फेब्रुवारी
शनिवार, १ फेब्रुवारी
मी तुमचं ऐकेन.—यिर्म. २९:१२.
हिज्कीया राजा जेव्हा खूप आजारी होता, तेव्हा यहोवाने आपल्याला बरं करावं अशी त्याने कळकळून विनंती केली. आणि यहोवाने त्याची ही प्रार्थना ऐकली आणि त्याला बरं केलं. (२ राजे २०:१-६) पण दुसरीकडे पाहिलं तर प्रेषित पौलनेसुद्धा यहोवाला आपल्या ‘शरीरातला काटा’ काढून टाकण्याची विनंती केली. पण यहोवाने मात्र त्याची ही समस्या काढून टाकली नाही. (२ करिंथ. १२:७-९) तसंच, प्रेषित याकोब आणि प्रेषित पेत्र या दोघांनाही हेरोद राजाकडून मृत्यूचा धोका होता. याकोबला ठार मारण्यात येतं, पण पेत्रची मात्र चमत्कारिकपणे सुटका करण्यात येते. (प्रे. कार्यं १२:१-११) त्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं, की ‘यहोवाने पेत्रसोबत याकोबलाही का वाचवलं नाही?’ याबद्दल बायबल काहीच सांगत नाही. पण आपण एका गोष्टीची खातरी बाळगू शकतो, की यहोवा ‘कधीच कोणावर अन्याय करत नाही.’ (अनु. ३२:४) कधीकधी असं होऊ शकतं की आपण यहोवाकडे जे मागतो त्याचं उत्तर यहोवा आपण अपेक्षा केली नसेल अशा पद्धतीने देईल. पण यहोवा आपल्या प्रार्थनांचं नेहमी न्यायीपणे आणि प्रेमळपणे उत्तर देतो, या गोष्टीवर जर आपला भरवसा असेल, तर ‘यहोवाने आपल्या प्रार्थनेचं उत्तर अशा प्रकारे का दिलं?’ असा प्रश्न आपल्या मनात कधीच येणार नाही.—ईयो. ३३:१३. टेहळणी बुरूज२३.११ २१ ¶६
रविवार, २ फेब्रुवारी
वरून येणारी बुद्धी ही आज्ञाधारक असते.—याको. ३:१७.
याकोबने देवाच्या प्रेरणेने लिहिलं की बुद्धिमान व्यक्ती “आज्ञाधारक” राहायला तयार असते. याचा नेमका काय अर्थ होतो याचा विचार करा. यहोवाने ज्यांना काही प्रमाणात अधिकार दिलाय, त्यांच्या आज्ञेत राहायला आपण आनंदाने तयार असलं पाहिजे. पण जे यहोवाच्या नियमांच्या विरोधात वागतात, त्यांच्या आज्ञेत राहायची यहोवा आपल्याकडून अपेक्षा करत नाही. (प्रे. कार्यं ४:१८-२०) आपल्याला माणसांपेक्षा यहोवाच्या आज्ञेत राहणं सोपं वाटू शकतं. कारण शेवटी यहोवाचं मार्गदर्शन परिपूर्ण आणि योग्यच असतं. (स्तो. १९:७) पण माणसांच्या बाबतीत असं म्हणता येत नाही. तरीपण यहोवाने काही प्रमाणात आईवडिलांना, सरकारी अधिकाऱ्यांना आणि मंडळीतल्या वडिलांना अधिकार दिलाय. (नीति. ६:२०; १ थेस्सलनी. ५:१२; १ पेत्र २:१३, १४) त्यामुळे आपण जेव्हा त्यांच्या आज्ञेत राहतो, तेव्हा खरंतर आपण यहोवाच्याच आज्ञेत राहत असतो. टेहळणी बुरूज२३.१० ६ ¶२-३
सोमवार, ३ फेब्रुवारी
ही वचनं विश्वसनीय आणि खरी आहेत.—प्रकटी. २१:५.
आपला विश्वास वाढवण्याचा एक मार्ग म्हणजे, यहोवा किती शक्तिशाली आहे यावर खोलवर विचार करणं. दिलेलं प्रत्येक अभिवचन पूर्ण करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. तोच सर्वशक्तिमान देव आहे. (ईयो. ४२:२; मार्क १०:२७; इफिस. ३:२०) अब्राहाम आणि सारा वयोवृद्ध असताना यहोवाने त्यांना असं अभिवचन दिलं, की त्यांना मुलगा होईल. (उत्प. १७:१५-१७) त्याने अब्राहामला असंही अभिवचन दिलं होतं, की त्याच्या वंशजांना कनान देश वारसा म्हणून मिळेल. पण अब्राहामचे वंशज, म्हणजे इस्राएली लोक बऱ्याच काळापर्यंत इजिप्तमध्ये गुलामगिरीत होते. त्यामुळे यहोवाने दिलेलं अभिवचन कधीच पूर्ण होणार नाही असं अनेकांना वाटलं असेल. पण यहोवाने ते पूर्ण केलं. त्याने मरीयाला जेव्हा तिचं लग्नही झालं नव्हतं तेव्हा असं सांगितलं, की ती त्याच्या मुलाला जन्म देईल. आणि हेही पूर्ण झालं. खरंतर, या संततीच्या येण्याबद्दल यहोवाने हजारो वर्षांआधी एदेन बागेत अभिवचन दिलं होतं. (उत्प. ३:१५) यहोवाने कोणकोणती अभिवचनं दिली आणि ती कशी पूर्ण केली याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा यहोवा किती शक्तिशाली आहे ते आपल्याला समजतं, आणि त्यामुळे नवीन जगाच्या अभिवचनावरचा आपला विश्वास आणखी मजबूत होतो.—यहो. २३:१४; यश. ५५:१०, ११. टेहळणी बुरूज२३.०४ २८ ¶१०-१२
मंगळवार, ४ फेब्रुवारी
हे यहोवा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या मदतीच्या याचनेकडे लक्ष दे.—स्तो. १४३:१.
यहोवाने शत्रूंच्या हातून दावीदला वाचवलं आणि त्याच्या प्रार्थनांचं उत्तर दिलं. (१ शमु. १९:१०, १८-२०; २ शमु. ५:१७-२५) आपणही हीच खातरी बाळगू शकतो. (स्तो. १४५:१८) आपल्याला वाटतं त्याच मार्गाने कदाचित यहोवा उत्तर देणार नाही. आपल्या ‘शरीरातला काटा’ काढून टाकावा अशी पौलने देवाला विनंती केली. आपल्या या समस्येबद्दल त्याने तीन वेळा यहोवाला प्रार्थना केली. मग यहोवाने त्याच्या प्रार्थनांचं उत्तर दिलं का? हो, पण त्याने अपेक्षा केली होती त्या मार्गाने नाही. कारण, यहोवाने ती समस्या काढून टाकली नाही, तर त्याला विश्वासूपणे सेवा करत राहायची ताकद दिली. (२ करिंथ. १२:७-१०) आपल्या बाबतीतही असंच होऊ शकतं. आपण अपेक्षा केली नव्हती त्यापेक्षा वेगळ्या मार्गाने आपल्याला आपल्या प्रार्थनांचं उत्तर मिळू शकतं. पण एका गोष्टीची आपण खातरी बाळगू शकतो, ती म्हणजे आपल्याला योग्य ती मदत कशी पुरवायची हे यहोवाला अगदी चांगल्या प्रकारे माहीत आहे. तो तर “आपण मागितलेल्या किंवा कल्पना केलेल्या गोष्टींपेक्षाही कित्येक पटींनी जास्त प्रमाणात आपल्यासाठी करू शकतो.” (इफिस. ३:२०) आणि त्यामुळे आपण अपेक्षाही केली नव्हती त्या वेळी किंवा त्या मार्गाने आपल्याला आपल्या प्रार्थनांचं उत्तर मिळू शकतं. टेहळणी बुरूज२३.०५ ८-९ ¶४-६
बुधवार, ५ फेब्रुवारी
अशी वेळ येत आहे जेव्हा स्मारक कबरींमध्ये असलेले सगळे त्याची हाक ऐकतील आणि बाहेर येतील.—योहा. ५:२८, २९.
बायबलमध्ये दिलेल्या पुनरुत्थानाच्या अहवालांवर आपण सगळ्यांनीच वेळोवेळी मनन केलं पाहिजे. का बरं? कारण कधी कोणता जीवघेणा आजार आपल्याला होऊ शकतो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचा अचानक मृत्यू होऊ शकतो हे आपण सांगू शकत नाही. (उप. ९:११; याको. ४:१३, १४) आणि अशा वेळी पुनरुत्थानाची आशाच आपल्याला धीराने त्याचा सामना करायला मदत करू शकते. (१ थेस्सलनी. ४:१३) बायबल आपल्याला सांगतं, की यहोवा आपल्यावर खूप प्रेम करतो आणि आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखतो. (लूक १२:७) आणि यहोवा जेव्हा आपलं पुनरुत्थान करेल तेव्हा आपला स्वभाव आणि आपल्या सगळ्या आठवणी जशाच्या तशाच असतील. त्यामुळे विचार करा, यहोवा आपल्याला किती चांगल्या प्रकारे ओळखत असेल. शिवाय त्याचं आपल्यावर इतकं प्रेम आहे, की त्याने आपल्याला सर्वकाळ जगण्याची आशाही दिली आहे. आणि आता जरी आपला मृत्यू झाला तरी तो आपल्याला पुन्हा जिवंत करेल. आपण पुनरुत्थानाच्या आशेवर विश्वास का ठेवला पाहिजे? कारण आपल्याला हा भरवसा आहे की ज्याने हे अभिवचन दिलंय त्याच्यामध्ये ते पूर्ण करण्याची इच्छा आणि ताकदही आहे. टेहळणी बुरूज२३.०४ ८-९ ¶२-४
गुरुवार, ६ फेब्रुवारी
दरवर्षी, वल्हांडण सणासाठी यरुशलेमला जायची [योसेफ आणि मरीयाची] रीतच होती.—लूक २:४१.
योसेफ आणि मरीया यांनी फक्त वैयक्तिकच नाही तर सोबत मिळूनसुद्धा यहोवासोबतचं नातं मजबूत करण्यासाठी मेहनत घेतली. कुटुंब मिळून यहोवाची उपासना करणं किती महत्त्वाचं आहे हे त्यांना समजलं होतं. (लूक २:२२-२४; ४:१६) आजच्या विवाहित जोडप्यांसाठी हे किती सुंदर उदाहरण आहे! योसेफ आणि मरीयासारखं तुम्हालाही जर मुलं असतील तर सभांना जाण्यासाठी आणि कौटुंबिक उपासनेसाठी वेळ काढणं तुम्हालाही कठीण जात असेल. शिवाय, तुम्हा दोघांनाही प्रार्थनेसाठी आणि अभ्यासासाठी वेळ काढणं खूप कठीण जात असेल. पण नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही सोबत मिळून यहोवाची उपासना करता, तेव्हा तुम्ही त्याच्या आणि एकमेकांच्याही आणखी जवळ येत असता. म्हणून यहोवाच्या उपासनेला आपल्या जीवनात सगळ्यात पहिलं स्थान द्या. तुमच्या नात्यात तणाव निर्माण झाला असेल तर एकत्र येऊन कौटुंबिक उपासना करण्यासाठी कदाचित तुमचं मन तयार होत नसेल. तेव्हा छोट्या-छोट्या गोष्टींनी तुम्ही सुरवात करू शकता. त्यासाठी, दोघांनाही बोलायला आवडतील असे विषय तुम्ही निवडू शकता. असं केल्यामुळे तुमचं नातं आणखी मजबूत होईल. आणि एकत्र मिळून उपासनेशी संबंधीत कामं करायची तुमची इच्छा आणखी वाढेल. टेहळणी बुरूज२३.०५ २२ ¶७-८
शुक्रवार, ७ फेब्रुवारी
ओबद्या हा यहोवाला फार भिऊन वागायचा.—१ राजे १८:३.
देवाची भीती असल्यामुळेच ओबद्या खूप प्रामाणिक आणि भरवशालायक होता. आणि त्यामुळेच राजाने त्याला, राजमहालाची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी दिली होती. (नहेम्या ७:२ तुलना करा.) देवाची भीती असल्यामुळे त्याला असाधारण धैर्य दाखवता आलं. आणि या गुणाची त्याला खरंच गरज होती. कारण तो दुष्ट राजा अहाब याच्या काळात राहत होता. (१ राजे १६:३०) तसंच, बआल दैवताची उपासना करणारी अहाबची पत्नी ईजबेल हिला यहोवाबद्दल खूप तिटकारा होता. त्यामुळे तिने इस्राएलच्या दहा वंशांच्या राज्यातून यहोवाच्या सर्व उपासकांना मारून टाकायचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर तिने यहोवाच्या बऱ्याच संदेष्ट्यांना ठार मारलं. (१ राजे १८:४) ईजबेल राणी जेव्हा देवाच्या संदेष्ट्यांना मारून टाकण्यासाठी त्यांना शोधत होती, तेव्हा ओबद्याने ‘१०० संदेष्ट्यांना ५०-५० च्या गटांत गुहांमध्ये लपवलं आणि तो त्यांना अन्नपाणी पुरवत’ राहिला. (१ राजे १८:१३, १४) ही गोष्ट जर ईजबेल राणीला कळली असती तर तिने ओबद्याला मारून टाकलं असतं. ओबद्या नक्कीच घाबरला असेल, कारण तोही एक माणूसच होता. पण स्वतःच्या जिवापेक्षा ओबद्याचं यहोवावर आणि त्याच्या सेवकांवर जास्त प्रेम होतं. टेहळणी बुरूज२३.०६ १६ ¶९-१०
शनिवार, ८ फेब्रुवारी
मी यहोवा आहे. ज्या मार्गाने तू चाललं पाहिजेस, त्यावरून मी तुला नेतो.—यश. ४८:१७.
पूर्वीसारखंच यहोवा आजही त्याच्या लोकांचं मार्गदर्शन करतोय. यासाठी तो त्याच्या वचनाचा आणि मंडळीचं मस्तक असलेल्या त्याच्या मुलाचा वापर करतोय. यहोवा त्याच्या लोकांचं मार्गदर्शन करण्यासाठी आजही माणसांचा वापर करतोय, याचे काही पुरावे आपल्याकडे आहेत का? हो आहेत. १८७० नंतर कोणत्या घटना घडल्या याचा विचार करा. चार्ल्झ टेझ रस्सल आणि त्यांच्या सोबत्यांना समजलं की देवाच्या राज्यासाठी १९१४ हे वर्ष खूप महत्त्वाचं वर्ष असणार आहे. (दानी. ४:२५, २६) बायबलच्या भविष्यवाणीचा अभ्यास केल्यामुळे ते या निष्कर्षावर पोहोचले होते. मग यहोवा त्यांच्या संशोधनासाठी त्यांचं मार्गदर्शन करत होता का? हो नक्कीच. १९१४ मध्ये जगभरात ज्या घडामोडी घडल्या त्यांवरून हे स्पष्ट झालं की देवाच्या राज्याचं शासन सुरू झालंय. जसं की पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली. त्यानंतर एकापाठोपाठ एक रोगांच्या साथी, भूकंप आणि दुष्काळ यांसारख्या गोष्टी दिसू लागल्या. (लूक २१:१०, ११) यात काहीच शंका नाही की यहोवा या विश्वासू बायबल विद्यार्थ्यांचा वापर करून त्याच्या लोकांची मदत करत होता. टेहळणी बुरूज२४.०२ २२ ¶११
रविवार, ९ फेब्रुवारी
नीतिमान माणसावर बरेच कठीण प्रसंग येतात, पण त्या सर्वांतून यहोवा त्याला वाचवतो.—स्तो. ३४:१९.
यहोवाचे लोक असल्यामुळे आपल्याला माहीत आहे, की त्याचं आपल्यावर प्रेम आहे आणि आपण सगळ्यात चांगलं जीवन जगावं अशी त्याची इच्छा आहे. (रोम. ८:३५-३९) शिवाय, बायबलची तत्त्वं लागू केल्यामुळे आपल्याला फायदाच होतो हेही आपल्याला चांगलं माहीत आहे. (यश. ४८:१७, १८) पण आपण अपेक्षा केलेली नसते अशा समस्या आपल्यावर येतात, तेव्हा काय? उदाहरणार्थ, कुटुंबातली एखादी व्यक्ती आपलं मन दुखावू शकते. किंवा आपल्याला एखाद्या गंभीर आरोग्याच्या समस्येला तोंड द्यावं लागू शकतं. आणि त्यामुळे आपल्याला यहोवाची सेवा म्हणावी तशी करता येत नसेल. किंवा मग आपल्याला नैसर्गिक विपत्तीचा सामना करावा लागू शकतो आणि त्यामुळे आपलं बरंच नुकसान होऊ शकतं. किंवा आपल्या विश्वासामुळे आपला छळ होऊ शकतो. जेव्हा आपण अशा प्रकारच्या परिस्थितींचा सामना करतो तेव्हा आपल्याला कदाचित वाटेल, ‘हे सगळं माझ्यासोबतच का होतंय? मी काही चुकीचं तर केलं नाही ना? यहोवा माझ्यावर नाराज तर नाही ना?’ तुम्हालाही असं कधी वाटलंय का? जर वाटलं असेल तर निराश होऊ नका. यहोवाच्या बऱ्याच विश्वासू सेवकांना अशाच प्रकारच्या परिस्थितींमधून जावं लागलं आणि त्यांच्यासुद्धा अशाच भावना होत्या.—स्तो. २२:१, २; हब. १:२, ३. टेहळणी बुरूज२३.०४ १४ ¶१-२
सोमवार, १० फेब्रुवारी
मी तुझ्या कायद्यांचं नेहमी पालन करण्याचा निश्चय केलाय.—स्तो. ११९:११२.
एखादी चुकीची गोष्ट करायचा मोह आपल्याला होतो, तेव्हा तो विचार आपण लगेच आपल्या मनातून काढून टाकला पाहिजे. तसंच, यहोवाची आणि आपली मैत्री धोक्यात येईल अशी कोणतीही गोष्ट आपण करू नये. यहोवाची अशी इच्छा आहे, की आपण त्याच्या आज्ञांचं “मनापासून पालन” करावं. (रोम. ६:१७) त्याचं मार्गदर्शन नेहमी आपल्या भल्यासाठीच असतं. आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण त्याचे नियम कधीच बदलू शकत नाही. (यश. ४८:१७, १८; १ करिंथ. ६:९, १०) सैतान हिंसेचा आणि दबावाचा वापर करून आपला निश्चय कमकुवत करायचा प्रयत्न करतो. यहोवासोबत आपलं नातं तुटावं म्हणून तो जणू आपल्याला ‘गिळून’ टाकायचा प्रयत्न करतो. (१ पेत्र ५:८) पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनी यहोवाच्या बाजूने उभं राहण्याचा ठाम निश्चय केला तेव्हा त्यांना धमकावण्यात आलं, मारहाण करण्यात आली आणि काहींना तर ठारही मारण्यात आलं. (प्रे. कार्यं ५:२७, २८, ४०; ७:५४-६०) सैतान आजही त्याच प्रकारे देवाच्या लोकांचा छळ करत आहे. रशिया आणि इतर देशांमध्ये आपल्या भाऊबहिणींना जी क्रूर वागणूक देण्यात येत आहे, आणि इतर ठिकाणी विरोधक त्यांच्यावर जे हल्ले करत आहेत, त्यावरून हे स्पष्टपणे दिसून येतं. सैतान थेट हल्ल्यांसोबतच ‘डावपेचांचासुद्धा’ वापर करतो.—इफिस. ६:११. टेहळणी बुरूज२३.०७ १५-१६ ¶६-९
मंगळवार, ११ फेब्रुवारी
आपण सगळ्या गोष्टींत प्रेमापोटी वाढत जावं.—इफि. ४:१५.
तुम्ही यहोवाबद्दल जितकं जास्त शिकाल तितकं यहोवावरचं तुमचं प्रेम वाढत जाईल. हे प्रेम तुम्हाला शिकलेल्या गोष्टी लागू करायची प्रेरणा देतं. बायबल तत्त्वांच्या आधारावर तुम्ही चांगले निर्णय घेता. यहोवाला खूश करायची इच्छा असल्यामुळे तुम्ही तुमच्या वागण्या-बोलण्यातही सुधारणा करता. जसं एक लहान मूल आपल्या आईवडिलांचं अनुकरणं करतं, तसं तुम्ही तुमच्या स्वर्गातल्या पित्याचं अनुकरण करत राहा. (इफिस. ५:१, २) स्वतःचं परीक्षण करत असताना कदाचित आपण विचार करू: ‘बाप्तिस्म्याच्या वेळी माझं यहोवावर जितकं प्रेम होतं, त्यापेक्षा आज त्याच्यावर माझं जास्त प्रेम आहे का? बाप्तिस्म्यानंतर मी जास्तीत जास्त यहोवासारखा विचार करायला आणि त्याच्यासारखं वागायला शिकलोय का? खासकरून भाऊबहिणींवर प्रेम करण्याच्या बाबतीत?’ तुमचं “सुरुवातीचं प्रेम आता आटलं आहे,” असं जर तुम्हाला वाटत असेल, तर निराश होऊ नका. पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांच्या बाबतीतही असंच झालं होतं. पण तरीसुद्धा येशूने त्यांना नाकारलं नाही आणि आज तो आपल्यालाही नाकारणार नाही. (प्रकटी. २:४, ७) सुरुवातीला सत्य शिकल्यावर तुमच्या मनात यहोवाबद्दल जितकं प्रेम होतं तितकंच प्रेम तुम्ही आजसुद्धा तुमच्या मनात पुन्हा उत्पन्न करू शकता, हे त्याला माहीत आहे. टेहळणी बुरूज२३.०७ ८ ¶२-३
बुधवार, १२ फेब्रुवारी
हे यहोवा, तू चांगला आणि क्षमाशील आहेस.—स्तो. ८६:५.
प्रेषित पेत्रने एकापाठोपाठ एक बऱ्याच चुका केल्या. सुरुवातीला, त्याने फाजील आत्मविश्वास दाखवला आणि सगळे प्रेषित येशूला सोडून गेले तरी तो त्याला विश्वासू राहील अशी स्वतःबद्दल बढाईसुद्धा मारली. (मार्क १४:२७-२९) नंतर, येशूने जागं राहायची आज्ञा देऊनसुद्धा तो पुन्हा-पुन्हा झोपी गेला. (मार्क १४:३२, ३७-४१) नंतर एक मोठा जमाव येशूला पकडून न्यायला आला तेव्हा पेत्र तिथून पळून गेला. (मार्क १४:५०) शेवटी, पेत्रने एक खूप मोठं पाप केलं. त्याने येशूला तीन वेळा नाकारलं. इतकंच काय तर आपण त्याला ओळखत नाही अशी खोटी शपथसुद्धा घेतली. (मार्क १४:६६-७१) नंतर जेव्हा पेत्रला कळलं, की आपण किती गंभीर पाप केलंय तेव्हा त्याने काय केलं? तो ढसाढसा रडला! (मार्क १४:७२) पेत्रच्या चुका दाखवत बसण्याऐवजी येशूने आपल्या मित्राला सांगितलं, की त्याला नंतर मोठमोठ्या जबाबदाऱ्या मिळणार आहेत. (योहा. २१:१५-१७) पेत्रला माहीत होतं की त्याच्या हातून एक गंभीर पाप झालंय, पण तरी त्याने हार मानली नाही. कारण त्याला या गोष्टीची पक्की खातरी होती, की येशूने त्याच्याबद्दल आशा सोडलेली नाही. यातून आपण काय शिकतो? हेच की, यहोवा आपल्यावर प्रेम करतो आणि तो आपल्याला क्षमा करायला तयार आहे याची खातरी आपल्याला असावी असं त्याला वाटतं.—रोम. ८:३८, ३९. टेहळणी बुरूज२४.०३ १८-१९ ¶१३-१५
गुरुवार, १३ फेब्रुवारी
तिने असंख्य माणसांचा जीव घेतलाय.—नीति. ७:२६.
लैंगिक अनैतिकतेमुळे आपल्याला स्वतःचीच लाज वाटते आणि आपण आपल्याच नजरेत पडतो. शिवाय, यामुळे नको असलेली गर्भधारणा आणि कुटुंब विस्कळीत होणं यांसारख्या समस्यांनाही तोंड द्यावं लागतं. त्यामुळे स्पष्टच आहे की मूर्ख स्त्रीचं आमंत्रण न स्वीकारणं आणि तिच्या “घरी” न जाणं यातच शहाणपण आहे. अशा प्रकारची कामं करणाऱ्या लोकांचं यहोवासोबत असलेलं नातं तर तुटतंच, पण वेगवेगळ्या रोगांची लागण झाल्यामुळे त्यांचा अकाली मृत्यूसुद्धा होतो. (नीति. ७:२३) नीतिवचनांच्या ९ व्या अध्यायाच्या १८ व्या वचनात शेवटी असं म्हटलंय: “तिच्या घरी जाणारे कबरेच्या खोल ठिकाणांत जातात.” पण इतके वाईट परिणाम असतानाही बरेच लोक या स्त्रीच्या आमंत्रणाला बळी का पडतात? (नीति. ९:१३-१८) याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे पोर्नोग्राफी. काहींना वाटतं, की पोर्नोग्राफी पाहण्यात काहीच धोका नाही. पण याच्या अगदी उलट पोर्नोग्राफीमुळे खूप नुकसान होतं. स्वतःच्याच नजरेत आपली किंमत घसरते, आपण दुसऱ्यांनाही वाईट नजरेने पाहू लागतो आणि पोर्नोग्राफी पाहण्याची सवय लागते. अनैतिक दृश्यं मनात कायमचं घर करतात. आणि त्यांना पूर्णपणे मनातून काढून टाकणं खूप कठीण असतं. शिवाय, पोर्नोग्राफीमुळे वाईट इच्छा मारल्या जात नाहीत तर त्या आणखी प्रबळ होतात. (कलस्सै. ३:५; याको. १:१४, १५) पोर्नोग्राफी पाहणारे बरेच लोक पुढे अनैतिक काम करून बसतात. टेहळणी बुरूज२३.०६ २३ ¶१०-११
शुक्रवार, १४ फेब्रुवारी
ते या सगळ्या राज्यांचा चुराडा करून त्यांचा नाश करेल, आणि फक्त तेच कायम टिकेल.—दानी. २:४४.
हे खरं आहे, की अँग्लो-अमेरिकन महासत्तेला इतर देश आव्हान देत आहेत. पण तरी ते तिची जागा घेऊ शकणार नाहीत. कारण आपल्याला माहीत आहे, की नबुखद्नेस्सरने स्वप्नात पाहिलेला, देवाच्या राज्याला सूचित करणारा “दगड,” अँग्लो-अमेरिकन महासत्तेला सूचित करणाऱ्या त्या पुतळ्याच्या पावलांवर येऊन आदळेल आणि त्यांचा चुराडा करेल. (दानी. २:३४, ३५, ४४, ४५) लोखंड आणि मातीची पावलं यांबद्दलची दानीएलची भविष्यवाणी खरी आहे, याची तुम्हाला खातरी आहे का? जर असेल तर ते तुमच्या जीवन जगण्याच्या पद्धतीवरून दिसून येईल. या जगाचा एका अर्थाने लवकरच चुराडा होऊन नाश होणार आहे. अशा जगात संपत्ती कमवून आपण सुरक्षा शोधण्याचा प्रयत्न करणार नाही. (लूक १२:१६-२१; १ योहा. २:१५-१७) ही भविष्यवाणी समजून घेतल्यामुळे प्रचाराचं आणि शिष्य बनवण्याचं काम किती महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला कळेल. (मत्त. ६:३३; २८:१८-२०) या भविष्यवाणीचा अभ्यास केल्यावर तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारू शकता, ‘देवाचं राज्य लवकरच सर्व मानवी सरकारांचा नाश करणार आहे याची मला खातरी आहे, हे माझ्या निर्णयांवरून दिसून येतं का?’ टेहळणी बुरूज२३.०८ ११ ¶१३-१४
शनिवार, १५ फेब्रुवारी
आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतःबद्दल देवाला हिशोब देईल.—रोम. १४:१२.
नम्रपणे ही गोष्ट स्वीकारा की तुमचं वय, आरोग्य आणि परिस्थितीमुळे तुम्हाला म्हणावं तितकं करता येणार नाही. म्हणून आरोग्याच्या समस्यांमुळे एखादी नेमणूक पूर्ण करायला तुम्हाला जमत नाही तेव्हा बर्जिल्ल्यसारखं त्या नेमणुकीला ‘नाही’ म्हणायला तयार असा. (२ शमु. १९:३५, ३६) तसंच, मोशेसारखं मदत स्वीकारायला तयार असा आणि योग्य असेल तेव्हा इतरांवर जबाबदारी सोपवा. (निर्ग. १८:२१, २२) अशा प्रकारे, नम्र राहिल्यामुळे तुम्ही स्वतःकडून अवाजवी अपेक्षा करणार नाही. इतरांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांसाठी आपण स्वतःला दोष देऊ नये. आपण इतरांसाठी निर्णय घेऊ शकत नाही. तसंच इतरांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे त्यांना जे वाईट परिणाम भोगावे लागतात, त्यांपासून आपण त्यांना वाचवू शकत नाही. उदाहरणार्थ, आपल्या मुलाने किंवा मुलीने यहोवाची सेवा करायचं सोडून दिल्यामुळे पालकांना खूप दुःख होऊ शकतं; हे दुःख कदाचित त्यांना शब्दांतही व्यक्त करता येणार नाही. पण त्यांच्या मुलांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांसाठी ते स्वतःलाच दोष देत राहिले तर हे त्यांच्यासाठी खूप मोठं ओझं ठरू शकतं. पण त्यांनी अशा प्रकारचं ओझं वाहावं, अशी यहोवाची मुळीच इच्छा नाही. टेहळणी बुरूज२३.०८ २९ ¶११-१२
रविवार, १६ फेब्रुवारी
शमशोन, दलीला नावाच्या एका स्त्रीच्या प्रेमात पडला.—शास्ते १६:४.
शमशोन हा आपल्यासारखाच अपरिपूर्ण होता. त्यामुळे काही वेळा त्याने चुकीचे निर्णय घेतले. जसं की, त्याने एक असा निर्णय घेतला ज्याचे त्याला खूप वाईट परिणाम भोगावे लागले. तो शास्ता म्हणून काम करू लागला याच्या काही काळानंतर तो “दलीला नावाच्या एका स्त्रीच्या प्रेमात पडला; ती सोरेक खोऱ्यात राहायची.” आधी शमशोनला एका पलिष्टी स्त्रीशी लग्न करायचं होतं. पण ‘हे सगळं यहोवाने घडवून’ आणलं होतं, कारण यहोवा “पलिष्टी लोकांविरुद्ध लढण्याची संधी पाहत होता.” नंतर शमशोन गाझा या पलिष्टी शहरात एका वैश्येच्या घरी राहिला. आणि त्या वेळी यहोवा देवाने शमशोनला शहराचे दरवाजे उचलून न्यायची शक्ती दिली. त्यामुळे शहराची सुरक्षा धोक्यात आली. (शास्ते १४:१-४; १६:१-३) पण जेव्हा तो दलीलाच्या प्रेमात पडला तेव्हा गोष्ट वेगळी होती. ती कदाचित एक इस्राएली स्त्री असावी. त्यामुळे तिच्यासोबत असलेल्या त्याच्या संबंधामुळे त्याला पलिष्टी लोकांविरुद्ध लढायची संधी मिळणार नव्हती. शमशोनला फसवण्यासाठी दलीलाने पलिष्टी लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले. टेहळणी बुरूज२३.०९ ५ ¶१२-१३
सोमवार, १७ फेब्रुवारी
सखोल समज माणसाचा राग शांत करते.—नीति. १९:११.
सखोल समज आपल्याला सौम्यतेने वागायला मदत करू शकते. सखोल समज असणाऱ्या व्यक्तीला जेव्हा तिच्या विश्वासाबद्दल प्रश्न विचारला जातो किंवा तिची टीका केली जाते, तेव्हा ती शांत राहते. काही प्रश्न हे समुद्रात असणाऱ्या हिमनगासारखे (बर्फाच्या पर्वतांसारखे) असतात. त्यांचा अतिशय थोडा भाग पाण्यावर दिसत असला, तरी बराचसा भाग हा पाण्याखाली असतो. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती जेव्हा प्रश्न विचारते, तेव्हा त्यामागचा खरा हेतू कदाचित आपल्याला लगेच समजणार नाही. म्हणून अशा प्रश्नांची उत्तरं देण्याआधी आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, त्या व्यक्तीचा प्रश्न विचारण्यामागचा नेमका हेतू काय आहे, हे कदाचित आपल्याला लगेच समजणार नाही. (नीति. १६:२३) एफ्राईमच्या माणसांसोबत बोलत असताना गिदोनने त्यांना कसं उत्तर दिलं त्याचा विचार करा. इस्राएलच्या शत्रूंसोबत लढण्यासाठी त्यांना आधीच का बोलवण्यात आलं नाही, याचा त्यांना खूप राग आला होता. पण त्यांना राग येण्यामागचं नेमकं कारण काय होतं? त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला असेल का? कदाचित. पण गिदोनने त्यांच्या भावनांचा आदर केला आणि त्यांना सौम्यतेने उत्तर दिलं. याचा काय परिणाम झाला? बायबलमध्ये म्हटलंय, की “त्यांचा राग शांत झाला.”—शास्ते ८:१-३. टेहळणी बुरूज२३.०९ १६ ¶८-९
मंगळवार, १८ फेब्रुवारी
दिवसेंदिवस मी त्याला खूप प्रिय वाटू लागले.—नीति. ८:३०.
वडिलांचं आणि मुलाचं जसं खूप जवळचं नातं असतं, तसंच यहोवा आणि येशूचं आहे. त्याच्या मुलाला दिली गेलेली वाईट वागणूक, अपमान आणि त्याचा छळ पाहून नक्कीच यहोवाला खूप वेदना झाल्या असतील. ज्या आईवडिलांनी आपल्या मुलाला मृत्यूमध्ये गमावलंय, त्यांना आपल्या मुलाला गमवायचं दुःख काय असतं ते चांगलं माहीत आहे. तसं पाहायला गेलं तर पुनरुत्थानावर आपला ठाम विश्वास आहे. पण तरीसुद्धा आपल्या प्रिय व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो, तेव्हा आपल्याला होणारं दुःख आणि वेदना कमी होत नाहीत. यावरून आपण समजू शकतो, की इ.स. ३३ च्या निसान १४ तारखेला जेव्हा यहोवाने आपल्या प्रिय मुलाला वेदना सहन करत मरताना पाहिलं असेल तेव्हा त्याला किती दुःख झालं असेल! (मत्त. ३:१७) स्मारकविधी येईपर्यंत व्यक्तिगत अभ्यासासाठी किंवा कौटुंबिक उपासनेसाठी तुम्ही ‘खंडणी बलिदान’ या विषयावर असणारा एखादा उपक्रम हाती घेऊ शकता का? आणि स्मारकविधीच्या दिवशी सकाळच्या उपासनेचा जो खास कार्यक्रम तयार करण्यात आलेला असतो, तोसुद्धा तुम्ही न विसरता पाहू शकता. अशा प्रकारे जेव्हा स्मारकविधीसाठी तुम्ही स्वतःचं मन तयार कराल, तेव्हा तुम्हाला तर फायदा होईलच पण इतरांनाही त्याचा फायदा व्हावा म्हणून तुम्हाला त्यांना मदत करता येईल.—एज्रा ७:१०. टेहळणी बुरूज२४.०१ ११ ¶१०-१२
बुधवार, १९ फेब्रुवारी
तो तुम्हाला बळ देईल.—१ पेत्र ५:१०.
यहोवाकडून बळ मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे त्याला प्रार्थना करणं. आपण प्रार्थना केल्यानंतर यहोवा आपल्याला “असाधारण सामर्थ्य” देतो. (२ करिंथ. ४:७) तसंच आपण जेव्हा बायबल वाचतो आणि त्यावर मनन करतो, तेव्हासुद्धा आपल्याला बळ मिळू शकतं. (स्तो. ८६:११) कारण यहोवाचं वचन “प्रभावशाली” आहे. (इब्री ४:१२) आपण जर यहोवाला प्रार्थना केली आणि बायबल वाचलं, तर धीर धरण्यासाठी, आपला आनंद टिकवून ठेवण्यासाठी किंवा एखादी कठीण नेमणूक पूर्ण करण्यासाठी तो आपल्याला बळ देईल. त्याने योना संदेष्ट्याला कसं बळ दिलं याकडे लक्ष द्या. यहोवाने योनाला एक कठीण काम दिलं होतं. पण हे काम न करता तो उलट दिशेला पळून गेला. याचा परिणाम असा झाला की तो एका भयंकर वादळात सापडला. आणि यामुळे त्याचा आणि जहाजात त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्यांचा जीवसुद्धा जाणार होता. म्हणून त्याच्या सांगण्यावरून लोकांनी त्याला समुद्रात फेकून दिलं. पण त्या खोल समुद्रात एका मोठ्या माशाने त्याला गिळून टाकलं. त्या माशाच्या पोटात, अंधाऱ्या ठिकाणी बळ मिळवण्यासाठी योनाने काय केलं? एक गोष्ट म्हणजे, त्याने यहोवाला प्रार्थना केली.—योना २:१, २, ७. टेहळणी बुरूज२३.१० १३ ¶४-६
गुरुवार, २० फेब्रुवारी
सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे.—१ पेत्र ४:७.
पेत्रने आपली पत्रं पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांसाठी जरी लिहिली असली, तरी यहोवाने त्या पत्रांचा समावेश त्याच्या वचनात केलाय. त्यामुळे आज आपल्यालाही या पत्रांमुळे फायदा होऊ शकतो. (रोम. १५:४) आपण सध्या अशा लोकांमध्ये राहत आहोत ज्यांचा बायबलच्या भविष्यवाण्यांवर बिलकूल विश्वास नाही. आपला विरोध करणारे लोक आपली चेष्टा करतात, कारण या जगाचा अंत खूप जवळ आहे असं बऱ्याच वर्षांपासून आपण सांगत आलो आहोत. टीका करणारे काही लोक तर असंही म्हणतात, की अंत कधीच येणार नाही. (२ पेत्र ३:३, ४) प्रचारकार्यात, कामावरच्या ठिकाणी आणि कुटुंबातल्या सदस्यांकडूनही आपल्याला जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी ऐकायला मिळतात, तेव्हा कदाचित आपला विश्वास डळमळू शकतो. पण अशा परिस्थितीत कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होईल हे पेत्र आपल्याला सांगतो. काही लोकांना तर असंही वाटेल, की या दुष्ट जगाचा नाश करण्यासाठी यहोवा खूपच वेळ लावत आहे. पण पेत्रच्या शब्दांमुळे आपल्याला या बाबतीत योग्य दृष्टिकोन बाळगायला मदत होते. त्यातून आपल्याला कळतं, की वेळेकडे पाहण्याचा यहोवाचा दृष्टिकोन आणि मानवांचा दृष्टिकोन यात खूप मोठा फरक आहे. (२ पेत्र ३:८, ९) यहोवासाठी एक हजार वर्षं ही एका दिवसासारखी आहेत. तसंच यहोवा नेहमी धीराने काम करतो. कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. पण जेव्हा त्याचा दिवस येईल तेव्हा मात्र तो या दुष्ट जगाचा नक्की नाश करेल. टेहळणी बुरूज२३.०९ २६-२७ ¶२-५
शुक्रवार, २१ फेब्रुवारी
ऐकलेल्या गोष्टींकडे आपण नेहमीपेक्षा जास्त लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे आपण कधीही वाहवत जाणार नाही.—इब्री २:१.
यहूदीयामधल्या इब्री ख्रिश्चनांना प्रेषित पौलने पत्र का लिहिलं असावं? कदाचित याची दोन मुख्य कारणं असतील. पहिलं, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी. कारण त्यांच्यापैकी बरेच जण आधी यहुदी धर्मातले होते. आणि आता ख्रिश्चन बनल्यानंतर यहुदी धार्मिक पुढाऱ्यांनी त्यांची थट्टा केली असेल. का? कारण ख्रिश्चनांकडे त्या वेळी उपासनेसाठी मंदिर नव्हतं, देवाला बलिदानं देण्यासाठी वेदी नव्हती आणि त्यांच्या वतीने त्या वेदीवर देवाला अर्पणं देण्यासाठी याजकही नव्हते. यामुळे कदाचित हे शिष्य निराश झाले असतील आणि त्यांचा विश्वासही कमजोर झाला असेल. (इब्री ३:१२, १४) इतकंच काय, तर त्यांच्यापैकी काही जणांना पुन्हा यहुदी धर्मात जायची इच्छा झाली असेल. हे पत्र लिहिण्याचं दुसरं कारण म्हणजे, प्रेषित पौलने दाखवून दिल्याप्रमाणे इब्री ख्रिश्चन देवाच्या वचनात दिलेलं ‘जड अन्न’ म्हणजेच, नवीन किंवा गहन आध्यात्मिक शिकवणी समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हते. (इब्री ५:११-१४) त्यामुळे त्यांच्यापैकी काही जण मोशेचं नियमशास्त्र अजूनही मानत होते. टेहळणी बुरूज२३.१० २४-२५ ¶३-४
शनिवार, २२ फेब्रुवारी
तरुण स्त्रियांशी अगदी शुद्ध मनाने आपल्या बहिणी समजून [वागा.]—१ तीम. ५:२.
काही बहिणी अविवाहित राहायचा निर्णय घेतात. (मत्त. १९:१०-१२) पण याची खातरी असू द्या की यामुळे यहोवा आणि येशू तुम्हाला कमी समजत नाहीत. संपूर्ण जगभरात अविवाहित बहिणी मंडळ्यांसाठी एक आशीर्वादच आहेत. इतर भाऊबहिणींवर असलेल्या प्रेमामुळे आणि त्यांच्याबद्दल असलेल्या काळजीमुळेच त्या बऱ्याच जणांसाठी आध्यात्मिक अर्थाने आई आणि बहिणींसारख्या ठरल्या आहेत. (मार्क १०:२९, ३०) काही जणी पूर्णवेळच्या सेवक बनल्या आहेत. जगभरात चाललेल्या प्रचारकार्यात ख्रिस्ती बहिणींचा खूप मोठा वाटा आहे. (स्तो. ६८:११) तुम्हीसुद्धा पूर्णवेळच्या सेवेत जायचा विचार करू शकता का? तुम्ही कदाचित एक पायनियर म्हणून, बांधकाम प्रकल्पात स्वयंसेवक म्हणून किंवा बेथेलमध्ये सेवा करायचं ध्येय ठेवू शकता. त्यासाठी प्रार्थना करा. आणि ज्यांनी अशी ध्येयं गाठली आहेत त्यांच्याशी बोला, तसंच तुम्हाला त्यासाठी काय करता येईल, हे त्यांना विचारा. आणि मग चांगली योजना करा म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला काम करता येईल. पूर्णवेळच्या सेवेत जायचं तुमचं ध्येय गाठल्यामुळे यहोवाची सेवा करायचे बरेच चांगले मार्ग तुमच्यासाठी मोकळे होतील. टेहळणी बुरूज२३.१२ २२ ¶१६-१७
रविवार, २३ फेब्रुवारी
आधी राज्याबद्दलच्या आनंदाच्या संदेशाची घोषणा होणं गरजेचं आहे.—मार्क १३:१०.
मोठं संकट खूप जवळ आहे. त्यामुळे प्रचार करण्याची जी आज्ञा आपल्याला दिली आहे, तिचं पालन करणं किती गरजेचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण आर्थिक समस्यांमुळे किंवा प्रचारकार्यात छळाचा सामना करावा लागत असल्यामुळे आपल्याला सेवाकार्यावर लक्ष द्यायला कठीण जाऊ शकतं. पण देवाच्या राज्याला महत्त्व देण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होऊ शकते? “सैन्यांचा देव यहोवा” आपल्या बाजूने आहे याची खातरी आपण ठेवू शकतो. जर आपण स्वतःच्या इच्छांना नाही तर देवाच्या राज्याला पहिलं स्थान दिलं, तर तो आपल्याला नक्की मदत करेल. म्हणून आपल्याला घाबरण्याची गरज नाही. (हाग्ग. २:४) आपण शिष्य बनवण्याचं जे जीवन वाचवणारं काम आहे, त्यावर लक्ष लावावं अशी यहोवाची इच्छा आहे. हाग्गयने यहोवाच्या लोकांना असं प्रोत्साहन दिलं होतं, की ते जणू मंदिराचा पाया पुन्हा एकदा घालत आहेत अशा प्रकारे त्यांनी त्यांची पवित्र सेवा नव्याने सुरू करावी. जर त्यांनी तसं केलं, तर यहोवा त्यांना नक्कीच आशीर्वाद देणार होता. (हाग्ग. २:१८, १९) त्याचप्रमाणे आपणसुद्धा यहोवाने दिलेल्या कामाला जास्त महत्त्व दिलं, तर यहोवा आपल्या प्रयत्नांवर नक्की आशीर्वाद देईल याची खातरी आपण ठेवू शकतो. टेहळणी बुरूज२३.११ १६ ¶८; १७ ¶११
सोमवार, २४ फेब्रुवारी
सगळ्यांनीच पाप केलं आहे.—रोम. ३:२३.
रोमकरांना लिहिलेल्या पत्रात, पौलने म्हटलं की आपण सगळेच पापी आहोत. मग एक व्यक्ती देवाला खूश कशी काय करू शकते आणि देवाच्या नजरेत निर्दोष किंवा नीतिमान कशी ठरू शकते? हे आपल्याला समजून घेता यावं म्हणून पौलने अब्राहामचं उदाहरण दिलं. अब्राहाम कनानच्या प्रदेशात राहत असताना यहोवाने त्याला नीतिमान म्हटलं. पण यहोवा अब्राहामला नीतिमान का म्हणू शकला? त्याने मोशेच्या नियमशास्त्राचं तंतोतंत पालन केलं होतं म्हणून? नक्कीच नाही. (रोम. ४:१३) कारण देवाने अब्राहामला नीतिमान म्हटल्याच्या ४०० पेक्षा जास्त वर्षांनंतर यहोवाने हे नियमशास्त्र इस्राएल राष्ट्राला दिलं होतं. मग देवाने अब्राहामला कोणत्या आधारावर नीतिमान म्हटलं? यहोवाने अब्राहामला अपार कृपा दाखवून त्याच्या विश्वासामुळे त्याला नीतिमान म्हटलं.—रोम. ४:२-४. टेहळणी बुरूज२३.१२ ३ ¶४-५
मंगळवार, २५ फेब्रुवारी
तुझ्या मनात आहे तसं कर.—१ इति. १७:२.
नाथान संदेष्टा दावीद राजाला हे शब्द बोलला “त्याच रात्री” यहोवाने नाथानला सांगितलं की दावीद मंदिर बांधणार नाही. (१ इति. १७:३, ४, ११, १२) दावीदने हे ऐकलं तेव्हा त्याने काय केलं? त्याने आपला मुलगा शलमोन याला मंदिर बांधण्यासाठी जे साहित्य आणि पैसे लागणार होते ते जमा करायला सुरवात केली. (१ इति. २९:१-५) दावीदला मंदिर बांधता येणार नाही हे सांगितल्यानंतर लगेचच यहोवाने त्याच्यासोबत एक करार केला. यहोवाने दावीदला वचन दिलं, की त्याच्या वंशातून असा एक जण येईल जो कायम राज्य करेल. (२ शमु. ७:१६) नवीन जगात हजार वर्षांच्या राज्यादरम्यान जेव्हा दावीदला उठवलं जाईल आणि त्याला कळेल की येशू आपल्याच वंशातला होता, तेव्हा त्याला किती आनंद होईल! या अहवालातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते. ती म्हणजे, यहोवाच्या सेवेत आपल्याला जे काही करायची इच्छा आहे ते सगळं जरी आपल्याला करता येत नसलं, तरी आपल्याला निराश व्हायची गरज नाही. कारण आपण कल्पनाही केली नसेल, असे आशीर्वाद कदाचित यहोवा आपल्याला देईल. टेहळणी बुरूज२३.०४ १६ ¶८-१०
बुधवार, २६ फेब्रुवारी
यहोवा आपल्या लोकांना सोडून देणार नाही.—स्तो. ९४:१४.
जेव्हा तुम्हाला खूप भीती वाटत असते, तेव्हा बायबलमध्ये वाचलेला एखादा विशिष्ट भाग तुम्हाला खासकरून खूप सांत्वनदायक वाटेल. जसं की, बायबलमधल्या ईयोब, स्तोत्रं आणि नीतिवचनं या पुस्तकांमधला एखादा भाग किंवा मत्तय ६ व्या अध्यायातले येशूचे शब्द खूप प्रोत्साहनदायक वाटतील. खरंच यहोवाला प्रार्थना करून आणि त्याचं वचन वाचून तुम्हाला त्याचं सांत्वन अनुभवता येईल. आपल्याही आयुष्यात कधीकधी खूप वाईट परिस्थिती येऊ शकते. पण तेव्हा आपण नक्कीच एकटं नसू. उलट, यहोवा आपल्यासोबत कायम असेल असा भरवसा आपण ठेवू शकतो. (स्तो. २३:४) कारण यहोवा आपल्याला संरक्षण द्यायचं, आपलं मन शांत आणि स्थिर ठेवायचं, आपल्याला आधार द्यायचं आणि आपलं सांत्वन करायचं वचन देतो. यशया २६:३ मध्ये यहोवाबद्दल म्हटलंय: “तुझ्यावर पूर्णपणे विसंबून राहणाऱ्यांचं तू रक्षण करशील. तू त्यांना कायम टिकणारी शांती देशील. कारण त्यांनी तुझ्यावर आपला भरवसा ठेवलाय.” म्हणून यहोवावर भरवसा ठेवा आणि तो तुम्हाला मदत करण्यासाठी ज्या गोष्टींचा वापर करतोय त्यांचा फायदा करून घ्या. तुम्ही जर असं केलं तर कठीण परिस्थितीतही तुम्हाला नव्याने शक्ती मिळेल! टेहळणी बुरूज२४.०१ २५ ¶१६-१७
गुरुवार, २७ फेब्रुवारी
तुझ्यावर चालवायला बनवलेलं कोणतंही हत्यार तुझ्यावर चालणार नाही.—यश. ५४:१७.
देवाच्या प्रेरणेने लिहिलेले हे शब्द आज पूर्ण होत आहेत. तसंच पुढे दिलेले शब्दसुद्धा आपल्या काळात पूर्ण होत आहेत: “तुझी सर्व मुलं यहोवाने शिकवलेली असतील, आणि तुझ्या मुलांना भरपूर शांती मिळेल. नीतिमत्त्वाच्या मजबूत पायावर तुझी स्थापना होईल. . . . तुला कसलीच भीती वाटणार नाही आणि कोणीही तुला घाबरवणार नाही, कारण भीती तुझ्या जवळपासही फिरकणार नाही.” (यश. ५४:१३, १४) इतकंच नाही तर ‘या जगाच्या व्यवस्थेचा देवही’ म्हणजे स्वतः सैतानही यहोवाचे लोक आज चालवत असलेलं शैक्षणिक काम थांबवू शकत नाही. (२ करिंथ. ४:४) शुद्ध उपासना पुन्हा सुरू झाली आहे आणि ती पुन्हा कधीही भ्रष्ट होणार नाही. ती कायम अशीच चालू राहील. खरंच, आपल्यावर चालवायला बनवलेलं कोणतंही हत्यार आपल्यावर चालणार नाही! टेहळणी बुरूज२४.०२ ४ ¶१०
शुक्रवार, २८ फेब्रुवारी
ज्याचं माझ्यापेक्षा आपल्या वडिलांवर किंवा आईवर जास्त प्रेम आहे, तो माझा शिष्य व्हायला योग्य नाही.—मत्त. १०:३७.
ख्रिस्ती या नात्याने आपण आपलं समर्पणाचं वचन खूप गंभीरतेने घेतो. आणि याचा परिणाम आपण कुटुंबासाठी जे काही करतो आणि जे निर्णय घेतो त्यावर होतो. शास्त्रवचनांमध्ये कुटुंबासाठी ज्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्या आपण प्रामाणिकपणे पार पाडतो. पण यहोवा आपल्याकडून ज्या गोष्टींची अपेक्षा करतो त्याऐवजी आपण कुटुंबातल्या सदस्यांच्या इच्छांना कधीच जास्त महत्त्व देणार नाही. (मत्त. १०:३५, ३६; १ तीम. ५:८) यामुळे कधीकधी आपल्या घरचे लोक आपल्यावर नाराज होतील. पण तरीसुद्धा आपण यहोवाचं मन आनंदित करायचा प्रयत्न करतो. यहोवाने कुटुंबाची व्यवस्था केली आहे आणि त्याची इच्छा आहे की कुटुंबांनी आनंदी असावं. (इफिस. ३:१४, १५) जर आपल्याला खरोखर आनंदी राहायचं असेल तर आपण यहोवाच्या पद्धतीने काम केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळून, त्यांना प्रेमाने आणि आदराने वागवून यहोवाच्या सेवेसाठी जे काही त्याग करता त्याची यहोवा मनापासून कदर करतो यात काहीच शंका नाही.—रोम. १२:१०. टेहळणी बुरूज२४.०२ १८ ¶११, १३