वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es25 पृ. ३१-४४
  • मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मार्च
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२५
  • उपशिर्षक
  • शनिवार, १ मार्च
  • रविवार, २ मार्च
  • सोमवार, ३ मार्च
  • मंगळवार, ४ मार्च
  • बुधवार, ५ मार्च
  • गुरुवार, ६ मार्च
  • शुक्रवार, ७ मार्च
  • शनिवार, ८ मार्च
  • रविवार, ९ मार्च
  • सोमवार, १० मार्च
  • मंगळवार, ११ मार्च
  • बुधवार, १२ मार्च
  • गुरुवार, १३ मार्च
  • शुक्रवार, १४ मार्च
  • शनिवार, १५ मार्च
  • रविवार, १६ मार्च
  • सोमवार, १७ मार्च
  • मंगळवार, १८ मार्च
  • बुधवार, १९ मार्च
  • गुरुवार, २० मार्च
  • शुक्रवार, २१ मार्च
  • शनिवार, २२ मार्च
  • रविवार, २३ मार्च
  • सोमवार, २४ मार्च
  • मंगळवार, २५ मार्च
  • बुधवार, २६ मार्च
  • गुरुवार, २७ मार्च
  • शुक्रवार, २८ मार्च
  • शनिवार, २९ मार्च
  • रविवार, ३० मार्च
  • सोमवार, ३१ मार्च
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२५
es25 पृ. ३१-४४

मार्च

शनिवार, १ मार्च

या आशेमुळे पुढे आपली निराशा होणार नाही.—रोम. ५:५.

नवीन जग अजूनही आलेलं नाही. पण आपल्या सभोवती असलेल्या काही गोष्टींचा विचार करा. जसं की, झाडं, प्राणी, माणसं आणि तारे. या सगळ्या गोष्टी एकेकाळी अस्तित्वात नव्हत्या, तरी त्या आहेत यावर कोणी शंका घेणार नाही. या सगळ्या गोष्टी अस्तित्वात आहेत कारण यहोवाने त्यांना बनवलंय. (उत्प. १:१, २६, २७) आपल्याला देवाने नवीन जग आणायचंसुद्धा वचन दिलंय. आणि तो तेही नक्कीच पूर्ण करेल. नवीन जगात लोक परिपूर्ण आरोग्य असलेल्या कायमच्या जीवनाचा आनंद घेतील. आणि देवाने ठरवलेल्या वेळी ते नवीन जग आपल्या आजूबाजूच्या गोष्टींइतकंच खरं असेल. (यश. ६५:१७; प्रकटी. २१:३, ४) नवीन जग येईपर्यंत प्रत्येक संधीचा फायदा घेऊन आपला विश्‍वास मजबूत करा. खंडणी बलिदानाबद्दल आपली कदर आणखी वाढवा. यहोवा किती शक्‍तिशाली आहे यावर सखोल विचार करा. आणि आध्यात्मिक गोष्टी करण्यात व्यस्त राहा. असं केल्यामुळे “विश्‍वासाद्वारे आणि धीर धरण्याद्वारे जे अभिवचनांचे वारस होतात,” त्यांच्यापैकी तुम्हीसुद्धा एक असाल!—इब्री ६:११, १२. टेहळणी बुरूज२३.०४ ३१ ¶१८-१९

रविवार, २ मार्च

मी तुला सांगितलं नव्हतं का, की तू विश्‍वास ठेवशील तर देवाचं गौरवी सामर्थ्य पाहशील?—योहा. ११:४०.

येशू वर स्वर्गाकडे पाहून सगळ्यांसमोर प्रार्थना करतो. कारण लवकरच जे घडणार आहे त्याचं सगळं श्रेय त्याला यहोवाला द्यायचं आहे. त्यानंतर येशू मोठ्याने ओरडून म्हणतो: “लाजर, बाहेर ये!” (योहा. ११:४३) तेव्हा लाजर गुहेतून चालत बाहेर येतो. काहींना वाटत होतं, की ही गोष्ट होणं अशक्य आहे. पण येशूने नेमकं तेच शक्य करून दाखवलं होतं. या अहवालामुळे पुनरुत्थानाच्या आशेवरचा आपला विश्‍वास आणखी पक्का होतो. तो कसा? येशूने मार्थाला काय म्हटलं होतं ते आठवा. त्याने म्हटलं: “तुझा भाऊ उठेल.” (योहा. ११:२३) आपल्या पित्याप्रमाणेच हे अभिवचन पूर्ण करायची येशूला इच्छा आहे आणि तसं करायची ताकदही त्याच्याकडे आहे. त्याच्या अश्रूंवरून दिसून आलं, की मरण आणि त्यामुळे होणारं दुःख कायमचं नाहीसं करायची त्याची मनापासून इच्छा आहे. आणि लाजर जेव्हा गुहेतून चालत बाहेर आला तेव्हा येशूने सिद्ध केलं, की मृत लोकांना जिवंत करण्याची ताकदही त्याच्याकडे आहे. शिवाय आजच्या वचनात सांगितल्याप्रमाणे मार्थाला त्याने कोणत्या गोष्टीची आठवण करून दिली त्याचाही विचार करा. खरंच, देवाने दिलेलं पुनरुत्थानाचं अभिवचन तो नक्की पूर्ण करेल असा भरवसा ठेवायची कितीतरी कारणं आपल्याकडे आहेत. टेहळणी बुरूज२३.०४ ११-१२ ¶१५-१६

सोमवार, ३ मार्च

यहोवा त्याला हाक मारणाऱ्‍या सर्वांच्या जवळ आहे; प्रामाणिकपणे त्याला हाक मारणाऱ्‍या सर्वांच्या तो जवळ आहे.—स्तो. १४५:१८.

यहोवाची इच्छा काय आहे याबद्दल जेव्हा आपल्याला स्पष्टपणे समजतं, तेव्हा आपण आधी ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करत होतो, त्यात बदल करायची आपल्याला गरज पडू शकते. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की यहोवाचा एक उद्देश आहे आणि त्याने ठरवलेल्या वेळी तो आपला उद्देश नक्की पूर्ण करेल. आणि त्याच्या या उद्देशामध्ये मानवजातीला ज्या समस्यांमुळे खूप दुःख सहन करावं लागलं आहे, त्या कायमच्या आणि पूर्णपणे काढून टाकणं सामील आहे. जसं की, नैसर्गिक विपत्ती, आजारपण आणि मृत्यू. यहोवा त्याच्या राज्याद्वारे हा उद्देश पूर्ण करेल. (दानी. २:४४; प्रकटी. २१:३, ४) पण तोपर्यंत यहोवाने सैतानाला या जगावर राज्य करायची परवानगी दिली आहे. (योहा. १२:३१; प्रकटी. १२:९) यहोवाने जर मानवजातीच्या समस्या आत्ताच सोडवल्या तर असं वाटेल, की सैतान काही प्रमाणात जगावर राज्य करण्यात यशस्वी होत आहे. यहोवाची अभिवचनं पूर्ण होण्याची वाट पाहावी लागत असली, तरी याचा असा अर्थ होत नाही, की यहोवा आपल्याला काहीच मदत करत नाही. तो नक्कीच आपल्याला मदत करेल. टेहळणी बुरूज२३.०५ ८ ¶४; ९-१० ¶७-८

मंगळवार, ४ मार्च

प्रत्येकाला कसं उत्तर द्यायचं हे तुम्हाला समजेल.—कलस्सै. ४:६.

स्मारकविधीचा फायदा करून घेण्यासाठी आपण इतरांना कशी मदत करू शकतो? त्यासाठी साहजिकच सर्वात आधी आपल्याला त्यांना आमंत्रण द्यावं लागेल. तसंच, प्रचारकार्यात आपल्याला नेहमी भेटणाऱ्‍या लोकांना आमंत्रण देण्यासोबतच आपण आपल्या ओळखीच्या लोकांची लिस्ट बनवून त्यांनाही आमंत्रण देऊ शकतो. यामध्ये आपले नातेवाईक, कामावरचे लोक, शाळा-कॉलेजमधले आपले मित्र किंवा इतर लोकही असू शकतात. आपल्याकडे आमंत्रण पत्रिकेच्या छापील प्रती जरी नसल्या, तरी आपण त्यांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपातल्या पत्रिकेची लिंक पाठवू शकतो. कोण जाणे त्यातले किती लोक येतील! (उप. ११:६) लक्षात असू द्या, आपण ज्यांना आमंत्रण दिलंय त्यांच्या मनात भरपूर प्रश्‍न असतील. खासकरून जेव्हा त्यांना आपल्या सभांबद्दल काहीच माहीत नसतं तेव्हा. त्यांच्या मनात कोणते प्रश्‍न असतील याचा अंदाज बांधून त्यांची उत्तरं कशी देता येतील याची चांगली तयारी आपण करू शकतो. स्मारकविधीला उपस्थित राहिल्यानंतरही नवीन लोकांच्या मनात आणखी काही प्रश्‍न असू शकतात. ‘योग्य मनोवृत्तीच्या’ लोकांना स्मारकविधीच्या आमंत्रणाचा फायदा व्हावा, म्हणून आपण स्मारकविधीच्या आधी, त्या दरम्यान आणि त्यानंतरही त्यांना हवी ती मदत करू शकतो.—प्रे. कार्यं १३:४८. टेहळणी बुरूज२४.०१ १२ ¶१३, १५; १३ ¶१६

बुधवार, ५ मार्च

तुम्ही धुक्यासारखे आहात, जे थोडा वेळ दिसतं आणि मग नाहीसं होतं.—याको. ४:१४.

बायबलमध्ये अशा आठ पुनरुत्थानांबद्दल सांगितलंय ज्यांमध्ये मृत लोकांना याच पृथ्वीवर पुन्हा जिवंत करण्यात आलं. या प्रत्येक अहवालाचा तुम्ही बारकाईने अभ्यास करा. आणि असं करत असताना या अहवालातून काय शिकायला मिळतं ते पाहा. तसंच पुनरुत्थानाच्या प्रत्येक घटनेतून मृत लोकांना पुन्हा जिवंत करायची यहोवाची इच्छा आणि ताकद कशी दिसून येते यावरही विचार करा. आणि सगळ्यात महत्त्वाच्या पुनरुत्थानावर, म्हणजे येशूच्या पुनरुत्थानावर मनन करा. त्याचं पुनरुत्थान झालं तेव्हा शेकडो लोकांनी त्याला पाहिलं. यामुळे आपल्याला खातरी मिळते, की ज्यांचा मृत्यू झाला आहे तेसुद्धा नक्की जिवंत होतील. (१ करिंथ. १५:३-६, २०-२२) यहोवाने आपल्याला पुनरुत्थानाचं अभिवचन दिलंय याबद्दल आपण त्याचे किती आभार मानले पाहिजेत! हे अभिवचन तो नक्की पूर्ण करेल अशी खातरी आपण ठेवू शकतो. कारण ते पूर्ण करण्याची इच्छा आणि ताकद या दोन्ही गोष्टी त्याच्याकडे आहेत. त्यामुळे पुनरुत्थानाच्या या सुंदर आशेवरचा आपला विश्‍वास आपण आणखी भक्कम करत राहू या. असं केल्यामुळे आपण यहोवा देवाच्या आणखी जवळ जाऊ, ज्याने आपल्याला असं वचन दिलंय की ‘तुमचे प्रिय जन उठतील!’—योहा. ११:२३. टेहळणी बुरूज२३.०४ ८ ¶२; १२ ¶१७; १३ ¶२०

गुरुवार, ६ मार्च

तुझ्या देवासोबत नम्रपणे चालत राहा!—मीखा ६:८.

मर्यादांची जाणीव असणं आणि नम्र असणं यांचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. मर्यादांची जाणीव असल्यामुळे एक व्यक्‍ती फक्‍त स्वतःबद्दल विचार करत नाही. शिवाय, काही गोष्टी आपल्या क्षमतेपलीकडे आहेत हेही तिला माहीत असतं. नम्र व्यक्‍ती इतरांचा आदर करते आणि स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्त्व देते. (फिलिप्पै. २:३) सहसा, ज्या व्यक्‍तीला आपल्या मर्यादांची जाणीव असते ती व्यक्‍ती नम्रसुद्धा असते. गिदोनला त्याच्या मर्यादांची जाणीव होती आणि तो एक नम्र व्यक्‍ती होता. जेव्हा यहोवाच्या स्वर्गदूताने गिदोनला सांगितलं, की शक्‍तिशाली मिद्यानी लोकांपासून इस्राएली लोकांची सुटका करण्यासाठी त्याला निवडण्यात आलं आहे, तेव्हा त्याने म्हटलं: “मनश्‍शेच्या वंशात माझं घराणं सगळ्यात लहान आहे. आणि माझ्या वडिलांच्या घरात तर मी फार छोटा माणूस आहे.” (शास्ते ६:१५) ही जबाबदारी पार पाडायच्या पात्रतेचे आपण नाही असं त्याला वाटत होतं. पण यहोवाला माहीत होतं की तो हे करू शकतो. आणि यहोवाच्या मदतीने गिदोनने आपली जबाबदारी पार पाडली. आपल्या मर्यादा ओळखून काम करण्यासाठी आणि नम्र राहण्यासाठी वडील पुरेपूर प्रयत्न करतात. (प्रे. कार्यं २०:१८, १९) ते आपल्या कामांबद्दल किंवा कौशल्यांबद्दल बढाई मारत नाहीत. किंवा त्यांच्या चुकांमुळे किंवा कमतरतांमुळे ‘आपण काहीच कामाचे नाही,’ असा विचार ते करत नाहीत. टेहळणी बुरूज२३.०६ ३ ¶४-५

शुक्रवार, ७ मार्च

तो तुझं डोकं ठेचेल.—उत्प. ३:१५.

सैतानाचं डोकं आजपासून हजारपेक्षा जास्त वर्षांनंतर ठेचलं जाणार आहे. (प्रकटी. २०:७-१०) हे घडण्याआधी बायबल आपल्याला हादरून सोडणाऱ्‍या ज्या घटनांबद्दल सांगतं त्यांचाही विचार करा. सगळ्यात आधी राष्ट्रं “शांती आहे, सुरक्षा आहे,” अशी घोषणा करतील. (१ थेस्सलनी. ५:२, ३) आणि मग “एकाएकी” ही राष्ट्रं खोट्या धर्मावर हल्ला करतील, तेव्हा मोठ्या संकटाला सुरुवात होईल. (प्रकटी. १७:१६) त्यानंतर येशू संपूर्ण मानवजातीवर आपला न्यायदंड बजावेल आणि मेंढरांना बकऱ्‍यांपासून वेगळं करेल. (मत्त. २५:३१-३३, ४६) पण यादरम्यान सैतान शांत बसणार नाही. द्वेषाने आणि तिरस्काराने तो राष्ट्रांच्या समूहाला एकत्र करेल आणि त्यांना यहोवाची शुद्ध उपासना करणाऱ्‍या उपासकांवर हल्ला करण्यासाठी चेतवेल. या राष्ट्रांच्या समूहालाच बायबलमध्ये मागोग देशचा गोग असं म्हटलंय. (यहे. ३८:२, १०, ११) मग एक अशी वेळ येईल जेव्हा पृथ्वीवर उरलेल्या अभिषिक्‍त जणांना वरती स्वर्गात घेतलं जाईल. आणि ते ख्रिस्तासोबत आणि स्वर्गातल्या इतर स्वर्गदूतांसोबत हर्मगिदोनचं युद्ध लढण्यासाठी त्यांना जाऊन मिळतील. हर्मगिदोन ही मोठ्या संकटाची शेवटची घटना असेल. (मत्त. २४:३१; प्रकटी. १६:१४, १६) आणि त्यानंतर मग पृथ्वीवर ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्याची सुरुवात होईल.—प्रकटी. २०:६. टेहळणी बुरूज२३.१० २०-२१ ¶९-१०

शनिवार, ८ मार्च

तुमचा हा सेवक तर लहानपणापासून यहोवाचं भय बाळगत आलाय.—१ राजे १८:१२.

आज आपले बरेच भाऊबहीण अशा देशांत राहतात जिथे आपल्या कामावर बंदी आहे. ते तिथल्या अधिकाऱ्‍यांचा आदर तर करतात, पण ओबद्यासारखंच ते यहोवाची सेवा करायचं सोडत नाहीत. (मत्त. २२:२१) माणसांऐवजी देवाची आज्ञा पाळून ते दाखवतात, की त्यांच्या मनात देवाची भीती आहे. (प्रे. कार्यं ५:२९) म्हणून ते यहोवाची उपासना करण्यासाठी सावधपणे प्रचार करत राहतात आणि गुप्तपणे सभेसाठी एकत्र येतात. (मत्त. १०:१६, २८) तसंच त्या ठिकाणी राहणाऱ्‍या इतर भाऊबहिणींनाही बायबलवर आधारित साहित्य मिळावं याची ते काळजी घेतात. आफ्रिकेतल्या एका देशात एके काळी आपल्या कामावर बंदी होती. तिथे राहणाऱ्‍या हेन्री नावाच्या भावाचं उदाहरण घ्या. त्या काळात आपल्या भाऊबहिणींना बायबल आधारित साहित्य पुरवण्याचं काम करण्यासाठी हेन्री पुढे आला होता. तो म्हणतो: “माझा स्वभाव लाजाळू आहे. यहोवामुळे . . . मी हे काम धैर्याने करू शकलो.” येणाऱ्‍या काळात तुम्हीसुद्धा हेन्रीसारखंच धैर्य दाखवाल का? तुमच्याही मनात जर देवाबद्दल योग्य भीती असेल, तर तुम्ही हे नक्की करू शकाल. टेहळणी बुरूज२३.०६ १६ ¶९, ११

रविवार, ९ मार्च

एका माणसाद्वारे पाप जगात आलं.—रोम. ५:१२.

आदाम आणि हव्वाने बंड केल्यानंतर असं वाटलं असतं, की परिपूर्ण आणि आज्ञाधारक मानवांनी पृथ्वी भरून टाकण्याचा यहोवाचा जो उद्देश आहे, त्यात सैतानाने अडथळा आणलाय. सैतानाला कदाचित वाटलं असेल की यहोवाकडे आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी आता खूप कमी पर्याय उरलेत. त्यांपैकी एक म्हणजे आदाम आणि हव्वाचा नाश करून, मानवजातीसाठी आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी एक नवीन जोडपं निर्माण करणं. पण जर यहोवाने असं केलं असतं, तर यहोवा खोटं बोलत आहे असा आरोप सैतानाने लावला असता. कारण उत्पत्ती १:२८ मध्ये यहोवाने आदाम आणि हव्वाला सांगितलं होतं, की त्यांची संतती या पृथ्वीला भरून टाकेल. किंवा कदाचित सैतानाला असं वाटलं असावं की देव आदाम आणि हव्वाच्या अपरिपूर्ण मुलांचा जन्म होऊ देईल, पण ती मुलं कधीच परिपूर्ण होणार नाहीत. (उप. ७:२०; रोम. ३:२३) पण जर तसं झालं असतं, तर यहोवा आपला उद्देश पूर्ण करू शकला नाही असा आरोप सैतानाने त्याच्यावर लावला असता. कारण या पर्यायामुळे देवाचा उद्देश पूर्ण झाला नसता; म्हणजेच आदाम आणि हव्वाच्या परिपूर्ण आणि आज्ञाधारक मुलांनी ही नंदनवन पृथ्वी कधीच भरली नसती. टेहळणी बुरूज२३.११ ६ ¶१५-१६

सोमवार, १० मार्च

लिहिण्यात आलेल्या गोष्टींच्या पलीकडे जाऊ नका.—१ करिंथ. ४:६.

यहोवा त्याच्या वचनाद्वारे आणि त्याच्या संघटनेद्वारे आपल्याला स्पष्ट मार्गदर्शन देतो. आणि त्याने दिलेल्या मार्गदर्शनात आपल्याला कोणतीही भर घालायची गरज नाही. (नीति. ३:५-७) म्हणून बायबलमध्ये जे लिहिलंय त्याच्या पलीकडे आपण जात नाही. आणि भाऊबहिणींच्या खाजगी गोष्टींबद्दल आपण नियम बनवत नाही. सैतान ‘फसव्या गोष्टींचा’ आणि ‘जगाच्या विचारसरणीचा’ वापर करून लोकांची दिशाभूल करायचा आणि त्यांच्यात फूटी निर्माण करायचा प्रयत्न करतो. (कलस्सै. २:८) त्याने हे पहिल्या शतकात कसं केलं? त्याने मानवी विचारांवर आधारलेल्या तत्त्वज्ञानाचा आणि देवाच्या वचनानुसार नसलेल्या यहुदी शिकवणींचा वापर केला. तसंच, त्याने ख्रिश्‍चनांना हे पटवून द्यायचा प्रयत्न केला, की त्यांनी मोशेच्या नियमशास्त्राचं पालन केलं पाहिजे. ही सगळी फसवणूक होती. कारण त्यामुळे, खऱ्‍या बुद्धीचा स्रोत असलेल्या यहोवा देवापासून लोकांचं लक्ष विचलित झालं. आजसुद्धा सैतान फसवणूक करण्यासाठी मिडिया आणि सोशल नेटवर्कचा (प्रसार आणि समाज माध्यमांचा) वापर करत आहे. यांचा वापर करून तो अफवा आणि राजकीय पुढाऱ्‍यांना हव्या असणाऱ्‍या खोट्या बातम्या पसरवतो. टेहळणी बुरूज२३.०७ १६ ¶११-१२

मंगळवार, ११ मार्च

हे यहोवा, तुझी कार्यं किती महान आहेत! तुझे विचार खरंच किती खोल आहेत!—स्तो. ९२:५.

सैतान आणि आपल्या पहिल्या मानवी पालकांनी बंड केल्यामुळे जी समस्या निर्माण झाली होती, ती यहोवाने ज्या प्रकारे सोडवली ते पाहून सैतान अवाक झाला असेल. यहोवाने आदाम आणि हव्वाला मुलं होऊ दिली. असं करून, यहोवाने सिद्ध केलं की तो लबाड किंवा खोटा नाही, तर खरा आहे. आणि अशा प्रकारे आपला उद्देश पूर्ण करण्यात तो विजयी ठरला. आदाम आणि हव्वाच्या आज्ञाधारक मुलांना वाचवण्यासाठी त्याने ‘संततीचा’ जन्म होऊ दिला आणि तो आपला उद्देश पूर्ण करत राहिला. (उत्प. ३:१५; २२:१८) खंडणी बलिदानाची यहोवाने केलेली तरतूद पाहून सैतान नक्कीच थक्क झाला असेल! का? कारण ही तरतूद निःस्वार्थ प्रेमावर आधारलेली होती. (मत्त. २०:२८; योहा. ३:१६) सैतानाच्या स्वार्थी मनोवृत्तीत हा गुण मुळीच पाहायला मिळत नाही. पण खंडणीच्या या तरतुदीमुळे काय साध्य होणार होतं? यहोवाच्या मूळ उद्देशाप्रमाणे, हजार वर्षांच्या शेवटी आदाम-हव्वाच्या परिपूर्ण आणि आज्ञाधारक संततीला पृथ्वीवरच्या नंदनवनात कायमचं जीवन मिळणार होतं. टेहळणी बुरूज२३.११ ६ ¶१७

बुधवार, १२ मार्च

देव न्याय करेल.—इब्री १३:४.

आपण जीवनाच्या आणि रक्‍ताच्या पावित्र्याबद्दल यहोवाने दिलेल्या नियमांचं पालन करतो. का बरं? कारण यहोवाने म्हटलं रक्‍त म्हणजेच जीवन आहे. आणि जीवन यहोवाकडून आपल्याला मिळालेली एक मौल्यवान भेट आहे. (लेवी. १७:१४) जेव्हा यहोवाने पहिल्यांदा मानवांना मांस खायची परवानगी दिली, तेव्हा मांसासोबत रक्‍त न खाण्याची आज्ञाही दिली. (उत्प. ९:४) पुढे जेव्हा त्याने इस्राएली लोकांना मोशेद्वारे नियमशास्त्र दिलं, तेव्हाही त्याने ही आज्ञा पुन्हा सांगितली. (लेवी. १७:१०) यानंतर, त्याने पहिल्या शतकातल्या नियमन मंडळाद्वारे सर्व ख्रिश्‍चनांना अशी आज्ञा दिली, की त्यांनी ‘रक्‍तापासून दूर राहावं.’ (प्रे. कार्यं १५:२८, २९) त्यामुळे आपणसुद्धा उपचारांच्या बाबतीत निर्णय घेताना, या आज्ञेचं खंबीरपणे पालन करतो. यहोवाच्या उच्च नैतिक स्तरांचं आपण काटेकोरपणे पालन करतो. प्रेषित पौलने असा सल्ला दिला, की एका अर्थाने आपण आपल्या ‘शरीराच्या अवयवांना मारून टाकलं पाहिजे.’ म्हणजेच, चुकीच्या इच्छांना आपल्या मनातून काढून टाकण्यासाठी आपण ठोस पावलं उचलली पाहिजेत. आपण अशी कोणतीही गोष्ट पाहायचं किंवा करायचं टाळलं पाहिजे, ज्यामुळे आपल्या हातून अनैतिक लैंगिक कृत्य घडेल.—कलस्सै. ३:५; ईयो. ३१:१. टेहळणी बुरूज२३.०७ १५ ¶५-६

गुरुवार, १३ मार्च

शेवटी त्याने तिला सगळं काही खरं सांगून टाकलं.—शास्ते १६:१७.

शमशोन दलीलाच्या प्रेमात इतका आंधळा झाला होता का, की तिचा नेमका हेतू काय आहे हे त्याला समजलं नाही? कारण काहीही असो, पण शमशोनला शक्‍ती कुठून मिळते, हे त्याचं रहस्य जाणून घेण्यासाठी तिने त्याच्याकडे हट्ट धरला आणि शमशोनने शेवटी तिला सगळं काही सांगून दिलं. दुःखाची गोष्ट म्हणजे, शमशोनच्या या चुकीमुळे तो अडचणीत सापडला आणि त्याने त्याची शक्‍ती गमावली. आणि निदान काही काळासाठी तरी त्याने यहोवाची स्वीकृती गमावली. (शास्ते १६:१६-२०) शमशोनने यहोवावर भरवसा ठेवण्याऐवजी दलीलावर भरवसा ठेवल्यामुळे त्याला त्याचे खूप दुःखद परिणाम भोगावे लागले. पलिष्टी लोकांनी त्याला पकडून त्याचे डोळे फोडले. त्याला गाझामध्ये तुरुंगात टाकण्यात आलं आणि लोकांनी त्याला धान्य दळायला लावलं. यानंतर पलिष्टी लोकांनी त्याचा आणखीन अपमान करण्यासाठी मोठा आनंदोत्सव साजरा केला. त्यांनी दागोन या त्यांच्या खोट्या दैवतासाठी यज्ञ केला, कारण त्यांच्या देवाने शमशोनला त्यांच्या हाती दिलंय असं त्यांना वाटत होतं. त्यांनी शमशोनला त्यांची “करमणूक” करायला तुरुंगातून त्या ठिकाणी बाहेर आणलं.—शास्ते १६:२१-२५. टेहळणी बुरूज२३.०९ ५-६ ¶१३-१४

शुक्रवार, १४ मार्च

सगळ्यांच्या दृष्टीने जे चांगलं ते करण्याकडे लक्ष द्या.—रोम. १२:१७.

शाळा-कॉलेजमधली किंवा कामावरची एखादी व्यक्‍ती आपण बायबलच्या स्तरांप्रमाणे का चालतो, याबद्दल कदाचित आपल्याला प्रश्‍न विचारेल. अशा वेळी आपण आपल्या विश्‍वासाबद्दल जितकं चांगल्या प्रकारे सांगता येईल तितकं सांगण्याचा प्रयत्न तर करूच, पण त्यासोबतच तिच्या मतांचासुद्धा आदर करू. (१ पेत्र ३:१५) एखाद्याने आपल्याला फक्‍त आपली टीका करण्यासाठी किंवा आपला विरोध करण्यासाठी प्रश्‍न विचारलाय, असं समजू नका. उलट, त्याच्या प्रश्‍नामुळे त्याला कोणती गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची वाटते, हे समजून घ्यायला आपल्याला मदत होते. एखाद्याने आपल्याला कोणत्याही हेतूने प्रश्‍न विचारलेला असला, तरी आपण त्याचं उत्तर सौम्यतेने आणि प्रेमळपणे दिलं पाहिजे. असं केल्यामुळे त्या व्यक्‍तीला स्वतःच्या मतावर पुन्हा विचार करण्याची प्रेरणा मिळू शकते. कामावरची एखादी व्यक्‍ती कदाचित आपल्याला विचारेल की आपण वाढदिवस साजरा का करत नाही? अशा वेळी तिला लगेच उत्तर देण्याऐवजी ती असा प्रश्‍न का विचारत आहे याचा आपण विचार करू शकतो. उदाहरणार्थ, आपल्याला मौजमजाच करू दिली जात नाही असं तिला वाटत असेल का? कामावरच्या लोकांबद्दल त्या व्यक्‍तीला किती काळजी आहे याबद्दल आपण तिची प्रशंसा करू शकतो. असं केल्यामुळे त्या व्यक्‍तीला वाटणारी काळजी कदाचित आपल्याला थोडी कमी करता येईल. आणि यामुळे ती आपलं ऐकून घ्यायला तयार होईल आणि वाढदिवसाबद्दल बायबलमधून काय कळतं हे त्या व्यक्‍तीला निवांतपणे सांगायची संधीसुद्धा आपल्याला मिळेल. टेहळणी बुरूज२३.०९ १७ ¶१०-११

शनिवार, १५ मार्च

दुष्ट लोकांच्या खोट्या शिकवणींमुळे भरकटले जाऊन तुम्ही आपली स्थिरता गमावून बसू नये म्हणून सावध राहा.—२ पेत्र ३:१७.

अंत येण्याआधी सर्व राष्ट्रांमधल्या लोकांना साक्ष देण्यासाठी आपल्याकडे असलेल्या वेळेचा उपयोग करणं, हा किती मोठा बहुमान आपल्याला मिळालाय! पेत्र त्याच्या पत्रामध्ये, यहोवाचा दिवस ‘नेहमी डोळ्यांपुढे ठेवायची’ विनंती आपल्याला करतो. (२ पेत्र ३:११, १२) मग आपण हे कसं करू शकतो? त्यासाठी नवीन जगात मिळणाऱ्‍या आशीर्वादांचा आपण दररोज विचार करू शकतो. उदाहरणार्थ, अशी कल्पना करा की तुम्ही अतिशय शुद्ध वातावरणात राहत आहात. खायला-प्यायला मुबलक प्रमाणात आहे. पुनरुत्थान झालेल्या आपल्या प्रियजनांचं तुम्ही आनंदाने स्वागत करत आहात. शिवाय, कित्येक शतकांआधी मरण पावलेल्या लोकांना तुम्ही बायबलच्या भविष्यवाण्या कशा पूर्ण झाल्या आहेत, याबद्दल शिकवत आहात. आपण जर दररोज या गोष्टींचा विचार केला तर यामुळे यहोवाच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहायला आणि अंत नक्की येईल या गोष्टीची खातरी बाळगायला मदत होईल. अशा प्रकारे भविष्यात होणाऱ्‍या या गोष्टींबद्दल ‘आधीपासूनच माहीत असल्यामुळे’ आपण दुष्ट लोकांच्या खोट्या शिकवणींमुळे ‘भरकटणार नाही.’ टेहळणी बुरूज२३.०९ २७ ¶५-६

रविवार, १६ मार्च

देवाच्या इच्छेप्रमाणे आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा, कारण असं करणं योग्य आहे.—इफिस. ६:१.

आज आपली लहान मुलं अशा मुलांमध्ये वावरत असतात, जी त्यांच्या ‘आईवडिलांचं ऐकत नाहीत.’ (२ तीम. ३:१, २) पण ही मुलं असं का वागतात? कारण काहींना असं वाटतं, की आपले आईवडील बोलतात एक आणि करतात एक. आणि म्हणून त्यांचं ऐकण्यात काही अर्थ नाही. तर काही मुलांना वाटतं की आपले आईवडील जुन्या विचारांचे आहेत. म्हणून त्यांचा सल्ला आजच्या काळात लागू होणारा नाही. तर इतरांना असं वाटतं, की आपले आईवडील जास्तच कडक आहेत. पण बऱ्‍याच मुलांना आजच्या वचनात यहोवाने दिलेली आज्ञा पाळायला कठीण जातं. बायबलमधला हा सल्ला पाळायला तुम्हाला कुठल्या गोष्टीमुळे मदत होईल? आज्ञा पाळण्याच्या बाबतीत येशूचं खूप चांगलं उदाहरण आहे. म्हणून तुम्ही त्याच्याकडून शिकू शकता. (१ पेत्र २:२१-२४) तो एक परिपूर्ण मनुष्य होता, पण त्याचे आईवडील अपरिपूर्ण होते. त्याच्या आईवडिलांकडून बऱ्‍याचदा चुका झाल्या. इतकंच काय तर त्याला समजून घेण्यात त्यांचा बऱ्‍याचदा गैरसमजही झाला. पण इतकं असूनसुद्धा येशूने त्याच्या आईवडिलांचा आदर केला.—निर्ग. २०:१२. टेहळणी बुरूज२३.१० ७ ¶४-५

सोमवार, १७ मार्च

पूर्वीची आज्ञा कमजोर आणि निरुपयोगी ठरल्यामुळे ती रद्द करण्यात आली.—इब्री ७:१८.

पौलने समजावून सांगितलं, की नियमशास्त्रामधल्या बलिदानांमुळे पाप पूर्णपणे काढून टाकलं जाऊ शकत नाही. त्यामुळेच नियमशास्त्र “रद्द” करण्यात आलं होतं. पुढे पौलने देवाच्या वचनातली काही गहन सत्यं शिकवली. त्याने भाऊबहिणींना याची आठवण करून दिली, की येशूच्या बलिदानाच्या आधारावर त्यांना जास्त “चांगली आशा” मिळू शकते. यामुळे ते “देवाच्या जवळ” येऊ शकतात. (इब्री ७:१९) पौलने इब्री ख्रिश्‍चनांना सांगितलं, की ते आधी ज्या पद्धतीने उपासना करत होते त्यापेक्षा आता ते ज्या पद्धतीने उपासना करत आहेत ती खूप श्रेष्ठ आहे. त्याने असंही म्हटलं, की नियमशास्त्राप्रमाणे यहुदी लोक उपासनेत ज्या गोष्टी करत होते त्या “सगळ्या येणाऱ्‍या गोष्टींच्या छाया आहेत, पण वास्तविकता ही ख्रिस्तामध्ये आहे.” (कलस्सै. २:१७) जेव्हा एखाद्या वस्तूची छाया किंवा सावली पडते तेव्हा आपल्याला त्या वस्तूचा सर्वसाधारण आकार समजतो. पण ती छाया खरोखरची वस्तू नसते. त्याचप्रमाणे यहुदी लोकांची उपासना करायची पद्धत ही पुढे येणाऱ्‍या वास्तविक गोष्टींची फक्‍त एक छाया होती. आपल्या पापांची क्षमा व्हावी म्हणून यहोवाने जी व्यवस्था केली आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. कारण त्यामुळेच आपल्याला यहोवाला मान्य असलेल्या पद्धतीने उपासना करता येईल. टेहळणी बुरूज२३.१० २५ ¶४-५

मंगळवार, १८ मार्च

अंताच्या समयी दक्षिणेचा राजा त्याच्याशी लढाई करेल. आणि उत्तरेचा राजा त्याच्याशी लढायला येईल.—दानी. ११:४०.

दानीएलच्या ११ व्या अध्यायात दोन राजांबद्दल किंवा राजकीय सत्तांबद्दल सांगितलं आहे. या सत्ता जगावर अधिकार चालवण्यासाठी एकमेकांसोबत संघर्ष करतात. आपण या भविष्यवाणीची आणि बायबलमधल्या इतर भविष्यवाण्यांची तुलना केली, तर आपल्याला कळतं, की “उत्तरेचा राजा” रशिया आणि त्याच्या मित्र राष्ट्रांना सूचित करतो. तर, ‘दक्षिणेचा राजा’ अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्तेला सूचित करतो. आज जे देवाचे लोक ‘उत्तरेच्या राजाच्या’ अधिकाराखाली राहतात, त्यांचा तो तीव्र छळ करतोय. काही साक्षीदारांना त्यांच्या विश्‍वासामुळे मारहाण करून तुरुंगात टाकण्यात आलंय. पण ‘उत्तरेच्या राजाच्या’ अशा कामांमुळे आपले भाऊबहीण घाबरले नाहीत. उलट, त्यांचा विश्‍वास मजबूत झाला आहे. असं का? कारण त्या भाऊबहिणींना माहीत आहे, की देवाच्या लोकांचा अशा प्रकारे छळ झाल्यामुळे दानीएलच्या पुस्तकातली भविष्यवाणी पूर्ण होत आहे. (दानी. ११:४१) हे माहीत असल्यामुळे आपली आशा मजबूत होते आणि एकनिष्ठ राहण्याचा आपला निश्‍चय आणखी पक्का होतो. टेहळणी बुरूज२३.०८ ११ ¶१५-१६

बुधवार, १९ मार्च

जो तुम्हाला हात लावतो, तो जणू माझ्या डोळ्याच्या बुबुळाला हात लावतो.—जख. २:८.

यहोवा आपल्यावर प्रेम करतो, म्हणून त्याला आपल्या भावना लगेच कळतात. आणि आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी तो लगेच पावलंही उचलतो. आपल्याला जेव्हा वाईट वाटतं तेव्हा त्यालाही वाईट वाटतं. म्हणूनच आपण अशी प्रार्थना करू शकतो: “तुझ्या डोळ्याच्या बाहुलीसारखं मला सांभाळ.” (स्तो. १७:८) डोळा हा आपल्या शरीराचा सगळ्यात नाजूक आणि महत्त्वाचा अवयव आहे त्यामुळे जेव्हा यहोवा आपली तुलना त्याच्या डोळ्याच्या बुबुळाशी करतो, तेव्हा खरंतर तो असं म्हणत असतो, ‘माझ्या लोकांनो, जो तुमचं नुकसान करतो, तो माझ्या सर्वात मौल्यवान गोष्टीचं नुकसान करतो.’ यहोवा आपल्यावर प्रेम करतो याची आपल्याला खातरी असावी असं त्याला वाटतं. पण पूर्वी आलेल्या वाईट अनुभवांमुळे यहोवा खरंच आपल्यावर प्रेम करतो का, याची कदाचित आपल्याला शंका वाटेल. किंवा आपण सध्या ज्या समस्यांचा सामना करत आहोत त्यामुळे यहोवा खरंच आपल्यावर प्रेम करतो की नाही याची आपल्याला खातरी नसेल. पण मग हा भरवसा आपण कसा मजबूत करू शकतो? यहोवाने येशूबद्दल, अभिषिक्‍तांबद्दल, आणि आपल्या सगळ्यांबद्दल प्रेम कसं दाखवलं हे शिकून आपण आपला भरवसा मजबूत करू शकतो. टेहळणी बुरूज२४.०१ २७ ¶६-७

गुरुवार, २० मार्च

आमचा देव आमच्यासोबत असल्यामुळे, त्याने मार्गात शत्रूंपासून आणि लुटारूंपासून आमचं रक्षण केलं.—एज्रा ८:३१.

परीक्षेच्या काळात यहोवाने त्याच्या लोकांना कशी साथ दिली हे एज्राने पाहिलं होतं. याच्या काही वर्षांआधी म्हणजे इ.स.पू. ४८४ मध्ये एज्रा कदाचित बाबेलमध्ये राहत असावा. तेव्हा अहश्‍वेरोश राजाने संपूर्ण पर्शियाच्या साम्राज्यामध्ये राहणाऱ्‍या यहुद्यांचा नाश करायचं फर्मान काढलं. (एस्ते. ३:७, १३-१५) त्यामुळे एज्राचा जीवसुद्धा धोक्यात होता. हे फर्मान ऐकून प्रत्येक ‘प्रांतातले’ यहुदी उपवास करतात आणि आक्रोश करतात. त्यांनी नक्कीच यहोवाला मार्गदर्शनासाठी प्रार्थनाही केली असेल. (एस्ते. ४:३) यहुद्यांच्या विरुद्ध रचलेला हा कट कसा उलटला हे जेव्हा एज्रा आणि इतर यहुद्यांना कळलं, तेव्हा त्यांना किती आनंद झाला असेल, याचा विचार करा! (एस्ते. ९:१, २) या कठीण काळात एज्राने जे अनुभवलं त्यामुळे भविष्यात येणाऱ्‍या परीक्षांसाठी तो तयार झाला असेल. आणि यहोवा त्याच्या लोकांना सुरक्षित ठेवतो, या गोष्टीवरचा त्याचा भरवसा आणखी मजबूत झाला असेल. टेहळणी बुरूज२३.११ १७ ¶१२-१३

शुक्रवार, २१ मार्च

देव कार्यांशिवाय नीतिमान ठरवतो.—रोम. ४:६.

प्रेषित पौल ज्या कार्यांबद्दल बोलत होता, ती कार्यं मोशेला सीनाय पर्वतावर दिलेल्या “नियमशास्त्रात सांगितलेली कार्यं” आहेत. (रोम. ३:२१, २८) असं दिसून येतं, की पौलच्या दिवसांत काही यहुदी ख्रिस्ती असं मानत होते, की त्यांना मोशेचं नियमशास्त्र अजूनही पाळण्याची गरज आहे. म्हणून पौलने अब्राहामचं उदाहरण देऊन हे सिद्ध केलं की फक्‍त नियमशास्त्र पाळून एक व्यक्‍ती नीतिमान ठरत नाही, तर विश्‍वासाने ठरते. यामुळे आपल्याला किती प्रोत्साहन मिळतं! कारण यामुळे देवाला खूश करणं शक्य आहे याची आपल्याला खातरी मिळते. म्हणजेच जर आपला देवावर आणि ख्रिस्तावर विश्‍वास असेल तर आपल्याला देवाला खूश करता येऊ शकतं. याउलट याकोबच्या दुसऱ्‍या अध्यायात ज्या ‘कार्यांबद्दल’ सांगितलंय ती पौलने सांगितलेली ‘नियमशास्त्रातली कार्यं’ नाहीत. याकोब अशा कार्यांबद्दल किंवा कामांबद्दल बोलत होता जे ख्रिस्ती दररोज आपल्या जीवनात करतात. (याको. २:२४) या कामांवरूनच दिसून येणार होतं, की त्या ख्रिस्ती व्यक्‍तीचा खरंच देवावर विश्‍वास आहे की नाही. टेहळणी बुरूज२३.१२ ३ ¶८; ४-५ ¶१०-११

शनिवार, २२ मार्च

पती पत्नीचं मस्तक आहे.—इफिस. ५:२३.

लग्न करायचा विचार करणाऱ्‍या बहिणींनी खूप विचार करून आपला जोडीदार निवडला पाहिजे. लक्षात असू द्या की तुम्ही ज्या व्यक्‍तीसोबत लग्न कराल तो तुमचा मस्तक असेल. आणि तुम्हाला त्याच्या अधीन राहावं लागेल. (रोम. ७:२; इफिस. ५:३३) म्हणून स्वतःला विचारा: ‘मंडळीत त्याचं एक चांगलं उदाहरण आहे का? तो त्याच्या आयुष्यात आध्यात्मिक गोष्टींना पहिलं स्थान देतो का? तो योग्य निर्णय घेतो का? तो त्याच्या चुका कबूल करतो का? तो स्त्रीयांचा आदर करतो का? यहोवासोबतचं माझं नातं मजबूत करायला तो मला मदत करेल का आणि माझ्या गरजा पूर्ण करेल का? तो माझा चांगला मित्र बनू शकेल का?’ तुम्हाला एक चांगला पती हवा असेल, तर तुम्हीसुद्धा एक चांगली पत्नी असलं पाहिजे. चांगली पत्नी “एक सहायक” असते. आणि तिच्या पतीसाठी “एक योग्य असा साथीदार” असते. (उत्प. २:१८) तसंच, तिचं यहोवावर प्रेम असल्यामुळेच इतरांसमोर आपल्या पतीचं चांगलं नाव असावं म्हणून ती प्रयत्न करते. (नीति. ३१:११, १२; १ तीम. ३:११) म्हणून बहिणींनो, या जबाबदारीची तयारी करण्यासाठी तुम्ही यहोवासोबतचं तुमचं नातं मजबूत करू शकता, तसंच घरातल्या आणि मंडळीतल्या लोकांची मदत करून चांगली सहायक बनू शकता. टेहळणी बुरूज२३.१२ २२-२३ ¶१८-१९

रविवार, २३ मार्च

तुमच्यापैकी कोणाला बुद्धीची गरज असली, तर त्याने ती देवाजवळ मागत राहावी.—याको. १:५.

यहोवा आपल्याला वचन देतो, की तो योग्य निर्णय घ्यायला आपल्याला बुद्धी देईल. खासकरून असे निर्णय ज्यांचा आपल्या पुढच्या आयुष्यावर प्रभाव पडत असतो. तो आपल्याला धीराने सहन करायलासुद्धा सामर्थ्य देतो. यहोवाने प्रेषित पौलला धीराने समस्यांचा सामना करायची ताकद दिली, तशीच तो आपल्यालाही मदत करतो. (फिलिप्पै. ४:१३) एक मार्ग म्हणजे तो भाऊबहिणींचा उपयोग करून आपल्याला मदत करतो. आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री येशूने खूप मनापासून यहोवाला प्रार्थना केली. देवाची निंदा करण्याचा खोटा आरोप त्याच्यावर लागू नये आणि त्यासाठी त्याला दोषी ठरवलं जाऊ नये, अशी कळकळून विनंती त्याने यहोवाकडे केली. पण यहोवाने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर वेगळ्या प्रकारे दिलं. त्याने स्वर्गातल्या त्याच्या भावांपैकी एकाला म्हणजे एका स्वर्गदूताला त्याला धीर देण्यासाठी पाठवलं. (लूक २२:४२, ४३) आजसुद्धा यहोवा आपल्या भाऊबहिणींचा उपयोग करून आपल्याला मदत करतो. आपल्याला धीर देण्यासाठी ते एखादा फोन करतील किंवा आपल्याला येऊन भेटतील. आपण सगळेच, आपल्या भाऊबहिणींना ‘दिलासा देणाऱ्‍या शब्दांनी’ धीर कसा देता येईल याची संधी शोधू शकतो.—नीति. १२:२५. टेहळणी बुरूज२३.०५ १०-११¶९-११

सोमवार, २४ मार्च

एकमेकांना प्रोत्साहन देत राहा आणि एकमेकांना बळकट करत राहा.—१ थेस्सलनी. ५:११.

स्मारकविधीला उपस्थित राहणाऱ्‍या काही अक्रियाशील भाऊबहिणींना कदाचित अशी भीती वाटत असेल, की इतर भाऊबहीण आपल्याबद्दल काय बोलतील. म्हणून त्यांना अवघडल्यासारखं वाटेल असे प्रश्‍न विचारू नका किंवा त्यांच्या मनाला लागेल असं काहीही बोलू नका. ते आपले भाऊबहीणच आहेत, हे विसरू नका. त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा उपासना करायला आपल्याला नक्कीच आनंद होईल! (स्तो. ११९:१७६; प्रे. कार्यं २०:३५) येशूने आपल्याला दरवर्षी त्याच्या मृत्यूची आठवण करायची आज्ञा दिली. त्यासाठी आपण खरंच खूप आभारी आहोत, कारण त्याचं महत्त्व आपल्याला माहीत आहे. आपण जेव्हा स्मारकविधीला उपस्थित राहतो, तेव्हा आपल्याला आणि इतरांनासुद्धा बऱ्‍याच मार्गांनी फायदा होतो. (यश. ४८:१७, १८) आपलं यहोवा आणि येशूवरचं प्रेम वाढतं. तसंच, त्यांनी आपल्यासाठी जे काही केलंय, त्याबद्दल आपल्याला किती कदर आहे हे आपण दाखवून देतो. यासोबतच, इतर भाऊबहिणींसोबत असलेलं आपलं नातं आणखी घट्ट होतं. खंडणी बलिदानामुळे इतरांना कसा फायदा होऊ शकतो हे समजून घ्यायला आपण त्यांना मदत करू शकतो. वर्षाच्या सगळ्यात महत्त्वाच्या दिवसासाठी म्हणजेच या वर्षीच्या स्मारकविधीसाठी तयार राहायला आपण होता होईल ते करू या! टेहळणी बुरूज२४.०१ १४ ¶१८-१९

मंगळवार, २५ मार्च

मी यहोवा आहे. ज्या मार्गाने तू चाललं पाहिजेस, त्यावरून मी तुला नेतो.—यश. ४८:१७.

यहोवा आपलं मार्गदर्शन कसं करतो? त्याचा मुख्य मार्ग म्हणजे त्याचं वचन बायबल. त्यासोबतच तो काही मानवांचा वापर करूनही आपलं मार्गदर्शन करतो. उदाहरणार्थ, ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाचा’ वापर करून तो आपल्याला आध्यात्मिक अन्‍न पुरवतो आणि त्यामुळे आपल्याला योग्य निर्णय घेता येतात. (मत्त. २४:४५) त्यासोबतच यहोवा योग्य अशा भावांचा वापर करूनसुद्धा आपलं मार्गदर्शन करतो. जसं की, विभागीय पर्यवेक्षक आणि मंडळीतले वडील. ते आपल्याला प्रोत्साहन आणि सूचना देतात. त्यामुळे आपल्याला कठीण काळात टिकून राहता येतं. शेवटल्या काळात मिळणाऱ्‍या या भरवशालायक मार्गदर्शनासाठी आपण किती आभारी आहोत! त्यामुळे आपल्याला यहोवासोबतची आपली मैत्री टिकवून ठेवता येते आणि जीवनाच्या मार्गावर चालत राहता येतं. अशा वेळी यहोवाच आपल्या लोकांचं मार्गदर्शन करत आहे आणि त्याचं मार्गदर्शन स्वीकारल्यामुळे आपल्याला आशीर्वाद मिळतील या गोष्टीवर खासकरून आपला विश्‍वास असणं गरजेचं आहे. टेहळणी बुरूज२४.०२ २० ¶२-३

बुधवार, २६ मार्च

आपण शब्दांनी किंवा फक्‍त तोंडाने नाही, तर कार्यांतून प्रेम केलं पाहिजे.—१ योहा. ३:१८.

आपण बायबलचा अभ्यास करण्यासाठी मेहनत घेतली तर यहोवावर असलेलं आपलं प्रेम वाढत जाईल. बायबल वाचत असताना त्या अहवालातून यहोवाबद्दल तुम्हाला काय समजतं हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि मग या प्रश्‍नांवर विचार करा: ‘या अहवालातून मला कसं कळतं की यहोवाचं माझ्यावर प्रेम आहे? आणि मीसुद्धा यहोवावर प्रेम केलं पाहिजे याची कोणती कारणं मला मिळतात?’ यहोवावरचं आपलं प्रेम वाढवायचा आणखी एक मार्ग म्हणजे, आपण त्याला दररोज प्रार्थना करून मनमोकळेपणाने त्याच्याशी बोललं पाहिजे. (स्तो. २५:४, ५) आणि असं केल्यावर यहोवाही आपल्या प्रार्थनांचं उत्तर देईल. (१ योहा. ३:२१, २२) तसंच, आपल्या मनात आपण इतरांबद्दल प्रेमही वाढवलं पाहिजे. प्रेषित पौल येशूचा शिष्य बनल्यानंतर काही वर्षांनी त्याची ओळख तीमथ्य नावाच्या एका तरुणाशी झाली. तीमथ्यचं यहोवावर प्रेम होतं आणि इतरांवरही प्रेम होतं. म्हणूनच काही वर्षांनंतर पौलने फिलिप्पैकरांना असं लिहिलं: “त्याच्यासारखा स्वभाव असलेला असा कोणीही माझ्याजवळ नाही, जो तुमची अगदी मनापासून काळजी घेईल.” (फिलिप्पै. २:२०) तीमथ्यचं भाऊबहिणींवर किती प्रेम होतं, हे पाहून पौल प्रभावित झाला होता. म्हणूनच मंडळीतले भाऊबहीण तीमथ्यच्या भेटीची आतुरतेने वाट पाहायचे.—१ करिंथ. ४:१७. टेहळणी बुरूज२३.०७ ९ ¶७-१०

गुरुवार, २७ मार्च

मी तुला कधीच टाकून देणार नाही.—इब्री १३:५.

इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात जाण्याआधी मोशेचा मृत्यू झाला. मग यहोवाने आपल्या लोकांना असंच सोडून दिलं का? नाही. जोपर्यंत ते यहोवाला विश्‍वासू होते, तोपर्यंत तो त्यांची काळजी घेत राहिला. मोशेचा मृत्यू होण्याआधी यहोवाने त्याला त्याच्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी यहोशवाला नेमायला सांगितलं. मोशे बरीच वर्षं यहोशवाला प्रशिक्षण देत होता. (निर्ग. ३३:११; अनु. ३४:९) त्यासोबतच, त्याने लोकांचं नेतृत्व करण्यासाठी हजार जणांवर, शंभर जणांवर, पन्‍नास जणांवर आणि अगदी दहा जणांवरही काही अनुभवी माणसांना प्रमुख म्हणून नेमलं होतं. (अनु. १:१५) अशा प्रकारे देवाच्या लोकांची चांगली काळजी घेण्यात आली. एलीयाचंसुद्धा असंच उदाहरण आहे. तो बरीच वर्षं इस्राएलमध्ये शुद्ध उपासनेसाठी पुढाकार घेत होता. पण अशी एक वेळ आली जेव्हा यहोवाने त्याची नेमणूक बदलून त्याला यहूदामध्ये दक्षिणेकडे पाठवलं. (२ राजे २:१; २ इति. २१:१२) मग इस्राएलच्या दहा वंशांच्या राज्यातले विश्‍वासू लोक एकटे पडले का? नाही. त्यासाठी एलीया बरीच वर्षं अलीशाला प्रशिक्षण देत होता. अशा प्रकारे देवाचा उद्देश पूर्ण होत गेला आणि त्याने त्याच्या विश्‍वासू उपासकांची काळजी घेतली. टेहळणी बुरूज२४.०२ ५ ¶१२

शुक्रवार, २८ मार्च

प्रकाशाच्या मुलांप्रमाणे चालत राहा.—इफिस. ५:८.

इफिसमधले ख्रिस्ती देवाच्या वचनानुसार जीवन जगू लागले होते. आणि त्यामुळे ते एका अर्थाने प्रकाशात होते. (स्तो. ११९:१०५) इफिसमधल्या या लोकांनी खोट्या धार्मिक रितीरिवाजांप्रमाणे आणि अनैतिकतेने वागायचं सोडून दिलं होतं. ते आता देवाचं “अनुकरण” करणारे बनले होते. तसंच, ते यहोवाला खूश करण्यासाठी आणि त्याची उपासना करण्यासाठी जमेल ते करत होते. (इफिस. ५:१) त्याच प्रकारे, आपणसुद्धा सत्य शिकण्याआधी खोट्या धर्माच्या आणि अनैतिकतेच्या अंधारात होतो. आपल्यापैकी काही जण खोटे धार्मिक सण पाळत होते, तर इतर जण अनैतिक जीवन जगत होते. पण योग्य काय आणि अयोग्य काय याबद्दल असलेले यहोवाचे स्तर शिकून घेतल्यावर आपण स्वतःमध्ये बदल केले. तसंच, यहोवाच्या इच्छेप्रमाणे आपण जीवन जगू लागलो. आणि याचे आपल्याला बरेच फायदे झाले. (यश. ४८:१७) आज आपल्याला बऱ्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो. तरी ज्या अंधारातून आपण बाहेर आलोय तिथे आपण पुन्हा जात नाही, तर “प्रकाशाच्या मुलांप्रमाणे” आपण चालत राहतो. टेहळणी बुरूज२४.०३ २१ ¶६-७

शनिवार, २९ मार्च

आतापर्यंत आपण जी प्रगती केली आहे, त्याच मार्गाने आपण पुढेही नीट चालत राहू या.—फिलिप्पै. ३:१६.

तुम्हाला कदाचित असं वाटेल, की आपण समर्पण आणि बाप्तिस्म्यासाठी अजून तयार नाही. कदाचित यहोवाच्या स्तरांनुसार तुम्ही तुमच्या जीवनात अजून बदल केले नसतील किंवा तुमचा विश्‍वास अजून मजबूत करायची गरज असेल. (कलस्सै. २:६, ७) प्रत्येक विद्यार्थ्याला प्रगती करायला सारखाच वेळ लागतो असं नाही; तसंच, सगळीच मुलं एकाच वयात समर्पण आणि बाप्तिस्म्यासाठी तयार होतात असंही नाही. म्हणून तुम्हाला कुठे प्रगती करायची गरज आहे ते ओळखा आणि जितकं करता येईल तितकं करायचा प्रयत्न करा. आणि असं करत असताना दुसऱ्‍यांसोबत स्वतःची तुलना करू नका. (गलती. ६:४, ५) यहोवाला समर्पण करण्यासाठी आपण अजून तयार नाही असं जरी तुम्हाला वाटत असलं, तरी ही गोष्ट एक ध्येय म्हणून तुमच्या समोर नेहमी ठेवा. स्वतःमध्ये बदल करण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेता त्यावर यहोवाचा आशीर्वाद असावा म्हणून त्याला प्रार्थना करा. (फिलिप्पै. २:१३) तो तुमची प्रार्थना ऐकेल आणि त्याचं उत्तर देईल याची तुम्ही खातरी ठेवू शकता.—१ योहा. ५:१४. टेहळणी बुरूज२४.०३ ५ ¶९-१०

रविवार, ३० मार्च

पतींनो आपापल्या पत्नीसोबत विचारशीलपणे राहा.—१ पेत्र ३:७.

अब्राहाम नेहमी साराशी आदराने वागायचा. त्याने नेहमी तिचं म्हणणं ऐकून घेतलं आणि तिच्या भावनांची कदर केली. एकदा सारा खूप चिडली होती. आणि रागाच्या भरात तिने आपल्या सगळ्या भावना बोलून दाखवल्या. इतकंच नाही तर तिने अब्राहामलाच दोष दिला. सारा आपल्या अधीन आहे आणि ती आपल्याला नेहमी साथ देते हे अब्राहामला माहीत होतं. म्हणून त्याने तिचं शांतपणे ऐकून घेतलं आणि समस्येवर उपाय काढायचा प्रयत्न केला. (उत्प. १६:५, ६) यावरून आपण काय शिकू शकतो? पतींनो, तुमच्या कुटुंबासाठी निर्णय घ्यायचा अधिकार तुम्हाला देण्यात आलाय. (१ करिंथ. ११:३) पण तरीसुद्धा, एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी तुम्ही तुमच्या पत्नीचं लक्ष देऊन ऐकलं पाहिजे आणि तिचं मत जाणून घेतलं पाहिजे. खासकरून जेव्हा त्या निर्णयाचा तुमच्या पत्नीवर परिणाम होणार असतो तेव्हा. असं केल्यामुळे तुमचं तुमच्या पत्नीवर प्रेम आहे हे दिसून येईल. (१ करिंथ. १३:४, ५) आणखी एकदा अचानक आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करायचं अब्राहामने ठरवलं. त्याने साराला हातातलं काम बाजूला ठेवून भरपूर प्रमाणात पीठ मळून भाकरी बनवायला सांगितलं. (उत्प. १८:६) साराने लगेच अब्राहामने सांगितल्याप्रमाणे केलं. पत्नींनो तुम्हीसुद्धा सारासारखं आपल्या पतीच्या निर्णयांना पाठिंबा देऊ शकता. असं केल्यामुळे तुमचं नातं आणखी मजबूत होईल.—१ पेत्र ३:५, ६. टेहळणी बुरूज२३.०५ २४-२५ ¶१६-१७

सोमवार, ३१ मार्च

वरून येणारी बुद्धी आज्ञाधारक असते.—याको. ३:१७.

गिदोनला जेव्हा न्यायाधीश म्हणून नेमण्यात आलं तेव्हा आज्ञा पाळणं आणि धैर्य दाखवणं त्याच्यासाठी खूप कठीण होतं. आपल्याच वडिलांनी बांधलेल्या बआल दैवताच्या वेद्या पाडण्याची एक अवघड जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. (शास्ते ६:२५, २६) नंतर, जेव्हा त्याने सैन्य गोळा केलं तेव्हा यहोवाने दोनदा त्याला त्या सैनिकांची संख्या कमी करायला सांगितली. (शास्ते ७:२-७) आणि शेवटी अगदी मध्यरात्री त्याला शत्रूंच्या छावणीवर हल्ला करायला सांगण्यात आलं. (शास्ते ७:९-११) वडिलांनी नेहमी “आज्ञाधारक” असलं पाहिजे. आज्ञाधारक वडील नेहमी शास्त्रवचनातला सल्ला आणि यहोवाच्या संघटनेकडून मिळणारं मार्गदर्शन स्वीकारायला तयार असतात. अशा प्रकारे ते इतरांसमोर एक चांगलं उदाहरण मांडतात. पण तरी आज्ञाधारक राहणं काही वेळा त्यांना कठीण जाऊ शकतं. उदाहरणार्थ, काही सूचना दिल्या जातात किंवा त्या सूचनांमध्ये काही बदल केले जातात, तेव्हा त्याप्रमाणे चालणं त्यांना कठीण वाटू शकतं. काही वेळा तर संघटनेकडून मिळणारं मार्गदर्शन खरंच व्यावहारिक आणि समंजसपणाचं आहे का असंही त्यांना वाटू शकतं. किंवा मग त्यांना असं एखादं काम करण्यासाठी सांगितलं जाईल ज्यामुळे त्यांना अटक होऊ शकते. अशा परिस्थितींमध्ये मंडळीतले वडील गिदोनच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतात? त्यासाठी मिळणारं मार्गदर्शन लक्षपूर्वक ऐका आणि त्याप्रमाणे वागा. टेहळणी बुरूज२३.०६ ४-५ ¶९-११

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा