वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es26 पृ. ७१-८३
  • जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जून
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२६
  • उपशिर्षक
  • सोमवार, १ जून
  • मंगळवार, २ जून
  • बुधवार, ३ जून
  • गुरुवार, ४ जून
  • शुक्रवार, ५ जून
  • शनिवार, ६ जून
  • रविवार, ७ जून
  • सोमवार, ८ जून
  • मंगळवार, ९ जून
  • बुधवार, १० जून
  • गुरुवार, ११ जून
  • शुक्रवार, १२ जून
  • शनिवार, १३ जून
  • रविवार, १४ जून
  • सोमवार, १५ जून
  • मंगळवार, १६ जून
  • बुधवार, १७ जून
  • गुरुवार, १८ जून
  • शुक्रवार, १९ जून
  • शनिवार, २० जून
  • रविवार, २१ जून
  • सोमवार, २२ जून
  • मंगळवार, २३ जून
  • बुधवार, २४ जून
  • गुरुवार, २५ जून
  • शुक्रवार, २६ जून
  • शनिवार, २७ जून
  • रविवार, २८ जून
  • सोमवार, २९ जून
  • मंगळवार, ३० जून
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२६
es26 पृ. ७१-८३

जून

सोमवार, १ जून

हे यहोवा, तू चांगला आणि क्षमाशील आहेस.—स्तो. ८६:५.

ख्रिस्ताच्या खंडणीमुळे आपल्याला आजसुद्धा फायदा होतो. उदाहरणार्थ, खंडणीच्या आधारावर यहोवा आपली पापं क्षमा करतो. आपल्याला क्षमा करायला तो बांधील नाही, पण तरीसुद्धा त्याला आपल्याला क्षमा करायची इच्छा आहे. (स्तो. १०३:३, १०-१३) काही लोकांना असं वाटू शकतं, की ते यहोवाच्या क्षमेच्या लायक नाहीत. खरंतर आपल्यापैकी कोणीच यहोवाच्या क्षमेच्या लायक नाही. प्रेषित पौलला ही गोष्ट समजली होती म्हणून त्याने म्हटलं: “प्रेषित म्हणवून घ्यायचीसुद्धा माझी लायकी नाही.” पण तरीसुद्धा त्याने पुढे असं म्हटलं: “आज मी जो काही आहे, तो देवाच्या अपार कृपेमुळेच आहे.” (१ करिंथ. १५:९, १०) जेव्हा आपण आपल्या पापांसाठी पश्‍चात्ताप करतो तेव्हा यहोवा आपल्याला क्षमा करतो. का? आपण त्या लायक आहोत म्हणून? नाही. त्याचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही यहोवाच्या क्षमेच्या लायक नाही, तर काय? तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवू शकता की यहोवाने खंडणी बलिदानाची व्यवस्था पाप न करणाऱ्‍या माणसांसाठी नाही, तर पश्‍चात्ताप करणाऱ्‍या पापी माणसांसाठी केली आहे.—लूक ५:३२; १ तीम. १:१५. टेहळणी बुरूज२५.०१ २६-२७ ¶३-४

मंगळवार, २ जून

दयाळू माणसाच्या वागणुकीमुळे त्याला फायदा होतो, पण क्रूर माणूस स्वतःवर संकट ओढवून घेतो.—नीति. ११:१७.

दुसरे लोक आपल्याला काय म्हणतात किंवा आपल्यासोबत काय करतात हे आपल्या हातात नसतं. पण आपली प्रतिक्रिया काय असणार हे मात्र आपल्या हातात असतं. आणि क्षमा करणं ही सहसा सगळ्यात चांगली प्रतिक्रिया असते. का बरं? कारण आपलं यहोवावर प्रेम आहे. आणि त्याची इच्छा आहे की आपण दुसऱ्‍यांना क्षमा करावी. आपण जर राग धरून बसलो आणि क्षमा केली नाही, तर आपल्या हातून एखादी मूर्खपणाची गोष्ट घडू शकते. यामुळे आपल्याच आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. (नीति. १४:१७, २९, ३०) जेव्हा आपण आपला राग सोडून देतो तेव्हा मनातल्या कडवटपणामुळे आपण स्वतःचं नुकसान होऊ देत नाही. त्यासोबतच आपण त्याचत्याच गोष्टींवर विचार करत नाही आणि आयुष्यात पुढे वाटचाल करतो. अशा प्रकारे आपण स्वतःलाच एक भेट देत असतो. एखाद्याबद्दल राग किंवा नाराजी धरून राहायचं टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? एक मार्ग म्हणजे, स्वतःला सावरण्यासाठी वेळ द्या. जसं, गंभीरपणे जखमी झालेल्या व्यक्‍तीला वैद्यकीय उपचार मिळाल्यानंतर बरं व्हायला वेळ लागतो, तसं आपलं मन दुखावणाऱ्‍या व्यक्‍तीला माफ करण्याआधी आपल्याला भावनिक रित्या बरं व्हायला वेळ लागू शकतो. (उप. ३:३; १ पेत्र १:२२) यहोवाने इतरांना क्षमा करण्यासाठी आपल्याला मदत करावी म्हणून त्याला प्रार्थना करा. टेहळणी बुरूज२५.०२ १६-१७ ¶८-११

बुधवार, ३ जून

जड अन्‍न हे प्रौढ लोकांसाठी आहे.—इब्री ५:१४.

प्राथमिक शिकवणींमध्ये पश्‍चात्ताप, विश्‍वास, बाप्तिस्मा आणि पुनरुत्थान या गोष्टींचा समावेश होतो. (इब्री ६:१, २) या मूलभूत शिकवणी ख्रिस्ती विश्‍वासाचा पाया आहेत. यामुळेच पेन्टेकॉस्टच्या दिवशी जमलेल्या लोकांना प्रचार करताना प्रेषित पेत्रने या गोष्टींचा उल्लेख केला. (प्रे. कार्यं २:३२-३५, ३८) येशूचे शिष्य होण्यासाठी आपण या मूलभूत शिकवणी स्वीकारल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, पौलने म्हटलं की जे पुनरुत्थानावर विश्‍वास ठेवत नाहीत त्यांनी ख्रिस्ती विश्‍वासच नाकारला आहे. (१ करिंथ. १५:१२-१४) पण, सत्याच्या या मूलभूत गोष्टींवरच आपण समाधान नाही मानलं पाहिजे. मूलभूत शिकवणींच्या अगदी उलट, जड अन्‍नामध्ये यहोवाचे फक्‍त नियमच नाहीत तर तत्त्वंसुद्धा येतात. त्यामुळे आपल्याला यहोवाची विचारसरणी समजून घ्यायला मदत होते. जड अन्‍नाचा फायदा करून घ्यायला आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्यावर मनन केलं पाहिजे आणि देवाचं वचन जीवनात लागू केलं पाहिजे. असं केल्यामुळे आपण यहोवाला आवडतील असे निर्णय घ्यायला स्वतःला प्रशिक्षण देत असतो. टेहळणी बुरूज२४.०४ ५ ¶१२-१३

गुरुवार, ४ जून

न्यायाच्या वेळी निनवेचे लोक उठतील.—मत्त. १२:४१.

यहोवाने योनाला आठवण करून दिली, की निनवेच्या लोकांना ‘चांगल्यावाइटाचा फरकसुद्धा माहीत नाही.’ (योना १:१, २; ३:१०; ४:९-११) नंतर, येशूने त्यांचं उदाहरण देऊन लोकांना यहोवाच्या दयेबद्दल आणि न्यायाबद्दल शिकवलं. त्याने जेव्हा म्हटलं की निनवेचे लोक “न्यायाच्या” वेळी “उठतील,” तेव्हा तो कोणत्या न्यायाबद्दल बोलत होता? येशूने भविष्यात होणाऱ्‍या “न्यायाच्या पुनरुत्थानाबद्दल” सांगितलं होतं. (योहा. ५:२९) तो त्याच्या हजार वर्षांच्या राज्याबद्दल बोलत होता. तेव्हा “नीतिमान आणि अनीतिमान” अशा सगळ्या लोकांचं पुनरुत्थान होईल. (प्रे. कार्यं २४:१५) अनीतिमान लोकांसाठी हे “न्यायाचं पुनरुत्थान” असेल. म्हणजे पुनरुत्थान झाल्यावर ते शिकलेल्या गोष्टीप्रमाणे वागत आहेत की नाहीत, हे यहोवा आणि येशू पाहतील. जर समजा पुनरुत्थान झालेल्या निनवेमधल्या एका व्यक्‍तीने शुद्ध उपासनेला नकार दिला, तर त्याचा न्याय करून नाश केला जाईल. (यश. ६५:२०) पण यहोवाची विश्‍वासूपणे उपासना करायची निवड करणाऱ्‍या सगळ्यांचा न्याय केला जाईल आणि त्यांना कायमचं जीवन जगण्याची संधी दिली जाईल!—दानी. १२:२. टेहळणी बुरूज२४.०५ ५ ¶१३-१४

शुक्रवार, ५ जून

हरवलेल्यांना शोधायला आणि त्यांचं तारण करायलाच मनुष्याचा मुलगा आलाय.—लूक १९:१०.

आपल्या पित्याची दया कशी आहे याचं एक सुंदर चित्र येशूने मांडलं. (योहा. १४:९) आपल्या वागण्या-बोलण्यातून येशूने हे दाखवून दिलं की त्याच्या दयाळू पित्याचं लोकांवर प्रेम आहे. तसंच, पापाविरुद्ध लढण्यासाठी त्यांच्यापैकी प्रत्येकाला मदत करायची त्याच्या पित्याची इच्छा आहे, हेसुद्धा त्याने दाखवून दिलं. येशूने पापी लोकांना त्यांचा मार्ग बदलायला आणि त्याच्यामागे यायला मदत केली. (लूक ५:२७, २८) येशूला माहीत होतं की पुढे त्याच्यासोबत काय होणार होतं. म्हणूनच त्याने अनेकदा आपल्या शिष्यांना हे सांगितलं, की त्याचा विश्‍वासघात केला जाईल आणि त्याला वधस्तंभावर ठार मारलं जाईल. (मत्त. १७:२२; २०:१८, १९) पण त्याला हेसुद्धा माहीत होतं, की त्याच्या बलिदानामुळे या जगातल्या लोकांचं पाप दूर होणार होतं. येशूने हे शिकवलं की त्याने आपल्या जीवनाचं खंडणी बलिदान दिल्यानंतर, तो “सगळ्या प्रकारच्या लोकांना” त्याच्याकडे आकर्षित करेल. (योहा. १२:३२) येशूला आपला प्रभू मानून आणि त्याच्या पावलांवर चालून पापी लोक यहोवाला खूश करू शकणार होते. त्यांनी जर असं केलं तर ते “पापातून मुक्‍त होणार होते.” (रोम. ६:१४, १८, २२; योहा. ८:३२) आणि म्हणूनच येशू स्वेच्छेने आणि धैर्याने एका भयानक मृत्यूला सामोरा गेला.—योहा. १०:१७, १८. टेहळणी बुरूज२४.०८ ४-५ ¶११-१२

शनिवार, ६ जून

सगळ्या राष्ट्रांत आधी राज्याबद्दलच्या आनंदाच्या संदेशाची घोषणा होणं गरजेचं आहे.—मार्क १३:१०.

तुम्हाला देवाच्या वचनातून पहिल्यांदा सत्य कळलं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं त्याचा विचार करा. तुम्हाला कळलं की स्वर्गातल्या पित्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या उपासकांच्या कुटुंबाचा भाग बनावं. तसंच, त्याने सगळ्या समस्या काढून टाकायचं वचन दिलंय. शिवाय मृत्यूमध्ये गमावलेल्या तुमच्या जवळच्या लोकांना नवीन जगात पुन्हा भेटायची तुम्हाला आशा मिळाली. आणि अशा बऱ्‍याच गोष्टी तुम्हाला कळल्या होत्या. (मार्क १०:२९, ३०; योहा. ५:२८, २९; रोम. ८:३८, ३९; प्रकटी. २१:३, ४) या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही भारावून गेला होता. (लूक २४:३२) तुम्ही जे काही शिकत होता त्या गोष्टी तुम्हाला आवडत होत्या आणि त्याबद्दलचं प्रेम तुमच्या मनात वाढत होतं. आणि यामुळेच ही मौल्यवान सत्यं इतरांना सांगायची तुमची मनापासून इच्छा होत होती. (यिर्मया २०:९ सोबत तुलना करा.) जेव्हा सत्याबद्दलचं प्रेम आपल्या मनात रुजू लागतं, तेव्हा आपण शांत बसू शकत नाही. (लूक ६:४५) याबाबतीत आपल्याला पहिल्या शतकातल्या येशूच्या शिष्यांसारखंच वाटतं. त्यांनी म्हटलं होतं: “ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या आणि ऐकल्या आहेत त्यांबद्दल बोलायचं आम्ही थांबवू शकत नाही.” (प्रे. कार्यं ४:२०) आपल्या मनात सत्याबद्दलचं प्रेम इतकं जास्त आहे, की आपल्याला जास्तीत जास्त लोकांना त्याबद्दल सांगावंसं वाटतं. टेहळणी बुरूज२४.०५ १५ ¶५; १६ ¶७

रविवार, ७ जून

आनंदाने यहोवाची सेवा करा.—स्तो. १००:२.

यहोवाचे लोक या नात्याने आपण प्रचार करतो, कारण आपलं आपल्या स्वर्गातल्या पित्यावर खूप प्रेम आहे आणि इतरांना त्याच्याविषयी जाणून घ्यायला आपल्याला मदत करायची आहे. पण काहींना प्रचारातून आनंद मिळवणं कठीण जातं. कारण त्यांचा स्वभाव कदाचित लाजाळू असेल किंवा त्यांच्यात आत्मविश्‍वासाची कमी असेल. काहींना बोलवलं नसताना दुसऱ्‍यांच्या घरी जायला अवघडल्यासारखं वाटत असेल. किंवा काही जणांना भीती असेल की आपल्या बोलण्यामुळे समोरची व्यक्‍ती नाराज होईल. तर काहींना असं शिकवलेलं असेल की आपण दुसऱ्‍यांना विनाकारण त्रास देऊ नये. या भाऊबहिणींना अनोळखी लोकांना राज्याचा संदेश सांगणं कठीण जातं. तुम्हालाही कधीकधी या भाऊबहिणींसारखंच वाटतं का? जर वाटत असेल, तर निराश होऊ नका. जर तुमच्यात आत्मविश्‍वासाची कमी असेल, तर यावरून दिसतं की तुम्हाला इतरांचं लक्ष स्वतःकडे वेधायचं नाही. तसंच तुम्हाला इतरांशी विनाकारण वादही घालायचा नाही. शिवाय, इतरांना नाराज करायची कोणाचीच इच्छा नसते, इतरांसाठी चांगलं करायचा प्रयत्न करणाऱ्‍या व्यक्‍तीची तर मुळीच नसते. तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो हे तुमच्या स्वर्गातल्या पित्याला चांगलं माहीत आहे आणि तुम्हाला गरजेच्या गोष्टी पुरवून मदत करायची त्याची इच्छा आहे.—यश. ४१:१३. टेहळणी बुरूज२४.०४ १४-१५ ¶१-२

सोमवार, ८ जून

जे आपल्या मर्यादांची जाणीव ठेवतात, त्यांच्याकडे बुद्धी असते.—नीति. ११:२.

बायबल वाचत असताना, वाचलेल्या सगळ्याच गोष्टी एकाच वेळी लागू करण्याऐवजी सुरुवातीला तुम्ही एक-दोन गोष्टी लागू करायचा प्रयत्न करू शकता. ही पद्धत वापरून पाहा: तुम्हाला ज्या गोष्टींवर काम करायचंय त्याची एक यादी तुम्ही बनवू शकता आणि त्यातल्या एक-दोन गोष्टी निवडून सगळ्यात आधी त्यांवर काम करू शकता. बाकीच्या गोष्टी तुम्हाला नंतर हळूहळू पूर्ण करता येतील. मग सगळ्यात आधी कोणत्या गोष्टीवर काम करायचं हे तुम्हाला कसं ठरवता येईल? तुम्हाला पूर्ण करायला सोपं जाईल अशा एखाद्या ध्येयापासून तुम्ही सुरुवात करू शकता. किंवा तुम्हाला कोणत्या बाबतीत जास्त सुधारणा करायची गरज आहे त्यानुसार तुम्ही तुमचं ध्येय ठरवू शकता. एकदा का तुम्ही तुमचं ध्येय ठरवलं, की वेगवेगळ्या प्रकाशनांमध्ये तुम्ही त्याबद्दल संशोधन करू शकता. तुमच्या ध्येयांबद्दल यहोवाला प्रार्थना करा. त्याने तुम्हाला ही ध्येयं पूर्ण करायला तुमच्यामध्ये ‘इच्छा निर्माण करावी आणि कार्य करायची ताकदही द्यावी,’ म्हणून तुम्ही त्याला विनंती करू शकता. (फिलिप्पै. २:१३) मग शिकलेल्या गोष्टी लागू करायचा प्रयत्न करा. तुमचं पहिलं ध्येय गाठल्यावर, कदाचित तुम्हाला दुसऱ्‍या ध्येयांवर काम करायची जास्त प्रेरणा मिळेल. खरंतर तुम्ही तुमच्या जीवनाच्या एखाद्या पैलूवर किंवा एखाद्या गुणाच्या बाबतीत प्रगती करता, तेव्हा कदाचित तुम्हाला इतर गोष्टींमध्येही असं करणं सोपं जाईल. टेहळणी बुरूज२४.०९ ६-७ ¶१३-१४

मंगळवार, ९ जून

या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे शुद्ध असल्याचं दाखवून दिलं.—२ करिंथ. ७:११.

तुमच्या हातून आधी घडलेल्या चुकांमुळे कदाचित इतरांचं मन दुखावलं गेलं असेल आणि म्हणून तुम्हाला खूप वाईट वाटत असेल. अशा वेळी कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला मदत होईल? त्यांची मनापासून माफी मागण्यासोबतच तुम्हाला त्यांच्यासाठी काही करता येत असेल तर ते करायचा पुरेपूर प्रयत्न करा. तुमच्या चुकीमुळे ज्यांचं नुकसान झालंय त्यांना यहोवाने मदत करावी म्हणून त्याला प्रार्थना करा. तो तुमच्यासोबत त्यांनाही धीर धरायला आणि पुन्हा शांतीने राहायला मदत करेल. आधी केलेल्या चुकांमधून शिका आणि ज्या मार्गाने यहोवाला तुमचा वापर करायचा आहे त्या मार्गाने तुमचा वापर व्हावा यासाठी तयार असा. योना संदेष्ट्याच्या उदाहरणाचा विचार करा. यहोवाने त्याला निनवेला जायला सांगितलं होतं. पण तो विरुद्ध दिशेला पळाला. त्यामुळे यहोवाने त्याला सुधारलं आणि तोही त्याच्या चुकांमधून शिकला. (योना १:१-४, १५-१७; २:७-१०) यहोवाने त्याच्याबद्दल आशा सोडली नाही. त्याने त्याला निनवेला जायची आणखी एक संधी दिली. आणि या वेळी त्याने ती आज्ञा लगेच पाळली. त्याला जरी त्याच्या चुकीबद्दल वाईट वाटत असलं, तरी यहोवाकडून मिळालेल्या नवीन नेमणुकीवर त्याने त्याचा परिणाम होऊ दिला नाही.—योना ३:१-३. टेहळणी बुरूज२४.१० ९-१० ¶१०-११

बुधवार, १० जून

म्हणून पश्‍चात्ताप करा आणि मागे वळा, म्हणजे तुमची पापं पुसून टाकली जातील. आणि खुद्द यहोवाकडून तुम्हाला तजेला मिळेल.—प्रे. कार्यं ३:१९.

यहोवा आपली कर्जं किंवा पापं फक्‍त माफच करत नाही, तर ती पूर्णपणे पुसून टाकतो. हे समजून घेण्यासाठी अशी कल्पना करा की तुम्ही एका माणसाकडून कर्ज घेतलंय. पण तो त्या कर्जाच्या किंमतीवर फुली मारतो. त्याने फुली मारलेली असली, तरी त्याखालचे आकडे दिसत असतात. पण एखादी लिहिलेली गोष्ट पुसून टाकणं यापेक्षा खूप वेगळं आहे. हे शब्दचित्र समजून घ्यायला आपण जुन्या काळात ज्या प्रकारची शाई वापरली जायची त्याचा विचार करू या. त्या शाईने जे काही लिहिलं जायचं ते पाण्याने पुसून टाकता यायचं. त्यामुळे एक व्यक्‍ती सहज ओलं कापड घेऊन लिहिलेलं सगळं काही पुसून टाकू शकत होती. जेव्हा एखादं कर्ज ‘पुसून टाकलं’ जायचं, तेव्हा ते पूर्णपणे नाहीसं व्हायचं; जणू ते कर्ज कधी घेतलंच नव्हतं. यहोवा आपली पापं फक्‍त माफच करत नाही, तर तो ती पूर्णपणे पुसून टाकतो. हे समजल्यामुळे आपल्याला खरंच किती बरं वाटतं!—स्तो. ५१:९. टेहळणी बुरूज२५.०२ १० ¶११

गुरुवार, ११ जून

संतापाच्या भरात वाईट गोष्टी करू नकोस.—स्तो. ३७:८.

जेव्हा इतर जण आपल्याबद्दल चुकीचं मत बनवतात किंवा आपल्याशी वाईट वागतात तेव्हा खरं काय आहे ते यहोवाला माहीत आहे, असा भरवसा आपण ठेवू शकतो. या भरवशामुळे आपल्याला ती गोष्ट सहन करायला मदत होते. कारण यहोवा योग्य वेळी सगळ्या गोष्टी ठीक करेल हे आपल्याला माहीत असतं. सगळ्या गोष्टी यहोवाच्या हाती सोपवून दिल्यामुळे आपण मनात राग धरून बसत नाही किंवा कोणाबद्दल द्वेष बाळगत नाही. कारण यामुळे आपल्या हातून काहीतरी वाईट होऊ शकतं, आपला आनंद नाहीसा होऊ शकतो आणि यहोवासोबतचा आपला नातेसंबंध धोक्यात येऊ शकतो. हे खरंय की आपण येशूच्या उदाहरणाचं अनुकरण पूर्णपणे कधीच करू शकत नाही. कधीकधी आपण असं काहीतरी बोलतो किंवा करतो, ज्याचा नंतर आपल्याला पस्तावा होतो. (याको. ३:२) आपल्यावर झालेल्या अन्यायाचा आपल्याला भावनिक किंवा शारीरिक त्रास होऊ शकतो आणि आपल्याला त्याचे परिणाम आयुष्यभर सहन करावे लागू शकतात. तुमच्यासोबत असं झालं असेल तर याची खातरी असू द्या, की तुम्ही कशातून जात आहात, हे यहोवाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. येशूलासुद्धा अन्यायाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याला तुमच्याबद्दल सहानुभूती वाटते. (इब्री ४:१५, १६) यहोवाने अन्यायाचा सामना करण्यासाठी आपल्याला व्यावहारिक सल्ले दिले आहेत ही किती आनंदाची गोष्ट आहे! टेहळणी बुरूज२४.११ ६ ¶१२-१३

शुक्रवार, १२ जून

देवाने ज्याला पाठवलं त्याच्यावर विश्‍वास ठेवा, म्हणजे तुम्हाला देवाची पसंती मिळेल.—योहा. ६:२९.

‘सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी’ येशूवर विश्‍वास ठेवणं गरजेचं होतं. (योहा. ३:१६-१८, ३६; १७:३) पण ही गोष्ट बऱ्‍याच यहुद्यांनी स्वीकारली नाही. त्यांनी त्याला विचारलं: “आम्ही पाहून विश्‍वास ठेवावा म्हणून तू कोणता चमत्कार करणार आहेस?” (योहा. ६:३०) त्यांनी म्हटलं, की मोशेच्या काळात त्यांच्या पूर्वजांना मान्‍ना मिळाला होता. तो त्यांच्यासाठी भाकरीसारखाच होता. (नहे. ९:१५; स्तो. ७८:२४, २५) हे तर स्पष्टच होतं की त्यांचं संपूर्ण लक्ष खरोखरच्या भाकरीवर म्हणजे फक्‍त त्यांचं पोट भरण्यावर होतं. येशूने जेव्हा त्यांना ‘स्वर्गातल्या खऱ्‍या भाकरीबद्दल’ सांगितलं, तेव्हा त्यांनी त्याला त्याबद्दल आणखी काहीच विचारलं नाही. त्यांच्या पूर्वजांना मान्‍नामुळे सर्वकाळाचं जीवन मिळालं नव्हतं. पण स्वर्गातल्या खऱ्‍या भाकरीमुळे त्यांना सर्वकाळाचं जीवन मिळणार होतं. (योहा. ६:३२) आपली भूक भागवण्याकडे त्यांचं इतकं लक्ष होतं, की सर्वकाळाचं जीवन मिळवण्याबद्दल येशू त्यांना जे सांगत होता त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. टेहळणी बुरूज२४.१२ ५-६ ¶१०-११

शनिवार, १३ जून

ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या तो देव आहे.—इब्री ३:४.

शाळेत तुमच्या मुलांना कदाचित सृष्टीत दिसणाऱ्‍या गोष्टींच्या इतर डिझाइनबद्दल शिकायला मिळेल. उदाहरणार्थ, बऱ्‍याच झाडांच्या रचनेत एकसारखेपणा दिसून येतो. जसं की, खोडांमधून शाखा तयार होतात, शाखांमधून फांद्या आणि फांद्यांमधून आणखी छोट्या फांद्या तयार होतात. या विशिष्ट रचनेला इंग्रजीमध्ये फ्रॅक्टल म्हटलं जातं. अशा प्रकारची रचना सृष्टीतल्या इतर गोष्टींमध्येही दिसून येते. पण अशा प्रकारची सुंदर रचना करणारा कोण असेल? तुमची मुलं यहोवाने निर्माण केलेल्या अद्‌भुत गोष्टींवर जितका जास्त विचार करतील, तितकं जास्त त्यांना खातरी पटेल की यहोवानेच सर्वकाही निर्माण केलंय. तसंच, तुम्ही त्यांना हा प्रश्‍न विचारू शकता: “जर देवाने आपल्याला निर्माण केलंय तर आनंदी राहायला काय करणं गरजेचं आहे हे तोच आपल्याला सांगू शकत नाही का?” मग तुम्ही त्यांना सांगू शकता, की आपण आनंदी कसं राहू शकतो याबद्दल बायबलमध्ये सांगितलंय. टेहळणी बुरूज२४.१२ १६ ¶८

रविवार, १४ जून

मला असं सांगण्यात आलं आहे की तुमच्यामध्ये एक जण अनैतिक लैंगिक कृत्यांबद्दल दोषी आहे. त्याचे आपल्याच वडिलांच्या बायकोसोबत संबंध आहेत. अशी अनैतिकता तर विदेश्‍यांमध्येही केली जात नाही.—१ करिंथ. ५:१.

देवाच्या प्रेरणेने प्रेषित पौलने मंडळीला एक पत्र लिहिलं. त्यात त्याने सांगितलं, की पश्‍चात्ताप न करणाऱ्‍या पापी व्यक्‍तीला मंडळीतून काढून टाकलं जावं. (१ करिंथ. ५:१३) मग इतर विश्‍वासू भाऊबहिणींनी त्याच्याशी कसं वागयचं होतं? पौलने त्यांना ‘अशा माणसाची संगत सोडून द्यायला’ सांगितलं. याचा काय अर्थ होता? पौलने त्यांना सांगितलं, की त्यांनी ‘त्याच्यासोबत जेवायलाही बसू नये.’ (१ करिंथ. ५:११) कारण आपण जेव्हा एखाद्यासोबत जेवतो, तेव्हा आपण त्याच्यासोबत वेळ घालवत असतो. स्पष्टच आहे, पौलला मंडळीला हे सांगायचं होतं, की त्यांनी अशा माणसासोबत ऊठबस करू नये. यामुळे त्याच्या वाईट प्रभावापासून मंडळीचं संरक्षण होणार होतं. (१ करिंथ. ५:५-७) तसंच, त्या माणसाला याची जाणीव झाली असती, की तो यहोवापासून किती दूर गेलाय. आणि वाईट वाटल्यामुळे त्याला पश्‍चात्ताप करायला मदत झाली असती. टेहळणी बुरूज२४.०८ १५-१६ ¶४-५

सोमवार, १५ जून

देवाने जगावर इतकं प्रेम केलं, की त्याने आपला एकुलता एक मुलगा दिला.—योहा. ३:१६.

इस्राएलमध्ये दर वर्षी प्रायश्‍चित्ताचा दिवस साजरा केला जायचा. त्या दिवशी मुख्य याजक लोकांच्या वतीने प्राण्यांचं अर्पण द्यायचा. खरंतर या प्राण्यांच्या बलिदानांमुळे कोणाच्याही पापांचं पूर्णपणे प्रायश्‍चित्त होऊ शकत नव्हतं. कारण प्राण्यांचा दर्जा मानवांपेक्षा कमी आहे. पण जोपर्यंत पश्‍चात्तापी इस्राएली लोक यहोवाने अपेक्षा केल्याप्रमाणे ही अर्पणं त्याला द्यायचे, तोपर्यंत तो त्यांच्या पापांची क्षमा करायला तयार होता. (इब्री १०:१-४) प्रायश्‍चित्ताच्या दिवशी इस्राएली लोकांना या गोष्टीची जाणीव होत होती, की ते खूप पापी आहेत. पण मानवजातीच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून एक कायमची व्यवस्था करायची यहोवाच्या मनात इच्छा होती. म्हणून त्याने आपल्या प्रिय मुलाला ‘पुष्कळ लोकांच्या पापांचा भार वाहून न्यायला सर्वकाळासाठी एकदाच अर्पण’ द्यायची व्यवस्था केली. (इब्री ९:२८) म्हणून येशूने “बऱ्‍याच जणांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून” दिलं.—मत्त. २०:२८. टेहळणी बुरूज२५.०२ ४ ¶९-१०

मंगळवार, १६ जून

मोहात पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करत राहा.—मत्त. २६:४१.

“मन तर उत्सुक आहे, पण शरीर दुर्बळ आहे.” (मत्त. २६:४१ख) या शब्दांवरून येशूने दाखवून दिलं की त्याला आपल्या अपरिपूर्ण स्थितीची जाणीव आहे. तसंच, त्याच्या या शब्दांमध्ये एक ताकीदही आहे. ती म्हणजे, आपल्या हातून कधीच पाप घडणार नाही असा आत्मविश्‍वास आपण कधीच बाळगू नये. येशूने हे शब्द म्हटले त्याच्या काही तासांआधी शिष्यांनी वचन दिलं होतं की ते त्याला कधीच सोडून जाणार नाही. (मत्त. २६:३५) त्यांना योग्य तेच करायचं होतं, पण कठीण परिस्थिती आल्यावर ते किती सहजासहजी कमजोर पडतील हे त्यांच्या लक्षातही आलं नाही. म्हणून येशूने त्यांना जी ताकीद दिली ती आपल्याला आजच्या वचनात वाचायला मिळते. मग जेव्हा येशूला अटक करण्यात आली, तेव्हा ते त्याच्यासोबत राहिले की पळून जायच्या मोहाला बळी पडले? दुःखाची गोष्ट म्हणजे येशूचे शिष्य सावध राहायला चुकले. ते जे बोलले त्याच्या अगदी उलट त्यांनी केलं. ते त्याला सोडून पळून गेले.—मत्त. २६:५६. टेहळणी बुरूज२४.०७ १४ ¶१-२

बुधवार, १७ जून

देवाच्या मुलाच्या मृत्यूद्वारे आपला देवाशी समेट झाला.—रोम. ५:१०.

आदाम आणि हव्वाने त्यांचा पिता, यहोवा याच्यासोबत असलेलं त्यांचं मौल्यवान नातं गमावलं. सुरुवातीला आदाम आणि हव्वा देवाच्या कुटुंबाचाच एक भाग होते. (लूक ३:३८) पण जेव्हा त्यांनी यहोवाची आज्ञा मोडली, तेव्हा त्यांना त्या कुटुंबातून काढून टाकण्यात आलं. तोपर्यंत त्यांना मुलं झाली नव्हती. (उत्प. ३:२३, २४; ४:१) त्यामुळे त्यांची मुलं या नात्याने आपण यहोवाशी समेट करणं गरजेचं आहे. (रोम. ५:१०, ११) दुसऱ्‍या शब्दांत, आपण त्याच्यासोबत चांगलं नातं जोडणं गरजेचं आहे. एका संदर्भ ग्रंथात म्हटल्याप्रमाणे इथे “समेट” यासाठी वापरण्यात आलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ “शत्रूपासून मित्र बनणं” असा होऊ शकतो. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, हे शक्य करण्यासाठी यहोवानेच पुढाकार घेतला. तो कसा? यहोवाने त्याच्यामध्ये आणि पापी मानवांमध्ये चांगलं नातं पुन्हा जोडण्यासाठी केलेल्या प्रायश्‍चित्ताच्या व्यवस्थेद्वारे. आदामने एक खूप मोलाची गोष्ट गमावली होती. ती गोष्ट परत मिळवण्यासाठी यहोवाने त्याच किंमतीची दुसरी गोष्ट द्यायची व्यवस्था केली. टेहळणी बुरूज२५.०२ ३-४ ¶७-८

गुरुवार, १८ जून

देवाच्या इच्छेप्रमाणे असलेल्या दुःखामुळे पश्‍चात्ताप उत्पन्‍न होऊन तारण होतं.—२ करिंथ. ७:१०.

प्रेषित पौलने म्हटलं, की “त्या माणसाला बहुतेक जणांनी जे ताडन दिलं आहे, ते पुरेसं आहे.” (२ करिंथ. २:५-८) दुसऱ्‍या शब्दांत, आपल्याच वडिलांच्या बायकोसोबत ज्याने आधी संबंध ठेवले होते, त्याला मिळालेल्या ताडनाचा उद्देश पूर्ण झाला होता. (१ करिंथ. ५:१) कोणता उद्देश? त्याला पश्‍चात्ताप करायला मदत करायचा. (इब्री १२:११) पौलने मंडळीला सांगितलं: “तुम्ही त्याला प्रेमळपणे क्षमा करून सांत्वन द्या . . . त्याला तुमच्या प्रेमाचं आश्‍वासन द्या.” लक्ष द्या, पौलची इच्छा होती, की मंडळीने त्या व्यक्‍तीला पुन्हा आपल्यात घ्यावं. पण त्यासोबतच त्यांनी आपल्या वागण्या-बोलण्यातून त्याला याची जाणीव करून द्यावी, की त्यांनी त्याला मनापासून क्षमा केली आहे आणि त्यांचं त्याच्यावर प्रेम आहे. यामुळे हे दिसणार होतं, की तो मंडळीत पुन्हा आल्यामुळे त्यांना आनंद झालाय. टेहळणी बुरूज२४.०८ १५ ¶४; १६-१७ ¶६-८

शुक्रवार, १९ जून

जाहीरपणे तुमचा अपमान आणि छळ करण्यात आला.—इब्री १०:३३.

धीर धरण्यासाठी कशाची गरज आहे, हे प्रेषित पौलला चांगलं माहीत होतं. त्याने ख्रिश्‍चनांना याची आठवण करून दिली की परीक्षांचा सामना करताना त्यांनी स्वतःवर नाही, तर यहोवावर अवलंबून राहणं गरजेचं आहे. यामुळे पौल धाडसाने म्हणू शकला: “यहोवा मला साहाय्य करतो; मी घाबरणार नाही.” (इब्री १३:६) आपल्या काही भाऊबहिणींना आजही छळाचा सामना करावा लागतोय. अशा वेळी, त्यांना प्रेम आणि आधार द्यायचा एक मार्ग म्हणजे आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो आणि कधीकधी त्यांच्या गरजेच्या गोष्टी पुरवून त्यांना मदत करू शकतो. पण बायबल स्पष्टपणे सांगतं की, “ख्रिस्त येशूमध्ये देवाची भक्‍ती करत जीवन जगू इच्छिणाऱ्‍या सगळ्यांचा छळ केला जाईल.” (२ तीम. ३:१२) या कारणासाठी आपण सगळ्यांनीच पुढे येणाऱ्‍या गोष्टींसाठी तयार असलं पाहिजे. म्हणून आपण यहोवावर पूर्ण भरवसा ठेवू या आणि पुढे कुठलीही परीक्षा आली तरी तिचा सामना करायला तो आपल्याला मदत करेल अशी खातरी बाळगू या. काही काळाने, तो सर्व विश्‍वासू उपासकांची या सगळ्यातून सुटका करेल.—२ थेस्सलनी. १:७, ८. टेहळणी बुरूज२४.०९ १३ ¶१७-१८

शनिवार, २० जून

हे ऐकल्यावर करिंथमधल्या बऱ्‍याच लोकांनीही विश्‍वास ठेवला आणि बाप्तिस्मा घेतला.—प्रे. कार्यं १८:८.

करिंथमधल्या लोकांना बाप्तिस्मा घ्यायला कशामुळे मदत झाली? (२ करिंथ. १०:४, ५) देवाच्या वचनामुळे आणि त्याच्या पवित्र शक्‍तीच्या ताकदीमुळे ते आपल्या जीवनात मोठमोठे बदल करू शकले. (इब्री ४:१२) करिंथमधल्या लोकांनी ख्रिस्ताबद्दलचा आनंदाचा संदेश स्वीकारला. त्यामुळे ते दारुडेपणा, चोरी आणि समलैंगिकता यांसारख्या वाईट सवयीसुद्धा सोडून देऊ शकले. (१ करिंथ. ६:९-११) लक्ष द्या, करिंथमधल्या काहींना सहजासहजी न सुटणाऱ्‍या वाईट सवयी होत्या. पण त्यांनी असा विचार केला नाही की त्यांना ख्रिस्ती बनणं कठीण होईल. सर्वकाळाच्या जीवनाकडे जाणाऱ्‍या अरुंद रस्त्यावर चालण्यासाठी त्यांनी मनापासून मेहनत घेतली. (मत्त. ७:१३, १४) बाप्तिस्मा घेता यावा म्हणून एखादी वाईट सवय सोडण्यासाठी तुम्हीही लढत आहात का? असं असेल, तर हार मानू नका. वाईट इच्छेवर मात करायला यहोवाने तुम्हाला त्याची पवित्र शक्‍ती द्यावी म्हणून त्याला कळकळून विनंती करा. टेहळणी बुरूज२५.०३ ६ ¶१५-१७

रविवार, २१ जून

तुमच्यापैकी कोणाला बुद्धीची गरज असली, तर त्याने ती देवाजवळ मागत राहावी.—याको. १:५.

अमुक एक निर्णय यहोवाला आवडतो की नाही हे समजून घ्यायला तो आपल्याला बुद्धी देईल असं त्याने वचन दिलंय. तो “कोणालाही कमी न लेखता सगळ्यांना उदारपणे बुद्धी देतो.” मार्गदर्शनासाठी यहोवाला प्रार्थना केल्यानंतर तो काय उत्तर देतो याकडे लक्ष द्या. उदाहरणार्थ, तुम्ही प्रवासात वाट चुकला, तर तुम्ही तिथल्या एखाद्या माणसाकडे मदत मागाल. पण तो उत्तर देण्याआधीच तुम्ही तिथून निघून जाल का? नक्कीच नाही. तुम्ही त्याचं लक्ष देऊन ऐकाल. त्याच प्रकारे यहोवाकडे बुद्धीसाठी प्रार्थना केल्यानंतर, त्याचं उत्तर काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. हे तुम्ही कसं करू शकता? आपल्या परिस्थितीला कोणती बायबल तत्त्वं आणि नियम लागू होतात हे शोधून तुम्ही असं करू शकता. उदाहरणार्थ, एखाद्या पार्टीला जायचं की नाही हे ठरवताना त्याबद्दल बायबल काय म्हणतं हे तुम्ही तपासून पाहू शकता; जसं की, बेधुंद पार्ट्यांबद्दल, वाईट संगतीबद्दल आणि स्वतःच्या इच्छा-आकांक्षांपेक्षा राज्याला पहिली जागा देण्याबद्दल माहिती शोधू शकता.—मत्त. ६:३३; रोम. १३:१३; १ करिंथ. १५:३३. टेहळणी बुरूज२५.०१ १६ ¶६-७

सोमवार, २२ जून

पाहा! माझे सेवक पोटभर खातील, पण तुम्ही उपाशीच राहाल.—यश. ६५:१३.

यशयाच्या भविष्यवाणीत आध्यात्मिक नंदनवनात राहणाऱ्‍या लोकांमध्ये आणि बाहेर राहणाऱ्‍या लोकांमध्ये असलेला मोठा फरक स्पष्टपणे पाहायला मिळतो. यहोवा त्याच्या सेवकांच्या आध्यात्मिक गरजा उदारतेने पूर्ण करतो. आपल्याकडे त्याची पवित्र शक्‍ती आहे, त्याचं वचन आहे आणि भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्‍न आहे. यामुळे आपण ‘पोटभर खाऊ शकतो, आपली तहान भागवू शकतो आणि आनंद साजरा करू शकतो.’ (प्रकटीकरण २२:१७ सोबत तुलना करा.) याच्या अगदी उलट, आध्यात्मिक नंदनवनाच्या बाहेर असलेले लोक “उपाशीच” आणि “तहानलेलेच” राहतात आणि यामुळे ते “लज्जित” होतात. कारण त्यांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण होत नाहीत. (आमो. ८:११) यहोवा त्याच्या लोकांना गरजेचं आणि त्यासोबतच आध्यात्मिक अन्‍न अगदी उदारतेने पुरवतो. (योए. २:२१-२४) हे आध्यात्मिक अन्‍न तो बायबल, बायबल आधारित साहित्यं, वेबसाईट तसंच सभांमधून, संमेलनांमधून आणि अधिवेशनांमधून पुरवतो. आपण दररोज हे आध्यात्मिक अन्‍न घेऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला आरोग्यदायी आणि ताजंतवानं वाटू शकतं. टेहळणी बुरूज२४.०४ २१ ¶५-६

मंगळवार, २३ जून

तुमचं बोलणं नेहमी प्रेमळ असावं.—कलस्सै. ४:६.

जर तुम्हाला कोणासोबत डेटींग करायची इच्छा असेल, तर त्यासाठी तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी किंवा फोनवर त्या व्यक्‍तीसोबत बोलू शकता. त्या व्यक्‍तीला आपल्या हेतूबद्दल स्पष्टपणे सांगा. (१ करिंथ. १४:९) आणि जर गरज असेल तर त्या व्यक्‍तीला उत्तरासाठी पुरेसा वेळ द्या. (नीति. १५:२८) जर त्या व्यक्‍तीची तुमच्यासोबत डेटींग करायची इच्छाच नसेल तर तिच्या भावनांचा आदर करा. जर एखाद्या व्यक्‍तीने तुम्हाला डेटींगसाठी विचारलं असेल, तर काय? तुम्हाला विचारण्यासाठी नक्कीच त्या व्यक्‍तीला धाडस लागलं असेल. म्हणून त्या व्यक्‍तीशी प्रेमाने आणि आदराने बोला. जर तुम्हाला उत्तर द्यायला वेळ लागणार असेल तर तसं तिला सांगा. पण उत्तर द्यायला खूप जास्त वेळ लावू नका. (नीति. १३:१२) जर तुम्हाला त्या व्यक्‍तीसोबत डेटींग करायची इच्छा नसेल, तर तिच्या भावना न दुखावता, पण स्पष्टपणे सांगा. पण जर तुम्हाला त्या व्यक्‍तीसोबत डेटींग करायची इच्छा असेल, तर डेटींगविषयी तुमच्या भावना आणि अपेक्षा काय आहेत हे त्या व्यक्‍तीला सांगा. कारण कदाचित तुमच्या आणि तिच्या अपेक्षा वेगवेगळ्या असू शकतात. टेहळणी बुरूज२४.०५ २३-२४ ¶१२-१३

बुधवार, २४ जून

मी सैन्यांचा देव यहोवा याच्या नावाने तुझ्याकडे येतोय.—१ शमु. १७:४५.

दावीद इस्राएलच्या सैन्याच्या छावणीत गेला तेव्हा कदाचित तो तरुणच असावा. त्याने पाहिलं की सैनिक खूप घाबरले होते, कारण गल्याथ नावाचा एक महाकाय पलिष्टी “इस्राएलच्या सैन्याला आव्हान” देत होता. (१ शमु. १७:१०, ११) आपल्यासमोर असलेल्या या महाकाय गल्याथवर आणि त्याच्या आव्हानांवर सैनिकांचं लक्ष होतं. त्यामुळे सैनिक खूप घाबरून गेले होते. (१ शमु. १७:२४, २५) पण दावीद मात्र या परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघत होता. जे काही चाललंय ते इस्राएलच्या सैन्याच्या विरोधात नाही, तर ‘जिवंत देवाच्या सैन्याच्या’ विरोधात चाललंय, या दृष्टिकोनातून तो त्याकडे पाहत होता. (१ शमु. १७:२६) दावीद त्या गल्याथचा नाही तर यहोवाचा विचार करत होता. मेंढपाळ असताना ज्या देवाने त्याला मदत केली, तो आताही त्याला मदत करेल असा भरवसा त्याला होता. देवाच्या पाठिंब्यामुळेच दावीद गल्याथचा सामना करू शकला आणि साहजिकच तो जिंकला!—१ शमु. १७:४५-५१. टेहळणी बुरूज२४.०६ २१ ¶७

गुरुवार, २५ जून

भिऊ नकोस, मी तुझ्यासोबत आहे. घाबरू नकोस, मी तुझा देव आहे. मी तुला बळ देईन; हो, मी तुला मदत करीन. नीतिमत्त्वाच्या माझ्या उजव्या हाताने मी तुला आधार देईन.—यश. ४१:१०.

कल्पना करा की आपण यहोवाची सेवा करत नसतो, तर काय झालं असतं. असं केल्यामुळे आपल्याला यहोवाला विश्‍वासू राहायला आणि स्तोत्रकर्त्याने जसं म्हटलं, तसं म्हणायला मदत होईल. त्याने म्हटलं: “माझ्यासाठी तर देवाच्या जवळ जाणं हेच हिताचं आहे.” (स्तो. ७३:२८) या शेवटच्या दिवसांत आपल्यापुढे कुठलीही समस्या आली, तरी आपण त्याचा सामना करू शकतो. कारण, आपण एका “जिवंत आणि खऱ्‍या देवाची सेवा करत आहोत.” (१ थेस्सलनी. १:९) आपला देव, ही एक अशी खरीखुरी व्यक्‍ती आहे, जी त्याची उपासना करणाऱ्‍यांच्या वतीने कार्य करते. भूतकाळात त्याने त्याच्या सेवकांची साथ कधीच सोडली नाही आणि तो आजही आपल्यासोबत आहे. आपण लवकरच या पृथ्वीवर येणाऱ्‍या सर्वात मोठ्या संकटाचा सामना करणार आहोत. पण त्या वेळी आपण एकटे नसू. म्हणूनच आपण सगळे “धैर्याने असं म्हणू शकतो: ‘यहोवा मला साहाय्य करतो; मी घाबरणार नाही.’”—इब्री १३:५, ६. टेहळणी बुरूज२४.०६ २५ ¶१७-१८

शुक्रवार, २६ जून

तुम्हाला नीतिमान आणि दुष्ट माणसातला फरक दिसून येईल.—मला. ३:१८.

बायबलमध्ये अशा ४० पेक्षा जास्त पुरुषांची नावं दिली आहेत, ज्यांनी इस्राएलचे राजे म्हणून राज्य केलं. चांगल्या राजांनीसुद्धा काही वाईट कामं केली. जसं की दावीद राजाच्या उदाहरणावर विचार करा. यहोवाने त्याच्याबद्दल म्हटलं: ‘माझा सेवक दावीद माझ्या दृष्टीने जे योग्य ते करून मनापासून माझ्या मार्गांवर चालला.’ (१ राजे १४:८) यहोवाने त्याच्याबद्दल असं म्हटलं असलं तरी त्याने विवाहित स्त्रीसोबत अनैतिक काम केलं. इतकंच काय तर तिच्या पतीला कट रचून युद्धात मारलंसुद्धा. (२ शमु. ११:४, १४, १५) याउलट बऱ्‍याच अविश्‍वासू राजांनी काही चांगली कामंसुद्धा केली. रहबामचाच विचार करा. यहोवाच्या नजरेत तो “वाईट कामं करत राहिला.” (२ इति. १२:१४) असं असलं तरी त्याने काही चांगली कामंसुद्धा केली. यहोवाने त्याला आज्ञा दिली होती की त्याने इस्राएलच्या दहा वंशांसोबत लढू नये आणि त्यांना त्याचा राजा निवडू द्यावा. यहोवाची ही आज्ञा त्याने पाळली. तसंच त्याने देशाची शहरं मजबूत केली आणि त्यामुळे इस्राएल राष्ट्राला फायदा झाला. (१ राजे १२:२१-२४; २ इति. ११:५-१२) यहोवाच्या नजरेत एक राजा विश्‍वासू आहे की नाही हे तो कसं ठरवायचा? इस्राएलच्या राजांचं परीक्षण करताना यहोवाने काही गोष्टी विचारात घेतल्या. त्या म्हणजे, ते पूर्ण मनाने यहोवाची सेवा करत होते का, त्यांनी पश्‍चात्ताप केला की नाही आणि ते खऱ्‍या उपासनेला जडून होते की नव्हते. टेहळणी बुरूज२४.०७ २०-२१ ¶१-३

शनिवार, २७ जून

त्यांना यहोवाच्या शिस्तीत आणि शिक्षणात वाढवत राहा.—इफिस. ६:४.

बाप्तिस्मा झालेल्या १८ वर्षांखालच्या अल्पवयीन मुलांच्या हातून गंभीर पाप घडलं, तर ती परिस्थिती वडिलांनी कशी हाताळावी? अशा वेळी वडीलवर्ग त्याला आणि त्याच्या ख्रिस्ती आईवडिलांना भेटायला दोन वडिलांना नेमेल. त्या मुलाच्या आईवडिलांनी त्याला पश्‍चात्ताप करायला मदत करण्यासाठी कोणती पावलं उचलली आहेत, हे जाणून घ्यायचा प्रयत्न हे वडील करतील. जर त्या मुलाने चांगली वृत्ती दाखवली असेल आणि त्याचे आईवडील त्याला मदत करत असतील, तर ते दोन वडील हे ठरवतील, की ‘वडिलांची समिती’ बनवायची गरज नाही आणि आईवडीलच त्याला पुढे मदत करत राहतील. कारण वडिलांना हे माहीत आहे, की मुलांना प्रेमळपणे सुधारण्याची जबाबदारी देवाने आईवडिलांना दिली आहे. (अनु. ६:६, ७; नीति. ६:२०; २२:६; इफिस. ६:२-४) यानंतर वडील थोड्याथोड्या काळाने आईवडिलांना भेटतील आणि या गोष्टीची खातरी करतील, की हवी असलेली मदत त्या मुलाला मिळत आहे. पण जर तो अल्पवयीन पश्‍चात्ताप न करता चुकीची कामं करत राहिला तर? अशा वेळी वडिलांची समिती त्याच्या ख्रिस्ती आईवडिलांसोबत त्याला भेटेल. टेहळणी बुरूज२४.०८ २४-२५ ¶१८

रविवार, २८ जून

घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.—प्रे. कार्यं २०:३५.

जेव्हा आपल्याला एखादी भेटवस्तू मिळते तेव्हा आपल्याला आनंद होतो आणि आपण हे अनुभवलंयसुद्धा. पण आपण एखाद्याला काही देतो तेव्हा आपल्याला जास्त आनंद होतो. कारण आपल्याला अशा प्रकारे बनवल्यामुळेच आपण आपला आनंद वाढवू शकतो. आणि इतरांना वेगवेगळ्या गोष्टी द्यायची संधी शोधून आपण हे करू शकतो. यहोवाने आपल्याला अशा प्रकारे बनवलंय ही खरंच एक अद्‌भुत गोष्ट आहे! (स्तो. १३९:१४) बायबल म्हणतं की दिल्यामुळे आनंद होतो. म्हणूनच यहोवा ‘आनंदी देव’ आहे असं जे बायबल म्हणतं त्यात आश्‍चर्य करण्यासारखं काहीच नाही. (१ तीम. १:११) कारण त्यानेच सगळ्यात आधी इतरांना बऱ्‍याच गोष्टी दिल्या आणि त्याच्याइतकं दुसरं कोणीच देऊ शकत नाही. प्रेषित पौलने सांगितल्याप्रमाणे “त्याच्यामुळेच आपण जिवंत आहोत आणि चालतो-फिरतो; त्याच्यामुळेच आपलं अस्तित्व आहे.” (प्रे. कार्यं १७:२८) खरंच, “प्रत्येक चांगली देणगी आणि परिपूर्ण दान” यहोवाकडूनच येतं. (याको. १:१७) आपल्या सगळ्यांनाच देण्यातून मिळणारा आनंद अनुभवायला आणि आपला आनंद आणखी वाढवायला नक्कीच आवडेल. यासाठी आपण यहोवाच्या उदारतेचं अनुकरण करू शकतो.—इफिस. ५:१ टेहळणी बुरूज२४.०९ २६-२७ ¶१-४

सोमवार, २९ जून

आतापर्यंत आपण जी प्रगती केली आहे, त्याच मार्गाने आपण पुढेही नीट चालत राहू या.—फिलिप्पै. ३:१६.

वडील म्हणून पात्र ठरण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्यांवर विचार केल्यानंतर काही सहायक सेवकांना असं वाटू शकतं, की ते यासाठी कधीच पात्र होऊ शकणार नाहीत. पण नेहमी लक्षात ठेवा, की यहोवा किंवा त्याची संघटना तुमच्याकडून या गोष्टींच्या बाबतीत कधीच परिपूर्णतेची अपेक्षा करत नाही. (१ पेत्र २:२१) आणि यहोवाची जबरदस्त पवित्र शक्‍तीच तुम्हाला या पात्रता पूर्ण करण्यासाठी मदत करत असते. (फिलिप्पै. २:१३) तुम्हाला स्वतःमध्ये काही गुण वाढवण्याची गरज आहे असं वाटतं का? तर त्याबद्दल यहोवाला प्रार्थना करा. तसंच, त्या विषयावर संशोधन करा. आणि तुम्हाला त्यात कशी सुधारणा करता येईल हे एखाद्या वडिलाला विचारा. वडील म्हणून सेवा करण्यासाठी पात्र ठरायचा प्रयत्न करत राहा! यहोवाची आणि मंडळीतल्या भाऊबहिणींची जास्तीत जास्त सेवा करता यावी म्हणून यहोवाकडून प्रशिक्षण घ्या आणि त्याला तुम्हाला घडवू द्या. (यश. ६४:८) यासाठी तुम्ही जी काही मेहनत घेत आहात त्यावर यहोवा भरपूर आशीर्वाद देवो! टेहळणी बुरूज२४.११ २५ ¶१७-१८

मंगळवार, ३० जून

तुम्ही पवित्र जनांची सेवा केली आणि अजूनही करत आहात. आणि तुमचं काम आणि देवाच्या नावाबद्दल तुम्ही दाखवलेलं प्रेम विसरून जायला देव अन्यायी नाही.—इब्री ६:१०.

ही गोष्ट खरी आहे की आपण विश्‍वासूपणे केलेल्या सेवेची यहोवा कदर करतो. पण आपण बरीच वर्षं यहोवाची सेवा केली असली, तरी आपल्यापैकी कोणीच असा विचार करू नये की यहोवाची क्षमा मिळवण्याचा आपल्याला हक्क आहे. त्याने आपल्याला खंडणी बलिदानाची भेट आपल्या सेवेच्या मोबदल्यात नाही, तर मोफत दान म्हणून दिली आहे. जर आपण असा दावा केला, की आपल्या सेवेमुळे आपण स्वतःहून त्याची क्षमा मिळवली आहे, तर एका अर्थाने आपण असं म्हणत असू की ख्रिस्ताने उगीचंच आपला प्राण दिला. (गलतीकर २:२१ सोबत तुलना करा.) प्रेषित पौलला माहीत होतं, की त्याने यहोवाची कितीही सेवा केली तरी त्याच्या मोबदल्यात तो यहोवाची क्षमा कमावू शकत नाही. मग त्याने यहोवाच्या सेवेत इतकी मेहनत का केली? त्याने हे दाखवण्यासाठी यहोवाची सेवा केली नाही की तो त्याच्या क्षमेच्या लायक आहे. तर, यहोवाने त्याच्यावर जी अपार कृपा केली होती, त्या कृपेबद्दल कदर व्यक्‍त करण्यासाठी त्याने यहोवाची सेवा केली. (इफिस. ३:७) पौलसारखं आपणसुद्धा यहोवाची आवेशाने सेवा करत राहतो. त्याची क्षमा मिळवण्यासाठी नाही, तर तिच्याबद्दल कदर व्यक्‍त करण्यासाठी. टेहळणी बुरूज२५.०१ २७ ¶५-६

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा