वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es26 पृ. ५८-७१
  • मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मे
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२६
  • उपशिर्षक
  • शुक्रवार, १ मे
  • शनिवार, २ मे
  • रविवार, ३ मे
  • सोमवार, ४ मे
  • मंगळवार, ५ मे
  • बुधवार, ६ मे
  • गुरुवार, ७ मे
  • शुक्रवार, ८ मे
  • शनिवार, ९ मे
  • रविवार, १० मे
  • सोमवार, ११ मे
  • मंगळवार, १२ मे
  • बुधवार, १३ मे
  • गुरुवार, १४ मे
  • शुक्रवार, १५ मे
  • शनिवार, १६ मे
  • रविवार, १७ मे
  • सोमवार, १८ मे
  • मंगळवार, १९ मे
  • बुधवार, २० मे
  • गुरुवार, २१ मे
  • शुक्रवार, २२ मे
  • शनिवार, २३ मे
  • रविवार, २४ मे
  • सोमवार, २५ मे
  • मंगळवार, २६ मे
  • बुधवार, २७ मे
  • गुरुवार, २८ मे
  • शुक्रवार, २९ मे
  • शनिवार, ३० मे
  • रविवार, ३१ मे
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२६
es26 पृ. ५८-७१

मे

शुक्रवार, १ मे

देव कधीच भेदभाव करत नाही.—रोम. २:११.

इजिप्तच्या गुलामगिरीतून आपल्या लोकांना सोडवल्यानंतर यहोवाने उपासना मंडपात म्हणजे त्याच्या पवित्र तंबूत सेवा करण्यासाठी याजकांना नेमलं. आणि इतर कामं करायला त्याने लेव्यांना नेमलं. मग जे उपासना मंडपात सेवा करत होते किंवा जे त्याच्या जवळ राहत होते त्यांची यहोवा इतरांपेक्षा जास्त काळजी घेत होता का? नाही. त्याने सगळ्यांची सारखीच काळजी घेतली, कारण तो भेदभाव करत नाही. प्रत्येक इस्राएली व्यक्‍ती यहोवाचा जवळचा मित्र बनू शकत होता. उदाहरणार्थ, यहोवाने जेव्हा उपासना मंडपावर ढगाचा खांब आणि आगीचा खांब उभा केला, तेव्हा तो संपूर्ण राष्ट्राला दिसेल असा होता. (निर्ग. ४०:३८) तो ढग जेव्हा दिशा बदलायचा तेव्हा उपासना मंडपापासून दूर राहत असलेल्या लोकांनासुद्धा दिसायचा. मग ते बघून लोक आपलं सामानसुमान बांधून इतर लोकांसोबत तिथून निघायचे. (गण. ९:१५-२३) त्याचप्रमाणे आजही, आपण जगाच्या पाठीवर कुठेही राहत असलो तरी यहोवा आपल्यावर प्रेम करेल, आपली काळजी घेईल आणि आपल्याला सुरक्षित ठेवेल. टेहळणी बुरूज२४.०६ ४ ¶१०-१२

शनिवार, २ मे

चला, आपण इथून पळून जाऊ. नाहीतर आपल्यापैकी कोणीही अबशालोमच्या हातून सुटणार नाही!—२ शमु. १५:१४.

दावीदचा जीव धोक्यात होता. त्याचा मुलगा अबशालोम याने त्याचं राज्य बळकावण्याच्या निश्‍चय केला होता. (२ शमु. १५:१२, १३) त्यामुळे दावीदला ताबडतोब यरुशलेम सोडून जावं लागलं. त्याचे सेवक तिथून निघत असताना दावीदच्या लक्षात आलं, की अबशालोमच्या कटाबद्दल माहिती द्यायला शहरात कोणीतरी थांबायला हवं. म्हणून तो सादोक आणि इतर याजकांना हेर म्हणून पुन्हा शहरात पाठवतो. (२ शमु. १५:२७-२९) या लोकांना खूप सावध असण्याची गरज होती, म्हणून दावीदने एक योजना केली. या योजनेत दावीदचे विश्‍वासू मित्र सादोक आणि हूशयसुद्धा होते. (२ शमु. १५:३२-३७) या योजनेप्रमाणे हूशयने अबशालोमचा विश्‍वास जिंकला आणि दावीदला हल्ल्यासाठी वेळ मिळेल अशी एक रणनीती अबशालोमला सुचवली. नंतर हूशयने सादोक आणि अब्याथारला याबद्दल सांगितलं. (२ शमु. १७:८-१६) मग या दोघांनी दावीदला याबद्दल संदेश पाठवला. त्यांनी दावीदचा जीव वाचवण्यात एक महत्त्वाची भूमिका पार पाडली.—२ शमु. १७:२१, २२. टेहळणी बुरूज२४.०७ ४-५ ¶९-१०

रविवार, ३ मे

यहोवा म्हणतो: “आता या, आपण आपसात बोलू; म्हणजे मी तुम्हाला पुन्हा माझ्याशी चांगलं नातं जोडायला मदत करीन.”—यश. १:१८.

यहोवाच्या काही सेवकांनी बाप्तिस्म्याआधी किंवा त्यानंतरसुद्धा ज्या चुका केल्या त्यांबद्दल त्यांना खूप वाईट वाटतं. पण लक्षात ठेवा, की यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे. आणि यामुळेच आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी त्याने खंडणीची व्यवस्था केली. त्याची इच्छा आहे, की आपण त्याची ही भेट स्वीकारावी. यहोवा आपल्याला अशी खातरी देतो की त्याच्यासोबत ‘आपसात बोलल्यानंतर’ तो आपल्याला आपल्या पापांसाठी दोषी ठरवणार नाही. आपल्याकडून आधी झालेल्या चुका यहोवा आठवत नाही. यावरून कळतं की यहोवा खरंच किती प्रेमळ आहे. तसंच, आपण केलेली चांगली कामंसुद्धा तो विसरत नाही. (स्तो. १०३:९, १२; इब्री ६:१०) जर आधी केलेल्या गोष्टींबद्दल तुम्हाला वाईट वाटत असेल, तर त्या गोष्टींऐवजी सध्याच्या गोष्टींवर आणि भविष्यातल्या गोष्टींवर जास्तीत जास्त लक्ष द्यायचा प्रयत्न करा. तुम्ही गेलेला काळ बदलू शकत नाही. पण तुम्ही सध्याच्या परिस्थितीत यहोवाची स्तुती करू शकता आणि त्याने भविष्याबद्दल दिलेल्या अभिवचनांकडे आशेने पाहू शकता. टेहळणी बुरूज२४.१० ८ ¶८-९

सोमवार, ४ मे

देवाकडून असलेलं नवीन व्यक्‍तिमत्त्व घाला.—कलस्सै. ३:१०.

जेव्हा तुम्ही बायबल वाचता तेव्हा त्यातल्या गोष्टी कशा लागू करायच्या हे शोधत असताना तुम्हाला जाणवेल, की आपल्याला बऱ्‍याच गोष्टींवर काम करावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही निराश होऊ शकता. कल्पना करा, की आजच्या बायबल वाचनात तुम्हाला भेदभाव न करण्याबद्दल सल्ला वाचायला मिळतो. (याको. २:१-८) त्यावर विचार करत असताना तुम्हाला असं जाणवतं, की इतरांशी वागताना तुम्हाला आणखी सुधारणा करायची गरज आहे. म्हणून तुम्ही हा बदल करायचं ठरवता. मग दुसऱ्‍या दिवशी तुम्हाला तुमच्या वाचनात आपल्या बोलण्यावर ताबा ठेवण्याबद्दल वाचायला मिळतं. (याको. ३:१-१२) तुम्हाला जाणवतं की काही वेळा तुमचं बोलणं इतरांना खटकेल असं होतं. म्हणून तुम्ही ठरवता की इथून पुढे तुम्ही इतरांशी नेहमी प्रोत्साहनदायक आणि चांगलं बोलाल. मग तिसऱ्‍या दिवशी तुमच्या बायबल वाचनात तुम्हाला जगाची मैत्री टाळण्याबद्दल वाचायला मिळतं. (याको. ४:४-१२) तुमच्या लक्षात येतं, की मनोरंजनाची निवड करताना तुम्हाला थोडं लक्ष द्यायची गरज आहे. पण आत्ता चौथ्या दिवशी मात्र इतक्या साऱ्‍या गोष्टींवर आपल्याला काम करावं लागणार आहे, हे जाणवल्यामुळे तुम्ही कदाचित निराश व्हाल. पण निराश होऊ नका. नेहमी लक्षात ठेवा की “नवीन व्यक्‍तिमत्त्व” धारण करणं ही एक सतत चालत राहणारी क्रिया आहे. टेहळणी बुरूज२४.०९ ५-६ ¶११-१२

मंगळवार, ५ मे

ख्रिस्ताला आपल्या मनात प्रभू म्हणून पवित्र माना. तुम्ही बाळगत असलेल्या आशेबद्दल जो कोणी प्रश्‍न विचारतो, त्याला उत्तर देण्यासाठी नेहमी तयार राहा, पण सौम्यतेने आणि मनापासून आदर दाखवून असं करा.—१ पेत्र ३:१५.

आपल्यावर अन्याय होतो, तेव्हा यहोवाला त्याबद्दल कसं वाटतं हे येशूसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. त्याच्यावर जो अन्याय झालाय त्याचं यहोवा योग्य वेळी उत्तर देईल, असा भरवसा त्याला होता. आपल्यावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा आपण विचार करून बोललं पाहिजे. असं करून आपण येशूचं अनुकरण करत असतो. काही गोष्टी क्षुल्लक असतात. त्यामुळे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकतो किंवा गोष्टी आणखी बिघडू नयेत म्हणून आपण शांत राहू शकतो. (उप. ३:७; याको. १:१९, २०) पण इतर वेळी जेव्हा कोणावर अन्याय होतो किंवा आपल्याला सत्याची बाजू मांडायची असते, तेव्हा आपल्याला बोलायची गरज पडू शकते. (प्रे. कार्यं ६:१, २) अशा वेळी आपण बोलायचं ठरवलं, तर आपण शांतपणे आणि आदराने बोललं पाहिजे. येशूचं अनुकरण करायचा आणखी एक मार्ग म्हणजे आपण “नीतीने न्याय करणाऱ्‍याच्या हाती” स्वतःला सोपवून दिलं पाहिजे.—१ पेत्र २:२३. टेहळणी बुरूज२४.११ ५-६ ¶१०-१२

बुधवार, ६ मे

पश्‍चात्ताप करणाऱ्‍या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांमध्ये असाच आनंद व्यक्‍त केला जातो.—लूक १५:१०.

जेव्हा पाप करणारा पश्‍चात्ताप करतो, तेव्हा आपल्या सगळ्यांना खूप आनंद होतो. (लूक १५:७) पण याचं श्रेय कोणाला जातं? वडिलांना जातं का? नाही. पाप करणाऱ्‍यांबद्दल प्रेषित पौलने काय लिहिलं ते आठवा: “कदाचित देव त्यांना . . . पश्‍चात्ताप करायची संधी देईल.” (२ तीम. २:२५) म्हणजे, पाप करणाऱ्‍याला त्याच्या विचारात आणि वागण्यात बदल करण्यासाठी एखाद्या माणसाने नाही तर यहोवाने मदत केलेली असते. पौलने समजावलं की एखादा जेव्हा पश्‍चात्ताप करतो, तेव्हा चांगल्या गोष्टी घडतात. त्याला सत्याबद्दलचं आणखी अचूक ज्ञान मिळतं, तो पुन्हा भानावर येतो आणि सैतानाच्या पाशांपासून सुटू शकतो. (२ तीम. २:२६) पाप करणाऱ्‍याने पश्‍चात्ताप केल्यानंतर वडील त्याच्यासाठी वेळोवेळी मेंढपाळ भेटींची व्यवस्था करतात. असं केल्यामुळे त्याला आपला विश्‍वास मजबूत करत राहायला, सैतानाच्या प्रलोभनांचा सामना करत राहायला आणि योग्य ते करत राहायला मदत होते.—इब्री १२:१२, १३. टेहळणी बुरूज२४.०८ २३ ¶१४-१५

गुरुवार, ७ मे

तुम्ही चमत्कार पाहिल्यामुळे मला शोधत आला नाहीत, तर भाकरी खाऊन तुमचं पोट भरल्यामुळे शोधत आला आहात.—योहा. ६:२६.

येशूने ज्या जमावाला खाऊ घातलं त्यांचं लक्ष आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यावरच होतं, कारण दुसऱ्‍या दिवशी ते पुन्हा तिथे आले. पण येशू आणि त्याचे प्रेषित तिथे नव्हते. म्हणून ते येशूच्या शोधात तिबिर्याहून येणाऱ्‍या नावेत बसून कफर्णहूमला गेले. (योहा. ६:२२-२४) पण येशूकडून राज्याबद्दलच्या गोष्टी शिकण्यासाठी ते तिथे गेले होते का? नाही. येशूने आपल्याला खाण्या-पिण्याच्या गोष्टी पुरवाव्यात असं त्यांना वाटत होतं. असं आपण का म्हणू शकतो? लोकांच्या जमावाने जेव्हा येशूला कफर्णहूममध्ये गाठलं तेव्हा काय झालं याचा विचार करा. येशूने स्पष्टपणे सांगितलं, की आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करणंच त्या लोकांसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. भाकर खाऊन जरी त्यांचं पोट भरलं असलं तरी येशूने त्यांना सांगितलं, की ते ‘नाश होणारं अन्‍न’ आहे. याउलट त्याने त्यांना सांगितलं, की त्यांनी ‘अशा अन्‍नासाठी खटपट करावी, जे सर्वकाळाच्या जीवनात टिकून राहतं.’ (योहा. ६:२६, २७) येशूने म्हटलं की असं अन्‍न त्याचा पिता पुरवू शकतो. टेहळणी बुरूज२४.१२ ५ ¶८-९

शुक्रवार, ८ मे

बुद्धिमानाचं मन त्याला सखोल समज देतं; इतरांना त्याचं बोलणं सहज पटतं.—नीति. १६:२३.

वडील म्हणून सेवा करणाऱ्‍या भावाला चांगला शिक्षक बनायचं असेल, तर तो जे काही शिकवतो आणि जो काही सल्ला देतो, तो देवाच्या वचनावर आधारलेला असला पाहिजे. म्हणून बायबल आणि आपल्या प्रकाशनांचा चांगला अभ्यास करा. (नीति. १५:२८) तुम्ही अभ्यास करत असताना आपली प्रकाशनं बायबलमधली वचनं कशी स्पष्ट करतात याकडे नीट लक्ष द्या. म्हणजे ती कशी लागू होतात हे तुम्हाला समजेल. तसंच, शिकवताना भाऊबहिणींच्या हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर चांगला शिक्षक व्हायचं असेल, तर मंडळीतल्या अनुभवी वडिलांकडून सल्ला घ्या आणि तो लागू करा. (१ तीम. ५:१७) वडिलांनी नेहमी इतरांना प्रोत्साहन देणारे असलं पाहिजे. पण कधीकधी त्यांना भाऊबहिणींना सल्ला आणि ताडनही देण्याची गरज पडू शकते. म्हणून या दोन्ही गोष्टी करताना वडिलांनी नेहमी सौम्य असलं पाहिजे. तुम्ही जर नम्र आणि प्रेमळ असाल, आणि तुमची शिकवण ही देवाच्या वचनावर आधारित असेल, तर तुम्ही एक चांगले शिक्षक बनाल. कारण असं केल्यामुळे तुम्ही महान शिक्षकाचं, येशूचं अनुकरण करत असाल.—मत्त. ११:२८-३०; २ तीम. २:२४. टेहळणी बुरूज२४.११ २४ ¶१६

शनिवार, ९ मे

सर्व राष्ट्रांना त्याच्या गौरवाबद्दल सांगा.—स्तो. ९६:३.

इतरांना यहोवाबद्दल सांगून आपण त्याच्या नावाचा महिमा करू शकतो. यहोवाच्या लोकांना ‘त्याच्यासाठी गीत गायचं,’ ‘त्याच्या नावाची स्तुती करायचं,’ ‘त्याच्याकडून मिळणाऱ्‍या तारणाबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करायचं’ आणि ‘सर्व राष्ट्रांना त्याच्या गौरवाबद्दल सांगायचं’ प्रोत्साहन देण्यात आलंय. (स्तो. ९६:१-३) आपणसुद्धा या सगळ्या गोष्टी करून आपल्या बोलण्याने यहोवाचा महिमा करू शकतो. (प्रे. कार्यं ४:२९) आपण आपल्या मौल्यवान गोष्टी देऊनही यहोवाचा महिमा करू शकतो. खऱ्‍या उपासकांनी नेहमी अशाच प्रकारे यहोवाचा महिमा केलाय. (नीति. ३:९) उदाहरणार्थ, मंदिराचं बांधकाम आणि दुरुस्ती करायला इस्राएली लोकांनी दान दिलं. (२ राजे १२:४, ५; १ इति. २९:३-९) तसंच, येशूच्या शिष्यांनी ‘स्वतःच्या संपत्तीचा’ वापर करून त्याची आणि त्याच्या प्रेषितांची सेवा केली. (लूक ८:१-३) शिवाय, पहिल्या शतकातल्या भाऊबहिणींनीसुद्धा इतर भाऊबहिणींना मदत करण्यासाठी दान दिलं. (प्रे. कार्यं ११:२७-२९) आज आपणसुद्धा स्वेच्छेने दान देऊन यहोवाचा महिमा करू शकतो. टेहळणी बुरूज२५.०१ ४ ¶८; ५ ¶११

रविवार, १० मे

यांना पाण्यात बाप्तिस्मा घेण्यापासून कोण रोखू शकतं?—प्रे. कार्यं १०:४७.

कर्नेल्यला बाप्तिस्मा घ्यायला कशामुळे मदत झाली? बायबलमध्ये आपण वाचतो, की “तो आणि त्याचं संपूर्ण घराणं देवाला भिऊन वागायचं.” तसंच तो देवाला नेहमी याचना करायचा. (प्रे. कार्यं १०:२) जेव्हा पेत्रने त्याला आनंदाचा संदेश सांगितला, तेव्हा त्याने आणि त्याच्या कुटुंबाने ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि लगेच बाप्तिस्मा घेतला. (प्रे. कार्यं १०:४७, ४८) कर्नेल्यला आणि त्याच्या कुटुंबाला सोबत मिळून यहोवाची उपासना करायची होती. त्यामुळे लागणारे सगळे बदल करायला तो तयार होता. (यहो. २४:१५; प्रे. कार्यं १०:२४, ३३) तो समाजातल्या त्याच्या स्थानामुळे, ख्रिस्ती बनायला नकार देऊ शकला असता. पण त्याने असं होऊ दिलं नाही. सत्य स्वीकारण्यासाठी कदाचित तुम्हालाही तुमच्या जीवनात मोठमोठे बदल करावे लागतील. पण असं असलं तरी यहोवा तुम्हाला नक्की मदत करेल. बायबलच्या स्तरांनुसार जीवन जगायच्या तुमच्या निश्‍चयावर तो नक्की आशीर्वाद देईल. टेहळणी बुरूज२५.०३ ५ ¶१२-१३

सोमवार, ११ मे

देवाचा अनादर करणाऱ्‍या कथा कहाण्यांपासून दूर राहा.—१ तीम. ४:७.

जर तुम्ही आपल्या संघटनेबद्दल किंवा पुढाकार घेणाऱ्‍या भावांबद्दल चुकीची माहिती ऐकली तर देवाचे शत्रू येशूसोबत आणि पहिल्या शतकातल्या त्याच्या शिष्यांसोबत कसे वागले हे आठवायचा प्रयत्न करा. येशूने म्हटलं होतं, की यहोवाची उपासना करणाऱ्‍यांचा लोक छळ करतील आणि त्यांच्याबद्दल खोटी माहिती पसरवतील. आणि आज अगदी तसंच घडत आहे. (मत्त. ५:११, १२) खोट्या माहितीमागे कोण आहे हे आपण ओळखलं पाहिजे आणि लगेच पावलं उचलली पाहिजेत. जर आपण असं केलं तर खोट्या माहितीमुळे आपली फसवणूक होणार नाही. पण मग आपण कोणती पावलं उचलली पाहिजेत? खोट्या माहितीपासून दूर राहा. आपण खोटी माहिती ऐकली असेल, तर आपण काय केलं पाहिजे याबद्दल प्रेषित पौलने स्पष्ट सूचना दिल्या होत्या. प्रेषित पौलने तीमथ्यला सांगितलं होतं, की त्याने इफिसमधल्या लोकांना ‘काल्पनिक कथांकडे [खोट्या माहितीकडे] लक्ष न देण्याची आज्ञा’ द्यावी. तसंच, त्याने त्याला हेही सांगितलं, की त्याने “काल्पनिक आणि देवाचा अनादर करणाऱ्‍या कथा कहाण्यांपासून दूर” राहावं. (१ तीम. १:३, ४) आपण खोट्या माहितीपासून दूर राहतो, कारण त्यामागे कोण आहे हे आपल्याला माहीत आहे. त्याऐवजी आपण फक्‍त सत्याची ‘फायदेकारक वचनं’ ऐकतो.—२ तीम. १:१३. टेहळणी बुरूज२४.०४ ११ ¶१६-१७

मंगळवार, १२ मे

ते गोड बोलून आणि खुशामत करून भोळ्याभाबड्या लोकांची मनं भुलवतात.—रोम. १६:१८.

जे यहोवाशी एकनिष्ठ आहेत त्यांना जडून राहा. यहोवाची अशी इच्छा आहे, की आपण एकतेने त्याची उपासना करावी. जोपर्यंत आपण सत्याला धरून राहतो, तोपर्यंत आपल्यातली एकता टिकून राहील. सत्यापासून भरकटलेले लोक मंडळीत फुटी पाडतात. म्हणून “त्यांना टाळा,” असं देव आपल्याला इशारा देतो. आपण जर असं नाही केलं, तर आपणसुद्धा सत्यापासून भरकटू शकतो. (रोम. १६:१७) जेव्हा आपण सत्य ओळखतो आणि त्याला धरून राहतो, तेव्हा आपण यहोवाच्या जवळ राहू शकतो आणि विश्‍वासात मजबूत होऊ शकतो. (इफिस. ४:१५, १६) तसंच, सैतानाच्या खोट्या शिकवणी आणि तो पसरवत असलेल्या खोट्या गोष्टींपासून आपलं संरक्षण होईल आणि मोठ्या संकटादरम्यान यहोवा आपली काळजी घेईल. म्हणून जे सत्य आहे, ते धरून राहा म्हणजे “शांतीचा देव तुमच्यासोबत राहील.”—फिलिप्पै. ४:८, ९. टेहळणी बुरूज२४.०७ १२-१३ ¶१६-१७

बुधवार, १३ मे

या माणसाने पापांकरता सर्वकाळासाठी एकदाच बलिदान अर्पण केलं.—इब्री १०:१२.

पापाच्या ओझ्यामुळे दबलेल्या लोकांवर येशूने खास लक्ष दिलं. त्याने त्यांना त्याचे शिष्य बनण्याचं आमंत्रण दिलं. त्याला माहीत होतं की मानवजातीच्या दुःखाचं मूळ कारण पाप आहे. त्यामुळे त्याने पापी म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या स्त्री-पुरुषांना स्वतःहून मदत केली. एका उदाहरणाचा वापर करून त्याने असं समजावलं: “वैद्याची गरज निरोगी लोकांना नाही, तर आजारी लोकांना असते.” याबद्दल तो पुढे म्हणाला: “मी नीतिमान लोकांना नाही, तर पापी लोकांना बोलवायला आलोय.” (मत्त. ९:१२, १३) येशू जे बोलला त्याप्रमाणे त्याने केलंसुद्धा. जेव्हा एका पापी स्त्रीने अश्रूंनी त्याचे पाय भिजवले, तेव्हा त्या स्त्रीची पापं त्याने प्रेमळपणे क्षमा केली. (लूक ७:३७-५०) तसंच, एकदा एका विहिरीजवळ त्याला एक शोमरोनी स्त्री भेटली. त्याला तिच्या अनैतिक जीवनाबद्दल माहीत होतं, तरीसुद्धा त्याने तिला महत्त्वाची सत्यं शिकवली. (योहा. ४:७, १७-१९, २५, २६) पापाचा सर्वात भयानक परिणाम म्हणजे मृत्यू. पण देवाने येशूला मृत्यूही काढून टाकण्याची ताकद दिली. ते कसं? येशूने स्त्री-पुरुषांना, लहान-मोठ्यांना पुन्हा जिवंत केलं.—मत्त. ११:५. टेहळणी बुरूज२४.०८ ४ ¶९-१०

गुरुवार, १४ मे

तो सबंध पृथ्वीचा नीतिमत्त्वाने आणि सर्व लोकांचा विश्‍वासूपणे न्याय करेल.—स्तो. ९६:१३.

यहोवा लवकरच त्याच्या नावाचा महिमा कसा करणार आहे? न्याय करून. थोड्याच काळात तो मोठ्या बाबेलचा नाश करणार आहे आणि आपल्या पवित्र नावाला लागलेला कलंक मिटवणार आहे. (प्रकटी. १७:५, १६; १९:१, २) हा नाश पाहणाऱ्‍यांपैकी काही जण कदाचित आपल्यासोबत खऱ्‍या उपासनेत सामील होतील. मग शेवटी यहोवा हर्मगिदोनच्या युद्धात सैतानाच्या संपूर्ण व्यवस्थेचा नाश करेल. म्हणजे त्याचा विरोध करणाऱ्‍यांचा आणि त्याच्या नावावर कलंक लावणाऱ्‍यांचा तो नाश करेल. पण तो अशा लोकांना वाचवेल जे त्याच्यावर प्रेम करतात, त्याच्या आज्ञा पाळतात आणि ज्यांना त्याचा महिमा करणं अभिमानाची गोष्ट वाटते. (मार्क ८:३८; २ थेस्सलनी. १:६-१०) मग ख्रिस्ताचं हजार वर्षांचं शासन संपेल तेव्हा होणाऱ्‍या शेवटच्या परीक्षेनंतर, यहोवा त्याचं नाव पूर्णपणे पवित्र करेल. (प्रकटी. २०:७-१०) त्या वेळी, “जसा समुद्र पाण्याने भरला आहे, तशीच ही पृथ्वी यहोवाच्या गौरवाविषयीच्या ज्ञानाने भरून जाईल.” (हब. २:१४) लवकरच असा एक दिवस येईल, जेव्हा सगळे यहोवाच्या नावाचा महिमा करतील. तो दिवस खरंच किती रोमांचक असेल! टेहळणी बुरूज२५.०१ ७ ¶१५-१६

शुक्रवार, १५ मे

आपल्याला सुधारण्याचा हा एक मार्ग आहे असं समजून तुम्ही हे सहन करा.—इब्री १२:७.

कोणत्या गोष्टीमुळे इब्री ख्रिश्‍चनांना विरोधाचा सामना करायला मदत होणार होती? प्रेषित पौलला माहीत होतं, की त्यांनी परीक्षांबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. त्याने त्यांना समजावलं की प्रशिक्षणाचा भाग म्हणून देव एका ख्रिस्ती व्यक्‍तीवर विश्‍वासाची परीक्षा येऊ देतो. अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे महत्त्वाचे ख्रिस्ती गुण विकसित करायला आणि स्वतःमध्ये सुधारणा करायला त्याला मदत होऊ शकते. या परिणामांवर लक्ष लावल्यामुळे त्या काळातल्या इब्री ख्रिश्‍चनांना परीक्षांचा सामना करणं सोपं जाणार होतं. (इब्री १२:११) पौलने इब्री ख्रिश्‍चनांना सांगितलं की त्यांनी ठाम निश्‍चयाने येणाऱ्‍या परीक्षांना तोंड दिलं पाहिजे. आणि हे सगळं तो यासाठी म्हणू शकला, कारण आधी त्यानेही ख्रिश्‍चनांचा छळ केला होता. त्याला माहीत होतं की विरोधकांचा छळ करण्यामागे काय हेतू असतो. तसंच छळाचा सामना कसा करायचा हेसुद्धा त्याला माहीत होतं. कारण ख्रिस्ती बनल्यानंतर त्यालाही वेगवेगळ्या प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागला होता.—२ करिंथ. ११:२३-२५. टेहळणी बुरूज२४.०९ १२-१३ ¶१६-१७

शनिवार, १६ मे

सतत जागे राहा.—मत्त. २५:१३.

