जानेवारी
गुरुवार, १ जानेवारी
समजण्याच्या बाबतीत प्रौढांसारखं व्हा.—१ करिंथ. १४:२०.
बाळाचा जन्म हा आईवडिलांसाठी सर्वात आनंदाचा क्षण असतो. त्यांना त्यांच्या नवीन जन्मलेल्या बाळाचं खूप कौतुक असतं. पण त्यांच्या बाळाने नेहमी बाळच राहावं असं त्यांना वाटत नाही. उलट, जर त्यांच्या बाळाची वाढ होत नाही असं त्यांना समजलं तर त्यांना खूप चिंता वाटेल. त्याच प्रकारे येशूचे अनुयायी म्हणून आपण पहिली पावलं उचलतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो. पण आपण आध्यात्मिक रित्या बाळांसारखंच असावं असं त्याला वाटत नाही. (१ करिंथ. ३:१) उलट आपण देवाच्या गोष्टी समजण्याच्या बाबतीत “प्रौढांसारखं व्हावं” असं त्याला वाटतं. बायबलमधल्या ज्या ग्रीक शब्दाचं भाषांतर “प्रौढ” असं करण्यात आलंय, त्याचा अर्थ “पूर्ण वाढ झालेला” आणि “पूर्ण” असा होतो. (१ करिंथ. २:६) त्यामुळे असं म्हणता येईल की जसं एक लहान मूल वाढत जातं आणि एक प्रौढ व्यक्ती बनतं, त्याच प्रकारे आपणही यहोवासोबतच्या आपल्या नात्यात वाढत गेलं पाहिजे. म्हणजे त्याच्यासोबतचं आपलं नातं मजबूत केलं पाहिजे आणि पुढे जाऊन आपण एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्ती बनलं पाहिजे. तसंच, हे ध्येय गाठल्यावर आपण प्रगती करायचं थांबवलं नाही पाहिजे.—१ तीम. ४:१५. टेहळणी बुरूज२४.०४ २ ¶१, ३
शुक्रवार, २ जानेवारी
माझा तंबू त्यांच्यामध्ये असेल. मी त्यांचा देव होईन.—यहे. ३७:२७.
यहोवा तुमच्यासाठी कोण आहे? तुम्ही कदाचित म्हणाल, ‘यहोवा माझा पिता आहे, तो मला माझ्या मित्रासारखा आहे, तो माझा देव आहे.’ कदाचित आणखी काही शब्दांनी तुम्ही यहोवासोबतच्या तुमच्या नात्याचं वर्णन कराल. यहोवाने त्याच्या तंबूत तुम्हाला पाहुणे म्हणून बोलवलंय, या दृष्टीने तुम्ही त्याच्याकडे कधी पाहिलंय का? दावीद राजाने आपली तुलना यहोवाच्या पाहुण्यांसोबत आणि यहोवाची तुलना आपल्याला आमंत्रण देणाऱ्यासोबत केली आहे. त्याने म्हटलं: “हे यहोवा, तुझ्या तंबूत राहण्यासाठी तू कोणाचं स्वागत करशील? तुझ्या पवित्र पर्वतावर कोण राहू शकतं?” (स्तो. १५:१) या शब्दांवरून कळतं की आपण यहोवाचे पाहुणे बनू शकतो, म्हणजेच आपण त्याचे मित्र बनू शकतो. सर्वकाही निर्माण करण्याआधी यहोवा एकटाच होता. पण नंतर त्याने त्याच्या पहिल्या मुलाला निर्माण केलं. त्याने एक प्रकारे त्याच्या लाक्षणिक तंबूत आनंदाने त्याच्या पहिल्या पाहुण्याचं स्वागत केलं. बायबल म्हणतं की यहोवाला त्याचा मुलगा “खूप प्रिय वाटू” लागला. आणि त्याचा पहिला पाहुणाही नेहमी “त्याच्यासमोर आनंदी” असायचा.—नीति. ८:३०. टेहळणी बुरूज२४.०६ २-३ ¶१-३
शनिवार, ३ जानेवारी
[सादोक] तरुण असून शूर आणि धाडसी होता.—१ इति. १२:२८.
कल्पना करा: दावीदला संपूर्ण इस्राएलवर राजा बनवण्यासाठी ३,४०,००० पेक्षा जास्त माणसं हेब्रोनजवळ जमली आहेत. ती माणसं तीन दिवसांपासून तिथल्या डोंगराळ भागात राहत आहेत. ते बोलत आहेत आणि यहोवाच्या स्तुतीत गाणी गात आहेत. (१ इति. १२:३९) त्या जमावात सादोक नावाचा एक तरुण माणूससुद्धा आहे. एवढ्या लोकांमध्ये कदाचित कोणाचंच त्याच्याकडे लक्ष गेलं नसावं. पण यहोवाचं त्याच्याकडे लक्ष होतं आणि त्याची इच्छा आहे की आपणही सादोकबद्दल जाणून घ्यावं आणि त्याच्याकडून शिकावं. (१ इति. १२:२२, २६-२८) सादोक एक याजक होता आणि त्याने महायाजक अब्याथारसोबत काम केलं होतं. तो एक द्रष्टा होता. म्हणजे देवाने त्याला त्याची इच्छा जाणून घ्यायची क्षमता आणि बुद्धीही दिली होती. (२ शमु. १५:२७) तो एक धाडसी माणूस होता. या शेवटच्या दिवसांत, सैतान देवाच्या लोकांवर आणखी जास्त हल्ले करत आहे. (१ पेत्र ५:८) यहोवा जोपर्यंत सैतानाचा आणि या दुष्ट व्यवस्थेचा नाश करत नाही, तोपर्यंत आपल्याला वाट पाहत धाडस दाखवायची गरज आहे. (स्तो. ३१:२४) असं करून आपण सादोकच्या धाडसाचं अनुकरण करू शकतो. टेहळणी बुरूज२४.०७ २ ¶१-३
रविवार, ४ जानेवारी
आदाम ९३० वर्षं जगला; मग त्याचा मृत्यू झाला.—उत्प. ५:५.
यहोवाने पहिल्या मानवी जोडप्याला बनवलं तेव्हा त्याची इच्छा होती की त्यांनी आनंदी राहावं. म्हणूनच त्याने त्यांना एक सुंदर घर दिलं, विवाहाची व्यवस्था केली आणि एक खूप चांगलं काम दिलं. त्यांना एदेन बागेप्रमाणे या पृथ्वीलासुद्धा एक नंदनवन बनवायचं होतं. तसंच, आपल्या मुलाबाळांनी ही पृथ्वी भरून टाकायची होती. पण यहोवाने त्यांना फक्त एक साधीसोपी आज्ञा दिली होती. त्याने त्यांना समजावलं होतं, की त्यांनी ही आज्ञा मोडली तर ते त्याच्याविरुद्ध जाणूनबुजून बंड केल्यासारखं होईल. आणि त्यांच्या या पापामुळे त्यांचा मृत्यू होईल. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, की पुढे काय घडलं. एका दुष्ट स्वर्गदूताने त्यांना भुलवलं आणि पाप करायला प्रवृत्त केलं. त्याचं देवावर आणि माणसांवर प्रेम नव्हतं. आदाम आणि हव्वा त्याच्या वाईट प्रभावाखाली आले. त्यांनी आपल्या प्रेमळ पित्यावर भरवसा ठेवला नाही आणि ते पाप करून बसले. पुढे यहोवाने म्हटल्याप्रमाणेच झालं. त्या दिवसापासून त्यांना आपल्या पापाचे परिणाम भोगावे लागले. ते म्हातारे होऊ लागले आणि शेवटी त्यांचा मृत्यू झाला.—उत्प. १:२८, २९; २:८, ९, १६-१८; ३:१-६, १७-१९, २४. टेहळणी बुरूज२४.०८ ३ ¶३
सोमवार, ५ जानेवारी
फक्त वचन ऐकणारेच बनू नका, तर त्याप्रमाणे चालणारेही बना.—याको. १:२२.
आपण आनंदी असावं अशी यहोवाची आणि त्याच्या प्रिय मुलाची इच्छा आहे. स्तोत्र ११९:२ मध्ये म्हटलंय: “जे त्याच्या स्मरण-सूचना पाळतात; जे पूर्ण मनाने त्याचा शोध घेतात, ते सुखी आहेत!” शिवाय, येशूनेसुद्धा म्हटलं: “जे देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे वागतात तेच सुखी!” (लूक ११:२८) जे यहोवाची उपासना करतात ते आनंदी असतात. कारण ते देवाचं वचन दररोज वाचतात आणि त्यातून जे काही शिकायला मिळालं ते लागू करायचा प्रयत्न करतात. (याको. १:२२-२५) यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी हे महत्त्वाचंय. (उप. १२:१३) तसंच देवाचं हे प्रेरित वचन जीवनात लागू केल्यामुळे, आपलं कौटुंबिक जीवन सुधारतं आणि भाऊबहिणींसोबतचं आपलं नातंही आणखी मजबूत होतं. यासोबतच, आपण यहोवाच्या मार्गांचं पालन न केल्यामुळे येणाऱ्या बऱ्याच समस्याही टाळू शकतो. दावीद राजाने जे म्हटलं, तसं आपल्यालाही वाटतं. त्याने आपल्या गीतात यहोवाच्या नियमांचा, त्याच्या आदेशांचा आणि त्याच्या निर्णयांचा उल्लेख केल्यानंतर असं म्हटलं: “त्यांचं पालन केल्यामुळे मोठं प्रतिफळ मिळतं.”—स्तो. १९:७-११. टेहळणी बुरूज२४.०९ २ ¶१-३
मंगळवार, ६ जानेवारी
तो दुःखी मनाच्या लोकांना बरं करतो; तो त्यांच्या जखमांवर पट्टी बांधतो.—स्तो. १४७:३.
पृथ्वीवर असलेल्या आपल्या सेवकांसोबत कायकाय होतंय हे यहोवाला चांगलं माहीत आहे. ते कधी दुःखात असतात आणि कधी आनंदात असतात हे त्याला समजतं. (स्तो. ३७:१८) कठीण परिस्थितीचा सामना करूनही आपण जेव्हा त्याला सगळ्यात चांगलं ते देतो आणि त्याची सेवा करतो, तेव्हा त्याला किती आनंद होत असेल! तो नेहमी आपल्याला मदत करायला आणि सांत्वन करायला तयार असतो. स्तोत्र १४७:३ मध्ये सांगितलंय की यहोवा दुःखी मनाच्या लोकांच्या ‘जखमांवर पट्टी बांधतो.’ या वचनात यहोवा निराश असणाऱ्या लोकांची कशी प्रेमाने काळजी घेतो याबद्दल सांगितलंय. यहोवा ज्या पद्धतीने आपली काळजी घेतो त्याचा जर आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल, तर आपण काय केलं पाहिजे? एका उदाहरणाकडे लक्ष द्या. एक कुशल डॉक्टर एका जखमी झालेल्या व्यक्तीला बरं करण्यासाठी बऱ्याच गोष्टी करू शकतो. पण त्याचा फायदा होण्यासाठी त्या जखमी व्यक्तीला डॉक्टरच्या प्रत्येक सूचनेचं काळजीपूर्वक पालन करणं गरजेचं आहे. यहोवा मनाने खचलेल्या लोकांशी त्याच्या वचनाद्वारे बोलतो आणि त्यांना प्रेमळ सल्ला देतो. टेहळणी बुरूज२४.१० ६ ¶१-२
बुधवार, ७ जानेवारी
ते सर्व पृथ्वीवरून नाहीसे झाले.—उत्प. ७:२३.
आधी आपल्या प्रकाशनांमध्ये यहोवा ज्यांना अनीतिमान समजतो त्यांचं काय होईल याबद्दल चर्चा करण्यात आली होती. अशा अनीतिमान लोकांबद्दल, आपण म्हटलं होतं, की त्यांना पुनरुत्थानाची आशा नाही. बायबलमध्ये असे बरेचसे अहवाल आहेत ज्यांमध्ये यहोवाने अनीतिमान लोकांचा न्याय केला. उदाहरणार्थ, जलप्रलयात असंख्य लोक मारले गेले. तसंच, वचन दिलेल्या देशात राहत असलेल्या सात राष्ट्रांमधल्या लोकांचा नाश करायला यहोवाने इस्राएली लोकांना सांगितलं. तसंच, त्याने एका स्वर्गदूताचा वापर करून एका रात्रीत १,८५,००० अश्शूरी सैनिक मारले. (अनु. ७:१-३; यश. ३७:३६, ३७) या सगळ्या घटनांमध्ये यहोवाने अनीतिमान लोकांचा कायमचा नाश केला आणि त्यांना आता पुनरुत्थानाची काहीच आशा नाही, असं आपल्याला म्हणता येईल का? असं म्हणायला बायबलमध्ये पुरेशी माहिती आहे का? नाही. बायबलमध्ये याबद्दल पुरेशी माहिती सांगितलेली नाही. ज्यांचा नाश केला होता त्यांच्यापैकी प्रत्येक व्यक्तीचा यहोवाने कसा न्याय केला असेल हे आपल्याला माहीत नाही. आपल्याला हेही माहीत नाही की ज्यांचा नाश करण्यात आला त्यांना यहोवाबद्दल शिकून पश्चात्ताप करायची संधी मिळाली होती की नाही. टेहळणी बुरूज२४.०५ ३ ¶५-७
गुरुवार, ८ जानेवारी
बऱ्याने वाइटाला जिंकत राहा.—रोम. १२:२१.
येशूने आपल्या शिष्यांना एका विधवेचं उदाहरण दिलं. न्याय मिळण्यासाठी ती एका न्यायाधीशाला सारखी विनंती करत होती. तिचं दुःख शिष्यांना नक्कीच कळलं असेल कारण त्या काळात सहसा सामान्य लोकांवर अन्याय व्हायचा. (लूक १८:१-५) आपणही तिचं दुःख समजू शकतो कारण आपल्यासोबतही कधी न कधी अन्याय झालाच असेल. आज जगात एखाद्याबद्दल आधीच मत बनवणं, भेदभाव करणं, एखाद्यावर जुलूम करणं हे खूप सर्वसामान्य झालंय. म्हणून जेव्हा कोणी आपल्याशी असं वागतं तेव्हा आपल्याला त्याचं आश्चर्य वाटत नाही. (उप. ५:८) पण जर एखादा भाऊ किंवा बहीण आपल्याशी वाईट वागते तर याचं आपल्याला खूप दुःख होऊ शकतं. पण आपले भाऊबहीण काही आपले विरोधक नाहीत. ते फक्त अपरिपूर्ण आहेत. येशू पृथ्वीवर होता तेव्हा दुष्ट लोक त्याच्याशी खूप वाईट वागले. पण तो त्यांच्याशी कसा वागला यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळू शकतं. आपल्यावर अन्याय करणाऱ्या विरोधकांशी जर आपण सहनशीलतेने वागतो, तर आपल्या भाऊबहिणींशी आपण किती जास्त सहनशीलतेने वागलं पाहिजे? टेहळणी बुरूज२४.११ २ ¶१-२
शुक्रवार, ९ जानेवारी
या लोकांना खायला देण्यासाठी आपण भाकरी कुठून विकत घ्यायच्या?—योहा. ६:५.
बायबलच्या काळात बऱ्याच जणांसाठी भाकर हा मुख्य आहार होता. (उत्प. १४:१८; लूक ४:४) खरंतर, त्या काळात जेवणात भाकर इतकी सर्रासपणे वापरली जायची की जेवणाचा उल्लेख करायला, बायबलमध्ये कधीकधी “भाकर” हा शब्द वापरण्यात आलाय. (मत्त. ६:११; प्रे. कार्यं २०:७) येशूनेसुद्धा त्याच्या दोन मोठ्या चमत्कारांमध्ये भाकरीचा वापर केला. (मत्त. १६:९, १०) यातल्या एका चमत्काराबद्दल आपल्याला योहानच्या सहाव्या अध्यायात वाचायला मिळतं. एकदा येशूचे शिष्य प्रचार करून खूप थकले होते. त्यांना आरामाची गरज होती. म्हणून येशू त्यांना नावेतून गालीलच्या समुद्रापलीकडे घेऊन गेला. (मार्क ६:७, ३०-३२; लूक ९:१०) पलीकडे आल्यावर ते बेथसैदा इथल्या एका एकांत ठिकाणी आले. पण लवकरच तिथे हजारो लोक जमले. येशू दमला होता, पण तरी त्याने त्या लोकांकडे दुर्लक्ष केलं नाही. त्याने त्यांना देवाच्या राज्याबद्दल शिकवलं आणि त्यांचे आजार बरे केले. पण संध्याकाळ होत असल्यामुळे, शिष्यांना प्रश्न पडला की इतक्या लोकांना खायला कुठून मिळणार? कदाचित काही जणांकडे खाण्या-पिण्याच्या थोड्या गोष्टी असतील. पण बहुतेकांना जवळच्या गावांमध्ये जाऊन जेवण विकत घ्यावं लागणार होतं.—मत्त. १४:१५. टेहळणी बुरूज२४.१२ २-३ ¶१-२
शनिवार, १० जानेवारी
देवाचं दान, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्याद्वारे सर्वकाळाचं जीवन हे आहे.—रोम. ६:२३.
आपले सर्वात पहिले पालक आदाम आणि हव्वा परिपूर्ण होते आणि ते एका सुंदर नंदनवनात राहत होते. (उत्प. १:२७; २:७-९) त्यांना एका सुंदर आणि कायमच्या जीवनाचा आनंद घ्यायची आशा होती. पण नंतर सर्वकाही बदललं. त्यांनी त्यांचं नंदनवनासारखं घर तर गमावलंच पण त्यासोबतच कायमच्या जीवनाची आशासुद्धा गमावली. पण मग आता ते त्यांच्या मुलांना कोणता वारसा देणार होते? बायबल म्हणतं: “एका माणसाद्वारे [आदामद्वारे] पाप जगात आलं आणि पापाद्वारे मरण आलं आणि अशा रितीने सर्व माणसांमध्ये मरण पसरलं.” (रोम. ५:१२) आदामने आपल्याला वारशाने पाप दिलं आहे आणि त्याचा परिणाम मृत्यू आहे. हे वारशाने मिळालेलं पाप एका मोठ्या कर्जासारखं आहे आणि आपल्यापैकी कोणीही ते कधीच फेडू शकत नाही. (स्तो. ४९:८) येशूने पापाची तुलना ‘कर्जासोबत’ केली आहे. (मत्त. ६:१२; लूक ११:४) आपण पाप करतो तेव्हा आपण यहोवाचे कर्जदार बनतो आणि या पापाची भरपाई आपल्याला करावी लागते. हे कर्ज जर आपण फेडलं नाही, तर आपण मेल्यावरच ते रद्द केलं जातं.—रोम. ६:७. टेहळणी बुरूज२५.०२ २-३ ¶२-३
रविवार, ११ जानेवारी
मी त्यांना तुझं नाव प्रकट केलंय.—योहा. १७:२६.
इतरांना देवाच्या राज्याचा संदेश सांगणं हा आपल्यासाठी एक बहुमानच आहे. आणि हा बहुमान सगळ्यांनाच मिळालेला नाही. उदाहरणार्थ, येशू जेव्हा पृथ्वीवर होता, तेव्हा त्याने दुष्ट स्वर्गदूतांना त्याच्याबद्दल साक्ष देऊ दिली नाही. (लूक ४:४१) आज जेव्हा एखाद्या व्यक्तीला यहोवाच्या लोकांसोबत प्रचार करायचा असतो, तेव्हा तिला आधी यहोवाला आवडेल अशा पद्धतीने जीवन जगावं लागतं. आपण केव्हाही आणि कुठेही प्रचार करून आपल्याला या बहुमानाची किती कदर आहे हे दाखवत असतो. येशूप्रमाणेच लोकांच्या मनात राज्याच्या सत्याचं बी पेरणं आणि त्याला पाणी घालणं हा आपला उद्देश आहे. (मत्त. १३:३, २३; १ करिंथ. ३:६) येशूप्रमाणेच आज यहोवाची संघटना लोकांना देवाचं नाव कळावं म्हणून जे काही शक्य आहे ते करायचा प्रयत्न करते. पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर हे याचंच एक उदाहरण आहे. मूळ भाषेत ज्या-ज्या ठिकाणी देवाचं नाव होतं, त्या-त्या ठिकाणी ते या भाषांतरात टाकण्यात आलंय. या भाषांतराचा काही भाग किंवा संपूर्ण बायबल २७० पेक्षा जास्त भाषांमध्ये आज उपलब्ध आहे. टेहळणी बुरूज२४.०४ ९ ¶८-९
सोमवार, १२ जानेवारी
तिचा नवरा उठून तिची प्रशंसा करतो.—नीति. ३१:२८.
काही भावांनी त्यांचं त्यांच्या पत्नीवर किती प्रेम आहे, हे दाखवायला दररोज तिच्यासाठी काही न काही करायची स्वतःला सवय लावून घेतली आहे. त्यामुळे ते त्यांच्या संसारात आनंदी आहेत. (१ योहा. ३:१८) एक पती छोट्या-छोट्या गोष्टी करून आपल्या पत्नीवर प्रेम असल्याचं दाखवू शकतो. जसं की, तो प्रेमाने तिचा हात हातात घेऊ शकतो किंवा तिला मिठीत घेऊ शकतो. तसंच, तो तिला मेसेज करून सांगू शकतो, की “जेवलीस का?” किंवा, “कशी आहेस? तुझा दिवस कसा चाललाय?” तसंच, आपलं प्रेम व्यक्त करायला तो तिला एखादं कार्ड लिहून देऊ शकतो. किंवा तिला गजरा किंवा फुलं आणून देऊ शकतो. जेव्हा एक पती या गोष्टी करतो तेव्हा तो त्याच्या पत्नीचा आदर करतो आणि त्यांचा विवाहसुद्धा मजबूत होतो. जेव्हा एक पती आपल्या पत्नीला मान देतो तेव्हा तो तिला हे सांगत असतो, की ती त्याच्या नजरेत खूप अनमोल आहे. आणि त्यामुळे तिला बरं वाटतं. असं करण्याचा एक मार्ग म्हणजे, पत्नी आपल्या पतीला साथ देण्यासाठी जे काही करते त्याबद्दल न विसरता तिची प्रशंसा करणं. (कलस्सै. ३:१५) जेव्हा एक पती आपल्या पत्नीची मनापासून प्रशंसा करतो तेव्हा तिला खूप बरं वाटतं. त्यामुळे तिला सुरक्षित वाटतं, त्याच्या प्रेमाची जाणीव होते आणि आदर दिल्यासारखं वाटतं. टेहळणी बुरूज२५.०१ ११ ¶१५; १३ ¶१६
मंगळवार, १३ जानेवारी
मी यहोवा तुझा देव आहे. ज्या मार्गाने तू चाललं पाहिजेस, त्यावरून मी तुला नेतो.—यश. ४८:१७.
१५ व्या स्तोत्राचा शेवट या शब्दांनी होतो: “जो कोणी या गोष्टी करतो, तो कधीच डळमळणार नाही.” इथे स्तोत्रकर्ता देवाच्या आपल्याबद्दल ज्या अपेक्षा आहेत त्याबद्दलचा मुख्य उद्देश स्पष्ट करतो. आणि तो म्हणजे आपण नेहमी आनंदी असावं. म्हणूनच तो आपल्याला असं मार्गदर्शन देतो ज्यामुळे आपल्याला आशीर्वाद आणि संरक्षण मिळेल. यहोवाने ज्यांना त्याच्या तंबूत पाहुणे म्हणून बोलवलंय त्यांच्यापुढे एक उज्ज्वल भविष्य आहे. यहोवाच्या विश्वासू अभिषिक्त जणांना येशूने स्वर्गात तयार केलेल्या ‘जागा’ मिळतील. (योहा. १४:२) तर पृथ्वीवर जगण्याची आशा असलेले प्रकटीकरण २१:३ मध्ये दिलेलं अभिवचन पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत. खरंच यहोवाने आपल्याला त्याचे कायमचे पाहुणे होण्यासाठी जे आमंत्रण दिलंय ती आपल्यासाठी एक बहुमानाची गोष्ट आहे!—स्तो. १५:१-५. टेहळणी बुरूज२४.०६ १३ ¶१९-२०
बुधवार, १४ जानेवारी
यहोवाच्या गौरवशाली नावाचा महिमा करा.—स्तो. ९६:८.
महिमा म्हणजे काय? बायबलमध्ये “महिमा” हा शब्द अशा कोणत्याही गोष्टीला सूचित करतो, ज्यामुळे एक व्यक्ती प्रभावशाली वाटू शकते. यहोवाने जेव्हा इस्राएल राष्ट्राला इजिप्तच्या गुलामीतून सोडवलं त्या वेळेचा विचार करा. याच्या थोड्याच काळानंतर, यहोवाने तो किती शक्तिशाली आहे हे दाखवून दिलं. कल्पना करा: लाखो इस्राएली लोक सीनाय पर्वताच्या पायथ्याशी त्यांच्या देवाचं ऐकायला एकत्र आले आहेत. मग एक दाट ढग पर्वताला घेरतो आणि अचानक एक मोठा भूकंप होतो. त्यामुळे त्यांच्या पायांखालची जमीन हादरते, विजा चमकतात, ढगांचा गडगडाट होतो आणि शिंगाचा खूप मोठा आवाज ऐकू येतो. (निर्ग. १९:१६-१८; २४:१७; स्तो. ६८:८) विचार करा, यहोवा किती शक्तिशाली आहे हे जेव्हा त्याने दाखवून दिलं, तेव्हा इस्राएली लोक किती भारावून गेले असतील! आज आपण त्याच्या सुंदर गुणांबद्दल आणि त्याने केलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल इतरांना सांगून त्याचा महिमा करतो. तसंच, आपण जेव्हा त्याच्या मदतीने केलेल्या कामांचं श्रेय त्याला देतो तेव्हासुद्धा आपण त्याचा महिमा करत असतो.—यश. २६:१२. टेहळणी बुरूज२५.०१ २-३ ¶२-३
गुरुवार, १५ जानेवारी
यहोवाने मला पाठवलंय.—गण. १६:२८.
वचन दिलेल्या देशात इस्राएली लोक जात असताना एकदा असं झालं, की इस्राएलमधल्या काही नावाजलेल्या लोकांनी मोशेला आणि देवाने त्याला जी जबाबदारी सोपवली होती, त्याला आव्हान दिलं. ते म्हणाले: “[फक्त मोशेच नाही तर] इस्राएलचे सगळेच लोक पवित्र आहेत आणि यहोवा त्यांच्यामध्ये राहतो.” (गण. १६:१-३) हे खरं आहे, की देवाच्या नजरेत “इस्राएलचे सगळेच लोक” पवित्र होते. पण यहोवाने मोशेला त्यांच्या लोकांमध्ये नेतृत्व करण्यासाठी निवडलं होतं. मोशेची टीका करून हे बंडखोर लोक खरंतर यहोवाचीच टीका करत होते. त्यांनी यहोवाला काय हवंय, यापेक्षा स्वतःला काय हवंय याकडे लक्ष दिलं. कारण त्यांना अधिकार आणि प्रतिष्ठा हवी होती. देवाने या बंडखोर लोकांना आणि त्यांना साथ देणाऱ्या हजारो लोकांना मारून टाकलं. (गण. १६:३०-३५, ४१, ४९) आजसुद्धा आपण अशी खातरी बाळगू शकतो, की यहोवाच्या संघटनेत असलेल्या व्यवस्थेचा जे लोक अनादर करतात, त्यांना देवाची स्वीकृती मिळत नाही. टेहळणी बुरूज२४.०७ १०-११ ¶११
शुक्रवार, १६ जानेवारी
हा दृष्टान्त अजूनही आपल्या नेमलेल्या वेळेची वाट पाहत आहे.—हब. २:३.
आपण आज अशा काळात जगत आहोत, जिथे बरेच लोक जगाच्या नाशाबद्दल असलेला बायबलचा इशारा नाकारतात; इतकंच नाही तर त्याची थट्टा करतात. (२ पेत्र ३:३, ४) बऱ्याच गोष्टी आपल्याला अजूनही माहीत नसल्या तरी आपल्याला असा मजबूत विश्वास असणं गरजेचं आहे, की जगाच्या व्यवस्थेचा अंत योग्य वेळी येईल आणि त्या वेळी यहोवा आपली काळजी घेईल. यहोवा आज ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाचा’ वापर करून आपलं मार्गदर्शन करतोय. म्हणून इब्री ख्रिश्चनांप्रमाणे आपल्यालाही त्याच्यावर आपला भरवसा मजबूत करण्याची गरज आहे. (मत्त. २४:४५) आपल्याला मोठं संकट सुरू होईल, तेव्हा कदाचित जीवन वाचवणाऱ्या काही विशिष्ट सूचना मिळतील. म्हणून यहोवाच्या संघटनेत पुढाकार घेणाऱ्या बांधवांकडून आपल्याला जे मार्गदर्शन मिळतंय, त्यावर भरवसा ठेवायची आणि आपला विश्वास वाढवायची हीच वेळ आहे. आपण आत्ता जर पुढाकार घेणाऱ्यांच्या आज्ञेत राहिलो नाही, तर मोठ्या संकटाच्या वेळी त्यांनी दिलेलं मार्गदर्शन आपल्याला आत्मविश्वासाने पाळता येईल अशी अपेक्षा आपण करू शकणार नाही. टेहळणी बुरूज२४.०९ ११ ¶११-१२
शनिवार, १७ जानेवारी
देवाची चांगली, स्वीकारयोग्य आणि परिपूर्ण इच्छा काय आहे याची तुम्हाला खातरी पटेल.—रोम. १२:२.
आईवडिलांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, तुमचा देवावर विश्वास आहे म्हणून तुमच्या मुलांचाही असेलच असं नाही. त्यामुळे तुमच्या मुलांच्या मनात कदाचित प्रश्न येतील. जसं की: ‘देव खरंच आहे का? बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी खऱ्या आहेत का?’ खरंतर, बायबलमध्येसुद्धा आपल्याला आपल्या ‘तर्कबुद्धीचा’ वापर करायचं आणि ‘सगळ्या गोष्टींची खातरी करायचं’ प्रोत्साहन देण्यात आलंय. (रोम. १२:१, तळटीप; १ थेस्सलनी. ५:२१) पण तुम्ही तुमच्या मुलांना त्यांचा विश्वास मजबूत करायला कशी मदत करू शकता? तुमच्या मुलांना स्वतःला सत्य पटवून द्यायचं प्रोत्साहन द्या. जेव्हा तुमची मुलं प्रश्न विचारतात, तेव्हा संशोधन करून त्याचं उत्तर कसं शोधायचं हे त्यांना दाखवा. यासाठी तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांचं संशोधन मार्गदर्शक (रिसर्च गाईड) आणि वॉच टॉवर पब्लिकेशन इंडेक्स यांसारख्या संशोधनाच्या साधनांचा वापर करू शकता. मुलं संशोधन मार्गदर्शकामध्ये “बायबल” या शीर्षकाखाली “देवप्रेरित” हे उपशीर्षक पाहू शकतात आणि बायबल हे माणसांनी लिहिलेलं फक्त एक चांगलं पुस्तक नसून, “देवाचं वचन” आहे या गोष्टीबद्दलचे पुरावे शोधू शकतात.—१ थेस्सलनी. २:१३. टेहळणी बुरूज२४.१२ १५ ¶४-५
रविवार, १८ जानेवारी
त्या गोष्टी विश्वासू पुरुषांच्या स्वाधीन कर; म्हणजे, इतरांना शिकवण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेशी पात्रता असेल.—२ तीम. २:२.
मंडळीतले वडील येशूचं अनुकरण कसं करू शकतात? त्यांनी भावांना, अगदी तरुण भावांनासुद्धा मंडळीतल्या मोठ्या जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. या भावांकडून कोणतीच चूक होऊ नये अशी अपेक्षा वडील त्यांच्याकडून करत नाहीत. तसंच मंडळीतले वडील त्यांना प्रेमळपणे प्रशिक्षणही देतात. यामुळे त्यांना नम्र, भरवशालायक राहायला आणि इतरांची सेवा करण्यासाठी पुढे यायला मदत होते. (१ तीम. ३:१; १ पेत्र ५:५) येशूने त्याच्या शिष्यांना फक्त प्रचाराचीच नाही तर शिकवण्याचीही जबाबदारी सोपवली. आपण या जबाबदारीसाठी पात्र नाही असं शिष्यांना कदाचित वाटलं असेल. पण शिष्य ही जबाबदारी पार पाडू शकतात याबद्दल येशूला अजिबात शंका नव्हती आणि त्याने त्यांना तसं सांगितलंही. त्यांच्यावरचा भरवसा व्यक्त करताना येशूने म्हटलं: “जसं पित्याने मला पाठवलंय, तसं मीही तुम्हाला पाठवतोय.”—योहा. २०:२१. टेहळणी बुरूज२४.१० १६ ¶१५; १६-१७ ¶१७
सोमवार, १९ जानेवारी
दावीद हा मला माझ्या मनासारखा माणूस सापडलाय.—प्रे. कार्यं १३:२२.
दावीद एक महान राजा होता. तो संगीतकार, कवी, योद्धा आणि संदेष्टाही होता. त्याने अनेक संकटांचा सामना केला. शौल राजा त्याचा द्वेष करत असल्यामुळे त्याला बरीच वर्षं वेगवेगळ्या ठिकाणी पळून जावं लागलं. राजा झाल्यानंतरसुद्धा त्याचा मुलगा अबशालोम त्याचं राजासन बळकावण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हासुद्धा दावीदला पुन्हा आपला जीव वाचवण्यासाठी पळून जावं लागलं. या सगळ्या अडचणी आणि त्याच्या स्वतःच्या काही चुका असूनसुद्धा दावीद त्याच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत देवाला एकनिष्ठ राहिला. यहोवाने त्याच्याबद्दल, “माझ्या मनासारखा माणूस” असं म्हटलं. म्हणूनच दावीदचा सल्ला आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. (१ राजे १५:५) दावीदने इस्राएलच्या पुढच्या राजाला, म्हणजे त्याचा मुलगा शलमोनला जो सल्ला दिला त्याबद्दल विचार करा. शुद्ध उपासनेला पाठिंबा देण्यासाठी आणि देवाच्या सन्मानात मंदिर बांधण्यासाठी यहोवाने त्याची निवड केली होती. (१ इति. २२:५) आणि हे खरंच खूप मोठं काम होतं. शिवाय शलमोनला संपूर्ण राष्ट्राचं नेतृत्व करायचं होतं आणि त्यासाठी त्याला यहोवाच्या मदतीची गरज होती. मग दावीदने त्याला काय सल्ला दिला? दावीदने आपल्या मुलाला सांगितलं की त्याने यहोवाचं ऐकलं तर तो आयुष्यात यशस्वी होईल.—१ राजे २:२, ३. टेहळणी बुरूज२४.११ १०-११ ¶९-११
मंगळवार, २० जानेवारी
आपला मार्ग यहोवाच्या हाती सोपवून दे; त्याच्यावर विसंबून राहा, म्हणजे तो तुझ्या वतीने कार्य करेल.—स्तो. ३७:५.
जो पती आपल्या पत्नीला मारहाण करतो किंवा तिला वाईटसाईट बोलतो त्याने यहोवासोबतचं आणि त्याच्या पत्नीसोबतचं नातं सुधारण्यासाठी काही पावलं उचलली पाहिजेत. पहिलं, अशा प्रकारचं वागणं एक गंभीर समस्या आहे हे त्याने मान्य केलं पाहिजे. कारण यहोवाच्या नजरेतून कोणतीच गोष्ट सुटत नाही. (स्तो. ४४:२१; उप. १२:१४; इब्री ४:१३) दुसरं, त्याने आपल्या बायकोचा छळ करणं थांबवलं पाहिजे आणि स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. (नीति. २८:१३) तिसरं, त्याने त्याच्या बायकोची आणि यहोवाची माफी मागितली पाहिजे. (प्रे. कार्यं ३:१९) तसंच स्वतःमध्ये बदल करायची इच्छा निर्माण व्हावी, म्हणून त्याने यहोवाकडे याचनाही केली पाहिजे. शिवाय, त्याला स्वतःच्या विचारांवर आणि वागण्या-बोलण्यावर नियंत्रण ठेवता यावं म्हणून त्याने यहोवाकडे मदत मागितली पाहिजे. (स्तो. ५१:१०-१२; २ करिंथ. १०:५; फिलिप्पै. २:१३) चौथं, त्याने त्याच्या प्रार्थनांप्रमाणे वागलं पाहिजे, म्हणजे सर्व प्रकारच्या हिंसेचा आणि वाईट बोलण्याचा द्वेष करायला शिकलं पाहिजे. (स्तो. ९७:१०) पाचवं, त्याने मंडळीतल्या प्रेमळ मेंढपाळांची लगेच मदत घेतली पाहिजे. (याको. ५:१४-१६) सहावं, भविष्यात आपल्याकडून असं काही होऊ नये म्हणून आपण कोणती खबरदारी घेऊ शकतो, हे त्याने आधीच ठरवलं पाहिजे. टेहळणी बुरूज२५.०१ ११ ¶१४
बुधवार, २१ जानेवारी
उशीर का लावतोस? ऊठ, बाप्तिस्मा घे.—प्रे. कार्यं २२:१६.
यहोवाने आपल्याला जीवन आणि प्रत्येक चांगली देणगी दिली आहे. मग या सुंदर भेटी देणाऱ्या देवावर तुमचं प्रेम आहे का? तुम्हाला ते प्रेम व्यक्त करायचंय का? याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे आपलं जीवन त्याला समर्पित करणं आणि बाप्तिस्मा घेणं. ही पावलं उचलून तुम्ही यहोवाच्या कुटुंबाचा भाग बनाल. यामुळे तुमचा पिता आणि मित्र या नात्याने तो तुमची काळजी घेईल आणि तुमचं मार्गदर्शन करेल. (स्तो. ७३:२४; यश. ४३:१, २) समर्पण करून बाप्तिस्मा घेतल्यामुळे तुम्हाला सर्वकाळाच्या जीवनाची आशासुद्धा मिळेल. (१ पेत्र ३:२१) पण बाप्तिस्मा घेण्यापासून एखादी गोष्ट तुम्हाला रोखत आहे का? असं असेल तर तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या आधी लाखो लोकांनाही बाप्तिस्मा घेण्यासाठी पात्र ठरायला आपल्या वागण्या-बोलण्यात बदल करावे लागले आहेत. आणि आता ते आनंदाने आणि आवेशाने यहोवाची सेवा करत आहेत. टेहळणी बुरूज२५.०३ २ ¶१-२
गुरुवार, २२ जानेवारी
तू खरोखर त्यांच्या पापांची क्षमा करतोस.—स्तो. १३०:४.
बायबलमध्ये बऱ्याच वेळा पापांची तुलना जड ओझ्याशी करण्यात आली आहे. दावीद राजाने स्वतःच्या पापांबद्दल असं म्हटलं: “माझ्या अपराधांची रास माझ्या डोक्याच्याही वर गेली आहे. त्यांचं भयानक ओझं आता मला सहन होत नाही.” (स्तो. ३८:४) पण पश्चात्ताप करणाऱ्यांची पापं यहोवा क्षमा करतो. (स्तो. २५:१८; ३२:५) “क्षमा” असं भाषांतर केलेल्या हिब्रू शब्दाचा मूळ अर्थ “उचलणं” किंवा “घेऊन जाणं” असा होतो. या शब्दांवरून आपण अशी कल्पना करू शकतो, की यहोवा एका बलवान माणसासारखा आहे. तो एका अर्थाने पापाचं ओझं आपल्या सगळ्यांच्या खांद्यांवरून उचलून दूर घेऊन जातो. आणखी एका शब्दचित्रावरून दिसतं की यहोवा आपली पापं आपल्यापासून किती दूर नेऊ शकतो. स्तोत्र १०३:१२ म्हणतं: “पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितकेच त्याने आपले अपराध आपल्यापासून दूर केले आहेत.” पश्चिमेपासून पूर्व सगळ्यात दूर आहे. या दोन दिशा कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. दुसऱ्या शब्दांत, यहोवा आपली पापं आपण कल्पनाही करू शकत नाही, इतक्या दूर नेतो. यावरून आपल्याला ही खातरी मिळते की यहोवा आपल्या पापांची पूर्णपणे क्षमा करतो. टेहळणी बुरूज२५.०२ ९ ¶५-६
शुक्रवार, २३ जानेवारी
तुम्ही दानधर्म करता तेव्हा गाजावाजा करू नका.—मत्त. ६:२.
येशू जेव्हा स्वर्गात परत गेला तेव्हा प्रेषित पेत्रने जन्मापासून पांगळा असलेल्या एका माणसाला चमत्काराने बरं केलं. (प्रे. कार्यं १:८, ९; ३:२, ६-८) आणि साहजिकच या गोष्टीमुळे एक मोठा जमाव पेत्रच्या भोवती जमा झाला. (प्रे. कार्यं ३:११) पेत्र ज्या समाजातून आला होता, त्यात पद, प्रतिष्ठा या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जायचं. मग आता पेत्र स्वतःचा गौरव करून घेणार होता का? नाही. त्याने स्वतःकडे लोकांचं लक्ष वेधलं नाही. याउलट त्याने नम्र राहून सगळा गौरव यहोवाला आणि येशूला दिला. त्याने म्हटलं: “त्याच येशूच्या नावाने आणि त्याच्या नावावर असलेल्या आमच्या विश्वासाने, हा जो माणूस तुम्ही पाहताय आणि ज्याला तुम्ही ओळखता, तो बरा झालाय.” (प्रे. कार्यं ३:१२-१६) आपण पेत्रसारखं वागून नेहमी नम्र राहायला शिकू शकतो. यहोवावर आणि लोकांवर प्रेम असल्यामुळे आपण भाऊबहिणींसाठी चांगल्या गोष्टी करतो; लोकांनी आपली प्रशंसा करावी म्हणून नाही. आपली मेहनत लोकांच्या लक्षात आली नाही तरी आपण यहोवाची आणि आपल्या भाऊबहिणींची आनंदाने सेवा करतो, तेव्हा आपण दाखवून देतो की आपण खऱ्या अर्थाने नम्र आहोत.—मत्त. ६:१-४. टेहळणी बुरूज२५.०३ १०-११ ¶११-१२
शनिवार, २४ जानेवारी
स्वतःकडे आणि तू देत असलेल्या शिक्षणाकडे सतत लक्ष दे.—१ तीम. ४:१६.
यहोवावरच्या आणि आपल्या शेजाऱ्यांवरच्या प्रेमावर लक्ष लावून आपण प्रचारकार्यातला आपला उत्साह आणखी वाढवू शकतो. (मत्त. २२:३७-३९) आपल्याला प्रचार करताना पाहून यहोवा किती खूश होत असेल आणि एखाद्या व्यक्तीने बायबल अभ्यास सुरू केल्यावर त्याला किती आनंद होत असेल, याची कल्पना करा. विचार करा, एखादी व्यक्ती आपला संदेश ऐकते आणि यहोवाची सेवा करायचा निर्णय घेते तेव्हा तिला कायमचं जीवन जगण्याची संधी मिळू शकते! (योहा. ६:४०) काही कारणांमुळे तुम्हाला घराबाहेर पडता येत नाही का? जर तसं असेल तर यहोवावर आणि शेजाऱ्यांवर प्रेम असल्याचं दाखवण्यासाठी तुम्ही काय करू शकता यावर लक्ष द्या. कोव्हीड-१९ च्या काळात सॅम्युएल आणि डॅनिया घराबाहेर पडू शकत नव्हते. त्या कठीण काळात त्यांनी नियमितपणे टेलीफोन साक्षकार्य केलं, पत्रं लिहिली आणि झूमवरून बायबल अभ्यास चालवले. सॅम्युएल आणि डॅनियाच्या परिस्थितीमुळे ते जास्त काही करू शकत नव्हते, पण तरीसुद्धा त्यांना जे शक्य होतं ते त्यांनी केलं आणि त्यामुळे ते खूश होते. टेहळणी बुरूज२४.०४ १८-१९ ¶१५-१६
रविवार, २५ जानेवारी
सद्गुणी बायको कोणाला मिळू शकते? ती पोवळ्यांहूनही जास्त मौल्यवान असते.—नीति. ३१:१०.
जीवनात आनंदी राहण्यासाठी लग्न करणं गरजेचं नसलं, तरी बरेच अविवाहित भाऊबहीण मग ते तरुण असोत किंवा जास्त वय झालेले असोत लग्न करण्याचा विचार करतात. पण लग्न करण्याचा विचार करण्याआधी तुम्ही आध्यात्मिक, भावनिक आणि आर्थिकरीत्या लग्नासाठी तयार असलं पाहिजे. (१ करिंथ. ७:३६) तसंच डेटींग सुरू करण्याआधी आपल्या जोडीदारामध्ये कोणत्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत, हे माहीत असणं गरजेचं आहे. नाहीतर योग्य जोडीदार नसलेल्या व्यक्तीसोबत आपण डेटींग करायला लागू. किंवा असंही होईल की एक चांगला जोडीदार आहे आणि आपलं त्याच्याकडे लक्ष जाणार नाही. हे खरंय की आपला जोडीदार बाप्तिस्मा घेतलेला साक्षीदार असला पाहिजे. (१ करिंथ. ७:३९) पण हेही लक्षात घ्या की बाप्तिस्मा घेतलेली कोणतीही व्यक्ती तुमच्यासाठी चांगला जोडीदार असेलच असं नाही. म्हणून तुम्ही या गोष्टीवर विचार करू शकता: ‘जीवनात माझी कोणती ध्येयं आहेत? विवाह जोडीदारामध्ये कोणते गुण असणं गरजेचं आहे असं मला वाटतं? आणि याबाबतीत मी जास्त अपेक्षा तर करत नाही ना?’ टेहळणी बुरूज२४.०५ २० ¶१; २१ ¶३
सोमवार, २६ जानेवारी
एकमेकांशी प्रेमाने वागा.—इफिस. ४:३२.
डेटींग करताना जर तुमच्यात अधूनमधून समस्या आल्या किंवा मतभेद झाले तर तुम्हाला ते कसे हाताळता येतील? तुम्ही एकमेकांसाठी योग्य नाही असा याचा अर्थ होतो का? नक्कीच नाही! कारण प्रत्येक जोडप्यामध्ये एकमेकांचे विचार हे वेगवेगळे असतातच. कारण विवाहातसुद्धा एकमेकांचं नातं तेव्हाच मजबूत होतं, जेव्हा दोघांची मतं वेगवेगळी असूनही ते एकमेकांशी जुळवून घेतात आणि एका मतावर येऊन पोचतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या समस्या कशा सोडवता यावरून तुम्ही पुढे लग्नात यशस्वी व्हाल की नाही हे समजेल. म्हणून तुम्ही दोघं स्वतःला असं विचारू शकता: ‘आम्ही शांतीने आणि आदराने एखाद्या गोष्टीवर एकमेकांसोबत चर्चा करतो का? आम्ही आमच्या कमतरता मान्य करून त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो का? आम्ही लगेच माघार घ्यायला, माफी मागायला आणि माफ करायला तयार असतो का?’ (इफिस. ४:३१) पण तुमच्यात जर नेहमीच मतभेद आणि वाद होत असतील, तर कदाचित पुढे लग्नानंतरसुद्धा यात काही सुधारणा होणार नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला जाणवलं की ती व्यक्ती आपल्यासाठी योग्य नाही, तर अशा वेळी डेटींग तिथेच थांबवणं तुम्हा दोघांसाठी योग्य असेल. टेहळणी बुरूज२४.०५ २९-३० ¶१२
मंगळवार, २७ जानेवारी
यहोवा माझा खडक आहे, त्याची स्तुती असो! तो मला लढाईचं प्रशिक्षण देतो आणि युद्धासाठी सज्ज करतो.—स्तो. १४४:१.
आपण जे योग्य आहे त्यासाठी ठाम राहिलो आणि बायबल तत्त्वांच्या आधारावर निर्णय घेतले, तर इतरांवर त्याचा चांगला प्रभाव होऊ शकतो. जसजसं आपण विश्वासात आणि अचूक ज्ञानात वाढत जाऊ, तसतसं सत्यात आपण आणखी खंबीर होत जाऊ. त्यामुळे खोट्या शिकवणींचा आणि जगाच्या विचारसरणीचा आपल्यावर प्रभाव होणार नाही आणि आपण योग्य निर्णय घेऊ. (इफिस. ४:१४; याको. १:६-८) शिवाय संकटांचा सामना करणाऱ्यांनासुद्धा आपल्याला मदत करता येईल. (१ थेस्सलनी. ३:२, ३) तसंच मंडळीतल्या वडिलांनीही संयमी, समंजस, सुव्यवस्थित आणि समजूतदार असणं गरजेचं आहे. ते इतरांना शांत राहायला आणि देवावर मजबूत विश्वास ठेवायलाही मदत करतात. कारण वडील “विश्वसनीय वचनाला धरून” असतात. (तीत १:९; १ तीम. ३:१-३) त्यांच्या उदाहरणातून आणि मेंढपाळ म्हणून त्यांची जबाबदारी पार पाडून ते प्रचारकांना नियमितपणे सभेला, प्रचारकार्याला यायला आणि वैयक्तिक अभ्यास करायला मदत करतात. तसंच जेव्हा भाऊबहिणींच्या जीवनात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते, तेव्हा यहोवा आणि त्याच्या उद्देशावर लक्ष केंद्रित करण्यासाठीसुद्धा वडील बरंच काही करू शकतात. टेहळणी बुरूज२४.०६ ३१ ¶१६-१८
बुधवार, २८ जानेवारी
पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलंय.—मत्त. ४:१७.
पृथ्वीवर असताना येशूने लोकांना शिकवलं, की आपण पाप करतो तेव्हा त्याचा पिता आपल्याला क्षमा करायला उत्सुक असतो. हरवलेल्या मुलाच्या गोष्टीचा विचार करा. हा मुलगा आपलं घर सोडून गेला आणि त्याने खूप वाईट गोष्टी केल्या. पण मग तो “भानावर आला” आणि पुन्हा घरी आला. मग त्या वेळी त्याचे वडील त्याच्याशी कसे वागले? येशूने म्हटलं: “तो दूर असतानाच त्याच्या वडिलांनी त्याला पाहिलं आणि . . . त्यांनी धावत जाऊन त्याला मिठी मारली आणि प्रेमाने त्याचे मुके घेतले.” त्या मुलाने मनात असा विचार केला होता, की ‘मी माझ्या वडिलांना, मी त्यांच्या घरात मजूर म्हणून राहू शकतो का? असं विचारीन.’ पण त्याच्या वडिलांनी म्हटलं ‘हा माझा मुलगा आहे’ आणि त्याला पुन्हा घरात घेतलं. ते असंही म्हणाले: “तो हरवला होता आणि आता सापडलाय.” (लूक १५:११-३२) येशूने हे उदाहरण का दिलं? पृथ्वीवर येण्याआधी येशू स्वर्गात होता. त्याच्या पित्याने पश्चात्ताप करणाऱ्या असंख्य पापी लोकांना दया दाखवून कशी क्षमा केली हे त्याने नक्कीच पाहिलं असेल. खरंच, आपल्या दयाळू पित्याचं, यहोवाचं किती सुंदर चित्र येशूने रेखाटलं! टेहळणी बुरूज२४.०८ ११-१२ ¶११-१२
गुरुवार, २९ जानेवारी
समंजस असा.—१ पेत्र ४:७.
एक समंजस ख्रिस्ती व्यक्ती असे निर्णय घ्यायचा प्रयत्न करते, ज्यांतून यहोवाचा दृष्टिकोन दिसून येतो. अशी व्यक्ती जीवनातल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा यहोवासोबतच्या नात्याला सगळ्यात जास्त महत्त्व देते. तसंच, तिचा स्वतःबद्दल योग्य दृष्टिकोन असतो. तिला याची जाणीव असते की तिला सगळ्याच गोष्टी माहीत नाहीत. यासोबतच ती नेहमी यहोवाला प्रार्थना करून त्याच्यावर विसंबून असल्याचं दाखवून देते. आपल्याकडे कितीही कौशल्यं असली तरी आपण यहोवाला सतत प्रार्थना केली पाहिजे, ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आपण त्याला मार्गदर्शनासाठी प्रार्थना करतो; खासकरून महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात तेव्हा. आपण असा भरवसा ठेवतो की आपल्यासाठी चांगलं काय हे त्याला माहीत आहे. यहोवाने आपल्याला त्याच्यासारखे गुण दाखवायची क्षमता दिली आहे, यासाठी आपण त्याचे खरंच किती आभारी आहोत! (उत्प. १:२६) पण हेही खरंय की आपण पूर्णपणे यहोवासारखे गुण दाखवू शकत नाही.—यश. ५५:९. टेहळणी बुरूज२५.०३ ११ ¶१३; १३ ¶१७-१८
शुक्रवार, ३० जानेवारी
प्रेम सगळ्या गोष्टींची आशा धरतं, सगळ्या बाबतींत धीर धरतं.—१ करिंथ. १३:७.
इतरांच्या हेतूंवर शंका घेऊ नका. तुम्ही केलेल्या एखाद्या गोष्टीसाठी ते कदर दाखवत नसतील, तर तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘त्यांना खरंच आपण केलेल्या गोष्टीची कदर नाही, की ते कदर दाखवायचं विसरून गेलेत?’ ते जर आपल्या अपेक्षेप्रमाणे कदर दाखवत नसतील, तर त्याची कदाचित इतर कारणंही असू शकतात. किंवा असंही होऊ शकतं, की त्यांना खूप कदर असेल पण ती व्यक्त करायला कठीण जात असेल. किंवा इतरांची मदत घ्यायला त्यांना अवघडल्यासारखं वाटत असेल; खासकरून ते आधी इतरांना मदत करत असतील तेव्हा. कारण काहीही असलं तरी प्रेमामुळे आपण त्यांच्याबद्दल चुकीचा विचार करणार नाही. उलट आपण देण्यातून मिळणारा आनंद अनुभवत राहायचा प्रयत्न करत राहू. (इफिस. ४:२) तसंच धीर धरा. उदार असण्याच्या बाबतीत बुद्धिमान राजा शलमोनने लिहिलं: “आपलं अन्न पाण्यावर सोड. बऱ्याच दिवसांनी तुला ते परत मिळेल.” (उप. ११:१) या शब्दांवरून कळतं, की आपण दाखवलेल्या उदारतेला कदाचित काही जण ‘बऱ्याच काळानंतर’ प्रतिसाद देतील. टेहळणी बुरूज२४.०९ ३० ¶१८-१९
शनिवार, ३१ जानेवारी
जे पाप करत राहतात त्यांची सर्वांच्या देखत कानउघाडणी कर, म्हणजे बाकीच्या सगळ्यांना इशारा मिळेल.—१ तीम. ५:२०.
कधीकधी एखाद्याला ताडन दिल्याची मंडळीत घोषणा केली जाते. अशा वेळी आपण त्याच्यासोबत आधीसारखं उठणं-बसणं ठेवू शकतो. कारण त्याने पश्चात्ताप केलेला असतो आणि चुकीचा मार्ग सोडून दिलेला असतो. तसंच, तो अजूनही मंडळीचा भाग असतो आणि चांगली कामं करत राहायला त्याला भाऊबहिणींकडून प्रोत्साहनाची गरज असते. (इब्री १०:२४, २५) पण ज्याला मंडळीतून काढून टाकलं जातं, त्याच्या बाबतीत गोष्ट वेगळी असते. आपण अशा माणसाची “संगत सोडून देतो” आणि “त्याच्यासोबत जेवायलाही बसत नाही.” (१ करिंथ. ५:११) पण मग याचा असा अर्थ होतो का, की त्याच्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो? नक्कीच नाही! हे खरंय की आपण त्याच्यासोबत उठणं-बसणं ठेवणार नाही. पण जर तो आपला नातेवाईक असला किंवा मंडळीतून काढून टाकण्याआधी आपला जवळचा मित्र असला, तर त्याला सभांना यायचं आमंत्रण द्यायचं की नाही हे ठरवण्यासाठी, आपण आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकाचा वापर करू शकतो. टेहळणी बुरूज२४.०८ ३० ¶१३-१४