१६ बाराक आणि दबोरा
“मी तुझ्यासोबत नक्की येईन”
इस्राएलसाठी हा एक खूप भयानक काळ होता. लोकांनी यहोवाविरुद्ध बंड केलं होतं. यहोवाने त्यांना आधीच बजावलं होतं की ते जर असं वागत राहिले, तर तो त्यांना शत्रूंच्या हाती सोपवून देईल. ते त्यांच्यावर सतत जुलूम करतील आणि हल्ला करतील, आणि तसंच झालं. त्या वेळी कनानचा राजा याबीन राज्य करत होता. त्याचा सेनापती सीसरा हा खूप क्रूर माणूस होता. त्याचं भलंमोठं सैन्य होतं. त्याच्याकडे ९०० लोखंडी रथ होते आणि त्या रथांच्या चाकांना लांब सुऱ्या होत्या.
२० वर्षांपर्यंत सीसराच्या सैन्याने इस्राएली लोकांमध्ये दहशत माजवली होती. असं म्हटलं जातं की ते जेव्हा एखाद्या गावावर किंवा शहरावर हल्ला करायचे तेव्हा तिथल्या तरुण स्त्रियांना ते पकडून न्यायचे आणि त्यांच्यावर बलात्कार करायचे. अशा भयानक घटना घडत असल्यामुळे तिथले रस्ते सुमसाम असायचे आणि गावं ओसाड पडलेली असायची. काही इस्राएली लोकांना सोडलं, तर बाकी कोणाकडेही शस्त्रं नव्हती. आणि त्यामुळे ते स्वतःचं संरक्षण करू शकत नव्हते.
त्या काळात दबोरा नावाची एक धाडसी स्त्री यहोवाची संदेष्टी म्हणून सेवा करत होती. तसंच, इस्राएली लोकांच्या काही कठीण समस्या असल्या तर ते तिच्याकडे यायचे आणि ती त्यांवर न्याय-निर्णयसुद्धा द्यायची. यहोवाने तिचा वापर बाराकला सूचना देण्यासाठी केला. कारण इस्राएली लोकांना सोडवण्यासाठी यहोवाने बाराकला निवडलं होतं. तिने त्याला सांगितलं, की त्याने १०,००० माणसांचं सैन्य गोळा करून ताबोर डोंगरावर जावं अशी यहोवाची इच्छा आहे. हे ऐकून त्याला किती आश्चर्य वाटलं असेल याचा विचार करा! तिने त्याला असंही सांगितलं की यहोवा त्याला सीसरा आणि त्याच्या सैन्यावर विजय मिळवून देईल.
एका स्त्रीकडून युद्धाला जायची आज्ञा मिळाल्यामुळे बाराकचा अहंकार दुखावला का? मुळीच नाही. उलट तो तिला म्हणाला: “तू जर माझ्यासोबत आलीस, तर मी जाईन. नाहीतर मी जाणार नाही.” याचा अर्थ त्याच्यात विश्वासाची कमी होती असा होतो का? नक्कीच नाही. कारण बऱ्याच वर्षांनंतर प्रेषित पौलने मजबूत विश्वास असलेल्या स्त्री-पुरुषांच्या यादीत बाराकचाही उल्लेख केला. (इब्री ११:१, २, ३२) दबोराने त्याच्यासोबत आणि त्याच्या सैन्यासोबत यावं अशी जेव्हा त्याने विनंती केली तेव्हा त्याने दाखवून दिलं, की यहोवावर त्याचा मजबूत विश्वास आहे. त्याला माहीत होतं की आपल्या लोकांचं मार्गदर्शन करण्यासाठी यहोवा दबोराचा वापर करत आहे. त्यामुळे ती जर सोबत आली तर आपल्याला यहोवाकडून आणखी मार्गदर्शन मिळेल असं त्याला वाटलं. मग दबोराने धाडस दाखवलं आणि ती त्याच्यासोबत जायला तयार झाली. ती त्याला म्हणाली: “मी तुझ्यासोबत नक्की येईन.” पण तिने त्याला हेही सांगितलं, की त्याने जरी युद्ध जिंकलं तरी तो किंवा इतर कोणताही माणूस सीसराला मारणार नाही. कारण हा बहुमान यहोवाने एका स्त्रीला दिलाय.
बाराकने लगेच यहोवाने सांगितल्याप्रमाणे केलं. त्याने १०,००० धाडसी माणसांना गोळा करून एक सैन्य उभं केलं. इस्राएली लोकांकडे खरंतर खूप कमी शस्त्रं होती. तरीसुद्धा युद्धासाठी जी काही तयारी करता येईल ती बाराकने केली. मग तो त्याचं सैन्य घेऊन ताबोर डोंगरावर गेला. हा एक खूप मोठा डोंगर होता. त्याची उंची १,८४४ फूट होती आणि त्याचा आकार पालथं घातलेल्या एका मोठ्या वाटीसारखा होता. त्या डोंगरावरून समोर पसरलेला इज्रेलचा सपाट प्रदेश दिसायचा. त्या डोंगरावरून दबोरा, बाराक आणि त्याची माणसं दूरून येणाऱ्या सीसराला आणि त्याच्या सैन्याला पाहू शकत होती.
मग बाराकने काय केलं? त्याने जर एका योध्यासारखा विचार केला असता, तर सीसरा आणि त्याचे रथ ताबोर डोंगराजवळ येईपर्यंत तो थांबून राहिला असता. कारण डोंगर चढून वर येताना रथांचा वेग साहजिकच कमी झाला असता. आणि त्यामुळे बाराक आणि त्याच्या माणसांना, सीसरा आणि त्याच्या सैन्याशी लढाई करणं जास्त सोपं गेलं असतं. पण बाराकला माहीत होतं की हे युद्ध त्याचं नाही, तर यहोवाचं आहे. त्यामुळे त्याने दबोराचं ऐकलं. तिच्याद्वारे यहोवाने बाराकला सीसरावर आणि त्याच्या सैन्यावर हल्ला करायला सांगितलं. तेव्हा बाराक आणि त्याची माणसं डोंगरावरून धावत खाली सपाट प्रदेशावर आली. आता अंगावर शहारे आणणाऱ्या सीसराच्या त्या लोखंडी रथांचा त्यांना सामना करावा लागणार होता!
न्यायाधीश आणि संदेष्टी असलेल्या एका स्त्रीला एका क्रूर सेनापतीचा आणि भयंकर रथं असलेल्या त्याच्या सैन्याचा सामना करावा लागला
मानवी दृष्टिकोनातून पाहिलं तर बाराक आणि त्याच्या सैन्याला हे युद्ध जिंकणं शक्यच नव्हतं. पण त्यांनी दाखवलेलं धैर्य यहोवाने पाहिलं आणि त्यांना मदत केली. यहोवाने कनानच्या त्या सैन्याला गोंधळात टाकलं. मुसळधार पाऊस सुरू झाला. आणि पाहता पाहता इज्रेलचं संपूर्ण खोरं चिखलाने भरून गेलं, आणि त्यात ती भयंकर लोखंडी रथं रुतून बसली. त्यामुळे सीसराच्या सैनिकांना रथांमधून उतरून इस्राएली लोकांशी समोरासमोर लढावं लागणार होतं. सीसराचे ते भयंकर लोखंडी रथ आता काहीच कामाचे राहिले नव्हते. त्या युद्धातून सीसराचा एकही सैनिक वाचला नाही. पण सीसराबद्दल काय?
तो त्या चिखलातून धडपडत, वाट काढत कसातरी निसटला. तो खूप भितरा होता. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो आपल्या सैनिकांचा काहीएक विचार न करता तिथून पळून गेला. जे काही घडत होतं, ते सगळं यहोवा पाहत होता. पण सीसराचा अंत कसा करायचा हे यहोवाने आधीच ठरवलं होतं. आणि लवकरच तो ते करणार होता.
याबद्दल बायबलमधून वाचा:
चर्चेसाठी:
बाराक आणि दबोराने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?
संशोधन करा
१. सीसरा इस्राएली लोकांवर जुलूम करत होता त्या काळात लोकांचं जीवन कसं होतं? (टेहळणी बुरूज१५ ८/१ १३ ¶१-wcgr)
२. इस्राएलच्या १२ न्यायाधीशांमध्ये सहसा दबोराला का गणलं जात नाही? (टेहळणी बुरूज८७ ७/१ ३१ ¶६-८)
३. कोणत्या अर्थाने दबोरा इस्राएली लोकांसाठी ‘आईसारखी’ होती? (शास्ते ४:४, ५; ५:७; टेहळणी बुरूज१५ ८/१ १३ ¶२-wcgr) १
चित्र १
चित्र १
४. सीसराविरुद्ध “आकाशातून तारे लढले” असं दबोरा आणि बाराकने गायलं त्याचा काय अर्थ होतो? (शास्ते ५:२०; टेहळणी बुरूज०५ १/१५ २५ ¶५)
शिकलेल्या मुद्द्यांवर विचार करा
बाराकने नम्रपणे एका विश्वासू स्त्रीची मदत स्वीकारली. एक भाऊ कोणत्या परिस्थितींमध्ये बाराकच्या या उदाहरणाचं अनुकरण करू शकतो? २
चित्र २
बाराकसोबत जायला दबोराला धैर्याची गरज का होती? अशा धैर्याची आपल्याला केव्हा गरज पडू शकते?
तुम्ही आणखी कोणत्या मार्गांनी बाराक आणि दबोराने दाखवलेल्या धैर्याचं अनुकरण करू शकता?
मनन करण्यासाठी
या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?
बाराक आणि दबोराचं पुनरुत्थान झाल्यावर मी त्यांना काय विचारेन?
आणखी शिका
आपण यहोवासाठी जे काही करतो ते त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे याची खातरी या अहवालातून आपल्याला कशी मिळते ते पाहा.
“तुमच्या स्वेच्छेने पुढे येण्याच्या मनोवृत्तीमुळे यहोवाचा गौरव होतो!” (टेहळणी बुरूज१७.०४ २८-३२)
बाराक आणि दबोराच्या उदाहरणातून आपण यहोवाच्या आज्ञा पाळण्याच्या बाबतीत, त्याच्यावर भरवसा ठेवण्याच्या बाबतीत आणि मर्यादेत राहण्याच्या बाबतीत काय शिकू शकतो?
“विश्वासाद्वारे, बाराकने शक्तिशाली सैन्य पराजित केले” (टेहळणी बुरूज०३ ११/१५ २८-३१)