सगळ्या राष्ट्रांतल्या लोकांना यहोवाच्या विरोधात उभं राहायला भाग पाडेल. (प्रकटी. १६:१३, १४) तसंच, तो देवाच्या लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आणखी जास्त करेल, हे आपल्याला माहीत आहे. (प्रकटी. १२:९) त्यामुळे सत्य आणि असत्य यांतला फरक ओळखण्यासाठी आणि सत्याचं पालन करत राहण्यासाठी स्वतःला प्रशिक्षण देणं महत्त्वाचंय. (रोम. ६:१७; १ पेत्र १:२२) मोठ्या संकटात आपण वाचू की नाही हे या गोष्टीवरच अवलंबून आहे! टेहळणी बुरूज२४.०७ ८-९ ¶१-३
गुरुवार, ६ ऑगस्ट
मी तुम्हाला देत असलेली आज्ञा तुमच्यासाठी कठीण नाही किंवा तुमच्यापासून फार दूरही नाही.—अनु. ३०:११.
यहोवाने इस्राएली लोकांना एक राष्ट्र म्हणून संघटित केलं. त्याने त्यांच्याशी एक करार केला. जर त्यांनी या करारातले कायदे पाळले असते, तर त्याने त्यांचं संरक्षण केलं असतं आणि त्यांना आशीर्वाद दिला असता. पण जर त्यांनी त्याच्या कायद्याचं पालन केलं नाही आणि इतर देवांची उपासना केली, तर तो त्यांचं संरक्षण करणार नव्हता. आणि त्यांना दुःख भोगावं लागणार होतं. पण असं असलं तरी, ते पुन्हा देवाची पसंती मिळवू शकणार होते. ते आपला ‘देव यहोवा याच्याकडे परत येऊ शकत होते आणि त्याचं ऐकू शकत होते.’ (अनु. ३०:१-३, १७-२०) दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, ते पश्चात्ताप करू शकत होते. आणि जर त्यांनी तसं केलं, तर यहोवा त्यांच्याशी नातं जोडणार होता आणि पुन्हा त्यांना आशीर्वाद देणार होता. पण, यहोवाने निवडलेल्या या लोकांनी वारंवार त्याच्याविरुद्ध बंड केलं. याचा परिणाम असा झाला, की त्यांना दुःख भोगावं लागलं. पण या भरकटलेल्या लोकांना यहोवा देवाने असंच सोडून दिलं नाही. त्यांनी पश्चात्ताप करावा आणि त्याच्याकडे परत यावं, म्हणून तो सतत आपल्या संदेष्ट्यांना त्यांच्याकडे पाठवत राहिला.—२ राजे १७:१३, १४. टेहळणी बुरूज२४.०८ ९ ¶४-५
शुक्रवार, ७ ऑगस्ट
यरुशलेम इथे असलेल्या मंडळीविरुद्ध छळाची लाट उसळली.—प्रे. कार्यं ८:१.
यरुशलेममध्ये आणि यहूदीयामध्ये राहणाऱ्या इब्री ख्रिश्चनांना येशूच्या मृत्यूनंतर कठीण काळाचा सामना करावा लागला. ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाल्यानंतर लगेचच त्यांना भयंकर छळाचा सामना करावा लागला. मग जवळपास २० वर्षांनी कदाचित देशात पडलेल्या दुष्काळामुळे ख्रिस्ताच्या अनुयायांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. (प्रे. कार्यं ११:२७-३०) पण जवळपास इ.स. ६१ मध्ये ख्रिश्चनांना भविष्यात येणाऱ्या काळाच्या तुलनेत काही प्रमाणात शांतीचा काळ अनुभवायला मिळाला. याच काळात त्यांना देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं एक पत्र प्रेषित पौलकडून मिळालं. आणि हे पत्र त्या वेळेसाठी अगदी योग्य होतं. कारण ते ज्या शांतीचा अनुभव घेत होते ती जास्त काळ राहणार नव्हती. पौलने दिलेल्या व्यावहारिक सल्ल्यामुळे त्यांना लवकरच येणाऱ्या संकटाचा धीराने सामना करायला मदत होणार होती. टेहळणी बुरूज२४.०९ ८ ¶१-२
शनिवार, ८ ऑगस्ट
त्यांनी मला खूप सांत्वन दिलं आहे.—कलस्सै. ४:११.
जेव्हा आपण दुःख सहन करत असतो, तेव्हा आपल्या भाऊबहिणींद्वारेच यहोवा आपल्यावर असलेलं त्याचं प्रेम दाखवतो. भाऊबहीण सहानुभूतीने आपलं ऐकून घेतात किंवा आपल्यासोबत राहून ते आपल्याला आधार देत असतात. ते कदाचित दिलासा देणारं एखादं वचन आपल्याला दाखवतील किंवा आपल्यासोबत प्रार्थना करतील. (रोम. १५:४) कधीकधी एखादा भाऊ किंवा बहीण आपल्याला यहोवाच्या दृष्टिकोनातून विचार करायला मदत करेल. त्यामुळे आपल्याला नेहमी धीर धरायला मदत होईल. यासोबतच भाऊबहीण आपल्याला काही व्यावहारिक मार्गांनी, जसं की आपण संकटात असताना आपल्याला जेवण पुरवून मदत करतात. आपल्याला भाऊबहिणींकडून मदत हवी असेल तर आपण ती मागितली पाहिजे. (नीति. १७:१७) आपल्याला कसं वाटतंय आणि आपल्याला कशाची गरज आहे, हे त्यांना कदाचित माहीत नसेल. (नीति. १४:१०) म्हणून अशा एखाद्या प्रौढ भावाशी किंवा बहिणीशी बोला जे तुम्हाला समजून घेतील. तुम्हाला कशाची गरज आहे, हे त्यांना सांगा. तुम्हाला कदाचित अशा एक-दोन वडिलांशी बोलावंसं वाटेल, ज्यांच्यासमोर तुम्हाला मन मोकळं करता येईल. काही बहिणींना मंडळीतल्या काही प्रौढ बहिणींसोबत बोलायला जास्त सोपं गेलंय. टेहळणी बुरूज२४.१० १०-११ ¶१५-१६
रविवार, ९ ऑगस्ट
जो मुलाला ओळखून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सर्वकाळाचं जीवन [मिळेल].—योहा. ६:४०.
आज बरेच लोक सुदृढ राहायला आपल्या खाण्या-पिण्याकडे लक्ष देतात आणि नियमितपणे व्यायाम करतात. पण हे सगळं करूनसुद्धा त्यांना माहीत असतं, की ते म्हातारपण आणि मरण टाळू शकत नाहीत. तसंच, म्हातारपणात ज्या समस्या येतात त्यांचा विचार करून त्यांना कायमचं जीवन नकोसं वाटतं आणि असं वाटतं की ते त्यांना मिळूच शकत नाही. असं असलं तरी, येशूने योहान ३:१६ आणि ५:२४ या वचनांमध्ये सांगितलं, की आपण “सर्वकाळाचं जीवन” जगू शकतो. येशूने चमत्कार करून हजारो लोकांना खायला भाकरी आणि मासे दिले होते. ही खरोखरंच एक आश्चर्य करण्यासारखी घटना होती. पण याच्या दुसऱ्या दिवशी येशू जे बोलला ते त्यापेक्षा जास्त आश्चर्यकारक होतं. लोक त्याच्या मागेमागे गालीलच्या किनाऱ्याजवळ असलेल्या कफर्णहूमला गेले. तिथे त्याने त्यांना सांगितलं की मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत केलं जाईल आणि त्यांना सर्वकाळाचं जीवन मिळेल. (योहा. ६:३९, ४०) येशूच्या शब्दांमुळे आपल्याला कळतं, की मेलेल्या असंख्य लोकांना पुन्हा जिवंत केलं जाईल. तसंच, आपल्या प्रियजनांसोबत आपल्याला आनंदाने सर्वकाळाचं जीवन जगता येईल. टेहळणी बुरूज२४.१२ ८-९ ¶१-२
सोमवार, १० ऑगस्ट
पतींनो आपापल्या पत्नीसोबत विचारशीलपणे राहा. त्या स्त्रिया असल्यामुळे, जास्त नाजूक भांड्यांसारख्या आहेत हे ओळखून त्यांना मान द्या.—१ पेत्र ३:७.
अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने एक रिपोर्ट सादर केला. त्यात असं सांगितलंय, की बरेच पती आपल्या पत्नीला मारहाण करतात, त्यांना घालूनपाडून बोलतात किंवा भावनिक रितीने त्यांचं शोषण करतात. जो पती आपल्या पत्नीशी असं वागतो तो कदाचित चारचौघांत तिला आदराने वागवत असेल, पण घरी तिचा छळ करत असेल. कोणत्या कारणांमुळे एक पती आपल्या पत्नीचा छळ करत असेल? कदाचित त्याचे वडील हिंसक असतील. त्यामुळे त्याला वाटू शकतं की अशा प्रकारचं वागणं चुकीचं नाही. किंवा काही संस्कृतींमध्ये असं शिकवलं जातं की “खरा मर्द” तोच असतो जो आपल्या बायकोला मुठीत ठेवतो. तर काही पुरुषांना लहानपणी आपल्या भावनांवर ताबा ठेवायला शिकवलेलं नसतं आणि म्हणून ते आपल्या रागावरही ताबा ठेवू शकत नाही. तसंच, काही पतींना पोर्नोग्राफी पाहायची सवय असते. त्यामुळे स्त्रियांबद्दल आणि शारीरिक संबंध ठेवण्याबद्दल त्यांचा दृष्टिकोन चुकीचा होऊ शकतो. इतकंच काय, तर काही रिपोर्टप्रमाणे कोव्हिड-१९ च्या महामारीनंतर या सगळ्या समस्या आणखीनच वाढल्या आहेत. पण यांपैकी कोणतंही कारण सांगून पती आपल्या पत्नीशी वाईट वागू शकत नाही. टेहळणी बुरूज२५.०१ ८-९ ¶२-३
मंगळवार, ११ ऑगस्ट
ख्रिस्ताने शरीरात दुःख सोसलं, त्यामुळे तुम्हीसुद्धा त्याच्यासारखीच मनोवृत्ती ठेवायला तयार असा.—१ पेत्र ४:१.
“तू आपला देव, यहोवा याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने, पूर्ण शक्तीने आणि पूर्ण बुद्धीने प्रेम कर.” (लूक १०:२७) असं बोलून येशूने स्पष्ट केलं की ही आज्ञा नियमशास्त्रातली सगळ्यात महत्त्वाची आज्ञा आहे. लक्ष द्या की आपण पूर्ण मनाने यहोवावर प्रेम केलं पाहिजे. त्यात आपल्या इच्छा आणि आपल्या भावना सामील आहेत. तसंच, आपण पूर्ण जिवाने आणि पूर्ण शक्तीने प्रेम केलं पाहिजे. पण आपण पूर्ण बुद्धीनेही यहोवावर प्रेम केलं पाहिजे. यात एखाद्या गोष्टीबद्दल आपण कसा विचार करतो हे सामील आहे. हे खरंय, की यहोवा कसा विचार करतो हे आपण कधीच पूर्णपणे समजून घेऊ शकत नाही. पण “ख्रिस्ताचं मन” समजून घेतल्यामुळे यहोवा कसा विचार करतो हे आपल्याला बऱ्यापैकी समजून घेता येईल, कारण येशू अगदी हुबेहूब त्याच्यासारखा विचार करतो.—१ करिंथ. २:१६. टेहळणी बुरूज२५.०३ ८ ¶१
बुधवार, १२ ऑगस्ट
त्याच्याच महान अशा अपार कृपेमुळे, आपल्याला त्याच्या प्रिय मुलाच्या रक्ताद्वारे खंडणी देऊन मुक्त करण्यात आलं आहे. म्हणजेच, आपल्या पापांची क्षमा झाली आहे.—इफिस. १:७.
पाप करण्याआधी आदाम जसा होता तसाच येशू परिपूर्ण होता. (१ करिंथ. १५:४५) म्हणून येशू स्वतःच्या जीवाचं बलिदान देऊन आदामच्या पापाचं प्रायश्चित्त करू शकला. म्हणजेच आदामने जे गमावलं होतं त्याची भरपाई करू शकला. (रोम. ५:१९) अशा प्रकारे येशू “शेवटला आदाम” बनला. त्यामुळे आदामने जे गमावलं त्याची किंमत चुकवण्यासाठी दुसऱ्या परिपूर्ण व्यक्तीला यायची आणि त्याची भरपाई करायची गरज नव्हती. कारण येशू “सर्वकाळासाठी एकदाच” मरण पावला. (इब्री ७:२७; १०:१२) तर मग प्रायश्चित्ताची व्यवस्था आणि खंडणी यात काय फरक आहे? आपल्या सगळ्यांचं देवासोबत असलेलं नातं पुन्हा पहिल्यासारखं व्हावं म्हणून देवाने केलेलं कार्य म्हणजे प्रायश्चित्ताची व्यवस्था. तसंच, पापी माणसांना हे प्रायश्चित्त करणं शक्य व्हावं म्हणून दिलेली किंमत म्हणजे खंडणी. आणि खंडणीची ही किंमत म्हणजे येशूने आपल्या सगळ्यांसाठी ओतलेलं त्याचं मौल्यवान रक्त आहे.—इब्री ९:१४. टेहळणी बुरूज२५.०२ ४-५ ¶१२-१३
गुरुवार, १३ ऑगस्ट
देव विश्वासू आहे आणि तुम्ही सहन करू शकणार नाही अशी एकही परीक्षा तो तुमच्यावर येऊ देणार नाही. तर, परीक्षेच्या वेळी तिच्यातून बाहेर पडायचा मार्गही तो तयार करेल, म्हणजे तुम्हाला ती सहन करता येईल.—१ करिंथ. १०:१३.
यहोवाकडे एक जिवंत व्यक्ती म्हणून पाहिल्यामुळे आपल्याला आपल्या परीक्षांकडे योग्य दृष्टिकोनातून बघायला मदत होते. ते कसं? कारण त्यामुळे आपल्या परीक्षा, यहोवा आणि सैतानामध्ये असलेल्या एका मोठ्या वादाचा भाग आहेत, या दृष्टिकोनातून आपण त्यांच्याकडे बघू. सैतान असा दावा करतो, की जेव्हा आपल्यावर संकटं येतात तेव्हा आपण यहोवाला सोडून देऊ. (ईयो. १:१०, ११; नीति. २७:११) पण जेव्हा आपण परीक्षांचा यशस्वीपणे सामना करतो तेव्हा आपण यहोवावर प्रेम असल्याचं दाखवत असतो आणि हे सिद्ध करत असतो की सैतान खोटा आहे. तुम्हाला सरकारकडून विरोध होतोय का? आर्थिक अडचणी आहेत का? प्रचारात लोक तुमचं ऐकत नाहीत का? किंवा तुम्हाला यांसारख्या इतर कुठल्या समस्या आहेत का? जर असतील तर हे लक्षात ठेवा, की तुमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला यहोवाचं मन आनंदित करायची संधी मिळत आहे. हेही लक्षात ठेवा, की यहोवा तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त परीक्षा तुमच्यावर कधीच येऊ देणार नाही. उलट, ते सहन करायची ताकद तो तुम्हाला देईल. टेहळणी बुरूज२४.०६ २२ ¶९
शुक्रवार, १४ ऑगस्ट
प्रत्येक जण स्वतःच्याच इच्छेमुळे ओढला जाऊन भुलवला जातो तेव्हा परीक्षेत पडतो.—याको. १:१४.
तुम्ही कोणत्या बाबतीत मोहाला सहज बळी पडू शकता, हे तुम्हाला माहीत आहे का? स्वतःच्या कमतरतांना नाकारून किंवा माझ्या हातून काहीच चुकीचं होणार नाही असा विचार करून आपण स्वतःला फसवत असतो. (१ योहा. १:८) पौलने काय म्हटलं त्याकडे लक्ष द्या. त्याने म्हटलं की “ज्यांच्याकडे देवाने ठरवलेल्या पात्रता आहेत” ते जर सावध राहिले नाहीत तर ते मोहाला बळी पडू शकतात. (गलती. ६:१) म्हणून आपण स्वतःसोबत प्रामाणिक असलं पाहिजे आणि ज्या कमतरतांमुळे आपण मोहाला बळी पडू शकतो त्या मान्य केल्या पाहिजेत. (२ करिंथ. १३:५) आपण कोणत्या बाबतीत मोहाला सहज बळी पडू शकतो हे एकदा आपल्याला कळलं, तर मग आपण काय केलं पाहिजे? त्या मोहांचा सामना करण्यासाठी आपण स्वतःला बळकट करू शकतो. उदाहरणार्थ, बायबल काळात, शहराच्या भिंतींचा सगळ्यात असुरक्षित भाग म्हणजे त्यांची फाटकं होती. आणि म्हणून त्या फाटकांवर जबरदस्त पहारा असायचा. त्याचप्रमाणे आपणसुद्धा सहज मोहाला बळी पडू अशा परिस्थितींकडे खास लक्ष दिलं पाहिजे.—१ करिंथ. ९:२७. टेहळणी बुरूज२४.०७ १५ ¶५-७
शनिवार, १५ ऑगस्ट
तुम्ही प्रत्येक चांगल्या कार्याचं फळ उत्पन्न करत राहावं आणि देवाच्या अचूक ज्ञानात वाढत जावं.—कलस्सै. १:१०.
आजच्या दैनिक वचनात सांगितलेल्या चांगल्या कार्यांमध्ये आनंदाचा संदेश सांगणंही सामील आहे. त्यामुळे जेव्हा आपण देवाचं वचन वाचतो आणि त्यावर मनन करतो, तेव्हा यहोवावरचा आपला भरवसा वाढतो आणि राज्याचा संदेश सांगणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला आणखी स्पष्ट होतं. देवाच्या वचनातून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी ते वाचताना, त्याचा अभ्यास करताना आणि त्यावर मनन करताना घाई करू नका. जर तुम्हाला एखादं वचन समजत नसेल, तर लगेच पुढच्या वचनावर जाऊ नका. तर वॉच टॉवर पब्लिकेशन्स इंडेक्स किंवा यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक यांचा वापर करून त्या वचनाबद्दल आणखी माहिती मिळवा. देवाच्या वचनाचा अभ्यास करताना वेळ दिल्यामुळे देवाचं वचन खरंय, यावरचा तुमचा भरवसा आणखी वाढेल. (१ थेस्सलनी. ५:२१) आणि तुमचा भरवसा जितका वाढेल, तितकाच त्याबद्दल इतरांना सांगायला तुम्हाला आनंद होईल. टेहळणी बुरूज२४.०४ १५ ¶४-५
रविवार, १६ ऑगस्ट
तुम्हाला पत्र लिहायचं कारण म्हणजे, तुम्ही सगळ्या बाबतींत आज्ञा पाळाल की नाही, हे मला पाहायचं होतं.—२ करिंथ. २:९.
दावीदने म्हटलं: यहोवा “चांगला आणि क्षमाशील आहे.” (स्तो. ८६:५) मीखाने लिहिलं: “तुझ्यासारखा देव कोण आहे? तू अपराधांची क्षमा करतोस आणि . . . पापांची तू आठवण ठेवत नाहीस.” (मीखा ७:१८) यशयानेही म्हटलं: “दुष्ट माणसाने आपला दुष्ट मार्ग सोडून द्यावा, आणि वाईट माणसाने आपले वाईट विचार सोडून द्यावेत; त्याने यहोवाकडे परत यावं, म्हणजे तो त्याच्यावर दया करेल, त्याने आमच्या देवाकडे परत यावं, कारण तो मोठ्या मनाने क्षमा करेल.” (यश. ५५:७) यहोवासारखं वागण्यासाठी करिंथमधल्या भाऊबहिणींना पश्चात्ताप करणाऱ्या माणसाचं मंडळीत पुन्हा स्वागत करायला सांगितलं होतं आणि त्याला आपल्या प्रेमाची खातरी करून द्यायची होती. त्या सूचना त्यांनी पाळल्या. अशा प्रकारे त्यांनी “सगळ्या बाबतींत आज्ञा” पाळल्या आहेत हे दाखवून दिलं. हे खरंय, की या माणसाला मंडळीतून काढून काहीच महिने झाले होते. पण, त्याला मिळालेल्या ताडनामुळे त्याला पश्चात्ताप करायला मदत झाली होती. म्हणून त्याला मंडळीत पुन्हा घेण्यासाठी उशीर करण्यात काहीच अर्थ नव्हता. टेहळणी बुरूज२४.०८ १७-१८ ¶१२-१३
सोमवार, १७ ऑगस्ट
एकाला घेतलं जाईल आणि दुसऱ्याला सोडून दिलं जाईल.—मत्त. २४:४०.
आज आपण एका रोमांचक काळात जगत आहोत. लवकरच येशू प्रत्येक व्यक्तीचा न्याय करेल. या न्यायाच्या आधी कोणकोणत्या घडामोडी घडतील हे त्याने सांगितलंय. त्यासाठी त्याने शिष्यांना त्याच्या अदृश्य उपस्थितीचं आणि जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीचं “चिन्ह” दिलं. (मत्त. २४:३) या चिन्हाबद्दल आपल्याला मत्तयच्या २४ आणि २५ अध्यायात, तसंच मार्कच्या १३ आणि लूकच्या २१ अध्यायात वाचायला मिळतं. येशूने तीन दाखल्यांचा वापर करून आपल्याला इशारे दिले आहेत आणि तयार राहायला मदत केली आहे. त्याने मेंढरं आणि बकऱ्या, समजदार आणि मूर्ख कुमारी, तसंच तालान्तांचा दाखला दिलाय. एका व्यक्तीच्या वागण्यावरून तिचा न्याय केला जाईल, ही गोष्ट या प्रत्येक दाखल्यातून आपल्याला कळते. टेहळणी बुरूज२४.०९ २० ¶१-२
मंगळवार, १८ ऑगस्ट
तुम्ही जे काही करता ते सगळं प्रेमाने करा.—१ करिंथ. १६:१४.
येशू ख्रिस्ताचं आपल्यासमोर सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. त्याने जे काही केलं ते पित्यावरच्या आणि लोकांवरच्या प्रेमापोटी केलं. या प्रेमामुळेच तो इतरांसाठी भरपूर मेहनत घ्यायला आणि इतरांच्या दृष्टीने हलकी समजली जाणारी कामं करायलाही तयार होता. (मत्त. २०:२८; योहा. १३:५, १४, १५) भावांनो, जर तुमचं भाऊबहिणींवर प्रेम असेल, तर यहोवा तुम्हाला आशीर्वाद देईल आणि आध्यात्मिक ध्येयं गाठायला तुम्हाला मदत करेल. जसं की, सहायक सेवक बनण्यासाठी पात्र ठरणं. (१ पेत्र ५:५) आपण कोणीतरी खूप महत्त्वाचे आहोत असं जे लोक भासवायचा प्रयत्न करतात त्यांची जगामध्ये खूप प्रशंसा केली जाते. पण यहोवाच्या संघटनेत असं होत नाही. जो भाऊ येशूसारखं इतरांवर प्रेम करतो त्याला कधीही सत्तेची, इतरांवर अधिकार गाजवायची किंवा प्रतिष्ठेची हाव नसते. पण अशी हाव असलेल्या व्यक्तीला मंडळीत सहायक सेवक म्हणून नेमलं गेलं, तर यहोवाच्या मौल्यवान मेंढरांची काळजी घेण्यासाठी जी छोटी-छोटी कामं करावी लागतात, ती करायला तो कदाचित तयार होणार नाही. कारण ही कामं आपल्या प्रतिष्ठेला शोभणारी नाहीत असं त्याला वाटेल.—योहा. १०:१२. टेहळणी बुरूज२४.११ १५-१६ ¶६-७
बुधवार, १९ ऑगस्ट
पवित्र शक्तीने तुम्हाला त्यांच्यावर देखरेख करणारे म्हणून नेमलंय.—प्रे. कार्यं २०:२८.
संपूर्ण जगभरात “माणसांच्या रूपात भेटी” म्हणून सेवा करण्यासाठी भावांची खूप जास्त गरज आहे. (इफिस. ४:८) तुम्ही बाप्तिस्मा घेतला असेल तर ‘इतरांचं भलं करण्याची तुमच्यात ताकद’ आहे का? (नीति. ३:२७) तुम्ही सहायक सेवक म्हणून जबाबदारी पार पाडण्यासाठी पात्र ठरू शकता का? वडील म्हणून सेवा करून तुम्ही तुमच्या भाऊबहिणींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करू शकता का? सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेचा अर्ज भरता यावा म्हणून तुम्ही तुमच्या परिस्थितीत काही फेरबदल करू शकता का? येशूने तुमचा पूर्णपणे वापर करावा म्हणून ही प्रशाला तुम्हाला तयार करेल. पण आपण अजून पात्र नाही असं जर तुम्हाला वाटत असेल, तर यहोवाला प्रार्थना करा. तुम्हाला दिलेली कोणतीही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडता यावी म्हणून त्याच्याजवळ पवित्र शक्ती मागा. (लूक ११:१३) येशू “माणसांच्या रूपात भेटी” म्हणून ज्या भावांचा उपयोग करत आहे, त्यामुळे या शेवटच्या काळात तोच आपलं नेतृत्व करत असल्याचा पुरावा आपल्याला मिळतो. (मत्त. २८:२०) मग अशा भावांची तरतूद करणाऱ्या प्रेमळ, उदार आणि काळजी असणाऱ्या राजाचे आपण आभार मानू नयेत का? टेहळणी बुरूज२४.१० २३ ¶१६-१७
गुरुवार, २० ऑगस्ट
जुन्या गोष्टी कोणालाही आठवणार नाहीत.—यश. ६५:१७.
ज्या गोष्टींमुळे देवाच्या लोकांना दुःख आणि त्रास सहन करावा लागतो त्या गोष्टींबद्दल काय? कालांतराने त्या गोष्टी ‘आठवणीत राहणार नाहीत, त्या देवाच्या नजरेआड केल्या जातील.’ (यश. ६५:१६) यहोवा आपल्या सगळ्या समस्या काढून टाकेल आणि काळाच्या ओघात त्यांच्या आठवणींमुळे होणारं दुःखही नाहीसं केलं जाईल. आपण आजसुद्धा जेव्हा सभांना जातो तेव्हा आपलं मन शांत होतं. तिथे आपण या दुष्ट जगाच्या चिंता मागे टाकून निश्चिंत होऊ शकतो. आपण जेव्हा पवित्र शक्तीच्या फळांच्या गुणांपैकी प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता आणि दयाळूपणा हे गुण दाखवतो तेव्हा आपण या आध्यात्मिक नंदनवनाच्या शांतीला हातभार लावत असतो. (गलती. ५:२२, २३) खरंच देवाच्या संघटनेत राहणं हा आपल्यासाठी किती मोठा आशीर्वाद आहे! जे या आध्यात्मिक नंदनवनात राहायची निवड करतात ते “नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी” हे देवाचं अभिवचन पूर्ण होताना पाहतील. टेहळणी बुरूज२४.०४ २२ ¶९-१०
शुक्रवार, २१ ऑगस्ट
विचार न करताच, “हे पवित्र आहे,” असं म्हणणं आणि केलेल्या नवसाबद्दल नंतर विचार करणं, माणसासाठी पाश ठरू शकतं.—नीति. २०:२५.
डेटींगचा काळ जरी आनंदाचा असला, तरी तो तितकाच गंभीरसुद्धा आहे. कारण त्यामुळे एक मुलगा आणि मुलगी लग्न करायचं, की नाही या गोष्टीविषयी निर्णय घेतात. लग्नाच्या दिवशी हे जोडपं यहोवासमोर अशी शपथ घेतं, की जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत ते एकमेकांवर प्रेम करतील आणि एकमेकांचा आदर करतील. अशा प्रकारची कोणतीही शपथ घेण्याआधी काळजीपूर्वक विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. डेटींगमुळे एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून घेता येतं आणि योग्य निर्णय घेता येतो. डेटींग करणारे एकतर लग्न करायचा निर्णय घेतील किंवा डेटींग (कोर्टशिप) तिथेच थांबवायचा निर्णय घेतील. मुलाने आणि मुलीने डेटींग तिथेच थांबवायचा (ब्रेकअपचा) निर्णय घेतला, तर डेटींग यशस्वी झाली नाही असं म्हणता येणार नाही. उलट डेटींगचा हेतू साध्य झाला असं म्हणता येईल. कारण यामुळे त्या दोघांना एक चांगला निर्णय घ्यायला मदत झाली. डेटींगबद्दल योग्य दृष्टिकोन असणं का गरजेचं आहे? जर एखाद्या अविवाहित मुलाचा किंवा मुलीचा डेटींगबद्दल योग्य दृष्टिकोन असेल, तर ते अशा व्यक्तीसोबत डेटींग करणार नाही जिच्याशी त्यांना लग्न करायचं नाही. टेहळणी बुरूज२४.०५ २६-२७ ¶३-४
शनिवार, २२ ऑगस्ट
आपल्या प्रभूबद्दल साक्ष देण्याची लाज बाळगू नकोस.—२ तीम. १:८.
कधीकधी आपल्या मुलांना आपल्या विश्वासाबद्दल इतरांना सांगायला भीती वाटू शकते. उदाहरणार्थ, आपण उत्क्रांतीवर विश्वास का करत नाही हे वर्गात सांगायला त्यांना भीती वाटत असेल. का बरं? कारण शिक्षक कदाचित उत्क्रांतीचा विषय अशा प्रकारे शिकवत असतील की ती सिद्ध झालेली गोष्ट आहे. तर मग अशा वेळी आईवडिलांनो, तुम्ही तुमच्या मुलांना आपल्या विश्वासाबद्दल ठामपणे सांगायला कशी मदत करू शकता? निर्माणकर्त्यावर आपला विश्वास आहे याबद्दल तुमच्या मुलाला लाज वाटून घ्यायची गरज नाही, याची त्यांना खातरी करून द्या. कारण बरेच वैज्ञानिकसुद्धा हे मानतात, की सजीव सृष्टी आपोआप आली नाही. या सृष्टीतल्या जटिल रचनेमागे नक्कीच एक बुद्धिमान निर्माणकर्ता असावा असं त्यांना वाटतं. त्यामुळे तेसुद्धा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत स्वीकारत नाहीत. मग निर्माणकर्त्यावरचा विश्वास वाढवायला तुमची मुलं काय करू शकतात? ज्या भाऊबहिणींचा आधी निर्माणकर्त्यावर विश्वास नव्हता त्यांच्याशी या विषयावर ते बोलू शकतात आणि कोणत्या गोष्टींमुळे त्या भाऊबहिणींना विश्वास ठेवायला मदत झाली यावर ते विचार करू शकतात. टेहळणी बुरूज२४.१२ १७-१८ ¶१४-१५
रविवार, २३ ऑगस्ट
पवित्र शक्तीद्वारे त्याला खूप आनंद झाला.—लूक १०:२१.
येशूला नेहमी ही आशा होती की त्याला त्याचा संदेश ऐकणारे लोक भेटतील. यामुळेच तो आवेशाने प्रचार करू शकला. उदाहरणार्थ, इ.स. ३० च्या शेवटीशेवटी येशूने पाहिलं की बरेच जण त्याचा संदेश ऐकत आहेत. त्याने त्यांची तुलना कापणीसाठी तयार असलेल्या शेतासोबत केली. (योहा. ४:३५) या घटनेच्या एका वर्षांनंतर, त्याने आपल्या शिष्यांना सांगितलं: “पीक तर भरपूर आहे.” (मत्त. ९:३७, ३८) यानंतर पुन्हा एकदा त्याने असं म्हटलं: “पीक तर भरपूर आहे . . . म्हणून, पिकाच्या मालकाने कापणी करायला कामकरी पाठवावेत अशी त्याला विनंती करा.” (लूक १०:२) लोक आनंदाचा संदेश ऐकतील अशी येशूने नेहमी आशा ठेवली आणि जेव्हा लोकांनी त्याचं ऐकलं तेव्हा त्याला आनंद झाला. येशूने आपल्या शिष्यांना शिकवलं की त्यांनी प्रचार केल्यामुळे खूप चांगले परिणाम पाहायला मिळतील. यामुळे त्यांना प्रचारातला आवेश टिकवून ठेवायला मदत झाली. टेहळणी बुरूज२५.०३ १८-१९ ¶१५-१६
सोमवार, २४ ऑगस्ट
माझा देव मला आश्रय देणारा खडक आहे.—स्तो. ९४:२२.
यहोवा सुरक्षित आश्रय आहे. ज्याप्रमाणे एका भयंकर वादळापासून लपून राहायला एका व्यक्तीला खडकाचा किंवा खडकाच्या गुहेचा आश्रय मिळतो, त्याचप्रमाणे धोकादायक परिस्थितीत यहोवा आपलं संरक्षण करतो. म्हणजे तो त्याच्यासोबतचं आपलं नातं जपायला आपल्याला मदत करतो. तसंच, आपल्याला अशी खातरी देतो की आज जरी आपल्याला त्रास सहन करावा लागला तरी त्यामुळे आपलं कायमचं नुकसान होणार नाही. इतकंच नाही, तर तो असंही वचन देतो की भविष्यात आपल्या शांती आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तो काढून टाकेल. (यहे. ३४:२५, २६) एका खडकासारखं यहोवाला आपला आश्रय बनवण्याचा एक मार्ग म्हणजे त्याला प्रार्थना करणं. जेव्हा आपण त्याला प्रार्थना करतो, तेव्हा तो आपल्याला त्याची “शांती” देतो आणि त्यामुळे आपल्या मनाचं आणि बुद्धीचं रक्षण होतं. (फिलिप्पै. ४:६, ७) यहोवा आपल्या मदतीसाठी नेहमी आपल्यामागे स्थिर उभा असतो. आपण त्याच्यावर भरवसा ठेवू शकतो कारण तो “सर्वकाळ टिकून राहणारा खडक आहे.” (यश. २६:३, ४) त्याने दिलेली अभिवचनं पूर्ण करण्यासाठी, आपल्या प्रार्थना ऐकण्यासाठी आणि आपल्याला आवश्यक असलेली मदत पुरवण्यासाठी तो नेहमी जिवंत असेल. त्याची सेवा करणाऱ्यांसोबत तो एकनिष्ठ असल्यामुळेसुद्धा आपण त्याच्यावर अवलंबून राहू शकतो. (२ शमु. २२:२६) आपण जे काही करतो ते तो कधीच विसरणार नाही आणि तो आपल्याला नेहमीच त्याचं प्रतिफळ देईल.—इब्री ६:१०; ११:६. टेहळणी बुरूज२४.०६ २७ ¶४-६
मंगळवार, २५ ऑगस्ट
आपल्या हृदयाचं रक्षण कर, कारण त्यातूनच जीवनाचे झरे फुटतात.—नीति. ४:२३.
हानिकारक मनोरंजनामुळे आपलं मन भरकटू शकतं. तसंच वाईट संगतीमुळे आणि धनसंपत्तीचा सतत विचार करत राहिल्यामुळेही आपल्यावर वाईट प्रभाव पडू शकतो. जर आपल्या लक्षात आलं की एखाद्या गोष्टीमुळे यहोवावरचं आपलं प्रेम कमजोर होत चाललंय, तर त्या गोष्टीला काढून टाकण्यासाठी आपण लगेच पाऊल उचललं पाहिजे. (मत्त. ५:२९, ३०) आपण कधीच आपलं मन भरकटू देऊ नये. आपण असा विचार करू की ‘मी यहोवाच्या सेवेत व्यस्त आहे, त्यामुळे माझ्यावर कुठल्याच वाईट गोष्टीचा प्रभाव पडणार नाही.’ असा विचार करून आपण खरंतर स्वतःला फसवत असू. हे समजून घ्यायला कल्पना करा, की उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तुम्ही कडक उन्हातून घरी आला आहात. घरी आल्यावर तुम्ही एसी किंवा कूलर चालू करता. पण मग तुम्ही दारं-खिडक्या उघड्या ठेवल्या तर त्या एसीचा किंवा कूलरचा तुम्हाला कितपत फायदा होईल? कारण तसं केल्यावर बाहेरची गरम हवा घरात येऊन घरातलं तापमान वाढू शकतं. तर मुद्दा हा आहे, की आपण यहोवासोबतचं आपलं नातं मजबूत करण्यासाठी फक्त आध्यात्मिक अन्न घेणं पुरेसं नाही. त्यासोबतच आपण वाईट गोष्टींचा आपल्यावर प्रभाव होऊ नये म्हणून आपण आपल्या मनाचं दारही बंद केलं पाहिजे. यामुळे जगातली गरम ‘हवा’ किंवा देवाला न आवडणारे गुण आपल्या मनात शिरणार नाहीत आणि त्यामुळे आपलं मन भरकटणार नाही.—इफिस. २:२. टेहळणी बुरूज२४.०७ २१ ¶६-७
बुधवार, २६ ऑगस्ट
आपल्या शत्रूंवर प्रेम करत राहा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहा.—मत्त. ५:४४.
येशूला जो अपमान आणि अन्याय सहन करावा लागला याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्याला इतका अन्याय सहन करावा लागला तरीसुद्धा तो इतरांशी प्रेमाने वागला आणि यहोवाला विश्वासू राहिला. त्याला वधस्तंभावर खिळणाऱ्या रोमी सैनिकांना शाप देण्याऐवजी त्याने त्यांच्यासाठी अशी प्रार्थना केली: “बापा, यांना क्षमा कर कारण ते काय करत आहेत ते त्यांना कळत नाही.” (लूक २३:३४) आपणसुद्धा जेव्हा आपल्यावर अन्याय करणाऱ्यांसाठी प्रार्थना करतो, तेव्हा त्यांच्याबद्दल आपल्या मनात असलेला राग किंवा द्वेषाची भावना कमी होते. आणि त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनसुद्धा बदलतो. या दुष्ट व्यवस्थेचा अंत होत नाही तोपर्यंत कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याला अन्याय सहन करावा लागेल. अशा वेळी आपल्या वाटेला काहीही आलं, तरी आपण यहोवाला प्रार्थना करायचं कधीही सोडू नये. तसंच, येशूवर अन्याय झाला तेव्हा तो ज्या प्रकारे वागला त्याचं आपण अनुकरण करू शकतो आणि बायबलची तत्त्वं लागू करत राहू शकतो. आपण जर असं केलं, तर यहोवा आपल्याला आशीर्वाद देईल याची आपण खातरी बाळगू शकतो.—१ पेत्र ३:८, ९. टेहळणी बुरूज२४.११ ६-७ ¶१६; ७ ¶१७, १९
गुरुवार, २७ ऑगस्ट
तू दुष्टता पाहून आनंदी होणारा देव नाहीस; वाईट गोष्टी करणारा कोणीही तुझ्याजवळ राहू शकत नाही.—स्तो. ५:४.
यहोवा सगळ्याच प्रकारचं वागणं खपवून घेतो असं नाही. उलट त्याला पापाची घृणा वाटते. (स्तो. ५:४-६) त्याने त्याच्या वचनात जे नीतिमान स्तर सांगितले आहेत, त्यांचा आपण आदर करावा असं त्याला वाटतं. आपण हे स्तर पाळत असताना तो आपल्यासारख्या अपरिपूर्ण लोकांकडून परिपूर्णतेची अपेक्षा करत नाही. (स्तो. १३०:३, ४) पण त्याच वेळी जी “अधार्मिक माणसं देवाच्या अपार कृपेचं निमित्त देऊन निर्लज्ज वर्तन करतात” त्यांचं वागणं यहोवा खपवूनही घेत नाही. (यहू. ४) बायबल सांगतं अशा ‘दुष्ट लोकांचा’ हर्मगिदोनाच्या युद्धात नाश होणार आहे. (२ पेत्र ३:७; प्रकटी. १६:१६) असं असलं तरी, कोणाचाही नाश व्हावा अशी यहोवाची इच्छा नाही. बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितलंय, की “सगळ्यांनी पश्चात्ताप करावा असं त्याला वाटतं.” (२ पेत्र ३:९) मंडळीतले वडीलही या बाबतीत यहोवासारखं वागतात. ते पाप करणाऱ्याला आपले चुकीचे मार्ग बदलायला आणि यहोवासोबतचं नातं पुन्हा जोडायला धीराने मदत करतात. टेहळणी बुरूज२४.०८ २६ ¶१-२
शुक्रवार, २८ ऑगस्ट
तू आपली मूठ उघडून, प्रत्येक जिवाची इच्छा पूर्ण करतोस.—स्तो. १४५:१६.
यहोवाप्रमाणे इतरांवर असलेल्या प्रेमामुळे आपणही त्यांच्या गरजेच्या गोष्टी त्यांना देतो. उदाहरणार्थ, तुम्हाला एखादा भाऊ किंवा बहीण माहीत आहे का, ज्यांना खाण्यापिण्याच्या गोष्टींची किंवा कपड्यांची गरज आहे? त्यांची ही गरज भागवण्यासाठी यहोवा तुमचा वापर करू शकतो. यहोवाच्या लोकांना खासकरून विपत्तीच्या काळात उदारता दाखवण्यासाठी ओळखलं जातं. उदाहरणार्थ, कोव्हिड-१९ महामारीच्या काळात भाऊबहिणींनी गरजू लोकांना खाण्यापिण्याच्या गोष्टी, कपडे आणि इतर गोष्टी पुरवल्या. बऱ्याच जणांनी जगभरात चाललेल्या कामासाठी उदारतेने दानही दिलं. यामुळे जगभरातल्या मदतकार्याला हातभार लागला. या भाऊबहिणींनी इब्री लोकांना १३:१६ मधल्या शब्दांप्रमाणे केलं. त्यात म्हटलंय: “चांगल्या गोष्टी करायला आणि तुमच्याजवळ जे आहे, त्यातून इतरांनाही द्यायला विसरू नका कारण अशा बलिदानांमुळे देवाला खूप आनंद होतो.” टेहळणी बुरूज२४.०९ २७-२८ ¶६-७
शनिवार, २९ ऑगस्ट
कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची तुम्ही नेहमी खातरी करून घ्यावी.—फिलिप्पै. १:१०.
या परिस्थितीचा विचार करा: तुमच्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी तुम्ही एक नोकरी शोधत आहात. तुमच्यासमोर दोन नोकऱ्या आहेत. तुम्ही सर्व माहिती गोळा करता. जसं की, काम कशा प्रकारचं आहे? ते किती वेळ असेल? यायला-जायला किती वेळ लागेल? या दोन्ही नोकऱ्या बायबल तत्त्वांप्रमाणे योग्य आहेत. त्यातल्या एका नोकरीतलं काम तुम्हाला आवडतं किंवा मग त्या नोकरीत पगार जास्त आहे. म्हणून कदाचित तुम्हाला ती नोकरी करावीशी वाटेल. पण कुठलाही निर्णय घेण्याआधी तुम्ही इतरही काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. यासाठी तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारू शकता: ‘या नोकरीमुळे मला सभांना जाणं अवघड होईल का? किंवा मी माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायला, खूश ठेवायला आणि यहोवासोबतचं त्यांचं नातं मजबूत करायला जो वेळ देतो त्या वेळेच्या आड ही नोकरी येईल का?’ असे प्रश्न विचारल्यामुळे तुम्हाला पैशांपेक्षा “जास्त महत्त्वाच्या” गोष्टींना पहिली जागा द्यायला मदत होईल. त्या गोष्टी म्हणजे तुमची उपासना आणि तुमच्या कुटुंबाच्या गरजा. या गोष्टींवर विचार केल्यामुळे तुम्हाला एक चांगला निर्णय घेता येईल आणि त्यावर यहोवाचा आशीर्वाद असेल. टेहळणी बुरूज२५.०१ १७ ¶११-१३
रविवार, ३० ऑगस्ट
यहोवा दुःखी लोकांच्या जवळ असतो.—स्तो. ३४:१८.
इतर जण तुमच्याशी वाईट वागले असतील, तरी तुम्ही याची खातरी बाळगू शकता, की यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे आणि त्याला तुमची किंमत आहे. जर तुम्हाला ‘खचून’ गेल्यासारखं वाटत असेल, तर हे लक्षात ठेवा की यहोवाने तुमच्यात असलेल्या चांगल्या गोष्टी पाहिल्या आणि त्याने स्वतः तुम्हाला त्याच्याकडे आकर्षित केलंय. (योहा. ६:४४) तुम्हाला मदत करण्यासाठी तो नेहमी तयार असतो, कारण तुम्ही त्याच्यासाठी खूप मौल्यवान आहात. यहोवाला आपल्याबद्दल कसं वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण येशूचा विचार करू शकतो. तो पृथ्वीवर होता तेव्हा त्याने अशा लोकांकडे लक्ष दिलं, ज्यांना इतर जण खालच्या नजरेने बघायचे. त्याने त्यांना खूप कोमलतेने आणि सहानुभूतीने वागवलं. (मत्त. ९:९-१२) खूप त्रासदायक आजार सहन करत असलेल्या एका स्त्रीने, बरं होण्याच्या आशेने जेव्हा येशूच्या कपड्यांना हात लावला, तेव्हा त्याने तिचं सांत्वन केलं आणि तिच्या विश्वासासाठी तिची स्तुती केली. (मार्क ५:२५-३४) येशूने त्याच्या पित्याचं अगदी हुबेहूब अनुकरण केलं. (योहा. १४:९) म्हणूनच तुम्ही अशी पक्की खातरी ठेवू शकता, की यहोवाला तुमची किंमत आहे आणि तुमच्यात असलेल्या चांगल्या गुणांकडे, जसं की तुमचा विश्वास आणि त्याच्यावर असलेलं तुमचं प्रेम, या गोष्टींकडे तो लक्ष देतो. टेहळणी बुरूज२४.१० ७ ¶४-५
सोमवार, ३१ ऑगस्ट
माझे अश्रू तुझ्या बुधलीत जमा कर.—स्तो. ५६:८.
दावीदच्या जीवनात अशा बऱ्याच कठीण समस्या आल्या, ज्यांमुळे त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. लोकांनी त्याचा द्वेष केला. इतकंच काय, तर त्याच्या जवळच्या लोकांनी त्याचा विश्वासघातही केला. (१ शमु. १९:१०, ११; २ शमु. १५:१०-१४, ३०) त्याच्या आयुष्याच्या एका कठीण काळात त्याने असं म्हटलं: “मी कण्हून कण्हून थकलोय; रात्रभर माझा बिछाना अश्रूंनी ओलाचिंब होतो; माझ्या पलंगावर आसवांचा पूर येतो.” (स्तो. ६:६) दावीदच्या जीवनात इतक्या समस्या आल्या तरी त्याला या गोष्टीची खातरी होती, की यहोवाचं त्याच्यावर प्रेम आहे. त्याने असं लिहिलं: “यहोवा माझ्या रडण्याचा आवाज नक्की ऐकेल.” (स्तो. ६:८) आजच्या वचनातल्या शब्दचित्रावरून स्पष्ट होतं, की यहोवा किती प्रेमळ देव आहे. दावीदला असं वाटलं जणू काही यहोवाने त्याचे अश्रू बुधलीत जमा केलेत किंवा एका वहीत त्यांची नोंद करून ठेवली आहे. दावीदला हे माहीत होतं, की यहोवाने त्याचा त्रास पाहिलाय आणि त्याच्या तो लक्षात आहे. दावीदला एका गोष्टीची पक्की खातरी होती. ती म्हणजे, त्याच्या प्रेमळ पित्याला त्याच्या समस्याच नाही, तर त्या समस्यांमुळे त्याच्यावर जो परिणाम होतोय तोसुद्धा माहीत आहे. टेहळणी बुरूज२४.१२ २२-२३ ¶११-१२