९ शिप्रा, पुवा, अम्राम, योखबेद आणि मिर्याम
त्यांच्या विश्वासामुळे मोशेचा जीव वाचला
योसेफचा मृत्यू होऊन आता ६० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला होता. यहोवाने ज्या विश्वासू माणसाचा उपयोग करून इजिप्त राष्ट्राला दुष्काळापासून वाचवलं होतं, त्या माणसालाच आता इजिप्तचे लोक विसरून गेले होते. आता एक नवीन फारो त्या देशावर राज्य करत होता. तो इस्राएली लोकांचा द्वेष करायचा आणि त्याला त्यांची भीती वाटत होती. कारण यहोवाच्या आशीर्वादामुळे त्यांची संख्या वाढतच होती. म्हणून इजिप्तच्या लोकांनी इब्री लोकांना गुलाम बनवलं. आणि ते त्यांच्याशी क्रूरपणे वागू लागले. पण तरीसुद्धा त्यांची संख्या वाढतच गेली.
पण त्यानंतर फारोने जे केलं, ते खूपच क्रूर होतं. त्याने शिप्रा आणि पुवा या दोन इब्री सुईणींना आपल्यासमोर हजर करायची आज्ञा दिली. या राजाने त्यांना असं सांगितलं, की त्या जेव्हा इब्री स्त्रियांना बाळंतपणात मदत करायला जातील, तेव्हा मुलगा झाला की मुलगी हे त्यांनी पाहावं आणि जर मुलगा झाला तर त्याला मारून टाकावं. कल्पना करा, राजाने जेव्हा हे त्यांना सांगितलं तेव्हा त्यांना कसं वाटलं असेल! पण त्या दोन धाडसी स्त्रिया यहोवाला भिऊन वागल्या. कारण त्यांना माहीत होतं की कोणतीही व्यक्ती, मग ती कितीही शक्तिशाली असली तरी ती त्यांना विश्वाचा सर्वोच्च अधिकारी असलेल्या यहोवाची आज्ञा मोडण्यापासून रोखू शकत नाही. त्यांना खऱ्या देवाची भीती असल्यामुळे त्यांनी धाडस दाखवलं. आणि इजिप्तच्या राजाने त्यांना जे सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी केलं नाही. उलट, शक्य आहे तितक्या मुलांचं त्यांनी संरक्षण केलं आणि त्यांचा जीव वाचवला. यामुळे फारो खूप चिडला. पण त्यांनी जे काही केलं होतं ते त्यांनी त्याला सांगितलं नाही. त्या जे काही करत होत्या ते यहोवाने पाहिलं आणि म्हणून यहोवाने त्यांचं “भलं केलं.” आणि काही काळाने देवाने त्यांना “मुलंबाळं दिली.”
इब्री सुईणींनी, मोशेच्या आईवडिलांनी आणि त्याच्या बहिणीने जर धाडस दाखवलं नसतं, तर मोशेचं काय झालं असतं?
फारोची ही दुष्ट योजना सफल झाली नाही, तेव्हा त्याने अतिशय क्रूरपणे आणखी एक हुकूम सोडला. त्याने असा आदेश दिला, की कोणाच्याही घरात जर जन्माला आलेलं बाळ मुलगा असेल, तर त्याला नदीत फेकून दिलं जावं. त्या भयंकर काळात आम्राम आणि योखबेद नावाच्या एका हिब्रू जोडप्याला अतिशय कठीण निर्णय घ्यावा लागला. त्यांना आधीच मिर्याम आणि अहरोन अशी दोन मुलं होती. पण योखबेद जेव्हा तिसऱ्या मुलाला जन्म देणार होती, तेव्हा तिला आणि आम्रामला हे माहीत होतं, की जर त्यांच्या घरी मुलगा जन्माला आला तर त्या बाळाचा जीव धोक्यात येईल. पण त्यांच्या घरी मुलाचाच जन्म झाला. म्हणून त्यांनी बराच काळ त्याला लपवायचा प्रयत्न केला. पण बाळाला लपवणं आता सोपं नाही हे त्यांच्या लक्षात आलं. मग ते बाळ तीन महिन्यांचं असताना योखबेदने एक पेटी घेऊन त्याला डांबर लावलं आणि बाळाला त्यात ठेवलं. मग तिने ती पेटी नाईल नदीच्या काठावर असलेल्या गवतात नेऊन ठेवली. आणि तिची मुलगी मिर्याम आपल्या लहान भावावर लक्ष ठेवण्यासाठी एका सुरक्षित अंतरावर लपली.
मग काही वेळानंतर फारोची मुलगी अंघोळीसाठी नाईल नदीवर आली तेव्हा तिला ती पेटी दिसली. तिने आपल्या दासीला ती पेटी घेऊन यायला सांगितलं. ती उघडल्यावर फारोच्या मुलीने पाहिलं, की त्यात एक सुंदर बाळ रडत आहे. ते पाहून तिला त्याची खूप दया आली आणि तिने त्याला दत्तक घ्यायचं ठरवलं. पण त्या बाळाला दूध पाजण्यासाठी आईची गरज असल्याचं तिला जाणवलं. त्या वेळी दूर उभ्या असलेल्या मिर्यामला लगेच एक युक्ती सूचली आणि ती धाडसाने फारोच्या मुलीकडे पळत आली. तिने त्या बाळासाठी, ‘मी एक दाई शोधून आणू का?’ असं फारोच्या मुलीला विचारलं आणि तिनेही होकार दिला. मग मिर्याम तिच्या आईला घेऊन आली. योखबेदला जेव्हा समजलं, की ती आता कोणाच्याही भीतीशिवाय आपल्या लाडक्या बाळाची काळजी घेऊ शकणार होती, तेव्हा तिला किती आनंद झाला असेल! शिवाय, त्यासाठी फारोची मुलगी तिला पैसेही देणार होती. आपल्या लहान मुलाला यहोवाबद्दल शिकवायला तिने आणि आम्रामने नक्कीच खूप मेहनत घेतली असेल. पण शेवटी तो दिवस आलाच. आता त्यांना आपल्या मुलाला फारोच्या मुलीकडे पुन्हा द्यावं लागलं. आणि फारोच्या मुलीने त्याचं नाव मोशे ठेवलं.
अम्राम, योखबेद आणि मिर्याम यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि धैर्यामुळे यहोवाने त्यांना आशीर्वाद दिला का? नक्कीच! अम्राम आणि योखबेद यांनी मिर्याम आणि अहरोनला ते यहोवाचे विश्वासू सेवक बनतील अशा प्रकारे वाढवलं. आणि यहोवा मोशेचं कसं संरक्षण करत आहे हेसुद्धा ते पाहू शकले. मोशे कसा चांगला माणूस बनला आणि यहोवाने किती मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग करून घेतला हे पाहण्यासाठी त्याचे आईवडील जिवंत होते का, याबद्दल बायबलमध्ये काहीच सांगितलेलं नाही. (निर्ग. ६:२०) पण मिर्याम आणि अहरोन नक्कीच जिवंत होते. त्यांनी मोशेद्वारे यहोवाला अद्भुत गोष्टी करताना पाहिलं. आणि त्या तिघांनी मिळून अतिशय जबरदस्त विश्वास आणि धैर्य दाखवलं. मोशे कोणत्या परिस्थितीत मोठा झाला आणि त्याने यहोवाची सेवा करायचं कसं ठरवलं हे आपण पुढच्या अध्यायात पाहू.
याबद्दल बायबलमधून वाचा:
चर्चेसाठी:
दोन इब्री सुईणींनी आणि मोशेच्या कुटुंबाने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?
संशोधन करा
१. बायबलमधला हा अहवाल खरा आहे हे कोणत्या ऐतिहासिक पुराव्यांवरून सिद्ध होतं? (सावध राहा!०४ ४/८ ४ ¶४-५ ¶१-wcgr)
२. बायबलमध्ये लव्हाळ्याच्या पेटीचा आणि फारोने इब्री मुलांची कत्तल करायचा हुकूम दिल्याचा उल्लेख आहे. हा अहवाल खरा असल्याचं कशावरून सिद्ध होतं? (सावध राहा!०४ ४/८ ६ ¶१-२-wcgr) १
Christine Osborne Pictures/Alamy Stock Photo
चित्र १: आजसुद्धा लव्हाळ्यापासून बोटी बनवल्या जातात
३. इब्री सुईणी कोणकोणती कामं करायच्या आणि यहोवाने त्या दोन इब्री सुईणींना कसा आशीर्वाद दिला? (टेहळणी बुरूज०३ ११/१ ८ ¶३-४; इन्साइट “सुईण”-wcgr) २
चित्र २
४. मिर्यामने अगदी वयस्कर होईपर्यंत जबरदस्त विश्वास कसा दाखवला? (त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा लेख ७ ¶१४-१८-wcgr)
शिकलेल्या मुद्द्यांवर विचार करा
अम्राम आणि योखबेद यांच्याकडून आज आईवडील काय शिकू शकतात?
ज्या मुलांना लहान भाऊबहीण आहेत ते मिर्यामकडून काय शिकू शकतात? ३
चित्र ३
शिप्रा आणि पुवा यांनी जे धाडस दाखवलं त्याचं तुम्ही तुमच्या जीवनात कसं अनुकरण करू शकता?
मनन करण्यासाठी
या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?
शिप्रा, पुवा, अम्राम, योखबेद आणि मिर्याम यांचं पुनरुत्थान झाल्यावर मी त्यांना काय विचारेन?
आणखी शिका
ज्या स्त्रियांनी फारोच्या आज्ञा न मानायचं धाडस दाखवलं त्यांच्या उदाहरणातून आपल्याला कसा फायदा होऊ शकतो ते पाहा.
“ज्यांनी यहोवाचे हृदय संतोषविले अशा स्त्रिया” (टेहळणी बुरूज०३ ११/१ ८-९ ¶३-५)
जे माणसांपेक्षा यहोवाची आज्ञा पाळतात त्यांची तो नेहमी काळजी घेतो हे आपल्याला कसं कळतं?