दिवसेंदिवस आपलं प्रचाराचं काम आणखीन जास्त महत्त्वाचं बनत चाललंय. का? कारण आपल्याकडे खूप कमी वेळ उरलाय. मार्क १३:१० मध्ये येशूने शेवटच्या दिवसांत होणाऱ्‍या प्रचारकार्याबद्दल काय सांगितलं होतं याचा विचार करा. मत्तयच्या अहवालाप्रमाणे येशूने म्हटलं होतं, की आनंदाचा संदेश संपूर्ण जगात घोषित केला जाईल आणि त्यानंतर “अंत” येईल. (मत्त. २४:१४) हा अंत सैतानाच्या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या संपूर्ण नाशाला सूचित करतो. भविष्यात ज्या घटना घडणार आहेत, त्यासाठी यहोवाने ‘दिवस आणि वेळ’ ठरवली आहे. (मत्त. २४:३६; प्रे. कार्यं १:७) त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस आपल्याला अंताच्या आणखी जवळ नेत आहे. (रोम. १३:११) म्हणून जोपर्यंत अंत येत नाही, तोपर्यंत आपण प्रचार करत राहिलं पाहिजे. प्रचारकार्याचा विचार करत असताना आपण एका महत्त्वाच्या प्रश्‍नावरसुद्धा विचार केला पाहिजे. तो म्हणजे: आपण आनंदाच्या संदेशाचा प्रचार का करतो? सोप्या शब्दांत सांगायचं झालं, तर प्रेमाने प्रवृत्त झाल्यामुळे आपण प्रचार करतो. आपल्या प्रचारकार्यावरून आनंदाच्या संदेशाबद्दल, लोकांबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यहोवा आणि त्याच्या नावाबद्दल असलेलं आपलं प्रेम दिसून येतं. टेहळणी बुरूज२४.०५ १४-१५ ¶२-३

रविवार, १७ मे

आपण बनवलेलं सर्वकाही खूप चांगलं आहे असं देवाने पाहिलं.—उत्प. १:३१.

आईवडिलांनो, आपल्या मुलांना यहोवाने निर्माण केलेल्या अद्‌भुत गोष्टींवर विचार करायचं प्रोत्साहन द्या. तुम्ही शहराबाहेर गावच्या ठिकाणी जात असताना किंवा बागकाम करत असताना तुमच्या मुलांचं लक्ष सृष्टीत दिसणाऱ्‍या गोष्टींच्या अनोख्या डिझाइनकडे वळवा. यावरून तुमच्या मुलांना हे समजायला मदत करा, की सृष्टी एका बुद्धिमान व्यक्‍तीने निर्माण केली असेल. उदाहरणार्थ, सृष्टीतल्या बऱ्‍याच गोष्टींत स्पायरल डिझाइन (एका बिंदूपासून सुरू होऊन गोलगोल फिरणारी डिझाइन) दिसून येते. शास्त्रज्ञ बऱ्‍याच वर्षांपासून अशा डिझाइनवर अभ्यास करत आलेत. निकोला फमेली नावाचे एक वैज्ञानिक सांगतात, की जेव्हा आपण सृष्टीत दिसणाऱ्‍या एखाद्या वस्तुचं बारकाईने निरीक्षण करतो, तेव्हा आपल्याला अंकांचा एक विशिष्ट क्रम दिसून येतो. यालाच इंग्रजीत फिबोनाची सिरीज (क्रम) म्हणतात. अशा प्रकारच्या डिझाइन सृष्टीतल्या बऱ्‍याच गोष्टींमध्ये दिसून येतात. जसं की, काही आकाशगंगांमध्ये, शंख-शिंपल्यांमध्ये, काही झाडांच्या पानांमध्ये आणि सूर्यफुलांमध्ये अशा डिझाइन दिसून येतात. टेहळणी बुरूज२४.१२ १६ ¶७

सोमवार, १८ मे

तोच तुमचं जीवन आहे.—अनु. ३०:२०.

मोशे, दावीद आणि योहान हे आपल्यापेक्षा खूप वेगळ्या काळात आणि परिस्थितींमध्ये जगले. पण त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये बऱ्‍याच गोष्टींच्या बाबतीत सारखेपणा आहे. त्यांनी खऱ्‍या देवाची सेवा केली आणि आपणही करतो. त्यांच्याप्रमाणेच आपणही यहोवाला प्रार्थना करतो, त्याच्यावर विसंबून राहतो आणि मार्गदर्शनासाठी त्याच्याकडे पाहतो. जुन्या काळातल्या या विश्‍वासू सेवकांप्रमाणे आपल्यालाही या गोष्टीची खातरी आहे, की यहोवा त्याच्या आज्ञा पाळणाऱ्‍यांना भरपूर आशीर्वाद देतो. तर चला, आपण यहोवाच्या आज्ञांचं पालन करून त्या विश्‍वासू सेवकांच्या शेवटच्या शब्दांकडे लक्ष देऊ या. मग आपण जे काही करतो त्यात आपल्याला खरं यश मिळेल आणि ‘मोठं आयुष्य लाभेल,’ तेही कायमचं! तसंच, यहोवा त्याची सगळी अभिवचनं आपल्या अपेक्षेच्या किंवा कल्पनेच्याही पलिकडे पूर्ण करेल. आणि त्यामुळे आपल्या स्वर्गातल्या प्रेमळ पित्याचं मन खूश करायचा आनंदही आपल्याला अनुभवायला मिळेल.—इफिस. ३:२०. टेहळणी बुरूज२४.११ १३ ¶२०-२१

मंगळवार, १९ मे

देवाने मंडळीत प्रत्येकाला नेमलं आहे.—१ करिंथ. १२:२८.

पहिल्या शतकात काही भावांना सहायक सेवक म्हणून नेमण्यात आलं होतं. (१ तीम. ३:८) प्रेषित पौलने ज्यांचा “उपयोगी सेवा करणारे” म्हणून उल्लेख केला होता ते कदाचित हेच भाऊ असावेत. यावरून असं दिसतं की वडिलांना शिकवायचं आणि मेंढपाळ म्हणून असलेली जबाबदारी पार पाडायचं काम करता यावं, म्हणून सहायक सेवक आवश्‍यक गोष्टींची काळजी घेत होते. उदाहरणार्थ, सहायक सेवकांनी शास्त्रवचनांच्या प्रती बनवण्याच्या कामात मदत केली असेल किंवा प्रती बनवण्यासाठी लागणारं साहित्यं खरेदी केलं असेल. तुमच्या मंडळीत सहायक सेवक करत असलेल्या काही उपयोगी सेवांचा विचार करा. (१ पेत्र ४:१०) त्यांना मंडळीच्या जमाखर्चाची किंवा प्रचाराच्या क्षेत्राची काळजी घेण्यासाठी, प्रकाशनं मागवण्यासाठी आणि ते प्रचारकांना उपलब्ध करून देण्यासाठी, ऑडिओ-व्हिडिओ उपकरणं चालवण्यासाठी, अटेंडन्ट म्हणून काम करण्यासाठी किंवा सभागृहाची देखभाल करण्यासाठी नियुक्‍त केलं जाऊ शकतं. मंडळीचं काम व्यवस्थित चालावं म्हणून या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेच्या असतात.—१ करिंथ. १४:४०. टेहळणी बुरूज२४.१० १९ ¶४-५

बुधवार, २० मे

जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सगळ्या गोष्टी करण्याची मला शक्‍ती मिळते.—फिलिप्पै. ४:१३.

यहोवा जिवंत देव आहे आणि तो आपल्याला टिकून राहायला मदत करेल, हे लक्षात ठेवल्यामुळे छोट्यामोठ्या अशा कोणत्याही परीक्षांचा आपल्याला सामना करता येईल. कारण शेवटी तो सर्वशक्‍तिमान देव आहे आणि तो आपल्याला सहन करायची शक्‍ती देऊ शकतो. त्यामुळे आपल्यासमोर येणाऱ्‍या कुठल्याही परीक्षेचा आपण सामना करू शकतो याची आपल्याला खातरी असते. छोट्या परीक्षांमध्ये यहोवा आपल्यासोबत आहे हे अनुभवल्यामुळे मोठ्या परीक्षांमध्येही तो आपल्याला मदत करेल याची आपल्याला खातरी मिळते. दावीद राजाच्या अशा दोन वैयक्‍तिक अनुभवांचा विचार करा, ज्यांमुळे यहोवावरचा त्याचा भरवसा वाढला. तरुण असताना जेव्हा तो एक मेंढपाळ म्हणून काम करत होता, तेव्हा एकदा अस्वलाने आणि एकदा सिंहाने त्याच्या वडिलांची मेंढरं नेली. या दोन्ही घटनांमध्ये, दावीदने धाडसाने या जनावरांचा पाठलाग केला आणि त्यांच्या तावडीतून मेंढरं सोडवली. तरी या धाडसी कामाचं श्रेय दावीदने स्वतःकडे घेतलं नाही. कारण त्याला माहीत होतं, की या सगळ्यांमागे यहोवा होता. (१ शमु. १७:३४-३७) या दोन्ही घटनांवर विचार करत राहिल्यामुळे, जिवंत देव यहोवा त्याला पुढेही बळ देईल हा भरवसा दावीदला होता. टेहळणी बुरूज२४.०६ २१ ¶५-६

गुरुवार, २१ मे

जो ऐकून घेण्याआधीच उत्तर देतो, त्याच्यासाठी ते मूर्खपणाचं आणि लाजिरवाणं ठरतं.—नीति. १८:१३.

समजा तुम्हाला एका पार्टीचं आमंत्रण मिळालंय. मग तुम्ही तिथे गेलं पाहिजे का? ज्याने तुम्हाला पार्टीला बोलवलंय त्याला तुम्ही ओळखत नसाल किंवा त्याने पार्टीची काय व्यवस्था केली आहे, हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही त्याला असे प्रश्‍न विचारू शकता: “पार्टी कुठे आणि कधी असणार आहे? पार्टीत किती लोक येणार आहेत? तिथे देखरेख करण्यासाठी कोण आहे? पार्टीत कोण-कोण येणार आहे? तिथे काय-काय होणार आहे? पार्टीत दारू दिली जाईल का?” या प्रश्‍नांच्या उत्तरांमुळे तुम्हाला एक चांगला निर्णय घ्यायला मदत होईल. सगळी माहिती गोळा केल्यानंतर, आता संपूर्ण परिस्थितीचा काळजीपूर्वक विचार करा. उदाहरणार्थ, जर तुमच्या लक्षात आलं की त्या पार्टीत असे लोक येणार आहेत, ज्यांना बायबलच्या तत्त्वांशी काहीच घेणंदेणं नाही किंवा तिथे कोणाच्याही देखरेखीशिवाय दारू दिली जाणार आहे, तर तुम्ही काय कराल? त्या पार्टीचं रूपांतर एखाद्या बेधुंद पार्टीत होण्याची शक्यता आहे का? (१ पेत्र ४:३) या सगळ्या माहितीचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर तुम्हाला एक चांगला निर्णय घ्यायला सोपं जाईल. टेहळणी बुरूज२५.०१ १६ ¶४-५

शुक्रवार, २२ मे

तुमची पापं रक्‍तासारखी लाल असली, तरी ती बर्फासारखी शुभ्र केली जातील.—यश. १:१८.

यहोवा खंडणीद्वारे पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांची पापं कशी माफ करतो हे समजावून सांगण्यासाठी बायबलमध्ये काही शब्दचित्रं वापरली आहेत. एखाद्या कपड्याला जर रक्‍तासारखा लाल किंवा किरमिजी रंगाचा डाग लागला, तर तो स्वच्छ करणं खूप कठीण असतं. पण तरी या शब्दचित्रातून यहोवा आपल्याला खातरी देतो की आपली पापं अशा पद्धतीने धुतली जातील की ती पूर्णपणे नाहीशी होतील. पापांची तुलना ‘कर्जांसोबतसुद्धा’ केली जाऊ शकते. (मत्त. ६:१२; लूक ११:४) म्हणजे आपण जेव्हाजेव्हा यहोवाच्या विरोधात पाप करतो, तेव्हातेव्हा आपल्यावरचं कर्ज आणखी वाढतच जातं. पण जेव्हा यहोवा आपल्याला माफ करतो तेव्हा जणू काय तो ते मोठं कर्ज पूर्णपणे रद्द करतो. त्याने जर तसं केलं नसतं तर ते कर्ज आपल्या नावावर जमा झालं असतं. पण यहोवा माफ केलेल्या पापांची कधीच भरपाई मागत नाही. खरंच, एखाद्या माणसाचं कर्ज जेव्हा माफ होतं तेव्हा त्याला जसा आनंद होतो, तसा आनंद यहोवाने आपली पापं माफ केल्यावर आपल्याला होतो. टेहळणी बुरूज२५.०२ १० ¶९-१०

शनिवार, २३ मे

मुलांनी आईवडिलांसाठी नाही, तर आईवडिलांनी मुलांसाठी पैसा साठवून ठेवावा, अशी अपेक्षा केली जाते.—२ करिंथ. १२:१४.

आईवडील म्हातारे होतात तेव्हा त्यांना काही प्रमाणात पैशांची किंवा इतर गोष्टींची गरज पडू शकते, आणि मुलंसुद्धा आनंदाने ती मदत करायला तयार असतात. (१ तीम. ५:४) पण ख्रिस्ती आईवडिलांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, मुलं आपल्याला म्हातारपणात आर्थिक मदत करतील या उद्देशाने त्यांनी मुलांना वाढवू नये. उलट, त्यांनी मुलांना यहोवाचे सेवक बनण्यासाठी मदत केली पाहिजे. जर आईवडिलांनी असं केलं, तर त्यांना खूप आनंद मिळेल. (३ योहा. ४) आईवडिलांनो, मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करत असताना, तुमच्या उदाहरणातून त्यांना यहोवावर भरवसा ठेवायला शिकवा. लहानपणापासूनच त्यांना मेहनत करायचं महत्त्व शिकवा. (नीति. २९:२१; इफिस. ४:२८) मुलं जशी मोठी होतात तसं त्यांना शाळेत चांगला अभ्यास करायला शिकवा. पुढे कोणतं शिक्षण घ्यायचं हे ठरवताना संशोधन करून बायबल तत्त्वं शोधून काढा आणि तुमच्या मुलांना योग्य निर्णय घ्यायला मदत करा. तुमच्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहायला, प्रचारात जास्तीत जास्त वेळ घालवायला किंवा मग पायनियर बनायलाही मदत करायचं ध्येय ठेवा. टेहळणी बुरूज२५.०३ ३०-३१ ¶१५-१६

रविवार, २४ मे

नवीन व्यक्‍तिमत्त्व धारण करा.—इफिस. ४:२४.

यशया ६५ अध्यायात, यशया संदेष्ट्याद्वारे यहोवाने आध्यात्मिक नंदनवनात राहणाऱ्‍या लोकांचं आयुष्य कसं असेल याबद्दल सांगितलं. या भविष्यवाणीची पहिली पूर्णता इ.स.पू. ५३७ मध्ये झाली. त्या वेळी पश्‍चात्ताप करणाऱ्‍या यहुद्यांना बाबेलच्या बंदिवासातून सोडण्यात आलं आणि ते पुन्हा त्यांच्या मायदेशी परतले. यहोवाने त्याच्या लोकांना आशीर्वाद दिला आणि उद्ध्‌वस्त झालेलं यरुशलेम शहर सुंदर बनवण्यासाठी आणि इस्राएलमध्ये खऱ्‍या उपासनेचं केंद्र असलेलं मंदिर पुन्हा बांधण्यासाठी त्यांना मदत केली. (यश. ५१:११; जख. ८:३) इ.स. १९१९ मध्ये यशयाच्या भविष्यवाणीची दुसरी पूर्णता व्हायला सुरुवात झाली. त्या वेळी यहोवाच्या सेवकांना मोठ्या बाबेलच्या गुलामगिरीतून मुक्‍त करण्यात आलं. तेव्हापासून आध्यात्मिक नंदनवन पूर्ण पृथ्वीवर तयार होऊ लागलं. आवेशी राज्य प्रचारकांनी बऱ्‍याच मंडळ्या सुरू केल्या आणि ते ख्रिस्ती गुण दाखवू लागले. हिंसक आणि अनैतिक जीवन जगणारे स्त्री-पुरुष आता “देवाच्या इच्छेप्रमाणे निर्माण करण्यात आलेलं नवीन व्यक्‍तिमत्त्व धारण” करू लागले. टेहळणी बुरूज२४.०४ २१ ¶३-४

सोमवार, २५ मे

प्रत्येक जण स्वतःचा भार वाहील.—गलती. ६:५.

काही देशांमध्ये आईवडिलांनी किंवा इतर नातेवाईकांनी मुलासाठी किंवा मुलीसाठी स्थळ बघणं अपेक्षित असतं. तर काही देशांमध्ये घरचे लोक किंवा मित्रमंडळी मुलासाठी किंवा मुलीसाठी स्थळ शोधतात आणि मग मुला-मुलीची भेट घालून त्यांचं जुळतंय का ते बघतात. जर तुम्हालाही एखाद्या मुला-मुलीचं जुळतंय का ते बघायला किंवा एखाद्यासाठी स्थळ बघायला सांगितलं असेल, तर दोघांच्या आवडी-निवडींचा आणि अपेक्षांचा विचार करा. आणि जर तुम्हाला त्यांच्यासाठी योग्य असा जोडीदार सापडला, तर त्याचं व्यक्‍तिमत्त्व, स्वभाव, गुण आणि त्याची आध्यात्मिकता कशी आहे, याबद्दल जितकी माहिती काढता येईल तितकी काढा. पैसा, शिक्षण आणि समाजातलं कुटुंबाचं स्थान या गोष्टींपेक्षा त्या व्यक्‍तीचं यहोवासोबतचं नातं जास्त महत्त्वाचं आहे. तसंच, नेहमी हे लक्षात ठेवा, की ज्याच्यासाठी तुम्ही स्थळ पाहताय, त्या भावाने किंवा बहिणीनेच लग्नाविषयीचा अंतिम निर्णय घेतला पाहिजे. टेहळणी बुरूज२४.०५ २३ ¶११

मंगळवार, २६ मे

खरा मित्र नेहमी प्रेम करतो.—नीति. १७:१७.

डेटींग करणाऱ्‍या जोडप्याला आपण एका मार्गाने मदत करू शकतो. तो मार्ग म्हणजे आपण काय बोलणार आणि काय नाही हे नेहमी लक्षात ठेवू शकतो. कधीकधी आपल्याला आपली जीभ ताब्यात ठेवायची गरज असू शकते. (नीति. १२:१८) उदाहरणार्थ, या जोडप्याने डेटींग सुरू केली आहे, हे इतरांना सांगायची आपल्याला खूप उत्सुकता असेल. पण याबद्दल आपण स्वतः इतरांना सांगावं अशी कदाचित त्या जोडप्याची इच्छा असेल. तसंच, आपण त्यांच्याबद्दल गप्पागोष्टी करत फिरू नये किंवा त्यांच्या निर्णयांबद्दल त्यांची टीका करू नये. (नीति. २०:१९; रोम. १४:१०; १ थेस्सलनी. ४:११) तसंच, त्या जोडप्यावर लग्न करण्यासाठी दबाव येईल अशी कोणतीही गोष्ट आपण त्यांना बोलू नये किंवा विचारू नये. डेटींग करणाऱ्‍या जोडप्याने जर डेटींग थांबवायचा (ब्रेकअपचा) निर्णय घेतला तर काय? अशा वेळी आपण त्यांना कोणतेही खाजगी प्रश्‍न विचारणार नाही. किंवा त्या दोघांपैकी कोणाची बाजू घेऊन त्यांना दोष देणार नाही. (१ पेत्र ४:१५) डेटींग थांबवण्याचा अर्थ डेटींग अयशस्वी ठरली असा होत नाही. उलट याचा अर्थ असा होतो, की डेटींगचा हेतू साध्य झाला. तो म्हणजे डेटींग करणाऱ्‍या जोडप्याला योग्य निर्णयावर पोचता आलं. हे खरंय, की अशा प्रकारच्या निर्णयांमुळे कधीकधी भावनिक त्रास होऊ शकतो. म्हणून त्या जोडप्याला आणखी कशी मदत करता येईल याकडे आपण लक्ष देऊ शकतो. टेहळणी बुरूज२४.०५ ३१ ¶१५-१६

बुधवार, २७ मे

दुःखाच्या प्रसंगी तू निराश झालास, तर तुझी शक्‍ती कमी पडेल.—नीति. २४:१०.

काही संकटं अशी असतात, ज्यामुळे आपल्याला खूप दुःख होऊ शकतं. जसं की, आपल्या कुटुंबातली एखादी व्यक्‍ती किंवा जवळचा एखादा मित्र यहोवाला सोडून जातो, तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. (स्तो. ७८:४०) त्या व्यक्‍तीसोबतचं आपलं नातं खूप जवळचं असल्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. तुम्हाला जर असा वाईट अनुभव आला असेल, तर सादोकने दाखवलेल्या एकनिष्ठेच्या उदाहरणामुळे तुम्हाला बळ मिळू शकतं. सादोकच्या एका जवळच्या मित्राने म्हणजे अब्याथारने विश्‍वासघात केला, तेव्हासुद्धा तो यहोवाला विश्‍वासू राहिला. दावीद अंथरुणाला खिळला होता, तेव्हा हे घडलं. या काळात यहोवाने शलमोनला जे राजासन द्यायचं वचन दिलं होतं ते बळकावण्याचा, दावीदचा मुलगा अदोनीया प्रयत्न करत होता. (१ इति. २२:९, १०) अब्याथारने अदोनीयाला साथ द्यायचं निवडलं. (१ राजे १:५-८) असं केल्यामुळे अब्याथार फक्‍त दावीद आणि सादोकचाच नाही, तर यहोवाचासुद्धा विश्‍वासघात करत होता. खरंतर, त्याने आणि अब्याथारने याजक म्हणून बरीच वर्षं सोबत मिळून काम केलं होतं.—२ शमु. ८:१७; १५:२९; १९:११-१४. टेहळणी बुरूज२४.०७ ६ ¶१४-१५

गुरुवार, २८ मे

नेहमी सावध राहणारा माणूस सुखी असतो.—नीति. २८:१४.

आपण याची खातरी ठेवू शकतो, की मोहापासून सावध राहण्यासाठी आपण जी मेहनत घेतोय ती कधीच वाया जाणार नाही. “पापाचं क्षणिक सुख” कितीही असलं तरी यहोवाच्या स्तरांप्रमाणे जगल्यामुळे मिळणारा आनंद हा त्याच्या कितीतरी पटीने जास्त आहे. (इब्री ११:२५; स्तो. १९:८) कारण आपल्याला यहोवाच्या मार्गांप्रमाणेच जगण्यासाठी बनवण्यात आलंय. (उत्प. १:२७) आपण जर असं केलं, तर आपल्याला शुद्ध विवेकाने जगता येईल आणि कायमच्या जीवनाचा आशीर्वाद मिळेल. (१ तीम. ६:१२; २ तीम. १:३; यहू. २०, २१) हे खरंय, की “शरीर दुर्बळ आहे.” (मत्त. २६:४१) पण याचा अर्थ असा होत नाही, की आपण लाचार आहोत. कारण आपल्याला लागणारी ताकद पुरवायला यहोवा नेहमी तयार आहे. (२ करिंथ. ४:७) पण लक्षात घ्या, की देव पुरवत असलेलं सामर्थ्य हे असाधारण आहे. असं असलं तरी, आपल्याकडे असलेलं साधारण सामर्थ्य वापरायची जबाबदारी आपली आहे. हे सामर्थ्य म्हणजे, आपण मोहाचा सामना करण्यासाठी दररोज करत असलेले प्रयत्न. यहोवा आपल्याला गरज असलेली ताकद पुरवण्यासाठी आपण केलेल्या प्रार्थनांचं उत्तर जरूर देईल. (१ करिंथ. १०:१३) खरंच, यहोवाच्या मदतीने आपण मोहांचा प्रतिकार नक्कीच करू शकतो. टेहळणी बुरूज२४.०७ १८-१९ ¶१९-२१

शुक्रवार, २९ मे

जे पाप करत राहतात त्यांची सर्वांच्या देखत कानउघाडणी कर.—१ तीम. ५:२०.

“जे पाप करत राहतात त्यांना” कसं ताडन द्यायचं, हे सांगायला प्रेषित पौलने तीमथ्यला आजच्या वचनातले हे शब्द लिहिले. पण इथे पौलला काय सांगायचं होतं? पौल जेव्हा “सर्वांच्या देखत” असं बोलला, तेव्हा त्याचा अर्थ संपूर्ण मंडळीच्या देखत असा नव्हता. याउलट तो फक्‍त अशा लोकांबद्दल बोलत होता ज्यांना घडलेल्या पापाबद्दल माहीत आहे. हे कदाचित त्या घटनेचे साक्षीदार असू शकतात. किंवा असे भाऊबहीण असू शकतात ज्यांच्यापुढे पाप करणाऱ्‍याने कबुली दिली. फक्‍त अशांनाच वडील सांगतील, की हे प्रकरण हाताळण्यात आलंय आणि पाप करणाऱ्‍याला सुधारण्यात आलंय. काही वेळा असं असू शकतं, की जे पाप घडलंय त्याबद्दल मंडळीतल्या बऱ्‍याच जणांना माहीत आहे, किंवा माहीत पडण्याची शक्यता आहे. अशा वेळी “सर्वांच्या देखत” यामध्ये संपूर्ण मंडळी येते. त्यामुळे मंडळीतल्या वडिलांपैकी एक जण कदाचित अशी घोषणा करेल, की त्या भावाला किंवा बहिणीला ताडन देण्यात आलंय. का? पौलने म्हटलं: यामुळे बाकीच्यांना “इशारा” मिळेल आणि ते पापात पडणार नाहीत. टेहळणी बुरूज२४.०८ २३-२४ ¶१६-१७

शनिवार, ३० मे

ही देवाची खरी वचनं आहेत.—प्रकटी. १९:९.

आपण शेवट येईपर्यंत यहोवाच्या सेवेत व्यस्त राहिलं पाहिजे. अभिषिक्‍तांना स्वर्गातलं बक्षीस मिळवण्यासाठी येशूद्वारे वर “घेतलं जाईल.” पण त्यासाठी त्यांना सावध राहण्याची गरज आहे. (मत्त. २४:४०) म्हणूनच स्वर्गात येशूसोबत “एकत्र केलं” जाण्यासाठी ते खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि हर्मगिदोनाच्या युद्धानंतर ते कोकऱ्‍याच्या लग्नात येशूची वधू म्हणून सहभाग घेतील. (२ थेस्सलनी. २:१) न्यायाचा दिवस झपाट्याने जवळ येत असला, तरी आपल्याला घाबरण्याची गरज नाही. कारण आपण जर विश्‍वासू राहिलो तर स्वर्गातला आपला प्रेमळ पिता आपल्याला “मनुष्याच्या मुलासमोर उभं राहता यावं” म्हणून “असाधारण सामर्थ्य” देईल. (२ करिंथ. ४:७; लूक २१:३६) आपली आशा स्वर्गातली असो किंवा पृथ्वीवरची, आपण जर येशूने दिलेल्या दाखल्यातल्या इशाऱ्‍यांकडे लक्ष दिलं, तर आपण आपल्या पित्याचं मन आनंदित करू. यहोवाच्या अपार दयेमुळे आपली ‘नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली’ दिसतील.—दानी. १२:१; प्रकटी. ३:५. टेहळणी बुरूज२४.०९ २४-२५ ¶१९-२०

रविवार, ३१ मे

देवाच्या जवळ जाणं हेच हिताचं आहे.—स्तो. ७३:२८.

देवाच्या वचनाच्या मदतीने तुम्हीसुद्धा मनाची शांती मिळवू शकता. कसं? सध्या तुमच्याजवळ असलेल्या चांगल्या गोष्टींवर विचार करा; यात तुम्ही स्वर्गात साठवत असलेली संपत्तीसुद्धा येते. मग या आशीर्वादांची तुलना देवाची सेवा न करणाऱ्‍या लोकांना शेवटी जे मिळतं त्याच्याशी करा. त्यांना भविष्याची काहीच आशा नाही. त्यामुळे जगात मिळवलेल्या गोष्टींवरच त्यांना कदाचित विसंबून राहावं लागू शकतं. याउलट, तुमच्यासाठी भविष्यात असे आशीर्वाद ठेवलेत, ज्यांची तुम्ही कल्पनाही कधी केली नसेल! (स्तो. १४५:१६) तसंच याचाही विचार करा: तुम्ही जर तुमच्या जीवनात वेगळे निर्णय घेतले असते तर तुमचं जीवन कसं असतं हे तुम्हाला खरंच कळलं असतं का? एक गोष्ट अगदी पक्की आहे: जे देवावर आणि शेजाऱ्‍यांवर असलेल्या प्रेमाच्या आधारावर निर्णय घेतात ते आनंदी असतात आणि त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीची कमी पडत नाही. टेहळणी बुरूज२४.१० २७-२८ ¶१२-१३

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा