१९ इफ्ताह आणि त्याची मुलगी
त्यांनी एक कठीण नवस पूर्ण केला!
पुन्हा एकदा इस्राएली लोक यहोवाची उपासना सोडून इतर दैवतांची उपासना करू लागले होते. त्यामुळे इस्राएलची स्थिती आणखीनच वाईट झाली होती. म्हणून यहोवाने अम्मोनी लोकांना जवळजवळ १८ वर्षं इस्राएली लोकांवर जुलूम करू दिला. (शास्ते १०:८) शेवटी, देवाच्या लोकांनी आपली पापं कबूल केली, खोट्या दैवतांच्या मूर्ती काढून टाकल्या आणि ते पुन्हा यहोवाची उपासना करू लागले. पण याच्या काही काळानंतर अम्मोनी लोक इस्राएलवर हल्ला करण्यासाठी गिलाद इथे एकत्र जमले.
त्यामुळे गिलादमधल्या वडीलजनांनी इफ्ताह नावाच्या एका माणसाला अशी विनंती केली, की त्याने येऊन युद्धात त्यांचं नेतृत्व करावं. या वडीलजनांमध्ये इफ्ताहचे सावत्र भाऊसुद्धा होते. पण आधी ते त्याच्याशी खूप वाईट वागले होते. त्यामुळे तो त्या प्रदेशातून पळून गेला होता. मग त्यांनी जेव्हा इफ्ताहकडे मदत मागितली तेव्हा त्याने त्यांच्याबद्दल मनात राग धरला का? मुळीच नाही. तो पुन्हा येऊन युद्ध करायला तयार झाला. सुरुवातीला त्याने अम्मोनी लोकांसोबत शांतीचे संबंध जोडायचा प्रयत्न केला. अम्मोनचा राजा असा दावा करत होता, की त्या प्रदेशावर त्यांचा हक्क आहे. पण इफ्ताहने ही गोष्टी ऐकली तेव्हा त्या प्रदेशावर त्यांचा हक्क नाही हे अम्मोनच्या राजाला सविस्तर समजावून सांगण्यासाठी त्याने काही दूतांना त्याच्याकडे पाठवलं. यावरून यहोवा आपल्या लोकांशी आणि आजूबाजूच्या राष्ट्रांशी कसा वागला याबद्दल इफ्ताहला खूप चांगलं माहीत होतं हे दिसून येतं. पण अम्मोनचा राजा काहीएक ऐकायला तयार नव्हता. त्याला युद्ध करायचंच होतं!
त्यामुळे मग इफ्ताह युद्धासाठी तयारी करू लागला आणि त्या वेळी यहोवाची पवित्र शक्ती त्याच्यावर होती. त्याने यहोवाला असा नवसही केला: “तू जर अम्मोनी लोकांना माझ्या हाती दिलंस, तर मी विजयी होऊन सुखरूप परत येईन, तेव्हा माझ्या घराच्या दारातून जो कोणी मला भेटायला सर्वात आधी बाहेर येईल तो तुझा, यहोवाचा होईल. आणि मी त्याला होमार्पण म्हणून अर्पण करीन.” इफ्ताहाने हा नवस केला तेव्हा त्याच्यावर यहोवाची पवित्र शक्ती होती. त्यामुळे त्याने भावनेच्या आहारी जाऊन नाही, तर खूप विचार करून हा नवस केला होता असं आपण म्हणू शकतो.
पण इफ्ताह खरोखरच होमार्पण करून एखाद्या मानवाचा आगीत होम करणार होता का? नक्कीच नाही. कारण मानवांचा बळी देण्याच्या प्रथेची यहोवाला खूप घृणा होती. आणि त्याने आपल्या लोकांना सांगितलं होतं, की अशा प्रकारचं भयंकर काम त्यांनी कधीच करू नये. (अनु. १८:१०, १२) त्यामुळे इफ्ताहने जेव्हा म्हटलं, की त्याच्या घरातून जो कोणी त्याला भेटायला सर्वात आधी बाहेर येईल तो “यहोवाचा होईल,” तेव्हा त्याला असं म्हणायचं होतं की ती व्यक्ती यहोवाच्या सेवेत स्वतःला पूर्णपणे वाहून घेईल, आणि त्यासाठी तिला शिलोह इथे उपासना मंडपात जावं लागेल. इफ्ताहला माहीत होतं, की केलेला नवस पूर्ण करणं त्याच्यासाठी खूप कठीण असेल. कारण युद्ध जिंकून परत आल्यावर कदाचित त्याची मुलगीच सर्वात आधी त्याला भेटायला येण्याची शक्यता सगळ्यात जास्त होती. आणि ती त्याची एकुलती एक मुलगी होती.
नवस केल्यानंतर इफ्ताह लगेच युद्धावर गेला. युद्धात त्याने आपल्या माणसांचं धैर्याने नेतृत्व केलं. आणि यहोवानेही त्याला खूप मोठा विजय मिळवून दिला! इफ्ताहने आणि त्याच्या माणसांनी अम्मोनी लोकांची ‘अतिशय मोठ्या प्रमाणात कत्तल केली,’ आणि नंतर त्यांच्या प्रदेशातल्या २० शहरांवर कब्जा मिळवला.
युद्ध जिंकल्यानंतर इफ्ताह जल्लोष करत घरी आला, तेव्हा आपल्या घरातून सर्वात आधी एखाद्या सेवकाने आपल्याला भेटायला यावं असं कदाचित त्याला वाटलं असेल. पण त्याची एकुलती एक मुलगीच त्याला सगळ्यात आधी भेटायला आली. ती डफ वाजवत, नाचत त्याला भेटायला आली. तिला पाहून तो खूप दुःखी झाला आणि आपले कपडे फाडत त्याने असं म्हटलं: “माझ्या मुली, तू मला दुःखाच्या खाईत लोटलंस! तुला आता माझ्यापासून दूर पाठवावं लागेल. मी यहोवाला शब्द दिलाय आणि मला तो परत घेता येणार नाही.”
इफ्ताह आणि त्याच्या मुलीला एक नवस फेडायचा होता. पण त्यासाठी त्यांना खूप मोठा त्याग करावा लागणार होता
इफ्ताहाच्या मुलीच्या लक्षात आलं, की तिच्या वडिलांनी जो नवस केलाय त्यामुळे तिचं जीवन आता पूर्णपणे बदलून जाणार आहे. तिला आता तिचं संपूर्ण जीवन यहोवाच्या सेवेत घालवावं लागणार होतं. यामुळे तिला लग्न करायचं आणि मुलाबाळांना वाढवायचं सुख मिळणार नव्हतं. त्या काळात इस्राएलमध्ये राहणाऱ्या स्त्रियांसाठी ही खूप दुःखाची गोष्ट होती. पण या तरुण मुलीने धैर्याने आपल्या वडिलांना असं म्हटलं: “बाबा, तुम्ही यहोवाला शब्द दिलाय ना, मग तो नक्की पूर्ण करा.” पण ही सेवा सुरू करण्याआधी तिने आपल्या वडिलांकडे थोडा वेळ मागितला. कारण आपल्याला लग्न करता येणार नाही, मुलाबाळांना जन्म देता येणार नाही याचा शोक करण्यासाठी तिला आपल्या मैत्रिणींसोबत काही वेळ घालवायचा होता.
खरंच, इफ्ताहच्या मुलीने निःस्वार्थ मनोवृत्ती आणि धैर्य दाखवलं होतं. त्यामुळे दरवर्षी चार दिवस इस्राएलमधल्या तरुण स्त्रिया तिचं सांत्वन आणि कौतुक करण्यासाठी तिला भेटायला जायच्या. तिने उपासना मंडपात जी सेवा केली त्यामुळे तिला खूप आशीर्वाद मिळाले. त्याच काळात शमुवेलसुद्धा तिथे राहत असावा. वयाने लहान असलेल्या शमुवेलला तिने वाढवलं असेल का, त्याला घडवलं असेल का? आणि यहोवाची सेवा करायला त्याला प्रोत्साहन दिलं असेल का? याबद्दल आपल्याला नक्की माहीत नाही. तिने जर तसं केलं असेल, तर त्यामुळे तिला खूप आनंद मिळाला असेल, कारण तिला स्वतःचं मूल नव्हतं. पण एक गोष्ट आपल्याला नक्की माहीत आहे. त्या काळात काही स्त्री-पुरुष उपासना मंडपात अनैतिक कामं करत असले, तरी इफ्ताहची मुलगी मात्र यहोवाला विश्वासू होती. (१ शमु. २:२२) तिने कोणतंही अनैतिक काम केलं नाही. कारण बायबलमध्ये असं म्हटलंय: “तिने कधीच कोणत्या पुरुषासोबत संबंध ठेवले नाहीत.”
पुढे प्रेषित पौलने विश्वासू स्त्री-पुरुषांच्या यादीत इफ्ताहचासुद्धा उल्लेख केला. (इब्री ११:३२) इफ्ताह आणि त्याच्या मुलीने धैर्य दाखवण्याच्या बाबतीत एक खूप जबरदस्त उदाहरण मांडलं. इफ्ताह देवाच्या लोकांसाठी लढला आणि त्याच्या मुलीने त्याला पूर्ण पाठिंबा दिला. त्या दोघांनी मिळून यहोवाला केलेला एक खूप कठीण नवस पूर्ण केला!
याबद्दल बायबलमधून वाचा:
चर्चेसाठी:
इफ्ताह आणि त्याच्या मुलीने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?
संशोधन करा
१. अम्मोनी लोकांना इस्राएली लोकांना फक्त हरवायचं नव्हतं, तर खरी उपासनाही मिटवायची होती हे कशावरून कळतं? (इन्साइट “इप्ताह” ¶६-wcgr) १
चित्र १: “त्यांनी आपल्यामधली परकी दैवतं काढून टाकली आणि ते यहोवाची उपासना करू लागले.”—शास्ते १०:१६
२. इफ्ताहने यहोवाला नवस केला तेव्हा त्याने याकोबसारखी मनोवृत्ती कशी दाखवली? (इन्साइट “इप्ताह” ¶११-wcgr)
३. इफ्ताहला आपला नवस फेडण्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागणार होता असं का म्हणता येईल? (टेहळणी बुरूज१७.०४ ४ ¶६)
४. शमुवेल संदेष्ट्याचा जन्म इ.स.पू. ११८० च्या आसपास झाला होता. मग त्याने आणि इफ्ताहच्या मुलीने उपासना मंडपात एकाच काळात सेवा केली असावी असं का म्हणता येईल? (इन्साइट “इप्ताह” ¶२-wcgr; “कुलप्रमुखांच्या काळापासून न्यायाधीशांच्या काळापर्यंत” ही समयरेषा पाहा.)
शिकलेल्या मुद्द्यांवर विचार करा
आईवडील इफ्ताहसारखं धैर्य दाखवतात तेव्हा त्यांच्या मुलांवर कसा चांगला प्रभाव पडतो?
तरुण स्त्रियांनी इफ्ताहच्या मुलीचं कौतुक केलं आणि तिला धैर्य दाखवत राहायला मदत केली. आज ख्रिस्ती भाऊबहीण त्या तरुण स्त्रियांचं अनुकरण कसं करू शकतात? २
चित्र २
इफ्ताह आणि त्याच्या मुलीने दाखवलेल्या धैर्याचं तुम्ही तुमच्या जीवनात कसं अनुकरण करू शकता?
मनन करण्यासाठी
या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?
इफ्ताह आणि त्याच्या मुलीचं पुनरुत्थान झाल्यावर मी त्यांना काय विचारेन?
आणखी शिका
इफ्ताहच्या मुलीच्या उदाहरणातून अविवाहित भाऊबहिणींना कसं प्रोत्साहन मिळू शकतं?
इफ्ताह आणि त्याच्या मुलीच्या उदाहरणामुळे आपल्याला यहोवाला विश्वासू राहायला कशी मदत होते याकडे लक्ष द्या.
“विश्वासू राहिल्यास देवाची स्वीकृती मिळते” (टेहळणी बुरूज१६.०४ ५-९)