जुलै
बुधवार, १ जुलै
मी एकाही नीतिमान माणसाला निराधार झालेलं पाहिलं नाही.—स्तो. ३७:२५.
यहोवाच्या काही सेवकांना वाढत्या वयामुळे होणाऱ्या परिणामांचा, आजारपणाचा किंवा अपंगत्वाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ‘यहोवाच्या नजरेत खरंच माझी काही किंमत आहे का?’ अशी शंका त्यांच्या मनात येऊ शकते. त्यामुळे त्यांना कदाचित असा प्रश्न पडेल, की ‘मी अजूनही यहोवाच्या कामी येऊ शकतो का?’ ७१ व्या स्तोत्राच्या लेखकालाही असंच वाटत होतं. त्याने प्रार्थना केली: “माझं शरीर थकल्यावर मला टाकून देऊ नकोस.” (स्तो. ७१:९, १८) पण तरीसुद्धा स्तोत्रकर्त्याला खातरी होती, की जर त्याने यहोवाची एकनिष्ठपणे सेवा केली, तर तो त्याचं मार्गदर्शन करेल आणि त्याला पाठिंबा देईल. स्तोत्रकर्त्याला कळलं, की जास्त काही करता येत नसूनही जे त्याची सेवा करायचा होता होईल तितका प्रयत्न करतात त्यांच्याबद्दल यहोवाला आनंद वाटतो. (स्तो. ३७:२३-२५) वयस्कर भाऊबहिणींनो, तुमच्या परिस्थितीकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहा. तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नसलं तरी यहोवा त्याची सेवा करायला तुम्हाला मदत करेल. (स्तो. ९२:१२-१५) त्यामुळे तुम्हाला जे करता येत नाही अशा गोष्टींवर नाही, तर तुम्ही जे करू शकता त्या गोष्टींवर लक्ष द्या. टेहळणी बुरूज२४.१० २८-२९ ¶१४-१६
गुरुवार, २ जुलै
मूर्तींना दाखवलेला नैवेद्य खाण्याबद्दल आपल्याला हे माहीत आहे, की या जगात मूर्ती काहीच नाही.—१ करिंथ. ८:४.
बायबल तत्त्वांच्या आधारावर विचार करून निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा आध्यात्मिक रितीने लहान मुलांसारखे असलेल्यांना तसं करणं कठीण जातं. जर एखाद्या गोष्टीबद्दल बायबलमध्ये नियमच नसेल तर काहींना वाटतं, की आपण आपल्या मनाप्रमाणे काहीही करू शकतो. तर काही जण नियमाची गरज नसतानाही नियम शोधायचा प्रयत्न करतील. उदाहरणार्थ, करिंथमधल्या ख्रिश्चनांनी प्रेषित पौलला, ‘आपण मूर्तीला वाहिलेले पदार्थ खाऊ शकतो का?’ असं विचारलं. अशा वेळी काय करायचं हे सांगण्याऐवजी पौलने त्यांना विवेकाच्या भूमिकेबद्दल आणि ‘निवड करायच्या त्यांच्या अधिकाराबद्दल’ सांगितलं. पौलने त्यांना काही बायबल तत्त्वांबद्दल सांगितलं. या तत्त्वांमुळे त्यांना असे निर्णय घेता येणार होते ज्यांमुळे त्यांचा विवेक त्यांना नंतर दोष देणार नव्हता आणि इतरांनाही अडखळण होणार नव्हतं. (१ करिंथ. ८:७-९) असं करून पौल करिंथमधल्या ख्रिश्चनांना आध्यात्मिक रितीने प्रौढ होण्यासाठी मदत करत होता. त्यामुळे ते निर्णय घेण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी किंवा नियम शोधण्याऐवजी त्यांच्या समजशक्तीचा वापर करून निर्णय घेऊ शकत होते. टेहळणी बुरूज२४.०४ ५-६ ¶१४
शुक्रवार, ३ जुलै
मी, यहोवा हृदय पारखतो आणि प्रत्येकाला त्याच्या वागणुकीप्रमाणे प्रतिफळ देतो.—यिर्म. १७:१०.
योनाच्या काळात, निनवेच्या लोकांकडे पश्चात्ताप करण्याची संधी होती. पुढे येशू ‘न्यायाच्या पुनरुत्थानाबद्दल’ बोलला. त्यात ‘वाईट कामं केलेल्यांचासुद्धा’ समावेश असेल. (योहा. ५:२९) त्यामुळे असं दिसून येतं, की सदोम आणि गमोरामधल्या लोकांनासुद्धा काही प्रमाणात आशा असू शकते. तसंच, त्यांच्यापैकी काही लोकांचं पुनरुत्थान होईल अशी शक्यता आहे. आणि त्यांना यहोवा आणि येशू ख्रिस्ताबद्दल शिकवण्याची संधीसुद्धा आपल्याला मिळू शकते. यहोवा नेहमी लोकांचं “हृदय पारखतो” आणि तो प्रत्येकाच्या मनातल्या खोल विचारांचं परीक्षण करतो. भविष्यात होणाऱ्या पुनरुत्थानाबद्दल बोलायचं झालं, तर तो नेहमीप्रमाणे ‘प्रत्येकाला त्याच्या वागणुकीप्रमाणे प्रतिफळ देईल.’ जेव्हा गरज आहे तेव्हा तो ठाम राहील, पण जेव्हा शक्य आहे तेव्हा तो दया दाखवेल. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला खातरीने माहीत नाही, तोपर्यंत अमुक एका व्यक्तीला पुनरुत्थानाची आशा नाही असा अंदाज आपण लावू नये. टेहळणी बुरूज२४.०५ ५-६ ¶१५-१६
शनिवार, ४ जुलै
घाबरू नकोस, मी तुला मदत करीन.—यश. ४१:१३.
जुन्या काळात जेव्हा देवाच्या सेवकांना एखादं कठीण काम करावं लागायचं, तेव्हा देवाच्या संदेशामुळे त्यांना मदत मिळायची. यिर्मयाचंच उदाहरण घ्या. यहोवाने त्याला प्रचार करायला सांगितलं, तेव्हा त्याला भीती वाटली. यिर्मया म्हणाला: “मी तर एक लहान मुलगा आहे. मला नीट बोलताही येत नाही.” (यिर्म. १:६) मग त्याने त्याच्या भीतीवर कशी मात केली? यहोवाच्या शब्दांमुळे त्याला हिंमत मिळाली. तो म्हणाला: “तो संदेश माझ्या मनात धगधगत्या आगीसारखा झाला; माझ्या हाडांमध्ये कोंडलेल्या अग्नीसारखा तो झाला. तो आवरता-आवरता मी पार थकून गेलो.” (यिर्म. २०:८, ९) यिर्मयाला ज्या क्षेत्रात प्रचार करायचा होता, तिथे प्रचार करणं खूप कठीण होतं. पण तरीसुद्धा जो संदेश त्याला लोकांना सांगायचा होता, त्यामुळे त्याला हे काम करायची ताकद मिळाली. देवाच्या वचनातल्या संदेशामुळे भाऊबहिणींना ताकद मिळते. प्रेषित पौलने म्हटलं, की देवाबद्दलचं अचूक ज्ञान घेतल्यामुळे भाऊबहिणींना “प्रत्येक चांगल्या कार्याचं फळ उत्पन्न करत” राहायला मदत मिळेल आणि “यहोवाच्या सेवकांना शोभेल” असं वागता येईल.—कलस्सै. १:९, १०. टेहळणी बुरूज२४.०४ १४-१५ ¶२-४
रविवार, ५ जुलै
सादोक याजकाने शलमोनचा अभिषेक केला.—१ राजे १:३९.
महायाजक अब्याथारने विश्वासघात केला असला तरी सादोक मात्र यहोवाला एकनिष्ठ होता. अब्याथारने दावीदच्या मुलाला म्हणजे अदोनियाला साथ दिली. अदोनिया दावीदचं राज्य बळकावण्याचा प्रयत्न करत होता. दावीदने सादोकच्या एकनिष्ठेवर कधीच शंका घेतली नाही. अदोनियाचा कट जेव्हा उघड झाला तेव्हा राजा म्हणून शलमोनचा अभिषेक करण्यासाठी दावीदने सादोक, नाथान आणि बनायावर भरवसा ठेवला. (१ राजे १:३२-३४) नाथान आणि दावीदला साथ देणाऱ्यांसारख्या यहोवाच्या विश्वासू लोकांसोबत राहिल्यामुळे सादोकला नक्कीच बळ आणि प्रोत्साहन मिळालं असेल. म्हणून शलमोन जेव्हा राजा बनला तेव्हा त्याने “अब्याथारच्या जागी सादोकला याजक म्हणून नेमलं.” (१ राजे २:३५) तुम्ही सादोकचं अनुकरण कसं करू शकता? जेव्हा तुमची जवळची व्यक्ती यहोवाला सोडून देते तेव्हा तुम्ही यहोवाला एकनिष्ठ आहात हे दाखवा. (यहो. २४:१५) त्यामुळे यहोवा तुम्हाला लागणारं बळ आणि धैर्य देईल. म्हणून प्रार्थना करून त्याच्यावर विसंबून राहा आणि त्याच्या एकनिष्ठ सेवकांच्या जवळ राहा. तुमच्या एकनिष्ठतेची यहोवा कदर करतो आणि तो त्यासाठी तुम्हाला नक्कीच प्रतिफळ देईल.—२ शमु. २२:२६. टेहळणी बुरूज२४.०७ ६-७ ¶१६-१७
सोमवार, ६ जुलै
आपण हिंमत हारून चांगलं ते करत राहायचं सोडू नये.—गलती. ६:९.
स्तोत्र १५:२ मध्ये अशा माणसाबद्दल सांगितलंय “जो निर्दोषपणे चालतो” आणि “योग्य ते करतो.” या अशा गोष्टी आहेत ज्या देवासोबत मैत्री असलेल्या व्यक्तीने करत राहिल्या पाहिजेत. पण आपण खरंच ‘निर्दोषपणे चालू’ शकतो का? हो. आपण सगळेच अपरिपूर्ण आहोत, पण जेव्हा आपण देवाच्या आज्ञा पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, तेव्हा यहोवा आपल्याला ‘निर्दोषपणे चालणारे’ म्हणून पाहील. जेव्हा आपण आपलं जीवन समर्पित करतो आणि बाप्तिस्मा घेतो, तेव्हा देवासोबतचा आपला प्रवास नुकताच चालू झालेला असतो. लक्षात घ्या, की बायबल काळात फक्त इस्राएली असल्यामुळे एक व्यक्ती आपोआपच यहोवाच्या तंबूत त्याचा पाहुणा बनून राहू शकत नव्हता. कारण काही जण “खरेपणाने आणि नीतीने” त्याला प्रार्थना करत नव्हते. (यश. ४८:१) त्यामुळे एका प्रामाणिक इस्राएली व्यक्तीला, यहोवाच्या त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत हे समजून घेणं आणि त्याप्रमाणे चालणं गरजेचं होतं. त्याचप्रमाणे आजसुद्धा आपल्याला देवाला खूश करायचं असेल तर फक्त बाप्तिस्मा घेऊन यहोवाचा साक्षीदार असणंच पुरेसं नाही, तर आपण जे ‘योग्य आहे ते करत राहिलं पाहिजे.’ टेहळणी बुरूज२४.०६ ९ ¶४; १० ¶६
मंगळवार, ७ जुलै
[देवाचं] अनुकरण करा.—इफिस. ५:१.
यहोवा कोणत्या मार्गांनी उदारता दाखवतो? तो आपल्याला गरजेच्या गोष्टी पुरवतो. आपल्याला कदाचित प्रत्येक वेळी चैनीच्या गोष्टी मिळणार नाहीत. पण आपल्यापैकी बहुतेकांकडे गरजेच्या गोष्टी असतात. त्यासाठी आपण यहोवाचे आभार मानले पाहिजेत! उदाहरणार्थ, यहोवा आपल्याला अन्न, वस्र आणि निवारा पुरवतो. (स्तो. ४:८; मत्त. ६:३१-३३; १ तीम. ६:६-८) आणि यहोवा या गोष्टी आपल्याला फक्त कर्तव्य म्हणून पुरवत नाही. मत्तय ६:२५, २६ मध्ये दिलेल्या येशूच्या शब्दांकडे लक्ष द्या. पक्ष्यांबद्दल बोलताना तो म्हणाला: “ते पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत किंवा कोठारांत धान्य साठवत नाहीत.” लक्ष द्या तो पुढे काय म्हणतो: “तरीही स्वर्गातला तुमचा पिता त्यांना खाऊ घालतो.” मग येशू विचारतो: “तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मौल्यवान नाही का?” तर मुद्दा हा आहे, की जर यहोवा प्राण्यांच्या गरजा पुरवतो, तर तो आपल्याही गरजा पुरवणार नाही का? नक्कीच पुरवेल. काळजी करणाऱ्या एका मानवी पित्याप्रमाणे यहोवा प्रेमापोटी आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवतो.—स्तो. १४५:१६; मत्त. ६:३२. टेहळणी बुरूज२४.०९ २७ ¶४-६
बुधवार, ८ जुलै
जे पुरुष चांगल्या प्रकारे सेवा करतात, ते चांगलं नाव कमावतात आणि विश्वासाबद्दल अगदी मोकळेपणाने बोलू शकतात.—१ तीम. ३:१३.
सहायक सेवक एक बाप्तिस्मा घेतलेला भाऊ असतो. त्याला पवित्र शक्तीच्या मदतीने नेमलेलं असतं. आणि मंडळीतली बरीचशी महत्त्वाची कामं करण्यासाठी तो वडिलांना मदत करत असतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहायक सेवकांचं यहोवावर प्रेम असतं आणि ते त्याच्या नीतिमान स्तरांप्रमाणे जीवन जगायचा प्रयत्न करतात. यासोबतच, मंडळीतल्या भाऊबहिणींवर ते मनापासून प्रेम करतात. (मत्त. २२:३७-३९) मग प्रश्न हा आहे, की एक बाप्तिस्मा घेतलेला भाऊ सहायक सेवक बनायचं ध्येय कसं ठेवू शकतो? सहायक सेवक बनण्यासाठी एखाद्या भावाला कोणत्या पात्रता पूर्ण करायची गरज आहे हे बायबलमध्ये सांगितलंय. (१ तीम. ३:८-१०, १२) तुम्ही जर या पात्रता चांगल्या प्रकारे समजून घेतल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली, तर सहायक सेवक बनण्याचं तुमचं ध्येय तुम्हाला गाठता येईल. पण त्याआधी सहायक सेवक बनण्यामागचा तुमचा हेतू काय आहे याचा तुम्ही काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. टेहळणी बुरूज२४.११ १५ ¶४-५
गुरुवार, ९ जुलै
तुम्ही ते माणसांचं वचन म्हणून नाही, तर देवाचं वचन म्हणून स्वीकारलं; आणि ते खरोखर देवाचंच वचन आहे.—१ थेस्सलनी. २:१३.
काही लोक दावा करतात की त्यांनी शंभर वेळा बायबल वाचलंय. पण ते खरोखर बायबलवर विश्वास ठेवतात का? त्यांनी ते लागू केलंय का किंवा त्याप्रमाणे आपल्या जीवनात बदल केले आहेत का? दुःखाची गोष्ट म्हणजे, त्यांनी तसं केलेलं नसतं. पण यहोवाचे लोक या नात्याने आपण मात्र वेगळे आहोत! आपण ते आपल्या जीवनात लागू करायचा पुरेपूर प्रयत्न करतो. असं असलं तरी, देवाचं वचन वाचून ते लागू करणं नेहमीच सोपं नसतं. ते वाचण्यासाठी वेळ काढायला आपल्याला बरीच खटपट करावी लागू शकते. किंवा आपल्याला भरभर बायबल वाचायची सवय असल्यामुळे आपल्याला ते नीट समजून घेऊन वाचता येत नसेल. किंवा बऱ्याच सुधारणा कराव्या लागणार आहेत हे जाणवल्यामुळे आपल्याला निराश झाल्यासारखं वाटत असेल. या समस्या आपल्याला डोंगराएवढ्या वाटत असल्या, तरी यहोवाच्या मदतीने आपण त्यांवर मात करू शकतो. म्हणून आपण देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे चालण्याचा निश्चय करू या. यात काहीच शंका नाही की आपण जितकं जास्त देवाचं वचन वाचू आणि ते आपल्या जीवनात लागू करू तितकं जास्त आपण आनंदी असू.—याको. १:२५. टेहळणी बुरूज२४.०९ ७ ¶१५-१६
शुक्रवार, १० जुलै
मागत राहा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल.—लूक ११:९.
जेव्हा आपल्या मनावर आघात होतो किंवा आपलं मोठं नुकसान होतं, तेव्हा यहोवा पवित्र शक्तीने आपलं सांत्वन करतो. तुमच्यासोबत काही वाईट झाल्यामुळे तुम्ही खूप दुःखातून जात असाल, तर तुम्हाला नक्की कसं वाटतंय ते यहोवाला सांगून तुमचं मन मोकळं करा. तुम्ही त्याच्याशी सारखं-सारखं आणि जितका वेळ बोलावंसं वाटतंय तितका वेळ बोलू शकता. (स्तो. ८६:३; ८८:१) त्याची पवित्र शक्ती मिळावी म्हणून त्याला पुन्हा-पुन्हा विनंती करा. तो तुमच्या विनंतीकडे कधीही दुर्लक्ष करणार नाही. तुम्ही एखाद्या कठीण परिस्थितीतून गेला आहात का? त्यामुळे तुमच्यात काहीच ताकद उरलेली नाही असं जर तुम्हाला वाटत असेल, तर यहोवाची पवित्र शक्ती तुम्हाला त्याची विश्वासूपणे सेवा करत राहायला ताकद देऊ शकते. (इफिस. ३:१६) पवित्र शक्तीसाठी प्रार्थना केल्यावर तुम्ही त्याप्रमाणे कसं काम करू शकता? उपासनेशी संबंधित कार्यांमध्ये सहभाग घ्या. त्यामुळे देवाच्या पवित्र शक्तीला तुमच्यावर जास्त कार्य करता येईल. यात सभांना उपस्थित राहणं, इतरांना प्रचार करणं यांसारख्या गोष्टी सामील आहेत. दररोज देवाचं वचन वाचून त्याच्या विचारांनी आपलं मन भरून टाका. (फिलिप्पै. ४:८, ९) बायबल काळातल्या देवाच्या लोकांनी संकटांचा सामना कसा केला, याचा विचार करा. तसंच, यहोवाने त्यांना धीर धरायला कशी मदत केली यावरही मनन करा. टेहळणी बुरूज२४.१० ९-१० ¶१२-१४
शनिवार, ११ जुलै
देवाने जगावर इतकं प्रेम केलं.—योहा. ३:१६.
यहोवा आणि त्याच्या मुलाप्रमाणेच आपलंही लोकांवर प्रेम आहे. (नीति. ८:३१) “देवाशिवाय” असणाऱ्या आणि “कोणतीही आशा” नसलेल्या लोकांबद्दल आपल्याला करुणा आणि कळकळ वाटते. (इफिस. २:१२) ते जीवनाच्या चिंतांमध्ये बुडत आहेत. आणि त्यांना वाचवण्यासाठी लागणारं लाईफ-जॅकेट म्हणजे देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश आपल्याकडे आहे. म्हणून त्यांच्यासाठी असलेल्या प्रेमामुळे आणि दयेमुळे आपल्याला त्यांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी जे काही करावं लागतं ते करायचा प्रयत्न आपण करतो. या अनमोल संदेशामुळे त्यांना आशा मिळते, या काळात त्यांना त्यांचं जीवन चांगल्या प्रकारे जगण्यासाठी मदत होते आणि देवाच्या नवीन जगात खरं जीवन म्हणजे कायमचं जीवन जगण्याची संधी मिळते. (१ तीम. ६:१९) लोकांबद्दल प्रेम असल्यामुळे लवकरच येणाऱ्या जगाच्या अंताबद्दल त्यांना सावध करण्यासाठीही आपण प्रवृत्त होतो. (यहे. ३३:७, ८) मोठ्या संकटाच्या वेळी काय होणार आहे, हे त्यांना कळावं अशी आपली इच्छा आहे. म्हणजे खोट्या धर्माचा नाश केला जाईल आणि त्यानंतर हर्मगिदोनाच्या वेळी या संपूर्ण दुष्ट जगाचा नाश केला जाईल, या गोष्टी त्यांना सांगायची आपली इच्छा आहे.—प्रकटी. १६:१४, १६; १७:१६, १७; १९:११, १९, २०. टेहळणी बुरूज२४.०५ १६-१७ ¶८-९
रविवार, १२ जुलै
प्रिय बांधवांनो, सूड घेऊ नका, तर झालेल्या वाइटाबद्दल देवाला त्याचा क्रोध व्यक्त करू द्या. कारण असं लिहिलं आहे: “‘सूड घेणं माझं काम आहे, मी परतफेड करीन,’ असं यहोवा म्हणतो.”—रोम. १२:१९.
प्रेषित पौलने ख्रिश्चनांना म्हटलं: “देवाला त्याचा क्रोध व्यक्त करू द्या.” याचा काय अर्थ होतो? आपण यहोवाला, त्याला हव्या असलेल्या वेळी आणि त्याला हव्या असलेल्या पद्धतीने न्याय करू देतो, तेव्हा आपण त्याला त्याचा क्रोध व्यक्त करू देत असतो. जॉन नावाच्या भावासोबतही अन्याय झाला होता. तो म्हणतो: “जे काही चुकीचं घडत होतं, त्याला माझ्या पद्धतीने बरोबर करायचा मला खूप मोह होत होता. पण रोमकर १२:१९ मुळे मला धीर धरायला आणि यहोवावर भरवसा ठेवायला मदत झाली.” आपल्यावर अन्याय होतो तेव्हा यहोवावर विसंबून राहिल्यामुळे आपल्याला फायदाच होतो. असं केल्यामुळे समस्या कशी सोडवायची याबद्दल आपण चिंता करत बसत नाही. कारण आपल्याला माहीत आहे की यहोवा आपल्याला मदत करायला नेहमी तयार असतो. तो जणू म्हणतो: ‘तुमच्यावर जो अन्याय झालाय त्याला कसं उत्तर द्यायचं ते माझ्यावर सोपवून द्या. मी ते पाहून घेईन.’ यहोवाने आपल्याला, “मी परतफेड करीन” असं वचन दिलंय. या वचनावर आपण भरवसा ठेवला, तर आपण आपल्यावर झालेल्या अन्यायावर विचार करत बसणार नाही आणि यहोवा सगळ्यात चांगल्या पद्धतीने ती गोष्ट हाताळेल असा भरवसा आपल्याला असेल. टेहळणी बुरूज२४.११ ६ ¶१४-१५
सोमवार, १३ जुलै
आमच्या गरजेप्रमाणे आमची रोजची भाकर आम्हाला दे.—लूक ११:३.
आपण आपल्या रोजच्या गरजांना जास्त महत्त्व देऊ नये. यहुदी व्यवस्थेच्या शेवटच्या दिवसांत जगणाऱ्या ख्रिश्चनांना पौलने याबद्दलच लिहिलं. जुन्या काळात इस्राएली लोकांनी काय केलं याची त्याने त्यांना आठवण करून दिली. तसंच सीनाय पर्वताजवळ घडलेल्या घटनांचाही त्याने उल्लेख केला. त्याने ख्रिश्चनांना असा इशारा दिला, की “[इस्राएली लोकांनी] जसा वाईट गोष्टींचा लोभ धरला, तसा [त्यांनी] धरू नये.” (१ करिंथ. १०:६, ७, ११) यहोवाने चमत्कार करून इस्राएली लोकांना अन्न दिलं होतं. पण लोभीपणाने वागल्यामुळे ते अन्नच त्यांच्यासाठी “वाईट” गोष्टीसारखं बनलं. (गण. ११:४-६, ३१-३४) तसंच, जेव्हा त्यांनी सोन्याच्या वासराची उपासना केली, तेव्हा त्यांनी हे दाखवून दिलं की त्यांच्यासाठी यहोवाच्या आज्ञा पाळण्यापेक्षा खाणं-पिणं आणि मौजमजा करणं जास्त महत्त्वाचं आहे. (निर्ग. ३२:४-६) इ.स. ७० मध्ये यहुदी व्यवस्थेच्या अंताच्या वेळी पौलने ख्रिश्चनांना इस्राएली लोकांचं उदाहरण देऊन हा इशारा दिला. आज आपणसुद्धा या जगाच्या व्यवस्थेच्या शेवटच्या दिवसांत जगतोय. त्यामुळे आपणसुद्धा पौलचा हा सल्ला गंभीरपणे घेतला पाहिजे. टेहळणी बुरूज२४.१२ ६ ¶१३
मंगळवार, १४ जुलै
आपल्या तारुण्यातल्या बायकोसोबत आनंदी राहा.—नीति. ५:१८.
यहोवा ‘आनंदी देव’ आहे आणि त्याची इच्छा आहे की आपणसुद्धा आनंदी राहावं. (१ तीम. १:११) त्यामुळे जीवनाचा आनंद घेण्यासाठी त्याने आपल्याला बऱ्याच भेटी दिल्या आहेत. (याको. १:१७) त्यांपैकी एक भेट म्हणजे विवाह. जेव्हा एका पुरुषाचं आणि स्त्रीचं लग्न होतं, तेव्हा ते एकमेकांना वचन देतात की ते एकमेकांचा आदर करतील आणि एकमेकांवर प्रेम करतील. जेव्हा ते त्यांच्यातलं नातं मजबूत ठेवतात, तेव्हा ते खऱ्या अर्थाने आनंदी होऊ शकतात. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, आज जगात बरीच जोडपी लग्नाच्या दिवशी एकमेकांना दिलेलं वचन विसरतात. यामुळे ती जोडपी खूश नाहीत. मग पतींनी आपल्या पत्नीशी कसं वागावं असं यहोवाला वाटतं? यहोवाने पतींना अशी आज्ञा दिली आहे, की त्यांनी आपल्या पत्नीला मान द्यावा. मान देणं म्हणजेच आदर करणं. जो पती आपल्या पत्नीला मान देतो तो तिच्याशी दयेने आणि प्रेमाने वागतो.—१ पेत्र ३:७. टेहळणी बुरूज२५.०१ ८ ¶१-२; ९ ¶४-५
बुधवार, १५ जुलै
यहोवा मला साहाय्य करतो; मी घाबरणार नाही.—इब्री १३:६.
इब्री लोकांना लिहिलेल्या प्रेषित पौलच्या या पत्रामुळे पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांना पुढे येणाऱ्या संकटांसाठी तयार राहायला नक्कीच मदत झाली. या पत्रात पौलने भाऊबहिणींना सांगितलं की त्यांनी शास्त्रवचनांचं सखोल ज्ञान आणि समज वाढवणं गरजेचं आहे. असं केल्यामुळे त्यांचा विश्वास कमजोर करणाऱ्या शिकवणी त्यांना ओळखता येणार होत्या आणि त्यांपासून दूर राहता येणार होतं. तसंच त्याने त्यांना त्यांचा विश्वास मजबूत करायचं प्रोत्साहनही दिलं. असं केल्यामुळे त्यांना येशूचं आणि मंडळीत पुढाकार घेणाऱ्या बांधवांचं मार्गदर्शन लगेच पाळायला मदत होणार होती. तसंच त्याने ख्रिश्चनांना परीक्षांकडे योग्य दृष्टिकोनातून बघून आपला धीर वाढवायला मदत केली. अशा प्रकारे येणाऱ्या परीक्षा आपल्या प्रेमळ पित्याकडून मिळणारं प्रशिक्षणच आहे, असा दृष्टिकोन ते ठेवू शकणार होते. आपणसुद्धा देवाच्या प्रेरणेने दिलेला हा सल्ला पाळू या, म्हणजे मग शेवटपर्यंत आपल्याला विश्वासूपणे धीर धरता येईल.—इब्री ३:१४. टेहळणी बुरूज२४.०९ १३ ¶१७, १९
गुरुवार, १६ जुलै
सर्वकाळासाठी एकदाच देण्यात आलेल्या येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या अर्पणाद्वारे, आपल्याला पवित्र करण्यात आलं आहे.—इब्री १०:१०.
बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे खंडणी ही प्रायश्चित्त आणि समेट घडवून आणण्यासाठी दिलेली किंमत आहे. यहोवाच्या दृष्टिकोनातून, गमावलेली गोष्ट परत मिळवायला त्यामुळे आधार मिळतो. ते कसं? लक्षात घ्या की आदाम आणि हव्वा यांनी त्यांचं परिपूर्ण जीवन तर गमावलंच होतं, पण त्यासोबत कायम जगण्याची आशासुद्धा गमावली होती. त्यामुळे या खंडणीची किंमत ही गमावलेल्या गोष्टीइतकीच असणं गरजेचं होतं. (१ तीम. २:६) ही किंमत एक असा प्रौढ पुरुषच देऊ शकणार होता, (१) जो परिपूर्ण होता, (२) ज्याच्याकडे पृथ्वीवर कायम जगण्याची क्षमता होती आणि (३) जो आपल्यासाठी या जीवनाचा त्याग करायला तयार होता. येशू खंडणीची किंमत का चुकवू शकला याची तीन कारणं आहेत. (१) तो परिपूर्ण होता. ‘त्याने कोणतंही पाप केलं नव्हतं.’ (१ पेत्र २:२२) (२) त्यामुळेच त्याच्याकडे पृथ्वीवर कायम जगण्याची क्षमता होती. आणि (३) हे जीवन देऊन तो आपल्यासाठी मरायला तयार होता.—इब्री १०:९. टेहळणी बुरूज२५.०२ ४ ¶११-१२
शुक्रवार, १७ जुलै
देव आपली पवित्र शक्ती उदारपणे देतो.—योहा. ३:३४.
यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे. तुम्ही त्याच्या कुटुंबाचा भाग बनावा अशी त्याची इच्छा आहे. बाप्तिस्मा घेण्यासाठी तुमच्यासमोर कितीही अडथळे आले तरीही ही गोष्ट खरी आहे. पहिल्या शतकातल्या आपल्या काही शिष्यांना येशूने असं म्हटलं: “जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याइतकाही विश्वास असला, तर तुम्ही या डोंगराला ‘इथून तिथे जा’ असं म्हणाल आणि तो जाईल. आणि कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नसेल.” (मत्त. १७:२०) ही गोष्ट ऐकताना त्याच्यापुढे जे होते ते काही वर्षांपासूनच त्याच्यासोबत होते आणि त्यांना त्यांचा विश्वास अजून वाढवायची गरज होती. पण येशूने त्यांना अशी खातरी दिली, जर त्यांनी आपला विश्वास वाढवला तर यहोवा त्यांना डोंगरांसारखे अडथळे पार करायला मदत करेल. आणि असेच अडथळे पार करायला यहोवा तुम्हालाही मदत करेल. जर बाप्तिस्मा घेण्यापासून एखादी गोष्ट तुम्हाला रोखत असेल, तर ती काढून टाकण्यासाठी लगेच पावलं उचला. आपलं जीवन यहोवाला समर्पित करून बाप्तिस्मा घ्या. तुम्ही खातरी ठेवू शकता, की तुम्ही घेतलेला हा निर्णय सर्वात चांगला निर्णय असेल! टेहळणी बुरूज२५.०३ ७ ¶१८-२०
शनिवार, १८ जुलै
यहोवा माझ्या बाजूने आहे; मी घाबरणार नाही.—स्तो. ११८:६.
जिवंत देव आपल्याला मदत करायला तयार आहे, हे लक्षात ठेवल्यामुळे आपण यशस्वीपणे परीक्षांचा सामना करू शकतो. त्याने पूर्वी आपल्याला कशी मदत केली आहे याच्यावर विचार केल्यामुळे तो आताही आपल्याला मदत करेल असा भरवसा आपण वाढवू शकतो. (यश. ३७:१७, ३३-३७) तसंच, अलीकडच्या काळात यहोवाने आपल्या भाऊबहिणींना कशी मदत केली याची माहिती तुम्ही jw.org वर वाचू शकता किंवा पाहू शकता. शिवाय यहोवाने तुम्हाला कशी मदत केली आहे तेही आठवा. तुम्हाला आयुष्यात मोठमोठे अनुभव आले नसतील, तरी यहोवाने नक्कीच तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या असतील. जसं की, त्याने तुम्हाला मैत्रीचा हात दिला. (योहा. ६:४४) तसंच यहोवाने तुमच्या प्रार्थनांचीसुद्धा उत्तरं दिली असतील, अगदी योग्य वेळेला तुम्हाला मदत केली असेल किंवा कठीण परिस्थितीत टिकून राहायला तुम्हाला शक्ती दिली असेल. या सगळ्या गोष्टींची तुम्हाला आठवण व्हावी म्हणून त्याला प्रार्थना करा. यांसारख्या अनुभवांवर विचार केल्यामुळे यहोवा पुढेही तुम्हाला मदत करत राहील हा तुमचा भरवसा आणखी मजबूत होईल. टेहळणी बुरूज२४.०६ २१-२२ ¶८
रविवार, १९ जुलै
सर्व माणसांमध्ये मरण पसरलं, कारण त्या सगळ्यांनी पाप केलं होतं.—रोम. ५:१२.
आपण यहोवाला खूश करण्याचा निश्चय केलाय, पण आपण अपरिपूर्ण असल्यामुळे मोहाला सहज बळी पडू शकतो. (रोम. ७:२१-२३) आपल्यासमोर अचानक अशी एखादी परिस्थिती येऊ शकते जेव्हा चुकीची गोष्ट बरोबर आहे असं आपल्याला वाटेल. पण आपल्याला यहोवाला आणि येशूला एकनिष्ठ राहायचं असेल तर पाप करायच्या मोहापासून सावध राहा, या येशूच्या सल्ल्याचं आपण पालन केलं पाहिजे. आपल्या सगळ्यांनाच पाप करायच्या मोहाचा सामना करावा लागू शकतो. पण आपल्या प्रत्येकामध्ये कोणती न कोणती कमजोर कडी असते. म्हणून खासकरून काही गोष्टींमुळे आपल्याला चुकीची गोष्ट करायचा मोह होऊ शकतो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती अनैतिक लैंगिक कृत्याच्या मोहाचा सामना करत असेल. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा हस्तमैथून किंवा पोर्नोग्राफी पाहणं यांसारख्या अशुद्ध गोष्टी करण्याकडे जास्त कल असेल. किंवा कदाचित काहींना माणसांची भीती, स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगण्याची ओढ किंवा तापट स्वभाव यांसारख्या गोष्टींसोबत झगडावं लागत असेल. टेहळणी बुरूज२४.०७ १४ ¶३; १५ ¶५
सोमवार, २० जुलै
तुम्ही त्याला प्रेमळपणे क्षमा करून सांत्वन द्या, नाहीतर तो दुःखात बुडून जाईल.—२ करिंथ. २:७.
कल्पना करा, पश्चात्ताप करणाऱ्या व्यक्तीला वडिलांनी मंडळीत पुन्हा घेतलं नसतं तर? किंवा, मंडळीत परत आल्यावर इतर भाऊबहिणींनी त्याच्यावर प्रेम असल्याचं दाखवलं नसतं तर? असं झालं असतं तर, तो ‘दुःखात पार बुडून’ गेला असता. तसंच, आपण यहोवाची सेवा पुन्हा कधीच करू शकणार नाही, असं त्याला वाटलं असतं. आणि यहोवासोबतचं नातं पुन्हा मजबूत करण्यासाठी त्याने प्रयत्नच केले नसते. पण याहून वाईट म्हणजे, मंडळीतल्या भाऊबहिणींनी पश्चात्ताप करणाऱ्या व्यक्तीला माफ करायला नकार दिला असता, तर त्यांचं यहोवासोबतचं नातं धोक्यात आलं असतं. ते कसं? कारण असं करून ते यहोवासारखं नाही तर सैतानासारखं वागले असते. सैतान कठोर आहे आणि तो अजिबात दया दाखवत नाही. पण याउलट, यहोवा पश्चात्ताप करणाऱ्या पापी लोकांना दया दाखवून क्षमा करतो. मंडळीतल्या भाऊबहिणींनी जर त्या माणसाला क्षमा केली नसती, तर सैतानाचा हेतू साध्य झाला असता; त्या माणसाचं यहोवासोबतचं नातं तुटलं असतं.—२ करिंथ. २:१०, ११; इफिस. ४:२७. टेहळणी बुरूज२४.०८ १७ ¶७, १०-११
मंगळवार, २१ जुलै
तो उंचावर चढून गेला तेव्हा त्याने माणसांच्या रूपात भेटी दिल्या.—इफिस. ४:८.
ख्रिस्त येशूने “माणसांच्या रूपात” ज्या भेटी दिल्या त्यात इतर मार्गांनी मंडळीची सेवा करणारे भाऊसुद्धा होते. येशूच्या मार्गदर्शनाखाली यरुशलेममधल्या वडिलांनी पौलला, बर्णबाला आणि इतरांना प्रवासी पर्यवेक्षक म्हणून पाठवलं. (प्रे. कार्यं ११:२२) का बरं? कारण ज्या प्रकारे सहायक सेवक आणि वडील मंडळीला मजबूत करत होते त्याच प्रकारे यांनीसुद्धा मंडळीला मजबूत करावं म्हणून येशूने असं केलं होतं. (प्रे. कार्यं १५:४०, ४१) विभागीय पर्यवेक्षक सतत प्रवास करत असतात. काही जण तर मंडळ्यांमध्ये शेकडो किलोमीटरचा प्रवास करून जातात. दर आठवडी विभागीय पर्यवेक्षक अनेक भाषणं देतात, मेंढपाळ भेटी घेतात आणि पायनियर सभा, वडिलांची सभा आणि क्षेत्रसेवेसाठी असणारी सभासुद्धा घेतात. ते भाषणं तयार करतात आणि विभागीय संमेलनाची आणि अधिवेशनाची योजना करतात. ते पायनियर प्रशालेत शिकवण्याचं काम करतात आणि विभागातल्या पायनियर भाऊबहिणींसोबत खास सभासुद्धा घेतात. तसंच, शाखा कार्यालयाने नेमून दिलेल्या आणि कधीकधी तातडीच्या असलेल्या काही जबाबदाऱ्यासुद्धा ते हाताळतात. टेहळणी बुरूज२४.१० २१ ¶१२-१३
बुधवार, २२ जुलै
मी त्यांचे अपराध माफ करीन, आणि त्यांची पापं पुन्हा कधीच लक्षात ठेवणार नाही.—यिर्म. ३१:३४.
आजच्या वचनातले शब्द यहोवाने यिर्मया संदेष्ट्याला सांगितले. या शब्दांचा संदर्भ घेऊन प्रेषित पौलनेसुद्धा म्हटलं: “[मी] त्यांची पापं पुन्हा कधीच आठवणीत आणणार नाही.” (इब्री ८:१२) पण याचा नेमका काय अर्थ होतो? आपल्याला माहीत आहे, की ‘आठवणीत ठेवणं’ म्हणजे लक्षात ठेवणं किंवा कशाचातरी विचार करणं. पण बायबलमध्ये आठवणीत ठेवण्याचा अर्थ नेहमी असाच होत नाही, तर या शब्दांचा अर्थ काहीतरी पाऊल उचलणं असासुद्धा होऊ शकतो. येशूच्या मृत्यूच्या वेळी त्याच्या शेजारी असलेल्या गुन्हेगाराने त्याला म्हटलं: “येशू, तू राजा होशील तेव्हा माझी आठवण ठेव.” (लूक २३:४२, ४३) इथे तो येशूला फक्त असं म्हणत नव्हता, की ‘तू राजा होशील तेव्हा माझ्याबद्दल विचार कर.’ उलट येशूने काहीतरी करावं असं त्याला वाटत होतं. कारण येशूने ज्या प्रकारे त्याला उत्तर दिलं त्यावरून कळतं, की या गुन्हेगाराचं पुनरुत्थान करण्यासाठी येशू पाऊल उचलणार होता. म्हणून जेव्हा यहोवा आपल्याला असं म्हणतो, की तो आपली पापं कधीच आठवणीत ठेवणार नाही, तेव्हा तो त्या पापांसाठी भविष्यात आपल्याविरुद्ध कोणतंही पाऊल उचलणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. दुसऱ्या शब्दांत, त्याने आपली पापं माफ केली म्हणजे तो भविष्यात आपल्याला कधीच शिक्षा देणार नाही. टेहळणी बुरूज२५.०२ १०-११ ¶१४-१५
गुरुवार, २३ जुलै
परमपवित्र देवाचं ज्ञान हीच समजशक्ती आहे.—नीति. ९:१०.
यहोवाच्या गुणांबद्दल, त्याच्या उद्देशाबद्दल आणि त्याला काय आवडतं किंवा त्याला कोणत्या गोष्टींचा द्वेष आहे याबद्दल जाणून घेतल्यामुळे आपल्याला समजशक्ती मिळू शकते. त्यामुळे आपण स्वतःला विचारू शकतो: ‘मी यहोवाला जितकं ओळखतो त्यावरून काय म्हणता येईल? माझ्या या निर्णयामुळे त्याला आनंद होईल का?’ (इफिस. ५:१७) यहोवाला खूश केल्यामुळे कधीकधी आपले जवळचे लोक नाराज होऊ शकतात. उदाहरणार्थ, सगळ्याच आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांचं भलं व्हावं. यासाठी काही आईवडील आपल्या मुलीवर एखाद्या श्रीमंत मुलाशी लग्न करायचा दबाव टाकतील; मग तो आध्यात्मिक रित्या मजबूत नसला तरीही. हे खरंय की त्यांची इच्छा असते की आपल्या मुलीला काहीच कमी पडू नये. पण मग तिला आध्यात्मिक प्रगती करायला कोण मदत करेल? या गोष्टीबद्दल यहोवाला काय वाटतं? याचं उत्तर आपल्याला मत्तय ६:३३ मध्ये मिळतं. तिथे सगळ्याच ख्रिश्चनांना सांगितलंय की त्यांनी “आधी देवाचं राज्य . . . मिळवण्याचा प्रयत्न करत” राहावं. हे खरंय की आपण आपल्या आईवडिलांचा आणि नातेवाइकांचा आदर करतो, पण यहोवाला खूश करणं आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं असलं पाहिजे. टेहळणी बुरूज२५.०१ १७ ¶९-१०
शुक्रवार, २४ जुलै
प्रभू माझ्याजवळ उभा राहिला आणि त्याने मला शक्ती दिली.—२ तीम. ४:१७.
आज आपला छळ केला जातो, म्हणून आवेशाने प्रचार करण्यासाठी आपल्याला यहोवाच्या मदतीची गरज आहे. (प्रकटी. १२:१७) मग यहोवा आपल्याला मदत करेल याची खातरी आपण कशी बाळगू शकतो? योहानच्या १७ व्या अध्यायात येशूने जी प्रार्थना केली त्याकडे लक्ष द्या. येशूने यहोवाला अशी विनंती केली की त्याने प्रेषितांचा सांभाळ करावा आणि यहोवाने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. छळ होत असतानाही यहोवाने प्रेषितांना आवेशाने प्रचार करायला कशी मदत केली हे आपल्याला प्रेषितांची कार्यं पुस्तकात पाहायला मिळतं. येशूने आपल्या प्रार्थनेत यहोवाला अशीसुद्धा विनंती केली की प्रेषितांच्या संदेशावर विश्वास ठेवणाऱ्यांनाही त्याने सांभाळावं. यात आपणसुद्धा सामील आहोत. यहोवा आजही येशूच्या त्या प्रार्थनेचं उत्तर देतोय. त्याने जशी प्रेषितांना मदत केली तशी आपल्यालाही करेल. (योहा. १७:११, १५, २०) अंत जसजसा जवळ येतोय तसतसा आनंदाच्या संदेशाचा प्रचार करणं आपल्यासाठी आणखीन कठीण होऊ शकतं. पण येशूने आपल्याला खातरी दिली की हे काम आवेशाने करत राहण्यासाठी आपल्याला हवी असलेली मदत नक्की मिळेल.—लूक २१:१२-१५. टेहळणी बुरूज२५.०३ १७-१८ ¶१३-१४
शनिवार, २५ जुलै
माझे सेवक मोठ्याने जयघोष करतील.—यश. ६५:१४.
यहोवाने आपल्यासाठी जे केलंय त्याबद्दल कदर असल्यामुळे त्याचे लोक “मोठ्याने जयघोष” करतात. देवाच्या वचनातल्या प्रोत्साहन देणाऱ्या सत्यामुळे, सांत्वन देणाऱ्या अभिवचनांमुळे आणि ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर आधारित असलेल्या मजबूत आशेमुळे आपलं ‘मन आनंदी आहे.’ या सगळ्या गोष्टींबद्दल बोलल्यामुळे आपल्याला खरंच खूप आनंद होतो! (स्तो. ३४:८; १३३:१-३) आध्यात्मिक नंदनवनातली दोन मोठी वैशिष्ट्यं म्हणजे यहोवाच्या लोकांमध्ये असलेलं प्रेम आणि एकता. नवीन जगात आपलं जीवन कसं असेल याची कल्पना आपल्याला ‘ऐक्याच्या बंधनातून’ येते. नवीन जगात यहोवाच्या सेवकांमध्ये आता आहे त्यापेक्षाही जास्त प्रेम आणि एकता पाहायला मिळेल. (कलस्सै. ३:१४) त्यामुळे जर एखाद्याला खऱ्या अर्थाने आनंदी आणि समाधानी राहायचं असेल, तर त्याने आध्यात्मिक नंदनवनाचा अनुभव घेतला पाहिजे. जग यहोवाच्या सेवकांबद्दल काहीही विचार करत असलं तरी यहोवाच्या आणि त्याची उपासना करणाऱ्यांच्या नजरेत त्यांचं एक चांगलं नाव आहे.—यश. ६५:१५. टेहळणी बुरूज२४.०४ २१-२२ ¶७-८
रविवार, २६ जुलै
एकमेकांना बळकट करत राहा.—१ थेस्सलनी. ५:११.
ज्यांना लग्न करायची इच्छा आहे, त्यांना आपण कशी मदत करू शकतो? एक मार्ग म्हणजे आपण नेहमी विचार करून त्यांच्याशी बोललं पाहिजे. (इफिस. ४:२९) आपण स्वतःला विचारू शकतो: ‘लग्न करायची इच्छा असलेल्या भाऊबहिणींना मी नेहमी चिडवतो का, त्यांची चेष्टा करतो का? एखादा अविवाहित भाऊ आणि बहीण बोलत असतात, तेव्हा त्यांच्यात काहीतरी चाललंय असा समज मी करून घेतो का?’ (१ तीम. ५:१३) आपण कधीच अविवाहित भाऊबहिणींना त्यांनी जर लग्न केलं नाही, तर त्यांच्या जीवनात काहीतरी कमी आहे असं भासवायचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी आपण अविवाहित भाऊबहिणींची नेहमी प्रशंसा करायचा प्रयत्न केला पाहिजे. एखाद्या भावाचं किंवा बहिणीचं जुळू शकतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर काय? बायबल म्हणतं की आपण इतरांच्या भावनांचा विचार केला पाहिजे. (रोम. १५:२) बऱ्याच अविवाहित भाऊबहिणींना लग्नाच्या बाबतीत कोणी सुचवलेलं आवडत नाही. आणि आपण त्यांच्या इच्छांचा आदर केला पाहिजे. (२ थेस्सलनी. ३:११) काही जणांना कदाचित याबाबतीत आपण सुचवलेलं आवडत असेल, पण आपण हे त्यांच्या परवानगीशिवाय करू नये.—नीति. ३:२७. टेहळणी बुरूज२४.०५ २४-२५ ¶१४-१५
सोमवार, २७ जुलै
त्यांचा खडक आपल्या खडकासारखा नाही.—अनु. ३२:३१.
आपण अशा जगात राहतो जिथे अनपेक्षित घटना कधीही घडू शकतात. आणि त्यामुळे आपलं पूर्ण जीवनच बदलू शकतं. पण मदतीसाठी आपण यहोवाकडे वळू शकतो याबद्दल आपण त्याचे खरंच खूप आभारी आहोत. जेव्हा आपल्याला त्याची मदत अनुभवायला मिळते, तेव्हा आपल्याला याची खातरी होते, की यहोवा खरंच “जिवंत देव आहे.” (स्तो. १८:४६) पण हे सांगितल्यावर दावीदने देवाला ‘माझा खडक’ असं म्हटलं. तो एका जिवंत देवाची, यहोवाची तुलना खडकासारख्या निर्जीव वस्तूशी का करत होता? बायबलमध्ये “खडक” या शब्दचित्रावरून आपल्याला यहोवाच्या गुणांबद्दल शिकून घ्यायला मदत होते. बायबलच्या बऱ्याच उताऱ्यांमध्ये यहोवासारखं दुसरं कोणीच नाही हे सांगण्यासाठी आणि त्याची स्तुती करण्यासाठी या शब्दचित्राचा वापर करण्यात आलाय. यहोवाला “खडक” म्हटल्याचा सगळ्यात पहिला उल्लेख अनुवाद ३२:४ मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हन्नासुद्धा आपल्या प्रार्थनेत म्हणते “देवासारखा भक्कम खडक दुसरा कोणीही नाही.” (१ शमु. २:२) तसंच, हबक्कूकनेसुद्धा देवाला “माझ्या खडका” असं म्हटलं. (हब. १:१२) ७३ व्या स्तोत्राच्या लेखकानेसुद्धा देवाबद्दल बोलताना “देव माझा खडक आहे” असं म्हटलं. (स्तो. ७३:२६) आणि अगदी यहोवानेसुद्धा एका ठिकाणी स्वतःला ‘खडक’ म्हटलं.—यश. ४४:८. टेहळणी बुरूज२४.०६ २६ ¶१, ३
मंगळवार, २८ जुलै
[यहोशाफाटने] मनापासून यहोवाची सेवा केली.—२ इति. २२:९.
इस्राएलच्या ज्या राजांनी यहोवाला खूश केलं ते पूर्ण मनाने त्याची सेवा करत होते. योशीयाबद्दल बायबलमध्ये म्हटलंय: “पूर्ण मनाने . . . यहोवाकडे परत येणारा योशीयासारखा एकही राजा त्याच्याआधी नव्हता.” (२ राजे २३:२५) शलमोनबद्दल काय? त्याने नंतर वाईट गोष्टी केल्या. बायबल त्याच्याबद्दल म्हणतं: “त्याचं मन आपला देव यहोवा याच्याकडे पूर्णपणे नव्हतं.” (१ राजे ११:४) आणखी एक अविश्वासू राजा अबीयाम याच्याबद्दल बायबल म्हणतं: “त्याचं मन त्याचा देव यहोवा याच्याकडे पूर्णपणे नव्हतं.” (१ राजे १५:३) बायबलमध्ये सहसा “मन” किंवा “हृदय” हा शब्द एखादी व्यक्ती आतून कशी आहे याचं वर्णन करण्यासाठी वापरण्यात आलाय. यामध्ये त्याची इच्छा, विचार, स्वभाव, वृत्ती, क्षमता आणि ध्येयं सामील आहेत. पूर्ण मनाने यहोवाची उपासना करण्याचा काय अर्थ होतो? पूर्ण मनाने यहोवाची उपासना करणारी व्यक्ती उपासना फक्त केली पाहिजे म्हणून करत नाही. उलट आपल्या मनात गाढ आदर आणि प्रेम असल्यामुळे ती त्याची उपासना आयुष्यभर करत राहते. टेहळणी बुरूज२४.०७ २१ ¶४-५
बुधवार, २९ जुलै
माझे सर्व अपराध पुसून टाक.—स्तो. ५१:९.
यहोवा आपली पापं कशी पुसून टाकतो याचं वर्णन करण्यासाठी त्याने एका शब्दचित्राचा वापर केलाय. तो म्हणतो: “मी तुझे अपराध पुसून टाकीन, आणि तुझी पापं दाट ढगाने झाकून टाकीन.” (यश. ४४:२२) जेव्हा यहोवा आपल्याला क्षमा करतो, तेव्हा ती पापं नजरेआड व्हावीत म्हणून यहोवा जणू ती दाट ढगाने झाकून टाकतो. या शब्दचित्रांमधून आपल्याला काय शिकायला मिळतं? जेव्हा यहोवा आपल्या पापांची क्षमा करतो, तेव्हा अशा पापांचं ओझं आपल्याला आयुष्यभर सहन करायची गरज पडत नाही. कारण येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपली पापं पूर्णपणे रद्द केली जातात. त्या कर्जांची नोंदसुद्धा ठेवली जात नाही. जेव्हा आपण आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप करतो, तेव्हा यहोवा अशा प्रकारे आपल्याला क्षमा करतो. त्याच्यासोबतचं आपलं नातं पुन्हा पहिल्यासारखं होईल अशी खातरी आपण ठेवू शकतो. शिवाय, यहोवाच्या दयेमुळे आपल्याला अपराधीपणाच्या भावनेवर मात करायला मदत होते. टेहळणी बुरूज२५.०२ १० ¶११-१४
गुरुवार, ३० जुलै
देव दयाळूपणे तुला पश्चात्ताप करायला प्रवृत्त करायचा प्रयत्न करत आहे.—रोम. २:४.
जे वडील समितीमध्ये सेवा करतात त्यांना यहोवाने मंडळीला शुद्ध ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. (१ करिंथ. ५:७) पण, असं असलं तरी पाप करणाऱ्या व्यक्तीला मदत करण्यासाठी वडील शक्य ते सगळं करतात. म्हणून त्या व्यक्तीला मदत करताना त्यांची हीच आशा असते, की ती आपला मार्ग बदलेल. का? कारण त्यांना यहोवासारखं वागायचं असतं. तो “दयाळू आणि खूप करुणामय आहे.” (याको. ५:११) लक्ष द्या, प्रेषित योहानने त्याच्या काळातल्या भाऊबहिणींबद्दल अशीच प्रेमळ वृत्ती कशी दाखवली. त्याने लिहिलं: “माझ्या मुलांनो, मी तुम्हाला या गोष्टी यासाठी लिहीत आहे, की तुम्ही पाप करू नये. आणि तरीसुद्धा एखाद्याच्या हातून पाप घडलंच, तर पित्याजवळ आपल्यासाठी एक सहायक आहे, म्हणजे येशू ख्रिस्त, जो नीतिमान आहे.” (१ योहा. २:१) पण, दुःखाची गोष्ट म्हणजे कधीकधी गंभीर पाप करणारे भाऊबहीण पश्चात्ताप करायला नकार देतात. अशा वेळी त्यांना मंडळीतून काढून टाकावं लागतं. टेहळणी बुरूज२४.०८ २५ ¶१९-२०
शुक्रवार, ३१ जुलै
विश्वासात स्थिर राहा.—१ करिंथ. १६:१३.
तुम्ही कदाचित स्वतःची तुलना इतरांशी कराल. पण तसं करू नका. यहोवा कधीच अशी तुलना करत नाही. (गलती. ६:४) उदाहरणार्थ, मरीयाने येशूला सुगंधी तेल भेट म्हणून दिलं. (योहा. १२:३-५) याउलट, एका गरजू विधवेने मंदिराच्या दानपेटीत अतिशय कमी किंमतीची दोन लहान नाणी टाकली. (लूक २१:१-४) तरीसुद्धा, येशूने या दोन्ही गोष्टींकडे विश्वासाने दिलेली भेट म्हणूनच पाहिलं. तुम्ही याची खातरी ठेवू शकता, की तुम्ही जे काही करताय ते त्याच्यावर असलेल्या विश्वासामुळे आणि प्रेमामुळेच करताय, हे यहोवाला माहीत आहे. आणि ते तुम्हाला अगदी छोटंसं जरी वाटत असलं, तरी ते त्याच्यासाठी खूप मौल्यवान आहे. सगळ्यांच्याच मनात कधी-ना-कधी शंका येत असतात. पण देवाच्या भरवशालायक वचनामुळे, म्हणजेच बायबलमुळे आपल्याला त्या दूर करण्यासाठी मदत होऊ शकते. तुमच्या शंकांची जागा आत्मविश्वासाला घेऊ द्या. यहोवा आपल्या प्रत्येकाला वैयक्तिकपणे ओळखतो आणि आपण केलेल्या त्यागांची त्याला कदर आहे. त्यामुळे तो आपल्याला त्याचं प्रतिफळ नक्की देईल. यहोवा त्याच्या सर्व एकनिष्ठ सेवकांना त्याच्या प्रेमाच्या आणि काळजीच्या लायक समजतो. टेहळणी बुरूज२४.१० २५ ¶३; २९ ¶१७-१८