वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es25 पृ. ५७-७०
  • मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मे
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२५
  • उपशिर्षक
  • गुरुवार, १ मे
  • शुक्रवार, २ मे
  • शनिवार, ३ मे
  • रविवार, ४ मे
  • सोमवार, ५ मे
  • मंगळवार, ६ मे
  • बुधवार, ७ मे
  • गुरुवार, ८ मे
  • शुक्रवार, ९ मे
  • शनिवार, १० मे
  • रविवार, ११ मे
  • सोमवार, १२ मे
  • मंगळवार, १३ मे
  • बुधवार, १४ मे
  • गुरुवार, १५ मे
  • शुक्रवार, १६ मे
  • शनिवार, १७ मे
  • रविवार, १८ मे
  • सोमवार, १९ मे
  • मंगळवार, २० मे
  • बुधवार, २१ मे
  • गुरुवार, २२ मे
  • शुक्रवार, २३ मे
  • शनिवार, २४ मे
  • रविवार, २५ मे
  • सोमवार, २६ मे
  • मंगळवार, २७ मे
  • बुधवार, २८ मे
  • गुरुवार, २९ मे
  • शुक्रवार, ३० मे
  • शनिवार, ३१ मे
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२५
es25 पृ. ५७-७०

मे

गुरुवार, १ मे

संपूर्ण पृथ्वीवर एक मोठा दुष्काळ येणार आहे.—प्रे. कार्यं ११:२८.

“संपूर्ण पृथ्वीवर” मोठा दुष्काळ पडला तेव्हा पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनाही त्याची झळ बसली. आपल्या कुटुंबाच्या गरजा कशा भागवायच्या याची चिंता कुटुंबप्रमुखांना पडली असेल. शिवाय ज्या तरुणांना यहोवाची आणखी सेवा करायची इच्छा होती त्यांच्यावरसुद्धा या परिस्थितीचा प्रभाव पडला असेल. त्यांनी कदाचित असा विचार केला असेल, की हा दुष्काळ संपल्याशिवाय आपल्याला सेवा पुढे वाढवता येणार नाही. पण परिस्थिती कशीही असली तरी या ख्रिश्‍चनांनी परिस्थितीशी जुळवून घेतलं. ते जमेल त्या मार्गाने प्रचार करत राहिले आणि त्यांच्याकडे जे काही होतं ते त्यांनी आपसात वाटून घेतलं (प्रे. कार्यं ११:२९, ३०) ज्या भाऊबहिणींना मदतकार्य पुरवण्यात आलं त्यांनी स्वतः हे अनुभवलं, की यहोवा त्यांना कशा प्रकारे मदत करत आहे. (मत्त. ६:३१-३३) त्यांना मदत करणाऱ्‍या भाऊबहिणींसोबत त्यांचं नातं नक्कीच घट्ट झालं असेल. आणि ज्या भाऊबहिणींनी त्यांच्यासाठी दान दिलं किंवा इतर मार्गांनी मदत केली, त्यांनासुद्धा ‘देण्यात जास्त आनंद आहे’ या गोष्टीचा अनुभव आला असेल.—प्रे. कार्यं २०:३५. टेहळणी बुरूज२३.०४ १६ ¶१२-१३

शुक्रवार, २ मे

आपण जे मागितलं ते आपल्याला मिळेल हेही आपल्याला माहीत आहे, कारण आपण त्याच्याजवळ ते मागितलं आहे.—१ योहा. ५:१५.

यहोवा आपल्या सेवकांच्या प्रार्थनांचं उत्तर देण्यासाठी काही वेळा त्याची उपासना न करणाऱ्‍या लोकांचाही उपयोग करू शकतो. उदाहरणार्थ, नहेम्याने अर्तहशश्‍त राजाकडे जाऊन यरुशलेमला जायची आणि ते शहर पुन्हा बांधायची विनंती केली, तेव्हा यहोवाने ती विनंती मान्य करायला राजाला प्रवृत्त केलं. (नहे. २:३-६) आजसुद्धा यहोवा आपल्या लोकांची मदत करण्यासाठी त्याची उपासना न करणाऱ्‍या लोकांना प्रवृत्त करू शकतो. आपल्या प्रार्थनांचं उत्तर नेहमीच आश्‍चर्यकारक रितीने मिळेल असं नाही. पण यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर ज्या प्रकारे देतो त्यामुळे त्याला विश्‍वासू राहायला आपल्याला मदत होते. म्हणून तो कशा प्रकारे आपल्या प्रार्थनांचं उत्तर देतो याकडे नेहमी लक्ष असू द्या. आपण वेळोवेळी थोडं थांबू शकतो आणि यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर कसं देत आहे, यावर विचार करू शकतो. (स्तो. ६६:१९, २०) आपण फक्‍त प्रार्थना करूनच नाही, तर यहोवा ज्या कोणत्या पद्धतीने त्या प्रार्थनांचं उत्तर देतो, ते स्वीकारूनसुद्धा त्यावर विश्‍वास असल्याचं दाखवत असतो.—इब्री ११:६. टेहळणी बुरूज२३.०५ ११ ¶१३; १२ ¶१५-१६

शनिवार, ३ मे

माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करायला मला आनंद वाटतो.—स्तो. ४०:८.

आपण जेव्हा यहोवाला आपलं जीवन समर्पित केलं होतं, तेव्हा आपण फक्‍त त्याचीच उपासना करायचं आणि त्याची इच्छा पूर्ण करायचं वचन त्याला दिलं होतं. आपण हे वचन पाळलं पाहिजे. आपण यहोवाला केलेल्या समर्पणानुसार जगणं कठीण नाही. कारण त्याची इच्छा काय आहे हे आपण ओळखावं आणि त्याप्रमाणे जगावं या क्षमतेनेच त्याने आपल्याला बनवलंय. (प्रकटी. ४:११) त्याने आपल्यामध्ये त्याला जाणून घेण्याची आणि त्याची उपासना करण्याची इच्छा घातली आहे. तसंच त्याने आपल्याला त्याच्या प्रतिरूपात बनवलं आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यासोबत एक जवळचं नातं जोडणं शक्य होतं. आणि त्याची इच्छा पूर्ण केल्यामुळे आपल्याला आनंद मिळू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जेव्हा आपण देवाची इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्या मुलाचं अनुकरण करतो तेव्हा आपल्याला ‘तजेलासुद्धा’ मिळतो. (मत्त. ११:२८-३०) म्हणून यहोवावर असलेलं तुमचं प्रेम वाढवत राहण्यासाठी त्याने आत्तापर्यंत तुमच्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्यांवर तुम्ही मनन करू शकता आणि पुढे ज्या चांगल्या गोष्टी तो तुमच्यासाठी करणार आहे, त्यांवरसुद्धा तुम्ही विचार करू शकता. यहोवावरचं तुमचं प्रेम जितकं जास्त वाढत राहील तितकं तुम्हाला त्याच्या आज्ञा पाळणं सोपं जाईल. (१ योहा. ५:३) येशू देवाची इच्छा यासाठी पूर्ण करू शकला कारण त्याने मदतीसाठी यहोवाकडे प्रार्थना केली आणि त्याला मिळणाऱ्‍या प्रतिफळावर लक्ष केंद्रित केलं. (इब्री ५:७; १२:२) येशूप्रमाणेच मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करा आणि सर्वकाळाच्या जीवनाची आशा नेहमी आपल्या डोळ्यांसमोर ठेवा. टेहळणी बुरूज२३.०८ २७-२८ ¶४-५

रविवार, ४ मे

देव दयाळूपणे तुला पश्‍चात्ताप करायला प्रवृत्त करायचा प्रयत्न करत आहे, हे न ओळखून तू देवाची अपार दया, धीर आणि सहनशीलता यांना तुच्छ लेखतोस?—रोम. २:४.

धीर धरायला तयार असणारी माणसं आपल्या सगळ्यांनाच आवडतात. जे लोक चीडचीड न करता किंवा अस्वस्थ न होता धीराने वाट पाहायला तयार असतात, त्यांचा आपण आदर करतो. आणि आपल्याकडून चुका होतात तेव्हा इतर लोक धीराने आपलं समजून घ्यायला तयार असतात तेव्हा त्यांच्याबद्दलही आपल्याला आदर वाटतो. आपण बायबल अभ्यास करत होतो तेव्हा बायबलची एखादी शिकवण शिकायला, ती स्वीकारायला किंवा ती लागू करायला आपल्याला कठीण जायचं, त्या वेळी बायबल शिकवणारे आपले शिक्षक आपल्याशी खूप धीराने वागले. त्यासाठी आपण त्यांचे आभारी आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यहोवा देव आपल्या बाबतीत धीर दाखवतो त्यासाठी आपण त्याचे मनापासून आभारी आहोत! इतरांनी धीर दाखवल्यावर आपल्याला बरं वाटतं. पण काही वेळा आपल्याला धीर दाखवणं कठीण जाऊ शकतं. उदाहरणार्थ, कुठेतरी जायला आपल्याला उशीर झाला असेल आणि आपण ट्राफिकमध्ये अडकलो असलो, तर आपल्याला शांत राहायला कदाचित कठीण जाईल. तसंच, दुसरे जेव्हा आपल्याला चीड आणतात तेव्हा कदाचित आपल्याला राग येईल. इतकंच काय तर यहोवाने नवीन जगाचं जे वचन दिलंय त्यासाठी धीराने वाट पाहणंसुद्धा आपल्याला कठीण जाऊ शकतं. असं असलं तरी आपल्याला सर्व बाबतींत धीर दाखवणं गरजेचंय. टेहळणी बुरूज२३.०८ २० ¶१-२

सोमवार, ५ मे

त्याने ३०० माणसांना ठेवून घेतलं आणि बाकीच्यांना घरी पाठवून दिलं.—शास्ते ७:८.

यहोवाने सांगितल्यामुळे गिदोनने जवळजवळ ९९ टक्क्यांपेक्षा जास्त सैन्य कमी केलं होतं. ‘असं करणं खरंच गरजेचं आहे का?’ किंवा ‘एवढं कमी सैन्य घेऊन युद्ध करता येईल का?’ असा विचार कदाचित त्याच्या मनात आला असेल. पण तरीसुद्धा त्याने मिळालेल्या मार्गदर्शनाचं पालन केलं. आजसुद्धा संघटनेकडून काही फेरबदल करायला सांगितले जातात तेव्हा गिदोनप्रमाणेच वडील ते लागू करतात. (इब्री १३:१७) गिदोनवर सोपवलेल्या कामात धोका होता आणि त्याला भीतीही वाटत होती तरी त्याने यहोवाची इच्छा पूर्ण केली. (शास्ते ९:१७) यहोवा त्याच्यासोबत आहे यावर गिदोनला पूर्ण विश्‍वास होता. त्यामुळे देवाच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी यहोवा त्याला मदत करेल याची त्याला पक्की खातरी होती. आज आपल्या कामावर जिथे बंदी आहे त्या ठिकाणी राहणारे वडील गिदोनच्या उदाहरणाचं अनुकरण करायचा प्रयत्न करतात. अटक होण्याचा, अधिकाऱ्‍यांकडून चौकशी होण्याचा, नोकरी गमावण्याचा किंवा मारहाण होण्याचा धोका असला तरीही ते सभा आणि प्रचार कार्यात धैर्याने पुढाकार घेतात. मोठ्या संकटाच्या वेळीसुद्धा वडिलांना अशा सूचना मिळतील ज्यांत धोका असेल. पण त्या वेळीसुद्धा त्यांना धैर्य दाखवून ते पाळायची गरज असेल. टेहळणी बुरूज२३.०६ ५-६ ¶१२-१३

मंगळवार, ६ मे

जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन.—१ शमु. २:३०.

यहोयादा महायाजकाने केलेल्या चांगल्या कामांबद्दल यहोवाने त्याच्या वचनात आपल्या मार्गदर्शनासाठी लिहून ठेवलं. (रोम. १५:४) आणि पुढे जेव्हा यहोयादाचा मृत्यू झाला तेव्हा यहोवाने त्याला एक खास बहुमान दिला. बायबल म्हणतं, “त्यांनी त्याला दावीदपुरात राजांच्या कबरेत दफन केलं. कारण, त्याने खरा देव आणि त्याचं मंदिर यांच्या बाबतीत इस्राएलमध्ये चांगली कामं केली होती.” (२ इति. २४:१५, १६) यहोयादाचं उदाहरण आपल्याला यहोवाची भीती बाळगायला मदत करतं. मंडळीतले वडीलसुद्धा यहोयादाप्रमाणे सावध राहून देवाच्या कळपाचं एकनिष्ठपणे संरक्षण करतात. (प्रे. कार्यं २०:२८) मंडळीतले वृद्ध भाऊबहीणसुद्धा यहोयादाच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतात. त्यांनी जर यहोवाची भीती बाळगली आणि ते जर त्याला एकनिष्ठ राहिले, तर यहोवा त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी नक्की त्यांचा वापर करेल. यहोवा यहोयादाशी कसा वागला, हे मंडळीतले तरुणसुद्धा लक्षात घेऊ शकतात. आणि तेसुद्धा त्याचं अनुकरण करून मंडळीतल्या वृद्ध भाऊबहिणींना, खासकरून जे बऱ्‍याच काळापासून यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत आहेत त्यांना आदर आणि सन्मान देऊ शकतात. (नीति. १६:३१) तर चला आपण नेहमी “जे [आपलं] नेतृत्व करत आहेत” त्यांच्या अधीन राहून त्यांना एकनिष्ठपणे पाठिंबा देत राहू या.—इब्री १३:१७. टेहळणी बुरूज२३.०६ १७ ¶१४-१५

बुधवार, ७ मे

नीतिमानाचे बोल बऱ्‍याच लोकांचं पोषण करतात.—नीति. १०:२१.

सभेत उत्तर देण्यासाठी किती वेळा हात वर करायचा हे ठरवताना समंजसपणा दाखवा. तुम्ही जर सारखा-सारखा हात वर केला, तर इतरांना अजून संधी मिळाली नसली तरी संचालकावर तुम्हालाच उत्तर विचारायचा दबाव येईल. त्यामुळे इतर जण कदाचित निराश होतील आणि त्यांना हात वर करावासा वाटणार नाही. (उप. ३:७) अभ्यासदरम्यान उत्तर देण्यासाठी बरेच जण हात वर करतात तेव्हा आपल्याला पाहिजे तितक्या वेळा संधी मिळेलच असं नाही. आणि कधीकधी तर आपल्याला एकही संधी मिळणार नाही. अशा वेळी वाईट वाटणं साहजिक आहे, पण आपण जास्त मनाला लावून घेऊ नये. (उप. ७:९) सभेत तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा उत्तरं देता आली नाहीत, तर इतरांची उत्तरं तुम्ही लक्ष देऊन ऐकू शकता का? आणि सभेनंतर त्यांबद्दल त्यांची प्रशंसा करू शकता का? तुमच्या उत्तरांमुळे भाऊबहिणींना जितकं प्रोत्साहन मिळालं असतं, तितकंच त्यांची प्रशंसा केल्यामुळे त्यांना मिळू शकतं. टेहळणी बुरूज२३.०४ २३-२४ ¶१४-१६

गुरुवार, ८ मे

हे देवा, माझं मन खंबीर आहे.—स्तो. ५७:७.

देवाच्या वचनाचा अभ्यास करा आणि त्यावर मनन करा. झाडाची मुळं खोलवर गेली असतील तर झाड मजबूतपणे उभं राहू शकतं. त्याचप्रमाणे देवाच्या वचनाचा अभ्यास करून आपण आपल्या विश्‍वासाची मुळं खोलवर रुजवलेली असतील तर आपल्याला ठाम उभं राहता येईल. जसजसं एखादं झाड वाढत जातं, तसतशी त्याची मुळं आणखी खोलवर व दूरवर पसरत जातात. त्याचप्रमाणे आपण जेव्हा देवाच्या वचनाचा अभ्यास करून त्यावर मनन करतो, तेव्हा आपला विश्‍वाससुद्धा आणखी मजबूत होत जातो. तसंच देवाचे मार्गच श्रेष्ठ आहेत यावरचा आपला भरवसाही वाढत जातो. (कलस्सै. २:६, ७) जुन्या काळात देवाच्या सेवकांना यहोवाच्या सूचनांमुळे, मार्गदर्शनामुळे आणि संरक्षणामुळे कसा फायदा झाला, त्याचा विचार करा. उदाहरणार्थ, यहेज्केलने पाहिलेल्या लाक्षणिक मंदिराच्या दृष्टान्ताचा विचार करा. त्यात स्वर्गदूत मंदिराचं मोजमाप करत असताना यहेज्केलने बारकाईने लक्ष दिलं. या दृष्टान्तामुळे यहेज्केलचा विश्‍वास मजबूत झाला. तसंच, शुद्ध उपासनेसाठी असलेल्या यहोवाच्या स्तरांवर आपण कसं चालू शकतो, यासाठी हा दृष्टान्त आज आपल्यालाही मदत करतो. (यहे. ४०:१-४; ४३:१०-१२) आजसुद्धा आपण देवाच्या वचनातल्या गहन गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी वेळ काढतो तेव्हा आपल्यालाही फायदा होतो. आपणही यहोवावर पूर्ण भरवसा ठेवून आपलं मन खंबीर करू शकतो.—स्तो. ११२:७. टेहळणी बुरूज२३.०७ १८ ¶१५-१६

शुक्रवार, ९ मे

विचारशक्‍तीचं रक्षण कर.—नीति. ३:२१.

बायबलमध्ये अशी बरीच चांगली उदाहरणं आहेत, ज्यांचं अनुकरण तरुण लोक करू शकता. पूर्वीच्या काळात होऊन गेलेल्या या विश्‍वासू सेवकांचं देवावर प्रेम होतं आणि त्याच्या लोकांची काळजी घेण्यासाठी त्यांनी बऱ्‍याच जबाबदाऱ्‍या पार पाडल्या. तसंच, तुमच्या स्वतःच्याच कुटुंबामध्ये आणि मंडळीमध्ये असे बरेच जण असतील, ज्यांच्या चांगल्या उदाहरणाचं तुम्ही अनुकरण करू शकता. (इब्री १३:७) यासोबतच येशूचं सगळ्यात चांगलं उदाहरणसुद्धा तुमच्यासमोर आहे. (१ पेत्र २:२१) या सर्व उदाहरणांचा अभ्यास करताना त्यांच्या चांगल्या गुणांबद्दल विचार करा. (इब्री १२:१, २) आणि मग तुम्ही त्यांचं अनुकरण कसं कराल याचा विचार करा. विचार करून वागणारी व्यक्‍ती कोणतीही गोष्ट करण्याआधी तिच्या परिणामांचा काळजीपूर्वक विचार करते. म्हणून ही क्षमता वाढवण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी मेहनत घ्या. सर्वात आधी बायबलमधली तत्त्वं शिकून घ्या आणि त्यांचं पालन केल्यामुळे तुम्हाला कसा फायदा होईल याचा विचार करा. आणि मग यहोवाला आवडतील असे निर्णय घेण्यासाठी या तत्त्वांचा वापर करा. (स्तो. ११९:९) एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍ती बनण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल आहे असं म्हणता येईल.—नीति. २:११, १२; इब्री ५:१४. टेहळणी बुरूज२३.१२ २४-२५ ¶४-५

शनिवार, १० मे

तुम्ही बाळगत असलेल्या आशेबद्दल जो कोणी प्रश्‍न विचारतो, त्याला उत्तर देण्यासाठी नेहमी तयार राहा, पण सौम्यतेने आणि मनापासून आदर दाखवून असं करा.—१ पेत्र ३:१५.

आपल्या विश्‍वासाबद्दल जेव्हा प्रश्‍न विचारले जातात तेव्हा त्या प्रश्‍नांचं सौम्यतेने कसं उत्तर देता येईल, हे पालक शाळेत जाणाऱ्‍या आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिकवू शकतात. (याको. ३:१३) त्यासाठी काही पालक आपल्या कौटुंबिक उपासनेच्या वेळी आपल्या मुलांसोबत चर्चासुद्धा करतात. आपल्या मुलांना कोणत्या विषयांवर प्रश्‍न विचारले जातील या गोष्टीचा ते विचार करतात. आणि या प्रश्‍नांची उत्तरं सौम्यतेने आणि इतर जण ऐकून घ्यायला तयार होतील, अशा प्रकारे कशी देता येतील याबद्दल ते मुलांसोबत मिळून चर्चा करतात. तसंच, ते त्यांच्यासोबत चांगला सराव करतात. पालक जेव्हा अशा प्रकारे मुलांसोबत सराव करतात, तेव्हा मुलांना आपल्या विश्‍वासाबद्दल इतरांसोबत पूर्ण खातरीने बोलता येतं. शिवाय आपण जे मानतो, ते का मानतो याबद्दल स्वतःला खातरी करून द्यायलाही त्यांना मदत होऊ शकते. jw.org वर “तरुण लोक विचारतात” या लेखमालिकेत तरुणांसाठी काही वर्कशिटसुद्धा देण्यात आल्या आहेत. या वर्कशिट अशा प्रकारे बनवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे तरुणांना आपला विश्‍वास आणखी मजबूत करायला आणि आपल्या विश्‍वासाबद्दल विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्यायला मदत होईल. याशिवाय, या लेखमालिकेचा घरच्यांसोबत मिळून अभ्यास केल्यामुळे आपल्या सगळ्यांनाच सौम्यतेने आणि लोक आपलं ऐकून घेतील अशा प्रकारे उत्तरं द्यायला मदत होईल. टेहळणी बुरूज२३.०९ १७ ¶१०; १८ ¶१५-१६

रविवार, ११ मे

आपण हिंमत हारून चांगलं ते करत राहायचं सोडू नये. कारण जर आपण खचून गेलो नाही, तर योग्य वेळी आपल्या पदरी पीक पडेल.—गलती. ६:९.

तुम्ही एखादं आध्यात्मिक ध्येय ठेवलं पण तुम्हाला ते पूर्ण करता आलं नाही, असं कधी तुमच्या बाबतीत घडलंय का? तसं असेल तर निराश होऊ नका. बऱ्‍याच जणांच्या बाबतीत असं झालंय. उदाहरणार्थ, फिलिप नावाच्या एका भावाला असं वाटायचं, की आपण आणखी चांगल्या प्रकारे आणि जास्त प्रार्थना केली पाहिजे. पण त्यासाठी वेळ काढणं त्याला मुश्‍कील जायचं. एरिका नावाच्या बहिणीने ठरवलं होतं, की क्षेत्रसेवेच्या प्रत्येक सभेला आपण वेळेवर हजर राहायचं. पण तसं झालं नाही. प्रत्येक सभेला ती उशीराच पोचायची. तुम्ही जर एखादं ध्येय ठेवलं असेल आणि ते अजून गाठलं नसेल, तर निराश होऊ नका. कारण एखादं छोटंसं ध्येय गाठण्यासाठीसुद्धा वेळ आणि मेहनत लागते. पण तुम्हाला तुमचं ध्येय गाठायची अजूनही इच्छा आहे यावरून दिसून येतं, की यहोवासोबतचं नातं तुमच्यासाठी खूप मोलाचं आहे आणि तुम्हाला त्याची चांगल्या प्रकारे सेवा करायची इच्छा आहे. तुमच्या या मेहनतीची यहोवा मनापासून कदर करतो. पण तुम्हाला जे जमणार नाही, त्याची अपेक्षा तो कधीच तुमच्याकडून करणार नाही. (स्तो. १०३:१४; मीखा ६:८) त्यामुळे तुम्ही जेव्हा एखादं ध्येय ठेवाल, तेव्हा असं ध्येय ठेवा जे तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला गाठता येईल. टेहळणी बुरूज२३.०५ २६ ¶१-२

सोमवार, १२ मे

देव आपल्या बाजूने आहे, तर आपल्या विरोधात कोण उभं राहू शकतं?—रोम. ८:३१.

धैर्यवान लोकांनाही भीती वाटू शकते. पण असं असलं तरी योग्य ते करायला ते कचरत नाहीत. दानीएल वयाने लहान असला तरी तो खूप धैर्यवान होता. त्याने देवाच्या संदेष्ट्यांनी लिहिलेल्या गोष्टींचा अभ्यास केला. यांमध्ये यिर्मयाच्या भविष्यवाणीचासुद्धा समावेश होतो. या अभ्यासातून दानीएलला हे कळलं, की बऱ्‍याच काळापासून बाबेलच्या बंदिवासात असलेल्या यहुद्यांची लवकरच सुटका होणार आहे. (दानी. ९:२) बायबलची भविष्यवाणी कशी पूर्ण होत आहे हे पाहिल्यामुळे त्याचा यहोवावरचा भरवसा नक्कीच वाढला असेल. आणि ज्यांचा यहोवावर भरवसा असतो, ते सहसा जबरदस्त धैर्य दाखवतात. (रोमकर ८:३२, ३७-३९ सोबत तुलना करा.) आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तो आपल्या स्वर्गातल्या पित्याला नेहमी प्रार्थना करायचा. (दानी. ६:१०) त्याने यहोवासमोर आपल्या चुका कबूल केल्या आणि आपलं मन त्याच्यासमोर मोकळं केलं. तसंच त्याने देवाकडे मदतसुद्धा मागितली. (दानी. ९:४, ५, १९) तो आपल्यासारखाच एक माणूस होता, त्यामुळे त्यालाही धैर्य दाखवायला शिकावं लागलं. त्याने अभ्यास करून, प्रार्थना करून आणि यहोवावर भरवसा ठेवून हा गुण स्वतःमध्ये वाढवला. टेहळणी बुरूज२३.०८ ३ ¶४; ४ ¶७

मंगळवार, १३ मे

तुमचा प्रकाश लोकांपुढे पडू द्या, म्हणजे ते तुमची चांगली कामं पाहून स्वर्गातल्या तुमच्या पित्याचा गौरव करतील.—मत्त. ५:१६.

जेव्हा आपण वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या आज्ञेत राहतो तेव्हा आपल्याला आणि इतरांनाही त्याचा फायदा होतो. ते कसं? एक गोष्ट म्हणजे, जे लोक नियम मोडतात त्यांना मिळणारी शिक्षा आपल्याला होत नाही. (रोम. १३:१, ४) आपण जेव्हा स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या आज्ञेत राहतो तेव्हा अधिकाऱ्‍यांना कळतं, की यहोवाचे साक्षीदार चांगले लोक आहेत. उदाहरणार्थ, काही दशकांआधी नायजेरियामध्ये कर भरावा लागू नये म्हणून लोक दंगली करत होते. अशा लोकांना शोधण्यासाठी काही सैनिक सभा चालू असताना आपल्या राज्य सभागृहात घुसले. पण नंतर त्यांच्या अधिकाऱ्‍याने त्यांना तिथून जायला सांगितलं. तो म्हणाला: “यहोवाचे साक्षीदार नेहमीच कर भरतात.” यावरून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट कळते, की आपण जेव्हा नियमांचं पालन करतो तेव्हा आपण यहोवाच्या साक्षीदारांचं चांगलं नाव टिकवून ठेवतो. आणि या चांगल्या नावामुळे पुढे भाऊबहिणींचं संरक्षण होऊ शकतं. टेहळणी बुरूज२३.१० ९ ¶१३

बुधवार, १४ मे

देवाची इच्छा पूर्ण केल्यावर, त्याने दिलेल्या अभिवचनाचं प्रतिफळ तुम्हाला मिळावं, म्हणून तुम्हाला धीराची गरज आहे.—इब्री १०:३६.

यहोवाचे काही सेवक बऱ्‍याच काळापासून या जगाचा अंत होण्याची वाट पाहत आहेत. मानवी दृष्टिकोनातून देवाचं हे अभिवचन पूर्ण व्हायला खूप वेळ लागत आहे असं आपल्याला वाटेल. आपल्याला कसं वाटतं हे यहोवाला चांगलं माहीत आहे. आणि म्हणूनच प्राचीन काळात त्याने हबक्कूक संदेष्ट्याला अशी खातरी दिली होती, की “हा दृष्टान्त अजूनही आपल्या नेमलेल्या वेळेची वाट पाहत आहे, तो लवकरच पूर्ण होईल, तो खोटा ठरणार नाही. तो पूर्ण व्हायला उशीर लागला, तरी त्याची वाट पाहत राहा! कारण तो नक्कीच खरा ठरेल. त्याला उशीर होणार नाही!” (हब. २:३) यहोवाने ही खातरी फक्‍त हबक्कूक संदेष्ट्याला नाही, तर आपल्यालाही दिली आहे. कारण देवाच्या प्रेरणेने प्रेषित पौलने हे शब्द नव्या जगाची वाट पाहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांनाही लागू केले. (इब्री १०:३७) त्यामुळे नवीन जग यायला खूप उशीर होत आहे असं जरी आपल्याला वाटत असलं, तरी आपण याची खातरी ठेवू शकतो, की ‘ते नक्कीच खरं ठरेल. त्याला उशीर होणार नाही!’ टेहळणी बुरूज२३.०४ ३० ¶१६

गुरुवार, १५ मे

[सर्व इस्राएली लोक] मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध कुरकुर करू लागले.—गण. १४:२.

यहोवा मोशेला आपला प्रतिनिधी म्हणून वापरत आहे याचे स्पष्ट पुरावे असूनही बऱ्‍याच इस्राएली लोकांनी त्याला नाकारलं. (गण. १४:१०, ११) यहोवा मोशेद्वारे आपलं मार्गदर्शन करतोय ही गोष्ट ओळखायला ते वारंवार चुकले. याचा परिणाम असा झाला, की यहोवाने त्या पिढीला वचन दिलेल्या देशात जाऊ दिलं नाही. (गण. १४:३०) असं असलं तरी काही इस्राएली लोकांनी यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन केलं. उदाहरणार्थ, यहोवाने म्हटलं, की “[कालेबने] मनापासून माझ्या आज्ञा पाळल्या.” (गण. १४:२४) त्यामुळे देवाने कालेबला आशीर्वाद दिला आणि कनान देशात त्याला हवी ती जागा निवडायची संधी दिली. (यहो. १४:१२-१४) इस्राएली लोकांच्या पुढच्या पिढीनेसुद्धा यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन करण्याच्या बाबतीत एक चांगलं उदाहरण मांडलं. जेव्हा यहोवाने मोशेऐवजी यहोशवाला त्यांचं नेतृत्व करण्यासाठी निवडलं तेव्हा त्यांनी “तो जिवंत असेपर्यंत [त्याचा] आदर केला.” (यहो. ४:१४) त्यामुळे यहोवाने त्यांना वचन दिलेल्या देशात नेऊन आशीर्वाद दिला.—यहो. २१:४३, ४४. टेहळणी बुरूज२४.०२ २१ ¶६-७

शुक्रवार, १६ मे

जो कोणी देवावर प्रेम करतो, त्याने आपल्या भावावरही प्रेम केलं पाहिजे.—१ योहा. ४:२१.

आपली नाडी तपासल्यामुळे डॉक्टरला आपल्या हृदयाची स्थिती कळते, त्याच प्रकारे भाऊबहिणींवर आपलं किती प्रेम आहे हे तपासल्यामुळे आपलं देवावर किती प्रेम आहे हे आपल्याला कळतं. भाऊबहिणींवरचं आपलं प्रेम आधीपेक्षा कमी झालंय असं जर आपल्याला जाणवलं तर यावरून कळेल की देवावरचं आपलं प्रेम कमी होत चाललंय. पण आपण भाऊबहिणींना नियमितपणे प्रेम दाखवत राहिलो, तर यावरून दिसून येईल की देवावरचं आपलं प्रेमसुद्धा मजबूत आहे. भाऊबहिणींवरचं आपलं प्रेम कमी होत चाललंय असं जर आपल्याला वाटत असेल, तर ही एक खूप गंभीर गोष्ट आहे. का? कारण याचा अर्थ यहोवासोबतचं आपलं नातं कमजोर झालंय असा होतो. प्रेषित योहानने आपल्याला स्पष्टपणे याची आठवण करून दिली की, “ज्याला त्याने पाहिलं आहे त्या भावावर जर तो प्रेम करत नाही, तर न पाहिलेल्या देवावर तो प्रेम करूच शकत नाही.” (१ योहा. ४:२०) यातून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो? हाच की आपण जर “एकमेकांवर प्रेम” केलं, तरच यहोवा आपल्यावर खूश होईल.—१ योहा. ४:७-९, ११. टेहळणी बुरूज२३.११ ८ ¶३; ९ ¶५-६

शनिवार, १७ मे

तुझे आईवडील आनंदी होतील.—नीति. २३:२५.

लहान असताना यहोआश राजाने सुज्ञ निर्णय घेतले. त्याचं मार्गदर्शन करायला त्याचे वडील नव्हते. पण त्याने विश्‍वासू महायाजक यहोयादा याने दिलेलं मार्गदर्शन स्वीकारलं आणि त्याप्रमाणे तो चालला. यहोयादा महायाजकाने यहोआशला आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवलं. त्याचा परिणाम असा झाला, की यहोआशने जीवनात सुज्ञ निर्णय घेतले. त्याने यहोवाची सेवा केली आणि शुद्ध उपासनेत पुढाकार घेतला. इतकंच नाही तर यहोआशने यहोवाच्या मंदिराची दुरुस्ती करण्याची व्यवस्था केली. (२ इति. २४:१, २, ४, १३, १४) जर तुम्हालाही यहोवावर प्रेम करायला आणि त्याच्या स्तरांनुसार जीवन जगायला शिकवण्यात आलं असेल, तर ती तुमच्यासाठी एक मौल्यवान भेटच आहे. (नीति. २:१, १०-१२) तुमचे आईवडील तुम्हाला चांगले निर्णय घ्यायला प्रशिक्षण देऊ शकतात. तुमचे आईवडील जेव्हा तुम्हाला बायबलमधून काही सल्ला देतात आणि तुम्ही तो लागू करता किंवा पाळता, तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. आणि फक्‍त त्यांनाच नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाला आनंद होतो. आणि तुमची त्याच्यासोबतची मैत्री आणखी मजबूत होते. (नीति. २२:६; २३:१५, २४) या गोष्टींमुळे लहान वयात यहोआशने जे चांगलं उदाहरण मांडलं त्याचं अनुकरण करायचं प्रोत्साहन तुम्हाला मिळत नाही का? टेहळणी बुरूज२३.०९ ८-९ ¶३-५

रविवार, १८ मे

मी तुमचं ऐकेन.—यिर्म. २९:१२.

यहोवा आपल्या प्रार्थना नक्की ऐकेल असं वचन तो आपल्याला देतो. यहोवाचं आपल्या विश्‍वासू उपासकांवर खूप प्रेम आहे. म्हणूनच तो त्यांच्या प्रार्थनांकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. (स्तो. १०:१७; ३७:२८) पण याचा हा अर्थ होत नाही की तो आपल्या सगळ्याच मागण्या पूर्ण करेल. कारण काही प्रार्थनांचं उत्तर मिळण्यासाठी आपल्याला कदाचित नवीन जगापर्यंत थांबून राहावं लागेल. यहोवा आपण केलेल्या प्रार्थनांचा त्याच्या एकंदर उद्देशाशी कसा संबंध आहे ते लक्षात घेतो. (यश. ५५:८, ९) या उद्देशाचा एक भाग म्हणजे त्याच्या अधिकाराखाली असलेल्या पृथ्वीवर पुरुष आणि स्त्रियांनी आनंदाने आणि एकतेने जगावं हा आहे. पण सैतानाचा असा दावा आहे की मानवांनी स्वतःवर राज्य करणंच योग्य आहे. (उत्प. ३:१-५) म्हणून सैतानाने केलेला दावा खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी यहोवाने मानवाला स्वतःवर राज्य करण्याची परवानगी दिली आहे. म्हणूनच आज मानवी सरकारांमुळे तयार झालेल्या समस्यांना आज आपल्याला तोंड द्यावं लागतं. (उप. ८:९) त्यामुळे यहोवा आज सगळ्याच समस्या काढून टाकणार नाही हे समजण्यासारखं आहे. टेहळणी बुरूज२३.११ २१ ¶४-५

सोमवार, १९ मे

मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा पिता म्हणून नेमलं आहे.—रोम. ४:१७.

यहोवाने वचन दिलं होतं, की अब्राहामद्वारे ‘पुष्कळ राष्ट्रं’ आशीर्वादित होतील. पण, अब्राहाम १०० वर्षांचा झाला आणि सारा ९० वर्षांची झाली, तरी त्यांना मुलगा झाला नव्हता. मानवी दृष्टिकोनातून पाहिलं तर ही गोष्ट आता अशक्यच होती. अब्राहामसाठी खरंतर ही विश्‍वासाची परीक्षा होती. तरी त्याने “आशेच्या आधारावर असा विश्‍वास ठेवला की तो पुष्कळ राष्ट्रांचा पिता बनेल.” (रोम. ४:१८, १९) आणि पुढे ही आशा खरी ठरली. तो इसहाकचा पिता बनला आणि याच गोष्टीची तो बऱ्‍याच काळापासून वाट बघत होता. (रोम. ४:२०-२२) अब्राहामसारखंच देव आपल्यावर खूश होऊ शकतो आणि आपल्याला त्याचे मित्र मानून नीतिमान ठरवू शकतो. याच गोष्टीवर भर देत पौलने म्हटलं, “‘त्याला नीतिमान ठरवण्यात आलं’ हे शब्द फक्‍त [अब्राहामसाठीच] लिहिण्यात आले नव्हते. तर ते आपल्यासाठीही लिहिण्यात आले आहेत. कारण ज्या देवाने आपला प्रभू येशू याला मेलेल्यांतून जिवंत केलं, त्याच्यावर आपला विश्‍वास असल्यामुळे आपल्यालाही नीतिमान ठरवण्यात येईल.” (रोम. ४:२३, २४) अब्राहामसारखंच आपणसुद्धा विश्‍वास ठेवला पाहिजे, तो विश्‍वास आपल्या कार्यातून दाखवला पाहिजे आणि आशा बाळगली पाहिजे. टेहळणी बुरूज२३.१२ ७ ¶१६-१७

मंगळवार, २० मे

तू माझं दुःख पाहिलं आहेस; मला होणाऱ्‍या यातना तू जाणतोस.—स्तो. ३१:७.

एखाद्या संकटामुळे तुम्ही जेव्हा घाबरून जाता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, की यहोवाला तुमच्यावर आलेलं संकट माहीत आहे आणि तुम्हाला कसं वाटतं हेसुद्धा त्याला कळतं. उदाहरणार्थ, इजिप्तमध्ये असताना इस्राएली लोकांवर जे अत्याचार होत होते ते यहोवाने पाहिलेच, पण त्यासोबतच “त्यांना किती यातना सोसाव्या लागत आहेत” हेसुद्धा यहोवा पाहत होता. (निर्ग. ३:७) तुम्हाला कदाचित प्रश्‍न पडेल, की एखाद्या भीतीदायक परिस्थितीचा सामना करताना यहोवा आपल्यासोबत आहे, हे आपल्याला कसं कळेल? त्यासाठी तुम्ही काय करू शकता? अशा वेळी यहोवा आपल्यासोबत आहे, हे आपल्याला पाहता यावं म्हणून त्याला प्रार्थना करा. (२ राजे ६:१५-१७) आणि मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांचा विचार करा: सभेत एका भावाने किंवा बहिणीने दिलेल्या उत्तरातून तुम्हाला धीर मिळाला आहे का? एखाद्या साहित्यामुळे, व्हिडिओमुळे किंवा एखाद्या खास गीतामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळालं आहे का? एखाद्या भावाने किंवा बहिणीने तुम्हाला एखादं चांगलं वचन किंवा मुद्दा सांगितला आहे का? हे खरं आहे, की यहोवा आपल्याला जे आध्यात्मिक अन्‍न पुरवतो आणि आपल्या प्रेमळ भाऊबहिणींची आपल्याला जी साथ आहे, तिचा कधीकधी आपल्याला विसर पडू शकतो. पण या सगळ्या गोष्टी यहोवाकडून मिळालेल्या अनमोल भेटीच आहेत! (यश. ६५:१३; मार्क १०:२९, ३०) यावरून यहोवाला आपली काळजी आहे, हेच दिसून येतं. (यश. ४९:१४-१६) आणि या गोष्टी दाखवतात, की यहोवावर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो. टेहळणी बुरूज२४.०१ ४-५ ¶९-१०

बुधवार, २१ मे

तुझं वचन पूर्ण धैर्याने सांगत राहायला तुझ्या सेवकांना बळ दे.—प्रे. कार्यं ४:२९.

स्वर्गात जाण्याआधी येशूने “यरुशलेममध्ये, संपूर्ण यहूदीयामध्ये आणि शोमरोनमध्ये, तसंच पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत” साक्ष देण्याच्या त्यांच्या जबाबदारीबद्दल त्यांना आठवण करून दिली. (प्रे. कार्यं १:८; लूक २४:४६-४८) याच्या काही काळानंतरच यहुदी धर्मगुरूंनी प्रेषित पेत्र आणि योहान यांना पकडलं आणि न्यायसभेसमोर आणलं. त्यांनी त्यांना धमकावून अशी आज्ञा दिली की त्यांनी प्रचारकार्य थांबवावं. (प्रे. कार्यं ४:१८, २१) पेत्र आणि योहान त्यांना म्हणाले: “आम्ही देवाऐवजी तुमचं ऐकावं, हे देवाच्या दृष्टीने योग्य ठरेल का, हे तुम्हीच ठरवा. पण आमच्याबद्दल विचाराल, तर ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या आणि ऐकल्या आहेत त्यांबद्दल बोलायचं आम्ही थांबवू शकत नाही.” (प्रे. कार्यं ४:१९, २०) पेत्र आणि योहान यांना सोडण्यात आलं तेव्हा यहोवाची इच्छा पूर्ण करता यावी यासाठी त्यांनी यहोवाला प्रार्थना केली. त्यांनी मनापासून केलेल्या या प्रार्थनेचं यहोवाने उत्तर दिलं.— प्रे. कार्यं ४:३१. टेहळणी बुरूज२३.०५ ५ ¶११-१२

गुरुवार, २२ मे

हा माझा मुलगा मला प्रिय आहे.—मत्त. १७:५.

यहोवा आणि त्याच्या प्रिय मुलाने जितका काळ सोबत घालवलाय तितका या विश्‍वात कोणीच घालवला नसेल. त्यांनी अब्जावधी वर्षं सोबत घालवली आहेत. म्हणून त्यांच्यातलं नातं खूप मजूबत आहे. यहोवाचं त्याच्या मुलावर, येशूवर किती प्रेम आहे हे त्याने आजच्या वचनामध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलंय. इथे यहोवा फक्‍त इतकंच म्हणू शकला असता, की येशूने ‘त्याचं मन आनंदीत केलंय.’ पण त्याचं येशूवर किती प्रेम आहे, हे आपल्याला कळावं म्हणून तो म्हणाला: “हा माझा मुलगा मला प्रिय आहे.” यावरून कळतं, की यहोवाला येशूचा आणि येशूने आपल्या जीवनाचं बलिदान देण्याची जी तयारी दाखवली त्याचा त्याला किती अभिमान आहे! (इफिस. १:७) आपल्या पित्याचं आपल्यावर प्रेम आहे या गोष्टीची येशूलाही खातरी होती. इतकी, की ते प्रेम त्याला जाणवत होतं. आणि याबद्दल त्याने अगदी खातरीने पुन्हा-पुन्हा सांगितलं.—योहा. ३:३५; १०:१७; १७:२४. टेहळणी बुरूज२४.०१ २८ ¶८

शुक्रवार, २३ मे

भरपूर धनसंपत्तीपेक्षा चांगलं नाव आणि सोन्याचांदीपेक्षा आदर मिळवणं बरं!—नीति. २२:१.

कल्पना करा, की तुमच्या जवळची एक व्यक्‍ती तुमच्याबद्दल काहीतरी खूप वाईट बोलते. तुम्हाला माहीत आहे, की ते खोटं आहे. पण काही जण त्या गोष्टीवर विश्‍वास ठेवतात. इतकंच नाही, तर ते इतरांनासुद्धा त्या गोष्टीबद्दल सांगत सुटतात. आणि ते लोकही त्यावर विश्‍वास ठेवतात. अशा वेळी तुम्हाला कसं वाटेल? अशा बदनामीमुळे तुम्हाला खूप वाईट वाटेल. नाही का? या उदाहरणातून यहोवाच्या नावाला कलंक लावण्यात आला तेव्हा त्याला कसं वाटलं असेल हे आपण समजू शकतो. स्वर्गात राहणाऱ्‍या त्याच्या एका मुलाने पहिल्या स्त्रीला म्हणजे हव्वाला त्याच्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या. आणि तिने त्यावर विश्‍वास ठेवला. या खोट्या गोष्टीमुळे आपल्या पहिल्या पालकांनी यहोवाविरुद्ध बंड केलं. आणि याचा परिणाम म्हणजे संपूर्ण मानवी कुटुंबांमध्ये पाप आणि मृत्यू पसरला. (उत्प. ३:१-६; रोम. ५:१२) आज जगात ज्या काही समस्या आपण पाहतो, म्हणजे मृत्यू, युद्ध, गरीबी या सगळ्या गोष्टी एदेन बागेत पसरवलेल्या त्याच खोट्या गोष्टीचा परिणाम आहेत. यहोवाची अशी बदनामी केल्यामुळे आणि त्याचा जो परिणाम झालाय, त्यामुळे त्याला वाईट वाटतंय का? हो नक्कीच! तरीसुद्धा, त्याचं मन त्यामुळे कटू झालेलं नाही किंवा तो मनात राग बाळगून नाही. उलट बायबल म्हणतं, की तो ‘आनंदी देव’ आहे.—१ तीम. १:११. टेहळणी बुरूज२४.०२ ८ ¶१-२

शनिवार, २४ मे

इतकं मोठं वाईट काम करून मी देवाविरुद्ध पाप कसं करू?—उत्प. ३९:९.

तुम्ही योसेफसारखाच निर्धार कसा करू शकता? मोहाचा सामना करण्यासारखी परिस्थिती येईल तेव्हा काय करायचं हे तुम्ही आत्ताच ठरवू शकता. यहोवाला वीट आणणाऱ्‍या गोष्टींना लगेच ‘नाही’ म्हणायला शिका. इतकंच काय तर त्या गोष्टींवर विचार करायचंही टाळा. (स्तो. ९७:१०; ११९:१६५) अशा प्रकारे जेव्हा मोहाचा सामना करायची वेळ येईल तेव्हा तुम्ही गोंधळात पडणार नाही. आपल्याला सत्य मिळालंय हे तुम्हाला माहीत असेल आणि यहोवाची मनापासून सेवा करायची तुमची इच्छा असेल. पण तरीसुद्धा असं काहीतरी असू शकतं जे तुम्हाला समर्पण आणि बाप्तिस्मा घेण्यापासून रोखत असेल. अशा वेळी तुम्ही दावीद राजाच्या उदाहरणावर विचार करू शकता. तुम्ही यहोवाला अशी विनंती करू शकता: “हे देवा, मला तपासून पाहा आणि माझं मन ओळख. माझी पारख कर आणि माझ्या चिंता जाणून घे. चुकीच्या मार्गावर नेणारी एखादी गोष्ट तर माझ्यात नाही ना, हे पाहा आणि मला सर्वकाळाच्या मार्गावर चालव.” (स्तो. १३९:२३, २४) यहोवा “त्याचा मनापासून शोध घेणाऱ्‍यांना” आशीर्वाद देतो. तुम्ही जर समर्पण आणि बाप्तिस्म्याचं पाऊल उचलण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर यावरून हेच दिसून येईल की तुम्ही यहोवाचा मनापासून शोध घेत आहात.—इब्री ११:६. टेहळणी बुरूज२४.०३ ६ ¶१३-१५

रविवार, २५ मे

त्याला रोजच्या रोज बलिदानं अर्पण करायची गरज नाही.—इब्री ७:२७.

महायाजकालाच लोकांच्या वतीने देवाकडे जायची परवानगी होती. जेव्हा उपासना मंडपाची स्थापना करण्यात आली तेव्हा यहोवाने अहरोनला इस्राएलचा पहिला महायाजक म्हणून नियुक्‍त केलं. पण प्रेषित पौलने जसं म्हटलं तसं “पूर्वी एकापाठोपाठ एक बऱ्‍याच जणांना याजक बनावं लागायचं. कारण मृत्यूमुळे त्यांना याजक म्हणून कायम सेवा करत राहणं शक्य नव्हतं.” (इब्री ७:२३-२६) अपरिपूर्ण असल्यामुळे महायाजकांना स्वतःच्या पापांसाठीसुद्धा बलिदानं द्यावी लागायची. इथेच आपल्याला इस्राएलचा महायाजक आणि श्रेष्ठ महायाजक येशू ख्रिस्त यांच्यातला फरक स्पष्टपणे दिसून येतो. आपला महायाजक येशू ख्रिस्त “माणसाने नाही, तर यहोवाने उभारलेल्या खऱ्‍या मंडपातल्या परमपवित्र स्थानाचा सेवक आहे.” (इब्री ८:१, २) पौलने म्हटलं की “हा याजक सदासर्वकाळ जिवंत असल्यामुळे, त्याच्या याजकपदाला वारसदारांची गरज नाही.” हा विषय समजून सांगताना पौलने पुढे म्हटलं की तो “निष्कलंक, पापी लोकांपेक्षा वेगळा” आहे आणि इस्राएलच्या महायाजकाप्रमाणे त्याला “स्वतःच्या पापांसाठी” रोजच्या रोज बलिदानं अर्पण करायची गरज नाही. टेहळणी बुरूज२३.१० २६ ¶८-९

सोमवार, २६ मे

आधीचं आकाश आणि आधीची पृथ्वी नाहीशी झाली होती.—प्रकटी. २१:१.

इथे “आधीचं आकाश” हे सैतानाच्या आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांच्या प्रभावाखाली असलेल्या राजकीय सरकारांना सूचित करतं. (मत्त. ४:८, ९; १ योहा. ५:१९) तसंच बायबलमध्ये “पृथ्वी” हा शब्द कधीकधी पृथ्वीवर राहत असलेल्या मानवांना सूचित करण्यासाठी वापरण्यात आला आहे. (उत्प. ११:१; स्तो. ९६:१) त्यामुळे “आधीची पृथ्वी” ही आज पृथ्वीवर असलेल्या दुष्ट मानवांना सूचित करते. यहोवा आत्ताच्या या “आकाश” आणि ‘पृथ्वीमध्ये’ सुधारणा करणार नाही, तर त्यांचा पूर्णपणे नाश करून टाकेल. आणि त्यांच्या जागी “नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी” आणेल. हे नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी, नवीन सरकार आणि नीतिमान लोकांच्या नवीन मानवी समाजाला सूचित करतं. यहोवा पृथ्वीला आणि मानवांना परिपूर्ण स्थितीत आणेल म्हणजे एका अर्थाने त्यांना नवीन करेल. यशयाने भविष्यवाणी केल्यानुसार पूर्ण पृथ्वी मग एका बागेसारखी म्हणजे एदेन बागेसारखी बनेल. तसंच, अगदी व्यक्‍तिगत पातळीवरसुद्धा आपण हे नवीनीकरण अनुभवू. लंगडे, आंधळे, बहिरे बरे होतील. इतकंच नाही, तर मेलेले लोकसुद्धा पुन्हा जिवंत होतील.—यश. २५:८; ३५:१-७. टेहळणी बुरूज२३.११ ४ ¶९-१०

मंगळवार, २७ मे

तयार राहा.—मत्त. २४:४४.

आपल्याला माहीत आहे, की “मोठं संकट” अचानक सुरू होईल. (मत्त. २४:२१) विपत्ती येतात तेव्हा लोक शक्यतो बेसावध असतात. पण मोठ्या संकटाच्या बाबतीत तसं होणार नाही. कारण जवळजवळ २,००० वर्षांआधी येशूने आपल्या शिष्यांना त्याबद्दल इशारा दिला होता आणि त्या दिवसासाठी तयार राहायला सांगितलं होतं. आपण जर आधीच तयार राहिलो तर तो कठीण काळ पार करायला आपल्याला सोपं जाईल आणि इतरांनाही मदत करता येईल. (लूक २१:३६) अशा वेळी यहोवा आपलं संरक्षण करेल असा विश्‍वास ठेवून धीराने आपल्याला त्याची आज्ञा पाळावी लागेल. किंवा त्या काळात आपल्या भाऊबहिणींना त्यांच्याकडे असलेल्या काही गोष्टी किंवा सगळंच काही गमवावं लागलं तर आपण काय करू? (हब. ३:१७, १८) अशा वेळी आपल्या मनात त्यांच्याबद्दल करुणा असेल तर आपल्याला त्यांना गरजेच्या गोष्टी पुरवता येतील. तसंच राष्ट्रांच्या समूहाने आपल्यावर हल्ला केल्यामुळे जर एकाच ठिकाणी बऱ्‍याच भाऊबहिणींसोबत आपल्याला राहावं लागलं तर काय? (यहे. ३८:१०-१२) अशा वेळी त्यांच्याबद्दल मनापासून प्रेम आणि आपुलकी असल्यामुळे त्या कठीण काळातून पार व्हायला आपल्याला मदत होईल. टेहळणी बुरूज२३.०७ २ ¶२-३

बुधवार, २८ मे

तुम्ही कसं चालता याकडे बारकाईने लक्ष द्या; मूर्खांसारखं नाही, तर बुद्धिमानांसारखं चाला. वेळेचा चांगला उपयोग करा.—इफिस. ५:१५, १६.

पती-पत्नी अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांच्या उदाहरणातून बरंच काही शिकू शकतात. पहिल्या शतकात हे एक असं जोडपं होतं ज्यांच्याकडे खूप आदराने पाहिलं जायचं. (रोम. १६:३, ४) ते नेहमी सोबत मिळून काम करायचे, प्रचारकार्य करायचे आणि इतरांना मदत करायचे. (प्रे. कार्यं १८:२, ३, २४-२६) खरंतर, अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला या जोडप्याचा नेहमी बायबलमध्ये सोबतच उल्लेख करण्यात आलाय. पती-पत्नींनो तुम्ही त्यांचं अनुकरण कसं करू शकता? तुम्ही दिवसभरात बरीच कामं करत असाल. पण यांतली काही कामं एक-एकटं करण्याऐवजी तुम्ही सोबत मिळून करू शकता का? उदाहरणार्थ अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांनी सोबत मिळून प्रचारकार्य केलं. तुम्हीसुद्धा असंच करण्यासाठी काही योजना करू शकता का? अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांनी सोबत मिळून व्यवसाय केला. तुम्ही कदाचित सोबत मिळून नोकरी करत नसाल पण तुम्ही घरची काही कामं सोबत मिळून करू शकता का? (उप. ४:९) जेव्हा एखादं काम करण्यासाठी तुम्ही सोबत मिळून एकमेकांना मदत कराल तेव्हा तुम्हाला एका टीमसारखं वाटेल आणि त्यामुळे एकमेकांसोबत बोलायची संधीसुद्धा मिळेल. टेहळणी बुरूज२३.०५ २२-२३ ¶१०-१२

गुरुवार, २९ मे

मला भीती वाटते, तेव्हा मी तुझ्यावर भरवसा ठेवतो.—स्तो. ५६:३.

आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी भीती वाटते. उदाहरणार्थ, शौल राजा दावीदच्या जिवावर उठला होता, तेव्हा तो घाबरून पलिष्टी लोकांच्या गथ शहरात पळून गेला. दावीद तिथे असताना तिथल्या आखीश राजाला कळलं, की दावीद एक शूर योद्धा आहे आणि त्याने ‘लाखो’ पलिष्टी लोकांना मारलंय. त्यामुळे आखीश राजा आता आपलं काय करेल या विचाराने दावीदला “खूप भीती वाटली.” (१ शमु. २१:१०-१२) मग भीतीवर मात करायला दावीदला कशामुळे मदत झाली? गथमध्ये असताना दावीदला कशाची भीती वाटत होती आणि त्यामुळे त्याला कसं वाटत होतं हे त्याने स्तोत्र ५६ मध्ये सांगितलंय. पण या भीतीवर मात करण्यासाठी त्याला कोणत्या गोष्टींमुळे मदत झाली, हेसुद्धा त्याने या स्तोत्रात सांगितलंय. दावीदला जेव्हा भीती वाटली, तेव्हा त्याने यहोवावर भरवसा ठेवला. (स्तो. ५६:१-३, ११) दावीदने यहोवावर जो भरवसा ठेवला होता तो व्यर्थ गेला नाही. यहोवाच्या आशीर्वादाने त्याला एक युक्‍ती सुचली. त्याने वेड्याचं सोंग घेतलं. त्यामुळे दावीदपासून आपल्याला काही धोका नाही असं आखीशला वाटलं आणि म्हणून त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. अशा प्रकारे दावीदला त्याच्या हातून निसटता आलं.—१ शमु. २१:१३–२२:१. टेहळणी बुरूज२४.०१ २ ¶१-३

शुक्रवार, ३० मे

जे बोलावण्यात आलेले, निवडलेले आणि विश्‍वासू जन त्याच्यासोबत आहेत तेसुद्धा विजय मिळवतील.—प्रकटी. १७:१४.

आजच्या वचनात ज्यांच्याबद्दल सांगितलंय ते कोण आहेत? ते पुनरुत्थान झालेले अभिषिक्‍त जन आहेत! तेव्हा मोठ्या संकटाचा शेवट होत असताना, उरलेल्या अभिषिक्‍त जणांना पृथ्वीवरून स्वर्गात घेतलं जाईल, तेव्हा त्यांना सर्वात आधी लढावं लागेल. जेव्हा ते स्वर्गात जातील आणि ख्रिस्तासोबत आणि पवित्र स्वर्गदूतांसोबत सेवा करतील तेव्हा ते देवाच्या शत्रूंविरुद्ध शेवटची लढाई लढतील. विचार करा, सध्या पृथ्वीवर काही अभिषिक्‍त जन खूप वयस्कर आहेत. काही जणांची तब्येत तर खूपच नाजूक आहे. पण स्वर्गात जेव्हा त्यांचं पुनरुत्थान होईल तेव्हा ते खूप शक्‍तिशाली आणि अमर असतील. त्यांना विजयी राजा येशू ख्रिस्तासोबत लढण्यासाठी नेमण्यात येईल. आणि हर्मगिदोनचं युद्ध लढल्यानंतर ते मानवजातीला परिपूर्णतेकडे नेण्यासाठी मदत करतील. एक अपरिपूर्ण व्यक्‍ती म्हणून ते आज आपल्या प्रिय भाऊबहिणींसाठी जास्त काही करू शकत नाहीत. पण जेव्हा ते स्वर्गात जातील तेव्हा ते त्यांच्यासाठी बरंच काही करू शकतील, यात शंका नाही! टेहळणी बुरूज२४.०२ ६-७ ¶१५-१६

शनिवार, ३१ मे

पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालत राहा, म्हणजे तुम्ही शारीरिक वासना पूर्ण करणारच नाही.—गलती. ५:१६.

काही जण समर्पण आणि बाप्तिस्म्यासाठी तयार असतात, पण तरीसुद्धा हे पाऊल उचलायला ते कचरतात. कारण नंतर त्यांच्या हातून एखादी गंभीर चूक झाली आणि त्यांना बहिष्कृत केलं तर काय, असं त्यांना वाटतं. जर तुम्हालाही या गोष्टीची भीती वाटत असेल तर याची खातरी बाळगा, की त्याच्या “सेवकांना शोभेल असं वागून त्याला पूर्णपणे संतुष्ट” करायला ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी यहोवा तुम्हाला पुरवेल. (कलस्सै. १:१०) तसंच योग्य ते करण्यासाठी तो तुम्हाला बळही देईल. त्याने बऱ्‍याच जणांना मदत पुरवून ही गोष्ट सिद्ध केली आहे. (१ करिंथ. १०:१३) यहोवा त्याच्या लोकांना त्याला विश्‍वासू राहायला मदत करतो. आणि हेसुद्धा एक कारण आहे ज्यामुळे ख्रिस्ती मंडळीतून खूप कमी लोक बहिष्कृत होतात. प्रत्येक अपरिपूर्ण माणूस मोहात पडू शकतो. (याको. १:१४) पण त्या मोहाला बळी पडायचं की नाही हे तुमच्या हातात आहे. खरंतर, तुमचं आयुष्य तुम्ही कसं जगणार हे पूर्णपणे तुमच्यावर आहे. आपल्या इच्छांवर ताबा मिळवणं कठीण आहे असं कदाचित काही लोकांना वाटत असलं तरीही तुम्ही तुमच्या इच्छांवर ताबा मिळवायला शिकू शकता. टेहळणी बुरूज२४.०३ ५ ¶११-१२

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा