वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es26 पृ. २०-३२
  • फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • फेब्रुवारी
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२६
  • उपशिर्षक
  • रविवार, १ फेब्रुवारी
  • सोमवार, २ फेब्रुवारी
  • मंगळवार, ३ फेब्रुवारी
  • बुधवार, ४ फेब्रुवारी
  • गुरुवार, ५ फेब्रुवारी
  • शुक्रवार, ६ फेब्रुवारी
  • शनिवार, ७ फेब्रुवारी
  • रविवार, ८ फेब्रुवारी
  • सोमवार, ९ फेब्रुवारी
  • मंगळवार, १० फेब्रुवारी
  • बुधवार, ११ फेब्रुवारी
  • गुरुवार, १२ फेब्रुवारी
  • शुक्रवार, १३ फेब्रुवारी
  • शनिवार, १४ फेब्रुवारी
  • रविवार, १५ फेब्रुवारी
  • सोमवार, १६ फेब्रुवारी
  • मंगळवार, १७ फेब्रुवारी
  • बुधवार, १८ फेब्रुवारी
  • गुरुवार, १९ फेब्रुवारी
  • शुक्रवार, २० फेब्रुवारी
  • शनिवार, २१ फेब्रुवारी
  • रविवार, २२ फेब्रुवारी
  • सोमवार, २३ फेब्रुवारी
  • मंगळवार, २४ फेब्रुवारी
  • बुधवार, २५ फेब्रुवारी
  • गुरुवार, २६ फेब्रुवारी
  • शुक्रवार, २७ फेब्रुवारी
  • शनिवार, २८ फेब्रुवारी
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२६
es26 पृ. २०-३२

फेब्रुवारी

रविवार, १ फेब्रुवारी

भांडण टाळणं ही माणसासाठी आदराची गोष्ट आहे, पण प्रत्येक मूर्ख वाद घालत बसतो.—नीति. २०:३.

ख्रिस्ती गुण असलेले भाऊ खरंतर मंडळीसाठी आशीर्वादच असतात. एक समजूतदार भाऊ नेहमी शांती टिकवून ठेवायचा प्रयत्न करतो. लोकांनी तुम्हाला समजूदार म्हणून ओळखावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही इतरांचं ऐकलं पाहिजे आणि त्यांचा दृष्टिकोन समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. वडिलांच्या सभेत घेतला जाणारा एखादा निर्णय बायबलमधल्या नियमांच्या किंवा तत्त्वांच्या विरोधात नसेल, आणि बहुतेक वडील त्याला सहमत असतील तर तुम्हीही त्याच्याशी सहमत असता का? स्वतःच्याच मतांवर अडून राहायचं टाळा. त्याऐवजी इतरांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल कदर असल्याचं दाखवा. (उत्प. १३:८, ९; नीति. १५:२२) इतरांशी कठोरपणे वागण्याऐवजी किंवा वाद घालत बसण्याऐवजी, त्यांच्याशी सौम्यतेने आणि समंजसपणे वागा. एक शांतिप्रिय व्यक्‍ती असल्यामुळे तुम्ही तणावाच्या परिस्थितींतही शांती टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घेऊ शकता. (याको. ३:१७, १८) तुमच्या प्रेमळ शब्दांमुळे विरोध करणाऱ्‍यांचंही मन शांत होऊ शकतं.—शास्ते ८:१-३; नीति. २५:१५; मत्त. ५:२३, २४. टेहळणी बुरूज२४.११ २३ ¶१३

सोमवार, २ फेब्रुवारी

तो स्वर्गदूतांना पाठवेल आणि चारही दिशांतून, पृथ्वीच्या सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांना गोळा करेल.—मार्क १३:२७.

येशू आपल्यासाठी “एकदाच मेला.” पण तो आजही आपल्यासाठी बरेच त्याग करतोय. (रोम. ६:१०) ते कसं? खंडणी बलिदानाचे फायदे आपल्याला मिळावेत म्हणून तो आजही मेहनत घेतोय आणि वेळ देतोय. तो आज कोणत्या कामात व्यस्त आहे याचा विचार करा. तो आपला राजा, महायाजक आणि मंडळीचं मस्तक म्हणून सेवा करतोय. (१ करिंथ. १५:२५; इफिस. ५:२३; इब्री २:१७) तसंच, अभिषिक्‍तांना आणि मोठ्या समुदायातल्या लोकांना गोळा करायची जबाबदारीसुद्धा त्याच्यावर आहे. हे काम मोठं संकट संपायच्या आधी पूर्ण केलं जाईल. (मत्त. २५:३२) तसंच, या शेवटच्या दिवसांत त्याच्या विश्‍वासू सेवकांना भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्‍न मिळेल याकडेही तो लक्ष देतोय. (मत्त. २४:४५) पुढे, त्याच्या हजार वर्षांच्या राज्यातसुद्धा तो आपल्यासाठी बऱ्‍याच गोष्टी करणार आहे. खरंच, यहोवाने त्याच्या मुलाला आपल्यासाठी खऱ्‍या अर्थाने दिलंय! टेहळणी बुरूज२५.०१ २४ ¶१२

मंगळवार, ३ फेब्रुवारी

देव आपल्याला नीतिमान ठरवतो, ही त्याची अपार कृपा आहे आणि हे त्याच्याकडून मिळणारं मोफत दान आहे. ख्रिस्त येशूने आपल्या सुटकेसाठी भरलेल्या खंडणीद्वारे देव आपल्याला नीतिमान ठरवतो.—रोम. ३:२४.

यहोवा आपल्याला क्षमा करतो, तेव्हा तो ती पूर्णपणे आणि कायमची करतो. त्यामुळे आपल्याला स्वर्गातल्या आपल्या पित्यासोबत चांगलं नातं टिकवून ठेवता येतं. पण त्यासोबतच आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की जेव्हा यहोवा खऱ्‍या अर्थाने आपल्याला क्षमा करतो तेव्हा ही त्याच्याकडून एक भेटच आहे. खरंतर, आपल्यासारख्या पापी मानवांना ती मिळवायचा हक्क नाही. पण ही भेट तो त्याच्या प्रेमामुळे आणि अपार कृपेमुळेच आपल्याला देतो. यहोवा “खरोखर” म्हणजे खऱ्‍या अर्थाने क्षमा करणारा देव आहे, याबद्दल आपण प्रत्येकाने त्याचे किती आभार मानले पाहिजेत! (स्तो. १३०:४; रोम. ४:८) पण जर आपल्याला वाटत असेल की देवाने आपल्याला क्षमा करावी तर आपण एक महत्त्वाची गोष्ट करणं गरजेचंय. याबद्दल येशू म्हणाला: “जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा केली नाही, तर स्वर्गातला तुमचा पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही.” (मत्त. ६:१४, १५) म्हणून, यहोवाच्या क्षमेचं अनुकरण करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. टेहळणी बुरूज२५.०२ १३ ¶१८-१९

बुधवार, ४ फेब्रुवारी

नीतिमान आणि अनीतिमान अशा सगळ्या लोकांना मेलेल्यांतून उठवलं जाणार आहे.—प्रे. कार्यं २४:१५.

सदोम आणि गमोरामधल्या लोकांचा विचार करा. त्या लोकांमध्ये नीतिमान माणूस लोट राहत होता. पण लोटने त्या सगळ्यांना प्रचार केला की नाही हे आपल्याला माहीत नाही. हे खरंय की ते लोक दुष्ट होते. पण त्या सगळ्यांनाच योग्य आणि अयोग्य काय हे माहीत होतं का? लोटच्या घरी आलेल्या पाहुण्यांसोबत संबंध ठेवण्यासाठी एक जमाव लोटच्या घरी आला, त्या घटनेचा विचार करा. बायबल म्हणतं, की त्या जमावात “तरुण मुलांपासून म्हाताऱ्‍यांपर्यंत” सगळे लोक होते. (उत्प. १९:४; २ पेत्र २:७) आपल्या दयाळू यहोवा देवाने त्यांपैकी प्रत्येकाला पुनरुत्थानाची आशा न देता मृत्यूदंड द्यायचं ठरवलं होतं असं आपण खातरीने म्हणू शकतो का? यहोवाने अब्राहामला म्हटलं होतं, की त्या शहरात दहासुद्धा नीतिमान लोक नाहीत. (उत्प. १८:३२) त्यामुळे आपल्याला म्हणता येईल की ते अनीतिमान होते. आणि म्हणून यहोवाने त्यांना त्यांच्या कृत्यांसाठी जबाबदार ठरवून योग्य तेच केलं होतं. पण त्यांपैकी कोणीच ‘अनीतिमान लोकांच्या पुनरुत्थानात’ उठणार नाही असं आपण खातरीने म्हणू शकतो का? नाही. टेहळणी बुरूज२४.०५ ३ ¶३; ३-४ ¶८

गुरुवार, ५ फेब्रुवारी

आधी देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्त्व मिळवण्याचा प्रयत्न करत राहा. मग या सगळ्या गोष्टीही तुम्हाला दिल्या जातील.—मत्त. ६:३३.

पैशांच्या अडचणीमुळे काही जणांनी अशी नोकरी निवडली आहे ज्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबापासून लांब राहावं लागलं आहे. पण नंतर त्यांना जाणवलं की त्यांचा हा निर्णय चुकीचा होता. कोणतीही नोकरी निवडण्याआधी त्यातून किती पैसे मिळतील याचा विचार करण्यासोबतच, त्या नोकरीमुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुमची आध्यात्मिकता टिकवून ठेवता येईल का, याचासुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. (लूक १४:२८) त्यामुळे तुम्ही स्वतःला काही प्रश्‍न विचारू शकता. ते म्हणजे: ‘माझ्या जोडीदारापासून लांब राहिल्यामुळे आमच्या नात्यावर काय परिणाम होईल? मला प्रत्येक सभेला आणि प्रचारकार्याला जाता येईल का? तसंच मला भाऊबहिणींसोबत वेळ घालवता येईल का?’ शिवाय, जर तुम्हाला मुलं असतील तर तुम्ही स्वतःला आणखी एक महत्त्वाचा प्रश्‍न विचारू शकता. तो म्हणजे: ‘जर मी माझ्या मुलांसोबत नसलो तर मी त्यांना “यहोवाच्या शिस्तीत आणि शिक्षणात” वाढवू शकेन का?’ (इफिस. ६:४) अशा परिस्थितीत निर्णय घेताना, बायबलच्या तत्त्वांचा आदर न करणाऱ्‍या तुमच्या नातेवाइकांचा किंवा मित्रांचा सल्ला लागू करण्याऐवजी, यहोवाचे विचार लक्षात घेऊन त्याप्रमाणे निर्णय घ्या. टेहळणी बुरूज२५.०३ २९ ¶१२

शुक्रवार, ६ फेब्रुवारी

यापुढे आपण लहान मुलांसारखं असू नये.—इफिस. ४:१४.

जो आध्यात्मिक रितीने लहान मुलांसारखाच असतो तो “धूर्त” आणि ‘चलाख माणसांकडून फसवला जाऊ’ शकतो. तो चुकीच्या बातम्या, अफवा, मिडियाद्वारे खोट्याच पण खऱ्‍या असल्याचं भासवल्या जाणाऱ्‍या बातम्या आणि धर्मत्यागी लोकांना बळी पडू शकतो. तसंच, इतरांबद्दल हेवा वाटणं, वाद घालणं किंवा इतरांच्या वागण्या-बोलण्यामुळे लगेच वाईट वाटून घेणं अशा गोष्टीही त्याच्याकडून होऊ शकतात. शिवाय, मोह आला की त्याच्याकडून एखादी चुकीची गोष्टसुद्धा होऊ शकते. (१ करिंथ. ३:३) बायबलमध्ये आध्यात्मिक रितीने प्रौढ होण्याची तुलना एका लहान मुलाच्या वाढीशी करण्यात आली आहे. (इफिस. ४:१५) लहान मुलाला जास्त समज नसते आणि त्याला देखरेखीची गरज असते. उदाहरणार्थ, एक आई तिच्या लहान मुलीला रस्ता ओलांडताना तिचा हात धरायला सांगेल. पुढे जेव्हा ती मुलगी थोडी मोठी होईल, तेव्हा आई त्या मुलीला स्वतःहून रस्ता ओलांडायला सांगेल. पण तेव्हासुद्धा ती तिला दोन्ही बाजूला बघायची आठवण करून देईल. मग जेव्हा ती मुलगी आणखी मोठी होईल, तेव्हा ती स्वतःच ते धोके टाळेल. त्याचप्रमाणे, एक ख्रिस्ती व्यक्‍ती जेव्हा प्रौढ होते, तेव्हा ती बायबल तत्त्वांच्या आधारावर एखाद्या विषयावर यहोवाचे विचार काय आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न करते आणि त्यानुसार निर्णय घेते. टेहळणी बुरूज२४.०४ ३-४ ¶५-६

शनिवार, ७ फेब्रुवारी

हे यहोवा, तुझ्या तंबूत राहण्यासाठी तू कोणाचं स्वागत करशील?—स्तो. १५:१.

बऱ्‍याच वर्षांपर्यंत फक्‍त स्वर्गात राहणारेच यहोवाचे पाहुणे होते. पण नंतर त्याने माणसांनाही त्याच्या तंबूत बोलवलं. त्या तंबूत हनोख, नोहा, अब्राहाम आणि ईयोबसुद्धा होते. या विश्‍वासू सेवकांचं वर्णन देवाचे मित्र किंवा ‘खऱ्‍या देवासोबत चालणारे’ म्हणूनसुद्धा करण्यात आलंय. (उत्प. ५:२४; ६:९; ईयो. २९:४; यश. ४१:८) बऱ्‍याच शतकांपासून यहोवा त्याच्या मित्रांना त्याच्या तंबूत यायचं आमंत्रण देत आलाय. (यहे. ३७:२६, २७) उदाहरणार्थ, यहेज्केलच्या भविष्यवाणीवरून कळतं की यहोवाच्या सेवकांनी त्याच्यासोबत जवळचं नातं जोडावं अशी त्याची मनापासून इच्छा आहे. तो “त्यांच्यासोबत शांतीचा एक करार” करण्याचं वचन देतो. तसंच यहेज्केलची भविष्यवाणी अशा एका काळाबद्दल सांगते, जेव्हा स्वर्गाची आणि पृथ्वीची आशा असणाऱ्‍यांना “एक कळप” म्हणून त्याच्या लाक्षणिक तंबूत एकत्र केलं जाईल. (योहा. १०:१६) आणि आत्ता ती वेळ आहे! टेहळणी बुरूज२४.०६ २ ¶२; ३ ¶४-५

रविवार, ८ फेब्रुवारी

आम्ही आमच्या देवाच्या मदतीने धैर्य एकवटलं.—१ थेस्सलनी. २:२.

यहोवाचे लोक म्हणून आपण देवाच्या राज्याला मनापासून पाठिंबा देतो. पण असं करण्यासाठी सहसा आपल्याला धैर्याची गरज असते. (मत्त. ६:३३) उदाहरणार्थ, या दुष्ट जगात देवाच्या स्तरांप्रमाणे जगायला आणि आनंदाच्या संदेशाचा प्रचार करायला आपल्याला धैर्य लागतं. आणि राजकीय दृष्टीने फुटी पडत चाललेल्या या जगात तटस्थ राहण्यासाठी आपल्याला सहसा हिमतीची गरज असते. (योहा. १८:३६) त्यामुळे यहोवाच्या लोकांपैकी बऱ्‍याच जणांचं आर्थिक नुकसान झालंय, त्यांना शारीरिक शोषण सहन करावं लागलंय. तसंच, राजकारणात किंवा सैन्यात भाग घ्यायला नकार दिल्यामुळे तुरुंगात टाकण्यात आलंय. यहोवाच्या राज्याला धैर्याने पाठिंबा देणाऱ्‍यांच्या उदाहरणावर विचार केल्यामुळे आपल्याला ताकद आणि धैर्य मिळतं. सैतानाच्या राजकीय व्यवस्थेत सामील होण्याच्या दबावाला आपला राजा येशू ख्रिस्ताने ठामपणे नकार दिला. (मत्त. ४:८-११; योहा. ६:१४, १५) तो ताकदीसाठी नेहमी यहोवावर अवलंबून राहिला. टेहळणी बुरूज२४.०७ ३ ¶४; ४ ¶७

सोमवार, ९ फेब्रुवारी

तिने त्याचं फळ तोडलं आणि ते खाल्लं. नंतर, तिचा नवरा तिच्यासोबत असताना तिने त्यालाही ते फळ दिलं, आणि त्याने ते खाल्लं.—उत्प. ३:६.

या घटनेचे परिणाम जरी दुःखद असले, तरी यहोवाने आपल्या फायद्यासाठी त्याबद्दल बायबलमध्ये लिहून ठेवलंय. त्यामुळे आपल्याला कळतं, की त्याला पापाबद्दल इतकी चीड का आहे. पापामुळे आपण आपल्या पित्यापासून दूर जातो आणि त्यामुळेच आपला मृत्यू होतो. (यश. ५९:२) बंडखोर सैतानाला पाप करायला आवडतं. त्याने आदाम आणि हव्वाला पाप करायला प्रवृत्त केलं आणि आजही तो मानवांना पाप करायला प्रवृत्त करतोय. त्याला कदाचित वाटलं असेल की त्याने एदेन बागेत खूप मोठा विजय मिळवला. पण यहोवा देव किती प्रेमळ आहे हे त्याला समजत नाही. आदाम आणि हव्वाच्या वंशजांसाठी असलेला उद्देश यहोवाने कधीच बदलला नाही. त्याचं मानवांवर इतकं प्रेम आहे की त्याने लगेच त्यांना एक आशा दिली. (रोम. ८:२०, २१) यहोवाला माहीत होतं, की आदाम आणि हव्वाच्या वंशजांपैकी काही जण त्याच्यावर प्रेम करायचं निवडतील आणि पापाविरुद्ध लढण्यासाठी त्याच्याकडे मदत मागतील. त्यांचा पिता या नात्याने तो त्यांना पापापासून मुक्‍त होण्यासाठी आणि त्याच्याजवळ येण्यासाठी मदत करणार होता. टेहळणी बुरूज२४.०८ ३ ¶३-४

मंगळवार, १० फेब्रुवारी

कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची तुम्ही नेहमी खातरी करून घ्यावी.—फिलिप्पै. १:१०.

यहोवाच्या सेवकांपैकी बरेच जण आपल्या दररोजच्या जीवनात खूप व्यस्त असतात. आपल्याला स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी काम करावं लागतं. (१ तीम. ५:८) तसंच, आपल्यापैकी बरेच जण आजारी किंवा वयस्कर नातेवाइकांची काळजी घेत असतात. शिवाय, आपल्या सगळ्यांनाच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं आणि त्यासाठी वेळ खर्च होतो. या जबाबदाऱ्‍यांसोबतच आपल्याला मंडळ्यांमधल्या काही जबाबदाऱ्‍याही पार पाडाव्या लागतात. प्रचारकार्यात नियमित सहभाग घेणं, ही आपली प्रमुख जबाबदारी आहे. बायबल वाचणं हे ख्रिस्ती या नात्याने आपल्यासाठी “जास्त महत्त्वाच्या” गोष्टींपैकी एक आहे. म्हणून बायबल वाचायला आपण नेहमी जास्त महत्त्व दिलं पाहिजे. आनंदी माणसाबद्दल पहिल्या स्तोत्रात असं म्हटलंय: “तो यहोवाच्या नियमशास्त्रावर मनापासून प्रेम करतो, आणि रात्रंदिवस ते हळू आवाजात वाचतो.” (स्तो. १:१, २, तळटीप.) त्यामुळे हे स्पष्टच आहे, की बायबलचं वाचन करण्यासाठी आपल्याला वेळ काढणं गरजेचं आहे. मग बायबल वाचायची सगळ्यात योग्य वेळ कोणती? आपल्यापैकी प्रत्येकाचं उत्तर कदाचित वेगवेगळं असेल. पण सोप्या शब्दांत सांगायचं तर, तुमचं बायबल वाचन नियमितपणे होईल अशी वेळ तुम्ही निवडली पाहिजे. टेहळणी बुरूज२४.०९ ३ ¶५-६

बुधवार, ११ फेब्रुवारी

प्रत्येक जण स्वतःचा भार वाहील.—गलती. ६:५

जे आध्यात्मिक रितीने प्रौढ आहेत त्यांना इतरांच्या मदतीची गरज पडते का? हो. त्यांना कदाचित इतरांच्या मदतीची गरज पडू शकते. जे या बाबतीत लहान मुलांसारखेच असतात त्यांना वाटतं, की एखाद्या परिस्थितीत त्यांनी काय करावं हे त्यांना कोणीतरी सांगावं किंवा त्यांच्यासाठी निर्णय घ्यावेत. याउलट, जे आध्यात्मिक रित्या प्रौढ असतात ते इतरांच्या ज्ञानातून आणि अनुभवातून शिकतात. तसंच त्यांना याचीही जाणीव असते की आपण “स्वतःचा भार” स्वतः वाहिला पाहिजे. मोठं झाल्यावर प्रत्येक व्यक्‍ती सारखी दिसत नाही, तसंच जे आध्यात्मिक रितीने प्रौढ असतात ते आध्यात्मिक गुणांच्या बाबतीत सारखेच नसतात. जसं की, बुद्धी, धैर्य, उदारता आणि सहानुभूती दाखवण्याच्या बाबतीत ते सारखे नसतात. कदाचित, आध्यात्मिक रितीने प्रौढ असलेल्या दोन व्यक्‍ती सारख्याच परिस्थितीत वेगवेगळे निर्णय घेतील. पण तरी ते दोन्ही निर्णय बायबल तत्त्वांप्रमाणे बरोबर असतील. जेव्हा एखादा निर्णय विवेकाच्या आधारावर घ्यायचा असतो तेव्हा खासकरून असं होऊ शकतं. अशा वेळी ते एकमेकांची टीका करत नाहीत, उलट एकता टिकवून ठेवायचा प्रयत्न करतात.—रोम. १४:१०; १ करिंथ. १:१०. टेहळणी बुरूज२४.०४ ४ ¶७-८

गुरुवार, १२ फेब्रुवारी

चिंतांनी मला सर्व बाजूंनी घेरलं, तेव्हा तू मला दिलासा आणि सांत्वन दिलंस.—स्तो. ९४:१९.

आपली खरंच काही लायकी आहे का, अशी शंका तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता? यहोवाला तुमची किंमत आहे याची खातरी करून देणारी वचनं वाचा आणि त्यावर मनन करा. तुम्हाला कदाचित एखादं ध्येय गाठता आलं नसेल किंवा इतर जण करतात तितकं करता येत नसेल. आणि त्यामुळे तुम्ही निराश झाला असाल. अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका. कारण यहोवासुद्धा तुम्हाला जमणार नाहीत अशा गोष्टींची तुमच्याकडून कधीच अपेक्षा करत नाही. (स्तो. १०३:१३, १४) तुम्हाला अपमान, मारहाण किंवा लैंगिक अत्याचार सहन करावा लागला असेल. अशा वेळी समोरच्याने केलेल्या वाईट गोष्टींसाठी स्वतःला दोष देऊ नका. कारण यात तुमची काहीएक चूक नाही. लक्षात ठेवा, की ज्यांच्यासोबत वाईट काम झालंय त्यांना नाही, तर ज्यांनी वाईट काम केलंय त्यांना यहोवा दोषी ठरवतो. (१ पेत्र ३:१२) इतरांना मदत करण्यासाठी यहोवा तुमचा वापर करू शकतो यावर शंका घेऊ नका. त्याने तुम्हाला प्रचारकार्यात त्याचे सहकारी बनून काम करण्याचा सन्मान दिलाय. (१ करिंथ. ३:९) तुम्हाला आलेल्या वाईट अनुभवामुळे, इतर जण कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, हे समजून घ्यायला तुम्हाला कदाचित सोपं जाईल. त्यामुळे तुम्ही त्यांना मदत करण्यासाठी बरंच काही करू शकता. टेहळणी बुरूज२४.१० ७-८ ¶६-७

शुक्रवार, १३ फेब्रुवारी

देवसुद्धा रात्रंदिवस त्याच्याकडे मदतीची याचना करणाऱ्‍या त्याच्या निवडलेल्या लोकांना न्याय मिळवून देणार नाही का? तो त्यांच्याशी धीराने वागत असला, तरी तो नक्कीच त्यांचं ऐकेल. मी तुम्हाला सांगतो, तो लवकरात लवकर त्यांना न्याय मिळवून देईल.—लूक १८:७, ८.

लोक आपल्याशी कसं वागतात याचा यहोवाला नक्कीच फरक पडतो. कारण “यहोवा न्यायप्रिय आहे.” (स्तो. ३७:२८) येशूने अशी खातरी दिली, की योग्य वेळ येईल तेव्हा यहोवा ‘लवकरात लवकर न्याय मिळवून देईल.’ ज्या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात त्या गोष्टी यहोवा लवकरच काढून टाकेल आणि पुन्हा कधी आपल्याला अन्याय सहन करावा लागणार नाही. (स्तो. ७२:१, २) आपण अशा जगाची वाट पाहत आहोत जेव्हा न्यायनीती कायमची टिकून राहील. पण तोपर्यंत अन्याय सहन करण्यासाठी यहोवा आपल्याला मदत करतो. (२ पेत्र ३:१३) आपल्यासोबत अन्याय होतो तेव्हा कदाचित आपण अविचारीपणे वागू. पण हे टाळण्यासाठी यहोवा आपल्याला मदत करतो. त्यासाठी त्याने आपल्या मुलाचं, येशूचं एक खूप चांगलं उदाहरण आपल्यासमोर मांडलं. यासोबतच आपल्यावर अन्याय होतो तेव्हा त्याचा सामना कसा करायचा यासाठी त्याने बायबलमध्ये काही व्यावहारिक सल्लेही दिले आहेत. टेहळणी बुरूज२४.११ २ ¶३-४

शनिवार, १४ फेब्रुवारी

त्यांना काहीतरी खायला द्या.—मत्त. १४:१६.

येशूने प्रेषितांना म्हटलं: “तुम्हीच त्यांना काहीतरी खायला द्या.” पण हे अशक्य वाटत होतं. कारण तिथे जवळजवळ ५,००० पुरुष होते. आणि स्त्रियांना आणि मुलांना मोजलं तर तिथे जवळजवळ १५,००० लोकांना जेवू घालायचं होतं. (मत्त. १४:२१) मग अंद्रिया म्हणाला: “इथे एका लहान मुलाजवळ जवाच्या पाच भाकरी आणि दोन लहान मासे आहेत. पण इतक्या लोकांना हे अन्‍न कसं पुरणार?” (योहा. ६:९) त्या काळात लोक सहसा जवाची भाकरी खायचे. आणि कदाचित लहान माशांना मीठ लावून सुकवलं जायचं. पण त्या लहान मुलाकडे असलेलं एवढंसं अन्‍न एवढ्या लोकांना कसं पुरलं असतं? येशूला त्या लोकांचा पाहुणचार करायचा होता. म्हणून त्याने त्यांना सांगितलं, की त्यांनी लहान-लहान गट करून गवतावर बसावं. (मार्क ६:३९, ४०; योहा. ६:११-१३) मग येशूने त्या भाकरींसाठी आणि माशांसाठी यहोवाचे आभार मानले. हे योग्यच होतं, कारण ते अन्‍न यहोवानेच दिलं होतं. आपणसुद्धा जेवणाआधी प्रार्थना करून येशूसारखं वागू शकतो. मग प्रार्थना केल्यानंतर येशूने ते लोकांमध्ये वाटायला सांगितलं आणि ते खाऊन लोक तृप्त झाले. टेहळणी बुरूज२४.१२ ३-४ ¶३-४

रविवार, १५ फेब्रुवारी

तुमचा देव यहोवा याची स्तुती करा.—१ इति. २९:२०.

पृथ्वीवर असताना येशूने मान्य केलं की पित्याच्या मदतीनेच त्याला चमत्कार करणं शक्य होतं. असं करून त्याने आपल्या पित्याचा महिमा केला. (मार्क ५:१८-२०) तसंच, लोकांना आपल्या पित्याबद्दल सांगून आणि त्यांच्याशी चांगलं वागूनसुद्धा येशूने यहोवाचा महिमा केला. एकदा तो एका सभास्थानात शिकवत होता. तिथे १८ वर्षांपासून दुष्ट स्वर्गदूताने पछाडलेली एक स्त्रीसुद्धा होती. दुष्ट स्वर्गदूताच्या प्रभावामुळे ती कमरेपासून वाकली होती आणि तिला सरळ उभं राहणं शक्यच नव्हतं. खरंच त्या स्त्रीला किती त्रास होत असावा! येशूने जेव्हा तिला पाहिलं, तेव्हा त्याला तिची खूप दया आली. त्यामुळे तो तिच्याकडे गेला आणि तिला प्रेमाने म्हणाला: “बाई, तुझ्या आजारापासून तू मुक्‍त झालीस.” मग त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ उभी राहिली आणि “देवाची स्तुती करू लागली.” यहोवाने आपल्याला बरं केलंय यासाठी ती खूप कृतज्ञ होती. (लूक १३:१०-१३) यहोवाचा महिमा करण्यासाठी त्या स्त्रीकडे एक चांगलं कारण होतं आणि आपल्याकडेही आहे. टेहळणी बुरूज२५.०१ ३ ¶३-४

सोमवार, १६ फेब्रुवारी

आमच्या पापांची क्षमा कर.—लूक ११:४.

आदाम आणि हव्वाने जे गमावलं ते सगळं परत मिळवणं आपल्याला शक्य आहे का? हो. पण स्वतःच्या बळावर नाही. (स्तो. ४९:७-९) आपल्याला जर मदत मिळाली नसती, तर भविष्यात मिळणाऱ्‍या जीवनाची किंवा पुनरुत्थानाची आपल्याला आशा नसती. आणि आपला मृत्यू हा इतर प्राण्यांसारखाच कोणत्याही आशेविना झाला असता. (उप. ३:१९; २ पेत्र २:१२) आपल्या प्रेमळ पित्याने, यहोवाने आपल्याला आदामकडून वारशाने मिळालेल्या पापाचं कर्ज फेडण्यासाठी एक भेट दिली आहे. येशूने याबद्दल म्हटलं: “देवाने जगावर इतकं प्रेम केलं, की त्याने आपला एकुलता एक मुलगा दिला. कारण त्याची अशी इच्छा आहे, की जो कोणी त्याच्या मुलावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.” (योहा. ३:१६) शिवाय, या भेटीमुळे आपल्याला यहोवासोबत एक चांगलं नातं जोडायची संधीसुद्धा मिळते. या भेटीचा आणखी एक फायदा म्हणजे यामुळे आपली पापं किंवा “कर्जं” माफ होऊ शकतात. टेहळणी बुरूज२५.०२ ३ ¶३-६

मंगळवार, १७ फेब्रुवारी

[शौल] उठला आणि त्याने बाप्तिस्मा घेतला.—प्रे. कार्यं ९:१८.

शौलला बाप्तिस्मा घ्यायला कशामुळे मदत झाली? जेव्हा येशू स्वर्गातून शौलशी बोलला, तेव्हा लख्ख प्रकाश पडला आणि शौलची दृष्टी गेली. (प्रे. कार्यं ९:३-९) यानंतर त्याने तीन दिवस उपवास केला. आपल्यासोबत नुकतंच जे झालं त्यावर त्याने नक्कीच मनन केलं असेल. मग शौलला खातरी पटली की येशू हाच मसीहा आहे आणि त्याचे शिष्य खऱ्‍या अर्थाने देवाची इच्छा पूर्ण करतात. शौलकडून आपण काही महत्त्वाचे धडे शिकू शकतो. माणसांच्या भीतीमुळे किंवा गर्वामुळे तो बाप्तिस्मा घ्यायला नकार देऊ शकला असता. पण त्याने तसं केलं नाही. शौलला माहीत होतं, की ख्रिस्ती बनल्यावर त्याचा छळ केला जाईल. पण तरीसुद्धा तो येशूचा शिष्य बनायला तयार होता. (प्रे. कार्यं ९:१५, १६; २०:२२, २३) त्याच्या बाप्तिस्म्यानंतरही तो वेगवेगळ्या परीक्षांचा सामना करताना यहोवाच्या मदतीवर अवलंबून राहिला. (२ करिंथ. ४:७-१०) जेव्हा तुम्ही यहोवाचे साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा घ्याल, तेव्हा तुमच्या विश्‍वासाची परीक्षा होऊ शकते किंवा तुम्हाला इतर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पण तुम्ही एकटे नाही. तुम्ही या गोष्टीची खातरी बाळगू शकता की यहोवा देव आणि येशू ख्रिस्त नेहमी तुमच्यासोबत असतील.—फिलिप्पै. ४:१३. टेहळणी बुरूज२५.०३ ४ ¶८-९

बुधवार, १८ फेब्रुवारी

मी कोणतंही ध्येय नसल्यासारखं धावत नाही.—१ करिंथ. ९:२६.

बायबल वाचायचं ध्येय ठेवणं, ही एक चांगली गोष्ट आहे! पण जर आपल्याला बायबलच्या वाचनातून पुरेपूर फायदा मिळवायचा असेल, तर आणखी काहीतरी करणं गरजेचं आहे. एका उदाहरणाचा विचार करा. जमिनीवर पडणारं पावसाचं पाणी हे जीवनासाठी खूप आवश्‍यक आहे. पण जर कमी वेळात खूप जास्त पाऊस पडला तर ते पाणी वाहून जाईल आणि जमिनीला ते शोषून घेता येणार नाही. तसं झाल्यामुळे पावसाच्या पाण्याचा म्हणावा तसा फायदा होणार नाही. पावसाचं पाणी जमिनीत शोषलं जाऊन जर त्याचा वनस्पतीसाठी उपयोग व्हायचा असेल, तर त्यासाठी वेळ लागेल. त्याचप्रमाणे आपण जर घाईघाईत बायबल वाचलं तर आपण जे काही वाचतोय ते आपल्याला समजून घ्यायला आणि लक्षात ठेवायला जमणार नाही. (याको. १:२४) तुम्हाला कधी असं जाणवलंय का, की तुम्ही खूप भरभर बायबल वाचता? मग अशा वेळी काय केलं पाहिजे? ते सावकाश वाचायचा प्रयत्न करा. तुम्ही जे काही वाचताय किंवा वाचलंय त्यावर खोलवर विचार करायचा प्रयत्न करा. तसंच मनन करता यावं म्हणून तुम्ही तुमच्या बायबल अभ्यासाचा वेळही वाढवू शकता. टेहळणी बुरूज२४.०९ ४ ¶७-९

गुरुवार, १९ फेब्रुवारी

जे तुमचं नेतृत्व करत आहेत त्यांच्या आज्ञा पाळा.—इब्री १३:१७.

जेव्हा मंडळीतल्या वडिलांना एखादं मार्गदर्शन मिळतं तेव्हा त्यांनी ते काळजीपूर्वक वाचलं पाहिजे आणि ते लागू करायचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. त्यांना फक्‍त सभांमधले भाग कसे हाताळायचे आणि मंडळीत प्रार्थना कशी करायची याबद्दलच मार्गदर्शन मिळत नाही, तर ख्रिस्ताच्या मेंढरांची काळजी कशी घ्यायची याबद्दलसुद्धा मार्गदर्शन मिळतं. वडील जेव्हा संघटनेकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाचं पालन करतात तेव्हा भाऊबहिणींना यहोवाच्या प्रेमाची आणि त्याच्या काळजीची जाणीव होते. आपल्याला वडिलांकडून जेव्हा मार्गदर्शन मिळतं, तेव्हा आपण त्याचं मनापासून पालन केलं पाहिजे. त्यामुळे पुढाकार घेणाऱ्‍या बांधवांना त्यांचं काम करायला सोपं जातं. पुढाकार घेणाऱ्‍यांच्या “आज्ञा पाळा” आणि त्यांच्या “अधीन राहा” असं प्रोत्साहन बायबल आपल्याला देतं. (इब्री १३:७, १७) पण असं करणं नेहमीच सोपं नसतं. का? कारण पुढाकार घेणारे भाऊ अपरिपूर्ण आहेत. पण आपण त्यांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देण्याऐवजी जर त्यांच्या चुकांकडे लक्ष दिलं, तर आपण आपल्या शत्रूंना मदत करत असू. ती कशी? आपण जेव्हा आपल्या वडिलांच्या चुकांबद्दल विचार करत राहतो, तेव्हा आपण संघटनेबद्दलसुद्धा चुकीचा विचार करतो आणि त्यामुळे संघटनेवरचा आपला भरवसा आपण गमावू शकतो. टेहळणी बुरूज२४.०४ १० ¶११-१२

शुक्रवार, २० फेब्रुवारी

तो लोकांना एकमेकांपासून वेगळं करेल.—मत्त. २५:३२.

मोठ्या संकटादरम्यान ज्या लोकांचा मृत्यू होईल त्यांचा पुनरुत्थानाच्या आशेविना कायमचा नाश होईल का? बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं, की जे लोक यहोवा आणि त्याच्या सैन्याविरुद्ध असतील त्यांचा हर्मगिदोनमध्ये नाश केला जाईल आणि त्यांना पुनरुत्थानाची काहीच आशा नसेल. (२ थेस्सलनी. १:६-१०) पण मग इतर लोकांबद्दल काय? उदाहरणार्थ, मोठ्या संकटादरम्यान ज्यांचा नैसर्गिकपणे किंवा अपघातामुळे मृत्यू झालाय किंवा जे इतरांच्या हातून मारले गेलेत, त्यांच्याबद्दल काय? (उप. ९:११; जख. १४:१३) या लोकांचा “अनीतिमान” लोकांमध्ये सामावेश असेल का? आणि त्यांना नवीन जगात पुन्हा उठवलं जाईल का? (प्रे. कार्यं २४:१५) याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही. पण भविष्यात कोणकोणत्या गोष्टी घडतील याबद्दल आपल्याला बऱ्‍याच गोष्टी माहीत आहेत. उदाहरणार्थ, लोक ख्रिस्ताच्या भावांसोबत कसं वागतील या आधारावर त्यांचा हर्मगिदोनात न्याय केला जाईल. (मत्त. २५:४०) आणि ज्यांनी ख्रिस्ताच्या अभिषिक्‍तांना आणि ख्रिस्ताला पाठिंबा दिलाय त्यांचा मेंढरं म्हणून न्याय केला जाईल.—प्रकटी. १२:१७. टेहळणी बुरूज२४.०५ १०-११ ¶९-११

शनिवार, २१ फेब्रुवारी

यहोवा जिवंत देव आहे! खडकासारख्या माझ्या देवाची स्तुती होवो! तारण करणाऱ्‍या देवाचा सन्मान होवो!—स्तो. १८:४६.

बायबल सांगतं, की आपण खूप कठीण काळात जगत आहोत. (२ तीम. ३:१) यहोवाच्या लोकांना जगातल्या लोकांसारख्या समस्या तर आहेतच, पण त्यासोबतच त्यांना विरोधाचा आणि छळाचासुद्धा सामना करावा लागतो. मग समस्या असतानाही यहोवाची उपासना करत राहायला कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होते? एका महत्त्वाच्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होते. ती म्हणजे, तो “जिवंत देव” आहे हे आपण ओळखलंय. (यिर्म. १०:१०; २ तीम. १:१२) यहोवा एक खरीखुरी व्यक्‍ती आहे. तो आपल्याला परीक्षांमध्ये टिकून राहायला मदत करतो आणि नेहमी आपल्या पाठीशी असतो. (२ इति. १६:९; स्तो. २३:४) यहोवाकडे एक जिवंत देव म्हणून बघितल्यामुळे आपल्यासमोर येणाऱ्‍या कोणत्याही परीक्षेचा आपण यशस्वीपणे सामना करू शकतो. टेहळणी बुरूज२४.०६ २० ¶१-२

रविवार, २२ फेब्रुवारी

नीतिमान माणसाचा मार्ग पहाटेच्या प्रकाशासारखा असतो; दिवस पूर्ण उगवेपर्यंत वाढत जाणाऱ्‍या उजेडासारखा तो असतो.—नीति. ४:१८.

आपणसुद्धा यहोवाच्या संघटनेवरचा भरवसा टिकवून ठेवला पाहिजे. जेव्हा बायबलमधल्या एखाद्या सत्याच्या बाबतीत आपली समज सुधारण्याची गरज आहे किंवा संघटनेत राज्याचं काम ज्या पद्धतीने केलं जातं त्यात बदल करायची गरज आहे असं दिसून येतं, तेव्हा संघटनेत नेतृत्व करणारे बांधव तो बदल करायला लगेच तयार असतात कारण इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्यांना यहोवाला खूश करायचं असतं. तसंच ते जे काही निर्णय घेतात ते देवाच्या वचनाच्या आधारावर घ्यायचा पुरेपूर प्रयत्न करतात. कारण बायबलमध्ये वचनांचा असा नमुना आहे किंवा रूपरेषा आहे ज्याचं यहोवाच्या सगळ्या लोकांनी पालन केलं पाहिजे. “फायदेकारक वचनांच्या नमुन्याला धरून राहा” असा प्रेषित पौलने सल्ला दिला. (२ तीम. १:१३) बायबलमध्ये ज्या ख्रिस्ती शिकवणी आहेत त्यांना या ठिकाणी ‘फायदेकारक वचनांचा नमुना’ असं म्हटलंय. (योहा. १७:१७) या शिकवणी आपल्या विश्‍वासाचा आधार आहेत. यहोवाच्या संघटनेने आपल्याला या नमुन्याला धरून राहायला शिकवलंय. जोपर्यंत आपण असं करू, तोपर्यंत आपल्याला आशीर्वाद मिळत राहतील. टेहळणी बुरूज२४.०७ ११ ¶१२-१३

सोमवार, २३ फेब्रुवारी

यहोवा तुमच्या बाबतीत सहनशीलता दाखवतो. कारण कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सगळ्यांनी पश्‍चात्ताप करावा असं त्याला वाटतं.—२ पेत्र ३:९.

पश्‍चात्ताप केल्यामुळे आणि क्षमा मिळाल्यामुळे कसं वाटतं हे प्रेषित पेत्रला समजलं होतं. म्हणून या गोष्टी तो इतरांनाही शिकवू शकला. पेन्टेकॉस्टच्या सणाच्या काही काळानंतर, त्याने यहुद्यांपुढे एक भाषण दिलं. त्याने त्यांना समजावून सांगितलं, की त्यांनी मसीहाला ठार मारलं होतं. तरीसुद्धा त्याने प्रेमळपणे त्यांना असं सांगितलं: “पश्‍चात्ताप करा आणि मागे वळा, म्हणजे तुमची पापं पुसून टाकली जातील. आणि खुद्द यहोवाकडून तुम्हाला तजेला मिळेल.” (प्रे. कार्यं ३:१४, १५, १७, १९) अशा प्रकारे पेत्रने हे दाखवून दिलं की पश्‍चात्तापामुळे एक पापी व्यक्‍ती पुन्हा मागे वळते. म्हणजे, ती आपल्या विचार करण्याचा आणि वागण्या-बोलण्याचा वाईट मार्ग सोडून देते. आणि देवाला आवडेल अशा नवीन मार्गावर चालू लागते. प्रेषित पेत्रने हेसुद्धा दाखवलं, की यहोवा त्यांची पापं कायमची पुसून टाकेल किंवा नाहीशी करेल. ही खरंच किती सुंदर आशा आहे, नाही का? टेहळणी बुरूज२४.०८ १२-१३ ¶१४

मंगळवार, २४ फेब्रुवारी

आपली जीवनशैली पैशाच्या लोभापासून मुक्‍त ठेवा.—इब्री १३:५.

या दुष्ट जगाचा नाश लवकरच होणार आहे असा जर आपला मजबूत विश्‍वास असेल, तर आपण भौतिक गोष्टींच्या मागे लागणार नाही. बायबल सांगतं, की लोक “आपली चांदी रस्त्यावर फेकून देतील.” कारण त्यांच्या लक्षात येईल, की “यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी त्यांचं सोनं-चांदी त्यांना वाचवू शकणार नाही.” (यहे. ७:१९) जास्तीत जास्त पैसा गोळा करण्यावर लक्ष लावण्याऐवजी आपण असे निर्णय घेतले पाहिजेत ज्यामुळे आपल्याला साधंच पण संतुलित जीवन जगता येईल. तसंच आपण गरज नसताना कर्ज घेण्याच्या मोहात पडणार नाही किंवा बऱ्‍याच भौतिक गोष्टींची काळजी घेण्याच्या मागे आपला वेळ खर्च करणार नाही. शिवाय, आपण लक्ष देऊ की आपल्याकडे असलेल्या भौतिक गोष्टींना आपण आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देणार नाही. (मत्त. ६:१९, २४) कारण या जगाच्या व्यवस्थेच्या नाशाची वाट पाहत असताना भौतिक गोष्टींच्या आणि इतर गोष्टींच्या बाबतीत आपल्या विश्‍वासाची परीक्षा होऊ शकते. टेहळणी बुरूज२४.०९ ११ ¶१३-१४

बुधवार, २५ फेब्रुवारी

आपण उभे आहोत असं ज्याला वाटतं त्याने पडू नये म्हणून सांभाळावं.—१ करिंथ. १०:१२.

आपल्या अपरिपूर्णतेमुळे आपल्यात अशा काही प्रवृत्ती असतील, ज्यांच्यावर आपण पूर्णपणे मात केली असेल. पण अशाही काही प्रवृत्ती असतील ज्यांच्यावर मात करण्यासाठी आपल्याला खूप काळ झगडावं लागू शकतं. प्रेषित पेत्रचं उदाहरण घ्या. तो माणसाच्या भीतीला बळी पडला आणि त्याने तीन वेळा येशूला नाकारलं. (मत्त. २६:६९-७५) नंतर त्याने न्यायसभेसमोर धैर्याने साक्ष देऊन त्याच्या भीतीवर मात केली आहे असं वाटत होतं. (प्रे. कार्यं ५:२७-२९) पण त्याच्या काही वर्षांनंतर “सुंता झालेल्यांच्या भीतीमुळे” त्याने विदेशांबरोबर जेवायचं तात्पुरतं थांबवलं. (गलती. २:११, १२) पेत्रची भीती पूर्णपणे गेली नव्हती. कदाचित पेत्रला त्याच्या या भीतीवर कधीच पूर्णपणे मात करता आली नसेल. आपल्यावरसुद्धा अशी परिस्थिती येऊ शकते. आपण “जागे राहा” या येशूच्या सल्ल्याचं पालन करून मोहांचा प्रतिकार करू शकतो. (मत्त. २६:४१) आपण मोहात पडणार नाही असं जरी तुम्हाला वाटलं, तरी मोहात पाडणाऱ्‍या परिस्थिती टाळायचा प्रयत्न करत राहा. तसंच, ज्या गोष्टींमुळे तुम्हाला असं करायला यश मिळालंय, त्या गोष्टी करत राहा.—२ पेत्र ३:१४. टेहळणी बुरूज२४.०७ १८-१९ ¶१७-१९

गुरुवार, २६ फेब्रुवारी

त्याने माणसांच्या रूपात भेटी दिल्या.—इफिस. ४:८.

कोणताही माणूस येशू इतका उदार नाही. पृथ्वीवर असताना, त्याने इतरांना मदत करण्यासाठी आपल्या चमत्कारिक शक्‍तीचा उदारपणे उपयोग केला. (लूक ९:१२-१७) त्याने आपल्यासाठी स्वतःचं जीवन अर्पण करून सर्वात मोठी देणगी दिली. (योहा. १५:१३) पुनरुत्थान झाल्यापासून येशू अशाच प्रकारे उदारता दाखवत आला आहे. वचन दिल्याप्रमाणे त्याने आपल्या पित्याकडे प्रार्थना केली आणि शिष्यांवर पवित्र शक्‍ती ओतायला सांगितली. त्यामुळे त्यांना सत्य समजून घेता आलं आणि सांत्वन मिळालं. (योहा. १४:१६, १७, तळटीप; १६:१३) येशू आजही मंडळीच्या सभांद्वारे आपल्याला संपूर्ण जगभरात शिष्य बनवण्यासाठी तयार करतोय. (मत्त. २८:१८-२०) प्रेषित पौलने लिहिलं की येशू स्वर्गात गेल्यानंतर त्याने “माणसांच्या रूपात भेटी दिल्या.” (इफिस. ४:७, ८) पौलने स्पष्ट केलं की येशूने मंडळीला वेगवेगळ्या मार्गाने मदत करण्यासाठी या भेटी दिल्या. (इफिस. १:२२, २३; ४:११-१३) हे खरंय की हे भाऊ अपरिपूर्ण आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून चुका होतात. (याको. ३:२) पण आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला मदत करण्यासाठी त्यांचा वापर करतो. त्यामुळे ते त्याच्याकडून आपल्याला मिळालेल्या भेटीच आहेत. टेहळणी बुरूज२४.१० १८ ¶१-२

शुक्रवार, २७ फेब्रुवारी

समंजसपणा तुझं रक्षण करेल.—नीति. २:११.

दावीदने आपल्या मुलाला शलमोनला सांगितलं की जोपर्यंत तो देवाची आज्ञा पाळणार होता तोपर्यंत त्याला यश मिळणार होतं. पण दुःखाची गोष्ट म्हणजे त्याच्या आयुष्यात पुढे तो इतर देवी-देवतांकडे वळला. यहोवाला ही गोष्ट आवडली नाही आणि त्यामुळे शलमोनने नीतीने आणि न्यायाने शासन करण्यासाठी लागणारी बुद्धी गमावली. (१ राजे ११:९, १०; १२:४) यातून आपण काय शिकतो? आज्ञा पाळल्यामुळे यश मिळतं. (स्तो. १:१-३) यहोवाने आपल्याला शलमोनसारखी संपत्ती आणि वैभव द्यायचं वचन दिलेलं नाही. पण आपण जर यहोवाची आज्ञा पाळली तर तो आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी लागणारी बुद्धी नक्की देईल. (नीति. २:६, ७; याको. १:५) त्याची तत्त्वं आपल्याला नोकरी, शिक्षण, मनोरंजन आणि पैसा यांसारख्या गोष्टींच्या बाबतीत चांगले निर्णय घ्यायला मदत करू शकतात. यहोवाकडून मिळणाऱ्‍या बुद्धीप्रमाणे चालल्यामुळे आपलं कधीच कायमचं नुकसान होणार नाही. (नीति. २:१०, ११) त्यासोबतच इतरांसोबतची आपली मैत्री आणखी घट्ट होईल आणि कुटुंबात आनंदी राहण्यासाठी मार्गदर्शन मिळेल. टेहळणी बुरूज२४.११ १०-११ ¶११-१२

शनिवार, २८ फेब्रुवारी

सगळ्या गोष्टींची खातरी करा; जे चांगलं आहे त्याला धरून राहा.—१ थेस्सलनी. ५:२१.

बायबलबद्दल किंवा देवावरच्या विश्‍वासाबद्दल, तुमच्या मुलांशी बोलण्यासाठी तुमच्याकडे बऱ्‍याच संधी आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या संग्रहालयात जाता, तेव्हा तुमच्याकडे या संधी असतात. उदाहरणार्थ, एखाद्या संग्रहालयाला भेट देताना तुम्ही तुमच्या मुलांचं लक्ष अशा एखाद्या ऐतिहासिक वस्तूकडे किंवा घटनेकडे वळवू शकता, ज्याबद्दल बायबलमध्ये सांगितलंय. यामुळे तुमच्या मुलांना खातरी पटेल, की बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी खऱ्‍या आहेत. कदाचित तुम्ही तुमच्या मुलांना, “मवाबी दगडाबद्दल” शिकवू शकता. हा दगड ३,००० वर्षं जुना आहे. आणि त्यावर यहोवाचं नाव कोरलंय. तसंच, वॉरविकमधल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात “बायबल आणि देवाचं नाव” या संग्रहालयात या दगडाची हुबेहूब नक्कल असलेला एक दगड ठेवण्यात आलाय. मवाबचा राजा मेशा याने इस्राएलविरुद्ध बंड केलं होतं, असं या दगडावर कोरलंय. आणि बायबलमध्येही असंच सांगण्यात आलंय. (२ राजे ३:४, ५) जर तुम्हाला एखाद्या संग्रहालयात जाणं शक्य नसेल, तर मग तुम्ही तुमच्या मुलांसोबत या दगडासारख्या जुन्या गोष्टींचे फोटो इंटरनेटवर किंवा आपल्या प्रकाशनांमध्ये पाहू शकता. जेव्हा तुमची मुलं बायबलच्या अचूकतेचे पुरावे स्वतःच्या डोळ्यांनी पाहतील तेव्हा त्यांचा विश्‍वास आणखी मजबूत होईल. टेहळणी बुरूज२४.१२ १५ ¶४; १५-१६ ¶६

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा