वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wcg अध्या. ५४ पृ. २४२-२४५
  • त्याने अंधाऱ्‍या काळात धैर्य दाखवलं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • त्याने अंधाऱ्‍या काळात धैर्य दाखवलं
  • धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • संशोधन करा
  • शिकलेल्या मुद्द्‌यांवर विचार करा
  • मनन करण्यासाठी
  • आणखी शिका
  • त्याच्यापेक्षा “श्रेष्ठ कोणी नाही”
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • विश्‍वासू सेवकांच्या शेवटच्या शब्दांमधून शिकायला मिळणारे धडे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२५-२०२६ विभागीय पर्यवेक्षकांसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
  • असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
अधिक माहिती पाहा
धैर्याने देवाची उपासना करत राहा!
wcg अध्या. ५४ पृ. २४२-२४५

५४ प्रेषित योहान

त्याने अंधाऱ्‍या काळात धैर्य दाखवलं

छापील आवृत्ती
छापील आवृत्ती

प्रेषित योहान खूप वयस्कर होता तेव्हा त्याने “हा शेवटचा काळ आहे” असं लिहिलं. त्याला माहीत होतं, की प्रेषितांचा काळ आता संपण्याच्या बेतात आहे. काही दशकांआधी येशू आणि प्रेषित पौलने असा इशारा दिला होता, की मंडळ्यांमध्ये धर्मत्याग पसरेल. हा धर्मत्याग पसरू नये म्हणून प्रेषितांनी मंडळ्यांचं संरक्षण केलं होतं. पण त्यांच्या मृत्यूनंतर मात्र खोटे शिक्षक मंडळ्यांना भ्रष्ट करू लागले होते. (मत्त. ७:१५; प्रे. कार्यं २०:२९, ३०; २ थेस्सलनी. २:६, ७) असं दिसतं, की या धर्मत्यागापासून मंडळ्यांचं संरक्षण करणारा योहान हा शेवटचा प्रेषित होता. त्या अंधाऱ्‍या काळात धर्मत्यागाचा संसर्ग एका मंडळीतून दुसऱ्‍या मंडळीत पसरत होता, तेव्हा प्रेषित योहानला कसं वाटलं असेल हे आपण समजू शकतो. पण यामुळे त्याने हार मानली नाही किंवा तो निराश झाला नाही.

वयस्कर असतानाही प्रेषित योहान छळाचा, बंदिवासाचा आणि धर्मत्यागाच्या उसळत्या लाटेचा सामना कसा करू शकला?

योहान जवळपास ९० वर्षांचा होता तेव्हासुद्धा त्याने ‘देवाबद्दल बोलायचं आणि येशूबद्दल साक्ष द्यायचं’ थांबवलं नाही. म्हणूनच त्याला एजियन समुद्रातल्या पात्म नावाच्या एका ओसाड आणि खडकाळ बेटावर नेऊन कैद करून ठेवण्यात आलं. मग अशा परिस्थितीतही निराश न होता सेवा करत राहायला त्याला कशामुळे मदत झाली? त्याला नक्कीच येशूने जवळपास ६० वर्षांपूर्वी दिलेलं अभिवचन आठवलं असेल. येशूने म्हटलं होतं: “पाहा! जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीपर्यंत मी नेहमी तुमच्यासोबत असेन.”—मत्त. २८:२०.

आता इतक्या वर्षांनंतर एका अद्‌भुत मार्गाने योहानला पुन्हा एकदा येशूला पाहायची आणि त्याच्याकडून ऐकायची संधी मिळते. यामुळे योहान नक्कीच खूप भारावून गेला असेल. कारण येशूने त्याला यहोवाकडून असलेला एक रोमांचक दृष्टान्त दाखवला. “प्रभूच्या दिवसात” म्हणजेच शेवटच्या काळात काय होईल हे येशूने त्याला दाखवलं. तसंच, येशूने त्याला हेही दाखवलं की सैतानाकडून विरोध होत असतानाही तो त्याच्या शिष्यांना विश्‍वासू राहायला कशी मदत करेल.

हा दृष्टान्त त्याला “चिन्हांच्या रूपात” देण्यात आला होता. दृष्टान्तात त्याने जे पाहिलं त्यातल्या बऱ्‍याच गोष्टी त्याच्या समजशक्‍तीच्या पलीकडे होत्या. पण एक गोष्ट त्याला पक्की समजली होती. ती म्हणजे, त्या वेळी मंडळ्यांमध्ये जो धर्मत्याग पसरत होता तो यहोवा आणि येशू अजिबात खपवून घेणार नव्हते. प्रभूच्या दिवसात यहोवाच्या सेवकांची संख्या झपाट्याने वाढणार होती आणि यहोवा त्यांच्यासाठी बऱ्‍याच अद्‌भुत गोष्टी करणार होता. स्वर्गात होणाऱ्‍या एका युद्धात सैतानाला हरवून पृथ्वीवर फेकून दिलं जाणार होतं. मग शेवटी त्याचा कायमचा नाश होणार होता. या दृष्टान्तामुळे योहानला खूप हिंमत मिळाली असेल. त्यामुळेच ‘पाहिलेल्या सगळ्या गोष्टी’ त्याने प्रामाणिकपणे लिहून ठेवल्या.

प्रेषित योहान येशूकडून मिळालेला दृष्टान्त लिहून काढत आहे. दृष्टान्तात तो गौरवी येशूला पाहत आहे. आणि येशू अग्नीच्या रंगाच्या अजगराला आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांना खाली पृथ्वीवर फेकत आहे.

पात्म बेटावर एक कैदी म्हणून राहत असतानासुद्धा योहानचा आनंद आणि आवेश जरासुद्धा कमी झाला नाही. त्या वेळी डॉमिशियन हा रोमी सम्राट शासन करत होता आणि तो ख्रिस्ती धर्माचा कट्टर विरोधक होता. पण असं दिसतं, की त्याच्या मृत्यूनंतर योहानची सुटका झाली. काही काळानंतर योहान कदाचित इफिसमध्ये गेला असेल. मग जवळजवळ १०० वर्षांचा असताना त्याला एक अतिशय मोठी जबाबदारी मिळाली.

देवाने त्याला चौथं आणि शेवटचं शुभवर्तमान लिहायची प्रेरणा दिली. या शुभवर्तमानाच्या प्रती एका मंडळीतून दुसऱ्‍या मंडळीत लगेच पोहोचतील आणि त्यामुळे भाऊबहिणींचा विश्‍वास आणि धैर्य वाढेल हे योहानला कदाचित माहीत होतं. पण यामुळे ख्रिस्ती धर्माचा विरोध करणारे रागाने पेटून उठतील हेही त्याला चांगलं माहीत होतं. पण या भीतीमुळे त्याने आपलं काम थांबवलं नाही.

येशूचा मृत्यू होऊन आता जवळजवळ ७० वर्षं उलटली होती. तरीही योहानने येशूसोबत घालवलेले क्षण त्याला पवित्र शक्‍तीच्या मदतीने जसेच्या तसे आठवत होते. म्हणूनच त्याने येशूच्या जीवनाचा जिवंत आणि मनाला स्पर्श करणारा अहवाल लिहिला. या अहवालातल्या जवळजवळ ९० टक्के गोष्टी इतर तीन शुभवर्तमानांत वाचायला मिळत नाहीत. उदाहरणार्थ, येशूने लाजरचं केलेलं पुनरुत्थान आणि त्यानंतर धर्मगुरूंनी लाजरला मारण्यासाठी केलेला क्रूर कट याबद्दल फक्‍त योहाननेच लिहिलंय. (योहा. ११:१-४६; १२:१०) तसंच, येशूचा विश्‍वासघात झाला त्या रात्री येशूने त्याच्या शिष्यांना जे सांगितलं आणि त्यांच्यासाठी जी प्रार्थना केली त्याबद्दलही फक्‍त योहाननेच लिहिलं. खरंच, योहान सगळ्याच ख्रिश्‍चनांसाठी एक अनमोल वारसा ठेवून गेला!

याच काळात, देवाच्या प्रेरणेने योहानने भाऊबहिणींना तीन पत्रंही लिहिली. त्या काळात जो धर्मत्याग पसरत होता त्याबद्दल त्याने या पत्रांमध्ये उघडपणे आणि धैर्याने लिहिलं. ख्रिश्‍चनांनी अशा धर्मत्यागी लोकांसोबत ऊठबस करू नये, इतकंच काय तर अशा लोकांना साधा नमस्कारही करू नये, असा इशारा त्याने दिला. योहानने त्याच्या तीन पत्रांमध्ये प्रेम आणि आशेबद्दल भरभरून लिहिलं. त्याने शिकवलं की “देव प्रेम आहे” आणि भाऊबहिणींना प्रोत्साहन आणि सल्ला देताना त्याने स्वतःही असंच प्रेम दाखवलं. तसंच, आपली आध्यात्मिक मुलं “सत्याच्या मार्गावर चालत आहेत,” हे पाहून आपल्याला किती आनंद होतोय याबद्दलही त्याने लिहिलं. त्याच्या या पत्रांमुळे बऱ्‍याच जणांना सत्याच्या मार्गावर चालत राहायची प्रेरणा मिळाली असेल.

आज धर्मत्यागाचा धोका असला, तरी योहानला ज्या परिस्थितीला तोंड द्यावं लागलं तशा परिस्थितीला आज ख्रिश्‍चनांना तोंड द्यावं लागणार नाही. योहानच्या मृत्यूनंतर ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये धर्मत्याग पसरला, तसा पुन्हा कधीच पसरणार नाही. (यश. ५४:१७; प्रे. कार्यं ३:२१) पण आपल्याला योहानसारखंच समस्यांचा, छळाचा आणि तुरुंगवासाचा सामना करावा लागू शकतो. म्हणून चला, आपण योहानच्या उदाहरणाचं अनुकरण करू या आणि देवाच्या मार्गावर धैर्याने चालत राहायचा ठाम निश्‍चय करू या!

याबद्दल बायबलमधून वाचा:

  • योहान १६:१–१७:२६

  • १ योहान २:१८; ४:८

  • २ योहान ९-११

  • ३ योहान ४

  • प्रकटीकरण १:१, २, ९-११; १२:९; २०:१-६; २१:१-५

चर्चेसाठी:

योहानने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?

संशोधन करा

  1. १. योहान खूप उत्साही आणि आवेशी होता हे कशावरून कळतं? (साक्ष द्या अध्या. ४ , चौकट ¶३-४)

  2. २. योहानला “अशिक्षित आणि सर्वसाधारण” का म्हणण्यात आलं? (प्रे. कार्यं ४:१३; टेहळणी बुरूज०८ ५/१५ ३० ¶६-wcgr)

  3. ३. कोणत्या अर्थाने ‘येशू येईपर्यंत योहान राहिला’? (टेहळणी बुरूज०५ १/१५ १३ ¶१४-१५)

  4. ४. योहानचं शुभवर्तमान हे पुस्तक योहाननेच लिहिलं असं आपण का म्हणू शकतो? (इन्साइट “योहान, शुभवर्तमान” ¶२-८-wcgr) १

    Fondation Martin Bodmer, Cologny (Genève)

    चित्र १: इ.स. २०० च्या काळातली एक गुंडाळी. त्यावर “योहान याने सांगितलेला आनंदाचा संदेश” असं लिहिलेलं शीर्षक (चौकटीत) दिसत आहे

शिकलेल्या मुद्द्‌यांवर विचार करा

  • योहानने त्याच्या प्रेरित लिखाणांमध्ये १०० पेक्षा जास्त वेळा येशूच्या खंडणी बलिदानाचा किंवा त्याच्या फायद्यांचा उल्लेख केलाय. येशूच्या खंडणी बलिदानाबद्दल आपणही अशीच कदर कशी दाखवू शकतो?

  • योहान जवळजवळ १०० वर्षांचा असताना यहोवाने त्याला बायबलची पाच पुस्तकं लिहायची प्रेरणा दिली. यावरून वयस्कर लोकांबद्दल यहोवाचा दृष्टिकोन कसा आहे याबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं? २

    कोलाज: एक वयस्कर बहीण आवेशाने सेवाकार्य करत आहे. १. ती व्हिडिओ कॉलवर बायबल अभ्यास चालवत आहे. २. ती मंडळीतल्या एका तरुण पायनियर बहिणीला एक छोटीशी भेट देत आहे. त्या बहिणीच्या हातात पायनियर प्रशालेचं पुस्तक आहे.

    चित्र २

  • योहानसारखंच तुम्हीही तुमच्या जीवनात धैर्य कसं दाखवू शकता?

मनन करण्यासाठी

  • या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?

  • या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?

  • हा अध्याय वाचल्यानंतर, योहानला येशूसोबत स्वर्गात राज्य करण्यासाठी निवडलंय याचा विचार करून तुम्हाला कसं वाटतं, आणि का?

आणखी शिका

आज वयस्कर भाऊबहीणसुद्धा योहानसारखं धैर्य दाखवू शकतात का?

धैर्यवान . . . वृद्ध (२:०४)

योहानने त्याच्या लिखाणात प्रेमाबद्दल भरभरून लिहिलं. त्याच्या प्रेरित लिखाणांमधून आणि उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं ते पाहा.

“‘ज्याच्यावर येशूचं प्रेम होतं’ त्या शिष्याकडून काय शिकायला मिळतं?” (टेहळणी बुरूज२१.०१ ८-१३)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा