वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es24 पृ. १२१-१३४
  • ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑक्टोबर
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२४
  • उपशिर्षक
  • मंगळवार, १ ऑक्टोबर
  • बुधवार, २ ऑक्टोबर
  • गुरुवार, ३ ऑक्टोबर
  • शुक्रवार, ४ ऑक्टोबर
  • शनिवार, ५ ऑक्टोबर
  • रविवार, ६ ऑक्टोबर
  • सोमवार, ७ ऑक्टोबर
  • मंगळवार, ८ ऑक्टोबर
  • बुधवार, ९ ऑक्टोबर
  • गुरुवार, १० ऑक्टोबर
  • शुक्रवार, ११ ऑक्टोबर
  • शनिवार, १२ ऑक्टोबर
  • रविवार, १३ ऑक्टोबर
  • सोमवार, १४ ऑक्टोबर
  • मंगळवार, १५ ऑक्टोबर
  • बुधवार, १६ ऑक्टोबर
  • गुरुवार, १७ ऑक्टोबर
  • शुक्रवार, १८ ऑक्टोबर
  • शनिवार, १९ ऑक्टोबर
  • रविवार, २० ऑक्टोबर
  • सोमवार, २१ ऑक्टोबर
  • मंगळवार, २२ ऑक्टोबर
  • बुधवार, २३ ऑक्टोबर
  • गुरुवार, २४ ऑक्टोबर
  • शुक्रवार, २५ ऑक्टोबर
  • शनिवार, २६ ऑक्टोबर
  • रविवार, २७ ऑक्टोबर
  • सोमवार, २८ ऑक्टोबर
  • मंगळवार, २९ ऑक्टोबर
  • बुधवार, ३० ऑक्टोबर
  • गुरुवार, ३१ ऑक्टोबर
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२४
es24 पृ. १२१-१३४

ऑक्टोबर

मंगळवार, १ ऑक्टोबर

मंडळीत मी तुझी स्तुती करीन.​—स्तो. २२:२२.

आपण सर्वच उत्साहाने गीत गाऊन आणि चांगल्या प्रकारे तयार केलेली उत्तरं देऊन सभांमध्ये सहभाग घेऊ शकतो. पण काही जणांना सगळ्यांसमोर गीत गायला आणि उत्तरं द्यायला कठीण वाटू शकतं. तुम्हालाही असंच वाटतं का? वाटत असेल तर बऱ्‍याच भाऊबहिणींना आपल्या भीतीवर मात करायला कशामुळे मदत झाली ते पाहू या. काहींनी अनुभवलंय की मनापासून आणि उत्साहाने गीत गायल्यामुळे मदत होते. आपण सभांमध्ये राज्यगीतं गातो कारण त्यामुळे यहोवाची स्तुती होते आणि हेच गीत गाण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. म्हणून सभांमधल्या भागांची तयारी करताना आपण गीतांचाही सराव केला पाहिजे. सभांमधल्या भागांचा गीतांच्या बोलांशी कसा संबंध आहे याकडे लक्ष द्या. तसंच, तुम्ही कसं गाता याकडे जास्त लक्ष देण्याऐवजी गाण्यांच्या बोलांकडे लक्ष द्या. काही जणांना सभेत उत्तरं देणं कठीण जाऊ शकतं. मग अशा वेळी कशामुळे मदत होऊ शकते? प्रत्येक सभेत उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. लक्षात असू द्या की उत्तर लहान, सरळ आणि मुख्य मुद्दा स्पष्ट करणारं असलं, तर त्यात काहीच हरकत नाही. यहोवाचा गौरव करण्यासाठी आपण जी मेहनत घेतो त्याची तो कदर करतो. टेहळणी बुरूज२२.०४ ७-८ ¶१२-१५

बुधवार, २ ऑक्टोबर

यहोवा मला साहाय्य करतो; मी घाबरणार नाही.​—इब्री १३:६.

“साहाय्य करतो” हे शब्द अशा व्यक्‍तीला सूचित करतात, जो मदतीसाठी हाक मारणाऱ्‍या एखाद्याला संकटातून सोडवायला धावून येतो. यहोवा संकटात असलेल्या एखाद्या व्यक्‍तीच्या मदतीला धावून जातोय, असं चित्र तुमच्या डोळ्यांपुढे उभं करा. यावरून यहोवाला आपली मदत करायची खरंच मनापासून इच्छा आहे, आणि तो असं करायला उत्सुक आहे, हेच दिसून येत नाही का? यहोवा आपल्यासोबत असल्यामुळे आपण कोणत्याही समस्यांचा सामना करत असताना आनंदी राहू शकतो. यहोवा कोणत्या काही मार्गांनी आपल्याला मदत करतो याचं उत्तर आपल्याला यशयाच्या पुस्तकातून मिळतं. असं आपण का म्हणतो? कारण यशयाने देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या बऱ्‍याच भविष्यवाण्या आजच्या काळातल्या देवाच्या सेवकांच्या बाबतीत पूर्ण होत आहेत. शिवाय बऱ्‍याच ठिकाणी यशयाने आपल्याला समजू शकेल अशा शब्दांत यहोवाचं वर्णन केलंय. याची काही उदाहरणं आपण यशयाच्या ३० व्या अध्यायात पाहू शकतो. यहोवा आपल्याला कशी मदत करतो हे स्पष्ट करण्यासाठी यशया काही शब्दचित्रं आपल्या डोळ्यांसमोर उभी करतो. तो सांगतो, की यहोवा (१) आपल्या प्रार्थना लक्षपूर्वक ऐकून आणि त्यांचं उत्तर देऊन (२) आपलं मार्गदर्शन करून आणि (३) आपल्याला आज आणि भविष्यातही आशीर्वाद देऊन मदत करतो. टेहळणी बुरूज२२.११ ८ ¶२-३

गुरुवार, ३ ऑक्टोबर

तुला लवकरच जी दुःखं सहन करावी लागणार आहेत त्यांची भीती बाळगू नकोस. मरणापर्यंत विश्‍वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन.​—प्रकटी. २:१०.

स्मुर्णा आणि फिलदेल्फिया मंडळ्यांना येशूने सांगितलं की त्यांनी छळाचा सामना करायला भिऊ नये, कारण जर ते विश्‍वासू राहिले तर त्यांना मोठं प्रतिफळ मिळेल. (प्रकटी. ३:१०) आपला छळ नक्कीच होईल हे आपण ओळखलं पाहिजे आणि तो सहन करायला तयार असलं पाहिजे. (मत्त. २४:९, १३; २ करिंथ. १२:१०) प्रकटीकरणाचं पुस्तक आपल्याला सांगतं, की ‘प्रभूच्या दिवसात’ म्हणजे आज आपल्या काळात देवाच्या लोकांचा छळ होईल. (प्रकटी. १:१०) प्रकटीकरण १२ अध्यायात सांगितलं आहे, की येशू राजा बनल्यानंतर स्वर्गात लगेच एक युद्ध होतं. मीखाएल, म्हणजेच पुनरुत्थान झालेला गौरवी येशू ख्रिस्त आपल्या सैन्यांसोबत सैतान आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांसोबत लढतो. (प्रकटी. १२:७, ८) या युद्धात देवाच्या शत्रूंचा पराभव होतो आणि त्यांना पृथ्वीवर फेकून देण्यात येतं. यामुळे पृथ्वी आणि तिच्या रहिवाशांवर मोठी संकटं येतात.​—प्रकटी. १२:९, १२. टेहळणी बुरूज२२.०५ ५ ¶१२-१३

