मार्च
रविवार, १ मार्च
जो मेला, त्याला त्याच्या पापापासून निर्दोष ठरवण्यात आलं आहे.—रोम. ६:७.
आपण बायबलमध्ये अशा नीतिमान लोकांबद्दलही वाचतो जे नंतर अनीतिमान झाले. शलमोन राजाचंच उदाहरण घ्या. त्याला यहोवा देव कोण आहे आणि त्याची उपासना कशी केली पाहिजे, हे माहीत होतं. आणि त्याला यहोवाकडून भरभरून आशीर्वादही मिळाले होते. पण तरीसुद्धा तो नंतर खोट्या देवांची उपासना करू लागला. त्यामुळे यहोवाचा क्रोध भडकला आणि शलमोनच्या पापांमुळे संपूर्ण इस्राएल राष्ट्राला बऱ्याच शतकांपर्यंत त्याचे परिणाम भोगावे लागले. हे खरंय की शास्त्रवचनांत म्हटलंय, की “शलमोन आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.” आणि त्या पूर्वजांमध्ये दावीद राजासारखे विश्वासू लोकसुद्धा होते. (१ राजे ११:५-९, ४३ तळटीप; २ राजे २३:१३) पण ज्या पध्दतीने शलमोनला दफन करण्यात आलं त्यावरून त्याला पुन्हा जिवंत केलं जाईलच असं आपण खातरीने म्हणू शकतो का? बायबल याबद्दल काही सांगत नाही. कारण पुनरुत्थान ही देवाकडून एक प्रेमळ भेट आहे. आणि त्याची सर्वकाळ उपासना करायची संधी असणाऱ्यांनाच तो ही भेट देतो. (ईयो. १४:१३, १४; योहा. ६:४४) मग शलमोनला ही भेट मिळेल का? ते यहोवालाच माहीत; आपल्याला माहीत नाही. पण आपल्याला हे मात्र नक्की माहीत आहे, की यहोवा जे योग्य आहे तेच करेल. टेहळणी बुरूज२४.०५ ४ ¶९
सोमवार, २ मार्च
मी सर्वकाळ तुझ्या तंबूमध्ये राहीन.—स्तो. ६१:४.
जेव्हा आपण समर्पण करतो, तेव्हा आपण यहोवाच्या तंबूत त्याचे पाहुणे म्हणून येत असतो. या तंबूमध्ये आपण भरपूर प्रमाणात मिळणाऱ्या आध्यात्मिक अन्नाचा फायदा घेऊ शकतो. इतकंच नाही तर आपण यहोवाच्या इतर पाहुण्यांसोबतही मैत्रीचा आनंद घेऊ शकतो. यहोवाचा हा लाक्षणिक तंबू एखाद्या विशिष्ट ठिकाणीच नाही, तर तो सगळ्या देशांमध्ये आहे. यावरून म्हणता येईल की जिथे-जिथे यहोवाचे आज्ञाधारक उपासक आहेत तिथे-तिथे हा लाक्षणिक तंबू असतो. (प्रकटी. २१:३) पण यहोवाच्या ज्या विश्वासू सेवकांचा मृत्यू झालाय, त्यांच्याबद्दल काय? ते अजूनही यहोवाच्या तंबूत त्याचे पाहुणे आहेत असं म्हणता येईल का? हो नक्कीच म्हणता येईल! कारण ते अजूनही यहोवाच्या आठवणीत जिवंत आहेत. येशूने म्हटलं: “मेलेल्यांना पुन्हा उठवलं जाईल याबद्दल मोशेनेही झुडपाच्या अहवालात सांगितलं होतं. तिथे त्याने यहोवाला, ‘अब्राहामचा देव, इसहाकचा देव आणि याकोबचा देव’ म्हटलं. तो मेलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे. कारण त्याच्या दृष्टीने ते सगळे जिवंतच आहेत.”—लूक २०:३७, ३८. टेहळणी बुरूज२४.०६ ३-४ ¶६-७
मंगळवार, ३ मार्च
यहोवा माझी ताकद आणि माझी ढाल आहे.—स्तो. २८:७.
सादोक हेब्रोनला शस्त्रं घेऊन युद्धाच्या तयारीत गेला होता. (१ इति. १२:३८) दावीदच्या पाठोपाठ युद्धात जायला तो तयार होता. आणि इस्राएल राष्ट्राचं शत्रूंपासून रक्षण करायलाही तो तयार होता. सादोककडे युद्धाचा काहीच अनुभव नव्हता कारण तो एक याजक होता. पण त्याच्या धैर्याने त्याची ही कमी भरून काढली. सादोकसारख्या याजकाला कशामुळे धैर्य दाखवता आलं? त्याच्यासोबत काही ताकदवान आणि धाडसी माणसं होती. त्यांच्या उदाहरणामुळे त्याला नक्कीच फायदा झाला असेल. उदाहरणार्थ, “युद्धाच्या मोहिमांमध्ये” दावीदने धाडसाने इस्राएलचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे संपूर्ण इस्राएलने अगदी मनापासून त्याला पाठिंबा दिला. (१ इति. ११:१, २) आपल्या शत्रूंविरुद्ध लढण्यासाठी दावीद नेहमी यहोवावर विसंबून होता. (स्तो. १३८:३) याशिवाय, यहोयादा, त्याचा मुलगा बनाया (एक धाडसी योद्धा) आणि दावीदच्या बाजूने असलेले इतर वंशांचे २२ प्रमुख यांचंही उदाहरण सादोकसमोर होतं.—१ इति. ११:२२-२५; १२:२६-२८. टेहळणी बुरूज२४.०७ ३-४ ¶५-६
बुधवार, ४ मार्च
देव दयाळूपणे तुला पश्चात्ताप करायला प्रवृत्त करायचा प्रयत्न करत आहे.—रोम. २:४.
शौलने येशूच्या शिष्यांचा क्रूरपणे छळ केला. बहुतेक शिष्यांना वाटायचं की तो कधीच बदलू शकणार नाही. पण येशू सामान्य लोकांसारखा विचार करणारा नव्हता. त्याने आणि त्याच्या पित्याने शौलमधले चांगले गुण पाहिले. येशूने म्हटलं: “हा माणूस माझ्यासाठी एक निवडलेलं पात्र आहे.” (प्रे. कार्यं ९:१५) शौलला पश्चात्ताप करायला मदत करण्यासाठी येशूने एक चमत्कारसुद्धा केला. (प्रे. कार्यं ७:५८–८:३; ९:१-९, १७-२०) ख्रिस्ती बनल्यानंतर शौलला प्रेषित पौल म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्याला जी दया दाखवण्यात आली होती आणि जी क्षमा मिळाली होती त्याबद्दलची कदर त्याने बऱ्याच वेळा व्यक्त केली. (१ तीम. १:१२-१५) मग पुढे, पौलला करिंथच्या मंडळीत घडलेल्या एका गंभीर पापाबद्दल समजलं, तेव्हा पौलने ही समस्या कशी हाताळली? त्याने ही समस्या ज्या प्रकारे हाताळली त्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. आपण शिकतो, की यहोवा कशी प्रेमाने शिस्त लावतो आणि दया दाखवणं किती गरजेचं आहे. टेहळणी बुरूज२४.०८ १३ ¶१५-१६
गुरुवार, ५ मार्च
देवाचा मुलगा यासाठीच आला, की त्याने सैतानाची कार्यं उद्ध्वस्त करावीत.—१ योहा. ३:८.
पापी माणसं यहोवासोबत नातं जोडण्यासाठी काय करू शकतात हे यहोवाने बऱ्याच शतकांदरम्यान हळूहळू स्पष्ट केलं. एदेन बागेत झालेल्या बंडानंतर आदाम आणि हव्वाचा मुलगा हाबेल हा पहिला माणूस होता, ज्याने यहोवावर विश्वास ठेवला. हाबेलचं यहोवावर प्रेम होतं. त्याला यहोवाला खूश करायचं होतं आणि त्याच्याशी एक जवळचं नातं जोडायचं होतं. म्हणून त्याने यहोवाला बलिदान अर्पण केलं. हाबेल मेंढपाळ होता. म्हणून त्याने आपल्या कळपातली काही कोकरं घेतली आणि ती बलिदान म्हणून यहोवाला अर्पण केली. मग यहोवाला कसं वाटलं? त्याने “हाबेलचा आणि त्याच्या अर्पणाचा स्वीकार केला.” (उत्प. ४:४) इतर लोकांनीही जेव्हा यहोवावर प्रेम केलं, त्याच्यावर भरवसा दाखवला आणि त्याला अशाच प्रकारे अर्पणं दिली, तेव्हा त्याने ती स्वीकारली. नोहासुद्धा अशाच लोकांपैकी एक होता. (उत्प. ८:२०, २१) अशा प्रकारची बलिदानं स्वीकारून यहोवाने दाखवलं की पापी माणसं त्याला खूश करू शकत होती आणि त्याच्याशी एक जवळचं नातं जोडू शकत होती. टेहळणी बुरूज२४.०८ ३-४ ¶५-६
शुक्रवार, ६ मार्च
माझी पावलं तर जवळजवळ भरकटलीच होती; मी पडण्याच्या बेतात होतो.—स्तो. ७३:२.
अन्यायामुळे आपलं मन खूप दुखावलं जाऊ शकतं. (उप. ७:७) ईयोब आणि हबक्कूक यांसारख्या देवाच्या विश्वासू सेवकांनाही असंच वाटलं होतं. (ईयो. ६:२, ३; हब. १:१-३) असं वाटणं साहजिक आहे. पण अशा वेळी आपण कशी प्रतिक्रिया देतो याबद्दल काळजी घेणं खूप महत्त्वाचंय, नाहीतर आपल्या हातून काहीतरी चुकीचं घडू शकतं आणि परिस्थिती आणखी बिघडू शकते. इतरांवर अन्याय करणाऱ्यांना जेव्हा काहीच शिक्षा होत नाही, तेव्हा आपल्याला प्रश्न पडू शकतो, की ‘चांगलं वागण्यात काही अर्थ आहे का?’ स्तोत्रकर्त्याने म्हटलं, की दुष्ट लोक चांगल्या लोकांवर अन्याय करतात, पण तरीही असं वाटतं, की त्यांची भरभराट होत आहे. त्याने म्हटलं: “दुष्ट हे असे असतात; त्यांचं सगळं सुरळीत चालतं.” (स्तो. ७३:१२) अन्याय पाहून तो खूप निराश झाला आणि यहोवाची सेवा करण्यात काहीच अर्थ नाही असं त्याला वाटलं. त्याने म्हटलं: “मी या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला मनःस्ताप झाला.”—स्तो. ७३:१४, १६. टेहळणी बुरूज२४.११ ३-४ ¶५-७
शनिवार, ७ मार्च
राष्ट्रा-राष्ट्रांतल्या कुटुंबांनो, यहोवाचा सन्मान करा! यहोवाचा सन्मान करा, कारण तो गौरवशाली आणि सामर्थ्यशाली आहे!—स्तो. ९६:७.
आपण यहोवाचा महिमा करतो, कारण आपण त्याचा मनापासून आदर करतो. त्याचा आदर करण्याची आपल्याकडे बरीच कारणं आहेत. यहोवा सर्वशक्तिमान आहे; त्याच्याकडे अमर्याद ताकद आहे. (स्तो. ९६:४-७) त्याने निर्माण केलेल्या गोष्टींमधून त्याची अफाट बुद्धी स्पष्टपणे दिसते. त्याने आपल्याला जीवन तर दिलंच आहे, पण त्यासोबतच ते जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टीही दिल्या आहेत. (प्रकटी. ४:११) तो एकनिष्ठ आहे. (प्रकटी. १५:४) तो जे काही करतो त्यात यशस्वी होतो आणि तो नेहमी दिलेलं वचन पाळतो. (यहो. २३:१४) त्यामुळेच यिर्मया संदेष्ट्याने यहोवाबद्दल म्हटलं: “राष्ट्रांतल्या सर्व बुद्धिमान लोकांमध्ये आणि त्यांच्या सगळ्या राज्यांमध्ये, तुझ्यासारखा दुसरा कोणीच नाही.” (यिर्म. १०:६, ७) खरंच आपल्या स्वर्गातल्या पित्याचा आदर करण्यासाठी आपल्याकडे बरीच कारणं आहेत. पण आपण फक्त त्याचा आदरच करत नाही तर त्याच्यावर प्रेमही करतो. आपण यहोवाचा महिमा करतो, कारण आपलं त्याच्यावर जिवापाड प्रेम आहे. टेहळणी बुरूज२५.०१ ३-४ ¶५-६
रविवार, ८ मार्च
त्या दुष्टाला आपल्यामधून काढून टाका.—१ करिंथ. ५:१३.
देवाचे विरोधक आपल्या संघटनेबद्दलच्या चांगल्या गोष्टी वाईट आहेत असं भासवण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, आपण बायबलमधून शिकलोय की यहोवाला त्याच्या उपासकांनी शारीरिक, नैतिक आणि आध्यात्मिक रित्या शुद्ध असावं असं वाटतं. त्याला वाटतं, की पश्चात्ताप न करता वाईट कामं करत राहणाऱ्यांना मंडळीतून काढून टाकलं जावं. (१ करिंथ. ५:११, १२; ६:९, १०) बायबलमधल्या या आज्ञेचं आपण काटेकोरपणे पालन करतो. पण आपले विरोधक याच गोष्टीचा वापर करून आपल्यावर असा आरोप लावतात की आपलं लोकांवर प्रेम नाही, आपण त्यांची टिका करतो आणि आपल्यापेक्षा वेगळे असलेले लोक आपल्याला आवडत नाहीत. आपल्यावर होणाऱ्या या हल्ल्यांमागे कोण आहे हे आपण ओळखलं पाहिजे. आपल्या संघटनेबद्दल खोटी माहिती पसरवण्यामागे सैतानाचा हात आहे. तो “खोटेपणाचा बाप आहे.” (योहा. ८:४४; उत्प. ३:१-५) त्यामुळे तो काही लोकांचा वापर करून आपल्या संघटनेबद्दल खोटी माहिती पसरवतो याचं आपल्याला आश्चर्य वाटत नाही. टेहळणी बुरूज२४.०४ १० ¶१३-१४
सोमवार, ९ मार्च
तू सांगितलेले शब्द नक्कीच पूर्ण होतील.—यहे. ३३:३३.
मोठ्या संकटाची सुरुवात झाल्यानंतरसुद्धा असं होऊ शकतं, की काही लोक ‘मोठ्या बाबेलचा’ नाश होताना पाहतील तेव्हा त्यांना यहोवाचे साक्षीदार खूप आधीपासूनच या घटनेबद्दल सांगत होते हे आठवेल. मग जेव्हा ते या घटना प्रत्यक्ष घडताना पाहतील, तेव्हा त्यांच्या मनोवृत्तीत बदल होईल का? (प्रकटी. १७:५) मोशेच्या काळात इजिप्तमध्येसुद्धा असंच घडलं होतं. जेव्हा इस्राएली लोकांना तिथून सुटका मिळाली तेव्हा त्यांच्यासोबत “विदेश्यांचा एक मोठा समूहसुद्धा निघाला” होता. कदाचित त्यांच्यापैकी काही जणांनी, मोशेने दहा पीडांबद्दल जो इशारा दिला होता आणि तो कसा खरा ठरला हे पाहिलं असेल. आणि त्यामुळे यहोवाच खरा देव आहे या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसला असेल. (निर्ग. १२:३८) मोठ्या बाबेलचा नाश झाल्यानंतरसुद्धा जर काही लोकांच्या बाबतीत असंच झालं, तर अंत येण्याआधी ते आपल्यात सामील झाले म्हणून आपल्याला वाईट वाटेल का? नक्कीच नाही! कारण आपला स्वर्गातला पिता “दयाळू, करुणामय आणि सहनशील देव; एकनिष्ठ प्रेम आणि सत्याने भरलेला” असा देव आहे. आणि त्याचं अनुकरण करायची आपली इच्छा आहे.—निर्ग. ३४:६. टेहळणी बुरूज२४.०५ ११-१२ ¶१२-१३
मंगळवार, १० मार्च
फायदेकारक वचनांच्या नमुन्याला धरून राहा.—२ तीम. १:१३.
आपण जर ‘फायदेकारक वचनांच्या नमुन्यापासून’ भरकटलो तर काय होऊ शकतं? याचं एक उदाहरण विचारात घ्या. पहिल्या शतकात काही ख्रिश्चनांमध्ये अशी अफवा पसरली होती की यहोवाचा दिवस आलाय. कदाचित एका पत्रामुळे त्यांची अशी समजूत झाली असेल. आणि हे पत्र प्रेषित पौलकडून आहे असं वाटल्यामुळे त्यांनी त्यावर विश्वास ठेवला असेल. पण वस्तुस्थिती काय आहे हे तपासण्याऐवजी थेस्सलनीका इथल्या काही ख्रिश्चनांनी या अफवेवर विश्वास ठेवला आणि ती आणखी पसरवली. पौल त्यांच्यासोबत असताना त्याने त्यांना जे शिकवलं होतं त्या गोष्टी जर त्यांनी लक्षात ठेवल्या असत्या तर त्यांची अशी फसवणूक झाली नसती. (२ थेस्सलनी. २:१-५) म्हणून पौलने त्यांना असा सल्ला दिला की ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी विश्वास ठेवू नये. भविष्यात त्यांना या बाबतीत मदत व्हावी म्हणून पौलने थेस्सलनीकाकरांना लिहिलेल्या दुसऱ्या पत्राच्या शेवटी असं म्हटलं: “मी पौल स्वतःच्या अक्षरांत तुम्हाला माझा नमस्कार सांगतो. प्रत्येक पत्रात हीच माझी खूण आहे; मी अशाच पद्धतीने लिहितो.”—२ थेस्सलनी. ३:१७. टेहळणी बुरूज२४.०७ ११-१२ ¶१३-१४
बुधवार, ११ मार्च
तुम्हाला धीराची गरज आहे.—इब्री १०:३६.
यहूदीयामध्ये परिस्थिती बिघडल्यामुळे इब्री ख्रिश्चनांच्या विश्वासाची परीक्षा होणार होती. त्यांच्यापैकी काही जणांनी तीव्र छळाचा सामना केला असला, तरी बरेच जण असेही होते ज्यांना छळाची झळ बसली नव्हती. शिवाय प्रेषित पौलने सांगितलं की ज्यांचा छळ झाला होता त्यांनी येशूसारखं मृत्यू होईपर्यंत छळाचा सामना केला नव्हता. (इब्री १२:४) पण ख्रिस्ती धर्माचा जसजसा प्रसार होत गेला, तसतसं यहुदी विरोधक आणखीन कट्टर आणि क्रूर होत गेले. त्याच्या काही वर्षांआधी यरुशलेममध्ये ४० पेक्षा जास्त यहुद्यांनी अशी शपथ घेतली होती, की ‘जोपर्यंत ते पौलला ठार मारत नाहीत, तोपर्यंत ते काहीही खाणार-पिणार नाहीत.’ (प्रे. कार्यं २२:२२; २३:१२-१४) या इब्री खिश्चनांचा असा द्वेष आणि विरोध केला जात असला तरी त्यांना उपासनेसाठी एकत्र यावं लागणार होतं, आनंदाच्या संदेशाचा प्रचार करावा लागणार होता आणि स्वतःला विश्वासात मजबूत ठेवावं लागणार होतं. टेहळणी बुरूज२४.०९ १२ ¶१५
गुरुवार, १२ मार्च
[येशू] आपल्या आईला म्हणाला: “बाई, पाहा! तुझा मुलगा!”—योहा. १९:२६.
योहान हा येशूचा सगळ्यात आवडता प्रेषित होता. (मत्त. १०:२) योहान येशूच्या संपूर्ण सेवाकार्यात त्याच्यासोबत होता. आणि त्याने येशूला अनेक चमत्कार करतानासुद्धा पाहिलं होतं. यासोबतच अतिशय कठीण काळातसुद्धा तो त्याच्यासोबत राहिला होता. येशूला खिळलं जात असताना आणि त्याचं पुनरुत्थान झालं त्यानंतरही त्याने त्याला पाहिलं होतं. तसंच, पहिल्या शतकात विश्वासू लोकांच्या एका छोट्याशा गटापासून “आकाशाखालच्या सबंध सृष्टीत” आनंदाच्या संदेशाची घोषणा होईपर्यंत, ख्रिस्ती धर्माचा प्रसार कसा होत गेला हेही त्याने पाहिलं होतं. (कलस्सै. १:२३) योहान खूप मोठं आयुष्य जगला. त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्याने देवाच्या प्रेरणेने अतिशय रोमांचक असलेलं “येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण” लिहिलं. (प्रकटी. १:१) तसंच, त्याने त्याच्या नावाने ओळखलं जाणारं शुभवर्तमानसुद्धा लिहिलं. यासोबतच, योहानने देवाच्या प्रेरणेने तीन पत्रंही लिहिली. त्याने तिसरं पत्र गायस नावाच्या एका विश्वासू ख्रिश्चनाला लिहिलं. त्याला तो आध्यात्मिक अर्थाने आपला मुलगाच समजायचा. (३ योहा. १) या विश्वासू वृद्ध सेवकाने जे लिहिलं त्यामुळे आजपर्यंत येशूच्या सर्वच अनुयायांना प्रोत्साहन मिळालंय. टेहळणी बुरूज२४.११ १२ ¶१५-१६
शुक्रवार, १३ मार्च
पतींनो त्यांना मान द्या.—१ पेत्र ३:७.
ज्या पतीचं आपल्या पत्नीवर प्रेम असतं, तो तिची कदर करतो. त्यासोबतच, तो तिला यहोवाकडून मिळालेली एक अनमोल भेट समजतो. (नीति. १८:२२; ३१:१०) त्यामुळे तो तिच्याशी आदराने आणि दयेने वागतो, अगदी शारीरिक संबंध ठेवतानासुद्धा. तसंच, त्या वेळी तो तिला अशी कोणतीही गोष्ट करायची जबरदस्ती करणार नाही ज्यामुळे तिला अवघडल्यासारखं वाटेल, तिला वाईट वागवल्यासारखं वाटेल, तिचं शोषण केल्यासारखं वाटेल किंवा तिचा विवेक तिला दोष देईल. तसंच, पती स्वतःसुद्धा यहोवासमोर एक चांगला विवेक टिकवून ठेवायचा प्रयत्न करेल. (प्रे. कार्यं २४:१६) पतींनो, जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये तुमच्या पत्नीला मान द्यायला तुम्ही खूप मेहनत घेता. तुम्ही खातरी बाळगू शकता की यहोवाला याची कदर आहे. म्हणून तुमच्या पत्नीचा अनादर होईल असं वागायचं टाळा. तसंच तिच्याशी दयेने, आदराने आणि प्रेमाने वागून तिला मान द्यायचा निश्चय करा. त्यामुळे तिला हे जाणवेल की तुमचं तिच्यावर प्रेम आहे आणि तुम्ही तिला अनमोल समजता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पत्नीला मान देऊन तुम्ही एक सर्वात महत्त्वाचं नातं जपू शकता. ते म्हणजे यहोवासोबतचं तुमचं मौल्यवान नातं.—स्तो. २५:१४. टेहळणी बुरूज२५.०१ १३ ¶१७-१८
शनिवार, १४ मार्च
त्याने स्वतःला आपल्याकरता यासाठी अर्पण केलं, की आपल्याला मुक्त करावं आणि चांगल्या कामांसाठी आवेशी असे, आपल्या खास मालकीचे लोक स्वतःकरता शुद्ध करावेत.—तीत २:१४.
यहोवाच्या लोकांमध्ये आनंदाचा संदेश सांगायची जबरदस्त इच्छा असते आणि त्यासाठी ते खूप मेहनत घेतात. हीच गोष्ट त्यांना स्वतःला ख्रिस्ती म्हणवणाऱ्या इतर लोकांपेक्षा वेगळी करते. तर मग, प्रचारासाठी आपला आवेश टिकवून ठेवायला आणि तो वाढवायला आपल्याला कशामुळे मदत होईल? प्रचारात आपला आवेश कसा टिकवून ठेवायचा याबद्दल आपण येशूकडून शिकू शकतो. प्रचार करत असताना त्याने कधीच आपला आवेश कमी होऊ दिला नाही. उलट, जसजसा वेळ गेला तसतसं त्याने प्रचार करण्यात आणखी मेहनत घेतली. येशूने दिलेल्या माळ्याच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. अंजिराच्या झाडाने फळ द्यावं म्हणून माळ्याने तीन वर्षं मेहनत घेतली. तरीसुद्धा त्या झाडाला फळं आली नाहीत. त्याचप्रमाणे येशूनेसुद्धा यहुद्यांना जवळपास तीन वर्षं प्रचार केला. पण त्यांच्यातल्या बहुतेकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. ज्याप्रमाणे अंजिराचं झाड कधी न कधी फळ देईल अशी आशा माळ्याने सोडली नाही, त्याचप्रमाणे येशूने लोकांबद्दल आशा सोडली नाही. तो त्यांना प्रचार करत राहिला. त्याने कधीच आपला आवेश कमी होऊ दिला नाही. (लूक १३:६-९) येशूने शिकवलेल्या गोष्टींचं पालन केल्यामुळे आणि त्याच्यासारखं वागल्यामुळे आपल्याला प्रचारात आपला आवेश टिकवून ठेवता येईल. टेहळणी बुरूज२५.०३ १४-१५ ¶१-४
रविवार, १५ मार्च
शहाणा माणूस सुज्ञपणे वागतो.—नीति. १३:१६.
एखादी व्यक्ती तुमच्यासाठी चांगली जोडीदार ठरू शकते असं जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा काय? ती तुम्हाला आवडते म्हणून तुम्ही तिला लगेच तसं सांगाल का? बायबल म्हणतं, की “शहाणा माणूस सुज्ञपणे वागतो.” त्यामुळे त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे जाणून घेतल्याशिवाय असं पाऊल उचलणं योग्य ठरणार नाही. म्हणून सुज्ञपणे त्या व्यक्तीला पारखणं योग्य ठरेल. एखाद्या व्यक्तीला समजू न देता तुम्ही तिच्याबद्दल माहिती कशी काढू शकता? त्यासाठी तुम्ही मंडळीच्या सभांमध्ये किंवा सोबत वेळ घालवण्यासाठी भाऊबहीण एकत्र येतात, तेव्हा त्या व्यक्तीची आध्यात्मिकता, तिचं व्यक्तिमत्त्व आणि इतरांसोबतचं तिचं वागणं-बोलणं या गोष्टींचं तुम्ही परीक्षण करू शकता. तसंच त्या व्यक्तीचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत? ती नेहमी कोणत्या गोष्टींबद्दल बोलत असते? (लूक ६:४५) तिची आणि तुमची ध्येयं सारखीच आहेत का? या गोष्टींविषयीसुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता. यासोबतच, त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे ओळखणाऱ्या एखाद्या वडिलांना किंवा अनुभवी भावाला-बहिणीला तुम्ही तिच्याबद्दल विचारू शकता. (नीति. २०:१८) तसंच मंडळीत त्या व्यक्तीचं नावं कसं आहे आणि तिचा स्वभाव कसा आहे, हेसुद्धा तुम्ही विचारू शकता. (रूथ २:११) पण हे सगळं करत असताना सतत तिच्या अवतीभोवती राहून तिच्याविषयी सगळं काही जाणून घ्यायचा प्रयत्न करू नका. म्हणजे अशी कोणतीही गोष्ट करू नका, ज्यामुळे तिला अवघडल्यासारखं वाटेल. टेहळणी बुरूज२४.०५ २२-२३ ¶७-८
सोमवार, १६ मार्च
शेवटी मी माझं पाप तुझ्याजवळ कबूल केलं.—स्तो. ३२:५.
वडील कधीच घाईघाईने असा विचार करत नाहीत, की पाप करणारा कधीच पश्चात्ताप करणार नाही. काही जण वडिलांच्या समितीला पहिल्यांदा भेटल्यानंतर लगेच पश्चात्ताप करतील, तर काही जणांना वेळ लागू शकतो. त्यामुळे वडील पाप करणाऱ्याला एकापेक्षा जास्त वेळा भेटायचं ठरवू शकतात. कदाचित पहिल्या भेटीनंतरच पाप करणाऱ्याला जे सांगण्यात आलंय, त्याबद्दल तो मनापासून विचार करायला लागेल. इतकंच नाही, तर तो नम्रपणे यहोवाला प्रार्थना करेल आणि कदाचित त्याच्याकडे आपल्या पापांची माफीही मागेल. (स्तो. ३८:१८) मग समिती जेव्हा पुढच्या वेळी त्याला भेटेल, तेव्हा त्याचं वागणं बदललेलं असू शकतं. पाप करणाऱ्याला पश्चात्ताप करायला मदत व्हावी म्हणून वडील त्याच्याशी सहानुभूतीने आणि दयेने वागतात. यहोवाने त्यांच्या मेहनतीवर आशीर्वाद द्यावा अशी ते त्याच्याकडे प्रार्थना करतात. ते आशा बाळगतात, की पाप करणाऱ्याने भानावर यावं आणि पश्चात्ताप करावा.—२ तीम. २:२५, २६. टेहळणी बुरूज२४.०८ २२-२३ ¶१२-१३
मंगळवार, १७ मार्च
“कोणाच्याही मृत्यूने मला आनंद होत नाही,” असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो. “म्हणून मागे वळा आणि जिवंत राहा.”—यहे. १८:३२.
कोणाचाही नाश व्हावा अशी यहोवाची इच्छा नाही. त्याला वाटतं की पापी लोकांनी पुन्हा त्याच्यासोबत नातं जोडावं आणि समेट करावा. (२ करिंथ. ५:२०) म्हणूनच प्राचीन काळापासून तो त्याच्या भरकटलेल्या लोकांना, तसंच बंडखोर सेवकांना पश्चात्ताप करायला आणि त्याच्याकडे परत यायला विनंती करत आलाय. आज वडिलांना देवासोबत काम करून त्याचे सहकारी बनण्याचा बहुमान मिळालाय. तेसुद्धा पाप करणाऱ्यांना पश्चात्ताप करायला मदत करतात. (रोम. २:४; १ करिंथ. ३:९) विचार करा, जेव्हा एखादा पश्चात्ताप करतो तेव्हा स्वर्गात किती आनंद होत असेल! प्रत्येक वेळी जेव्हा एखादं हरवलेलं मेंढरू मंडळीत परत येतं, तेव्हा आपल्या स्वर्गातल्या पित्याला, यहोवाला खूप आनंद होतो. खरंच, यहोवा किती दयाळू, करुणामय आणि अपार कृपा दाखवणारा देव आहे. आणि जेव्हा आपण या गोष्टींवर मनन करतो तेव्हा त्याच्याबद्दलचं आपलं प्रेम वाढत राहतं.—लूक १:७८. टेहळणी बुरूज२४.०८ ३१ ¶१६-१७
बुधवार, १८ मार्च
लोक आपल्याला बळजबरीने राजा बनवण्यासाठी धरायला येत आहेत, हे ओळखून येशू पुन्हा एकटाच डोंगरावर निघून गेला.—योहा. ६:१५.
जर येशूने लोकांना त्याला राजा बनवू दिलं असतं, तर तोसुद्धा यहुद्यांच्या राजकारणामध्ये सामील झाला असता. लोकांचा इतका दबाव असूनसुद्धा, तो एकटाच “डोंगरावर निघून गेला.” त्याने राजकारणात भाग घेतला नाही. खरंच, आपल्यासाठी हा किती चांगला धडा आहे! हे खरं आहे, की आज लोक आपल्याला चमत्काराने अन्न पुरवायला किंवा त्यांचे रोग बरे करायला सांगणार नाहीत. तसंच, ते आपल्याला त्यांचा शासक व्हायलाही सांगणार नाहीत. पण ते कदाचित आपल्यावर राजकारणात भाग घ्यायचा दबाव टाकतील. यासाठी ते आपल्याला मतदान करायला किंवा अशा माणसाला पाठिंबा द्यायला सांगतील, जो त्यांच्या मते चांगला शासक होऊ शकतो. पण, येशूला जे सांगायचं होतं ते अगदी स्पष्ट होतं. त्याने राजकारणात भाग घ्यायला स्पष्ट नकार दिला. इतकंच नाही, तर त्याने म्हटलं: “माझं राज्य या जगाचं नाही.” (योहा. १७:१४; १८:३६) आज ख्रिस्ती भाऊबहीणसुद्धा येशूसारखा विचार करतात आणि त्याच्यासारखं वागतात. ते देवाच्या राज्याला पाठिंबा देतात, त्याबद्दल साक्ष देतात आणि त्यासाठी प्रार्थनाही करतात.—मत्त. ६:१०. टेहळणी बुरूज२४.१२ ४-५ ¶५-६
गुरुवार, १९ मार्च
जो माझ्या आज्ञा स्वीकारून त्या पाळतो त्याचं माझ्यावर प्रेम आहे. आणि ज्याचं माझ्यावर प्रेम आहे, त्याच्यावर माझा पिता प्रेम करेल आणि मीही प्रेम करीन. मी स्वतःला त्याच्यासमोर स्पष्टपणे प्रकट करीन.—योहा. १४:२१.
जसजसं तुम्ही अभ्यास करता, तसतसं शिकलेल्या गोष्टी लागू कशा करता येतील याचे मार्ग शोधा. उदाहरणार्थ, यहोवासारखं न्यायाने वागा. इतरांशी भेदभाव करू नका. येशूसारखं यहोवा देवावर आणि इतरांवर प्रेम करा. परिस्थिती कठीण असली तरी यहोवाच्या नावासाठी दुःख सोसायला आणि आपल्या भाऊबहिणींची सेवा करायला तयार राहा. यहोवाने दिलेली खंडणी बलिदानाची अनमोल भेट इतरांनाही मिळावी म्हणून त्यांना प्रचार करूनसुद्धा तुम्ही येशूसारखं वागू शकता. आपण खंडणीबद्दल जितकं जास्त समजून घेऊ आणि आपली कदर वाढवू, तितकं यहोवा देवाबद्दल आणि त्याच्या मुलाबद्दल आपलं प्रेम आणखी वाढत जाईल. आणि यामुळे त्यांचंही आपल्यावरचं प्रेम आणखी वाढेल. (याको. ४:८) म्हणून, खंडणीबद्दल शिकून घ्यायला यहोवाने ज्या तरतुदी केल्या आहेत त्यांचा आपण चांगला वापर करू या. टेहळणी बुरूज२५.०१ २५ ¶१६-१७
शुक्रवार, २० मार्च
माझे सगळे अपराध तू पाठीमागे टाकलेस.—यश. ३८:१७.
आजच्या वचनात जणू काय म्हटलंय: “माझे सगळे अपराध तुझ्या नजरेपासून दूर केले आहेत.” या शब्दचित्रावरून कळतं की यहोवा पश्चात्ताप करणाऱ्यांची पापं दूर फेकून देऊन ती नजरेआड करतो. वचनातल्या वाक्याचं अशा प्रकारेही भाषांतर केलं जाऊ शकतं: “तू माझ्या पापांकडे ती जणू कधी घडलीच नव्हती अशा प्रकारे बघतो.” तसंच, मीखा ७:१८, १९ या वचनांत आणखी एका शब्दचित्राद्वारे हा मुद्दा स्पष्ट करण्यात आलाय. या वचनांत सांगितल्याप्रमाणे यहोवा आपली पापं खोल समुद्रात टाकून देतो. जुन्या काळात जेव्हा एखादी वस्तू समुद्रात फेकली जायची तेव्हा ती पुन्हा मिळवणं अशक्यच होतं. या सगळ्या शब्दचित्रांमधून आपण शिकलो की यहोवा जेव्हा माफ करतो, तेव्हा तो आपल्याला आपल्या पापांच्या ओझ्यापासून मुक्त करतो. दावीदने म्हटलं: “सुखी आहेत ते, ज्यांच्या अपराधांची क्षमा करण्यात आली आहे आणि ज्यांची पापं झाकण्यात आली आहेत.” (रोम. ४:७) यालाच खऱ्या अर्थाने क्षमा करणं म्हणतात! टेहळणी बुरूज२५.०२ ९ ¶७-८
शनिवार, २१ मार्च
मी आता जे निर्माण करतोय, त्यामुळे जल्लोष करा आणि सर्वकाळ आनंदी राहा.—यश. ६५:१८.
आज या पृथ्वीवर एक असं नंदनवन आहे, ज्यात पुष्कळ लोक एक चांगलं काम करण्यात व्यस्त आहेत. या नंदनवनात आज लाखो लोक खऱ्या शांतीचा आनंद घेत आहेत. आणि त्यांना हे नंदनवन सोडून जायची अजिबात इच्छा नाही. उलट आणखी लोकांनी या नंदनवनात यावं अशी त्यांची इच्छा आहे. हे नंदनवन म्हणजे आध्यात्मिक नंदनवन! सैतानाच्या या दुष्ट, धोकेदायक आणि द्वेषपूर्ण जगात यहोवाने एक असं लाक्षणिक ठिकाण बनवलंय ज्यात राहणाऱ्या लोकांमध्ये शांती आणि एकता आहे. आणि ही गोष्ट खूप विशेष आहे. (१ योहा. ५:१९; प्रकटी. १२:१२) आपल्या प्रेमळ देवाला या दुष्ट जगाच्या व्यवस्थेचे धोकेदायक परिणाम माहीत आहेत. म्हणून आपली आध्यात्मिक रित्या भरभराट व्हावी यासाठी तो आपल्याला सुरक्षित ठेवतो. त्याच्या वचनात, बायबलमध्ये आध्यात्मिक नंदनवनाला “आसरा” आणि ‘भरपूर पाणी मिळालेली बाग’ म्हटलंय. (यश. ४:६; ५८:११) यहोवाच्या आशीर्वादामुळे नंदनवनात राहणारे लोक, या शेवटच्या कठीण दिवसांतसुद्धा आनंदी आणि सुरक्षित आहेत.—यश. ५४:१४; २ तीम. ३:१. टेहळणी बुरूज२४.०४ २०-२१ ¶१-२
रविवार, २२ मार्च
आपल्या विनंत्या देवाला कळवा.—फिलिप्पै. ४:६.
जर तुम्ही लग्नाचा विचार करताय, तर एक चांगला जोडीदार मिळण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रार्थना केली असेल. हे खरंय की यहोवा कोणालाही जोडीदार शोधून देण्याचं वचन देत नाही. पण त्याला तुमच्या गरजांची आणि भावनांची काळजी आहे. आणि एक चांगला जोडीदार शोधायला तो तुम्हाला मदत करू शकतो. म्हणून आपल्या गरजांबद्दल, भावनांबद्दल त्याला सांगत जा. (स्तो. ६२:८) धीरासाठी आणि बुद्धीसाठी प्रार्थना करा. (याको. १:५) पण एक चांगला जोडीदार मिळेपर्यंत तुम्हाला जर थांबावं लागत असेल, तर तोपर्यंत यहोवा तुमच्या शारीरिक आणि भावनिक गरजांची काळजी घेईल असं वचन तो तुम्हाला देतो. (स्तो. ५५:२२) पण योग्य जोडीदार शोधत असताना, तीच गोष्ट तुमच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची बनू नये म्हणून सावध राहा. (फिलिप्पै. १:१०) कारण खरा आनंद तुमचं लग्न झालंय की नाही यावर नाही, तर यहोवासोबतच्या तुमच्या नात्यावर अवलंबून असतो. (मत्त. ५:३) शिवाय हेही लक्षात घ्या, की जेव्हा तुम्ही अविवाहित असता तेव्हा आपली सेवा वाढवण्याचं जास्त स्वातंत्र्य तुमच्याकडे असतं. (१ करिंथ. ७:३२, ३३) म्हणून वेळेचा चांगला वापर करा. टेहळणी बुरूज२४.०५ २१-२२ ¶४; २२ ¶६
सोमवार, २३ मार्च
स्वतःच्याच फायद्याचा विचार करू नका, तर इतरांच्या फायद्याचाही विचार करा.—फिलिप्पै. २:४.
तुम्ही किती काळ डेटींग करत राहिलं पाहिजे? घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयांचा परिणाम सहसा वाईट होतो. (नीति. २१:५) त्यामुळे एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून घेईपर्यंत तुम्ही डेटींग केली पाहिजे. पण डेटींगचा काळ गरज नसताना विनाकारण वाढवणं योग्य ठरणार नाही. कारण बायबल असंही म्हणतं: “अपेक्षा पूर्ण व्हायला वेळ लागला, तर मन उदास होतं.” (नीति. १३:१२) एखादं जोडपं डेटींग करत असताना इतर जण काय करू शकतात? तुम्ही त्या दोघांनाही घरी जेवायला, कौटुंबिक उपासनेला, किंवा मनोरंजनासाठी आपल्या घरी बोलवू शकता. (रोम. १२:१३) समजा त्यांना बाहेर फिरायला जायचं असेल किंवा सोबत मिळून कारने कुठेतरी जायचं असेल, तसंच एकांतात बोलता येईल अशा ठिकाणी जायचं असेल. आणि त्यासाठी त्यांना सोबत कोणीतरी पाहिजे असेल, तर तुम्ही त्यांना मदत करू शकता का? (गलती. ६:१०) डेटींग करणाऱ्या जोडप्याने जर तुम्हाला त्यांच्यासोबत राहायला सांगितलं, तर त्यांना मदत करायची ही एक चांगली संधी आहे असं समजा. पण हेही लक्षात घ्या, की ते नेहमी तुमच्या नजरेसमोर राहतील आणि त्याच वेळेस त्यांना वैयक्तिकपणे बोलण्याची संधीसुद्धा मिळेल. टेहळणी बुरूज२४.०५ ३० ¶१३-१४
मंगळवार, २४ मार्च
मी तिला पश्चात्ताप करण्याची संधी दिली.—प्रकटी. २:२१.
कोणत्या गोष्टींमुळे एखाद्या व्यक्तीकडून पाप घडलं हे जाणून घ्यायचा वडील प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, पाप करणाऱ्याने वैयक्तिक अभ्यासाकडे किंवा प्रचाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो विश्वासात हळूहळू कमजोर झाला होता का? त्याने यहोवाला नियमितपणे प्रार्थना करायचं सोडून दिलं होतं का किंवा तो वरवर प्रार्थना करत होता का? त्याने चुकीच्या इच्छांशी लढायचं सोडून दिलं होतं का? संगतीच्या किंवा मनोरंजनाच्या बाबतीत तो चुकीची निवड करत होता का? अशा आवडीनिवडींचा त्याच्या विचारांवर आणि इच्छांवर कसा प्रभाव पडत होता? त्याने जे केलंय त्याबद्दल यहोवाला कसं वाटलं असेल हे त्याला जाणवतंय का? पाप करणाऱ्याचं यहोवासोबतचं नातं कसं कमजोर झालं आणि त्यामुळे त्याच्या हातून कसं पाप घडलं, याबद्दल विचार करायला लावण्यासाठी वडील त्याला प्रश्न विचारू शकतात. असं करताना ते त्याच्याशी प्रेमळपणे वागतात. वडिलांना ज्या गोष्टी माहीत असण्याची गरज नाही, म्हणजे त्याच्याबद्दलच्या खाजगी गोष्टी ते त्याला विचारत नाहीत. (नीति. २०:५) वडीलसुद्धा पाप करणाऱ्याशी तर्क करण्यासाठी आणि तो कशा प्रकारे चुकीचा वागला, हे त्याला समजवण्यासाठी उदाहरणांचा वापर करू शकतात. असं केल्यामुळे, कदाचित पहिल्या भेटीतच पाप करणाऱ्याने जे केलं त्याबद्दल त्याला मनापासून पस्तावा होईल. तसंच तो कदाचित पूर्णपणे पश्चात्तापही करेल. टेहळणी बुरूज२४.०८ २२ ¶९-११
बुधवार, २५ मार्च
मला इतर शहरांतही देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश घोषित केला पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवण्यात आलंय.—लूक ४:४३.
येशूने आवेशाने “देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश” सांगितला. कारण त्याला माहीत होतं, की त्याने हेच काम करावं अशी देवाची इच्छा आहे. येशूसाठी प्रचाराचं काम सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. आपल्या सेवाकार्याच्या शेवटच्या महिन्यांमध्येसुद्धा तो “शहरोशहरी आणि गावोगावी” जाऊन लोकांना शिकवत राहिला. (लूक १३:२२) इतकंच नाही, तर त्याने आणखी शिष्यांनासुद्धा प्रचार करायला शिकवलं. (लूक १०:१) येशूच्या दिवसांप्रमाणे आजही आनंदाच्या संदेशाचा प्रचार करणं हे देवाच्या लोकांचं मुख्य काम आहे. यहोवा देवाची आणि येशूची हीच इच्छा आहे की आपणही ते काम करावं. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) आपण जर लोकांकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर आपल्याला आवेशाने प्रचार करत राहता येईल. यहोवाची अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी आनंदाचा संदेश ऐकावा आणि तो स्वीकारावा. (१ तीम. २:३, ४) लोकांचं जीवन वाचवणारा हा संदेश सांगण्यात आपण आणखी कुशल बनावं म्हणून तो आपल्याला प्रशिक्षण देतो. आज जरी लोकांनी आपलं ऐकलं नाही, तरी मोठं संकट संपण्याच्या आधी त्यांच्याकडे यहोवाची सेवा करायची संधी आहे. टेहळणी बुरूज२५.०३ १५-१६ ¶५-७
गुरुवार, २६ मार्च
जो कोणी त्याला नमस्कार करतो तो त्याच्या दुष्ट कामांत सहभागी आहे.—२ योहा. ११.
ज्यांना मंडळीतून काढून टाकण्यात आलंय त्यांच्याशी वागताना प्रत्येक भावाने किंवा बहिणीने त्यांच्या बायबल प्रशिक्षित विवेकाचा वापर करून निर्णय घेतला पाहिजे. काहींना वाटेल की त्या व्यक्तीला नमस्ते करण्यात किंवा सभांमध्ये आल्यावर थोडक्यात तिचं स्वागत करण्यात काही हरकत नाही. पण आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की आपण त्याच्याबरोबर जास्त वेळ बोलणार नाही किंवा इतर वेळी त्याच्यासोबत वेळ घालवणार नाही. पण काही जण कदाचित म्हणतील: ‘बायबल तर म्हणतं की जे अशा व्यक्तीला नमस्कार करतात ते त्याच्या दुष्ट कामांत सहभागी होतात, मग त्याबद्दल काय?’ (२ योहा. ९-११) पण या वचनांचा मागचा-पुढचा संदर्भ लक्षात घेतला, तर त्यावरून दिसतं की हे मार्गदर्शन धर्मत्यागी लोकांच्या बाबतीत आणि इतरांना वाईट कामं करायला प्रवृत्त करत राहणाऱ्यांच्या बाबतीत लागू होतं. (प्रकटी. २:२०) त्यामुळे जो माणूस धर्मत्यागी शिकवणी किंवा इतर चुकीच्या गोष्टी पसरवत राहतो, त्याला वडील भेटणार नाहीत. असं असलं तरी पुढे जाऊन तो पश्चात्ताप करेल अशी आपल्याला आशा असते. पण जोपर्यंत तो असं करत नाही, तोपर्यंत आपण त्याला नमस्कार करणार नाही किंवा मंडळीच्या सभांमध्ये त्याला बोलवणारही नाही. टेहळणी बुरूज२४.०८ ३०-३१ ¶१४-१५
शुक्रवार, २७ मार्च
त्यांचं मन अजूनही अंधारात होतं.—मार्क ६:५२.
लोकांना जेवण दिल्यानंतर येशूने आपल्या शिष्यांना नावेतून कफर्णहूमला जायला सांगितलं. लोक त्याला राजा बनवायला निघाले होते म्हणून तो एकटाच डोंगरावर निघून गेला. (योहा. ६:१६-२०) प्रेषित नावेतून प्रवास करत असताना अचानक समुद्रात एक मोठं वादळ आलं. त्यामुळे वारा जोरात वाहू लागला आणि मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या. मग येशू पाण्यावर चालत त्यांच्याकडे आला आणि त्याने प्रेषित पेत्रलाही तसंच करायला सांगितलं. (मत्त. १४:२२-३१) मग, येशू नावेत बसल्यावर वादळ शांत झालं. हे पाहून त्याचे शिष्य म्हणाले: “तू खरोखरच देवाचा मुलगा आहेस!” (मत्त. १४:३३) विशेष गोष्ट म्हणजे, येशूने चमत्काराने भाकरी पुरवल्यानंतर नाही, तर तो पाण्यावर चालल्यानंतर शिष्यांनी असं म्हटलं. याबद्दल मार्क आपल्या अहवालात म्हणतो: “हे पाहून त्यांना फार आश्चर्य वाटलं. कारण भाकरींच्या चमत्काराचा अर्थ त्यांना कळला नव्हता.” (मार्क ६:५०-५२) यहोवाने येशूला चमत्कार करण्याची किती अफाट शक्ती दिली होती हे त्यांना अजून समजलं नव्हतं. टेहळणी बुरूज२४.१२ ५ ¶७
शनिवार, २८ मार्च
[देवाची] अशी इच्छा आहे, की सर्व प्रकारच्या लोकांचं तारण व्हावं आणि त्यांना सत्याचं अचूक ज्ञान मिळावं.—१ तीम. २:४.
आपण आणखी एका मार्गाने यहोवाच्या प्रेमाबद्दल कदर असल्याचं दाखवू शकतो. तो मार्ग म्हणजे स्मारकविधीच्या या काळात आपल्याला खंडणीबद्दल किती कदर आहे हे यहोवाला दाखवणं. आपण सगळेच स्मारकविधीला हजर राहणार आहोत. पण आपण इतरांनाही तिथे यायचं आमंत्रण देऊ शकतो. ज्यांना आपण आमंत्रण देऊ त्यांना आपण हे समजावून सांगू, की त्या वेळी तिथे काय होईल. येशूला का मरावं लागलं? आणि येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण ठेवा हे व्हिडिओ दाखवून आपण त्यांना मदत करू शकतो. तसंच, अक्रियाशील लोकांना आमंत्रण द्यायची खातरी वडील करतील. विचार करा, यहोवाच्या हरवलेल्या मेंढरांपैकी काही मेंढरं जर परत आली, तर स्वर्गात आणि पृथ्वीवर किती आनंद साजरा केला जाईल! (लूक १५:४-७) स्मारकविधीच्या वेळी आपण एकमेकांचं स्वागत करतो. पण तिथे आलेल्या नवीन लोकांचं किंवा बऱ्याच काळानंतर आलेल्या लोकांचंही आपण स्वागत केलं पाहिजे. त्यांच्यापैकी कोणालाही अवघडल्यासारखं वाटणार नाही याची आपण पूर्ण काळजी घेतली पाहिजे.—रोम. १२:१३. टेहळणी बुरूज२५.०१ २९ ¶१५
रविवार, २९ मार्च
[देवाने] आपल्यावर प्रेम केलं. आणि आपल्या पापांसाठी प्रायश्चित्ताचं बलिदान म्हणून त्याने आपल्या मुलाला पाठवलं.—१ योहा. ४:१०.
खंडणी बलिदानामुळे आपल्याला हे समजायला मदत होते की यहोवा न्यायी आहे. पण त्यासोबतच त्याचं आपल्यावर मनापासून प्रेम आहे हेसुद्धा आपल्याला कळतं. (योहा. ३:१६; १ योहा. ४:९, १०) खंडणीच्या शिकवणीवरून आपल्याला हेही कळतं, की आपल्याला कायमचं जीवन मिळावं असं यहोवाला वाटतं. पण त्यासोबतच आपल्याला हेसुद्धा कळतं, की आपण त्याच्या कुटुंबाचा भाग बनावं असंही त्याला वाटतं. विचार करा: जेव्हा आदामने पाप केलं तेव्हा यहोवाने त्याला आपल्या कुटुंबातून काढून टाकलं. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा जेव्हा जन्म झाला, तेव्हा आपण यहोवाच्या कुटुंबाचा भाग नव्हतो. पण खंडणी बलिदानाच्या आधारावर आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळणं शक्य झालं आहे. यहोवा त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि आज्ञाधारक लोकांना पुढे आपल्या कुटुंबाचा भाग बनवणार आहे. पण आजसुद्धा आपण यहोवा देवासोबत आणि आपल्या भाऊबहिणींसोबत एक चांगलं नातं जोडू शकतो. खरंच, यहोवाचं आपल्या सगळ्यांवर मनापासून प्रेम आहे!—रोम. ५:१०, ११. टेहळणी बुरूज२५.०१ २१ ¶६
स्मारकविधी बायबल वाचन: (निसान ९: दिवसा घडलेल्या घटना) योहान १२:१२-१९; मार्क ११:१-११
सोमवार, ३० मार्च
यावरूनच देवाचं आपल्यावर असलेलं प्रेम दिसून आलं.—१ योहा. ४:९.
आपण सगळेच ही गोष्ट मान्य करू, की खंडणी बलिदान ही यहोवाने आपल्याला दिलेली अमूल्य भेट आहे! (२ करिंथ. ९:१५) येशूने आपल्या जीवनाचं बलिदान दिल्यामुळेच आपण यहोवा देवासोबत एक जवळचं नातं जोडू शकतो. इतकंच नाही तर त्यामुळे आपल्याला सर्वकाळाच्या जीवनाची आशासुद्धा मिळते. म्हणून यहोवाबद्दल आणि त्याने प्रेमाने केलेल्या खंडणीच्या तरतुदीबद्दल कदर असणं खरंच किती महत्त्वाचं आहे! (रोम. ५:८) यहोवा आणि येशूने आपल्यासाठी जे केलं ते आपण कधीच विसरू नये आणि खंडणीबद्दल आपल्या मनात नेहमी कदर राहावी म्हणूनच येशूने स्मारकविधीची सुरुवात केली. (लूक २२:१९, २०) या वर्षी गुरुवार, २ एप्रिल २०२६ ला आपण येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करणार आहोत. आपण सगळेच तिथे हजर राहायला उत्सुक आहोत. यहोवाने आणि त्याच्या मुलाने आपल्यासाठी जे केलंय त्यावर या स्मारकविधीच्या काळात मनन केल्यामुळे आपल्या सगळ्यांनाच खूप फायदा होईल. टेहळणी बुरूज२५.०१ २० ¶१-२
स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १०: दिवसा घडलेल्या घटना) योहान १२:२०-५०
मंगळवार, ३१ मार्च
चांदीपेक्षा माझं शिक्षण निवडा आणि सगळ्यात उत्कृष्ट सोन्यापेक्षा ज्ञान निवडा.—नीति. ८:१०.
यहोवाने आणि येशूने आपल्यासाठी जे केलंय त्यावर मनन केल्यामुळे, त्यांचं आपल्यावर किती प्रेम आहे याबद्दल शिकत राहायला आपल्याला मदत होईल. कदाचित या वर्षी स्मारकविधीच्या काळात तुम्ही एक किंवा एकापेक्षा जास्त शुभवर्तमानाची पुस्तकं वाचू शकता. पण एकाच वेळी बरेच अध्याय वाचायचा प्रयत्न करू नका. थोडेच अध्याय वाचा. मग यहोवावर आणि येशूवर आपण प्रेम का केलं पाहिजे याची आणखी कारणं शोधा. जर तुम्ही बऱ्याच वर्षांपासून सत्यात असाल तर कदाचित तुमच्या मनात असा विचार येईल, की देवाचा न्याय, त्याचं प्रेम आणि खंडणी बलिदान या विषयांबद्दल आणखी नवीन शिकण्यासारखं काय असू शकतं? खरं पाहिलं तर, या आणि यांसारख्या इतर विषयांबद्दल आपण आणखी बरंच काही शिकू शकतो. म्हणून आपल्या साहित्यामध्ये असलेल्या माहितीच्या खजिन्याचा पूर्ण उपयोग करा. टेहळणी बुरूज२५.०१ २४-२५ ¶१३-१५
स्मारकविधी बायबल वाचन: (निसान ११: दिवसा घडलेल्या घटना) लूक २१:१-३६