वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es26 पृ. ४५-५८
  • एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एप्रिल
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२६
  • उपशिर्षक
  • बुधवार, १ एप्रिल
  • स्मारकविधीची तारीख
    सूर्यास्तानंतर
    गुरुवार, २ एप्रिल
  • शुक्रवार, ३ एप्रिल
  • शनिवार, ४ एप्रिल
  • रविवार, ५ एप्रिल
  • सोमवार, ६ एप्रिल
  • मंगळवार, ७ एप्रिल
  • बुधवार, ८ एप्रिल
  • गुरुवार, ९ एप्रिल
  • शुक्रवार, १० एप्रिल
  • शनिवार, ११ एप्रिल
  • रविवार, १२ एप्रिल
  • सोमवार, १३ एप्रिल
  • मंगळवार, १४ एप्रिल
  • बुधवार, १५ एप्रिल
  • गुरुवार, १६ एप्रिल
  • शुक्रवार, १७ एप्रिल
  • शनिवार, १८ एप्रिल
  • रविवार, १९ एप्रिल
  • सोमवार, २० एप्रिल
  • मंगळवार, २१ एप्रिल
  • बुधवार, २२ एप्रिल
  • गुरुवार, २३ एप्रिल
  • शुक्रवार, २४ एप्रिल
  • शनिवार, २५ एप्रिल
  • रविवार, २६ एप्रिल
  • सोमवार, २७ एप्रिल
  • मंगळवार, २८ एप्रिल
  • बुधवार, २९ एप्रिल
  • गुरुवार, ३० एप्रिल
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२६
es26 पृ. ४५-५८

एप्रिल

बुधवार, १ एप्रिल

माझ्या पित्याची हीच इच्छा आहे, की जो मुलाला ओळखून त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.—योहा. ६:४०.

येशूला असं सांगायचं होतं की आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवणं गरजेचं आहे. (इफिस. १:७) येशूने ज्यांना ‘दुसरी मेंढरं’ म्हटलं, ते प्रभूच्या सांजभोजनाच्या वेळी भाकर खात नाहीत आणि द्राक्षारस पीत नाहीत. त्यांनी तसं करूही नये. (योहा. १०:१६) असं असलं तरी येशूच्या खंडणी बलिदानापासून त्यांनाही फायदा होतो. पण हा फायदा मिळवण्यासाठी खंडणी बलिदानामुळेच सर्वकाळाचं जीवन मिळू शकतं या गोष्टीवर त्यांनी विश्‍वास ठेवणं महत्त्वाचं आहे. (योहा. ६:५३) याउलट त्या वेळी जे भाकर खातात आणि द्राक्षारस पितात ते हे दाखवून देतात की देवाच्या राज्याचे वारस म्हणून त्यांना नवीन करारात सामील करण्यात आलंय. तर मग आपण अभिषिक्‍त जनांपैकी असू किंवा दुसऱ्‍या मेंढरांपैकी, सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी खंडणी बलिदानावर आपला मजबूत विश्‍वास असला पाहिजे. टेहळणी बुरूज२४.१२ १२ ¶१४; १३ ¶१६

स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १२: दिवसा घडलेल्या घटना) मत्तय २६:१-५, १४-१६; लूक २२:१-६

स्मारकविधीची तारीख
सूर्यास्तानंतर
गुरुवार, २ एप्रिल

लहान कळपा, भिऊ नको. कारण तुम्हाला राज्य द्यायला तुमच्या पित्याला आनंद झालाय.—लूक १२:३२.

प्रभूच्या सांजभोजनाच्या वेळी येशूने आपल्या प्रेषितांना बेखमीर भाकर दिली आणि त्यांना सांगितलं, की ती त्याच्या शरीराला सूचित करते. मग त्याने त्यांना द्राक्षारस देऊन म्हटलं, की तो “कराराच्या रक्‍ताला” सूचित करतो. (मार्क १४:२२-२५; लूक २२:२०; १ करिंथ. ११:२४) नवीन करार “[आध्यात्मिक] इस्राएलच्या घराण्याशी” करण्यात आला. ते “देवाच्या राज्यात” असतील. (इब्री ८:६, १०; ९:१५) प्रभूच्या सांजभोजनाच्या वेळी येशू जे शब्द बोलला, ते ‘लहान कळपाला’ उद्देशून होते. हा गट त्या वेळी तिथे हजर असलेल्या विश्‍वासू प्रेषितांपासून सुरू झाला. या गटाचा भाग असलेलेच येशूसोबत स्वर्गात राज्य करणार आहेत. टेहळणी बुरूज२४.१२ ११ ¶९-१०

स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १३: दिवसा घडलेल्या घटना) मत्तय २६:१७-१९; मार्क १४:१२-१६; लूक २२:७-१३ (निसान १४: सूर्यास्तानंतर घडलेल्या घटना) योहान १३:१-५; १४:१-३

शुक्रवार, ३ एप्रिल

देवाने जगावर इतकं प्रेम केलं, की त्याने आपला एकुलता एक मुलगा दिला. कारण त्याची अशी इच्छा आहे, की जो कोणी त्याच्या मुलावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.—योहा. ३:१६.

येशूचा विश्‍वासघात करण्यात आला, त्याला अटक करण्यात आली, त्याला शिव्याशाप देण्यात आले, त्याची बदनामी करण्यात आली, त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. इतकंच नाही तर, त्याला खूप यातनाही देण्यात आल्या. शेवटी मारण्यासाठी सैनिक त्याला वधस्तंभावर लटकवायला घेऊन गेले. येशूने विश्‍वासूपणे या सगळ्या यातना तर सोसल्याच, पण अशीही एक व्यक्‍ती होती, जिला त्या वेळी त्याच्यापेक्षाही जास्त यातना झाल्या. ती व्यक्‍ती म्हणजे यहोवा देव. यहोवा देवाकडे अफाट शक्‍ती आहे. येशूला वाचवण्यासाठी तो काहीही करू शकला असता. पण त्याने असं केलं नाही. का? एका शब्दात सांगायचं तर, प्रेमापोटी. यहोवाचं तुमच्यावर किती प्रेम आहे याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे येशूचं खंडणी बलिदान. तुम्हाला पाप आणि मृत्यूपासून सोडवायला त्याने कल्पना करता येणार नाही इतकं दुःख सोसलं. त्याने सर्वात मोठी किंमत मोजली! (१ योहा. ४:९, १०) हो, पापाशी लढत राहायला आपल्यापैकी प्रत्येकाला मदत करायची त्याची इच्छा आहे. आणि त्याला असं वाटतं, की आपण ही लढाई जिंकावी! टेहळणी बुरूज२४.०८ ५-६ ¶१३-१४

स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १४: दिवसा घडलेल्या घटना) योहान १९:१-४२

शनिवार, ४ एप्रिल

ख्रिस्तानेसुद्धा [तुमच्यासाठी] दुःख सोसलं.—१ पेत्र २:२१.

