७ याकोब
कुटुंबाला वाचवण्यासाठी त्याने धाडस दाखवलं
याकोबचं आयुष्य संपायच्या बेतात होतं. आपल्या आयुष्याची वर्षं कशी होती याचं वर्णन त्याने मोजक्याच शब्दांत केलं. त्याने म्हटलं, “माझ्या आयुष्याची वर्षं फार कमी आणि दुःखाने भरलेली होती.” (उत्प. ४७:९) त्याला त्याच्या जीवनात बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागलं. सुरुवातीला त्याला हारानमध्ये पळून जावं लागलं. कारण त्याचा सख्खा भाऊ त्याला ठार मारायच्या बेतात होता. हारानमध्ये गेल्यावर तो राहेलच्या प्रेमात पडला. पण राहेलचे वडील लाबान यांनी त्याचं लग्न आधी तिच्या मोठ्या बहिणीशी लावून त्याला फसवलं. आता याकोबला दोन बायका होत्या. पण त्यांचं एकमेकींशी पटत नव्हतं. बऱ्याच वर्षांपर्यंत लाबानने याकोबकडून काम करून घेतलं. पण तो त्याची मजुरी वारंवार बदलत राहिला आणि त्याला फसवत राहिला. पण तरीही याकोबने कमालीचं धैर्य, विश्वास आणि सहनशीलता दाखवली.
एक दिवस यहोवाने याकोबला सांगितलं, की आता हारान सोडून परत कनान देशात घरी जायची वेळ आली आहे. पण असं करणं धोक्याचं असणार होतं. कारण लाबान खूप लोभी होता आणि याकोबकडे असलेलं सगळं आपल्याच मालकीचं आहे असं त्याला वाटायचं. मग याकोब याबद्दल त्याच्या कुटुंबाशी बोलला, त्यांना एकत्र केलं आणि लाबानला न सांगताच तो त्यांना घेऊन पळून गेला. लाबानला ही गोष्ट कळली तेव्हा त्याने त्याच्या माणसांना एकत्र केलं आणि त्यांचा पाठलाग केला. शेवटी त्याने त्यांना गाठलं आणि न सांगताच निघून गेल्यामुळे त्याला खूप सुनावलं. लाबानने तर त्याला अशी धमकीही दिली, की “मला हवं तर मी तुझं बरंवाईट करू शकतो.” पण याकोबने धैर्य दाखवलं आणि लाबान त्याच्याशी किती अन्यायीपणे वागला आणि त्याला किती धूर्तपणे खूप वर्षांपर्यंत फसवत राहिला हे त्याने त्याला बोलून दाखवलं. पण तो त्याच्यासोबत शांतीचे संबंध टिकवून ठेवायलाही तयार होता. आणि म्हणूनच शेवटी त्या दोघांनी शांतीने एकमेकांचा निरोप घेतला.
याकोबला त्याच्या घरच्या काही तापट स्वभावाच्या लोकांसोबत शांती टिकवून ठेवायला आणि एका शक्तिशाली स्वर्गदूतासोबत लढाई करायला कोणत्या गोष्टीमुळे शक्य झालं?
पण याकोबच्या समस्या इथेच संपल्या नाहीत. त्याचा जुळा भाऊ एसाव हा त्याला भेटायला येत होता. बऱ्याच वर्षांआधी त्यांच्या आईने, रिबकाने याकोबला सावध करून म्हटलं होतं, की एसाव त्याला मारायचा प्रयत्न करेल. एसावला असं वाटत होतं, की त्याला त्याच्या वडिलांकडून जो आशीर्वाद मिळणार होता तो याकोबने स्वतः घेऊन त्याची फसवणूक केली. पण आता याकोबला एसावसोबत शांतीचे संबंध जोडायचे होते. त्याला कळलं की एसाव ४०० माणसं घेऊन त्याला आणि त्याच्या कुटुंबाला भेटायला येतोय. म्हणून याकोबने एसावला भेटण्यासाठी काही माणसं पुढे पाठवली आणि त्यांच्या हातून काही मौल्यवान भेटीही पाठवल्या. पण यामुळे एसावचा राग शांत होणार होता का? बायबलमध्ये आपण असं वाचतो, “याकोब खूप घाबरला आणि चिंतेत पडला.” पण मग काहीतरी आश्चर्यकारक घडलं.
त्या रात्री, नंतर याकोबला एक अनोळखी माणूस दिसला. तो खरंतर यहोवाचा एक स्वर्गदूत होता आणि तो स्वर्गदूत याकोबशी लढू लागला. त्या स्वर्गदूताकडून आपल्याला आशीर्वाद मिळू शकतो हे याकोबला जाणवल्यामुळे तो धैर्याने कितीतरी तास त्याच्याशी लढला. याकोब ९७ वर्षांचा होता आणि स्वर्गदूत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त शक्तिशाली होता. तरीही याकोबने हार मानली नाही. तो अगदी पूर्ण शक्ती लावून लढत राहिला. इतकंच काय, तर तो आशीर्वादासाठी रडलासुद्धा. (होशे. १२:४) यहोवाकडून मिळणारा आशीर्वाद किती मौल्यवान आहे हे याकोबला माहीत होतं. आणि त्यासाठी कितीही लढावं लागलं तरी तसं करायचा त्याने पक्का निश्चय केला होता. मग पहाटे स्वर्गदूताने याकोबच्या मांडीच्या सांध्याला स्पर्श केला आणि त्याचा सांधा निखळला. पण त्या स्वर्गदूताने याकोबला एक अद्भुत गोष्टही सांगितली. ती म्हणजे, त्याचं नाव आता इस्राएल असेल. या नावाचा अर्थ ‘देवासोबत लढणारा’ असा होतो. खरंच, देवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी याकोब हार न मानता चिकाटीने लढत राहिला.
आता याकोब लंगडत लंगडत आपल्या कुटुंबाकडे गेला. मग नंतर, दूरवर त्याला एसाव आणि त्याची ४०० माणसं येताना दिसली. त्या सगळ्यांचा सामना करण्यासाठी याकोब एकटाच पुढे गेला. याकोब एसावजवळ पोचला तेव्हा त्याने सात वेळा जमिनीवर डोकं टेकवून त्याला नमस्कार केला. मग एसाव धावत त्याच्याकडे आला. पण त्याने कोणतंही शस्त्र काढलं नाही. उलट आपले हात पसरून त्याने त्याला कडकडून मिठी मारली आणि ते दोघे अक्षरशः रडले. याकोबने उदारपणे एसावला दिलेल्या भेटवस्तूंमुळे आणि त्याच्या नम्रतेमुळे एसावचा राग पूर्णपणे शांत झाला होता. याकोबने जे धैर्य दाखवलं त्याचंही एसावने कौतुक केलं असावं. अशा प्रकारे याकोबने आपल्या भावासोबत पुन्हा शांतीचे संबंध जोडले.
पुढे आयुष्यभर याकोब त्याच्या दुखापतीमुळे लंगडत राहिला. आयुष्यात त्याला आणखी बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. पण यहोवाची आज्ञा मानण्याचा आणि त्या स्वर्गदूतासोबत लढण्याचा त्याने जो निश्चय केला होता, त्याचा त्याला कधीच पस्तावा झाला नाही. काही काळानंतर यहोवाने त्याला जे अद्भुत अभिवचन दिलं होतं ते पूर्ण झालं. कारण इस्राएल आता एक मोठं राष्ट्र बनलं होतं. (उत्प. २८:१४) यासोबतच, यहोवाला बऱ्याचदा “याकोबचा देव” असंही म्हणण्यात आलंय. (निर्ग. ३:६) येशूनेसुद्धा हे शब्द वापरले आणि पुढे असं म्हटलं: “तो मेलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे. कारण त्याच्या दृष्टीने ते सगळे जिवंतच आहेत.” (लूक २०:३७, ३८) त्यामुळे याकोबचं भविष्य एकदम निश्चित आहे. नवीन जगात त्याचं आयुष्य मोजण्यापलीकडे असेल आणि त्याच्या आनंदालाही कोणतीच सीमा असणार नाही!
याबद्दल बायबलमधून वाचा:
चर्चेसाठी:
याकोबने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?
संशोधन करा
१. यहोवाने प्रथमपुत्राचा हक्क एसावऐवजी याकोबला दिला. यावरून यहोवाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं? (टेहळणी बुरूज०३ १०/१५ २९ ¶२)
२. यहोवाने याकोबला स्वप्नामध्ये काय दाखवलं आणि यामुळे याकोबला कोणत्या गोष्टीची खातरी झाली? (टेहळणी बुरूज०३ १०/१५ २८ ¶३-२९ ¶१) १
चित्र १
३. स्वर्गदूताकडून आपल्याला आशीर्वाद मिळू शकतो याबद्दल याकोबला खातरी का होती? (टेहळणी बुरूज०३ १०/१५ ३१ ¶१) २
चित्र २
४. याकोबने कनानी लोकांच्या प्रभावापासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी कोणती पावलं उचलली? (टेहळणी बुरूज९५ ९/१५ २१ ¶५, तळटीप)
शिकलेल्या मुद्द्यांवर विचार करा
आपण लाबानच्या प्रत्येक मेंढरासाठी जबाबदार आहोत असं याकोबला वाटायचं. (उत्प. ३१:३८-४०) त्याचप्रमाणे आज ख्रिस्ती मेंढपाळसुद्धा यहोवाच्या मेंढरांबद्दल, म्हणजे त्यांच्या भाऊबहिणींबद्दल याकोबपेक्षाही जास्त काळजी असल्याचं कसं दाखवू शकतात? ३
चित्र ३
याकोबला भीती वाटली तेव्हा त्याने यहोवाला प्रार्थना केली. (उत्प. ३२:६-१२) प्रार्थना कशी केली पाहिजे याबद्दल तुम्हाला याकोबकडून काय शिकायला मिळतं?
याकोबने जे धैर्य दाखवलं त्याचं तुम्ही कसं अनुकरण करू शकता?
मनन करण्यासाठी
या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?
याकोबचं पुनरुत्थान झाल्यावर मी त्याला काय विचारेन?
आणखी शिका
आपण एखाद्या भावाचं किंवा बहिणीचं मन दुखवलंय हे आपल्याला जाणवतं, तेव्हा आपण याकोबचं अनुकरण कसं करू शकतो?
आपल्या कुटुंबाला याकोबबद्दल शिकवण्यासाठी बायबलच्या चित्रकथा याचा वापर करा.