१८ गिदोन
तो धाडसी, पण सावध होता
खऱ्या अर्थाने धैर्य दाखवायचं असेल तर सावधगिरी बाळगणंसुद्धा आवश्यक आहे. कारण सावधगिरी न बाळगता धैर्य दाखवणं म्हणजे विनाकारण स्वतःवर संकट ओढवून घेणं. गिदोनच्या बाबतीत म्हणायचं झालं तर तो धैर्यवान आणि सावध होता. तो अशा काळात जगत होता जेव्हा इस्राएली लोक पुन्हा एकदा यहोवापासून भरकटले होते. त्याचा परिणाम असा झाला, की मिद्यानी लोकांनी इस्राएली लोकांच्या प्रदेशातला बराचसा भाग काबीज केला आणि ते त्यांच्यावर अत्याचार करू लागले. इतकंच नाही, तर ते पिकांचीसुद्धा नासधूस करू लागले. त्यामुळे इस्राएली लोक शेतात काम करायला घाबरायचे. गिदोन मात्र धैर्याने आपल्या लोकांना अन्नपाणी पुरवण्यासाठी काम करत राहिला. पण हे त्याने सावधगिरीने केलं. मिद्यानी लोकांना दिसू नये म्हणून तो धान्याची झोडपणी खडकात खोदलेल्या एका द्राक्षकुंडातच करायचा.
पुढे इस्राएली लोकांनी पश्चात्ताप केला आणि ते मदतीसाठी यहोवाचा धावा करू लागले. म्हणून यहोवाने एका संदेष्ट्याला त्यांच्याकडे पाठवलं आणि त्याने त्यांना का सोडून दिलंय हे सांगितलं. मग आपल्या लोकांची सुटका करण्यासाठी यहोवाने गिदोनला निवडलंय हे त्याला सांगण्यासाठी यहोवाने एका स्वर्गदूताला त्याच्याकडे पाठवलं. तेव्हा गिदोनने त्याच्याकडे एक चिन्ह मागितलं. म्हणून त्या स्वर्गदूताने चमत्कारिकपणे आगीचा वापर करून गिदोनने तयार केलेलं सगळं अर्पण भस्म केलं. पण त्यानंतर तो स्वर्गदूत त्याच्या नजरेसमोरून गायब झाला. त्याच रात्री यहोवा गिदोनशी बोलला आणि त्याने त्याला त्याच्या वडिलांनी बनवलेली बआल दैवताची वेदी पाडून टाकायला आणि तिच्या शेजारी असलेला पूजेचा खांब तोडून टाकायला सांगितलं. आणि नंतर आपल्यासाठी एक वेदी बांधून त्यावर अर्पण द्यायला सांगितलं. यहोवाने सांगितलं त्याप्रमाणे गिदोनने केलं. पण गिदोनला आपल्या वडिलांची आणि शहरातल्या लोकांची भीती वाटत होती. त्यामुळे आपल्याला कोणी पाहू नये म्हणून त्याने हे काम रात्रीच्या वेळी केलं.
गिदोनने केलेल्या या धाडसी कामानंतर मिद्यानी लोकांनी अमालेकी आणि पूर्वेकडच्या लोकांना गोळा केलं. इस्राएली लोकांवर हल्ला करण्यासाठी त्यांनी एक मोठं सैन्य तयार केलं आणि ते इज्रेलच्या खोऱ्यात टोळांच्या थव्यासारखे पसरले. मग यहोवाची पवित्र शक्ती गिदोनवर आली आणि त्याने इस्राएलच्या अनेक वंशांना असा संदेश पाठवला, की त्यांनी एकत्र येऊन युद्धात त्याला साथ द्यावी. पण या वेळीसुद्धा गिदोन खूप सावध होता. आपल्याला यहोवाचा पाठिंबा आहे याची खातरी व्हावी म्हणून त्याने यहोवाकडे दोन चिन्हं मागितली. यहोवासुद्धा गिदोनशी खूप धीराने वागला आणि त्याने त्याच्या म्हणण्याप्रमाणे केलं. त्या रात्री जेव्हा गिदोनने खळ्यात लोकर ठेवली तेव्हा यहोवाने ती दवाने पूर्णपणे भिजवली, पण आजूबाजूची जमीन कोरडीच ठेवली. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्या म्हणण्याप्रमाणे यहोवाने याच्या उलट केलं. जमीन पूर्णपणे भिजून गेली, पण लोकर मात्र कोरडीच राहिली.
शत्रूच्या सैन्याच्या तुलनेत गिदोनचं सैन्य खूपच कमी होतं, तरीसुद्धा यहोवाने त्याला त्यांची संख्या आणखी कमी करायला सांगितली
देवाने दिलेल्या या चिन्हांमुळे गिदोनला खूप धीर मिळाला. मग गिदोनने आपल्या ३२,००० लोकांच्या सैन्याला घेऊन शत्रूंवर हल्ला करायची तयारी केली. पण हे सैन्य त्याच्या शत्रूंच्या तुलनेत खूपच कमी होतं. कारण त्यांच्या सैनिकांची संख्या जवळजवळ १,३५,००० इतकी होती. मग गिदोन आणि त्याच्या सैनिकांनी हरोदच्या झऱ्याजवळ छावणी केली. तेव्हा यहोवाने त्याला सांगितलं, की त्याच्या सैनिकांची संख्या खूपच जास्त आहे. म्हणून यहोवाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या सैनिकांपैकी जे घाबरले होते त्यांना गिदोनने परत पाठवलं. आता त्याच्याकडे फक्त १०,००० माणसं उरली होती. पण तीही खूप जास्त आहेत असं यहोवाने त्याला सांगितलं. यहोवाने त्याला त्याच्या माणसांना खाली झऱ्याकडे घेऊन जायला आणि ते पाणी पित असताना त्यांचं निरीक्षण करायला सांगितलं. जी माणसं गुडघे टेकून खाली वाकतील आणि मान खाली घालून पाणी पितील त्यांना यहोवाने बाजूला काढायला सांगितलं. आणि जी सावध राहून, आजूबाजूला नजर ठेवत पाणी हातात घेऊन पितील, त्यांनाच लढण्यासाठी सोबत घ्यायला सांगितलं. त्यामुळे आता गिदोनकडे फक्त ३०० माणसंच उरली होती!
गिदोनचं सैन्य अगदीच छोटं असलं, तरी तो आता धाडसाने आपल्या शत्रूंवर हल्ला करायला तयार होता. यहोवा त्याच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी यहोवाने त्याला आणखी एक पुरावा दिला. त्याने गिदोनला रात्रीच्या वेळी गुपचूप शत्रूच्या छावणीत जायला सांगितलं. तिथे गेल्यानंतर एक सैनिक त्याला पडलेलं स्वप्न आपल्या सोबत्याला सांगत असल्याचं त्याने ऐकलं. तेव्हा तो सोबती त्या सैनिकाला म्हणाला की याचा अर्थ, इस्राएली लोक युद्ध जिंकतील असा होतो. या गोष्टीमुळे गिदोनचा आत्मविश्वास आणखी वाढला. मग तो आपल्या माणसांकडे परत आला आणि युद्ध कसं जिंकायचं याबद्दल त्याने त्यांना सूचना दिल्या. तो त्यांना म्हणाला: “माझ्याकडे लक्ष द्या आणि मी जसं करीन अगदी तसंच करा.” रात्रीच्या त्या अंधारात गिदोन आणि त्याच्या माणसांनी शत्रूंच्या छावणीला वेढा दिला. त्यांच्याकडे रणशिंगं होती आणि घागरींमध्ये मशाली होत्या. गिदोनने इशारा देताच त्यांनी रणशिंगं फुंकली, घागरी फोडल्या, हातांतल्या मशाली उंच धरल्या आणि ते मोठ्याने ओरडू लागले: “यहोवाची तलवार आणि गिदोनची तलवार!” अचानक झालेल्या या आवाजामुळे आणि प्रकाशामुळे शत्रूचे सैनिक खूप घाबरले. त्यांना याची खातरी झाली, की शत्रूने आपल्याला घेरलंय आणि आता ते आपल्यावर हल्ला करतील. यहोवाने त्यांना गोंधळात टाकलं आणि ते एकमेकांवरच हल्ला करू लागले. त्यामुळे आता फक्त १५,००० सैनिक उरले होते आणि तेही पळून गेले.
गिदोनने त्यांचा पाठलाग केला. शेवटी त्याने शत्रूला हरवलं आणि त्यांच्या पुढाऱ्यांना ठार मारलं. तसंच, ज्या इस्राएली लोकांनी त्याला आणि त्याच्या माणसांना या युद्धाच्या वेळी अन्नपाणी पुरवायला नकार दिला होता, त्यांनाही त्याने शिक्षा केली. मग लोकांनी गिदोनला आपला राजा बनवायचा प्रयत्न केला. पण त्याने नम्रपणे नकार देत म्हटलं: “यहोवाच तुमच्यावर राज्य करेल.” सावधगिरीने काम करणाऱ्या या धाडसी माणसाला देवाने आशीर्वाद दिला. गिदोनने इस्राएलमध्ये न्यायाधीश म्हणून जितका काळ काम केलं, त्या काळात इस्राएलमध्ये शांती होती. शिवाय गिदोन खूप मोठं आयुष्य जगला. पुढे बऱ्याच शतकांनंतर प्रेषित पौलने कमालीचा विश्वास दाखवणाऱ्या स्त्री-पुरुषांचा उल्लेख केला तेव्हा त्याने गिदोनचाही उल्लेख केला.—इब्री ११:३२.
याबद्दल बायबलमधून वाचा:
चर्चेसाठी:
गिदोनने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?
संशोधन करा
१. सैनिकाने स्वप्नात “जवाची एक गोल भाकर” पाहिली. ती गिदोनच्या सैन्याला अगदी योग्यपणे सूचित करते असं का म्हणता येईल? (शास्ते ७:१३; इन्साइट “जव” ¶७-wcgr)
२. ३०० रणशिंगांच्या आवाजामुळे मिद्यानी लोक घाबरून आणि गोंधळून का गेले? (इन्साइट “रणशिंग” ¶३-wcgr) १
चित्र १: इस्राएली लोक इशारा देण्यासाठी एडक्याच्या शिंगांचा वापर करायचे
३. मिद्यानी लोकांना हरवण्यासाठी गिदोनला आणि त्याच्या सैन्याला कायकाय करावं लागलं? (टेहळणी बुरूज०४ १०/१५ १६ ¶९-१०) २
चित्र २: गिदोनने जवळजवळ ८० किलोमीटरपर्यंत (५० मी), म्हणजे यागबहापर्यंत मिद्यानी लोकांचा पाठलाग केला (नेमका मार्ग माहीत नाही)
४. बायबलचा हा अहवाल खरा आहे हे त्यात दिलेल्या कोणत्या बारीकसारीक माहितीवरून दिसून येतं? (टेहळणी बुरूज०५ ४/१५ ३२-wcgr)
शिकलेल्या मुद्द्यांवर विचार करा
गिदोनने देवाच्या लोकांना विजय मिळवून दिला. पण तरी तो नम्र होता आणि इतरांशी खूप शांतीने बोलला. (शास्ते ८:१-३) कुटुंबप्रमुखांनी आणि मंडळीतल्या वडिलांनी घेतलेल्या एखाद्या निर्णयामुळे इतर जण नाराज होतात, तेव्हा कुटुंबप्रमुख आणि वडील गिदोनच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतात?
कोणत्या परिस्थितींमध्ये आपल्याला धैर्य दाखवण्यासोबतच सावधही राहावं लागू शकतं? ३
चित्र ३
तुम्ही तुमच्या जीवनात गिदोनने दाखवलेल्या धैर्याचं अनुकरण कसं करू शकता?
मनन करण्यासाठी
या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?
गिदोनचं पुनरुत्थान झाल्यावर मी त्याला काय विचारेन?
आणखी शिका
यहोवाच्या सेवेत तुम्हाला एखादी जबाबदारी मिळते तेव्हा तुम्ही गिदोनच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकता?
“नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते” (टेहळणी बुरूज०० ८/१ १६-१८ ¶११-१५)
तुमच्या मुलांचा देवावरचा भरवसा वाढवण्यासाठी बायबलच्या या चित्रकथेचा वापर करा.
“यहोवाने गिदोनला धैर्य दाखवायला मदत केली” (बायबलच्या चित्रकथा लेख १३-wcgr)