जून
रविवार, १ जून
आपल्याला बऱ्याच संकटांना तोंड देऊन देवाच्या राज्यात जावं लागेल.—प्रे. कार्यं १४:२२.
पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनी बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेतलं आणि यामुळे यहोवाने त्यांना भरपूर आशीर्वाद दिले. तसंच त्यांना बऱ्याच वेळा छळाचासुद्धा सामना करावा लागला, आणि तेही त्यांनी अपेक्षा केली नव्हती तेव्हा. बर्णबा आणि प्रेषित पौल जेव्हा लुस्त्रमध्ये प्रचार करत होते तेव्हा काय घडलं त्याचा विचार करा. सुरवातीला लोकांनी त्यांचं ऐकलं आणि त्यांचं स्वागतही केलं. पण नंतर विरोधकांनी “लोकांना भडकवलं” आणि ज्या लोकांनी त्यांचं आधी ऐकलं होतं त्यांनी प्रेषित पौलला दगडमार केला आणि तो मेला आहे असं समजून ते त्याला सोडून गेले. (प्रे. कार्यं १४:१९) असं असलं तरी बर्णबा आणि प्रेषित पौल दुसऱ्या ठिकाणी प्रचार करत राहिले. याचा काय परिणाम झाला? त्यांनी “पुष्कळ जणांना शिष्य” बनवलं आणि त्यांच्या शब्दांमुळे आणि उदाहरणामुळे बऱ्याच भाऊबहिणींचा विश्वास मजबूत झाला. (प्रे. कार्यं १४:२१, २२) बर्णबा आणि प्रेषित पौल यांनी अचानक आलेल्या छळामुळेसुद्धा हार मानली नाही. आणि त्यामुळे बऱ्याच भाऊबहिणांना फायदा झाला. आज आपणही हार न मानता यहोवाने जे सांगितलंय ते करत राहिलो, तर तो आपल्याला नक्कीच आशीर्वाद देईल. टेहळणी बुरूज२३.०४ १६-१७ ¶१३-१४
सोमवार, २ जून
हे यहोवा, माझी प्रार्थना ऐक; आणि माझ्या मदतीच्या याचनांकडे लक्ष दे. संकटाच्या दिवशी मी तुला हाक मारतो, कारण तू मला नक्की उत्तर देशील.—स्तो. ८६:६, ७.
दावीद राजाच्या आयुष्यात असे बरेच शत्रू होते, जे त्याच्या जिवावर उठले होते. आणि त्या वेळी बऱ्याचदा त्याने यहोवाकडे मदत मागितली. दावीदला पूर्ण भरवसा होता, की यहोवाने त्याच्या प्रार्थना ऐकल्या आहेत आणि त्यांचं उत्तरही दिलं आहे. तुम्हीसुद्धा असाच भरवसा ठेवू शकता. बायबल आपल्याला खातरी देतं की यहोवा आपल्याला परीक्षांचा धीराने सामना करण्यासाठी बुद्धी आणि ताकद देईल. तो आपल्या भाऊबहिणींचा किंवा जे सध्या त्याची उपासना करत नाहीत त्यांचा उपयोग करूनही आपल्याला मदत करू शकतो. आपल्याला वाटलं होतं, त्या मार्गाने जरी यहोवाने आपल्या प्रार्थनांचं उत्तर दिलं नाही तरी तो त्या प्रार्थनांचं उत्तर नक्की देईल, हे आपल्याला माहीत आहे. तो अगदी योग्य वेळी आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे, त्या गोष्टी पुरवेल. यामुळे प्रार्थना करत राहा आणि हा भरवसा ठेवा, की यहोवा आत्तासुद्धा तुमची काळजी घेईल आणि येणाऱ्या नवीन जगातही ‘प्रत्येक जिवाची इच्छा पूर्ण करेल.’—स्तो. १४५:१६. टेहळणी बुरूज२३.०५ ८ ¶४; १३ ¶१७-१८
मंगळवार, ३ जून
यहोवाने माझ्यावर जे उपकार केले आहेत, त्या सर्वांच्या बदल्यात मी त्याला काय देऊ?—स्तो. ११६:१२.
ध्येय पूर्ण केल्यामुळे किती फायदे होतात यावर विचार करणं चांगलं आहे. तुम्हाला जर एखादं ध्येय गाठायचं असेल तर तुम्ही कोणत्या फायद्यांचा विचार करू शकता? तुम्ही जर बायबल वाचायचं किंवा प्रार्थना करण्याचं ध्येय ठेवलं असेल, तर हे ध्येय गाठल्यामुळे यहोवासोबतचं तुमचं नातं किती मजबूत होईल यावर विचार करा. (स्तो. १४५:१८, १९) तुम्ही एखादा ख्रिस्ती गुण वाढवण्याचं ध्येय ठेवलं असेल, तर त्यामुळे इतरांसोबतचे तुमचे नातेसंबंध किती चांगले होतील, यावर विचार करा. (कलस्सै. ३:१४) एखादं ध्येय गाठल्यामुळे कोणकोणते फायदे होतील, हे लिहून काढा. आणि वेळोवेळी ते पाहत राहा. तसंच, तुम्हाला प्रोत्साहन देतील अशांसोबत वेळ घालवा. (नीति. १३:२०) खरं पाहिलं तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही दिवस असतात, जेव्हा आपल्याला काहीच करायची इच्छा किंवा प्रेरणा नसते. मग याचा अर्थ आपलं ध्येय गाठण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही असा होतो का? नाही. आपण आपल्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी मेहनत घेऊ शकतो. हे करणं कदाचित तितकं सोपं नसेल, पण त्याचे फायदे भरपूर आहेत. टेहळणी बुरूज२३.०५ २७-२८ ¶५-८
बुधवार, ४ जून
एखादा माणूस जे काही पेरतो, त्याचीच तो कापणीही करेल.—गलती. ६:७.
आपण आपल्या चुकांसाठी जबाबदार आहोत हे माहीत असल्यामुळे आपण त्या कबूल करायला तयार होतो, त्या सुधारतो आणि त्या पुन्हा होऊ नयेत याची काळजी घेतो. या गोष्टी केल्यामुळे आपल्याला जीवनाच्या शर्यतीत धावत राहायला मदत होऊ शकते. जर तुम्ही एखादा चुकीचा निर्णय घेतला असेल तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही आहे ती परिस्थिती स्वीकारा. आपण घेतलेला निर्णय बरोबर होता हे पटवून देण्यासाठी किंवा स्वतःला किंवा इतरांना दोष देण्यात आपला वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. उलट, आपली चूक मान्य करा आणि आहे त्या परिस्थितीत काय चांगलं करता येईल याचा विचार करा. जर तुम्ही केलेल्या एखाद्या चुकीबद्दल तुमचं मन तुम्हाला दोष देत असेल तर नम्रपणे यहोवाला प्रार्थना करा, आपली चूक कबूल करा आणि त्याच्याकडे क्षमा मागा. (स्तो. २५:११; ५१:३, ४) तुम्ही कोणाचं मन दुखवलं असेल तर त्याची माफी मागा आणि गरज असेल तर मंडळीतल्या वडिलांची मदत घ्या. (याको. ५:१४, १५) तसंच, स्वतःच्या चुकांमधून शिका आणि त्या पुन्हा होऊ नयेत म्हणून काळजी घ्या. असं करत असताना तुम्ही याची खातरी बाळगू शकता, की यहोवा तुम्हाला दया दाखवेल आणि तुम्हाला लागणारी मदत तो नक्की पुरवेल.—स्तो. १०३:८-१३. टेहळणी बुरूज२३.०८ २८-२९ ¶८-९
गुरुवार, ५ जून
यहोयादा याजक जोपर्यंत मार्गदर्शन करत होता, तोपर्यंत यहोआश राजा यहोवाच्या नजरेत योग्य ते करत राहिला.—२ राजे १२:२.
यहोयादाच्या चांगल्या उदाहरणामुळे यहोआश राजाला फायदा झाला. आणि त्यामुळेच या राजाला यहोवाचं मन आनंदित करायचं होतं. पण यहोयादाच्या मृत्यूनंतर, तो खोटी उपासना करणाऱ्या यहूदाच्या प्रमुखांचं ऐकू लागला. (२ इति. २४:४, १७, १८) हे पाहून यहोवाला खूप दुःख झालं. आणि तो “त्यांना आपल्याकडे परत आणण्यासाठी संदेष्ट्यांना त्यांच्याकडे पाठवत राहिला. . . . पण त्यांनी त्यांचं ऐकलं नाही.” त्यांनी यहोयादाच्या मुलाचं म्हणजे जखऱ्याचंसुद्धा ऐकलं नाही. तो यहोवाचा संदेष्टा आणि याजक तर होताच, पण यहोआशचा भाऊसुद्धा लागत होता. पण त्याने जखऱ्याला मारून टाकलं. (२ इति. २२:११; २४:१९-२२) यहोआशने यहोवाची भीती बाळगायचं सोडून दिलं. यहोवाने म्हटलं होतं: “जे माझा अपमान करतात त्यांचा मी तिरस्कार करीन.” (१ शमु. २:३०) सीरियाच्या एका छोट्याशा सैन्याने योआशच्या ‘मोठ्या सैन्याला’ हरवलं आणि त्याला “जबर जखमी” केलं. (२ इति. २४:२४, २५) यहोआशच्या सेवकांनीच जखऱ्याला मारल्याबद्दल त्याचा खून केला. टेहळणी बुरूज२३.०६ १८-१९ ¶१६-१७
शुक्रवार, ६ जून
एकेकाळी तुम्ही अंधारात होता, पण आता तुम्ही प्रकाशात आहात.—इफिस. ५:८.
पौलने इफिसमध्ये बराच वेळ घालवला होता. तिथे त्याने आनंदाच्या संदेशाच्या प्रचाराचं आणि शिकवण्याचं काम केलं होतं. (प्रे. कार्यं १९:१, ८-१०; २०:२०, २१) त्याचं तिथल्या भाऊबहिणींवर खूप प्रेम होतं. आणि यहोवाला विश्वासू राहायला त्यांना मदत करायची त्याची इच्छा होती. पौलने इफिसमधल्या ज्या भाऊबहिणींना पत्र लिहिलं होतं, ते सत्य शिकून ख्रिस्ती बनण्याआधी खोट्या धार्मिक विचारांच्या आणि अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेले होते. इफिसमधले लोक खूप अनैतिक होते आणि त्यांना त्यांच्या घाणेरड्या वागण्याचं काही वाटत नव्हतं. शहराच्या नाट्यगृहांमध्ये आणि इतकंच काय तर धार्मिक सणांमध्येसुद्धा अश्लील बोलणं सर्रासपणे ऐकू यायचं. (इफिस. ५:३) तिथे राहणाऱ्या बऱ्याच लोकांनी “नैतिकतेच्या सगळ्या मर्यादा” ओलांडल्या होत्या. याचा ग्रीक भाषेतला शब्दशः अर्थ होतो, “दुखणं न जाणवणं.” (इफिस. ४:१७-१९) योग्य काय आणि अयोग्य काय हे शिकण्याआधी त्यांचा विवेक त्यांना बोचत नव्हता. त्यामुळे पौलने त्यांच्याबद्दल म्हटलं: “त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे आणि देवाकडून मिळणाऱ्या जीवनापासून ते दुरावले आहेत.” पण इफिसमधले काही लोक अंधारातच राहिले नाहीत. टेहळणी बुरूज२४.०३ २० ¶२, ४; २१ ¶५-६
शनिवार, ७ जून
यहोवाची आशा धरणाऱ्यांना नव्याने शक्ती मिळेल. ते थकणार नाहीत.—यश. ४०:३१.
न्यायाधीश म्हणून गिदोन काम करत होता तेव्हा त्याला बरंच मेहनतीचं काम करावं लागायचं. मध्यरात्रीच्या वेळी जेव्हा मिद्यानी सैन्य युद्ध सोडून पळू लागलं तेव्हा गिदोनने इज्रेलच्या खोऱ्यापासून ते यार्देन नदीपर्यंत त्यांचा पाठलाग केला. (शास्ते ७:२२) पण गिदोन यार्देनजवळच थांबला का? नाही. तो आणि त्याचे ३०० सैनिक थकलेले असतानाही ते मिद्यानी सैनिकांचा पाठलाग करत राहिले. शेवटी त्यांनी मिद्यानी लोकांना गाठलं आणि त्यांना हरवलं. (शास्ते ८:४-१२) गिदोनला पूर्ण भरवसा होता की यहोवा त्याला ताकद देईल आणि त्याने तसंच केलं. (शास्ते ६:१४, ३४) एकदा गिदोन आणि त्याची माणसं दोन मिद्यानी राजांचा पाठलाग करत होती. हे राजे उंटांवर होते आणि गिदोन व त्याची माणसं पळून त्यांचा पाठलाग करत होती. (शास्ते ८:१२, २१) पण देवाच्या मदतीने इस्राएली लोकांनी त्या मिद्यानी राजांवर विजय मिळवला. वडीलसुद्धा यहोवावर पूर्ण भरवसा ठेवू शकतात. कारण “तो कधीही थकत नाही किंवा दमत नाही.” त्यांना ताकदीची गरज असते तेव्हा तो नक्की त्यांना ती देईल.—यश. ४०:२८, २९. टेहळणी बुरूज२३.०६ ६ ¶१४, १६
रविवार, ८ जून
तो तुम्हाला सोडणार नाही किंवा टाकून देणार नाही.—अनु. ३१:६.
कोणतीही परीक्षा आली, तरी आपण आपलं मन खंबीर ठेवू शकतो. म्हणून यहोवावर भरवसा ठेवा. यहोवाच्या मार्गदर्शनावर भरवसा ठेवल्यामुळे बाराकला कसं यश मिळालं, त्याचा विचार करा. यहोवाने बाराकला कनानी लोकांविरुद्ध युद्ध करायला सांगितलं होतं. कनानच्या सैन्याचा सेनापती सीसरा होता आणि त्याच्याजवळ ९०० रथ आणि भरपूर शस्त्रसामग्री होती. याउलट, इस्राएली सैनिकांपैकी एकाकडेही ढाल किंवा बरची नव्हती. (शास्ते ५:८) दबोरा संदेष्टीने सीसरा आणि त्याच्या सैन्यासोबत युद्ध करायला बाराकला कीशोनच्या खोऱ्यात जायला सांगितलं. खरंतर सीसराकडे रथ असल्यामुळे खोऱ्यातल्या सपाट जमिनीवर युद्ध करायला त्याला जास्त सोपं जाणार होतं. पण तरीसुद्धा बाराकने दबोराचं म्हणणं ऐकलं. इस्राएली सैनिक ताबोर डोंगरावरून खाली येत होते, तेव्हा यहोवाने जोरदार पाऊस पाडला. त्यामुळे सीसराचे सगळे रथ चिखलात रूतले आणि यहोवाने बाराकला मोठा विजय मिळवून दिला. (शास्ते ४:१-७, १०, १३-१६) बाराकप्रमाणे आज आपणसुद्धा यहोवावर आणि त्याच्या संघटनेकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनावर भरवसा ठेवला, तर तो आपल्यालाही विजय मिळवून देईल. टेहळणी बुरूज२३.०७ १९ ¶१७-१८
सोमवार, ९ जून
जो शेवटपर्यंत धीर धरेल त्यालाच वाचवलं जाईल.—मत्त. २४:१३.
आपल्याला जर सर्वकाळाचं जीवन हवं असेल, तर धीर धरण्याची खूप गरज आहे. प्राचीन काळातल्या विश्वासू सेवकांप्रमाणेच, देवाची वचनं पूर्ण होईपर्यंत आपण धीराने वाट पाहिली पाहिजे. (इब्री ६:११, १२) बायबलमध्ये आपली तुलना एका शेतकऱ्यासोबत केली आहे. (याको. ५:७, ८) एक शेतकरी पिकाची पेरणी करण्यासाठी आणि त्याला पाणी घालण्यासाठी खूप मेहनत घेतो. पण ते नेमकं कधी वाढेल हे त्याला माहीत नसतं. तरी तो धीराने वाट पाहतो. कारण त्याला पुढे चांगलं पीक मिळेल याची खातरी असते. त्याच प्रकारे, आपल्याला जरी ‘माहीत नसलं की प्रभू कोणत्या दिवशी येणार आहे,’ तरी आपण ख्रिस्ताच्या मागे चालत राहायचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. (मत्त. २४:४२) आपण जर धीराने वाट पाहिली, तर आपण ही खातरी ठेवू शकतो की यहोवा त्याची वचनं योग्य वेळी पूर्ण करेल. पण जर आपण धीर सोडला तर आपण वाट पाहून थकून जाऊ आणि सत्यापासून वाहवत जाऊ. इतकंच काय तर आपण कदाचित तात्पुरता आनंद देणाऱ्या गोष्टींच्या मागे धावू. पण जर आपण धीर धरला, तर आपण शेवटपर्यंत सहनशील राहू आणि आपल्याला सर्वकाळचं जीवन मिळेल.—मीखा ७:७. टेहळणी बुरूज२३.०८ २२ ¶७.
मंगळवार, १० जून
पावलांच्या बोटांचा काही भाग लोखंडाचा आणि काही भाग मातीचा होता.—दानी. २:४२.
दानीएल २:४१-४३ मध्ये दिलेल्या भविष्यवाणीची तुलना दानीएलच्या आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकातल्या इतर भविष्यवाण्यांसोबत केल्यावर, असं दिसून येतं, की पुतळ्याची पावलं आजच्या अँग्लो-अमेरिकन महासत्तेला सूचित करतात. या महासत्तेबद्दल दानीएलने असं म्हटलं, “ते राज्य थोडंफार मजबूत आणि थोडंफार कमजोर असेल.” पण ते कमजोर का असेल? कारण मऊ मातीने सूचित करण्यात आलेले सामान्य लोक या महासत्तेच्या लोखंडासारख्या शक्तीला कमजोर करतात. स्वप्नात पाहिलेल्या पुतळ्याबद्दल दानीएलने जे सांगितलं, त्यातून आपल्याला बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी कळतात. पहिली गोष्ट म्हणजे, अँग्लो-अमेरिका या महासत्तेने ती लोखंडासारखी आहे हे दाखवून दिलंय. उदाहरणार्थ, पहिलं आणि दुसरं महायुद्ध जिंकण्यामध्ये या महासत्तेची महत्त्वाची भूमिका होती. पण ही महासत्ता तिच्या नागरिकांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे आणि संघर्षांमुळे मातीसारखी कमजोर झाली आहे आणि पुढेही होत राहील. दुसरी गोष्ट म्हणजे, देवाचं राज्य मानवी सरकारांचा नाश करेल, तेव्हा पृथ्वीवर राज्य करणारी ही शेवटची महासत्ता असेल. टेहळणी बुरूज२३.०८ १०-११ ¶१२-१३
बुधवार, ११ जून
संकटात मी यहोवाला हाक मारली, मी माझ्या देवाला मदतीची याचना करत राहिलो. त्याने त्याच्या मंदिरातून माझी हाक ऐकली.—स्तो. १८:६.
कधीकधी समस्यांमुळे आणि परीक्षांमुळे दावीदला खूप निराश झाल्यासारखं वाटलं. (स्तो. १८:४, ५) पण यहोवाच्या काळजीमुळे आणि त्याच्या प्रेमामुळे तो ताजातवाना झाला. यहोवाने त्याच्या या थकलेल्या मित्राला “हिरव्यागार कुरणांत” आणि ‘भरपूर पाणी असलेल्या ठिकाणी विश्रांतीसाठी नेलं.’ यामुळे दावीदला पुन्हा ताकद मिळाली आणि तो पुन्हा आनंदाने यहोवाची सेवा करत राहू शकला. (स्तो. १८:२८-३२; २३:२) त्याच प्रकारे आज जेव्हा आपल्या जीवनात संकटं आणि परीक्षा येतात तेव्हा “यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमामुळेच” आपल्याला त्यात टिकून राहायला मदत होते. (विलाप. ३:२२; कलस्सै. १:११) दावीदला बऱ्याच वेळा अशा प्रसंगांचा सामना करावा लागला जेव्हा त्याचा जीव धोक्यात होता. त्याला बऱ्याच शक्तिशाली शत्रूंचाही सामना करावा लागला. पण यहोवाच्या प्रेमामुळे त्याला सुरक्षित असल्यासारखं वाटलं. दावीदला हे जाणवलं, की प्रत्येक परिस्थितीत यहोवा त्याच्यासोबत आहे. आणि त्यामुळे तो निश्चिंत होता. म्हणूनच तो म्हणू शकला: “माझ्या सर्व भयांपासून [यहोवाने] मला सोडवलं.” (स्तो. ३४:४) हे खरंय, की दावीदला कधीकधी खूप भीती वाटली, पण यहोवाचं प्रेम त्याच्या या भीतीपेक्षा कितीतरी पटीने मोठं होतं. टेहळणी बुरूज२४.०१ ३० ¶१५-१७
गुरुवार, १२ जून
पापी लोकांनी तुला मोहात पाडायचा प्रयत्न केला, तर त्यांचं ऐकू नकोस.—नीति. १:१०.
यहोआशने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांतून धडा घ्या. महायाजक यहोयादाचा मृत्यू झाल्यानंतर यहोआशने काही चुकीच्या लोकांसोबत मैत्री केली. (२ इति. २४:१७, १८) त्याने यहोवावर प्रेम नसलेल्या यहूदाच्या प्रमुखांचं ऐकलं. त्याने अशा वाईट लोकांपासून दूर राहायला हवं होतं, असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल. पण दुःखाची गोष्ट म्हणजे त्याने या चुकीच्या लोकांचा सल्ला ऐकला. एवढंच काय तर जेव्हा त्याच्या जवळच्या नातेवाइकाने, जखऱ्याने त्याची चूक सुधारायचा प्रयत्न केला तेव्हा यहोआशने त्याला ठार मारलं. (२ इति. २४:२०, २१; मत्त. २३:३५) असं करणं किती चुकीचं आणि मूर्खपणाचं होतं! यहोआशने आपल्या आयुष्याची सुरुवात तर चांगली केली होती. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, नंतर तो धर्मत्यागी आणि एक खूनी बनला. शेवटी त्याच्या स्वतःच्याच सेवकांनी त्याला ठार मारलं. (२ इति. २४:२२-२५) खरंच, यहोआश जर यहोवाचं आणि ज्यांचं यहोवावर प्रेम आहे त्या लोकांचं ऐकत राहिला असता आणि त्यांच्यावर प्रेम करत राहिला असता, तर किती बरं झालं असतं! त्याच्या आयुष्याचा शेवट चांगला झाला असता. टेहळणी बुरूज२३.०९ ९ ¶६
शुक्रवार, १३ जून
घाबरू नकोस.—लूक ५:१०.
प्रेषित पेत्र त्याला विश्वासू राहील हे येशूला माहीत होतं. त्यामुळे येशूने प्रेमळपणे पेत्रला म्हटलं, “घाबरू नकोस.” येशूचा आपल्यावर असलेला हा भरवसा पाहून पेत्रच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला. पेत्र आणि त्याचा भाऊ अंद्रिया यांनी त्यांचा मासेमारीचा व्यवसाय सोडला आणि ते येशूसोबत पूर्णवेळ सेवा करू लागले. या गोष्टीमुळे यहोवाने त्यांना बऱ्याच मार्गांनी आशीर्वाद दिले. (मार्क १:१६-१८) येशूचा शिष्य बनल्यामुळे पेत्रला बरेच चांगले अनुभव आले. येशूने जेव्हा आजाऱ्यांना बरं केलं, दुष्ट स्वर्गदूत काढले आणि मेलेल्यांना पुन्हा जिवंत केलं, तेव्हा या गोष्टी पेत्रला स्वतःच्या डोळ्यांनी पाहता आल्या. (मत्त. ८:१४-१७; मार्क ५:३७, ४१, ४२) पेत्रला एक दृष्टान्तसुद्धा पाहायला मिळाला. पुढे येशू राजा झाल्यानंतर त्याचं वैभव कसं असेल हे त्याने पाहिलं. आणि ही गोष्ट तो त्याच्या संपूर्ण आयुष्यात कधीच विसरला नसेल. (मार्क ९:१-८; २ पेत्र १:१६-१८) खरंच, येशूचा शिष्य बनल्यामुळे पेत्रला असे आशीर्वाद अनुभवायला मिळाले, ज्यांचा त्याने कधी विचारही केला नव्हता. त्याने त्याच्या कमीपणाच्या भावनेला स्वतःवर हावी होऊ दिलं नाही आणि त्यामुळे त्याला भरपूर आशीर्वाद अनुभवायला मिळाले. या गोष्टीवर विचार करून पेत्रला खरंच किती आनंद झाला असेल! टेहळणी बुरूज२३.०९ २१ ¶४-५
शनिवार, १४ जून
येशू त्याला म्हणाला: “मी तुला सांगतो, सात वेळा नाही, तर ७७ वेळा त्याला क्षमा कर.”—मत्त. १८:२२.
पेत्रने आपल्या पहिल्या पत्रात अगदी “मनापासून प्रेम” करा असं म्हटलं. अशा प्रकारचं प्रेम इतरांच्या फक्त काही पापांनाच नाही तर “पुष्कळ पापांना” झाकून टाकतं. (१ पेत्र ४:८) काही वर्षांआधी येशूने क्षमा करण्याच्या बाबतीत पेत्रला जो धडा दिला होता, त्याची कदाचित पेत्रला आठवण झाली असेल. त्या वेळी पेत्र येशूला म्हणाला होता, की आपण आपल्या भावाला “सात वेळा” क्षमा केली पाहिजे. पेत्रला कदाचित आपण क्षमा करण्याच्या बाबतीत खूप उदार आहोत असं वाटलं असेल. पण येशूने त्याला आणि आपल्यालाही सांगितलं, की आपण “७७ वेळा” क्षमा केली पाहिजे, म्हणजेच क्षमा करायला कोणतीच मर्यादा नसली पाहिजे. (मत्त. १८:२१) तुम्हाला जर येशूने दिलेल्या या सल्ल्याप्रमाणे वागणं कठीण जात असेल तर निराश होऊ नका. यहोवाच्या सगळ्याच अपरिपूर्ण सेवकांना कधी ना कधी क्षमा करायला कठीण गेलं आहे. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे, की आपण आपल्या भाऊबहिणींना क्षमा करण्यासाठी योग्य ती पावलं उचलली पाहिजेत आणि त्यांच्यासोबत शांतीचे संबंध जोडले पाहिजेत. टेहळणी बुरूज२३.०९ २९ ¶१२
रविवार, १५ जून
मी यहोवाला हाक मारली आणि त्याने मला उत्तर दिलं.—योना २:२.
माशाच्या पोटात असताना योनाला या गोष्टीची खातरी होती की यहोवा नम्र आणि पश्चात्ताप करणाऱ्या व्यक्तीची प्रार्थना ऐकतो. आणि यहोवा त्याला नक्की मदत करेल. पुढे त्या माशाने योनाला कोरड्या जमिनीवर ओकून टाकलं. आणि नंतर यहोवाने दिलेलं काम करण्यासाठी योना तयार झाला. (योना २:१०–३:४) एखाद्या समस्येतून जात असताना तुम्ही इतके निराश होऊन जाता का, की तुम्हाला प्रार्थनाच करावीशी वाटत नाही? किंवा तुम्ही इतके थकून जाता का, की तुम्हाला अभ्यास करायची इच्छाच होत नाही? लक्षात असू द्या, की यहोवाला तुमची परिस्थिती चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे तुम्ही एक साधीशी प्रार्थना जरी केली, तरी तुम्हाला ज्या गोष्टीची नेमकी गरज आहे ती तो तुम्हाला देईल, याची तुम्ही खातरी बाळगू शकता. (इफिस. ३:२०) तुम्हाला कदाचित शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असेल. त्यामुळे बायबल वाचणं आणि अभ्यास करणं कठीण जात असेल. अशा वेळी तुम्ही बायबल किंवा बायबल आधारित प्रकाशनांचे ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकू शकता. तसंच आपल्या वेबसाईटवर तुम्ही एखादं गाणं किंवा एखादा व्हिडिओ पाहू शकता. यहोवाकडून बळ मिळवण्यासाठी तुम्ही त्याला प्रार्थना करू शकता, तसंच त्याने ज्या आध्यात्मिक तरतुदी केल्या आहेत त्यांतून तुमच्या प्रार्थनांचं उत्तर कसं मिळतं ते पाहू शकता. यावरून दिसून येईल की तुम्ही त्याची मदत स्वीकारत आहात. टेहळणी बुरूज२३.१० १३ ¶६; १४ ¶९
सोमवार, १६ जून
पवित्र शक्ती अगदी स्पष्टपणे दाखवून देते, की पहिला मंडप उभा असेपर्यंत परमपवित्र स्थानात जाण्याचा मार्ग प्रकट करण्यात आला नव्हता.—इब्री ९:८.
उपासना मंडपात आणि नंतर यरुशलेममध्ये बांधण्यात आलेल्या मंदिरांची रचना एकसारखीच होती. त्यांमध्ये दोन भाग असायचे. “पवित्र स्थान” आणि “परमपवित्र स्थान.” या दोन्ही भागांना भरतकाम केलेल्या पडद्याने विभागलेलं होतं. (इब्री ९:२-५; निर्ग. २६:३१-३३) पवित्र स्थानात सोन्याचा दीपवृक्ष होता, धूप जाळण्याची वेदी होती आणि अर्पणाची भाकरी ठेवण्यासाठी एक मेज होतं. फक्त ‘अभिषिक्त याजकच’ पवित्र सेवा करण्यासाठी पवित्र स्थानात जायचे. (गण. ३:३, ७, १०) परमपवित्र स्थानात सोन्याने मढवलेली कराराची पेटी होती. ही यहोवाच्या उपस्थितीला सूचित करत होती. (निर्ग. २५:२१, २२) वर्षातून एकदा येणाऱ्या प्रायश्चित्ताच्या दिवशी महायाजकालाच त्या पडद्याच्या पलीकडे असणाऱ्या परमपवित्र स्थानात जायची परवानगी होती. (लेवी. १६:२, १७) तो स्वतःच्या आणि संपूर्ण राष्ट्राच्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी परमपवित्र स्थानात जायचा. कालांतराने यहोवाने उपासना मंडपातल्या या सगळ्या गोष्टींचा अर्थ स्पष्ट केला.—इब्री ९:६, ७. टेहळणी बुरूज२३.१० २७ ¶१२
मंगळवार, १७ जून
एकमेकांवर प्रेम करा.—योहा. १५:१७.
“एकमेकांवर प्रेम करा” ही आज्ञा वारंवार देवाच्या वचनात देण्यात आली आहे. (योहा. १५:१२; रोम. १३:८; १ थेस्सलनी. ४:९; १ पेत्र १:२२; १ योहा. ४:११) पण प्रेम आपल्या मनात असलेली भावना आहे. आणि कोणतीही व्यक्ती आपल्या मनात काय आहे ते बघू शकत नाही. तर मग आपलं एकमेकांवर प्रेम आहे हे इतरांना कसं कळून येईल? आपल्या शब्दांमधून आणि कामांमधून. आपण बऱ्याच मार्गांनी आपलं भाऊबहिणींवर प्रेम आहे हे दाखवू शकतो. जसं की, “एकमेकांसोबत खरं बोला.” (जख. ८:१६) “एकमेकांसोबत शांतीने राहा.” (मार्क ९:५०) “एकमेकांचा आदर करण्यात पुढाकार घ्या.” (रोम. १२:१०) “एकमेकांचा स्वीकार करा.” (रोम. १५:७) “एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा.” (कलस्सै. ३:१३) “एकमेकांची ओझी वाहत राहा.” (गलती. ६:२) “एकमेकांना सांत्वन देत जा.” (१ थेस्सलनी. ४:१८) “एकमेकांना बळकट करत . . . राहा.” (१ थेस्सलनी. ५:११) “एकमेकांसाठी प्रार्थना करा.”—याको. ५:१६. टेहळणी बुरूज२३.११ ९ ¶७-८
बुधवार, १८ जून
आपल्या आशेमुळे आनंदी राहा.—रोम. १२:१२.
दररोज आपल्याला बऱ्याच गोष्टींच्या बाबतींत निर्णय घ्यावे लागतात. जसं की, कोणाशी मैत्री करावी, कोणतं मनोरंजन पाहावं, किती शिक्षण घ्यावं. तसंच विवाह, मुलं आणि नोकरी यांसारख्या गोष्टींबद्दल निर्णय घेतानाही आपल्याला भक्कम विश्वासाची गरज असते. हे निर्णय घेत असताना आपण या प्रश्नांवर विचार करू शकतो: ‘मी जे निर्णय घेतो, त्यांवरून सध्याचं हे जग काही काळापुरतंच आहे आणि देवाचं नवीन जग लवकरच येणार आहे, हे दिसून येतं का? की आजच्यापुरतंच जगणाऱ्या लोकांच्या विचारसरणीचा माझ्या निर्णयांवर प्रभाव होत आहे, हे दिसून येतं?’ (मत्त. ६:१९, २०; लूक १२:१६-२१) नवीन जग लवकरच येणार आहे, या गोष्टीवरचा आपला विश्वास जर आपण भक्कम केला तर आपल्याला चांगले निर्णय घेता येतील. आपल्यावर अशाही काही परीक्षा येऊ शकतात ज्यांसाठी आपल्याला भक्कम विश्वासाची गरज पडू शकते. जसं की, आपला छळ होऊ शकतो, आपल्याला गंभीर आजार होऊ शकतो, किंवा मग इतर कोणत्या तरी कारणामुळे आपण निराश होऊ शकतो. सुरवातीला कदाचित आपल्यासमोर आलेल्या परीक्षांचा आपण ठामपणे सामना करू. पण सहसा होतं त्याप्रमाणे ही समस्या वाढतंच गेली तर तिचा धीराने सामना करण्यासाठी आणि आनंदाने यहोवाची सेवा करत राहण्यासाठी आपल्याला भक्कम विश्वासाची गरज आहे.—१ पेत्र १:६, ७. टेहळणी बुरूज२३.०४ २७ ¶४-५
गुरुवार, १९ जून
प्रार्थना करत राहा.—१ थेस्सलनी. ५:१७.
आपण आपल्या प्रार्थनेप्रमाणे काम करावं अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. उदाहरणार्थ, अधिवेशनाला जाता यावं म्हणून एक भाऊ त्याच्या मालकाला सुट्टीसाठी विनंती करेल. यहोवा या भावाच्या प्रार्थनेचं उत्तर कसं देईल? तो कदाचित त्या भावाला त्याच्या मालकाशी बोलण्यासाठी लागणारी हिंमत देईल. पण असं असलं तरीसुद्धा त्या भावाला मालकाशी बोलावं लागेल. कदाचित त्याला हे पुन्हापुन्हा करावं लागेल. किंवा कदाचित दुसऱ्या एका कर्मचाऱ्यासोबत त्याला कामाची वेळ बदलून घ्यावी लागेल. किंवा तो त्याच्या मालकाकडे सुट्टी मागून त्या दिवसाचा पगार कापण्याची विनंतीही करेल. आपल्या मागण्यांबद्दल आपण यहोवाला पुन्हा पुन्हा प्रार्थना करावी अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. येशूच्या शब्दांवरून कळून येतं की आपल्या काही मागण्या लगेच पूर्ण होणार नाहीत. (लूक ११:९) म्हणून आपण हार न मानता कळकळीने आणि पुन्हा पुन्हा प्रार्थना केली पाहिजे. (लूक १८:१-७) आपण जर असं करत राहिलो तर आपण हे दाखवून देऊ, की फक्त हुक्की आली म्हणून आपण प्रार्थना करत नाही, तर ज्या गोष्टीसाठी आपण प्रार्थना करतोय ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तसंच यहोवा आपल्याला मदत करू शकतो या गोष्टीवर आपला विश्वास आहे हेसुद्धा त्यातून दिसून येईल. टेहळणी बुरूज२३.११ २२ ¶१०-११
शुक्रवार, २० जून
आशेमुळे पुढे आपली निराशा होणार नाही.—रोम. ५:५.
यहोवाने आपला मित्र अब्राहामला असं अभिवचन दिलं, की त्याच्या संततीमुळे पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. (उत्प. १५:५; २२:१८) अब्राहामचा यहोवावर भक्कम विश्वास होता आणि त्यामुळे त्याला याची पूर्ण खातरी होती, की देव त्याने दिलेलं अभिवचन नक्की पूर्ण करेल. पुढे अब्राहाम १०० वर्षांचा आणि त्याची पत्नी ९० वर्षांची झाली तरी या विश्वासू जोडप्याला मुलगा झाला नव्हता. (उत्प. २१:१-७) पण बायबल म्हणतं, की त्याने “आशेच्या आधारावर असा विश्वास ठेवला की तो पुष्कळ राष्ट्रांचा पिता बनेल. कारण असं सांगण्यात आलं होतं.” (रोम. ४:१८) आणि तुम्हाला माहीतच आहे, की अब्राहामची आशा फोल ठरली नाही. बराच काळ वाट पाहिल्यानंतर तो खरंच एका मुलाचा पिता बनला. आणि तो मुलगा होता इसहाक. पण कोणत्या गोष्टीमुळे अब्राहामला देवाने दिलेलं वचन पूर्ण होईल याची पक्की खातरी होती? यहोवासोबत अब्राहामचं एक वैयक्तिक नातं असल्यामुळे, “जे वचन देवाने दिलं होतं, ते पूर्ण करायला तो समर्थ आहे, अशी पक्की खातरी त्याला होती.” (रोम. ४:२१) आणि त्याच्या विश्वासामुळेच त्याला यहोवाची मान्यता मिळाली आणि त्याला नीतिमान ठरवण्यात आलं.—याको. २:२३. टेहळणी बुरूज२३.१२ ८ ¶१-२
शनिवार, २१ जून
जो सगळ्यात लहान गोष्टीत विश्वासू असतो, तो मोठ्या गोष्टींतही विश्वासू असतो. आणि जो सगळ्यात लहान गोष्टीत अनीतिमान असतो तो मोठ्या गोष्टींतही अनीतिमान असतो.—लूक १६:१०.
भरवशालायक असलेला तरुण भाऊ, त्याच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतो. येशूचं या बाबतीत एक खूप सुंदर उदाहरण आहे. तो कधीच निष्काळजीपणे किंवा बेजबाबदारपणे वागला नाही. उलट, यहोवाने त्याला जी जबाबदारी सोपवली होती ती कठीण असतानासुद्धा त्याने ती पूर्ण केली. त्याचं लोकांवर, खासकरून त्याच्या शिष्यांवर प्रेम होतं, म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने त्यांच्यासाठी आपलं जीवन दिलं. (योहा. १३:१) तुम्हीसुद्धा येशूचं अनुकरण करून तुम्हाला मिळालेली कोणतीही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मेहनत घेऊ शकता. जर तुम्हाला तुमची जबाबदारी कशी पूर्ण करायची हे समजत नसेल, तर नम्रपणे मंडळीतल्या प्रौढ भावांची मदत घ्या. फक्त नावापुरतं काम करू नका. (रोम. १२:११) उलट, ‘आपण जे काही करतो, ते माणसांसाठी नाही, तर यहोवासाठी करतो असं समजून’ आपली जबाबदारी पूर्ण करा. (कलस्सै. ३:२३) हे खरं आहे की आपण परिपूर्ण नाही, त्यामुळे आपल्या मर्यादांची जाणीव ठेवा आणि जेव्हा तुमच्या हातून चुका होतात तेव्हा त्या नम्रपणे कबूल करा.—नीति. ११:२. टेहळणी बुरूज२३.१२ २६¶८
रविवार, २२ जून
जो यहोवावर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित आहे.—यिर्म. १७:७.
बाप्तिस्मा घेऊन यहोवाच्या कुटुंबाचा भाग बनणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे! जे बाप्तिस्मा घेतात त्यांना स्तोत्रकर्ता दावीदसारखंच वाटतं. तो म्हणाला: “तुझ्या अंगणांत राहण्यासाठी तू ज्याला निवडतोस आणि आपल्याजवळ येऊ देतोस, तो माणूस सुखी आहे!” (स्तो. ६५:४) यहोवा त्याच्या अंगणात असंच कोणालाही आणत नाही. यहोवासोबत जवळचं नातं जोडण्याची इच्छा असल्याचं जे दाखवून देतात त्यांनाच तो त्याच्याजवळ आणतो. (याको. ४:८) जेव्हा तुम्ही समर्पण करून बाप्तिस्मा घेता तेव्हा तुम्ही या गोष्टीची खातरी ठेवू शकता, की त्यानंतर तुम्हाला “काहीच कमी पडणार नाही इतक्या आशीर्वादांचा वर्षाव” यहोवा तुमच्यावर करेल. (मला. ३:१०; यिर्म. १७:८) बाप्तिस्मा फक्त एक सुरुवात आहे. तुमच्यावर कितीही मोह आले आणि कितीही समस्या आल्या, तरी तुमच्या समर्पणाच्या वचनानुसार जीवन जगायचा होता होईल तितका प्रयत्न करायची तुमची इच्छा असेल. (उप. ५:४, ५) येशूचे शिष्य या नात्याने त्याच्या उदाहरणाचं अनुकरण करायचा आणि त्याच्या आज्ञेचं पुरेपूर पालन करायचा होता होईल तितका प्रयत्न करा.—मत्त. २८:१९, २०; १ पेत्र २:२१. टेहळणी बुरूज२४.०३ ८ ¶१-३
सोमवार, २३ जून
माणूस आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या बायकोसोबत राहील आणि ते दोघं एकदेह होतील.—उत्प. २:२४.
जर तुम्हाला आणि तुमच्या विवाहसोबत्याला एकमेकांसोबत वेळ घालवायलाच आवडत नसेल तर काय? अशा वेळी तुम्ही काय करू शकता? शेकोटीचं उदाहरण लक्षात घ्या. शेकोटी लगेच पेटत नसते. आधी त्यात छोटी-छोटी लाकडं आणि मग हळूहळू मोठी लाकडं घालावी लागतात. तसंच, सुरुवातीला तुम्ही दररोज काही मिनिटं सोबत घालवू शकता का? आणि या वेळेत असं काहीतरी करा जे दोघांनाही आवडेल. (याको. ३:१८) अशा प्रकारे सुरुवातीला थोडा-थोडा वेळ एकत्र घालवल्यामुळे तुमच्या प्रेमाची ज्योत पुन्हा पेटत राहील. पती-पत्नींनी एकमेकांचा आदर करणंसुद्धा खूप महत्त्वाचंय. ते जणू ऑक्सिजनसारखं आहे, ज्यामुळे शेकोटी पेटत राहते. कारण ऑक्सिजन नसेल तर आग लगेच विझून जाईल. तसंच, पती-पत्नींमध्ये आदर नसेल तर प्रेमाची ज्योत लगेच विझून जाईल. पण तेच जर पती-पत्नी एकमेकांना आदर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतील, तर ते जणू प्रेमाची ज्योत पेटती ठेवण्यासाठी मेहनत घेत असतात. हेही लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या जोडीदाराला आदर दाखवत आहात असं तुम्हाला जरी वाटत असलं, तरी ते तुमच्या जोडीदाराला जाणवतंय का हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं आहे. टेहळणी बुरूज२३.०५ २२ ¶९; २४ ¶१४-१५
मंगळवार, २४ जून
चिंतांनी मला सर्व बाजूंनी घेरलं, तेव्हा तू मला दिलासा आणि सांत्वन दिलंस.—स्तो. ९४:१९.
बायबलमध्ये देवाच्या अशा विश्वासू सेवकांबद्दल सांगितलंय, ज्यांना त्यांच्या शत्रूंमुळे आणि इतर तणावात्मक परिस्थितींमुळे खूप घाबरल्यासारखं वाटलं होतं. (स्तो. १८:४; ५५:१, ५) त्याचप्रमाणे, आज आपल्यालासुद्धा शाळा-कॉलेजमध्ये, कामावरच्या ठिकाणी, आपल्या घरच्यांकडून आणि सरकारकडून होणाऱ्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो. एवढंच नव्हे, तर कधीकधी आरोग्याच्या समस्येमुळे कदाचित आपल्या जिवालाही धोका निर्माण होऊ शकतो. अशा वेळी तुम्हाला एखादं लहान बाळ जसं स्वतःहून काहीच करू शकत नाही तसं खूप हतबल असल्यासारखं वाटेल. मग अशा वेळी यहोवा आपल्याला कशी मदत करतो? तो आपल्याला सांत्वन आणि दिलासा देतो. म्हणून यहोवाला प्रार्थना करून आणि बायबल वाचून त्याच्यासोबत नियमितपणे वेळ घालवायचा प्रयत्न करा. (स्तो. ७७:१, १२-१४) असं केल्यामुळे जेव्हा तुम्ही खूप तणावात्मक परिस्थितीत असता तेव्हा सर्वात आधी आपल्या स्वर्गातल्या पित्याला प्रार्थना करायचा विचार तुमच्या मनात येईल. तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती वाटते, कोणत्या गोष्टीची चिंता वाटते, ते यहोवाला सांगा. आणि त्याच्या वचनातून त्याला तुमच्याशी बोलू द्या आणि तुमचं सांत्वन करू द्या.—स्तो. ११९:२८. टेहळणी बुरूज२४.०१ २४-२५ ¶१४-१६
बुधवार, २५ जून
देव तुम्हाला उत्साहित करतो. तुमच्यामध्ये इच्छा निर्माण करतो आणि कार्य करायची ताकद देतो.—फिलिप्पै. २:१३.
आध्यात्मिक ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा खूप महत्त्वाची आहे. प्रेरणा मिळाल्यामुळे एखाद्या व्यक्तीला आपलं ध्येय गाठायचं प्रोत्साहन मिळतं किंवा ते मिळवण्याची जबरदस्त इच्छा त्याच्यामध्ये निर्माण होते. आपल्याला जर प्रेरणा मिळाली, तर आपण आपल्या ध्येयापर्यंत सहज पोहचू शकतो. तर मग, प्रेरणा मिळावी म्हणून तुम्ही काय करू शकता? प्रेरणा मिळण्यासाठी प्रार्थना करा. तुमचं ध्येय गाठण्यासाठी यहोवा त्याच्या पवित्र शक्तीद्वारे तुम्हाला प्रेरणा देऊ शकतो. आपलं काहीतरी ध्येय असलं पाहिजे किंवा ध्येय ठवणं ही एक चांगली गोष्ट आहे, हे माहीत असल्यामुळे काही वेळा आपण ध्येय ठेवतो. पण ते गाठायची इच्छा कदाचित आपल्यात नसेल. यहोवाने तुमच्यासाठी जे केलंय त्यावर मनन करा. (स्तो. १४३:५) यहोवाने आपल्याला जी अपार कृपा दाखवली, त्यावर प्रेषित पौलने मनन केलं आणि त्यामुळे यहोवासाठी खूप काही करायची प्रेरणा त्याच्यामध्ये निर्माण झाली. (१ करिंथ. १५:९, १०; १ तीम. १:१२-१४) अगदी तसंच, यहोवाने तुमच्यासाठी जे केलंय, त्यावर तुम्ही जितकं जास्त मनन कराल, तितकी जास्त तुम्हाला तुमचं ध्येय गाठायची प्रेरणा मिळेल.—स्तो. ११६:१२. टेहळणी बुरूज२३.०५ २७ ¶३-५
गुरुवार, २६ जून
यहोवाच्या नावाचं गुणगान करा.—स्तो. ११३:१.
जेव्हा आपण आपल्या स्वर्गातल्या पित्याच्या नावाची स्तुती करतो तेव्हा त्याला आनंद होतो. (स्तो. ११९:१०८) मग याचा अर्थ आपल्या सर्वसमर्थ देवाला अपरिपूर्ण मानवांसारखं प्रशंसेची गरज आहे, असा होतो का? नक्कीच नाही. जेव्हा आपण आपल्या स्वर्गातल्या पित्याची स्तुती करतो, तेव्हा सैतानाने केलेला आणखी एक दावा खोटा असल्याचं आपण दाखवून देत असतो. सैतानाने असा दावा केला, की कोणताही माणूस यहोवाच्या नावासाठी विश्वासूपणे त्याची बाजू घेऊ शकत नाही. कारण त्याच्या मते इतकी एकनिष्ठा आपण दाखवू शकणार नाही. त्याचं असं म्हणणं होतं, की जर यहोवाची आज्ञा न मानण्यातच आपलं भलं आहे, असं जर आपल्याला वाटलं तर आपण त्याची सेवा करायचं सोडून देऊ. (ईयो. १:९-११; २:४) पण यहोवाची विश्वासूपणे सेवा करणाऱ्या ईयोबने सैतान खोटा असल्याचं सिद्ध केलं. मग तुमच्याबद्दल काय? आज आपल्या प्रत्येकाकडे विश्वासूपणे त्याची बाजू घ्यायचा आणि एकनिष्ठपणे त्याची सेवा करून त्याचं मन आनंदित करायचा बहुमान आहे. (नीति. २७:११) हा खरंच आपल्यासाठी एक सन्मान आहे! टेहळणी बुरूज२४.०२ ८-९ ¶३-५
शुक्रवार, २७ जून
त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल.—२ इति. २०:२०.
मोशे आणि यहोशवाच्या दिवसांनंतर यहोवाने त्याच्या लोकांचं मार्गदर्शन करण्यासाठी न्यायाधीशांचा (शास्त्यांचा) वापर केला. मग राजांच्या काळात त्याने लोकांचं मार्गदर्शन करण्यासाठी संदेष्ट्यांना निवडलं. विश्वासू राजांनी संदेष्ट्यांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचं पालन केलं. उदाहरणार्थ, नाथान संदेष्ट्याने दावीद राजाची जी सुधारणूक केली होती, ती त्याने नम्रपणे स्वीकारली. (२ शमु. १२:७, १३; १ इति. १७:३, ४) यहोशाफाट राजासुद्धा मार्गदर्शनासाठी यहजिएल संदेष्ट्यावर अवलंबून राहिला. आणि त्याने यहूदामधल्या लोकांनासुद्धा “[देवाच्या] संदेष्ट्यांवर विश्वास” ठेवायचं प्रोत्साहन दिलं. (२ इति. २०:१४, १५) हिज्कीया राजासुद्धा समस्येत होता तेव्हा त्याने यशया संदेष्ट्याची मदत घेतली. (यश. ३७:१-६) जेव्हा-जेव्हा राजांनी यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन केलं, तेव्हा-तेव्हा त्यांना आशीर्वाद मिळाला आणि राष्ट्राचं संरक्षण झालं. (२ इति. २०:२९, ३०; ३२:२२) यावरून सगळ्यांना कळलं, की यहोवा संदेष्ट्यांचा वापर करून त्याच्या लोकांचं मार्गदर्शन करतोय. टेहळणी बुरूज२४.०२ २१ ¶८
शनिवार, २८ जून
त्यांच्यासोबत सहभागी होऊ नका.—इफिस. ५:७.
सैतानाची इच्छा आहे की आपण अशा लोकांसोबत वेळ घालवावा, ज्यांच्यामुळे आपल्याला यहोवाच्या स्तरांप्रमाणे जगणं आणखी कठीण जाईल. आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की आपण प्रत्यक्ष ज्यांच्यासोबत वेळ घालवतो त्यांच्यापुरताच हा सल्ला मर्यादित नाही, तर आपण सोशल मिडियावर ज्यांच्यासोबत वेळ घालवतो त्यांच्या बाबतीतही हा सल्ला लागू होतो. जगातले लोक असा विचार करतात की अनैतिक जीवन जगण्यात काहीच हरकत नाही. पण आपण अशा विचारांविरुद्ध लढलं पाहिजे. कारण आपल्याला चांगलंच माहीत आहे की हे चुकीचं आहे. (इफिस. ४:१९, २०) असं असलं तरी आपण स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजे. जसं की, ‘जर माझ्या शाळा-कॉलेजमधले किंवा कामावरचे सोबती यहोवाच्या नीतिमान स्तरांचा आदर करत नसतील, तर त्यांच्यासोबत विनाकारण वेळ घालवायचं मी टाळतो का? इतर जण माझी टीका करत असले तरी मी ठामपणे यहोवाच्या स्तरांप्रमाणे चालायचा प्रयत्न करतो का?’ मंडळीतसुद्धा मित्र निवडताना २ तीमथ्य २:२०-२२ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण काळजीपूर्वक मित्र निवडले पाहिजेत. कारण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की सगळेच लोक आपल्याला यहोवाची विश्वासूपणे सेवा करायला मदत करतीलच असं नाही. टेहळणी बुरूज२४.०३ २२-२३ ¶११-१२
रविवार, २९ जून
यहोवा खूप करुणामय आहे.—याको. ५:११.
यहोवा नेमका कसा असेल याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का? यहोवा अदृष्य असला तरी बायबल बऱ्याच मार्गांनी त्याचं वर्णन करतं. यहोवा “सूर्यासारखा आणि ढालीसारखा” आहे असं बायबल म्हणतं. तसंच, तो “भस्म करणारा अग्नी आहे” असंही त्यात म्हटलंय. (स्तो. ८४:११; इब्री १२:२९) बायबलच्या एका लेखकाने त्याचं अस्तित्व जणू नीलमण्यासारखं, चमकणाऱ्या धातूसारखं आणि डोळे दिपवून टाकणाऱ्या मेघधनुष्यासारखं आहे असं म्हटलं. (यहे. १:२६-२८) आपण यहोवाला पाहू शकत नसल्यामुळे तो आपल्यावर प्रेम करतो या गोष्टीवर विश्वास ठेवणं आपल्याला कदाचित कठीण जाईल. काही लोकांना आलेल्या वाईट अनुभवांमुळे त्यांना असं वाटतं, की यहोवा आपल्यासारख्या व्यक्तीवर प्रेम करू शकत नाही. यहोवाला अशा भावना समजतात आणि त्यामुळे आपल्यावर काय परिणाम होतो हेही त्याला समजतं. आपल्याला मदत करण्यासाठी त्याने त्याच्या वचनात त्याचं सुंदर व्यक्तिमत्व स्पष्ट केलंय. यहोवाचं सगळ्यात चांगलं वर्णन जर एकाच शब्दात करायचं झालं, तर तो शब्द आहे प्रेम. कारण बायबल म्हणतं, “देव प्रेम आहे.” (१ योहा. ४:८) प्रेमाने प्रवृत्त होऊनच यहोवा सर्वकाही करतो. यहोवा प्रेम दाखवण्याच्या बाबतीत इतका उदार आहे आणि त्याचं प्रेम इतकं गहिरं आहे, की जे त्याच्यावर प्रेम करत नाहीत त्यांच्यावरही तो प्रेम करतो.—मत्त. ५:४४, ४५. टेहळणी बुरूज२४.०१ २६ ¶१-३
सोमवार, ३० जून
तो ढगाच्या खांबातून त्यांच्याशी बोलायचा.—स्तो. ९९:७.
इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर काढण्यासाठी यहोवाने मोशेला निवडलं. आणि यहोवा त्यांचं मार्गदर्शन करतोय याचा पुरावा म्हणून त्याने त्यांना दिवसा ढगाचा खांब आणि रात्री आगीचा खांब दिला. (निर्ग. १३:२१) मोशे या खांबाच्या मागोमाग गेला आणि त्यामुळे तो आणि इस्राएली लोक तांबड्या समुद्रापर्यंत पोहोचले. पण जेव्हा इस्राएली लोकांनी पाहिलं की पुढे तांबडा समुद्र आहे आणि मागून इजिप्तचं सैन्य आपला पाठलाग करतंय, तेव्हा ते खूप घाबरले आणि त्यांना असं वाटलं की आता आपण अडकलोय. पण ही काही चूक नव्हती. यहोवाने जाणूनबुजून मोशेचा वापर करून त्यांना इथे आणलं होतं. (निर्ग. १४:२) त्यानंतर देवाने आश्चर्यकारक रितीने त्यांची सुटका केली. (निर्ग. १४:२६-२८) पुढे ४० वर्षं देवाच्या लोकांचं ओसाड रानात मार्गदर्शन करण्यासाठी मोशे या ढगाच्या खांबावर अवलंबून होता. (निर्ग. ३३:७, ९, १०) या खांबातूनच यहोवा मोशेसोबत बोलायचा आणि नंतर मोशे यहोवाने दिलेल्या सूचना लोकांना कळवायचा. अशा प्रकारे, यहोवाच मोशेद्वारे इस्राएली लोकांचं मार्गदर्शन करतोय याचे बरेच पुरावे इस्राएली लोकांकडे होते. टेहळणी बुरूज२४.०२ २१ ¶४-५