शुक्रवार, ४ ऑक्टोबर

आपला देव यहोवा हा अन्याय करत नाही.​—२ इति. १९:७

यहोवाचे निर्णय नेहमीच योग्य आणि न्यायाला धरून असतात. तो कधीच पक्षपात करत नाही. तसंच, एखादी व्यक्‍ती कशी दिसते, तिच्याजवळ किती पैसा आहे, समाजात तिला किती मान आहे किंवा तिच्याजवळ कोणत्या क्षमता आहेत हे पाहून यहोवा त्या व्यक्‍तीला माफ करायचा निर्णय घेत नाही. (१ शमु. १६:७; याको. २:१-४) कोणीही यहोवावर एखादा निर्णय घ्यायचा दबाव आणू शकत नाही किंवा त्याला लाच देऊ शकत नाही. तसंच, यहोवा कधीही रागाच्या भरात किंवा भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेत नाही. (निर्ग. ३४:७) तर, प्रत्येक व्यक्‍तीला आणि तिच्या परिस्थितीला समजून घेऊन तो निर्णय घेतो. आणि म्हणून तो सगळ्यात चांगला न्यायाधीश आहे असं आपण म्हणू शकतो. (अनु. ३२:४) यहोवाचं माफ करणं मानवांपेक्षा किती वेगळं असतं, ही गोष्ट इब्री शास्त्रवचनांच्या लेखकांनीही ओळखली होती. आणि म्हणून काही ठिकाणी, त्यांनी यासाठी एक खास इब्री शब्द वापरला. एका पुस्तकात असं म्हटलंय, “देव एका पापी व्यक्‍तीला जसं माफ करतो, ते सांगण्यासाठीच त्यांनी हा शब्द वापरला. मानव ज्या प्रकारे एकमेकांना माफ करतात, त्याबाबतीत त्यांनी कधीही हा शब्द वापरला नाही. कारण मानवांच्या माफ करण्याला मर्यादा असतात.” फक्‍त यहोवाच पश्‍चात्ताप करणाऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीला पूर्णपणे माफ करू शकतो. टेहळणी बुरूज२२.०६ ४ ¶१०-११

शनिवार, ५ ऑक्टोबर

मुलाला योग्य मार्गाने शिक्षण दे, म्हणजे म्हातारपणीही तो त्यापासून वळणार नाही.​—नीति. २२:६.

जर तुम्ही एकट्यानेच आपल्या मुलांना वाढवत असाल किंवा तुमचा जोडीदार सत्यात नसेल, तर याची खातरी बाळगा की तुमच्या चांगल्या उदाहरणामुळे इतर भाऊबहिणींचा विश्‍वास मजबूत होतो आणि त्यांना प्रोत्साहन मिळतं. पण तुम्ही घेत असलेल्या मेहनतीला तुमचं मूल योग्य प्रतिसाद देत नसेल तर काय? अशा वेळी हे विसरू नका, की मुलांना शिकवताना वेळ लागतो. जेव्हा आपण एखादं बी पेरतो तेव्हा ते चांगल्या प्रकारे वाढून फळ देईल का, हे आपल्याला माहीत नसतं. तरीसुद्धा ते चांगलं वाढावं म्हणून आपण त्याला पाणी घालत असतो, त्याची काळजी घेत असतो. (मार्क ४:२६-२९) त्याचप्रमाणे, आई या नात्याने आपल्या मुलांना तुम्ही जे काही शिकवत आहात ते त्यांच्या मनात रूजत आहे का, असा प्रश्‍न कदाचित तुमच्या मनात येईल. पण हे लक्षात घ्या, की मुलं पुढे जाऊन यहोवाची सेवा करतील की नाही, हे तुमच्या हातात नाही. पण यहोवाबद्दल त्यांना शिकवण्यासाठी तुम्ही पुरेपूर मेहनत घेत राहिलात तर त्याच्यासोबत जवळचं नातं जोडण्यासाठी तुमच्या मुलांना सर्वात चांगली संधी मिळेल. टेहळणी बुरूज२२.०४ १९-२० ¶१६-१७

रविवार, ६ ऑक्टोबर

गर्व झाला की नाश ठरलेला; घमेंडी वृत्ती आली, की माणूस अडखळतो.​—नीति. १६:१८.

शलमोन यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत होता तोपर्यंत त्याचा स्वतःबद्दल योग्य दृष्टिकोन होता. तरुणपणी त्याने नम्रपणे आपल्या मर्यादा ओळखल्या आणि यहोवाच्या मार्गदर्शनासाठी विनंती केली. (१ राजे ३:७-९) शलमोनने राज्य करायला सुरुवात केली तेव्हा गर्विष्ठपणा किती धोकादायक असू शकतो, हे त्याला माहीत होतं. दुःखाची गोष्ट म्हणजे नंतर शलमोन स्वतः या सल्ल्याच्या विरोधात वागला. काही वर्षं राज्य केल्यानंतर तो गर्विष्ठपणे देवाच्या नियमांकडे दुर्लक्ष करू लागला. उदाहरणार्थ, नियमशास्त्रात असं सांगण्यात आलं होतं, की राजाने “पुष्कळ बायका करू नयेत, नाहीतर त्याचं मन भरकटेल.” (अनु. १७:१७) पण शलमोनने या नियमाच्या विरोधात जाऊन ७०० बायका आणि ३०० उपपत्नी केल्या! (१ राजे ११:१-३) कदाचित शलमोनला असं वाटलं असेल, की मी हा नियम मोडला तरी माझं काही नुकसान होणार नाही. पण यहोवाची आज्ञा मोडल्यामुळे शलमोनला नंतर वाईट परिणाम भोगावे लागले.​—१ राजे ११:९-१३. टेहळणी बुरूज२२.०५ २३ ¶१२

सोमवार, ७ ऑक्टोबर

“माझा नीतिमान सेवक आपल्या विश्‍वासामुळे जगेल,” आणि “जर त्याने माघार घेतली, तर मला त्याच्याबद्दल मुळीच आनंद वाटणार नाही.”​—इब्री १०:३८.

आज सर्वांनी एक महत्त्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे. यहोवालाच या संपूर्ण विश्‍वावर राज्य करायचा अधिकार आहे ही गोष्ट मान्य करून ते यहोवाची बाजू घेतील, की त्याचा क्रूर शत्रू असलेल्या दियाबल सैतानाची बाजू घेतील हे त्यांनी ठरवलं पाहिजे. आणि प्रत्येकाला हा निर्णय घ्यावाच लागेल. दोन्ही दगडांवर पाय ठेवून चालणार नाही. प्रत्येक जण जो निर्णय घेईल त्यावरून हे ठरेल, की त्याला कायमचं जीवन मिळेल की नाही. (मत्त. २५:३१-३३, ४६) ‘मोठ्या संकटादरम्यान’ यहोवाच्या विश्‍वासू सेवकांवर खूण केली जाईल, ज्यामुळे त्यांचा येणाऱ्‍या नाशातून बचाव होईल. (प्रकटी. ७:१४; यहे. ९:४, ६) पण ज्यांनी स्वतःवर जंगली पशूची खूण करून घेतली आहे त्यांचा नाश होईल. (प्रकटी. १४:९-११) तुम्ही जर यहोवाच्या राज्याला पाठिंबा द्यायचं ठरवलं असेल, तर तुम्ही एक योग्य निर्णय घेतला आहे. आणि इतरांनीही हा योग्य निर्णय घ्यावा म्हणून त्यांना मदत करण्याची नक्कीच तुमची इच्छा असेल. जे यहोवाच्या शासनाला एकनिष्ठपणे पाठिंबा देतात त्यांना आशीर्वाद मिळतील. या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि म्हणून आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. असं केल्यामुळे यहोवाची सेवा करत राहण्याचा आपला निश्‍चय आणखी पक्का होईल. तसंच, शिकलेल्या या गोष्टींचा वापर करून आपण इतरांनाही योग्य निर्णय घ्यायला आणि यहोवाची सेवा करत राहायला मदत करू शकतो. टेहळणी बुरूज२२.०५ १५ ¶१-२

मंगळवार, ८ ऑक्टोबर

लोक तुमच्यावर सर्व प्रकारचे खोटे आरोप लावतात, तेव्हा तुम्ही सुखी आहात.​—मत्त. ५:११.

आपण आपल्या शत्रूंचं नाही तर यहोवाचं ऐकलं पाहिजे. यहोवा ईयोबशी बोलला तेव्हा त्याने लक्ष देऊन ऐकलं. यहोवाने ईयोबला बरेच प्रश्‍न विचारले आणि त्याला विचार करायला लावला. एक प्रकारे यहोवा ईयोबला असं म्हणत होता, ‘तुझ्यासोबत जे काही घडलंय, ते सगळं मला माहीत आहे. जर मी इतक्या अद्‌भूत गोष्टी निर्माण करू शकतो, तर मी तुझी काळजी घेऊ शकत नाही का?’ यहोवा किती चांगला आहे, याची ईयोबला जाणीव झाली आणि तो नम्रपणे म्हणाला: “मी आपल्या कानांनी तुझ्याबद्दल ऐकलं होतं, पण आता मी प्रत्यक्ष तुला डोळ्यांनी पाहतोय.” (ईयो. ४२:५) ईयोब हे शब्द बोलला तेव्हा तो कदाचित अजूनही तसाच राखेत बसलेला असेल. त्याच्या शरीरावरच्या फोडांच्या जखमांमुळे त्याला अजूनही वेदना होत असतील. पण असं असली तरी यहोवाने ईयोबला आपल्या प्रेमाची खातरी दिली आणि आपण त्याच्यावर खूश असल्याचं त्याला दाखवून दिलं. (ईयो. ४२:७, ८) आजसुद्धा कदाचित लोक आपला अपमान करतील. आणि जणू काही आपली किंमतच नाही अशा प्रकारे आपल्याशी वागतील. कदाचित ते आपलं आणि आपल्या संघटनेचं नाव खराब करायचा प्रयत्न करतील. पण ईयोबच्या अहवालातून आपल्याला हे शिकायला मिळतं, की यहोवाला आपल्याबद्दल हा भरवसा आहे की आपल्याला संकटांचा सामना करावा लागला, तरी आपण त्याला एकनिष्ठ राहू. टेहळणी बुरूज२२.०६ २४ ¶१५-१६

बुधवार, ९ ऑक्टोबर

कोकऱ्‍याच्या लग्नाची वेळ आली आहे.​—प्रकटी. १९:७.

जरा कल्पना करा, देवाच्या शत्रूंचा नाश झाल्यावर त्याच्या विश्‍वासू सेवकांना कसं वाटेल! किती आनंदाचा क्षण असेल तो! मोठ्या बाबेलचा नाश होईल तेव्हा तर स्वर्गात जल्लोष होईलच, पण आणखी एक घटना घडेल ज्यामुळे तिथे खूप मोठा आनंद साजरा केला जाईल. (प्रकटी. १९:१-३) खरंतर, याच घटनेने प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा शेवट होतो आणि ती घटना म्हणजे ‘कोकऱ्‍याचं लग्न.’ हर्मगिदोनची लढाई सुरू होण्याआधी १,४४,००० जणांपैकी सगळेच्या सगळे स्वर्गात असतील. पण त्या वेळी कोकऱ्‍याचं लग्न होणार नाही. (प्रकटी. २१:१, २) कोकऱ्‍याचं लग्न हर्मगिदोनच्या युद्धानंतर म्हणजे देवाच्या सगळ्या शत्रूंचा नाश झाल्यानंतर होईल. (स्तो. ४५:३, ४, १३-१७) कोकऱ्‍याच्या लग्नात कोणकोण सामील आहेत आणि ही घटना त्यांच्यासाठी खास का आहे? जेव्हा एका स्त्री आणि पुरुषाचं लग्न होतं तेव्हा जसं ते एक होतात, तसंच या लाक्षणिक लग्नामुळे राजा येशू ख्रिस्त आणि त्याची “वधू” म्हणजे १,४४,००० जण एक होतील. या खास घटनेनंतर १,४४,००० जण येशूसोबत पृथ्वीवर १,००० वर्षं राज्य करायला सुरुवात करतील.​—प्रकटी. २०:६. टेहळणी बुरूज२२.०५ १७ ¶११-१३

गुरुवार, १० ऑक्टोबर

मालक आल्यावर तो त्याला तसं करताना दिसला, तर तो दास आशीर्वादित ठरेल.​—मत्त. २४:४६.

येशूने सांगितलं होतं की शेवटच्या काळात आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी तो एका ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाला’ नियुक्‍त करेल. (मत्त. २४:४५) येशू ख्रिस्ताने देवाच्या सेवकांना आणि आवड दाखवणाऱ्‍या लोकांना “योग्य वेळी [आध्यात्मिक] अन्‍न पुरवण्यासाठी” या दासाचा म्हणजे अभिषिक्‍त जनांच्या छोट्या गटाचा वापर केलाय. पण असं असलं तरी हे अभिषिक्‍त भाऊ इतरांच्या विश्‍वासावर सत्ता गाजवत नाहीत. (२ करिंथ. १:२४) उलट, येशू ख्रिस्त त्याच्या लोकांचं “नेतृत्व करणारा आणि शासक” आहे ही गोष्ट ते ओळखतात. (यश. ५५:४) १९१९ पासून विश्‍वासू दासाने आवड दाखवणाऱ्‍या लोकांना देवाच्या वचनातलं सत्य समजून घ्यायला मदत करण्यासाठी वेगवेगळी पुस्तकं प्रकाशित केली आहेत. उदाहरणार्थ, १९२१ मध्ये बायबलची मूलभूत सत्य शिकता यावीत म्हणून या दासाने द हार्प ऑफ गॉड हे पुस्तक प्रकाशित केलं. आणि मग काळाच्या ओघात त्यांनी इतर प्रकाशनंही पुरवली. कोणत्या पुस्तकामुळे तुम्हाला आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल जाणून घ्यायला आणि त्याच्यासोबत एक जवळचं नातं जोडायला मदत झाली? टेहळणी बुरूज२२.०७ १० ¶९-१०

शुक्रवार, ११ ऑक्टोबर

तू सर्वकाळ मला आपल्यासमोर ठेवशील.​—स्तो. ४१:१२.

यहोवाइतका मोठ्या मनाचा कोणीच नाही. तुम्ही यहोवाला जे काही देता, त्याच्या शंभर पटीने जास्त तो तुम्हाला देईल. (मार्क १०:२९, ३०) या दुष्ट जगातही तो तुम्हाला सगळ्यात चांगलं आणि समाधानी आयुष्य देईल. आणि ही तर फक्‍त सुरुवात आहे. त्यानंतर तुम्ही कायम तुमच्या पित्याची उपासना करत राहू शकता. तुमचं आणि तुमच्या पित्यामधलं प्रेम दिवसेंदिवस वाढत जाईल आणि जोपर्यंत तुमचा पिता आहे अगदी तोपर्यंत, म्हणजे अनंतकाळापर्यंत तुम्ही जिवंत राहू शकाल. जेव्हा तुम्ही समर्पण करून बाप्तिस्म्याचं पाऊल उचलता, तेव्हा तुमच्याकडे यहोवासाठी काहीतरी खास करण्याची संधी असते. तुमच्याकडे असलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आणि तुमच्या जीवनातले आनंदाचे क्षण त्यानेच तुम्हाला दिले आहेत. मग या बदल्यात सबंध विश्‍वाच्या मालकाला तुम्ही काय देऊ शकता? तुम्ही त्याला मनापासून आणि एकनिष्ठतेने केलेली उपासना देऊ शकता. (ईयो. १:८; ४१:११; नीति. २७:११) आपण आपल्या आयुष्यात यापेक्षा चांगलं काय करू शकतो! टेहळणी बुरूज२३.०३ ६ ¶१६-१७

शनिवार, १२ ऑक्टोबर

एक तरुण आपला मार्ग शुद्ध कसा ठेवू शकतो? तुझ्या शब्दांप्रमाणे वागून आणि नेहमी सावध राहून.​—स्तो. ११९:९.

किशोरवयात लैंगिक भावना खूप तीव्र असतात आणि वाईट काम करायचा दबावही तुमच्यावर येण्याची शक्यता असते. सैतानाचीसुद्धा हीच इच्छा आहे की तुम्ही अशी वाईट कामं करावी. मग अशा वाईट कामांपासून दूर राहायला तुम्हाला कशामुळे मदत मिळेल? (१ थेस्सलनी. ४:३, ४) त्यासाठी यहोवाला प्रार्थना करा आणि त्याच्यासमोर आपलं मन मोकळं करा. तुम्हाला नेमकं कसं वाटतंय हे त्याला सांगा. आणि चुकीच्या कामांपासून दूर राहायला त्याच्याजवळ मदत मागा. (मत्त. ६:१३) यहोवाला आपल्याबद्दल काय वाटेल, असा विचार करू नका. त्याला तुम्हाला शिक्षा द्यायची नाही तर मदत करायची इच्छा आहे. (स्तो. १०३:१३, १४) तुम्हाला एकट्यानेच या सगळ्या समस्यांचा सामना करायचाय असा विचार करू नका. तर याबद्दल तुमच्या आईवडिलांशी बोला आणि त्यांना तुमच्या समस्या सांगा. कदाचित अशा विषयांवर त्यांच्याशी बोलायला तुम्हाला अवघड जाईल. पण हे बोलणं खूप महत्त्वाचं आहे. दररोज बायबल वाचल्यामुळे आणि त्यातल्या तत्त्वांवर मनन केल्यामुळे तुम्हाला यहोवाला आवडतील असे निर्णय घ्यायला सोपं जाईल. तुम्ही जर असं करत राहिला तर तुम्हाला समजेल की प्रत्येक गोष्टीसाठी नियमांची गरज नसते. उलट यहोवा कसा विचार करतो हे समजून घेऊन तुम्हाला त्याप्रमाणे निर्णय घेता येतील. टेहळणी बुरूज२२.०८ ५ ¶१०-१२

रविवार, १३ ऑक्टोबर

जो आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्या गरजा पुरवत नाही, त्याने विश्‍वास नाकारला आहे.​—१ तीम. ५:८.

ख्रिस्ती कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्याच्या जबाबदारीला खूप गंभीरतेने घेतात. तुम्ही जर एक कुटुंबप्रमुख असाल, तर घरात लागणाऱ्‍या गोष्टी कशा पुरवायच्या, घराचं भाडं किंवा हफ्ता कसा भरायचा याची चिंता तुम्हाला लागली असेल. हातातली नोकरी गेली तर दुसरी नोकरी मिळेल की नाही, अशी भीती तुम्हाला वाटली असेल. किंवा मग तुमची काही आध्यात्मिक ध्येयं असतील. पण कमी पैशात राहायला जमेल का, या भीतीमुळे तुम्ही जीवनात फेरबदल करायला घाबरत असाल. अशाच भीतीचा फायदा घेऊन सैतानाने बऱ्‍याच जणांना यहोवाची सेवा करण्यापासून रोखलंय. सैतान आपल्याला असं पटवून द्यायचा प्रयत्न करतो, की यहोवाला आपली काळजी नाही आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाचा सांभाळ आपल्यालाच करावा लागेल. जर आपण असा विचार केला तर आपण आपल्या हातातली नोकरी कशीही करून टिकवायचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी आपण कदाचित बायबलच्या तत्त्वांशी तडजोड करायलाही तयार होऊ. टेहळणी बुरूज२२.०६ १५ ¶५-६

सोमवार, १४ ऑक्टोबर

ही खातरीलायक आणि पक्की आशा आपल्या जिवासाठी एखाद्या नांगरासारखी आहे.​—इब्री ६:१९.

आपल्याला माहीत आहे की यहोवा हा “दयाळू, करुणामय आणि सहनशील” देव आहे. तसंच तो “एकनिष्ठ प्रेम आणि सत्याने भरलेला” आहे. (निर्ग. ३४:६) यहोवा कधीच अन्याय करत नाही. (यश. ६१:८) आपल्याला दुःख सहन करावं लागतं तेव्हा त्यालाही दुःख होतं. त्याने ठरवलेल्या वेळी तो आपल्या सगळ्या दुःखांचा अंत करणार आहे. खरंतर, तो असं करायला उत्सुक आहे. (यिर्म. २९:११) आपण त्या दिवसाची किती आतुरतेने वाट पाहतोय! खरंच यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि आपलंही त्याच्यावर खूप प्रेम आहे. सत्य आपल्यासाठी मौल्यवान असण्याचं आणखी एक कारण कोणतं आहे? ते कारण म्हणजे, सत्यामुळे आपल्याला बरेच फायदे होतात. याचं एक उदाहरण म्हणजे, बायबलमध्ये असलेल्या सत्यामुळे आपण हे शिकलो की देवाने भविष्यासाठी आपल्याला एक चांगली आशा दिली आहे. जसं नांगरामुळे जहाज एका जागी स्थिर राहतं, तसंच आपल्या जीवनात जेव्हा कठीण परीक्षा येतात तेव्हा बायबलमधल्या आशेमुळे आपण स्थिर राहतो आणि आपला विश्‍वास डळमळत नाही. आजच्या वचनात प्रेषित पौल अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना असलेल्या स्वर्गातल्या जीवनाच्या आशेबद्दल बोलत होता. पण पृथ्वीवरच्या नंदनवन कायम जगण्याची आशा असलेल्या ख्रिश्‍चनांनाही त्याचे हे शब्द लागू होतात. (योहा. ३:१६) खरंच, कायमच्या जीवनाच्या आशेबद्दल शिकून घेतल्यामुळे आपल्या जीवनाला एक उद्देश मिळाला आहे. टेहळणी बुरूज२२.०८ १४-१५ ¶३-५

मंगळवार, १५ ऑक्टोबर

सूर्य मावळेपर्यंत तुमचा राग राहू नये.​—इफिस. ४:२६.

एखाद्यावर प्रेम असल्याशिवाय आपण त्याच्यावर भरवसा ठेवू शकत नाही. पहिले करिंथकर १३ व्या अध्यायात प्रेमाच्या बऱ्‍याच पैलूंबद्दल सांगितलंय. त्यात सांगितलेल्या गोष्टींमुळे आपल्याला इतरांवर भरवसा ठेवायला मदत होऊ शकते. आणि जर त्यांच्यावरचा भरवसा उडाला असेल तर तो पुन्हा मजबूत करायलाही मदत होऊ शकते. (१ करिंथ. १३:४-८) उदाहरणार्थ, चौथ्या वचनात म्हटलंय, की “प्रेम सहनशील आणि दयाळू असतं.” आपण यहोवाविरुद्ध पाप केलं तरी तो आपल्याशी सहनशीलतेने वागतो. म्हणून जेव्हा आपल्या भाऊबहिणींच्या वागण्यामुळे आपल्याला वाईट वाटतं किंवा राग येतो, तेव्हा आपणसुद्धा त्यांच्याशी सहनशीलतेने वागलं पाहिजे. पाचव्या वचनात म्हटलंय, “[प्रेम] लगेच चिडत नाही, आपल्याविरुद्ध केलेल्या चुकांचा हिशोब ठेवत नाही.” म्हणून आपणही आपल्या भाऊबहिणींच्या “चुकांचा हिशोब” ठेवू नये. म्हणजेच आपल्या भाऊबहिणींच्या चुका पुढे त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आपण त्या आठवणीत ठेवू नयेत. उपदेशक ७:९ मध्ये म्हटलंय की आपण “लगेच रागावू” नये. आपल्या भाऊबहिणींबद्दल यहोवासारखाच विचार करायचा प्रयत्न करा. यहोवाचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि तो त्यांच्या चुकांचा हिशोब ठेवत नाही. म्हणून आपणही तेच केलं पाहिजे. (स्तो. १३०:३) आपण त्यांच्या चुकांकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांचे चांगले गुण पाहिले पाहिजेत.​—मत्त. ७:१-५. टेहळणी बुरूज२२.०९ ३-४ ¶६-७

बुधवार, १६ ऑक्टोबर

असा संकटाचा काळ त्या वेळी येईल.​—दानी. १२:१.

शेवटच्या काळात काही रोमांचक घटना कोणत्या क्रमाने घडतील याबद्दल दानीएलच्या पुस्तकात सांगण्यात आलंय. उदाहरणार्थ, दानीएल १२:१ मध्ये असं सांगण्यात आलंय, की मीखाएल म्हणजेच येशू ख्रिस्त “[देवाच्या] लोकांच्या वतीने उभा” राहतो. भविष्यवाणीतले हे शब्द १९१४ मध्ये पूर्ण व्हायला सुरुवात झाली. त्या वर्षी येशूला देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा म्हणून नियुक्‍त करण्यात आलं. दानीएलला असंही सांगण्यात आलं होतं की, ‘राष्ट्र निर्माण झालं तेव्हापासून कधीही आला नाही असा संकटाचा काळ येईल तेव्हा येशू उभा राहील.’ हा “संकटाचा काळ” मत्तय २४:२१ मध्ये सांगितलेलं “मोठं संकट” आहे. मोठ्या संकटाच्या शेवटी म्हणजे हर्मगिदोनमध्ये येशू उभा राहतो, म्हणजे देवाच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी कार्य करतो. देवाच्या या लोकांना प्रकटीकरणाच्या पुस्तकात, ‘मोठ्या संकटातून बाहेर येणारा मोठा लोकसमुदाय’ असं म्हटलंय.​—प्रकटी. ७:९, १४. टेहळणी बुरूज२२.०९ २१ ¶४-५

गुरुवार, १७ ऑक्टोबर

ज्याने माझ्याविरुद्ध पाप केलं असेल, त्याचं नाव मी माझ्या पुस्तकातून पुसून टाकीन.​—निर्ग. ३२:३३.

आज जी नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत ती पुसलीही जाऊ शकतात किंवा खोडलीही जाऊ शकतात. जणू यहोवाने ही नावं सुरुवातीला पेन्सिलने लिहिलेली आहेत. (प्रकटी. ३:५, तळटीप) पण जर आपली नावं कायमची किंवा पेनाने लिहिली जावीत असं आपल्याला वाटत असेल, तर आपण त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात आहेत तो पहिला गट अशा लोकांचा आहे ज्यांना येशूसोबत स्वर्गात राज्य करण्यासाठी निवडण्यात आलंय. प्रेषित पौलने फिलिप्पैमधल्या त्याच्या ‘सहकाऱ्‍यांना’ म्हणजे इतर अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना जे म्हटलं त्यावरून कळतं, की ज्यांना येशूसोबत राज्य करण्यासाठी निवडण्यात आलंय त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात आहे. (फिलिप्पै. ४:३) पण त्यांची नावं पुढेही या पुस्तकात राहावीत म्हणून त्यांनी शेवटपर्यंत विश्‍वासू राहणं गरजेचंय. मग त्यांचा मृत्यू होण्याआधी किंवा मोठं संकट सुरू होण्याआधी जेव्हा त्यांच्यावर शेवटचा शिक्का मारला जाईल, तेव्हा त्यांचं नाव कायमसाठी जीवनाच्या पुस्तकात लिहिलं जाईल.​—प्रकटी. ७:३. टेहळणी बुरूज२२.०९ १४ ¶३; १५ ¶५-६

शुक्रवार, १८ ऑक्टोबर

जे देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे वागतात तेच सुखी!​—लूक ११:२८.

तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का, की कोणीतरी तुमच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवलाय, पण तुम्ही खूपच घाईत असल्यामुळे किंवा दुसऱ्‍या कुठल्यातरी गोष्टीचा विचार करत असल्यामुळे तुम्ही तो घाईघाईत संपवला. आणि मग खाऊन झाल्यानंतर तुम्हाला वाटलं, की तो पदार्थ हळूहळू मजा घेत खाल्ला असता तर किती बरं झालं असतं! बायबल वाचत असतानासुद्धा काही वेळा असंच होऊ शकतं. कधीकधी आपण बायबल इतकं भरभर वाचतो, की त्यातल्या संदेशाचा आस्वादच आपल्याला घेता येत नाही. पण असं न करता आपण देवाचं वचन वाचण्यासाठी वेळ काढला पाहिजे, त्यातल्या दृश्‍यांना डोळ्यासमोर उभं केलं पाहिजे, कल्पनाशक्‍तीचा वापर करून त्यातल्या लोकांचा आवाज ऐकायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण जे वाचतो त्यावर विचार केला पाहिजे. असं केल्यामुळे बायबल वाचताना तुम्हाला खरंच खूप आनंद मिळेल. येशूने ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाला’ योग्य वेळी आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी नेमलंय. आणि त्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्‍न मिळतं. (मत्त. २४:४५) आणि हा विश्‍वासू दास आपल्याला जे काही पुरवतो ते सगळं काही बायबलवर आधारित असतं.​—१ थेस्सलनी. २:१३. टेहळणी बुरूज२२.१० ७-८ ¶६-८

शनिवार, १९ ऑक्टोबर

अहंकारी लोकांकडून अतोनात निंदा आमच्या वाट्याला आलाय.​—स्तो. १२३:४.

बायबलमध्ये आधीच सांगितलं होतं, की शेवटच्या काळात थट्टेखोर लोकांची कमी नसेल. (२ पेत्र ३:३, ४) हे लोक “स्वतःच्या दुष्ट वासनांप्रमाणे” चालतात. (यहू. ७, १७, १८) थट्टेखोर लोकांसारखी मनोवृत्ती आपल्यामध्ये येऊ नये म्हणून आपण सावध कसं राहू शकतो? एक म्हणजे, प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत टीका करणाऱ्‍या लोकांची संगत आपण टाळली पाहिजे. (स्तो. १:१) याचा अर्थ, आपण धर्मत्यागी लोकांचं ऐकणार नाही आणि त्यांचं कोणतंही साहित्य वाचणार नाही. या बाबतीत जर आपण काळजी घेतली नाही, तर आपलीही मनोवृत्ती या लोकांसारखीच टीकात्मक होऊ शकते. तसंच, आपण यहोवावर आणि त्याच्या संघटनेकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनावर शंका घ्यायलाही सुरुवात करू. आणि हे जर टाळायचं असेल, तर आपण या प्रश्‍नांवर विचार केला पाहिजे: ‘संघटनेकडून काही नवीन सूचना किंवा समज मिळते तेव्हा त्यात काही ना नाही खोट काढायचाच मी प्रयत्न करतो का? संघटनेत पुढाकार घेणाऱ्‍यांच्या चुका शोधण्याकडेच माझा कल असतो का?’ अशा प्रवृत्ती लगेच काढून टाकायचा आपण प्रयत्न करतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो.​—नीति. ३:३४, ३५. टेहळणी बुरूज२२.१० २० ¶९-१०

रविवार, २० ऑक्टोबर

इस्राएलचं घराणं मात्र तुझं ऐकणार नाही.​—यहे. ३:७.

‘कठोर मनाच्या आणि अडेल वृत्तीच्या’ लोकांना प्रचार करण्यासाठी देवाच्या पवित्र शक्‍तीनेच यहेज्केलला ताकद दिली. यहोवा यहेज्केलला म्हणाला: “बघ! मी तुझा चेहरा त्यांच्या चेहऱ्‍याइतकाच कठोर आणि तुझं कपाळ त्यांच्या कपाळाइतकंच कठीण केलंय. मी तुझं कपाळ हिऱ्‍यासारखं कठीण, गारगोटीच्या दगडापेक्षाही कठीण केलंय. तू त्यांना घाबरू नकोस किंवा त्यांचे चेहरे पाहून भिऊ नकोस.” (यहे. ३:८, ९) एका अर्थाने यहोवा यहेज्केलला म्हणत होता: ‘हे लोक अडेल वृत्तीचे असले तरी निराश होऊ नको. मी तुला मदत करीन.’ यानंतर देवाची पवित्र शक्‍ती यहेज्केलला त्या ठिकाणी घेऊन गेली जिथे त्याला प्रचार करायचा होता. याबद्दल यहेज्केलने लिहिलं: “यहोवाची शक्‍ती माझ्यावर जोरदारपणे कार्य करू लागली.” यहोवाने सांगितलेला संदेश लोकांना खातरीने सांगता यावा म्हणून तो पूर्णपणे समजून घ्यायला यहेज्केलला एक आठवडा लागला. (यहे. ३:१४, १५) मग यहोवाने त्याला एका खोऱ्‍यामध्ये जायला सांगितलं. तिथे “पवित्र शक्‍ती [त्याच्यामध्ये] आली.” (यहे. ३:२३, २४) आता यहेज्केल आपलं प्रचाराचं काम करायला तयार होता. टेहळणी बुरूज२२.११ ४-५ ¶८-९

सोमवार, २१ ऑक्टोबर

हे यहोवा, मी मदतीसाठी तुला कुठपर्यंत हाक मारू? तू कधी माझं ऐकशील? तू अत्याचार का खपवून घेतोस?​—हब. १:२, ३.

हबक्कूक संदेष्ट्याला बऱ्‍याच कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला. एकदा तर त्याला अशी शंका वाटू लागली, की यहोवाला त्याची खरंच काळजी आहे का? म्हणून त्याने यहोवाला प्रार्थना केली आणि आपल्याला कसं वाटतंय हे त्याला सांगितलं. आपल्या या विश्‍वासू सेवकाने मनापासून केलेली प्रार्थना यहोवाने ऐकली. (हब. २:२, ३) यहोवाने आपल्या लोकांना आधी कसं वाचवलं होतं याबद्दल विचार केल्यावर हबक्कूक पुन्हा आनंदी झाला. त्याला याची खातरी पटली की यहोवाला त्याची काळजी आहे आणि त्याच्यावर कोणतीही समस्या आली तरी यहोवा त्याला त्या समस्येचा धीराने सामना करायला मदत करेल. (हब. ३:१७-१९) यातून आपण काय शिकू शकतो? तुमच्यावर कठीण प्रसंग येतात तेव्हा यहोवाला प्रार्थना करा आणि तुम्हाला नेमकं कसं वाटतंय हे त्याला सांगा. आणि मदतीसाठी त्याच्यावर अवलंबून राहा. जर तुम्ही असं केलं तर तुमच्यासमोर असलेल्या समस्येचा धीराने सामना करण्यासाठी यहोवा तुम्हाला ताकद देईल याची तुम्ही खातरी बाळगू शकता. आणि यहोवा तुम्हाला कशी मदत करतो हे जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा त्याच्यावर असलेला तुमचा विश्‍वास आणखी मजबूत होईल. जर तुम्ही यहोवाची उपासना नियमितपणे करत राहिलात तर समस्यांमुळे किंवा मनात येणाऱ्‍या शंकांमुळे तुम्ही कधीही यहोवापासून दूर जाणार नाही.​—१ तीम. ६:६-८. टेहळणी बुरूज२२.११ १५ ¶६-७

मंगळवार, २२ ऑक्टोबर

आज मी तुला खरं सांगतो, तू माझ्यासोबत नंदनवनात असशील.​—लूक २३:४३.

येशू आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन गुन्हेगारांना खूप वेदना होत होत्या आणि ते आपले शेवटचे श्‍वास मोजत होते. (लूक २३:३२, ३३) हे दोन्ही गुन्हेगार येशूची निंदा करत होते. (मत्त. २७:४४; मार्क १५:३२) पण त्या दोन गुन्हेगारांपैकी एकाचं मन बदलतं आणि तो येशूला म्हणतो: “तू राजा होशील तेव्हा माझी आठवण ठेव.” यावर येशूने त्याला आजच्या वचनातले शब्द म्हटले. (लूक २३:३९-४२) येशू त्या गुन्हेगाराला जे म्हणाला त्यामुळे नंदनवनातलं आपलं जीवन कसं असेल यावर विचार करायची प्रेरणा आपल्याला मिळते. शलमोन राजाच्या काळात जी शांतिदायक परिस्थिती होती त्यातून आपल्याला नंदनवनाबद्दल बरंच काही शिकायला मिळतं. आणि शलमोनपेक्षा महान असलेला येशू ख्रिस्त आपल्या सहराजांसोबत मिळून या पृथ्वीवर एक सुंदर परिस्थिती आणेल याची खातरी आपण बाळगू शकतो. (मत्त. १२:४२) ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ पृथ्वीवर जगण्याची आशा असल्यामुळे साहजिकच नंदनवनात पृथ्वीवर कायमचं जगण्यासाठी काय करायची गरज आहे, या गोष्टींबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना असली पाहिजे.​—योहा. १०:१६. टेहळणी बुरूज२२.१२ ८ ¶१; ९ ¶४

बुधवार, २३ ऑक्टोबर

तू मदतीसाठी हाक मारताच देव तुझ्यावर कृपा करेल.​—यश. ३०:१९.

यशया आपल्याला ही खातरी देतो, की जेव्हा आपण यहोवाला मदतीसाठी हाक मारतो, तेव्हा तो लक्ष देऊन ऐकेल. आणि आपल्या प्रार्थनांचं लवकर उत्तर देईल. यशया पुढे म्हणतो: “तुझी हाक ऐकताच तो तुला उत्तर देईल.” हे शब्द आपला भरवसा वाढवतात आणि आपल्याला याची आठवण करून देतात, की आपला पिता त्याला हाक मारणाऱ्‍यांना मदत करायला उत्सुक आहे. ही गोष्ट समजल्यामुळे आपल्याला आपल्या समस्यांचा धीराने सामना करायला आणि आनंदी राहायला मदत मिळते. यहोवा आपल्यापैकी प्रत्येकाच्या प्रार्थनेकडे लक्ष देतो. आपण असं का म्हणू शकतो? यशयाच्या ३० व्या अध्यायाच्या सुरवातीला “तुम्ही” हे सर्वनाम वापरलेलं आहे. कारण तिथे यहोवा आपल्या सर्व लोकांना उद्देशून बोलत आहे. पण १९ व्या वचनात “तू” हे सर्वनाम यहोवाच्या प्रत्येक सेवकाला उद्देशून वापरलं आहे. यशया लिहितो, की “तू मुळीच शोक करणार नाहीस”; “देव तुझ्यावर कृपा करेल”; “तो तुला उत्तर देईल.” यहोवा कधीही आपली तुलना इतरांशी करत नाही. एका प्रेमळ पित्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाबद्दल यहोवाला काळजी आहे. आणि तो आपल्या प्रत्येकाच्या प्रार्थना लक्ष देऊन ऐकतो.​—स्तो. ११६:१; यश. ५७:१५. टेहळणी बुरूज२२.११ ९ ¶५-६

गुरुवार, २४ ऑक्टोबर

सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे भोळे असा.​—मत्त. १०:१६.

विरोध असतानाही जेव्हा आपण प्रचाराचं आणि शिकवण्याचं काम करतो, तेव्हा आपल्याला आनंद आणि शांती मिळते. पहिल्या शतकातल्या यहुदी अधिकाऱ्‍यांनी प्रेषितांना त्यांचं प्रचारकार्य थांबवण्याची आज्ञा दिली, तेव्हा त्यांनी त्यांच्याऐवजी देवाची आज्ञा पाळायचं ठरवलं. ते प्रचारकार्य करत राहिले आणि त्यामुळे त्यांना खूप आनंद मिळाला. (प्रे. कार्यं ५:२७-२९, ४१, ४२) जेव्हा आपल्या कार्यावर बंदी घातली जाते, तेव्हा आपण योग्य ती खबरदारी घेऊन प्रचारकार्य केलं पाहिजे. आपण आपल्या परीने शक्य असेल तितका प्रयत्न करत राहिलो, तर यहोवाचं मन आनंदित केल्यामुळे आणि लोकांचा जीव वाचवणाऱ्‍या कामात सहभाग घेतल्यामुळे आपल्याला देवाकडून मिळणारी शांती अनुभवता येईल. परिस्थिती कितीही वाईट झाली तरी आपण याची खातरी बाळगू शकतो, की देवाकडून मिळणारी शांती आपल्याला अनुभवता येईल. अशा परिस्थितीत आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की आपल्याला शांतीची गरज आहे आणि ती शांती फक्‍त यहोवाच आपल्याला देऊ शकतो. म्हणून जेव्हा महामारी पसरते, विपत्ती येतात आणि आपला छळ केला जातो तेव्हा यहोवावर विसंबून राहा. त्याच्या संघटनेला नेहमी जडून राहा. जे सुंदर भविष्य देव तुम्हाला देणार आहे, त्याबद्दल नेहमी विचार करत राहा. असं केल्यामुळे “शांतीचा देव तुमच्यासोबत राहील.”​—फिलिप्पै. ४:९. टेहळणी बुरूज२२.१२ २१ ¶१७-१८

शुक्रवार, २५ ऑक्टोबर

नवीन व्यक्‍तिमत्त्व धारण करा.​—इफिस. ४:२४.

हे करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. जसं की, सर्व प्रकारचा द्वेष, राग, क्रोध यांसारखे वाईट गुण आपण स्वतःमधून काढून टाकायचा प्रयत्न केला पाहिजे. (इफिस. ४:३१, ३२) पण हे वाटतं तितकं सोपं नाही. का बरं? कारण काही वाईट गुण आपल्या व्यक्‍तिमत्त्वात खोलवर रुजलेले असतात. उदाहरणार्थ, काही जण “तापट” स्वभावाचे असतात आणि त्यांना ‘लगेच राग येतो.’ (नीति. २९:२२) अशा प्रकारच्या वाईट गुणांना आपल्यामधून मुळासकट काढून टाकण्यासाठी आपल्याला बराच काळ प्रयत्न करत राहावे लागतील; मग आपला बाप्तिस्मा झाला असला तरीसुद्धा तसं करत राहावं लागेल. (रोम. ७:२१-२३) ज्या वाईट गुणांवर मात करायचा तुम्ही प्रयत्न करत आहात, त्यांबद्दल यहोवाला प्रार्थना करा. आणि असा भरवसा बाळगा, की तो तुमच्या प्रार्थना ऐकेल आणि तुम्हाला नक्की मदत करेल. (१ योहा. ५:१४, १५) यहोवा चमत्कार करून तो वाईट गुण तुमच्यातून काढून टाकणार नाही. पण त्यावर मात करण्यासाठी तो तुम्हाला नक्की ताकद देईल. (१ पेत्र ५:१०) प्रार्थना करण्यासोबतच त्यावर काम करा. आणि असं काहीही करू नका ज्यामुळे जुनं व्यक्‍तिमत्त्व पुन्हा तुमच्यामध्ये येईल. आणि चुकीच्या इच्छांना मनात घोळू देऊ नका.​—फिलिप्पै. ४:८; कलस्सै. ३:२. टेहळणी बुरूज२३.०१ १० ¶७, ९-१०

शनिवार, २६ ऑक्टोबर

जो कोणी देवावर प्रेम करतो, त्याने आपल्या भावावरही प्रेम केलं पाहिजे.​—१ योहा. ४:२१.

हे प्रेम दाखवायचा एक मार्ग म्हणजे, प्रचाराच्या कामात आवेशाने भाग घेणं. आपण कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सगळ्यांना राज्याचा संदेश सांगतो. एक व्यक्‍ती कोणत्या वंशाची किंवा रंगाची आहे, तिच्याकडे किती पैसा आहे किंवा समाजात तिचं काय स्थान आहे या गोष्टी आपण पाहत नाही. आपण असं करतो तेव्हा “सर्व प्रकारच्या लोकांचं तारण व्हावं आणि त्यांना सत्याचं अचूक ज्ञान मिळावं,” हा जो यहोवाचा उद्देश आहे त्याप्रमाणे आपण काम करतो. (१ तीम. २:४) आपण आपल्या भाऊबहिणींवर प्रेम करतो तेव्हासुद्धा आपण यहोवा आणि येशूवर प्रेम असल्याचं दाखवतो. भाऊबहीण एखाद्या समस्येतून जात असतात तेव्हा आपल्याला त्यांची मनापासून काळजी आहे हे आपण दाखवतो आणि त्यांना मदत करतो. जसं की, त्यांच्या एखाद्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू झाला असेल, तर आपण त्यांचं सांत्वन करतो, ते आजारी असतात तेव्हा आपण त्यांना जाऊन भेटतो किंवा ते निराश असतात तेव्हा आपण त्यांना धीर देतो. (२ करिंथ. १:३-७; १ थेस्सलनी. ५:११, १४) तसंच, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, कारण आपल्याला माहीत आहे की “नीतिमान माणसाने केलेल्या याचनेत खूप ताकद असते.”​—याको. ५:१६. टेहळणी बुरूज२३.०१ २८-२९ ¶७-८

रविवार, २७ ऑक्टोबर

एकमेकांना प्रोत्साहन देत [राहा] आणि एकमेकांना बळकट करत [राहा].​—१ थेस्सलनी. ५:११.

बांधकाम करणारा जसं आपली कौशल्यं सुधारत राहतो, तसंच आपणही आपल्या भाऊबहिणींना प्रोत्साहन देत राहायला शिकू शकतो. जे परीक्षांचा सामना करत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण अशा विश्‍वासू सेवकांचं उदाहरण त्यांना सांगू शकतो, ज्यांनी अशा समस्यांचा धीराने सामना केला. (इब्री ११:३२-३५; १२:१) इतरांच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करून आपण भाऊबहिणींना यहोवाच्या आणखी जवळ यायला मदत करू शकतो. तसंच काही कारणांमुळे जेव्हा वादविवाद किंवा मतभेद होतात, तेव्हा ते लवकरात लवकर मिटवून आपण मंडळीतली शांती टिकवून ठेवू शकतो. (इफिस. ४:३) यासोबतच त्या भाऊबहिणींना बायबलमधली महत्त्वाची सत्यं सांगून, त्यांना लागणारी मदत देऊन आणि ज्यांचा विश्‍वास कमजोर झाला आहे त्यांना प्रोत्साहन देऊन आपण त्यांचा विश्‍वास मजबूत करत राहू शकतो. भाऊबहिणींना प्रोत्साहन देणं हे एक प्रकारचं बांधकामच आहे. आणि या कामात सहभाग घेतल्यामुळे आपल्याला खूप आनंद आणि समाधान मिळतं. खरोखरच्या इमारती हळूहळू खराब होतात. पण भाऊबहिणींना प्रोत्साहन देऊन आपण जे काम करतो, ते कायम टिकून राहील. टेहळणी बुरूज२२.०८ २२ ¶६; २५ ¶१७-१८

सोमवार, २८ ऑक्टोबर

यहोवा स्वतः बुद्धी देतो; ज्ञान आणि समंजसपणा हे त्याच्याच तोंडून येतात.​—नीति. २:६.

मत्तय २४:१५ या वचनात म्हटलंय, की “वाचणाऱ्‍याने हे समजून घ्यावं.” यावरून देवाचं वचन समजून घेण्यासाठी आपल्याला आणखी एका गोष्टीची गरज आहे ते दिसून येतं. ती गोष्ट म्हणजे, समजबुद्धी. समजबुद्धी म्हणजे एका गोष्टीचा दुसऱ्‍या गोष्टीशी काय संबंध आहे किंवा एखादी गोष्टी दुसऱ्‍या गोष्टीपासून कशी वेगळी आहे हे समजण्याची किंवा लगेच लक्षात न येणारी एखादी गोष्ट समजून घेण्याची क्षमता. तसंच बायबलच्या भविष्यवाण्या पूर्ण करणाऱ्‍या घटना ओळखण्यासाठीही आपल्याला समजबुद्धीची गरज आहे असं येशूने म्हटलं. याशिवाय, बायबलमध्ये आपण जे काही वाचतो त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठीसुद्धा आपल्याला समजबुद्धीची गरज आहे. यहोवा त्याच्या सेवकांना समजबुद्धी देतो. त्यामुळे हा गुण वाढवण्यासाठी तुम्ही त्याच्याकडे प्रार्थनेत मदत मागू शकता. पण प्रार्थनेसोबतच तुम्ही त्यानुसार काम करणंसुद्धा गरजेचं आहे. हे तुम्ही कसं करू शकता? तुम्ही जे वाचता त्याचा तुम्हाला माहीत असलेल्या इतर गोष्टींशी कसा संबंध आहे याचं बारकाईने परीक्षण करा. बायबलमधल्या अहवालांचा अर्थ समजून घ्या आणि त्यांतल्या गोष्टी आपल्या जीवनात कशा लागू करायच्या हे पाहा. (इब्री ५:१४) अशा प्रकारे समजबुद्धीचा वापर करून जर तुम्ही वाचलं तर शास्त्रवचनांबद्दलची तुमची समज आणखी वाढेल. टेहळणी बुरूज२३.०२ १० ¶७-८

मंगळवार, २९ ऑक्टोबर

त्याच्यामुळेच आपण जिवंत आहोत आणि चालतो-फिरतो.​—प्रे. कार्यं १७:२८.

समजा तुमच्या मित्राने तुम्हाला एक सुंदर चित्र भेट म्हणून दिलं. ते चित्र एका प्रसिद्ध कलाकाराने काढलेलं अतिशय जुनं, पण तितकंच मौल्यवान आहे. ती एक अतिशय उत्कृष्ट कलाकृती आहे. पण त्या चित्रातले काही रंग थोडे फिके पडले आहेत, त्याला डाग लागले आहेत आणि त्या चित्राच्या कागदाला सुरकुत्या पडल्या आहेत. असं असलं तरी त्या चित्राची किंमत लाखांच्या घरात आहे. साहजिकच तुम्हाला त्या कलाकृतीची किंमत असल्यामुळे तुम्ही ती जिवापाड जपाल. त्याच प्रकारे, यहोवाने आपल्याला एक अतिशय सुंदर आणि मौल्यवान भेट दिली आहे. आणि ती भेट आहे जीवन. खरंतर त्याने त्याच्या मुलाचं जीवन आपल्यासाठी खंडणी म्हणून दिलं. आणि त्यावरून आपलं जीवन त्याच्यासाठी किती मौल्यवान आहे हे त्याने दाखवून दिलं. (योहा. ३:१६) जीवनाचा उगम यहोवा आहे. (स्तो. ३६:९) प्रेषित पौलने ही गोष्ट मान्य केली आणि म्हटलं, की “त्याच्यामुळेच आपण जिवंत आहोत आणि चालतो-फिरतो; त्याच्यामुळेच आपलं अस्तित्व आहे.” (प्रे. कार्यं १७:२५, २८) त्यामुळे आपण म्हणू शकतो की जीवन यहोवाकडून मिळालेली एक भेटच आहे. आणि जिवंत राहण्यासाठी आपल्याला ज्या-ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी तो आपल्याला प्रेमळपणे पुरवतो. (प्रे. कार्यं १४:१५-१७) पण तो चमत्कारिक रितीने आपल्या जिवाचं संरक्षण करत नाही. उलट आपण आपल्या शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्याची काळजी घ्यावी अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो.​—२ करिंथ. ७:१. टेहळणी बुरूज२३.०२ २० ¶१-२

बुधवार, ३० ऑक्टोबर

मी ज्या गोष्टी तुला सांगतोय, त्या सगळ्या एका पुस्तकात लिही.​—यिर्म. ३०:२.

यहोवाने आपल्याला बायबल दिलंय, यासाठी आपण त्याचे किती आभारी आहोत! रोजच्या जीवनातल्या समस्यांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी, बायबलमध्ये त्याने मोलाचा सल्ला दिला आहे. तसंच, भविष्यासाठी त्याने आपल्याला एक सुंदर आशाही दिली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, बायबलमध्ये त्याने त्याच्या बऱ्‍याच गुणांबद्दल सांगितलंय. त्याच्या या सुंदर गुणांवर आपण विचार करतो तेव्हा आपलं मन खरंच भरून येतं आणि आपल्याला त्याच्याशी आणखी जवळची मैत्री करावीशी वाटते. (स्तो. २५:१४) लोकांनी आपल्याला जाणून घ्यावं अशी यहोवाची इच्छा आहे. त्यासाठी पूर्वी त्याने काही लोकांना स्वप्नं आणि दृष्टान्त दाखवले. तसंच स्वर्गदूतांद्वारे त्यांच्यापर्यंत संदेश पोचवले. (गण. १२:६; प्रे. कार्यं १०:३, ४) पण ही स्वप्नं, दृष्टान्त आणि संदेश लिहून ठेवले नसते, तर आपल्याला त्यांबद्दल कळलं नसतं आणि त्यांचा अभ्यासही करता आला नसता. म्हणूनच यहोवाने काही माणसांना या गोष्टी ‘एका पुस्तकात लिहायला’ सांगितल्या. ‘खऱ्‍या देवाचा मार्ग परिपूर्ण असल्यामुळे’ त्याने आपल्यासोबत बोलण्यासाठी हे जे माध्यम निवडलंय, ते खरंच खूप चांगलं आणि आपल्या फायद्याचं आहे, अशी आपण खातरी ठेवू शकतो.​—स्तो. १८:३०. टेहळणी बुरूज२३.०२ २ ¶१-२

गुरुवार, ३१ ऑक्टोबर

घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.​—प्रे. कार्यं २०:३५.

योग्य ध्येयं ठेवा. अशी ध्येयं ठेवा ज्यामुळे तुमचा विश्‍वास मजबूत होईल आणि तुम्हाला एक प्रौढ ख्रिस्ती बनायला मदत होईल. (इफिस. ३:१६) जसं की, तुम्ही नियमितपणे वैयक्‍तिक अभ्यास करायचं आणि दररोज बायबल वाचायचं ध्येय ठेवू शकता. (स्तो. १:२, ३) तसंच, तुम्ही दिवसातून जास्त वेळा आणि मनापासून प्रार्थना करायचा प्रयत्न करू शकता. कदाचित तुम्ही कोणत्या प्रकारचं मनोरंजन करता आणि तुमच्या वेळेचा वापर कसा करता याकडे लक्ष द्यायची गरज असेल. याबाबतीत योग्य निर्णय घ्यायचं ध्येय तुम्ही ठेवू शकता. (इफिस. ५:१५, १६) इतरांची मदत करूनही तुम्ही एक प्रौढ ख्रिस्ती बनू शकता. जसं की, तुम्ही तुमच्या मंडळीतल्या वयस्कर आणि आजारी भाऊबहिणींना मदत करायचं ध्येय ठेवू शकता. त्यांची काही कामं तुम्ही करून देऊ शकता किंवा त्यांना मोबाईल किंवा टॅब वापरायला मदत करू शकता. तसंच, राज्याचा संदेश सांगण्याद्वारे तुम्ही लोकांना प्रेम दाखवू शकता. (मत्त. ९:३६, ३७) शक्य असेल तर पूर्ण वेळेची सेवा करण्याचं ध्येयसुद्धा तुम्ही ठेवू शकता. टेहळणी बुरूज२२.०८ ६ ¶१६-१७

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा