प्रस्तावना
तुम्ही धैर्यवान होऊ शकता!
१-३. “उठा, आपण जाऊ या” हे सगळ्यात धाडसी शब्द होते असं का म्हणता येईल?
“उठा, आपण जाऊ या.” हे कदाचित एका व्यक्तीने बोललेले आजपर्यंतचे सगळ्यात धाडसी शब्द असावेत. तुम्ही म्हणाल कशावरून? यासाठी हे शब्द कोणी आणि का म्हटले ते समजून घ्यावं लागेल.—मत्त. २६:४६.
“उठा, आपण जाऊ या.”—मत्त. २६:४६
२ हे येशूचे शब्द आहेत. त्याने ते आपल्या शिष्यांशी बोलताना म्हटले. याआधीही आपल्या शिष्यांशी बोलताना त्याने हेच शब्द वापरले होते. (योहा. १४:३१) पण या वेळी परिस्थिती खूपच वेगळी होती. तो यरुशलेम शहराबाहेर असलेल्या डोंगरावरच्या एका बागेत होता. फार रात्र झाली होती आणि सगळीकडे चंद्रप्रकाश पसरला होता. येशूला माहीत होतं, की लोकांचा एक जमाव हत्यारं घेऊन येत आहे. आणि तो जमाव आपल्यासोबत काय करणार आहे हेही त्याला माहीत होतं. आजपर्यंत कोणत्याही माणसाने सहन केली नसेल इतक्या भयंकर परीक्षेला त्याला लवकरच तोंड द्यावं लागणार होतं. आणि हे सगळं आपल्याला एकट्यालाच सहन करावं लागेल हेही त्याला माहीत होतं.
३ पण येशूने समोर आलेली भयंकर परिस्थिती टाळायचा प्रयत्न केला नाही. त्याला हवं असतं तर तो आपलं संरक्षण करण्यासाठी शक्तिशाली स्वर्गदूतांना बोलवू शकला असता. (मत्त. २६:५३) पण त्याने तसं केलं नाही. उलट, तो फक्त इतकंच म्हणाला: “उठा, आपण जाऊ या.” येशू कुठे जाण्याबद्दल बोलत होता? तो सरळ जीवघेण्या, यातनामय मृत्यूच्या तोंडात चालला होता. पण तो हे करायला का तयार होता? कारण त्याचं आपल्या पित्यावर आणि आपल्या शिष्यांवर खूप प्रेम होतं.
४-५. येशूने कशा प्रकारचं धैर्य दाखवलं, आणि आज आपल्याला अशा धैर्याची गरज का आहे?
४ येशू हा आजपर्यंत पृथ्वीवर होऊन गेलेला सगळ्यात धैर्यवान माणूस होता यात काहीच शंका नाही. तुम्ही येशूच्या शिष्यांपैकी एक आहात का? तर मग तुम्हीसुद्धा धैर्यवान आहात. सगळ्याच खऱ्या ख्रिश्चनांमध्ये हा गुण असला पाहिजे. आज आपण अतिशय कठीण आणि धोकादायक काळात जगत आहोत. त्यामुळे या गुणाची आज आपल्याला खूप जास्त गरज आहे.
५ मग येशूसारखं धैर्य आपण कसं दाखवू शकतो? काहींना असं वाटतं, की धैर्य दाखवणं म्हणजे कोणत्याही गोष्टीला न घाबरणं किंवा धोकादायक परिस्थिती टाळता येणं शक्य असलं तरी मुद्दाम स्वतःला त्या परिस्थितीत झोकून देणं. काहींना तर असंही वाटतं, की आपल्याला काहीच होणार नाही असा विचार करणं म्हणजे धैर्य दाखवणं. आणि असेही काही जण आहेत ज्यांना वाटतं, की आपण जर हिंसा केली किंवा मारहाण केली तर आपण धाडसी आहोत हे दिसून येईल. (स्तो. ११:५) पण खरं धैर्य तसं नसतं. खरं धैर्य दाखवण्यासाठी मनाने खंबीर असणं गरजेचं असतं. अशी व्यक्ती, देवाला आवडणारी गोष्ट करणं कितीही कठीण वाटत असलं किंवा ती करायची कितीही भीती वाटत असली तरीही करायला तयार असते. येशूने असंच धैर्य दाखवलं होतं.
तुम्हीही येशूसारखं धैर्य दाखवू शकता!
६. आपल्याला धैर्य दाखवता येणार नाही अशी भीती वाटत असेल तर कोणती गोष्ट आपण कायम लक्षात ठेवू शकतो?
६ तुमच्या मनात कदाचित असा प्रश्न येईल, की ‘माझ्यावर जर परीक्षा आली तर मलाही येशूसारखंच धैर्य दाखवता येईल का?’ तसं असेल, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा: येशू त्याच्या पित्यासारखाच खूप समजूतदार आहे. आपल्याला जे करणं शक्य नाही त्याची तो आपल्याकडून कधीच अपेक्षा करत नाही. (स्तो. १०३:१४; योहा. १४:९) त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने आपल्या प्रेषितांना काय म्हटलं होतं त्याचा विचार करा. त्याने त्यांना त्याच्यासोबत जागं राहायला सांगितलं होतं, पण ते झोपून गेले. हे पाहून तो त्यांच्यावर चिडला का? नाही. उलट त्याने प्रेमळपणे त्यांना म्हटलं: “मन तर उत्सुक आहे, पण शरीर दुर्बळ आहे.” (मत्त. २६:४१) येशूने त्यांची परिस्थिती, त्यांच्या कमतरता समजून घेतल्या आणि तो तुमच्याही कमतरता आणि परिस्थिती समजून घेतो.
७-८. येशूने आपल्या शिष्यांना कसा धीर दिला?
७ येशूने आपल्या शिष्यांवर भरवसा असल्याचंही दाखवलं. उदाहरणार्थ, येशूने जेव्हा त्यांना, “हिंमत धरा! मी जगाला जिंकलंय” असं म्हटलं तेव्हा त्यांना किती धीर मिळाला असेल याचा विचार करा. (योहा. १६:३३) त्याला भरवसा होता की ते त्याचं अनुकरण करू शकतात आणि शिष्यांनी तसं केलंही. याशिवाय, असे कितीतरी प्रसंग आहेत जेव्हा येशूने लोकांना धीर देऊन त्यांना धैर्य दाखवायला मदत केली. उदाहरणार्थ, लकवा मारलेल्या व्यक्तीला त्याच्या पापांची क्षमा झाली आहे असं सांगण्याआधी येशूने “मुला, काळजी करू नकोस,”असं म्हणून त्याला दिलासा दिला. (मत्त. ९:२) तसंच, येशूच्या कपड्यांना हात लावल्यामुळे जेव्हा एक स्त्री घाबरली तेव्हा “मुली, घाबरू नकोस!” असं म्हणून त्याने तिची भीती दूर केली. (मत्त. ९:२०-२२) इतकंच नाही, तर समुद्रात उठलेल्या वादळामुळे त्याचे शिष्य घाबरले तेव्हा “भिऊ नका, मी आहे,” असं म्हणून त्याने त्यांचं मन शांत केलं. (मत्त. १४:२७) पुढे एकदा प्रेषित पौल मरता-मरता वाचला त्या रात्री येशू स्वर्गातून त्याच्याशी बोलला आणि “हिंमत धर!” असं म्हणून त्याने त्याला धीर दिला.—प्रे. कार्यं २३:९-११.
८ एका अर्थाने आपला धैर्यवान राजा येशू आपल्यालाही तेच म्हणत आहे. आपणही ‘हिंमत धरावी’ अशी त्याची इच्छा आहे. आणि आपण ते करू शकतो असा त्याला भरवसाही आहे. शिवाय, धैर्य दाखवण्यासाठी ज्याची गरज आहे तेसुद्धा त्याच्या पित्याने, यहोवाने आपल्याला दिलं आहे.
धैर्यवान व्हायला बायबल आपल्याला कशी मदत करू शकतं?
९. देवाचं वचन आपल्याला धैर्यवान व्हायला कशी मदत करतं?
९ यहोवाने त्याच्या प्रेरित वचनात धैर्याची बरीच उदाहरणं दिली आहेत. त्यांमुळे आपल्याला धैर्यवान व्हायला मदत होऊ शकते. त्यात वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेल्या बऱ्याच लहान-मोठ्या स्त्री-पुरुषांचे अहवाल दिले आहेत. ते सगळे “आपल्यासारख्याच भावना” असलेले लोक होते. (याको. ५:१७) आपल्या सगळ्यांसारखेच तेही अपरिपूर्ण होते. त्यांच्यातही आपल्यासारख्याच कमतरता, मर्यादा आणि दोष होते. पण येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करून त्यांनी या सगळ्या गोष्टींवर मात केली. त्यांनी कमालीचं धैर्य दाखवलं आणि अशी जिवंत उदाहरणं आपल्यासमोर ठेवली जी आजपर्यंत आपल्याला प्रोत्साहन देतात.
१०-११. या पुस्तकामुळे तुम्हाला कशी मदत होईल, आणि तुम्ही हे पुस्तक कसं वापरू शकता? (“वैयक्तिक आणि कौटुंबिक अभ्यासात हे पुस्तक कसं वापरता येईल?” ही चौकट पाहा.)
१० हे पुस्तक तुमचं धैर्य वाढवायला मदत करण्यासाठीच तयार करण्यात आलंय. यातल्या ५४ अध्यायांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, की यहोवाने आपल्यासारख्याच अपरिपूर्ण लोकांना आवश्यक असलेलं धैर्य दाखवायला कशी मदत केली आहे. त्यामुळे प्रत्येक अध्याय वाचा, संशोधन करा आणि प्रत्येक व्यक्तीबद्दल जास्त माहिती जाणून घ्या. त्यामुळे या विश्वासू स्त्री-पुरुषांना तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल.
११ त्यांच्या उदाहरणांमुळे तुम्हाला आणखी धैर्य दाखवायला मदत होईल आणि या शेवटच्या कठीण काळात टिकून राहता येईल. (२ तीम. ३:१) तसंच, “मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही,” हे यहोवाने दिलेलं अभिवचन दररोज लक्षात ठेवायलाही मदत होईल. यामुळे तुम्हाला “धैर्याने” असं म्हणता येईल: “यहोवा मला साहाय्य करतो; मी घाबरणार नाही.”—इब्री १३:५, ६.