खंडणी बलिदानासाठी यहोवाला किती मोठी किंमत द्यावी लागली याचा जर आपण विचार केला, तर त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हे आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे समजेल. सैतानाने असा दावा केला की जेव्हा परिस्थिती कठीण होते, तेव्हा देवाचा कोणताही सेवक त्याला विश्‍वासू राहत नाही. सैतानाला खोटं ठरवायला, यहोवा देवाने येशूला दुःख सहन करून मरू दिलं. (ईयो. २:१-५) कल्पना करा, धार्मिक पुढारी येशूची थट्टा करत होते, सैनिक त्याला चाबकांनी फटके मारत होते, त्याच्या हातापायांना खिळे ठोकून त्याला वधस्तंभावर लटकवण्यात आलं. हे सगळं यहोवा पाहत होता. आपल्या प्रिय मुलाचा यातनादायक मृत्यू पाहून त्याला कसं वाटलं असेल, याचा विचार करा. (मत्त. २७:२८-३१, ३९) हे सगळं घडत असताना यहोवा ते कोणत्याही क्षणी थांबवू शकला असता. (मत्त. २७:४२, ४३) पण त्याने तसं केलं असतं, तर खंडणी दिली गेली नसती आणि आपल्याला कोणतीच आशा मिळाली नसती. म्हणून यहोवाने आपल्या मुलाला शेवटच्या श्‍वासापर्यंत दुःख सहन करू दिलं आणि त्याचा मृत्यू होऊ दिला. टेहळणी बुरूज२५.०१ २२ ¶७

स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १५: दिवसा घडलेल्या घटना) मत्तय २७:६२-६६ (निसान १६: सूर्यास्तानंतर घडलेल्या घटना) योहान २०:१

रविवार, ५ एप्रिल

४० दिवसांच्या काळादरम्यान तो बऱ्‍याचदा त्यांना दिसला.—प्रे. कार्यं १:३.

कल्पना करा, की इ.स. ३३ सालचा निसान महिन्याचा १६ वा दिवस आहे. येशूचे शिष्य खूप दुःखी आहेत. त्यासोबतच ते खूप घाबरलेले आहेत. त्यांच्यापैकी दोघे जण यरुशलेम सोडून अम्माऊसला जात आहेत. एक अनोळखी माणूस त्यांच्याजवळ येतो आणि त्यांच्यासोबत चालू लागतो. येशूच्या बाबतीत घडलेल्या गोष्टी ते अगदी निराश होऊन त्या माणसाला सांगतात. मग तो माणूस अशा गोष्टी त्यांना सांगू लागतो, ज्या शिष्य कधीच विसरू शकणार नव्हते. “मोशेपासून सुरुवात करून सर्व संदेष्ट्यांची लिखाणं” स्पष्ट करत तो त्यांना मसीहाला दुःख सोसून का मरावं लागलं ते सांगतो. जेव्हा ती तीन माणसं अम्माऊसमध्ये पोचतात तेव्हा त्यांना त्या अनोळखी माणसाची ओळख पटते. त्यांना कळतं की तोच पुनरुत्थान झालेला येशू आहे. (लूक २४:१३-३५) पृथ्वीवर असताना शेवटच्या ४० दिवसांत येशू त्याच्या शिष्यांना बऱ्‍याचदा भेटला. त्या काळात येशूने दुःखी आणि घाबरलेल्या शिष्यांना खूप प्रोत्साहन दिलं. आणि यामुळे ते आनंदाने आणि धाडसाने राज्याचा आनंदाचा संदेश लोकांना सांगू शकले आणि शिकवू शकले. टेहळणी बुरूज२४.१० १२-१३ ¶१-३

स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १६: दिवसा घडलेल्या घटना) योहान २०:२-१८

सोमवार, ६ एप्रिल

तुम्ही आपला परमपवित्र विश्‍वास मजबूत करा.—यहू. २०.

काळाच्या ओघात आपली शारीरिक वाढ आपोआप होत असते. पण, आध्यात्मिक वाढ आपोआप होत नाही. उदाहरणार्थ, करिंथमधल्या भाऊबहिणींनी सत्य स्वीकारलं, त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्यांना यहोवाकडून पवित्र शक्‍ती मिळाली. त्यासोबतच, प्रेषित पौलने त्यांना वैयक्‍तिकपणे जो सल्ला दिला होता त्यामुळेसुद्धा त्यांना फायदा झाला. (प्रे. कार्यं १८:८-११) असं असलं तरी, बाप्तिस्म्याच्या काही वर्षांनंतर त्यांच्यातले बरेच जण अजूनही आध्यात्मिक रितीने प्रौढ झाले नव्हते. (१ करिंथ. ३:२) तुम्हाला जर आध्यात्मिक रितीने प्रौढ व्हायचं असेल तर सर्वात आधी तुमच्या मनात तशी इच्छा असली पाहिजे. ज्यांचं ‘अज्ञानावर प्रेम’ असतं त्यांना आध्यात्मिक रितीने लहानच राहायचं असतं. आणि त्यामुळे त्यांची प्रगती होत नसते. (नीति. १:२२) आपल्याला अशा मुलांसारखं व्हायचं नाही, ज्यांची शारीरिक वाढ तर झाली आहे पण तरीसुद्धा ते निर्णय घेण्यासाठी त्यांच्या पालकांवर अवलंबून असतात. याउलट आपल्याला प्रौढ व्यक्‍तीसारखं व्हायचं आहे. कारण यहोवासोबतचं आपलं नातं मजबूत करणं ही आपली स्वतःची जबाबदारी आहे हे आपण ओळखतो. तर मग, तुम्ही आध्यात्मिक रितीने प्रगती करण्यासाठी मेहनत घेत असाल, तर यहोवाने तुम्हाला त्यासाठी “इच्छा” आणि “ताकदही” द्यावी म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करा.—फिलिप्पै. २:१३. टेहळणी बुरूज२४.०४ ४ ¶९-१०

मंगळवार, ७ एप्रिल

कोणाचाही नाश व्हावा अशी [यहोवाची] इच्छा नाही.—२ पेत्र ३:९.

मानवांचा न्याय करण्याची वेळ येते तेव्हा यहोवाला कसं वाटतं हे तो आपल्याला सांगतो. (यहे. ३३:११) यहोवा कोणाचाही कायमचा नाश करायची घाई करत नाही. तो मुळातच एक दयाळू देव आहे आणि जेव्हा शक्य आहे तेव्हा तो दया दाखवतो. ज्यांचं पुनरुत्थान होणार नाही अशा लोकांबद्दल आपल्याला काय माहीत आहे? बायबलमध्ये याची खूप कमी उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ, यहूदा इस्कर्योतचं पुनरुत्थान होणार नाही असं येशूने दाखवून दिलं. (मार्क १४:२१; योहा. १७:१२) यहूदाने मुद्दामहून यहोवा देवाच्या आणि त्याच्या मुलाच्या विरुद्ध काम केलं. (मार्क ३:२९ आणि टेहळणी बुरूज०७ ८/१ १३ पाहा.) त्यासोबतच येशूने असंही म्हटलं की त्याचा विरोध करणारे काही धार्मिक पुढारी पुनरुत्थानाच्या आशेविनाच मरतील. (मत्त. २३:३३; योहा. १९:११) तसंच, प्रेषित पौलने सांगितलं की पश्‍चात्ताप न करणाऱ्‍या धर्मत्यागी लोकांचं पुनरुत्थान होणार नाही.—इब्री ६:४-८; १०:२९. टेहळणी बुरूज२४.०५ ४ ¶१०-११

बुधवार, ८ एप्रिल

यहोवा विश्‍वासू लोकांचं रक्षण करतो.—स्तो. ३१:२३.

आपण जेव्हा यहोवाच्या जवळ असतो, तेव्हा सैतान कधीच आपलं कायमचं नुकसान करू शकणार नाही. (१ योहा. ३:८) नवीन जगात यहोवा त्याच्या विश्‍वासू मित्रांचं फक्‍त आध्यात्मिक धोक्यांपासूनच संरक्षण करणार नाही, तर मृत्यूपासूनसुद्धा संरक्षण करेल. (प्रकटी. २१:४) यहोवाच्या तंबूत त्याचे पाहुणे म्हणून राहणं हा खरंच एक बहुमान आहे. त्यामुळे आपण त्याच्यासोबत एक कायमचं व्यक्‍तिगत नातं अनुभवत असतो. (यहे. ३७:२७) पण आपल्याला यहोवाचे पाहुणे म्हणून राहायचंय तर आपण काय केलं पाहिजे? जर आपल्याला कोणी त्यांच्या घरी बोलवलं, तर आपण त्यांना बरं वाटेल अशाच प्रकारे वागायचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे आपल्याला यहोवाचे पाहुणे म्हणून राहायचं असेल तर आपल्यालासुद्धा त्याच्या अपेक्षा माहीत असल्या पाहिजेत. त्याच्यावर प्रेम असल्यामुळेच आपण “त्याला पूर्णपणे संतुष्ट” करायचा प्रयत्न करू. (कलस्सै. १:१०) आपल्या मनात त्याच्याबद्दल गाढ आदर असला पाहिजे. त्याच्याबद्दल आपल्या मनात अशी भावना असल्यामुळे त्याचं मन दुखावेल अशी कोणतीही गोष्ट आपण करणार नाही. उलट, आपण त्याच्यासोबत “नम्रपणे चालत” राहायचाच प्रयत्न करू.—मीखा ६:८. टेहळणी बुरूज२४.०६ ४ ¶८-९

गुरुवार, ९ एप्रिल

अपराध्यांसाठी त्याने मध्यस्थी केली.—यश. ५३:१२.

यहोवा देवाने अब्राहामला आपल्या एकुलत्या एका मुलाचं बलिदान द्यायला सांगितलं. अब्राहामसाठी ही गोष्ट नक्कीच सोपी नव्हती. तरीही तो ही गोष्ट करायला तयार झाला. पण देवाने त्याला काहीही करण्याच्या आधी थांबवलं. या उदाहरणातून आपल्याला हे शिकायला मिळतं की यहोवा भविष्यात काय करणार होता. तो आपल्या एकुलत्या एका मुलाचं बलिदान देणार होता. विचार करा: यहोवा देवाचं माणसांवर किती प्रेम आहे! (उत्प. २२:१-१८) याच्या बऱ्‍याच शतकांनंतर इस्राएल राष्ट्राला नियमशास्त्र देण्यात आलं. त्यात बऱ्‍याच बलिदानांबद्दल सांगितलं होतं. या बलिदानांमुळे देवाच्या लोकांना त्यांच्या पापांची माफी मिळणार होती. (लेवी. ४:२७-२९; १७:११) ही बलिदानं एका मोठ्या बलिदानाची झलक होती. आणि त्या बलिदानामुळे संपूर्ण मानवजातीला पापापासून पूर्णपणे सुटका मिळणार होती. देवाच्या संदेष्ट्यांनी त्याच्या प्रेरणेने हे समजावून सांगितलं की वचन दिलेली संतती कोण असणार होती. ही संतती देवाचा एकुलता एक मुलगा असणार होती. संपूर्ण मानवजातीला पाप आणि मृत्यूपासून सोडवण्यासाठी त्याला दुःख सहन करून शेवटी मरावं लागणार होतं. आणि हे बलिदान तुमच्यासाठीही आहे.—यश. ५३:१-१२. टेहळणी बुरूज२४.०८ ४ ¶७-८

शुक्रवार, १० एप्रिल

तुझ्या नियमशास्त्रावर माझं मनापासून प्रेम आहे! दिवसभर मी त्यावर मनन करतो.—स्तो. ११९:९७.

तुम्ही बायबल वाचता, तेव्हा वाचलेल्या गोष्टी कशा लागू करता येतील यावर विचार करा. तुम्ही बायबलचा एखादा भाग वाचल्यानंतर स्वतःला विचारू शकता: ‘मी ही माहिती आत्ता किंवा येणाऱ्‍या दिवसांमध्ये कशी लागू करू शकतो?’ हे समजून घ्यायला अशी कल्पना करा, की तुम्ही १ थेस्सलनीकाकर ५:१७, १८ वाचत आहात. वाचल्यानंतर थोडं थांबून तुम्ही किती वेळा आणि किती मनापासून प्रार्थना करता यावर विचार करू शकता. तसंच ज्या गोष्टींसाठी तुम्हाला देवाचे आभार मानावेसे वाटतात त्या गोष्टींचासुद्धा तुम्ही विचार करू शकता. मग कदाचित तुम्ही तीन विशिष्ट गोष्टींसाठी यहोवाचे आभार मानायचं ठरवाल. अशा प्रकारे काही मिनिटं लक्ष देऊन वाचल्यामुळे तुम्ही काही प्रमाणात देवाचं वचन फक्‍त ऐकणारेच नाही, तर त्याप्रमाणे चालणारेही बनाल. तुम्ही बायबलच्या इतर भागांचा अशाच प्रकारे विचार केला, तर तुम्हाला किती फायदा होईल याचा विचार करा! असं केल्यामुळे तुम्ही खऱ्‍या अर्थाने देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे बनाल. टेहळणी बुरूज२४.०९ ४-५ ¶९-१०

शनिवार, ११ एप्रिल

स्वतःला सांभाळा, म्हणजे तुमच्यामध्ये ज्या गोष्टी उत्पन्‍न करण्यासाठी आम्ही मेहनत घेतली त्या तुम्ही गमावून बसणार नाही, तर तुम्हाला पूर्ण प्रतिफळ मिळेल.—२ योहा. ८.

यहोवाने आपल्याला एका खास क्षमतेने बनवलंय. जर कोणी आपल्याला एखादी भेटवस्तू दिली तर आपल्याला आनंद होतोच. पण जेव्हा आपण इतरांना देतो, तेव्हा आपल्याला जास्त आनंद होतो. आपल्या भाऊबहिणींना मदत केल्यामुळे आपल्याला खूप बरं वाटतं. आणि जेव्हा ते त्याबद्दल कदर व्यक्‍त करतात, तेव्हा आपल्याला जास्त आनंद होतो. पण समजा कोणी कदर केली नाही, तरी आपण योग्य ते करतोय याचं समाधान आपल्याला असेल. हे कधीच विसरू नका, की तुम्ही दुसऱ्‍यांना जे काही देता त्या बदल्यात ‘यहोवा तुम्हाला त्याहून जास्त देऊ शकतो.’ (२ इति. २५:९) कारण यहोवा आपल्याला जितकं देऊ शकतो तितकं आपण इतरांना कधीच देऊ शकत नाही! आणि स्वतः यहोवा त्याची परतफेड करतोय यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणताच नाही. म्हणूनच आपण उदार असणाऱ्‍या आपल्या स्वर्गातल्या पित्याचं अनुकरण करत राहायचा पक्का निर्धार करू या! टेहळणी बुरूज२४.०९ ३१ ¶२०-२१

रविवार, १२ एप्रिल

हे यहोवा, माझ्या देवा, मी अगदी पूर्ण मनाने तुझी स्तुती करतो आणि मी सर्वकाळ तुझ्या नावाचं गुणगान करीन.—स्तो. ८६:१२.

यहोवा दयाळू आणि करुणामय आहे. (स्तो. १०३:१३; यश. ४९:१५) तो आपल्या भावना समजून घेऊ शकतो. जेव्हा आपल्याला दुःख होतं तेव्हा त्यालाही दुःख होतं. (जख. २:८) त्याला जाणून घ्यायला आणि त्याचे मित्र बनायला तो आपल्याला मदत करतो. (स्तो. २५:१४; प्रे. कार्यं १७:२७) यहोवा नम्र आहे. बायबल म्हणतं, की “आकाश आणि पृथ्वी यांना पाहण्यासाठी तो खाली वाकतो. तो दीनदुबळ्याला धुळीतून उठवतो.” (स्तो. ११३:६, ७) मग अशा महान देवाचा महिमा करायला आपल्या सगळ्यांनाच आवडणार नाही का? आपण यहोवाचा महिमा करतो, कारण इतरांनी त्याला जाणून घ्यावं असं आपल्याला वाटतं. आज बऱ्‍याच जणांना यहोवाबद्दल सत्य माहीत नाही. का? कारण सैतानाने त्याच्याबद्दल खोटं पसरवून लोकांची मनं आंधळी केली आहेत. (२ करिंथ. ४:४) सैतानाने लोकांना हे पटवून दिलंय की यहोवा रागीट देव आहे. त्याला आपली अजिबात काळजी नाही आणि जगातल्या बऱ्‍याच समस्यांसाठी तोच जबाबदार आहे. पण खरं काय आहे हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे लोकांना त्याच्याबद्दल सांगून त्याचा महिमा करायची संधी आपल्याकडे आहे.—यश. ४३:१०. टेहळणी बुरूज२५.०१ ३-४ ¶६-७

सोमवार, १३ एप्रिल

संपूर्ण पृथ्वीवरच्या लोकांना फसवणारा सैतान [आहे.]—प्रकटी. १२:९.

देवाचा मुलगा येशू परिपूर्ण होता आणि त्याने बरेच अद्‌भुत चमत्कार केले होते. पण तरी पहिल्या शतकात सैतानाने काही लोकांचा वापर करून त्याच्याबद्दल खोटी माहिती पसरवली. उदाहरणार्थ, त्या काळाच्या धार्मिक पुढाऱ्‍यांनी लोकांना सांगितलं की येशू “दुष्ट स्वर्गदूतांच्या अधिकाऱ्‍याच्या मदतीनेच” दुष्ट स्वर्गदूत काढतोय. (मार्क ३:२२) नंतर जेव्हा येशूवर खटला चालला होता तेव्हा धार्मिक पुढाऱ्‍यांनी त्याच्यावर देवाची निंदा करायचा आरोप लावला आणि त्याला मृत्यूदंड मिळावा म्हणून लोकांना भडकवलं. (मत्त. २७:२०) पुढे जेव्हा ख्रिस्ताचे शिष्य आनंदाच्या संदेशाचा प्रचार करू लागले, तेव्हा त्यांना छळण्यासाठी त्यांच्या विरोधकांनी “लोकांना भडकवलं आणि बांधवांविरुद्ध त्यांची मनं दूषित केली.” (प्रे. कार्यं १४:२, १९) १ डिसेंबर १९९८ च्या टेहळणी बुरूज अंकात, प्रेषितांची कार्यं १४:२ या वचनाबद्दल असं सांगितलं होतं: “स्वतः संदेश नाकारून यहुदी विरोधक शांत बसले नाहीत तर, ख्रिश्‍चनांवर काळीमा फासण्याची मोहीमच त्यांनी हाती घेतली; विदेशी लोकांची मनं ख्रिश्‍चनांविरुद्ध कलुषित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.” सैतान आजही ‘संपूर्ण पृथ्वीवरच्या लोकांना फसवत आहे.’ टेहळणी बुरूज२४.०४ १०-११ ¶१५-१६

मंगळवार, १४ एप्रिल

सगळ्या पृथ्वीचा न्यायाधीश योग्य ते करणार नाही का?—उत्प. १८:२५.

एखादी व्यक्‍ती केव्हा मरते या गोष्टीवर त्या व्यक्‍तीला अनंतकाळाचं जीवन मिळेल का हे ठरत नाही. यहोवा एक परिपूर्ण न्यायाधीश आहे आणि तो नेहमी न्यायाने आणि नीतीने निर्णय घेतो. (स्तो. ३३:४, ५) त्यामुळे आपण या गोष्टीची खातरी बाळगू शकतो, की “सगळ्या पृथ्वीचा न्यायाधीश” योग्य तेच करेल. तसंच असं म्हणणंसुद्धा योग्य ठरेल, की एखादी व्यक्‍ती कुठे राहते या गोष्टीवर त्या व्यक्‍तीला सर्वकाळाचं जीवन मिळेल की नाही हे ठरत नाही. कारण काही देशांमध्ये राज्याचा संदेश ऐकायची संधी लोकांना मिळत नाही. आणि फक्‍त या कारणामुळेच यहोवा त्यांचा ‘बकऱ्‍यांसारखी’ मनोवृत्ती असलेले लोक म्हणून न्याय करेल असा विचार करणंसुद्धा चुकीचं ठरेल. (मत्त. २५:४६) उलट, सगळ्या पृथ्वीच्या नीतिमान न्यायाधीशाला या लोकांची आपल्यापेक्षा जास्त काळजी आहे. आपल्याला हे माहीत नाही, की मोठ्या संकटादरम्यान यहोवा घटनांना कसं वळण देईल. पण जेव्हा यहोवा राष्ट्रांसमोर स्वतःला पवित्र करेल, तेव्हा कदाचित या लोकांना त्याला जाणून घ्यायची, विश्‍वास ठेवायची आणि त्याची बाजू घ्यायची संधी मिळेल.—यहे. ३८:१६. टेहळणी बुरूज२४.०५ १२-१३ ¶१४-१५

बुधवार, १५ एप्रिल

एकमेकांवर प्रेम करा.—योहा. १५:१२.

यहोवाच्या लोकांना एकमेकांना मदत करायला आवडतं. (२ करिंथ. ८:४) पण असं करताना कधीकधी धैर्य दाखवावं लागतं. जसं की, जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा भाऊबहिणींना प्रोत्साहनाची, आधाराची आणि कदाचित आध्यात्मिक किंवा जीवनावश्‍यक गोष्टींची गरज पडू शकते, हे स्थानिक वडिलांना माहीत असतं. म्हणून ते मेंढरांवर असलेल्या प्रेमामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना गरजेच्या गोष्टी पुरवतात. अशा परिस्थितीत आपण एकता टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे. यासाठी स्थानिक शाखा कार्यालयाकडून मिळणाऱ्‍या सूचनांचं पालन करा. (इब्री १३:१७) शिवाय, मंडळीतल्या वडिलांनी विपत्तीसाठी तयार राहायला स्थानिक योजना काय आहेत याबद्दल आणि विपत्ती आली तर संघटनेकडून काही सूचना आहेत का, याबद्दल नेहमी माहिती घेत राहणं गरजेचं आहे. (१ करिंथ. १४:३३, ४०) तसंच, धैर्य दाखवा पण सावध राहा. (नीति. २२:३) कोणतंही पाऊल उचलण्याआधी विचार करा आणि अनावश्‍यक धोके टाळा. यहोवावर विसंबून राहा. हे लक्षात असू द्या, की यहोवा तुम्हाला तुमच्या भावांना सुखरूप ठेवायला मदत करू शकतो. टेहळणी बुरूज२४.०७ ४ ¶८; ५ ¶११

गुरुवार, १६ एप्रिल

संकटात मी यहोवाला हाक मारली आणि माझी मदतीची याचना त्याच्या कानापर्यंत पोहोचली.—स्तो. १८:६.

दावीद राजा यहोवाला ओळखत होता आणि तो त्याच्यावर विसंबून होता. जेव्हा शौल राजा आणि त्याचे इतर शत्रू त्याचा पाठलाग करत होते तेव्हा दावीदने मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली. देवाने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिल्यावर आणि त्याला सोडवल्यावर दावीद म्हणाला: “यहोवा जिवंत देव आहे!” (स्तो. १८:४६) दावीद जेव्हा हे म्हणाला, तेव्हा त्याला फक्‍त एवढंच म्हणायचं नव्हतं की देव अस्तित्वात आहे. एका संदर्भानुसार यहोवा “आपल्या लोकांसाठी सतत कार्यं करणारा जिवंत देव आहे” असा भरवसा दावीद इथे व्यक्‍त करत होता. खरंच, आपल्या वैयक्‍तिक अनुभवावरून दावीदला हे माहीत होतं की देव जिवंत आहे. आणि या खातरीमुळे त्याची उपासना आणि स्तुती करायचा त्याचा निश्‍चय आणखी भक्कम झाला. (स्तो. १८:२८, २९, ४९) यहोवा एक जिवंत देव आहे, याची खातरी असल्यामुळे आपल्याला आवेशाने त्याची सेवा करत राहायला मदत होऊ शकते. त्यामुळे परीक्षांना तोंड द्यायची ताकद आणि मेहनतीने त्याची सेवा करत राहायची प्रेरणा आपल्याला मिळेल. तसंच त्याच्या जवळ राहायचा आपला निश्‍चयही पक्का होईल. टेहळणी बुरूज२४.०६ २०-२१ ¶३-४

शुक्रवार, १७ एप्रिल

कोणीही तुम्हाला बहकवू नये म्हणून सांभाळा.—२ थेस्सलनी. २:३.

प्रेषित पौलने थेस्सलनीकाकरांना लिहिलेल्या पत्रातून आपण काय शिकू शकतो? जेव्हा एखादी गोष्ट बायबलमधून शिकलेल्या गोष्टींप्रमाणे नसते किंवा एखादी खळबळजनक अफवा आपण ऐकतो, तेव्हा आपण समजबुद्धीने वागलं पाहिजे. पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमध्ये आपल्या शत्रूंनी एकदा एक पत्र भाऊबहिणींना पाठवलं होतं. हे पत्र जणू जागतिक मुख्यालयातूनच आलंय असं वाटत होतं. या पत्रात आपल्या भावांना वेगळं होऊन एक स्वतंत्र संघटना स्थापन करण्याबद्दल प्रोत्साहन दिलं होतं. हे पत्र अगदी खरं असल्यासारखं भासत होतं. पण आपले विश्‍वासू भाऊबहीण यात फसले नाहीत. त्यांना कळलं, की या पत्रातला संदेश शिकलेल्या गोष्टींशी जुळत नाही. आजसुद्धा सत्याचे काही शत्रू कधीकधी आपल्याला गोंधळात टाकण्याच्या किंवा आपल्यात फूट पाडण्याच्या प्रयत्नात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. पण आपण ‘लगेच गोंधळून न जाता,’ जे ऐकतो किंवा वाचतो ते शिकलेल्या गोष्टींप्रमाणे आहे की नाही याचा विचार केला पाहिजे आणि स्वतःचं रक्षण केलं पाहिजे.—२ थेस्सलनी. २:२; १ योहा. ४:१. टेहळणी बुरूज२४.०७ ११-१२ ¶१४-१५

शनिवार, १८ एप्रिल

एखाद्याच्या हातून पाप घडलंच, तर आपल्यासाठी एक सहायक आहे.—१ योहा. २:१.

एक व्यक्‍ती जेव्हा यहोवाला आपलं जीवन समर्पित करते आणि त्याच्या कुटुंबाचा भाग बनते, तेव्हा ती एक महत्त्वाचा निर्णय घेत असते. यहोवाची इच्छा आहे की सगळ्यांनीच हा निर्णय घ्यावा. का बरं? कारण त्याला वाटतं, की सगळ्यांनी त्याच्याशी मैत्री करावी आणि कायम जगावं. (अनु. ३०:१९, २०; गलती. ६:७, ८) असं असलं तरी, यहोवा कोणालाही त्याची उपासना करायची जबरदस्ती करत नाही. प्रत्येकाने काय केलं पाहिजे हे त्याने स्वतः ठरवावं असं त्याला वाटतं. पण बाप्तिस्मा झालेल्या एखाद्याने देवाचा नियम मोडला आणि गंभीर पाप केलं तर काय? जर त्याने पश्‍चात्ताप केला नाही तर त्याला मंडळीतून काढून टाकलं पाहिजे. (१ करिंथ. ५:१३) असं असलं तरी यहोवाची इच्छा आहे, की त्याने त्याच्याकडे परत यावं. खरंतर खंडणीची तरतूद करण्यामागचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. कारण त्यामुळे पश्‍चात्तापी व्यक्‍तीला माफी मिळू शकते. आपला प्रेमळ देव गंभीर पाप करणाऱ्‍या लोकांना विनंती करतो, की त्यांनी पश्‍चात्ताप करावा.—जख. १:३; रोम. २:४; याको. ४:८. टेहळणी बुरूज२४.०८ १४-१५ ¶१-२

रविवार, १९ एप्रिल

तू बुद्धिमान झालास, तर माझं मन आनंदी होईल.—नीति. २३:१५.

योहानने आपलं तिसरं पत्र लिहिलं तोपर्यंत काही लोक खोट्या शिकवणी पसरवत होते आणि मंडळीत फूट पाडायचा प्रयत्न करत होते. पण इतर विश्‍वासू लोक मात्र “सत्याच्या मार्गावर चालत” राहिले. त्यांनी यहोवाची आज्ञा पाळली आणि ‘त्याच्या आज्ञांप्रमाणे ते चालले.’ (२ योहा. ४, ६) या विश्‍वासू ख्रिश्‍चनांमुळे योहानला तर आनंद झालाच, पण त्यासोबत यहोवालाही आनंद झाला. (नीति. २७:११) यातून आपण काय शिकतो? विश्‍वासू राहिल्यामुळे आनंद होतो. (१ योहा. ५:३) उदाहरणार्थ, आपल्यामुळे यहोवाला आनंद होतो हे जाणून आपल्यालाही आनंद होतो. आपण जगातल्या मोहांचा प्रतिकार करतो आणि यहोवाच्या आज्ञा पाळतो हे पाहून तो खूश होतो. यामुळे स्वर्गदूतही खूश होतात. (लूक १५:१०) आपले भाऊबहीण यहोवाला विश्‍वासू आहेत हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला आनंद होतो. (२ थेस्सलनी. १:४) शेवटी या दुष्ट जगाचा नाश होईल तेव्हा आपल्याला या गोष्टीचं समाधान असेल, की सैतानाचं वर्चस्व असलेल्या या जगात आपण यहोवाला विश्‍वासू राहिलो. टेहळणी बुरूज२४.११ १२-१३ ¶१७-१८

सोमवार, २० एप्रिल

प्रत्येकाने स्वतःचा नाही, तर नेहमी दुसऱ्‍याचा फायदा पाहावा.—१ करिंथ. १०:२४.

आपल्या भावना बोलून दाखवण्याआधी एखाद्याने किती काळ थांबून राहावं? कारण याबाबतीत तुम्ही घाई केली, तर तुम्ही खूप उतावीळ आहात असं दिसेल. (नीति. २९:२०) हेच जर तुम्ही खूपच वेळ लावला तर निर्णय घ्यायच्या बाबतीत तुम्ही ठाम नाही असंही दिसून येईल; खासकरून त्या व्यक्‍तीला तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहात हे त्या व्यक्‍तीला जाणवतं तेव्हा. (उप. ११:४) हे लक्षात घ्या, की एखाद्याला आपल्या भावना बोलून दाखवण्याआधी तुमचं त्या व्यक्‍तीसोबत लग्न होईलच याची खातरी असण्याची गरज नाही. पण तुम्हाला याची खातरी असली पाहिजे, की तुम्ही लग्नासाठी तयार आहात आणि ती व्यक्‍ती कदाचित तुमच्यासाठी एक चांगला जोडीदार ठरू शकते. पण एखाद्याच्या मनात तुमच्याबद्दल भावना आहेत असं जर तुम्हाला जाणवलं तर काय? जर तुम्हाला तिच्याबद्दल तसं वाटत नसेल, तर त्या व्यक्‍तीला आपल्या वागण्यातून तसं दाखवा. कारण तुमच्या मनात त्या व्यक्‍तीबद्दल भावना नसताना तिला तसा विचार करू देणं, हे योग्य ठरणार नाही.—इफिस. ४:२५. टेहळणी बुरूज२४.०५ २३ ¶९-१०

मंगळवार, २१ एप्रिल

मी पुन्हा येईन आणि तुम्हाला माझ्यासोबत घरी घेऊन जाईन.—योहा. १४:३.

फक्‍त विश्‍वासू अभिषिक्‍त जणांनाच येशू स्वर्गीय राज्यात घेऊन जाईल. जे अभिषिक्‍त आध्यात्मिक रितीने सावध राहत नाहीत त्यांना “निवडलेल्या” लोकांसोबत गोळा केलं जाणार नाही. (मत्त. २४:३१) ही गोष्ट देवाच्या सगळ्याच सेवकांना लागू होते; मग त्यांची आशा स्वर्गातली असो किंवा पृथ्वीवरची. येशूने सावध आणि विश्‍वासू राहण्याबद्दल जे सांगितलं त्या गोष्टीला त्यांनी एक इशारा म्हणून घेतलं पाहिजे. आपण यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखल्यामुळे त्याच्या न्याय करायच्या पद्धतीवर आपला पूर्ण भरवसा आहे. यहोवाने काही जणांना अभिषिक्‍त म्हणून जर अलीकडच्या वर्षांमध्ये निवडलंय, तर त्याबद्दल आपल्याला चिंता करायची गरज नाही. कारण द्राक्षमळ्याच्या उदाहरणात येशूने अकराव्या तासाला आलेल्या मजुरांबद्दल काय म्हटलं होतं, ते आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. (मत्त. २०:१-१६) दिवसाच्या अगदी शेवटच्या तासाला आलेल्या मजुरांना, दिवसाच्या सुरुवातीला आलेल्या मजुरांइतकीच मजुरी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे, जेव्हा एक अभिषिक्‍त व्यक्‍ती शेवटपर्यंत विश्‍वासू राहते तेव्हा तिला स्वर्गातल्या जीवनाचं बक्षीस दिलं जाईल, मग ती कधीही अभिषिक्‍त झाली असली तरीही. टेहळणी बुरूज२४.०९ २४ ¶१५-१७

बुधवार, २२ एप्रिल

ख्रिस्तानेसुद्धा दुःख सोसलं आणि असं करून त्याने तुमच्यासाठी एक आदर्श घालून दिला. हे यासाठी, की तुम्ही त्याच्या पावलांचं जवळून अनुकरण करावं.—१ पेत्र २:२१.

अन्यायाचा सामना कसा करायचा या बाबतीत येशूने सगळ्यात चांगलं उदाहरण मांडलं. त्याला घरच्यांकडून आणि बाहेरच्यांकडून अन्यायाचा किती सामना करावा लागला याचा विचार करा. त्याच्या अविश्‍वासू नातेवाइकांनी त्याच्यावर आरोप लावला, की तो वेडा झालाय. धार्मिक नेत्यांनीही म्हटलं, की तो दुष्ट स्वर्गदूतांच्या मदतीने चमत्कार करतो. तसंच, रोमी सैनिकांनी त्याची थट्टा केली, त्याला यातना दिल्या आणि शेवटी त्याला मारून टाकलं. (मार्क ३:२१, २२; १४:५५; १५:१६-२०, ३५-३७) येशूने हा सगळा अन्याय सहन केला. पण त्याच्या मनात कधीच बदल्याची भावना आली नाही. त्याच्या या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं? (१ पेत्र २:२१-२३) अन्यायाचा सामना करण्याच्या बाबतीत येशूचं आपल्यासमोर सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. त्याला माहीत होतं, की कधी शांत राहायचं आणि कधी बोलायचं. (मत्त. २६:६२-६४) त्याच्यावर लावलेल्या प्रत्येक आरोपाचं त्याने उत्तर दिलं नाही. (मत्त. ११:१९) तो जेव्हा बोलला तेव्हा त्याने त्याचा छळ करणाऱ्‍यांचा अपमान केला नाही किंवा त्यांना धमकावलं नाही. टेहळणी बुरूज२४.११ ४-५ ¶९-१०

गुरुवार, २३ एप्रिल

ख्रिस्त येशू पापी लोकांना वाचवायला जगात आला.—१ तीम. १:१५.

कल्पना करा, तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्‍तीला एक खूप सुंदर भेट दिली आहे आणि ती भेट तिच्या कामाचीही आहे. पण जर त्या व्यक्‍तीने ती भेट न वापरता अशीच कोपऱ्‍यात ठेवून दिली तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्हाला नक्कीच खूप वाईट वाटेल. पण जर तिने त्या भेटीचा चांगला वापर केला आणि त्याबद्दल कदर व्यक्‍त केली, तर तुम्हाला नक्कीच खूप छान वाटेल. मग यातून आपण काय शिकू शकतो? यहोवाने आपल्यासाठी त्याच्या प्रिय मुलाला दिलं. या अनमोल भेटीबद्दल आणि ती देण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्‍या त्याच्या प्रेमाबद्दल आपण कदर व्यक्‍त केली तर त्याला नक्कीच आनंद होईल! (योहा. ३:१६; रोम. ५:७, ८) पण जसजसा वेळ जातो तसतसं खंडणीबद्दलची आपली कदर कमी होऊ शकते. जणू काय देवाने दिलेली ही भेट आपण कोपऱ्‍यात टाकून देतो. आपल्याकडे ती आहे म्हणून आपण आनंदी तर आहोत, पण कदाचित आपलं तिच्याकडे लक्षच नाही. असं होऊ नये म्हणून देवाने आणि ख्रिस्ताने आपल्यासाठी जे केलंय त्याबद्दलची कदर आपण सतत वाढवत राहिली पाहिजे. टेहळणी बुरूज२५.०१ २६ ¶१-२

शुक्रवार, २४ एप्रिल

या गोष्टींबद्दल खोलवर विचार करत राहा; त्यांत अगदी गढून जा, म्हणजे तुझी प्रगती सर्वांना स्पष्टपणे दिसून येईल.—१ तीम. ४:१५.

मंडळीत वडील म्हणून सेवा करण्यासाठी पात्र ठरणारा भाऊ विश्‍वासात नवीन नसावा. याचा अर्थ त्याला बाप्तिस्मा घेऊन बरीच वर्षं झाली पाहिजेत असं नाही. पण तरी एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍ती बनण्यासाठी त्याने थोडा वेळ जाऊ दिला पाहिजे. वडील म्हणून तुमची नियुक्‍ती होण्याआधी तुम्ही हे दाखवून दिलं पाहिजे, की तुम्ही येशूप्रमाणे नम्र आहात. आणि कोणतीही नेमणूक मिळेपर्यंत तुम्ही यहोवाच्या वेळेची वाट पाहायला तयार आहात. (मत्त. २०:२३; फिलिप्पै. २:५-८) तुम्ही यहोवाला आणि त्याच्या नीतिमान स्तरांना जडून राहिलं पाहिजे. आणि त्याच्या संघटनेद्वारे मिळालेल्या मार्गदर्शनाचं पालन करून तुम्ही त्याला एकनिष्ठ आहात हे सिद्ध केलं पाहिजे. शास्त्रवचनं स्पष्टपणे सांगतात, की मंडळीत देखरेख करणाऱ्‍यांकडे शिकवण्याची योग्यता असली पाहिजे. पण याचा अर्थ असा होतो का, की तुम्ही जबरदस्त भाषण देणारे असलं पाहिजे? नाही! कारण बरेच वडील जरी चांगले वक्‍ते नसले, तरी सेवाकार्यात आणि मेंढपाळ भेटी घेण्यात खूप चांगले असू शकतात. टेहळणी बुरूज२४.११ २३-२४ ¶१४-१५

शनिवार, २५ एप्रिल

मी तर तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, अगदी शुद्ध सोन्यापेक्षाही मौल्यवान समजतो.—स्तो. ११९:१२७.

जेव्हा तुम्ही बायबलमधून असं काही वाचता जे तुम्हाला नीट समजत नाही, तेव्हा त्यावर संशोधन करा. मग शिकलेल्या नवीन गोष्टींवर आणि त्यातून तुम्हाला यहोवाबद्दल, त्याच्या मुलाबद्दल आणि त्यांच्या प्रेमाबद्दल काय शिकायला मिळतं यावर “दिवसभर” मनन करा. (स्तो. ११९:९७, तळटीप) जेव्हा तुम्ही बायबल वाचता किंवा संशोधन करता, तेव्हा प्रत्येक वेळी तुम्हाला जर नवीन गोष्ट सापडली नाही तर निराश होऊ नका. एका अर्थाने तुम्ही सोनं शोधणाऱ्‍या लोकांसारखे आहात. हे लोक सोन्याचा एखादा छोटासा तुकडा शोधण्यासाठी तासंतास घालवतात, तर कधी अनेक दिवस घालवतात. ते इतकी मेहनत घेतात, कारण त्यांच्यासाठी सोन्याचा प्रत्येक कण मौल्यवान असतो. तर मग बायबलमधल्या सत्यांची रत्नं त्यापेक्षा किती जास्त मोलाची आहेत! (नीति. ८:१०) म्हणून धीर धरा आणि नियमितपणे बायबल वाचत राहा.—स्तो. १:२. टेहळणी बुरूज२५.०१ २४-२५ ¶१४-१५

रविवार, २६ एप्रिल

यहोवाने जशी तुम्हाला मोठ्या मनाने क्षमा केली, तशी तुम्हीही करा.—कलस्सै. ३:१३.

आपलं मन दुखावणाऱ्‍याला आपण माफ करायला तयार असावं अशी अपेक्षा यहोवा आपल्याकडून करतो. (स्तो. ८६:५; लूक १७:४; इफिस. ४:३२) कदाचित कोणी असं काहीतरी बोलेल किंवा वागेल, ज्यामुळे आपल्याला खूप वाईट वाटू शकतं; खासकरून ती व्यक्‍ती जवळची असते तेव्हा. (स्तो. ५५:१२-१४) त्या वेळी जो त्रास होतो तो कधीकधी वार केल्यासारखा वाटू शकतो. (नीति. १२:१८) कदाचित आपण त्या भावना दाबायचा किंवा त्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करू. पण असं करणं हे जणू शरीरात भोसकलेला सुरा तशाच अवस्थेत ठेवण्यासारखं असू शकतं. त्याचप्रमाणे, आपण जर आपल्या भावनांकडे दुर्लक्ष केलं, तर आपलं दुखावलेलं मन आपोआप बरं होईल अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. जेव्हा कोणी आपलं मन दुखावतं, तेव्हा कदाचित आपल्याला लगेच राग येऊ शकतो. बायबल सांगतं की राग येणं साहजिकच आहे, पण ते अशी ताकीद देतं की आपण त्या भावनेला स्वतःवर हावी होऊ देऊ नये. (स्तो. ४:४; इफिस. ४:२६) का बरं? कारण रागामुळे तर क्वचितच चांगल्या गोष्टी घडतात. (याको. १:२०) लक्षात ठेवा की राग येणं ही एक प्रतिक्रिया आहे, पण राग धरून ठेवणं ही एक निवड आहे. टेहळणी बुरूज२५.०२ १५ ¶४-६

सोमवार, २७ एप्रिल

ज्याच्याकडे बुद्धी असते, त्याच्या जिवाचं ती रक्षण करते.—उप. ७:१२.

येशूने एका उदाहरणातून समजावून सांगितलं की “देवाच्या दृष्टीने श्रीमंत” असणं किती महत्त्वाचं आहे. असं न करता आपण फक्‍त पैसेच साठवत राहिलो तर ते मूर्खपणाचं ठरेल. (लूक १२:१६-२१) कारण उद्या काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. (नीति. २३:४, ५; याको. ४:१३-१५) तसंच येशूने हेही म्हटलं होतं की ज्यांना त्याचे शिष्य होण्याची इच्छा आहे, त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींचा “त्याग” करायला तयार असलं पाहिजे. (लूक १४:३३, तळटीप) पहिल्या शतकात, यहूदीयामधल्या भाऊबहिणींनीसुद्धा आनंदाने अशा प्रकारचा त्याग केला. (इब्री १०:३४) आजच्या काळातसुद्धा राजकीय पक्षांना पाठिंबा न दिल्यामुळे बऱ्‍याच भाऊबहिणींना आपली नोकरी गमवावी लागली आहे. (प्रकटी. १३:१६, १७) मग त्यांना कशामुळे मदत झाली? त्यांना यहोवाने दिलेल्या अभिवचनावर पूर्ण भरवसा आहे. यहोवाने म्हटलं: “मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.” (इब्री १३:५) भविष्यासाठी काही पैसे साठवता यावेत म्हणून आपण जमेल ते करतो. पण त्यासोबतच आपल्याला याची खातरी आहे, की काही अनपेक्षित गोष्टी घडल्या तर यहोवा आपल्याला नक्की सांभाळेल. टेहळणी बुरूज२५.०३ २९ ¶१३-१४

मंगळवार, २८ एप्रिल

आता आपण ख्रिस्ताबद्दलच्या प्राथमिक शिकवणींच्या पुढे गेलो असल्यामुळे, आपण प्रौढतेपर्यंत पोहोचण्यासाठी खटपट करू या. आपण पुन्हा एकदा पाया घालू नये, म्हणजे पुन्हा त्याच गोष्टी शिकू नयेत, ज्या आपण सुरुवातीला शिकलो होतो.—इब्री ६:१.

आध्यात्मिक रितीने प्रौढ होण्यासाठी आपण कुठल्याही मदतीशिवाय स्वतःहूनच प्रगती करावी अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करत नाही. यासाठी त्याने मंडळीत मेंढपाळ आणि शिक्षक दिले आहेत. आणि ते आपल्याला आध्यात्मिक रितीने प्रौढ होण्यासाठी मदत करू शकतात. त्यासोबतच, “प्रौढता प्राप्त करून ख्रिस्ताच्या पूर्णतेची उंची” गाठायलाही ते आपल्याला मदत करू शकतात. (इफिस. ४:११-१३) “ख्रिस्ताचं मन” समजावं म्हणून यहोवा आपल्याला पवित्र शक्‍तीसुद्धा देतो. (१ करिंथ. २:१४-१६) तसंच, पृथ्वीवर सेवा करत असताना येशू कसा विचार करायचा, कसं बोलायचा, कसं वागायचा हे आपल्याला समजावं म्हणून त्याने शुभवर्तमानाची चार पुस्तकं लिहिण्यासाठी बायबल लेखकांना प्रेरित केलं. येशूच्या विचारांचं आणि त्याच्या वागण्याचं अनुकरण करून आपण ख्रिस्ती प्रौढतेपर्यंत पोहचण्याचं आपलं ध्येय गाठू शकतो. आध्यात्मिक रितीने प्रौढ होण्यासाठी आपण “ख्रिस्ताबद्दलच्या प्राथमिक शिकवणींच्या पुढे,” म्हणजे मूलभूत ख्रिस्ती शिकवणींच्या पुढे गेलं पाहिजे. टेहळणी बुरूज२४.०४ ४-५ ¶११-१२

बुधवार, २९ एप्रिल

तेव्हा विचारशक्‍ती तुझा सांभाळ करेल आणि समंजसपणा तुझं रक्षण करेल.—नीति. २:११.

आपल्याला दररोज काही न काही निर्णय घ्यावे लागतात. त्यांपैकी काही निर्णय खूप सोपे असतात. जसं की, नाष्ट्याला काय बनवायचं किंवा किती वाजता झोपायचं. पण काही निर्णय घ्यायला खूप कठीण जातं. कारण त्यांचा परिणाम कदाचित आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यावर, आपल्या उपासनेवर किंवा आपण सगळे आनंदी राहू की नाही यावर होऊ शकतो. आपली इच्छा असते की आपल्या निर्णयांमुळे आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला फायदा व्हावा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आपण घेतलेल्या निर्णयांमुळे यहोवाला आनंद व्हावा असं आपल्याला वाटतं. (रोम. १२:१, २) चांगले निर्णय घेण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे माहिती गोळा करणं. हे का गरजेचं आहे? कल्पना करा, एका रुग्णाला गंभीर आजार झाल्यामुळे तो डॉक्टरकडे गेला आहे. मग डॉक्टर त्याला तपासल्याशिवाय किंवा त्याला प्रश्‍न विचारल्याशिवाय त्याने कोणता उपचार घेतला पाहिजे हे लगेच सांगेल का? नक्कीच नाही. आपल्यालाही जर चांगले निर्णय घ्यायचे असतील, तर आपण सगळ्यात आधी आपल्या परिस्थितीशी संबंधित माहितीवर विचार केला पाहिजे. टेहळणी बुरूज२५.०१ १४ ¶१-३

गुरुवार, ३० एप्रिल

यहोवाने तुझं पाप माफ केलंय. तू मरणार नाहीस.—२ शमु. १२:१३.

यहोवाच्या दयेबद्दल आपल्याला काय माहीत आहे? “कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही” हे त्याने कसं दाखवलं? (२ पेत्र ३:९) ज्यांनी गंभीर पापं केली होती त्यांना यहोवाने दया कशी दाखवली याची काही उदाहरणं पाहा. दावीद राजाने व्यभिचार आणि खून यांसारखी गंभीर पापं केली होती. पण दावीदने पश्‍चात्ताप केल्यामुळे यहोवाने त्याला दया दाखवली आणि माफ केलं. (२ शमु. १२:१-१२) मनश्‍शे राजानेही आयुष्यभर दुष्ट कामं केली होती. पण त्याचं इतकं वाईट उदाहरण असतानासुद्धा जेव्हा त्याने पश्‍चात्ताप केला तेव्हा यहोवाने त्याला त्या पश्‍चात्तापाच्या आधारावर दया दाखवली आणि माफ केलं. (२ इति. ३३:९-१६) या उदाहरणांवरून आपल्याला कळतं, की जेव्हा यहोवाकडे दया दाखवण्यासाठी आधार असतो तेव्हा तो दया दाखवतो. आणि अशा लोकांचं तो नक्कीच पुनरुत्थान करेल. कारण त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली आणि त्यांनी पश्‍चात्ताप केला. टेहळणी बुरूज२४.०५ ४-५ ¶१२

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा