१० मोशे
त्याने योग्य निवड केली
मोशेला त्याचं नाव त्याच्या इब्री आईवडिलांकडून नाही, तर ज्या फारोच्या मुलीने त्याला दत्तक घेतलं होतं तिच्याकडून मिळालं. तिने त्याला हे नाव का दिलं असावं? कारण त्याचा अर्थ, “पाण्यातून वाचवलेला” असा होतो. आणि तिने त्याला तसंच वाचवलं होतं. तिला आशा होती, की मोठा होऊन तो इजिप्तच्या राजघराण्यातला एक मोठा माणूस बनेल. आणि त्याला इजिप्तमधलं चांगल्यातलं चांगलं शिक्षण मिळतंय हे पाहून तिला नक्कीच आनंद झाला असेल. त्याच्याबद्दल आपण असं वाचतो: “मोशेला इजिप्तच्या लोकांच्या सगळ्या विद्यांचं शिक्षण मिळालं.”
मोशे तरुण झाला तेव्हा तो एक प्रभावशाली व्यक्ती बनला. बायबल त्याच्याबद्दल म्हणतं: “त्याचं बोलणं आणि त्याची कार्यं खूप प्रभावशाली होती.” मोशेला हवं असतं तर तो इजिप्तमध्ये राहून धनसंपत्ती, चांगलं नाव कमवू शकला असता किंवा ऐशआरामाचं जीवन जगू शकला असता. पण या गोष्टींमुळे आपण यहोवापासून दूर जाऊ शकतो हे मोशेला माहीत होतं. मग मोशे पुढे आपल्या आयुष्यात काय करणार होता? त्याला आता एक निवड करावी लागणार होती.
मोशे ४० वर्षांचा होता तेव्हा त्याने काय निवड केली हे स्पष्ट झालं. आपण बायबलमध्ये असं वाचतो: “विश्वासानेच, मोशेने मोठा झाल्यावर स्वतःला फारोच्या मुलीचा मुलगा म्हणवून घ्यायला नकार दिला. पापाचं क्षणिक सुख उपभोगण्यापेक्षा त्याने देवाच्या लोकांसोबत अत्याचार सहन करायचं निवडलं.” मोशेने योग्य निवड केली होती आणि त्यातून त्याचा विश्वास आणि धैर्य दिसून आलं. पण त्याच्या हातून काही चुकाही झाल्या.
मोशेसाठी इस्राएली लोक त्याच्या ‘भावांसारखेच’ होते. आणि त्यांना मदत करायची त्याची इच्छा होती, कारण त्यांच्यावर खूप अन्याय होत होता. त्यांना कायकाय सहन करावं लागतंय हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी तो एकदा बाहेर पडला. त्याने पाहिलं की इजिप्तचा एक माणूस एका इब्री गुलामाला मारत होता. तो माणूस कदाचित एक अधिकारी असावा. मग मोशेने त्याला आधी रोखायचा प्रयत्न केला असेल का? आपल्याला माहीत नाही. पण मोशेने “इकडेतिकडे बघितलं” आणि त्याला कोणीच दिसलं नाही. मग त्या इब्री गुलामाला वाचवण्यासाठी त्याने त्या ‘इजिप्तच्या माणसाला’ मारून टाकलं. मोशेला खरंच त्याला मारून टाकायचं होतं का? की रागाच्या भरात त्याने त्याला इतक्या जोरात मारलं की तो मरून गेला? याबद्दलही बायबलमध्ये काहीही सांगितलेलं नाही. पण आता आपलं काही खरं नाही हे ओळखून मोशेने त्या मेलेल्या माणसाला वाळूत लपवलं.
दुसऱ्या दिवशी मोशे पुन्हा बाहेर गेला. या वेळी त्याने दोन इब्री गुलामांचं भांडण सोडवायचा प्रयत्न केला. पण त्यातला एक गुलाम त्याला असं काहीतरी बोलला ज्यामुळे भीतीने त्याचा थरकाप उडाला. तो त्याला म्हणाला: “तुम्हाला आमचा अधिकारी आणि न्यायाधीश कोणी नेमलं? इजिप्तच्या त्या माणसाला ठार मारलं, तसं आता मलाही मारण्याचा विचार आहे का?” मोशेला आता माहीत झालं, की त्याने जे केलं होतं ते सगळ्यांना कळलंय. त्यामुळे तो खूप घाबरला.
मोशेला वाटलं होतं तसं काहीच घडत नव्हतं. त्याला काय वाटत होतं? बायबल म्हणतं: “देव त्याच्याद्वारे त्याच्या भावांची सुटका करतोय, ही गोष्ट ते ओळखतील असं त्याला वाटलं होतं. पण त्यांनी ती ओळखली नाही.” यहोवाने इजिप्तच्या गुलामीतून इस्राएली लोकांची सुटका करण्यासाठी आपल्याला निवडलंय असं कदाचित मोशेला वाटलं असावं. पण त्यांची सुटका करायची यहोवाची वेळ अजून आलेली नाही हे त्याला कळलं नाही. शिवाय, इस्राएली लोक आपल्याशी असं वागतील अशीही त्याने अपेक्षा केली नव्हती. इजिप्तच्या राजघराण्यात वाढलेल्या या इब्री माणसावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता.
मोशेने काय निवडलं? धनदौलत आणि मोठं नाव कमवणं की यहोवाच्या लोकांना साथ देणं?
यहोवाच्या लोकांची गुलामीतून सुटका करायला आपण तयार आहोत असं मोशेला वाटत असलं, तरी त्यासाठी तो अजून पूर्णपणे तयार नव्हता. यहोवाला माहीत होतं, की मोशेला आणखी बरंच काही शिकायची गरज आहे. हे खरंय, की त्याच्यामध्ये बऱ्यापैकी धैर्य होतं. तो शक्तिशाली होता. आणि ‘त्याचं बोलणंही खूप प्रभावशाली होतं.’ पण तरी त्याला आणखी एका गुणाची गरज होती. तो गुण म्हणजे नम्रता. कारण हा गुण यहोवासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि कदाचित हा गुण नसल्यामुळे त्याने रागाच्या भरात इजिप्तच्या एका माणसाचा खून केला होता. आता त्याने केलेलं हे भयंकर कृत्य लवकरच फारोला कळलं.
त्यामुळे मोशेला स्वतःची बाजू मांडायची एकही संधी न देता फारोने त्याला मारून टाकायचा प्रयत्न केला. म्हणून मोशे इजिप्त सोडून पळून गेला. आता आपल्यासोबत पुढे काय होईल, आपलं पुढे कसं होईल हे मोशेला माहीत नव्हतं. कारण तो आपली धनसंपत्ती, ऐशआराम आणि मोठं नाव या सगळ्या गोष्टी मागे सोडून पळून गेला होता. आपलं घरदार सोडून दूर मिद्यान देशात पळून जाण्यासाठी त्याला नक्कीच धाडसाची गरज होती. त्या कोरड्या, रखरखीत प्रदेशात त्याला बरीच वर्षं काढावी लागणार होती, म्हणजे ‘एका परक्या देशात विदेश्यासारखं’ राहावं लागणार होतं. मग तो आपल्या स्वभावात बदल करायचं धैर्य दाखवणार होता का? यहोवाला हवा होता तसा नम्र व्यक्ती तो बनणार होता का? चला पाहू या.
याबद्दल बायबलमधून वाचा:
चर्चेसाठी:
या आध्यायात शिकल्याप्रमाणे मोशेने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?
संशोधन करा
१. बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे इस्राएली लोक इजिप्तमध्ये गुलाम होते हे सिद्ध करणारे कोणते ऐतिहासिक पुरावे आहेत? (टेहळणी बुरूज२०.०३ ३०) १
Courtesy Brooklyn Museum, gift of Theodora Wilbour
चित्र १: प्राचीन इजिप्तमधल्या गुलामांच्या नावांच्या यादीचा एक भाग. यात इब्री गुलामांची ४० पेक्षा जास्त नावं आहेत. त्यावरून कळतं की इस्राएली लोक इजिप्तमध्ये गुलाम होते
२. मोशे त्याच्या आईवडिलांकडून काय शिकला? आणि ‘इजिप्तच्या लोकांच्या ज्या विद्यांचं शिक्षण त्याला मिळालं’ त्यातून तो काय शिकला? (प्रे. कार्यं ७:२२; टेहळणी बुरूज०२ ६/१५ १० ¶२-५)
३. इजिप्तचे लोक सहसा मृत व्यक्तीला दफन कस करायचे? त्यामुळे मोशेने जेव्हा इजिप्तच्या माणसाचा खून करून त्याला वाळूत पुरलं तेव्हा त्यांना कसं वाटलं असेल? (इन्साइट “इजिप्त, इजिप्तचे लोक” ¶२८-wcgr) २
चित्र २: इजिप्तमधली एक ममी
४. मोशे मिद्यान देशात पळून गेला. मिद्यानी लोकांमध्ये आणि इस्राएली लोकांमध्ये कोणत्या गोष्टी सारख्या होत्या? (इन्साइट “मिद्यान” क्र. २ ¶१-२-wcgr)
शिकलेल्या मुद्द्यांवर विचार करा
आपल्या रागावर ताबा ठेवण्याच्या बाबतीत मोशेच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं?
योग्य ध्येयं निवडण्यासाठी कधीकधी आपल्याला धैर्याची गरज पडते. तरुण लोक मोशेच्या उदाहरणातून हे कसं शिकू शकतात? ३
चित्र ३
या अहवालात मोशेने जसं धैर्य दाखवलं तसं धैर्य तुम्ही आणखी कोणत्या मार्गांनी दाखवू शकता?
मनन करण्यासाठी
या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?
मोशेचं पुनरुत्थान झाल्यावर मी त्याला इजिप्त आणि मिद्यानमधल्या त्याच्या आयुष्याबद्दल काय विचारेन?
आणखी शिका
मोशेने त्याच्या जीवनात बरेच त्याग केले. आपण त्याच्याकडून काय शिकू शकतो ते पाहा.
विश्वासू लोकांसारखं असा, अविश्वासू लोकांसारखं नाही—मोशेसारखं, फारोसारखं नाही (२:२७)
मोशेने यहोवाची सेवा करण्यासाठी धनदौलत आणि ऐशआरामाचं जीवन सोडून दिलं. आजच्या काळात असं करणं बरोबर राहील का?