वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es25 पृ. ४४-५६
  • एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एप्रिल
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२५
  • उपशिर्षक
  • मंगळवार, १ एप्रिल
  • बुधवार, २ एप्रिल
  • गुरुवार, ३ एप्रिल
  • शुक्रवार, ४ एप्रिल
  • शनिवार, ५ एप्रिल
  • रविवार, ६ एप्रिल
  • सोमवार, ७ एप्रिल
  • मंगळवार, ८ एप्रिल
  • बुधवार, ९ एप्रिल
  • गुरुवार, १० एप्रिल
  • शुक्रवार, ११ एप्रिल
  • स्मारकविधीची तारीख
    सूर्यास्तानंतर
    शनिवार, १२ एप्रिल
  • रविवार, १३ एप्रिल
  • सोमवार, १४ एप्रिल
  • मंगळवार, १५ एप्रिल
  • बुधवार, १६ एप्रिल
  • गुरुवार, १७ एप्रिल
  • शुक्रवार, १८ एप्रिल
  • शनिवार, १९ एप्रिल
  • रविवार, २० एप्रिल
  • सोमवार, २१ एप्रिल
  • मंगळवार, २२ एप्रिल
  • बुधवार, २३ एप्रिल
  • गुरुवार, २४ एप्रिल
  • शुक्रवार, २५ एप्रिल
  • शनिवार, २६ एप्रिल
  • रविवार, २७ एप्रिल
  • सोमवार, २८ एप्रिल
  • मंगळवार, २९ एप्रिल
  • बुधवार, ३० एप्रिल
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२५
es25 पृ. ४४-५६

एप्रिल

मंगळवार, १ एप्रिल

तुम्ही माझ्यासोबत हे काय केलं? मला का फसवलं?—उत्प. २९:२५.

बायबल काळात यहोवाच्या सेवकांना अशा समस्यांचा सामना करावा लागला, ज्यांची त्यांनी कधीच अपेक्षा केली नव्हती. याकोबचाच विचार करा. त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं होतं, की त्याने यहोवाची सेवा करणाऱ्‍या त्याच्या नातेवाइकाकडे, लाबानकडे जावं आणि त्याच्या मुलींपैकी एकीशी लग्न करावं, म्हणजे मग यहोवा त्याला भरभरून आशीर्वाद देईल. (उत्प. २८:१-४) आणि याकोबनेही तसंच केलं. त्याने कनान देश सोडला आणि तो लाबानच्या घरी गेला. लाबानला दोन मुली होत्या, लेआ आणि राहेल. याकोब लाबानची लहान मुलगी राहेल हिच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्न करता यावं म्हणून तो लाबानसाठी सात वर्षं काम करायला तयार झाला. (उत्प. २९:१८) पण याकोबने अपेक्षा केली होती त्यापेक्षा वेगळंच काहीतरी घडलं. लाबानने याकोबला फसवलं आणि त्याच्या मोठ्या मुलीशी, म्हणजे लेआशी त्याचं लग्न लावून दिलं. मग त्याने याकोबला सांगितलं, की पुढच्या आठवड्यात तो राहेलशीही त्याचं लग्न लावून देईल, पण त्यासाठी त्याला आणखी सात वर्षं काम करावं लागेल. (उत्प. २९:२६, २७) इतकंच नाही, तर पुढे जेव्हा याकोब त्याच्यासाठी काम करत होता तेव्हासुद्धा त्याने त्याला फसवलं. तर असं म्हणता येईल की एकूण वीस वर्षं लाबान याकोबसोबत चुकीचं वागत राहिला.—उत्प. ३१:४१, ४२. टेहळणी बुरूज२३.०४ १५ ¶५

बुधवार, २ एप्रिल

त्याच्यासमोर आपलं मन मोकळं करा.—स्तो. ६२:८.

आपल्याला सांत्वनाची आणि मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा आपण कोणाकडे वळलं पाहिजे? साहजिकच आपण यहोवाकडे वळलं पाहिजे आणि त्याला प्रार्थना केली पाहिजे. आणि आपण हेच करावं अशी यहोवा देवाची इच्छा आहे. आपण त्याला वारंवार ‘प्रार्थना करावी’ असं त्याला वाटतं. (१ थेस्सलनी. ५:१७) जीवनातल्या कुठल्याही गोष्टीबद्दल आपण अगदी मनमोकळेपणाने त्याला प्रार्थना करू शकतो आणि त्याच्याकडे मदत मागू शकतो. (नीति. ३:५, ६) यहोवा खूप उदार मनाचा देव आहे त्यामुळे आपण त्याला कितीही वेळा प्रार्थना करू शकतो. यहोवाला आपल्या प्रार्थना किती महत्त्वाच्या वाटतात हे येशूला माहीत होतं. पृथ्वीवर येण्याच्या बऱ्‍याच काळाआधी त्याच्या पित्याने विश्‍वासू स्त्री-पुरुषांच्या प्रार्थनेचं कसं उत्तर दिलं हे त्याने स्वतः पाहिलं होतं. उदाहरणार्थ हन्‍ना, दावीद, एलीया आणि अशा इतर विश्‍वासू जणांच्या प्रार्थनेचं यहोवाने उत्तर दिलं तेव्हा येशू आपल्या पित्यासोबतच होता. (१ शमु. १:१०, ११, २०; १ राजे १९:४-६; स्तो. ३२:५) आणि म्हणूनच येशूने आपल्या शिष्यांना वारंवार आणि पूर्ण विश्‍वासाने प्रार्थना करायला सांगितलं.—मत्त. ७:७-११. टेहळणी बुरूज२३.०५ २ ¶१, ३

गुरुवार, ३ एप्रिल

माणसांची भीती पाश ठरते, पण जो यहोवावर भरवसा ठेवतो, तो सुरक्षित राहील.—नीति. २९:२५.

महायाजक यहोयादाच्या मनात यहोवाची भीती होती. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा ईजबेलच्या मुलीने म्हणजे अथल्याने यहूदाचं राज्यपद बळकावलं. कारण ती खूप निर्दयी होती. तिला सत्तेची इतकी हाव होती की तिने राजघराण्यातल्या सगळ्या वारसदारांना म्हणजे स्वतःच्या नातवंडांना मारून टाकायचा प्रयत्न केला. (२ इति. २२:१०, ११) पण त्यांच्यापैकी एका मुलाला, म्हणजे यहोआशला यहोयादाच्या बायकोने म्हणजे यहोशबाथने वाचवलं. तिने आणि तिच्या पतीने मुलाला लपवून ठेवलं आणि त्याची काळजी घेतली. आणि अशा प्रकारे त्यांनी दावीदच्या राजघराण्याचा नाश होऊ दिला नाही. यहोयादा यहोवाला एकनिष्ठ होता आणि तो अथल्याला घाबरला नाही. यहोआश सात वर्षांचा होता तेव्हा यहोयादाने पुन्हा एकदा दाखवलं की तो यहोवाला एकनिष्ठ होता. त्याने एक योजना आखली. ही योजना जर सफल झाली असती तर दावीदच्या घराण्यातून येणारा यहोआश राजा बनला असता. पण जर या योजनेप्रमाणे घडलं नसतं तर यहोयादाला आपला जीव नक्कीच गमवावा लागला असता. पण यहोवाच्या आशीर्वादाने ही योजना सफल झाली. टेहळणी बुरूज२३.०६ १७ ¶१२-१३

शुक्रवार, ४ एप्रिल

सर्वोच्च देव हाच मानवी राज्यांवर शासनकर्ता आहे आणि आपली इच्छा असेल त्याला तो राज्य देतो.—दानी. ४:२५.

दानीएलने सांगितलेला स्वप्नाचा अर्थ ऐकून नबुखद्‌नेस्सर राजाला असं वाटलं असतं की तो त्याच्याविरुद्ध बंड करत आहे, आणि त्यामुळे राजा त्याला ठारही मारू शकला असता. पण हे माहीत असतानासुद्धा दानीएलने धैर्य दाखवलं, आणि त्या स्वप्नाचा अर्थ राजाला सांगितला. दानीएलने आपल्या संपूर्ण आयुष्यात धैर्य दाखवलं. पण त्यासाठी त्याला कशामुळे मदत झाली? तो लहान होता तेव्हा त्याच्या आईवडिलांनी नक्कीच त्याच्यासमोर एक चांगलं उदाहरण ठेवलं असेल. (अनु. ६:६-९) दानीएलला नियमशास्त्रामधल्या दहा आज्ञांसारख्या फक्‍त मोठमोठ्या गोष्टीच माहीत नव्हत्या, तर लहानसहान गोष्टीसुद्धा माहीत होत्या. जसं की, नियमशास्त्रानुसार इस्राएली लोकांनी काय खायचं नव्हतं हेसुद्धा त्याला माहीत होतं. (लेवी. ११:४-८; दानी. १:८, ११-१३) यासोबतच, दानीएलला देवाच्या लोकांचा इतिहाससुद्धा माहीत होता. देवाच्या स्तरांना न पाळल्यामुळे त्यांना काय परिणाम भोगावे लागले, हे त्याला माहीत होतं. (दानी. ९:१०, ११) दानीएलच्या आयुष्यात जे काही घडलं आणि त्याला जो काही अनुभव आला, त्यावरून त्याला या गोष्टीची खातरी पटली होती, की यहोवा आणि त्याचे शक्‍तिशाली स्वर्गदूत नेहमी त्याच्यासोबत असतील.—दानी. २:१९-२४; १०:१२, १८, १९. टेहळणी बुरूज२३.०८ ३ ¶५-६

शनिवार, ५ एप्रिल

जे आपल्या मर्यादांची जाणीव ठेवतात, त्यांच्याकडे बुद्धी असते.—नीति. ११:२.

रिबका एक बुद्धिमान स्त्री होती. तिने तिच्या संपूर्ण आयुष्यात धैर्याने निर्णय घेतले. तसंच, कधी काय करायचं आणि कसं वागायचं हे तिला माहीत होतं. (उत्प. २४:५८; २७:५-१७) असं असलं, तरी ती दुसऱ्‍यांचा आदर करायची आणि ज्यांना अधिकार देण्यात आला होता, त्यांच्या आज्ञेत राहायची. (उत्प. २४:१७, १८, ६५) तुम्हीसुद्धा रिबकासारखं नम्र राहिला आणि यहोवाने घालून दिलेल्या व्यवस्थेला पाठिंबा दिला, तर तुमच्या कुटुंबासमोर आणि मंडळीसमोर तुमचं एक चांगलं उदाहरण असेल. मर्यादांची जाणीव असणं हा आणखी एक असा गुण आहे, जो सगळ्या ख्रिश्‍चनांमध्ये असला पाहिजे. एस्तेरसुद्धा अशीच होती. ती देवाला विश्‍वासू होती आणि तिच्या मर्यादांची तिला जाणीव होती. आणि यामुळेच ती राणी बनल्यावर गर्वाने फुगली नाही. तिच्यापेक्षा वयाने मोठा असलेला तिचा चुलत भाऊ मर्दखय याचा सल्ला तिने ऐकला आणि त्याप्रमाणे ती वागली. (एस्ते. २:१०, २०, २२) तरुण बहिणींनो, तुम्हालाही मर्यादांची जाणीव ठेवून इतरांकडून सल्ला घेता येईल आणि तो लागू करता येईल. (तीत २:३-५) एस्तेरने आणखी एका मार्गाने मर्यादांची जाणीव असल्याचं दाखवलं. “ती दिसायला अतिशय सुंदर आणि बांधेसूद होती.” तरी तिने इतरांचं लक्ष स्वतःकडे वेधलं नाही.—एस्ते. २:७, १५. टेहळणी बुरूज२३.१२ १९-२० ¶६-८

रविवार, ६ एप्रिल

देव आपल्या मनापेक्षा मोठा आहे आणि त्याला सर्वकाही माहीत आहे.—१ योहा. ३:२०.

मनात खूप जास्त प्रमाणात दोषीपणाची भावना असणं, हे एक असं ओझं आहे जे आपण वाहत राहण्याऐवजी काढून टाकलं पाहिजे. आपण जर आपलं पाप कबूल केलं असेल, त्याबद्दल पश्‍चात्ताप केला असेल आणि ते पुन्हा होऊ नये म्हणून पावलं उचलली असतील, तर यहोवाने आपल्याला क्षमा केली आहे असा भरवसा आपण बाळगू शकतो. (प्रे. कार्यं ३:१९) ही पावलं उचलल्यानंतरसुद्धा आपण स्वतःला दोष देत राहावं, असं यहोवाला वाटत नाही. कारण असं केल्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं, हे त्याला माहीत आहे. (स्तो. ३१:१०) आपण जर अशा भावनेमुळे खूप जास्त दुःखी झालो, तर आपण कदाचित जीवनाच्या शर्यतीत धावायचं सोडून देऊ. (२ करिंथ. २:७) अतिप्रमाणात दोषीपणाची भावना सतावते तेव्हा यहोवा आपल्याला ‘खरोखर क्षमा’ करतो या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. (स्तो. १३०:४) मनापासून पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांना जेव्हा तो क्षमा करतो तेव्हा तो असं वचन देतो, की तो “त्यांची पापं पुन्हा कधीच लक्षात ठेवणार नाही.” (यिर्म. ३१:३४) याचा अर्थ, आपण पश्‍चात्ताप केल्यानंतर यहोवा आपल्याला पूर्वी केलेल्या पापांसाठी जबाबदार धरणार नाही. तुमच्या चुकांमुळे तुम्हाला यहोवाची सेवा आधीसारखी करता येत नसली, तरी स्वतःला दोष देऊ नका. यहोवा तुमच्या पापांबद्दल विचार करत बसत नाही, आणि तुम्हीही तसं केलं नाही पाहिजे. टेहळणी बुरूज२३.०८ ३०-३१ ¶१४-१५

सोमवार, ७ एप्रिल

खंबीर आणि स्थिर राहा.—१ करिंथ. १५:५८.

कोव्हिड-१९ महामारीच्या वेळी ज्यांनी या चुकीच्या माहितीकडे लक्ष दिलं त्यांना नको त्या चिंतांचा सामना करावा लागला. याउलट ज्या यहोवाच्या साक्षीदारांनी संघटनेकडून येणाऱ्‍या मार्गदर्शनाचं पालन केलं त्यांना अशा चिंतांपासून दूर राहायला मदत झाली. (मत्त. २४:४५) आपण नेहमी “जास्त महत्त्वाच्या” गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. (फिलिप्पै. १:९, १०) कारण लक्ष विचलित करणाऱ्‍या गोष्टींमुळे आपला बराच वेळ आणि बरीच शक्‍ती वाया जाऊ शकते. रोजच्या जीवनातल्या गोष्टींनासुद्धा आपण जर जास्त महत्त्व दिलं तर त्यामुळेसुद्धा आपलं लक्ष विचलित होऊ शकतं; जसं की, खाणं-पिणं, मनोरंजन आणि नोकरी-व्यवसाय. (लूक २१:३४, ३५) यासोबतच आपल्यावर दररोज सामाजिक वादविषयांचा आणि राजनैतिक मुद्द्‌यांचा बातम्यांमधून भडिमार होत असतो. अशा प्रकारच्या वादविषयांमुळे आपलं लक्ष विचलित होऊन चालणार नाही. नाहीतर आपण मनातल्या मनात कोणाची तरी बाजू घ्यायचा प्रयत्न करू. अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून सैतान योग्य ते करायचा आपला निश्‍चय कमकुवत करण्याचा प्रयत्न करतो. टेहळणी बुरूज२३.०७ १६-१७ ¶१२-१३

मंगळवार, ८ एप्रिल

माझी आठवण म्हणून हे करत राहा.—लूक २२:१९.

यहोवाच्या लोकांसाठी ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी हा वर्षातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. आणि येशूनेसुद्धा ही एकमेव गोष्ट करण्यासाठी आपल्या शिष्यांना आज्ञा दिली होती. (लूक २२:१९, २०) स्मारकविधीमुळे आपण कोणकोणत्या मार्गांनी येशूच्या बलिदानाबद्दल कदर दाखवू शकतो याचीही आपल्याला आठवण होते. (२ करिंथ. ५:१४, १५) तसंच, स्मारकविधीला उपस्थित राहिल्यामुळे आपल्याला ‘एकमेकांना प्रोत्साहनसुद्धा’ देता येतं. (रोम. १:१२) तिथे उपस्थित राहिल्यामुळे आस्था दाखवणाऱ्‍या बऱ्‍याच लोकांना तिथे जे पाहायला आणि ऐकायला मिळतं, त्यामुळे त्यांना जीवनाच्या मार्गावर चालायलासुद्धा मदत होते. स्मारकविधीमुळे जगभरातल्या सगळ्या भाऊबहिणींमध्ये असलेली एकता कशी दिसून येते याचाही विचार करा. म्हणूनच स्मारकविधीचं आपल्या सगळ्यांच्या मनात एक खास स्थान आहे! टेहळणी बुरूज२४.०१ ८ ¶१-३

स्मारकविधी बायबल वाचन: (निसान ९: दिवसा घडलेल्या घटना) लूक १९:२९-४४

बुधवार, ९ एप्रिल

देवाने जगावर इतकं प्रेम केलं, की त्याने आपला एकुलता एक मुलगा दिला. कारण त्याची अशी इच्छा आहे, की जो कोणी त्याच्या मुलावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.—योहा. ३:१६.

यहोवा आणि येशूने जी किंमत दिली, त्यावर आपण जितकं जास्त मनन करू तितकं त्यांचं आपल्या प्रत्येकावर किती प्रेम आहे ते आपल्याला समजेल. (गलती. २:२०) यहोवाने आपल्यावरच्या अपार प्रेमामुळे खंडणीची ही भेट आपल्याला दिली. यहोवाने त्याच्याकडे असलेल्या सगळ्यात मौल्यवान गोष्टीचं, म्हणजे येशूचं बलिदान देऊन आपल्यावर प्रेम असल्याचं दाखवून दिलं. त्याने आपल्या मुलाला वेदना सहन करून त्याचा मृत्यू होऊ दिला. यहोवा आपल्यावर किती प्रेम करतो हे तो फक्‍त आपल्या मनातच ठेवत नाही, तर ते बोलूनही दाखवतो. (यिर्म. ३१:३) यहोवा आपल्यावर प्रेम करतो म्हणूनच त्याने आपल्याला त्याच्याकडे आकर्षित केलंय आणि त्याच्याशी नातं जोडायची एक संधी दिली आहे. (अनुवाद ७:७, ८ सोबत तुलना करा.) कोणीही आणि कोणतीही गोष्ट आपल्याला यहोवाच्या प्रेमापासून वेगळं करू शकत नाही. (रोम. ८:३८, ३९) त्याने दाखवलेल्या या प्रेमाबद्दल तुम्हाला कसं वाटतं? टेहळणी बुरूज२४.०१ २८ ¶१०-११

स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १०: दिवसा घडलेल्या घटना) लूक १९:४५-४८; मत्तय २१:१८, १९; २१:१२, १३

गुरुवार, १० एप्रिल

आशेच्या आधारावर सृष्टीला स्वातंत्र्य मिळेल.—रोम. ८:२०, २१.

अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना मिळालेली स्वर्गातल्या जीवनाची आशा त्यांच्यासाठी खूप खास आहे. ब्रदर फ्रेडरीक फ्रान्झ हे त्यांच्यापैकीच एक होते. या आशेबद्दल त्यांना कसं वाटतंय हे सांगताना ते म्हणाले: “आमची आशा माझ्यासाठी एक कल्पना नाही, तर एक निश्‍चित गोष्ट आहे. आणि ही आशा १,४४,००० जणांपैकी असलेल्या लहान कळपातल्या प्रत्येक सदस्यासाठी अगदी पूर्णपणे खरी ठरेल. आणि आम्ही कल्पनाही केली नाही अशा प्रकारे ती पूर्ण होईल.” १९९१ मध्ये ब्रदर फ्रान्झ यांनी असं म्हटलं: “या आशेची किंमत [आमच्या] नजरेत जराही कमी झालेली नाही. . . . आम्हाला या आशेसाठी कितीही वाट पाहावी लागली, तरी आमच्या मनात या आशेबद्दल असलेली कदर आणखी वाढतच जाईल. या आशेची वाट पाहणं कधीच व्यर्थ ठरणार नाही. आम्हाला मिळालेल्या या आशेची किंमत आज माझ्या नजरेत पूर्वीपेक्षाही जास्त आहे.” आपल्याला स्वर्गातल्या जीवनाची आशा असो किंवा पृथ्वीवरच्या, या आशेमुळे आपल्याला आनंदी राहायचं आणखी एक कारण मिळतं. तसंच, आपली ही आशा आणखी मजबूत होऊ शकते. टेहळणी बुरूज२३.१२ ९ ¶६; १० ¶८

स्मारकविधी बायबल वाचन: (निसान ११: दिवसा घडलेल्या घटना) लूक २०:१-४७

शुक्रवार, ११ एप्रिल

बैलांच्या किंवा बकऱ्‍यांच्या रक्‍ताने पापं नाहीशी होणं शक्य नाही.—इब्री १०:४.

प्राचीन उपासना मंडपाच्या प्रवेशाजवळ तांब्याची एक वेदी होती. आणि या वेदीवर यहोवासाठी प्राण्यांची अर्पणं दिली जायची. (निर्ग. २७:१, २; ४०:२९) पण या अर्पणांमुळे लोकांना त्यांच्या पापांची पूर्णपणे आणि कायमची सुटका मिळणं शक्य नव्हतं. (इब्री १०:१-३) उपासना मंडपात सतत दिली जाणारी प्राण्यांची ही अर्पणं पुढे दिल्या जाणाऱ्‍या एकाच अर्पणाला सूचित करत होती. या अर्पणामुळे मानवजातीची पापांपासून कायमची सुटका होणार होती. येशूला माहीत होतं की यहोवाने त्याला पृथ्वीवर त्याचं मानवी जीवन संपूर्ण मानवजातीसाठी खंडणी बलिदान म्हणून अर्पण करायला पाठवलंय. (मत्त. २०:२८) म्हणून बाप्तिस्म्याच्या वेळी येशूने यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःला सादर केलं. (योहा. ६:३८; गलती. १:४) अशा प्रकारे येशूचं जीवन “एकदाच” सर्व लोकांच्या पापांसाठी प्रायश्‍चित्त म्हणून देण्यात आलं. म्हणजेच जे येशूवर विश्‍वास ठेवतात त्यांची पापं कायमची झाकून टाकली जावीत म्हणून ते देण्यात आलं.—इब्री १०:५-७, १०. टेहळणी बुरूज२३.१० २६-२७ ¶१०-११

स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १२: दिवसा घडलेल्या घटना) लूक २२:१-६; मार्क १४:१, २, १०, ११

स्मारकविधीची तारीख
सूर्यास्तानंतर
शनिवार, १२ एप्रिल

देवाचं दान, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्याद्वारे सर्वकाळाचं जीवन हे आहे.—रोम. ६:२३.

आपण स्वतःहून पाप आणि मृत्यूपासून कधीच सुटका मिळवू शकत नव्हतो. (स्तो. ४९:७, ८) म्हणून आपल्यासाठी यहोवाने आपल्या प्रिय मुलाचं बलिदान द्यायची तरतूद केली. पण त्यासाठी यहोवा आणि येशूला खूप मोठी किंमत मोजावी लागली. यहोवा आणि येशूने जे त्याग आपल्यासाठी केले, त्यांवर आपण जितकं जास्त मनन करू तितकी जास्त खंडणी बलिदानाबद्दल आपल्या मनात असलेली कदर वाढत जाईल. जेव्हा आदामने पाप केलं, तेव्हा त्याने स्वतःसाठी आणि त्याच्या सर्व मुलांसाठी कायमच्या जीवनाची आशा गमावली. आदामने जे गमावलं ते पुन्हा विकत घेण्यासाठी येशूने आपल्या परिपूर्ण जीवनाचं बलिदान दिलं. पृथ्वीवर असलेल्या त्याच्या संपूर्ण जीवनात येशूने “कोणतंही पाप केलं नाही आणि कपटीपणाच्या गोष्टी त्याच्या तोंडून कधीही निघाल्या नाहीत.” (१ पेत्र २:२२) त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याचं परिपूर्ण जीवन हे आदामने गमावलेल्या परिपूर्ण जीवनाच्या अगदी बरोबरीचं होतं.—१ करिंथ. १५:४५; १ तीम. २:६. टेहळणी बुरूज२४.०१ १० ¶५-६

स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १३: दिवसा घडलेल्या घटना) लूक २२:७-१३; मार्क १४:१२-१६ (निसान १४: सूर्यास्तानंतर घडलेल्या घटना) लूक २२:१४-६५

रविवार, १३ एप्रिल

बकऱ्‍यांचं किंवा वासरांचं रक्‍त नाही, तर स्वतःचं रक्‍त घेऊन ख्रिस्त एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने आपल्या सर्वांसाठी सर्वकाळाची सुटका मिळवली.—इब्री ९:१२.

येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर तो आध्यात्मिक मंदिराच्या परमपवित्र स्थानात गेला. खंडणी बलिदानावर आणि येशू ख्रिस्ताच्या याजकपदाच्या आधारावर शुद्ध उपासनेसाठी यहोवाने जी व्यवस्था केली आहे ती किती श्रेष्ठ आहे हे आपण स्पष्टपणे पाहू शकतो. इस्राएलमधले महायाजक माणसांनी बनवलेल्या परमपवित्र स्थानात प्राण्यांच्या अर्पणांचं रक्‍त घेऊन जायचे. पण येशू यहोवापुढे जाण्यासाठी सगळ्यात पवित्र ठिकाणी म्हणजे “प्रत्यक्ष स्वर्गात गेला.” त्याने “स्वतःचं बलिदान देऊन पाप नाहीसं” केलं. अशा रितीने त्याने आपल्यावतीने स्वतःच्या परिपूर्ण मानवी जीवनाचं मोल सादर केलं. (इब्री ९:२४-२६) आपली आशा स्वर्गातली असो किंवा पृथ्वीवरची, आपण सर्व जण यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरात त्याची उपासना करू शकतो. टेहळणी बुरूज२३.१० २८ ¶१३-१४

स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १४: दिवसा घडलेल्या घटना) लूक २२:६६-७१

सोमवार, १४ एप्रिल

म्हणूनच, आपण अपार कृपेच्या राजासनापुढे धैर्याने जाऊ या.—इब्री ४:१६.

सध्या स्वर्गातून राज्य करत असलेला राजा आणि सहानुभूती असलेला महायाजक या नात्याने येशूची जी भूमिका आहे त्याचा विचार करा. त्याच्याद्वारे आपण प्रार्थना करून देवाच्या “अपार कृपेच्या राजासनापुढे” जाऊ शकतो आणि योग्य वेळी त्याच्याकडे दयेसाठी आणि मदतीसाठी विनंती करू शकतो. (इब्री ४:१४, १५) यहोवा आणि येशूने आपल्यासाठी जे केलंय आणि सध्या जे करत आहेत, त्यावर आपण दररोज विचार केला पाहिजे. त्यांच्या प्रेमाचा आपल्यावर खोलवर प्रभाव झाला पाहिजे. आणि आवेशाने यहोवाची सेवा आणि उपासना करण्यासाठी आपण प्रवृत्त झालं पाहिजे. (२ करिंथ. ५:१४, १५) आपल्या मनात कदर आहे, हे दाखवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे लोकांना यहोवाचे साक्षीदार आणि येशूचे शिष्य बनण्यासाठी मदत करणं. (मत्त. २८:१९, २०) प्रेषित पौलनेही हेच केलं. त्याला माहीत होतं, की “सर्व प्रकारच्या लोकांचं तारण व्हावं आणि त्यांना सत्याचं अचूक ज्ञान मिळावं” हीच यहोवाची इच्छा आहे.—१ तीम. २:३, ४. टेहळणी बुरूज२३.१० २२-२३ ¶१३-१४

स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १५: दिवसा घडलेल्या घटना) मत्तय २७:६२-६६

मंगळवार, १५ एप्रिल

यापुढे कोणीही मरणार नाही, कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही.—प्रकटी. २१:४.

आपल्यापैकी बरेच जण प्रचारकार्यात नंदनवनाबद्दल सांगताना या सांत्वनदायक वचनाचा वापर करतात. आपण प्रकटीकरण २१:३, ४ मधल्या गोष्टी खरंच पूर्ण होतील, याबद्दल इतरांना आणि स्वतःला खातरी व्हावी म्हणून काय करू शकतो? यहोवाने आपल्याला हे सांत्वनदायक अभिवचनच दिलं नाही, तर या अभिवचनावर विश्‍वास ठेवण्यासाठी खातरीलायक कारणंसुद्धा दिली आहेत. यहोवाने नंदनवनाबद्दल आपल्याला जे अभिवचन दिलंय, त्यावर भरवसा ठेवण्याची कारणं आपल्याला पुढच्या वचनात मिळतात. तिथे आपण असं वाचतो: “राजासनावर बसलेला देव म्हणाला: ‘पाहा! मी सर्वकाही नवीन करत आहे.’ पुढे तो असंही म्हणाला: ‘लिही, कारण ही वचनं विश्‍वसनीय आणि खरी आहेत.’ मग तो मला म्हणाला: ‘ती वचनं पूर्ण झाली आहेत! मी अल्फा आणि ओमेगा, म्हणजे सुरुवात आणि शेवट आहे.’”—प्रकटी. २१:५, ६क. टेहळणी बुरूज२३.११ ३ ¶३-५

स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १६: दिवसा घडलेल्या घटना) लूक २४:१-१२

बुधवार, १६ एप्रिल

तरुण पुरुषांना समंजस असण्याचं प्रोत्साहन देत राहा.—तीत २:६.

एक तरुण भाऊ कपड्यांच्या आणि दिसण्याच्या बाबतीत ज्या प्रकारचे निर्णय घेतो त्यावरून त्याने विचारशक्‍ती विकसित केली आहे की नाही हे दिसून येतं. बऱ्‍याच वेळा लोकप्रिय असलेल्या स्टाईल आणि फॅशनचे कपडे असे लोक बनवतात, ज्यांना यहोवाच्या स्तरांबद्दल अजिबात आदर नसतो आणि ते अनैतिक जीवन जगत असतात. आणि त्यांच्या कपड्यांच्या स्टाईलवरून आणि ते ज्या प्रकारचे कपडे बनवतात त्यांवरूनसुद्धा त्यांची अनैतिक विचारसरणी दिसून येते. ते टाईट फिटिंगचे आणि ज्या कपड्यांमध्ये एक पुरुष स्त्रियांसारखा दिसतो अशा प्रकारचे कपडे तयार करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे आध्यात्मिक रितीने प्रौढ बनण्याचा प्रयत्न करत असलेला भाऊ कपड्यांच्या बाबतीत निवड करताना बायबल तत्त्वांच्या आधारावर निवड करेल आणि मंडळीत ज्यांनी चांगलं उदाहरण मांडलंय त्यांचा पेहराव कसा आहे याचाही तो विचार करेल. तो स्वतःला विचारू शकतो: ‘माझ्या कपड्यांवरून मी समंजस आहे आणि इतरांचा विचार करतोय हे दिसून येतं का? मी खरंच देवाची उपासना करतोय हे दिसून येतं का?’ (१ करिंथ. १०:३१-३३) ज्या तरुण भावाने विचारशक्‍ती विकसित केली आहे, त्याचा मंडळीतले भाऊबहीणसुद्धा आदर करतील आणि त्यासोबतच स्वर्गातला आपला पितासुद्धा त्याच्यावर खूश असेल. टेहळणी बुरूज२३.१२ २६ ¶७

गुरुवार, १७ एप्रिल

माझं राज्य या जगाचं नाही. जर माझं राज्य या जगाचं असतं, तर माझे सेवक लढले असते.—योहा. १८:३६.

‘दक्षिणेच्या राजाने’ पूर्वी देवाच्या लोकांवर थेट हल्ले केले. (दानी. ११:४०) उदाहरणार्थ, २० व्या शतकाच्या सुरुवातीला काही भावांना त्यांच्या निष्पक्षतेसाठी तुरुंगात टाकण्यात आलं. तर, काही साक्षीदार मुलांनासुद्धा याच कारणासाठी शाळांमधून काढून टाकण्यात आलं. पण गेल्या काही वर्षांमध्ये या राजाच्या अधिकाराखाली राहणाऱ्‍या यहोवाच्या सेवकांना काही वेगळ्या दबावांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे देवाच्या राज्याला एकनिष्ठ राहण्याच्या त्यांच्या निश्‍चयाची परीक्षा झाली आहे. उदाहरणार्थ, जेव्हा निवडणुका होतात, तेव्हा एका ख्रिस्ती व्यक्‍तीला एखाद्या राजनैतिक पार्टीला पाठिंबा द्यायचा मोह होऊ शकतो. एक ख्रिस्ती व्यक्‍ती कदाचित मतदान द्यायला जाणार नाही, पण मनामध्येच ती एखाद्याची बाजू घेईल. म्हणून आपण आपल्या कामांमध्येच नाही, तर विचारांमध्येही राजकीय दृष्टीने निष्पक्ष राहणं खूप महत्त्वाचं आहे.—योहा. १५:१८, १९. टेहळणी बुरूज२३.०८ १२ ¶१७

शुक्रवार, १८ एप्रिल

यहोवाची स्तुती करा; तो दररोज आमचं ओझं वाहतो.—स्तो. ६८:१९.

जीवनाच्या शर्यतीत धावत असताना आपण ‘अशा प्रकारे धावलं पाहिजे की आपल्याला बक्षीस मिळेल.’ (१ करिंथ. ९:२४) येशूने म्हटलं, की “अतिप्रमाणात खाणंपिणं आणि जीवनाच्या चिंता यांमुळे तुमचं मन भारावून जाईल.” (लूक २१:३४) हे आणि यासारखी इतर वचनं तुम्हाला जीवनाच्या शर्यतीत धावत असताना कुठे बदल करायची गरज आहे, हे ओळखायला मदत करतील. आपल्याला जीवनाची शर्यत नक्की जिंकता येईल अशी खातरी आपण बाळगू शकतो. कारण ती पूर्ण करायला यहोवा आपल्याला बळ देतो. (यश. ४०:२९-३१) त्यामुळे तुमचा वेग कमी होऊ देऊ नका! प्रेषित पौलचं अनुकरण करा. कारण त्याने बक्षीस मिळवायचा कसोशीने प्रयत्न केला. (फिलिप्पै. ३:१३, १४) ही शर्यत तुमच्यासाठी दुसरं कोणी धावू शकत नाही तर ती तुम्हालाच धावायची आहे. पण यहोवा तुम्हाला ती पूर्ण करायला मदत करेल. जी ओझी गरजेची आहेत ती वाहायला आणि जी गरजेची नाहीत ती काढून टाकायला तो तुम्हाला मदत करू शकतो. यहोवा तुमच्या बाजूने उभा असल्यामुळे तुम्ही ही शर्यत धीराने धावू शकाल आणि जिंकूही शकाल! टेहळणी बुरूज२३.०८ ३१ ¶१६-१७

शनिवार, १९ एप्रिल

आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करा.—निर्ग. २०:१२.

येशू १२ वर्षांचा असताना काय झालं त्याकडे लक्ष द्या. त्याचे आईवडील यरुशलेममध्ये त्याला विसरून निघून गेले. (लूक २:४६-५२) सणानंतर आपल्या सगळ्या मुलांना सोबत नेण्याची जबाबदारी खरंतर योसेफ आणि मरीयाची होती. पण जेव्हा योसेफ आणि मरीयाला येशू भेटतो तेव्हा मरीया उलट येशूलाच दोष देते. त्या वेळी येशू कदाचित म्हणू शकला असता की ‘तुमचंच चुकलं.’ पण तो असं नाही म्हणाला. उलट, त्याने त्याच्या आईवडिलांना आदराने उत्तर दिलं. त्या वेळी ‘येशू काय म्हणत होता हे त्यांना समजलं नाही.’ तरीपण तो “त्यांच्या आज्ञेत राहिला.” तरुणांनो, तुमच्या आईवडिलांकडून कदाचित चुका होत असतील. किंवा तुमच्या बाबतीत त्यांचे गैरसमज होत असतील. तर अशा वेळी तुम्हाला त्यांच्या आज्ञेत राहायला कठीण जातं का? कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला मदत होऊ शकते? यहोवाला या बाबतीत कसं वाटतं याचा विचार करा. बायबल म्हणतं, जेव्हा तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या आज्ञेत राहता, तेव्हा “प्रभूला आनंद होतो.” (कलस्सै. ३:२०) जेव्हा तुमचे आईवडील तुम्हाला समजून घेत नाहीत, किंवा ते तुमच्यासाठी खूप कठीण असे नियम बनवतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं हे यहोवाला माहीत आहे. पण असं असूनसुद्धा जेव्हा तुम्ही त्यांच्या आज्ञेत राहता, तेव्हा यहोवा खूश होतो. टेहळणी बुरूज२३.१० ७ ¶५-६

रविवार, २० एप्रिल

समजूतदार असा आणि सर्वांशी सौम्यतेने वागा.—तीत ३:२.

एखादा शाळासोबती असा दबाव टाकेल, की यहोवाच्या साक्षीदारांनी समलिंगी लोकांबद्दलचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आपल्याला त्याला या गोष्टीची खातरी करून द्यावी लागेल, की प्रत्येक व्यक्‍तीला स्वतःचे निर्णय घ्यायचा अधिकार आहे हे आपण मान्य करतो. (१ पेत्र २:१७) आणि मग आपण बायबलच्या स्तरांप्रमाणे जीवन जगल्यामुळे कसा फायदा होतो हे कदाचित त्यांना सांगू शकतो. एखादा आपल्या विश्‍वासाशी बिलकूल सहमत नसेल, तेव्हा आपण असा लगेच विचार करू नये, की ‘तो काय मानतो हे मला चांगलं माहिती आहे.’ उदाहरणार्थ, शाळेतला एखादा वर्गमित्र तुम्हाला असं म्हणाला, की ‘देवाला मानणं हे मूर्खपणाचं आहे’ तर काय? अशा वेळी तुम्ही असं मानावं का, की त्याला उत्क्रांतीवर विश्‍वास आहे आणि त्याबद्दल त्याला सगळं काही माहीत आहे? कदाचित असं होऊ शकतं की त्याला याबद्दल काहीच माहीत नसेल आणि फक्‍त ऐकलेल्या गोष्टीच तो बोलत असेल. उदाहरणार्थ, jw.org वर निर्मितीबद्दल किंवा सृष्टीबद्दल असलेला एखादा लेख किंवा व्हिडिओ तुम्ही त्याला दाखवू शकता. तो कदाचित ते पाहील आणि मग तुमच्यासोबत चर्चा करायला तयार होईल. अशा प्रकारे आपण इतरांसोबत जेव्हा आदराने बोलतो तेव्हा बायबलबद्दल जास्त जाणून घ्यायला ते तयार होतात. टेहळणी बुरूज२३.०९ १७ ¶१२-१३

सोमवार, २१ एप्रिल

हे यहोवा, तू चांगला आणि क्षमाशील आहेस; तुला हाक मारणाऱ्‍या सर्वांवर तुझं अपार प्रेम आहे.—स्तो. ८६:५.

आपल्या हातून जरी चुका झाल्या तरी आपण त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि यहोवावर विसंबून राहू शकतो. असं केल्यामुळे आपण ही खातरी बाळगू शकतो की यहोवा त्याच्या सेवेत आपला उपयोग करेल आणि आपल्याला आशीर्वाद देईल. (नीति. २८:१३) शमशोन परिपूर्ण नव्हता. दलीलाच्या बाबतीत त्याच्या हातून एक चूक झाली, तरी यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने हार मानली नाही. आणि यहोवानेही त्याला सोडलं नाही. आणि एक जबरदस्त गोष्टी करण्यासाठी पुन्हा एकदा त्याचा वापर केला. त्याच्या हातून चूक झाली तरी यहोवाने विश्‍वासाचं एक भक्कम उदाहरण म्हणून त्याच्याकडे पाहिलं. आणि इब्री लोकांना ११ व्या अध्यायात सांगितलेल्या विश्‍वासू स्त्री-पुरुषांमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख केला. अशा प्रेमळ पित्याची सेवा करणं ही गोष्ट खरंच किती प्रोत्साहनदायक आहे! खासकरून आपण कमजोर असताना तो आपल्याला मदत करायला आणि बळ द्यायला तयार असतो. त्यामुळे शमशोनसारखं आपण यहोवाला विनंती करू या: ‘यहोवा, माझी आठवण कर, मला शक्‍ती दे.’—शास्ते १६:२८. टेहळणी बुरूज२३.०९ ७ ¶१८-१९

मंगळवार, २२ एप्रिल

तुम्ही तो दिवस नेहमी डोळ्यांपुढे ठेवला पाहिजे.—२ पेत्र ३:१२.

यहोवाचा दिवस नेहमी डोळ्यांपुढे ठेवल्यामुळे आपल्याला इतरांना आनंदाचा संदेश सांगायची प्रेरणा मिळते. पण कधीकधी आपल्याला इतरांशी याबद्दल बोलायला हिंमत होणार नाही. माणसांच्या भीतीमुळे कदाचित असं होऊ शकतं. पेत्रच्या बाबतीतही असं झालं होतं. येशूला पकडण्यात आलं त्या रात्री पेत्रने येशूचा शिष्य असल्याचं नाकारलं. इतकंच नाही, तर त्याला ओळखत असल्याचंही नाकारलं! (मत्त. २६:६९-७५) पण पेत्रने आपल्या भीतीवर मात केली आणि नंतर तो ठामपणे असं म्हणू शकला: “लोकांना ज्या गोष्टींची भीती वाटते त्यांची भीती तुम्ही बाळगू नका आणि अस्वस्थ होऊ नका.” (१ पेत्र ३:१४) पेत्रच्या या शब्दांवरून आपल्याला या गोष्टीची खातरी मिळते, की आपणसुद्धा माणसांच्या भीतीवर मात करू शकतो. तर मग माणसांच्या भीतीवर मात करण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते? पेत्रने म्हटलं: “ख्रिस्ताला आपल्या मनात प्रभू म्हणून पवित्र माना.” (१ पेत्र ३:१५) यासाठी आपण स्वतःला याची आठवण करून दिली पाहिजे, की ख्रिस्त येशू आपला राजा आहे आणि तो अतिशय सामर्थ्यशाली आहे. टेहळणी बुरूज२३.०९ २७-२८ ¶६-८

बुधवार, २३ एप्रिल

तुमच्यामध्ये अनैतिक लैंगिक कृत्यं, कोणत्याही प्रकारचा अशुद्धपणा आणि लोभ यांचा उल्लेखही होऊ नये.—इफिस. ५:३.

आपण “अंधाराच्या निरुपयोगी कामांत” गुंतू नये म्हणून सतत त्यांविरुद्ध लढा दिला पाहिजे. (इफिस. ५:११) अनुभवावरून असं दिसून आलंय की जी व्यक्‍ती जितक्या जास्त वेळा घाणेरड्या किंवा अनैतिक गोष्टी पाहत राहते, ऐकत राहते किंवा त्यांबद्दल बोलत राहते, तितक्याच सहजपणे तिच्याकडून वाईट गोष्टी घडण्याची शक्यता असते. (उत्प. ३:६; याको. १:१४, १५) यहोवा ज्याला अनैतिक आणि अशुद्ध म्हणतो त्या गोष्टी खरंतर तशा नाहीच असा विचार करायला सैतानाचं जग आपल्याला भाग पाडतं. आणि असं करून ते आपल्याला फसवतं. (२ पेत्र २:१९) कारण लोकांना गोंधळात पाडणं ही सैतानाची खूप जुनी युक्‍ती आहे. यामुळे योग्य-अयोग्यमधला फरक त्यांना ओळखता येत नाही. (यश. ५:२०; २ करिंथ. ४:४) म्हणूनच बऱ्‍याच चित्रपटांमध्ये, टिव्ही कार्यक्रमांमध्ये आणि वेबसाईटवर असे विचार मांडले जातात, जे यहोवाच्या स्तरांच्या अगदी विरोधात असतात. अशुद्ध गोष्टी करणं आणि अनैतिक जीवन जगणं यात काही धोका नाही, असा विचार करायला लावून सैतान आपल्याला फसवायचा प्रयत्न करतो.—इफिस. ५:६. टेहळणी बुरूज२४.०३ २२ ¶८-१०

गुरुवार, २४ एप्रिल

ते करत असलेली पवित्र सेवा ही स्वर्गीय गोष्टींचं प्रतीक आणि छाया आहे.—इब्री ८:५.

उपासना मंडप तंबूसारखा दिसायचा. सुरुवातीला इस्राएली लोक जिथे-जिथे जायचे तिथे-तिथे त्यांना हा उपासना मंडप घेऊन जावा लागायचा. यरुशलेममध्ये मंदिर बांधायच्या आधी जवळपास ५०० वर्षांपर्यंत त्यांनी या उपासना मंडपाचा वापर केला. (निर्ग. २५:८, ९; गण. ९:२२) इस्राएली लोक हा मंडप देवाची उपासना करण्यासाठी आणि बलिदानं देण्यासाठी वापरायचे. (निर्ग. २९:४३-४६) पण हा उपासना मंडप आणखीन मोठ्या गोष्टीला सूचित करत होता जी ख्रिश्‍चनांसाठी महत्त्वाची असणार होती. त्याला ‘स्वर्गीय गोष्टींची छाया’ असं म्हणण्यात आलंय. आणि हे यहोवाच्या महान आध्यात्मिक मंदिराला सूचित करतं. प्रेषित पौलने म्हटलं की “हा मंडप [किंवा, उपासना मंडप] सध्याच्या काळासाठी एक उदाहरण आहे.” (इब्री ९:९) त्यामुळे जेव्हा पौलने इब्री लोकांना हे पत्र लिहिलं तोपर्यंत हे आध्यात्मिक मंदिर ख्रिश्‍चनांसाठी वास्तविक बनलं होतं. इ.स. २९ मध्ये हे अस्तित्वात आलं. त्या वर्षी येशूचा बाप्तिस्मा झाला आणि तेव्हापासून तो आध्यात्मिक मंदिरात यहोवाचा “श्रेष्ठ महायाजक” म्हणून सेवा करू लागला.—इब्री ४:१४; प्रे. कार्यं १०:३७, ३८. टेहळणी बुरूज२३.१० २५-२६ ¶६-७

शुक्रवार, २५ एप्रिल

तुमचा समजूतदारपणा सर्वांना कळून येऊ द्या.—फिलिप्पै. ४:५.

ख्रिश्‍चनांमध्ये लवचिकता हा गुण असला पाहिजे, म्हणजे त्यांनी नेहमी बदल करायला तयार असलं पाहिजे. ते कसं? जेव्हा आपली परिस्थिती बदलते तेव्हा तिच्याशी जुळवून घेण्यासाठी आपण समजूतदार असलं पाहिजे. तसंच दुसऱ्‍यांच्या मतांचा आणि निर्णयांचा आदर करूनसुद्धा आपण समजूतदारपणा दाखवू शकतो. आपण यहोवाचे सेवक असल्यामुळे आपण समजूतदार असलं पाहिजे. त्यासोबतच आपल्यात नम्रता असली पाहिजे आणि इतरांबद्दल आपल्या मनात सहानुभूती असली पाहिजे. यहोवा आपला “खडक” आहे, कारण तो खंबीर आणि स्थिर आहे. (अनु. ३२:४) पण त्यासोबतच तो समजूतदारसुद्धा आहे. काळाच्या ओघात जशा घटना घडत गेल्या, तसे यहोवाने आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी परिस्थितीप्रमाणे बदलसुद्धा केले. यहोवाने मानवांना त्याच्या प्रतिरूपात बनवलंय त्यामुळे त्यांच्यातसुद्धा बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आहे. बायबलमध्ये यहोवा देवाने आपल्याला स्पष्ट तत्त्वं दिली आहेत. त्यामुळे जेव्हा जीवनात काही समस्या येतात किंवा कठीण परीक्षा येतात तेव्हा चांगले निर्णय घेण्यासाठी आपल्याला मदत होते. यहोवाच्या स्वतःच्या उदाहरणावरून आणि त्याने दिलेल्या तत्त्वांवरून आपल्याला स्पष्टपणे दिसतं, की तो ‘खडकासारखा’ खंबीर जरी असला तरी तो समजूतदारसुद्धा आहे. टेहळणी बुरूज२३.०७ २० ¶१-३

शनिवार, २६ एप्रिल

चिंतांनी मला सर्व बाजूंनी घेरलं, तेव्हा तू मला दिलासा आणि सांत्वन दिलंस.—स्तो. ९४:१९.

बायबलमध्ये यहोवाची तुलना आपल्या बाळाला माया दाखवणाऱ्‍या आईशी केली आहे. (यश. ६६:१२, १३) एक आई तिच्या बाळाची किती प्रेमळपणे काळजी घेते याची कल्पना करा. त्याला काय हवं, काय नको ते ती पाहते. तसंच आपण जेव्हा दुःखात असतो तेव्हा आपण ही खातरी ठेवू शकतो की यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे. आपण एखादी चूक केलेली असली तरी तो आपल्याला सोडून देत नाही. (स्तो. १०३:८) इस्राएल राष्ट्राने कितीतरी वेळा यहोवाला नाराज केलं. पण तरी, पश्‍चात्ताप करणाऱ्‍या लोकांवर तो प्रेम करत राहिला. तो म्हणाला: “तू माझ्या नजरेत मौल्यवान आहेस, मला तुझा आदर आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे.” (यश. ४३:४, ५) यहोवाचं हे प्रेम आजही बदललेलं नाही. आपण गंभीर चुका केल्या असल्या तरी यहोवा आपल्याला सोडून देत नाही. जेव्हा आपण पश्‍चात्ताप करतो आणि त्याच्याकडे परत येतो तेव्हा आपल्याला कळतं की त्याचं अजूनही आपल्यावर प्रेम आहे. तो वचन देतो की तो आपल्याला “मोठ्या मनाने क्षमा करेल.” (यश. ५५:७) बायबल याबद्दल म्हणतं, की “खुद्द यहोवाकडून तुम्हाला तजेला मिळेल.”—प्रे. कार्यं ३:१९. टेहळणी बुरूज२४.०१ २७ ¶४-५

रविवार, २७ एप्रिल

यहोवा माझ्यासोबत होता.—एज्रा ७:२८.

जेव्हा आपण एखाद्या समस्येचा सामना करत असतो तेव्हा यहोवा आपल्याला मदत करू शकतो. उदाहरणार्थ, अधिवेशनाला जाता यावं म्हणून तुम्ही तुमच्या बॉसकडे सुट्टी मागता. किंवा मंडळीतल्या सगळ्या सभांना उपस्थित राहता यावं म्हणून कामाच्या वेळेत काही फेरबदल करावेत म्हणून तुम्ही त्यांना विनंती करता. अशा वेळी यहोवा आपल्यासोबत आहे, हे अनुभवण्याची एक संधीच तुम्हाला मिळत असते. तुमच्यासाठी गोष्टी कशा बदलत आहेत, हे पाहून तुम्हाला कदाचित आश्‍चर्य वाटेल. आणि त्यामुळे यहोवावरचा तुमचा भरवसा आणखी मजबूत होईल. प्रत्येक वेळी जेव्हा एज्राला जबाबदारीच्या ओझ्याखाली दबल्यासारखं वाटलं, तेव्हा त्याने नम्रपणे यहोवाला प्रार्थना केली. (एज्रा ८:२१-२३; ९:३-५) या गोष्टीमुळेच इतरांनीही त्याला साथ दिली आणि त्याच्या विश्‍वासाचं अनुकरण केलं. (एज्रा १०:१-४) आपल्यालाही आपल्या कुटुंबाच्या गरजांची किंवा त्यांच्या सुरक्षिततेची चिंता वाटते, तेव्हा आपणसुद्धा पूर्ण भरवशाने यहोवाकडे प्रार्थना केली पाहिजे. टेहळणी बुरूज२३.११ १८ ¶१५-१७

सोमवार, २८ एप्रिल

अब्राहामने यहोवावर विश्‍वास ठेवला आणि त्यामुळे त्याने त्याला नीतिमान ठरवलं.—उत्प. १५:६.

देवाच्या नजरेत नीतिमान ठरण्यासाठी अब्राहामने जे केलं, अगदी तेच आपणही केलं पाहिजे असं यहोवा म्हणत नाही. उलट आपला विश्‍वास कार्यांमधून दाखवण्याचे बरेच मार्ग आहेत. जसं की, आपण मंडळीत येणाऱ्‍या नवीन लोकांचं स्वागत करू शकतो, गरजू भाऊबहिणींना मदत करू शकतो आणि आपल्या घरच्या लोकांशी चांगलं वागू शकतो. या सगळ्या गोष्टी केल्यामुळे यहोवा आपल्यावर खूश होईल आणि आपल्याला आशीर्वाद देईल. (रोम. १५:७; १ तीम. ५:४, ८; १ योहा. ३:१८) आणि खासकरून सगळ्यांना आवेशाने आनंदाचा संदेश सांगूनही आपण आपला विश्‍वास कार्यांमधून दाखवू शकतो. (१ तीम. ४:१६) आपण सगळेच जण आपल्या कार्यांमधून देवाची अभिवचनं नक्की खरी होतील आणि त्याचेच मार्ग सगळ्यात योग्य आहेत, असा विश्‍वास दाखवू शकतो. आपण जर असं केलं, तर यहोवा आपल्यालाही नीतिमान ठरवेल आणि आपल्यासोबत मैत्रीचं नातं जोडेल अशी खातरी आपण ठेवू शकतो. टेहळणी बुरूज२३.१२ २ ¶३; ६ ¶१५

मंगळवार, २९ एप्रिल

बांधवांनो, समजण्याच्या बाबतीत प्रौढांसारखं व्हा.—१ करिंथ. १४:२०.

प्रेषित पौलने करिंथकरांना आजच्या वचनात सांगितल्याप्रमाणे प्रोत्साहन दिलं. ज्यांना येशूचं अनुकरण करायचं आहे, त्यांनी या सल्ल्याचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि यात यशस्वी व्हायचं असेल, तर त्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूत देवाच्या नियमांचं पालन करायला आणि बायबल तत्त्वं लागू करायला शिकलं पाहिजे. (लूक २:५२) पण तरुण भावांनी एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍ती बनणं इतकं महत्त्वाचं का आहे? भावांना कुटुंबामध्ये आणि मंडळीमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍या पार पाडायच्या असतात. त्यामुळे तरुण भावांनो, पुढे पार पाडाव्या लागणाऱ्‍या जबाबदाऱ्‍यांच्या बाबतीत तुम्ही नक्कीच विचार केला असेल. तुम्ही कदाचित पूर्णवेळच्या सेवेत जायचं, एक सहायक सेवक बनायचं आणि नंतर मंडळीत वडील म्हणून सेवा करायचं ध्येय ठेवलं असेल. तसंच, लग्न करून आपलं कुटुंब वाढवायची तुमची इच्छा असेल. (इफिस. ६:४; १ तीम. ३:१) ही ध्येयं पूर्ण करायची असतील आणि त्यात यशस्वी व्हायचं असेल, तर तुम्हाला आध्यात्मिक रित्या प्रौढ असणं गरजेचं आहे. टेहळणी बुरूज२३.१२ २४ ¶१-२

बुधवार, ३० एप्रिल

जर मी गिदोन संदेष्ट्याबद्दल सांगू लागलो तर वेळ पुरणार नाही.—इब्री ११:३२.

ख्रिस्ती वडिलांवर यहोवाच्या मौल्यवान मेंढरांची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या विश्‍वासू बांधवांना भाऊबहिणींची सेवा करण्याचा जो बहुमान मिळाला आहे, त्याची त्यांना खूप कदर आहे. आणि देवाच्या कळपाचा ‘मनापासून सांभाळ’ करण्यासाठी ते खूप मेहनत घेतात. (यिर्म. २३:४; १ पेत्र ५:२) खरंच, आपल्या मंडळीत असे वडील आहेत, याबद्दल आपण किती आभार मानले पाहिजेत! या बाबतीत गिदोनच्या उदाहरणातून वडिलांना बरंच काही शिकता येईल. (इब्री ६:१२) मेंढपाळ या नात्याने देवाच्या लोकांचा सांभाळ करण्याची आणि त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. (शास्ते २:१६; १ इति. १७:६) त्याच प्रकारे आजच्या कठीण काळात आपल्या लोकांचा सांभाळ करण्यासाठी देवाने वडिलांना नियुक्‍त केलं आहे. (प्रे. कार्यं २०:२८; २ तीम. ३:१) आपल्या मर्यादा ओळखून काम करण्याच्या बाबतीत, नम्रता दाखवण्याच्या बाबतीत आणि आज्ञा पाळण्याच्या बाबतीत आपण गिदोनकडून बरंच काही शिकू शकतो. आपली जबाबदारी पार पाडत असताना त्याच्या सहनशक्‍तीची परीक्षा झाली. आपण मंडळीत वडील असलो किंवा नसलो तरी आपण मंडळीतल्या वडिलांबद्दल मनात कदर बाळगली पाहिजे. तसंच, मंडळीत मेहनत घेणाऱ्‍या या वडिलांना त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी मदत केली पाहिजे.—इब्री १३:१७. टेहळणी बुरूज२३.०६ २ ¶१; ३ ¶३

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा