समाप्ती
धैर्यवान व्हा!
१. बायबलमधून धैर्याबद्दल आपण आणखी काय शिकू शकतो?
आता आपण पुस्तकाच्या अगदी शेवटी पोहोचलोय. मग धैर्याबद्दल आणखी काही बोलायचं बाकी आहे का? नक्कीच! कारण बायबलमध्ये धैर्याबद्दल इतकं काही सांगितलंय, की ते सगळं एका पुस्तकात सांगणं शक्य नाही. उदाहरणार्थ, बायबलमध्ये धैर्य दाखवलेल्या आणखी कितीतरी लोकांबद्दल सांगितलंय. पण त्या सगळ्यांचाच या पुस्तकात उल्लेख केलेला नाही. शिवाय, धैर्य दाखवण्यासाठी आपल्याला आणखी एका गोष्टीची खूप गरज आहे. त्याबद्दलच आता आपण बोलू या.
२. आणखी कोणत्या विश्वासू सेवकांनी धैर्य दाखवलं?
२ या पुस्तकात ज्यांच्याबद्दल चर्चा केली आहे त्यांना सोडून आणखी कोणी धैर्य दाखवलं? तुम्ही कदाचित हिब्रू शास्त्रवचनांत उल्लेख केलेल्या यशया, यिर्मया, यहेज्केल, योना किंवा मलाखी यांसारख्या धाडसी संदेष्ट्यांचा विचार कराल. प्रेषित पौलने देवाच्या प्रेरणेने जे लिहिलं ते याच लोकांबद्दल होतं. इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रात त्याने म्हटलं, की काहींची “थट्टा करण्याद्वारे आणि फटके मारण्याद्वारे परीक्षा झाली. इतकंच नाही, तर त्यांना साखळदंडाची बंधनं आणि तुरुंगवासही सोसावा लागला.” तसंच, काही जण “निराधार, पीडित आणि छळलेले होते,” तर काहींना मृत्युदंडही देण्यात आला. (इब्री ११:३६, ३७) पण इतका छळ सोसूनही ते धैर्याने यहोवाची उपासना करत राहिले.
३-४. बायबलमध्ये ज्या दोन स्त्रियांची नावं दिलेली नाहीत त्यांनी कठीण काळात दावीदला वाचवण्यासाठी काय केलं?
३ धैर्य दाखवलेल्या सगळ्याच लोकांची नावं बायबलमध्ये दिलेली नाहीत. उदाहरणार्थ, दावीद राजाच्या दिवसांतल्या दोन स्त्रियांचा विचार करा. दावीदचा मुलगा अबशालोम याला आपल्या वडिलांच्या जागी राजा बनायचं होतं. त्यामुळे गर्विष्ठ आणि क्रूर अबशालोम दावीदला ठार मारायचा प्रयत्न करत होता. म्हणून दावीदला यरुशलेम सोडून पळून जावं लागलं. त्या वेळी दोन स्त्रियांनी दावीदला मदत केली. अबशालोम पुढे काय करणार आहे हे दावीदला जाणून घ्यायचं होतं. म्हणून दावीदने सादोक नावाच्या धाडसी याजकाला यरुशलेमला परत जायला सांगितलं आणि तिथे राहून अबशालोमचं पुढचं पाऊल काय असेल याची माहिती काढायला सांगितली. सादोकला आता दावीदला माहिती कळवायची होती. त्यासाठी त्याने ‘एका दासीला’ त्याच्याकडे पाठवलं. आपल्याला त्या दासीचं नाव माहीत नाही, पण ती धाडसी होती. आपल्या जिवाला धोका असूनही ती सादोकचा संदेश दावीदला पोहोचवण्यासाठी दावीदच्या दोन माणसांकडे गेली. पण ती दोन माणसं दावीदकडे जात असताना एका माणसाने त्यांना पाहिलं आणि अबशालोमला सांगितलं. म्हणून ती दोन माणसं एका विहिरीत लपून बसली. ज्या माणसाची ती विहीर होती, त्याच्या बायकोने एक कापड घेऊन विहिरीच्या तोंडावर अंथरलं आणि त्यावर धान्य पसरवलं. अबशालोमची माणसं जेव्हा या दोन माणसांना शोधत तिथे आली, तेव्हा त्या स्त्रीने त्यांना दुसरीकडे पाठवलं. बायबलमध्ये या स्त्रीचंसुद्धा नाव सांगितलेलं नाही. पण यहोवाने निवडलेल्या राजाला वाचवण्यासाठी ज्यांनी धैर्य दाखवलं त्यांत या दोन स्त्रियांचासुद्धा वाटा आहे!—२ शमु. १५:२३-३७; १७:८-२२.
यहोवाच्या लोकांना मदत करण्यासाठी धैर्य दाखवणारी एक दासी आणि एक स्त्री
४ खरंच, बायबलमध्ये धैर्य दाखवलेल्या कितीतरी लोकांची उदाहरणं दिली आहेत. यांपैकी काही स्त्रिया होत्या, तर काही पुरुष होते. काहींची नावं दिली आहेत, तर काहींची दिलेली नाहीत. काही श्रीमंत होते, तर काही गरीब होते. काहीचं लोकांमध्ये मोठं नाव होतं, तर काही अगदीच सर्वसामान्य होते. पण या सगळ्यांनी धैर्याने यहोवाची बाजू घेतली आणि ते यहोवाला विश्वासू राहिले. आजही त्यांच्या अहवालांमुळे आपल्याला फायदा होतो.
प्रार्थनेचं महत्त्व
५-७. तीव्र छळ होऊनसुद्धा पौलला धैर्य दाखवायला कशामुळे मदत झाली?
५ बायबलमधल्या धाडसी स्त्री-पुरुषांसारखं धैर्य आपण कसं दाखवू शकतो? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की हे स्त्री-पुरुष काही जन्मापासूनच किंवा स्वभावानेच धाडसी नव्हते. मग ते विश्वासूपणे यहोवाची सेवा कशी करू शकले? ते फक्त स्वतःच्या हिंमतीवर किंवा स्वतःच्या कौशल्यांमुळे यहोवाची सेवा करू शकले का? नाही. त्यासाठी आणखी एका गोष्टीची गरज होती. ती कोणती?
६ प्रेषित पौलचा विचार करा. एकदा तो आणि सीला फिलिप्पैमध्ये प्रचार करत असताना लोकांच्या एका जमावाने त्यांच्यावर हल्ला केला, त्यांचे कपडे फाडले, त्यांना बऱ्याचदा काठ्यांनी मारलं आणि अंधाऱ्या कोठडीत डांबून त्यांचे पाय खोड्यांत अडकवले. (प्रे. कार्यं १६:१२, १९-२४) मग नंतर तुरुंगातून सुटका झाल्यावर पौलला प्रचार करायला भीती वाटली का? थोडीफार भीती नक्कीच वाटली असेल. कारण शेवटी तोसुद्धा आपल्यासारखाच एक माणूस होता. पण आपण प्रचार करत राहावं अशी यहोवाची इच्छा आहे हे त्याला माहीत होतं. म्हणून त्याला थेस्सलनीकामधल्या लोकांना जाऊन प्रचार करायचा होता. मग तिथे जाण्यासाठी लागणारं बळ आणि धाडस त्याला कशामुळे मिळालं?
७ त्याने पुढे असं लिहिलं: “सुरुवातीला आमचा छळ झाला आणि आम्हाला वाईट वागणूक देण्यात आली. पण, इतका विरोध होत असूनही तुम्हाला देवाबद्दलचा आनंदाचा संदेश सांगण्यासाठी आम्ही आमच्या देवाच्या मदतीने धैर्य एकवटलं.” (१ थेस्सलनी. २:२) पौलला माहीत होतं की देवाचं काम पूर्ण करण्यासाठी त्याला धैर्याची गरज आहे. मग त्याला हे धैर्य कसं दाखवता आलं? त्याच्यात काही विशेष क्षमता होती म्हणून त्याला धैर्य दाखवता आलं असं नाही. तर त्याला ते “देवाच्या मदतीने” दाखवता आलं. पौल नम्र होता म्हणून त्याने धैर्यासाठी यहोवाकडे प्रार्थना केली. आणि यहोवाने त्याला हवं असलेलं धैर्य दिलं.
८. पौलसारखं आपल्यालाही धैर्य दाखवता यावं म्हणून आपण काय करू शकतो?
८ पौलसारखं तुम्हीही यहोवाकडे धैर्यासाठी प्रार्थना करू शकता. आपल्यामध्ये कोणतीही खास क्षमता नाही, त्यामुळे आपण धैर्य दाखवू शकत नाही असा विचार करू नका. उलट तुम्हाला धैर्य दाखवता यावं म्हणून यहोवाला कळकळून प्रार्थना करा.—प्रे. कार्यं ४:२९.
९. आपला विश्वास वाढवण्यासाठी यहोवाला प्रार्थना करणं का गरजेचंय?
९ धैर्यासोबतच तुम्ही स्वतःमध्ये आणखी एक गुण वाढवण्यासाठी यहोवाला प्रार्थना करू शकता. तो गुण म्हणजे विश्वास. विश्वास हा यहोवाच्या पवित्र शक्तीच्या फळाचा एक पैलू आहे. (गलती. ५:२२, २३) तसंच, प्रत्येक ख्रिश्चनाला ज्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीची गरज असते त्या शस्त्रसामग्रीचा एक भाग विश्वासही आहे. (इफिस. ६:१६) विश्वासात इतकी ताकद आहे, की त्याच्यामुळे ‘आपण जगावर विजय मिळवू शकतो,’ असं बायबल म्हणतं. (१ योहा. ५:४) यहोवावर जर तुमचा विश्वास असेल, तर तुम्ही नक्कीच धैर्य दाखवू शकता. कठीण काळात यहोवा तुम्हाला मदत करेल यावर जर तुमचा पक्का भरवसा असेल, तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत धैर्य दाखवता येईल. म्हणून प्रत्येक ख्रिश्चनाने येशूच्या प्रेषितांप्रमाणेच “आमचा विश्वास वाढव” अशी यहोवाकडे प्रार्थना केली पाहिजे.—लूक १७:५.
“हिंमत धरा!”
१०-११. पौलने इब्री ख्रिश्चनांना लिहिताना धैर्य दाखवण्यावर इतका भर का दिला?
१० पौलने जेव्हा यरुशलेममध्ये आणि त्याच्या आसपास राहणाऱ्या इब्री ख्रिश्चनांना पत्र लिहिलं, तेव्हा त्याला माहीत होतं, की लवकरच त्यांना एका मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागणार आहे. येशूने आधीच सांगितलं होतं, की यरुशलेम शहराचा नाश होणार आहे आणि ती वेळ आता खूप जवळ आली होती. (लूक १९:४१-४४; २१:२०-२४) मग अशा वेळी धैर्य दाखवणं किती महत्त्वाचं आहे याची पौलने त्यांना कशी आठवण करून दिली? त्याने त्यांना यहोवाच्या प्रेमळ अभिवचनाबद्दल सांगितलं. ते अभिवचन या पुस्तकाच्या प्रस्तावनेतही दिलं आहे. तिथे यहोवा म्हणतो: “मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.” या अभिवचनामुळे त्यांना कसं वाटणार होतं ते पौलने सांगितलं.,तो म्हणाला: “आपण धैर्याने असं म्हणू शकतो: ‘यहोवा मला साहाय्य करतो; मी घाबरणार नाही. माणूस माझं काय बिघडवू शकतो?’”—इब्री १३:५, ६.
११ इ.स. ७० मध्ये झालेल्या यरुशलेमच्या नाशाबद्दल बायबलमध्ये जास्त काही सांगितलेलं नाही. पण पौलने दिलेला सल्ला ख्रिश्चनांनी नक्कीच पाळला असेल असं आपण खातरीने म्हणू शकतो. येशूने दिलेल्या सल्ल्याचं पालन करण्यासाठी त्यांनी धैर्य दाखवलं आणि ते ‘डोंगरांकडे पळून गेले.’—लूक २१:२०, २१.
१२. (क) कठीण समस्यांना तोंड देत असताना तुम्ही धैर्य कसं दाखवू शकता? (ख) या शेवटच्या काळात काही जणांनी विलक्षण धैर्य कसं दाखवलंय, आणि तुम्ही काय करायचा निश्चय केलाय? (“यांच्यासारखं धैर्य दाखवा” ही चौकट पाहा.)
१२ आज आणि येणाऱ्या दिवसांत कठीण समस्यांना तोंड देत असताना यहोवा तुम्हाला असंच धैर्य दाखवायला मदत करू शकतो. (यहे. ३८:१, २, १०-१२; मत्त. २४:२१) नेहमी लक्षात ठेवा, की यहोवाने आपलं संरक्षण करायचं वचन दिलंय. (यहे. ३८:१९-२३; २ थेस्सलनी. ३:३) जे यहोवावर प्रेम करतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना तो कधीच सोडून देणार नाही. यहोवाने यहोशवाला जे म्हटलं ते तुम्हालाही लागू होतं. त्याने म्हटलं होतं: “हिंमत धर, खंबीर हो.” (यहो. १:७, ९, १८) तसंच, येशूने त्याच्या शिष्यांना जे म्हटलं होतं तेही नेहमी लक्षात ठेवा. त्याने त्यांना म्हटलं होतं: “हिंमत धरा!” येशूने आपल्याला त्याच्या पित्याकडून पवित्र शक्ती द्यायचं अभिवचन दिलंय आणि हे अभिवचन तो नक्की पूर्ण करेल. यहोवाची ही पवित्र शक्ती तुम्हाला कोणत्याही परीक्षेत धैर्य दाखवायला मदत करेल. (योहा. १४:२६; १५:२६, २७; १६:३३) त्यामुळे तुम्ही नक्कीच धैर्यवान होऊ शकता!
आपली परिस्थिती कशीही असली तरी धैर्य वाढवण्यासाठी यहोवा आपल्याला त्याची पवित्र शक्ती द्यायचं वचन देतो. यामुळे आपण कोणत्याही परीक्षेचा सामना करू शकतो
१३. धैर्य दाखवत राहायला तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे प्रेरणा मिळते?
१३ कल्पना करा, जेव्हा संपूर्ण पृथ्वीवर शांती असेल आणि यहोवाच्या स्मरणात असलेले लोक पुन्हा जिवंत होतील आणि आपण आनंदाने त्यांचं स्वागत करू, तो काळ किती जबरदस्त असेल! या पुस्तकात आपण ज्या धैर्यवान स्त्री-पुरुषांची चर्चा केली त्यांना आणि त्यांच्यासारख्या इतर बऱ्याच लोकांना भेटल्यावर आपल्याला खरंच किती आनंद होईल! सैतानाच्या जुन्या जगात राहत असतानाही धैर्याने यहोवाची सेवा करायची, इतकंच नाही तर त्यासाठी मृत्यू सहन करायची निवड केल्याचा त्यांना पस्तावा होईल असं तुम्हाला वाटतं का? मुळीच नाही! आणि तुमच्याबद्दल काय? त्यांच्यासोबत मिळून संपूर्ण पृथ्वीचं रूपांतर नंदनवनात करताना तुम्हाला कसं वाटेल? या शेवटच्या दिवसांत यहोवावर असलेल्या प्रेमापोटी तुम्ही जे धैर्य दाखवलं त्याचा तुम्हाला पस्तावा होईल का? मुळीच नाही! तर मग, अगदी शेवटपर्यंत धैर्य दाखवत राहायचा ठाम निश्चय करा. कारण याचा तुम्हाला पुढे कधीच पस्तावा होणार नाही, उलट आनंदच होईल!